OLX व तत्सम प्रकारच्या साईटवर ऑनलाईन खरेदी विक्रीत होणारे फ्रॉड

Submitted by शांत प्राणी on 20 January, 2022 - 16:49

OLX , Quicker , ebay अशा साईटवर पूर्वी जुन्या वस्तू काढून टाकण्यासाठी जाहीराती केल्या आहेत. काही ठिकाणी त्या विकल्याही आहेत. नुकताच OLX वर चालणार्‍या एका फ्रॉडला मी सामोरा गेलो त्याचा अनुभव.

मुलं खूप लहान असताना जे फर्निचर घेतलं होतं ते काढून आता नवीन फर्निचर बनवायचं होतं. त्या वेळी बजेटही कमी असल्याने स्वस्तातलं फर्निचर घेतलं होतं. ते सगळं काढून टाकायचं होतं. बरेचदा जुनं फर्निचर फुकट द्यावे लागते. या वेळी जे मिळेल ते घेऊन देऊन टाकू असा विचार केला. ओएलएक्स वर यापूर्वी जाहीराती दिल्या होत्या. लोक पहायलाही येतात. व्यवहार असा नव्हता झाला. त्या वेळी डिजिटल पेमेंटचा बोलबाला नव्हता.

या वेळी बंक बेड सुटा करून त्याचे दोन बेड केले होते. त्यातला एक वॉचमनला हवा होता म्हणून त्याला तसाच देऊन टाकला. दुसर्‍याची जाहीरात टाकली. त्याला लगेचच रिस्पॉन्स आला. मी हा बेड थेट कारखान्यात जाऊन हवा तसा बनवून घेतला होता. त्यांच्याकडून जेव्हां मॉलमधे जातो तिथल्या आणि इथल्या किंमतीतला फरकही माहिती होता. मॉलला साडेसहा हजार मधे विकतात. तो तिथे ४३००० ला विक्रीला असतो. मला ओळखीने फॅक्टरीच्या प्राईसमधे मिळाल्याने मी खूष होतो. किंमत मुद्दाम साडेसहा हजार ठेवली होती.

मला ज्या नंबरने इंटरेस्ट दाखवला होता त्याने त्याचे बाणेरला फर्निचर खरेदी विक्रीचे दुकान आहे असे सांगितले. मी त्याला मॉलमधे किंमत बघा आणि बघायला या असा निरोप दिला. तो म्हणाला लास्ट बोलो. किंमत ४५०० ठरली. मला हे माहिती होतं की कोणत्याही जुन्या फर्निचरच्या दुकानदाराने २००० रूपयेच दिले असते. त्याने विचारले अजून काही आहे का ? मग बायकोच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तिने एखाद्या कसलेल्या बिझनेसमनप्रमाणे जुने अडगळ झालेले वॉर्डरोब, एक सागवानी ड्रेसिंग टेबल आणि एक पुस्तकाचे कपाट याचा सौदा केला. पुस्तकाचे कपाट कशाला हे विचारल्यावर तिने मला शांत बसायला सांगितले. या सर्वांचे मिळूने १४००० रूपये ठरले. चांगला सौदा होता. नाहीतर फुकट द्यावे लागले असते. जुने फर्निचर तसेही कुणी घेत नाही.

याने फारशी घासाघीस केली नाही याचे नवल वाटले. नावाला केली होती. तो म्हणाला निम्मे पैसे आज ट्रान्सफर करीन निम्मे उद्या. मी म्हणालो आधी येऊन फर्निचर बघून जा. तो म्हणाला " त्याची गरज नाही. आम्हाला अंदाज असतो".

थोड्या वेळाने परत फोन आला. म्हणाला मी आजच पैसे ट्रान्स्फर करतो. कुणाला सौदा करू नका आणि जाहीरात डिलीट करून टाका. फक्त एव्हढे सगळे सामान आणायचे तर टेंपो आणावा लागेल. त्यामुळे फायनल किंमत १३०००/-. आता इथे बायकोला हजार रूपयाचे नुकसान दिसायला लागले. मी म्हणालो जाऊ दे. अडगळ जातेय.

थोड्या वेळाने त्याचा फोन आला. मी एका डिजाईन मधे गर्क होतो. बायकोला खूण केली कि तूच बघ. तो म्हणाला पैसे पाठवतोय. मग नाईलाज झाला.
तो म्हणाला " मी तुम्हाला पाच रूपये पाठवतो. ते मिळाले की सांगा". त्याला गुगल पे चा नंबर दिलाच होता. तो म्हणाला पाच रूपये तुम्हाला पाठवले आहेत. मी म्हणालो नाही आले. त्याने मग क्रेडीट कार्डचं मशीन सुरू केलं. शेठच्या दुकानावर आलोय. लवकर करा. हा नंबर टाईप करा. मग दहा रूपये अमाऊंट लिहून सेन्ड करा म्हणाला.

मी बुचकळ्यात पडलो. पेमेन्ट रिसीव्ह व्हायला पाहीजे. हे सेन्डचं बटण कशाला दाबायचं. मी त्याला विचारलं. तो म्हणाला या मशीनची हीच प्रोसिजर आहे. कुठे पाच दहा रूपयाकडे बघता.
मी पाच रुपये सेन्ड केले. त्याने ताबडतोब तिकडून दहा रूपये पाठवले.
म्हणाला हे बघा पाच रूपये तुमच्या अकाउंटला जमा झाले आहेत. एक स्क्रीनशॉट होता. मी चेक केले. तर दहा रूपये डिडक्ट झालेले आणि पाच रूपये आले होते. त्याच्या बोलण्यात शंका घ्यायला अनेक जागा होत्या. जसे की मी विचारले की माझ्याकडून पाच रूपये डिडक्ट झालेत. तर तो म्हणायचा की आता तुमची टोटल पाच रूपयाने प्लस आहे का बघा. म्हणजे तुम्हाला पाच रूपये आले. ही मशीन असेच पैसे पाठवते. बँकेचे त्या दोन व्यवहाराची डिटेल्स. गुगल पे चे त्या तारखेचे डिटेल्स नाहीत.
bank.jpg

आता त्याने सांगितले की मी साडेसहा हजार रूपये पाठवले आहेत. तुम्ही मागच्या प्रमाणेच प्रोसिजर करून साडेसहा हजार अमाऊंट टाकून सेन्डचं बटण दाबून ट्रॅन्जॅक्शन अ‍ॅप्रूव्ह करा. मी सावध झालो. हा शेंडी लावतोय हे सरळ होतं. सेन्डचं बटण दाबलं की पैसे जाणार. मी फोन उचलून त्याला म्हणालो की तू तिकडून पैसे पाठव मी पैसे सेन्ड करणार नाही. तर तो शिव्या द्यायला लागला. माझे पैसे गेले. तुम्ही मला धोका दिला.

मी म्हणालो " मी कुणाचा एक पैसाही कधी घेणार नाही. तुझे पैसे माझ्याकडे आलेत याचा पुरावा पाठव. तर त्याने अगदी खरी खुरी रिसीट पाठवली. त्यात अमाऊंट ६५०० होती. माझा अकाऊंट नंबर (फुल्यांसहीत), माझे नाव दिसत होते. ट्रॅन्झॅक्शन नंबर होता. मी अकाऊंट चेक केले. तर पैसे आले नव्हते. त्या दिवशी शनिवार होता. बँक आता बंद झाल्या होत्या. मी त्याला म्हणालो "पैसे जमा झालेले नाहीत. तुम्ही उद्या याल तोपर्यंत कदाचित पैसे जमा होतील. नाही झाले तर सोमवारी होतील. एक दिवस इकडे तिकडे होईल"

तर त्याचा संयम सुटला. मला फसवलं म्हणाला. मी पोलीस तक्रार करतो म्हणाला. मी म्हणालो ठीक आहे कर.
बायकोला दरदरून घाम फुटला होता. मला एकीकडे हा फ्रॉडही वाटत होता. दुसरीकडे पैसे ट्रान्स्फर झाले असतील पण कधी कधी बँक २४ ते ४८ तास घेते ती गोष्ट याला माहिती नसेल असे वाटत होते. पैसे आले तर त्याला परत देऊन टाकू आणि याच्याशी व्यवहार नको असे ठरवले. त्याला पुन्हा फोन करून सांगून टाकले. तिकडून धमक्या यायला लागल्या.

मग मी सायबर सेलचं पोर्टल काढलं. तिथे तक्रारच रजिस्टर होईना. मग सरळ पोलीस स्टेशन गाठलं.
घरातून बाहेर पडल्यावर मात्र अचानक आपले सर्व डिटेल्स त्याच्याकडे गेल्याची जाणिव झाली. आता माझ्या हातापायांना कापरं भरलं. कारण कधी नाही ते नेमके बँकेत मोठी रक्कम होती. गाडी थांबवून फोनवरून बँकेच्या वेबसाईटवर जायचा प्रयत्न केला तर पासवर्डच आठवेना. गडबडीत तीनदा पासवर्ड चुकीचा टाईप झाला आणि अ‍ॅक्सेस २४ तासांसाठी बंद झाला. आता धीरच सुटला. कसे बसे पो स्टे गाठले.

पोलिसांनी शांतपणे ऐकून घेतले. ही आमची केस नाही सायबरला नोंदवावी लागेल. त्यांना सायबरचा अनुभव सांगितला. मग त्यांनी आमची शाळा घेतली. सुशिक्षित असून वगैरे सगळे ऐकवले. मग म्हणाले रोज कंप्लेट येतात. हाच प्रकार आहे. खरं तर माझ्यासमोरच एक जोडपं हीच तक्रार घेऊन आले होते. तीच साईट, तीच पद्धत. तोच मनुष्य.

मग मला नीट बोलताही येईना. पोलीस म्हणाले पहिल्यांदा बँकेला फोन करा. गुगलपे, पेटीएम, ऑनलाईन सगळे बंद करा. त्यांना सगळे सांगा. आधी अकाउंट सेफ करा. मग ते तुम्हाला सूचना करतील. बँकेत किती आहेत पैसे ?
मी आकडा सांगितला. त्यांनी मान डोलावली आणि म्हणाले " साफ झाले असतील आतापर्यंत. त्यांनी फेक ट्रॅन्झॅक्शन करून तुमचे डिटेल्स मिळवले. आता साफ झाली असेल बँक"

मला दरदरून घाम फुटला. बायको तर मटकन खाली बसली.
मी तसाच बाहेर येऊन फोन केला. तर बँक बंद झाली होती. हेल्पलाईनला फोन केला. ते म्हणाले आम्ही इकडून काही करू शकत नाही. मी प्रोसिजर सांगते. ती प्रोसिजर सांगत होती. पण मला ते मल्टीटास्किंग मोबाईलवर अजिबात जमत नाही. त्यातून ऑनलाईन बँकींग २४ तास ब्लॉक झाले आहे ही जाणीव होती. मला काही सुचेना. फोन बंद केला.

सरळ घरी आलो. चहा घेतला. मग डोकं जाग्यावर आलं. बँक अकाउंट पुन्हा अ‍ॅक्सेस करण्यासाठी ब्लॉक काढणे गरजेचे होते. कस्टमर केअर वालीने तीन पर्याय सांगितले त्यातला एक एटीम पिनचा सांगितला. मी सरळ एटीम मशीन कडे गेलो. पण त्यात कुठे सापडेना. पुन्हा फोन केल्यावर मग लक्षात आले. यो नं वरून मग सगळी प्रोसिजर पूर्ण केली. एटीम पिन रिसेटच्या मेन्यु मधेच ऑनलाईन ब्लॉक कसा काढायचा ते दिले होते. अकाऊंट चालू झाले.

आता धडाधड सर्व परवानग्या बंद केल्या. गुगल पे बंद केले. पेटीम बंद केले. ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन बंद केले. सुदैवाने पैसे सुरक्षित होते.
सात दिवस याच अवस्थेत काढले. सारखी भीती वाटत होती. इतक्यात ओएलएक्सचा मेसेज आला की तुम्ही ज्याच्याशी व्यवहार केला तो संशयास्पद अकाऊंट आहे. बाजूच्या बिल्डींगमधल्या एका बाईनेही आमच्याकडे येऊन सांगितले. आमच्या दुस-याच दिवशी हाच इसम तिला याच पद्धतीने फसवत होता. तिने तक्रार दिली. तिची तक्रार ऑनलाईन गेली. त्याला अटक झाली. माणूस बिहारचा निघाला.

ही माहिती मी काढलीच होती.
खूप जणं याला बळी पडले आहेत. तो माणूस हुषारीने अ‍ॅप्रूव्ह करा असा शब्द वापरतो. अशीही पद्धत असेल असे समजून लोक सेन्ड बटण दाबतात. पहिल्यांदा तो दहा रूपये पाठवायला सांगून हा मनुष्य बेवकूफ बनू शकतो का हे चेक करतो. विश्वास जिंकायला पाच रूपये पाठवतो. पाच रूपये आल्याचा एसएमएस आला की कुणी पुन्हा मुद्दाम अकाउंट चेक करत नाही.

पुढे तो अकाऊंट हॅक करतो कि नाही हे ठाऊक नाही. पण बहुतेक अशाच पद्धतीने पाच दहा हजाराला टोपी लावत असेल.
गुगल केल्यावर बरीच माहिती दिसली. अनेकांनी कंपनीला कळवलेलं पण आहे. तरीही ही कंपनी इतकी बेफिकीर कशी काय ?
आमचा किस्सा सोसायटीत फेमस झाल्यावर अजून पर्यंत कुणी ना कुणी आम्हालाही अनुभव आला पण तुमचा अनुभव आठवला असे सांगतात. असे आणखीही लोक आहेत.

तरीही शंका नको म्हणून लॅपटॉप दुरूस्तीला दिला. फॅक्टरी रीसेट आणि सगळे पासवर्ड बदलले. त्यानंतर मग बँकेचे व्यवहार पुन्हा सुरू केले.
पण गुगल पे ची अजूनही भीती वाटते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे! हे भयंकर आहे Sad असेही होऊ शकते हे माहित नव्हते. एक सरळ साधा व्यवहार पण पापणी लवायच्या आत किती भयंकर वळण घेतले. ज्या अर्थी त्या मनुष्याने इतरही अनेक जणांना या पद्धतीने फसवले त्याअर्थी हि मोड्स ओप्रंडी वापरणारा हा सराईत गुन्हेगार असणार.

>> त्याने मग क्रेडीट कार्डचं मशीन सुरू केलं. शेठच्या दुकानावर आलोय. लवकर करा. हा नंबर टाईप करा. मग दहा रूपये अमाऊंट लिहून सेन्ड करा म्हणाला.

हे नक्की कसे झाले कळले नाही. तिकडच्या क्रेडीट कार्ड मशीनवर इकडून आपल्या फोनवरून ट्रांझाक्शन? पण त्यासाठी ॲप तरी हवे आपल्याकडे? त्याने कोणत्या ॲपवरून नंबर टाईप करयला सांगितला? हा फसवणुकीचा काहीतरी नवीनच प्रकार वाटतोय.

ऑनलाईन फसवणूक बाबत जे माहित असलेले प्रकार आहेत ज्याबाबत ओलक्स ने ग्राहकांना सावध केले आहे. त्यापैकी हे दोन.

१. गुगल पे वर पैसे स्विकारण्यासाठी म्हणून रिक्वेस्ट करतात पण प्रत्यक्षात ती त्यांना आपल्याकडून पैसे जाण्यासाठी असते ज्यामध्ये आपल्याला आपला पीन द्यावा लागतो.
https://www.youtube.com/watch?v=YePK0hIc6UE

२. पैसे तुम्हाला मिळावेत या सबबीखाली QR Code पाठवतात. पण प्रत्यक्षात तो QR Code पैसे तुमच्याकडून त्यांना जाण्यासाठी असतो आणि इथेही आपल्याला पीन द्यावा लागतो.
https://www.indiatvnews.com/technology/news-caught-in-online-money-scam-...

पैसे आपल्याला यायचे असतील तर त्यासाठी पीन लागत नाही. पीन फक्त पैसे देताना लागतो. पण हे आपल्याला ऐनवेळी पट्कन लक्षात येत नाही व तिथेच अनेकजण फसतात.

काही असो. मला ओलेक्स वर व्यवहार करताना कधीच सुरक्षित वाटले नाही. आजवर फार नाही पण दोन तीन वेळच ती साईट वापरली आहे. एक तर अमझोन सारखे ओलेक्स पेमेंट ची जबाबदारी स्वत: घेत नाही. ते फक्त collaborator आहेत. वस्तू घेणार्यांनी आणि देणार्यांनी एकमेकाशी संपर्क साधून व्यवहार करायचा. इथेच चोरांना स्कोप मिळतो. अनोळखी व्यक्तीवर विश्वास कसा ठेवणार? "वस्तू आधी पाठवायची/घ्यायची कि पैसे आधी द्यायचे/घ्यायचे?" इथून सुरवात. त्यामुळे जास्त किंमत असलेले व्यवहार ओलेक्स वर करणे धोकाच वाटतो. मागे एकदा एक वस्तू ओलेक्सवरून घेतली. देणाऱ्याने ऐनवेळी त्यात "अमुक एक्सेसरीज नाही तमुक पार्ट नाही. पण काळजी करू नका मी तुम्हाला ते नंतर देतो" म्हणून सांगितले. तरी नशीब तोवर मी सगळे पैसे दिले नाहते. मग मी त्याला स्पष्ट संगितले "तसे असेल तर मी त्याचे पैसे सुद्धा कट करतो. जेंव्हा तू ते एक्सेसरीज देशील तेंव्हा उरलेले पैसे तुला देईन". त्याला तो आढेवेढे घेत कसाबसा तयार झाला. वस्तू मला मिळाली खरी. पण माझा अंदाजसुद्धा खरा ठरला. त्या एक्सेसरीज त्यानंतर मला कधीच मिळाल्या नाहीत!

शांमा, आपला अनुभव शेअर केलात धन्यवाद. म्हणजे कुठे कुठे सावध राहायला हवे हे अशा अनुभवातूनच इतरांना शिकायला मिळते. पुन्हा एकदा धन्यवाद.

बापरे बरेच रामायण झाले की घरबसल्या
बरे झाले इतक्या तपशीलवार लिहिलं ते

पण मला एक कळलं नाही, गुगल पे चे डिटेल्स गेले तर त्यावरून ते बँक अकाउंट कसे काय साफ करू शकतात
गुगल पे वर असे काय डिटेल्स असतात ज्यावरून कुणीही व्यक्ती बँक अकाउंट ऍक्सेस करू शकेल

आशुचँप आणि अतुलजी आभार आपले.

गुगल पे चे डिटेल्स गेले तर त्यावरून ते बँक अकाउंट कसे काय साफ करू शकतात >> हे मी तरी कसे सांगणार ? मला यातले ज्ञान नाही हे आधीच म्हटले आहे. मला खाकी वेषातल्या पोलीसांनी जे जे सांगितले त्यावरून मला काय काय भीती वाटली हे मी लिहीले आहे. असे होऊ शकते कि नाही हे मी सांगू शकत नाही. पोलीसांनी सुद्धा त्यांच्याकडे येणार्‍या तक्रारीचा पाढा वाचून पटकन खबरदारीचे उपाय करायला सांगितले जे मी केले.

माझा मोबाईल नंबर त्या व्यक्तीकडे गेला होता. बँकेच्या ट्रॅझॅक्शन नंबर वरून हे लोक तुमचे अकाऊंट हॅक करतील हे पोलिसांनी सांगितले होते. जर ते बनावट पावती बनवू शकतात तर काहीही करू शकतात. विषाची परीक्षा नको असे मलाही वाटले.

same प्रकार माझ्या सोबत झाला olx वरून.. तो माणूस वस्तू बघण्या आधीच payment ची खूप घाई करत होता .. item कोणाला देऊ नका.. मी घेतो.. माझा वानवडी ला शॉप आहे.. हिंदी बोलत होता .. आपला व्यवहार कन्फर्म आहे.. आणि त्याने आधी १ rs पाठवला .. मग म्हणाला आता लगेच transaction approve करा.. खूप खूप घाई करत होता.. आणि मी पण hypnotise झाल्यासारखा त्याचे instructions follow केले आणि खूप पैसे घालवून बसले..

त्याच्या बोलण्यातून आता मी आठवते तेव्हा fraud च्या खूप clues मिळत होत्या .. पण माझ्या तेव्हा ते अजिबात लक्षात आले नाही..
आपण सगळ्यांशी चांगले वागतो बोलतो म्हणून आपल्याला वाटते कि सगळं जग चांगला आहे आणि कोणी आपल्याला फसवणार नाही..

मला सायबर सेल चा खूप खराब अनुभव आला.. त्यांनी काहीच केले नाही..

मागच्या वर्षी हे झाला.. मी खूप दिवस gpay use करायला पण घाबरत होते .. खूप त्रास झाला या सगळ्याचा .. स्वतः वरचा कॉन्फिडन्स एकदम शून्य होतो यामुळे..

हे नक्की कसे झाले कळले नाही. तिकडच्या क्रेडीट कार्ड मशीनवर इकडून आपल्या फोनवरून ट्रांझाक्शन? पण त्यासाठी ॲप तरी हवे आपल्याकडे? त्याने कोणत्या ॲपवरून नंबर टाईप करयला सांगितला? हा फसवणुकीचा काहीतरी नवीनच प्रकार वाटतोय. >>> ही लोणकढी असेल ? मी आत्ताच बँक डिटेल्स चेक केले. ऑगस्टच्या तारखा आहेत. वर इमेज पण टाकतोय. या थापेला अनेक जण बळी पडत असतील. केजरीवालच्या मुलीला गंडा घातलाय या भामट्यांनी.
असे मशीन असते की नसते हे मी सांगू शकत नाही. मी ही नव्यानेच गुगल पे ने व्यवहार करू लागलो होतो.

कनू एकदम बरोबर. त्याने क्रेडीट कार्ड मशीनचा उल्लेख केला का ? माझ्याकडून बर्‍याच गोष्टी विसरल्या गेल्या आहेत आता.

माझा मोबाईल विकत असताना पण असाच एक जण म्हणाला कुणाला नका देउ माझा माणूस येईल घ्यायला तुम्हाला लगेच ऑनलाईन पेमेंट करतो
पण मी घरी असल्यामुळे आणि मुले पण असल्या मुळे मनसोक्त शिव्या घालता आल्या नाहीत त्याला
त्यानंतर olx वरतीच exchange रेट पेक्षा अधिक किमतीला विकला
याआधी पण बऱ्याच वस्तू ३ कार olx वरती विकल्या आहेत
सजग असलो तरी प्रॉब्लेम येत नाही
वस्तू न पाहता प्रत्यक्षात न भेटता जर कुणी ऑनलाईन पेमेंट करत असेल किंवा मागत असेल तर हमखास फ्रॉड असणार

वस्तू न पाहता प्रत्यक्षात न भेटता जर कुणी ऑनलाईन पेमेंट करत असेल किंवा मागत असेल तर हमखास फ्रॉड असणार >> अगदी खरा आहे हे.. तेव्हा मनात item जात आहे या विचाराने मी ठीक आहे म्हंटलं ..

शांत माणूस, क्रेडिट कार्ड machine चा त्याने काही उल्लेख केला नाही.. तीनदा अमाऊंट ट्रान्सफर झाल्यावर तो मला २-३ दा अकाउंट बॅलन्स विचारत होता.. तेव्हा माझी ट्यूब पेटली ..

अहो मी काही शंका नाही घेत आहे विचारतोय
कारण आपण म्हणजे मी बरेचदा गुगल पे ने पेमेंट करतो तर ते किती सुरक्षित आहे
कारण मग सगळ्यांना आपले डिटेल्स असे मिळत असतील ना

अहो मी काही शंका नाही घेत आहे विचारतोय >>ते समजले होते. पण माहितीच नाही तर सांगणार काय असे माझे म्हणणे होते/ आहे. ही मंडळी जी घाई करतात त्याला भले भले बळी पडतात.
https://www.indiatoday.in/technology/features/story/kejriwal-s-daughter-...

>> मी पण hypnotise झाल्यासारखा त्याचे instructions follow केले........... त्याच्या बोलण्यातून आता मी आठवते तेव्हा fraud च्या खूप clues मिळत होत्या .. पण माझ्या तेव्हा ते अजिबात लक्षात आले नाही.. आपण सगळ्यांशी चांगले वागतो बोलतो म्हणून आपल्याला वाटते कि सगळं जग चांगला आहे आणि कोणी आपल्याला फसवणार नाही..

शब्द नि शब्द सहमत. अगदी असेच घडते. सतत शंका घेत आपण सगळे आयुष्य तर जगू शकत नाही. विश्वास ठेवणे हे रुटीनचा भाग होतो. अगदी पीन/पासवर्ड देण्याइतका नाही पण एका ठराविक मर्यादेत विश्वास ठेवणे हे कॉमन होऊन जाते. नी एक दिवस झटका बसतो Lol स्विगी बॉय च्या हातात फोन दिला होता तेंव्हा माझ्या बाबत सुद्धा अगदी ह्याच वरच्या ओळी लागू पडल्या होत्या.

डेंजर आहे हे!
हिप्नोटाईज झाल्यासारखे>> यावरून आठवलं. दहापंधरा वर्षांपूर्वी सासूबाईंच्या एका मैत्रिणीने रस्त्यावर एका चोराच्या हातात स्वतःचे सगळे दागिने देऊन टाकले होते! 'पुढे गडबड चालू आहे. दागिने काढून ठेवा ' असं त्याने सांगितलं होतं. सगळे दागिने गेले!
@अतुल, काही दिवसांपूर्वी झोमॅटोच्या माणसाने मला विचारलं, मला जरा मदत कराल का? म्हटलं काय? तर म्हणाला मला कॅश द्या, मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो. मला ताबडतोब तुमचा अनुभव आठवला आणि मी त्याला नकार दिला. मग तो गेला लगेचच.

हे झालं दुकानदारी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे.

मी दुकानदार आहे, (हो. दवाखान्याला शॉप अ‍ॅक्ट लायसन्स असते) अन दुकानदाराला फसवण्याचं अजून एक भारी फ्रॉड आहे. मध्यंतरी व्हिडिओ फिरत होता. लिंक सापडली की देतो. https://www.businesstoday.in/news-reel/video/fake-paytm-application-save... (हा व्हिडिओ नाहिये तो, पण फेक पेटीएम अ‍ॅपबद्दल आहे.)

पेटीएम चं एक फेक अ‍ॅप आहे. त्यात तुम्हाला पैसे सेण्ड झाल्याचा मेसेज येतो, पण तुमच्या खात्यात पैसे येत नाहीत. गिर्‍हाईक सामान घेऊन गायब होते.

अगदी खरे सांगायचे झाले तर लोकांची वृत्ती च जबाबदार आहे.
Olex कशाला हवं.
आपके मित्र,नातेवाईक,ओळखीचे ह्यांना जरी सांगितले तरी वस्तू घेणारा कोणी तरी असतो
लोकांचा ओळखीच्या लोकांवर विश्वास नाही.
ओळखीची लोक ही फसवणूक करणारी आहेत आणि आणि अनोळखी लोक राजा हरीश चंद्राची वारस आहे असे त्यांना वाटत .
शेतकरी पण दोन रुपये किलो नी कांदे बाजारपेठेत विकतील पण दहा रुपये दराने ओळखीच्या लोकांना देणार नाहीत
त्यांना pandhra रुपये हा मार्केट मधील विक्री दर हवा असतो .
Olex वर जे फसतात ते त्याच लायकीचे असतात

फेक न्युज/ व्हौटस अप वरचे आय टी सेल चे फोर्वड / फोटोशोप केलेले नेहरु गांधी चे फोटो / फेक विकास कामांचे (गुजरात मधील ) फोटो आणी न्युज यावर विश्वास ठेवणारे यात सहज फसतात !
याउलट अशा बातम्या चेक करायची सवय लागली कि पैशाच्या फ्रौड चे फोन कौल्स, मेसेजेस वगैरे वर पण संशय घ्यायची सवय लागते आणी यात अडकत नाहित लोक !

Olex वर जे फसतात ते त्याच लायकीचे असतात >>> बेस्ट कॉमेंट ! अशा लोकांना आरसा दाखवल्याबद्द्ल !

मुळात मोबाइल बैकिंग हा आळशी पणा आहे . जे लोक मोबाइल बैकिंग करतात त्यांचा डाटा हजारो लोकांच्या हातात कधीच पोहिचला आहे. फक्त तुम्हि लकि आहात/फ्रौड करणारे जास्त नाहित / पापभिरु आणी कायद्याला घाबरणारी माणसे जास्त आहेत /फ्रौड करणारे बाकि डाटात बिझी आहेत यामुळे तुम्हाला अजुन झळ बसली नाहि एवढेच आहे !

जे लोक मोबाइल बैकिंग करतात त्यांचा डाटा हजारो लोकांच्या हातात कधीच पोहिचला आहे.
आं... जर ईस्कटून सांगता का?

आं... जर ईस्कटून सांगता का? >>> ऐप डाउन लोड करतान वाचा टर्म आणी कंडिशन्स आपण काय ऐप्रुव्ह करतो आहे ते म्हणजे तुमच्या प्रशाने उत्तर मिळेल

एखाद्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या थोबाडीत कुणी मारली तर तो नेता त्याच लायकीचा आहे अशा एखाद्याच्या कमेण्टला छान छान म्हणणार का इतकाच सिंपल प्रश्न आहे. एक ही मारा कमेण्टच्या वेळी तरी तसे दिसले नाही. जाळपोळ झाली होती. ती कमेण्ट निषेधार्हच होती.
फसले गेलेल्यांच्या बद्दल असंवेदनशील कमेंट आहे. व्हिक्टीमची लायकी ठरवण्याचा अधिकार कुणी दिला ? भाषा नीट ठेवावी इतकेच.

" फसले गेलेले " या श्ब्दातच सर्व काहि येते. स्वतः फसुन, चुक करुन सहनुभुतीची अपेक्षा ठेवणे बरोबर नाहि त्यापेक्षा स्वता सावध रहाण्याची प्रैक्टीस करावी.
एखादा माणुस किंवा जमाव थोबाडित मारतो, जीव घेतो , मौब लिंचिंग कर्तो तेव्हा ज्याच्यावर हिंसा होते तो हतबल असतो .

एखादा माणुस फसला गेला तर त्याचे मुख्य कारण पैशाचा जास्त हव्यास , ग्रीड हेच मुख्य आहे, हतबलता नाहि आणी वरिल सर्व उदाहरणात स्वताच हव्यास कबुल केला आहे ( लेखातील वाक्य - १. "चांगला सौदा होता. नाहीतर फुकट द्यावे लागले असते. जुने फर्निचर तसेही कुणी घेत नाही."
२. याने फारशी घासाघीस केली नाही याचे नवल वाटले
३. मला हे माहिती होतं की कोणत्याही जुन्या फर्निचरच्या दुकानदाराने २००० रूपयेच दिले असते)

त्यामूळे या दोन गोष्टितील फरक जर कळत नसेल तर त्या लोकांच्या बुद्धीची किव करावी तेवढी कमी आहे

एखादा माणुस फसला गेला तर त्याचे मुख्य कारण पैशाचा जास्त हव्यास , ग्रीड हेच मुख्य आहे,
काहीच्या काही विधान

काहीही लपवून ठेवलेले नाही. त्यात काय प्रूव्ह करायचेय? असल्या भिकारड्या कमेंट्स करायच्या वृत्तीमुळे कुणी इतरांना सावध करण्यासाठी असे लेख लिहिणार नाही. आत्मक्लेश करूनही नंतर फायदा होत नाही.

असल्या भिकारड्या कमेंट्स करायच्या वृत्तीमुळे कुणी इतरांना सावध करण्यासाठी असे लेख लिहिणार नाही >>> पोलिसांना म्हणले का अस्ल्या भिकारड्या कौमेंट केल्या तेव्हा .
सोशल मिडियावर लेख टाकला आहे तर टिका सहन करायला शिका जरा !
२५ धागे माबोवरच आहेत फ्रौड चे ! काय शिकला तुम्हि ? झालात का सावध ! जर तुम्हि मागचे धागे वाचुन शिकत नसाल तर तुम्चा दोष आहे , परत त्यात समाजकल्याण करतोय असा भाव !

आणी मझ्या कौमेट डिलिट करु नका यापुढे जे कोणी असेल ते ! नियम मोड्ला असेल तर काय नियम मोड्ला ते सांगा आधी !