आपण सर्वजण इथे वाचन आणि लेखन करण्यासाठी जमतो. अनेक विषयांवर चर्चा होतात, रंगतात, वादविवाद अन काथ्याकूटही होतो. या माध्यमाव्यतिरिक्तही आपण इतर वाचन करतो. रोजचे वृत्तपत्र वाचन हा आपल्या दिनक्रमाचा एक भाग असतो. त्यावरून एक नजर फिरवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आज जरी इ-माध्यम प्रस्थापित झालेले असले तरी आपल्यातील बऱ्याच जणांना एखादे तरी छापील वृत्तपत्र वाचायला आवडते. जेव्हा आपण ते चाळू लागतो तेव्हा त्याच्या पानांमध्ये आपल्याला विविध विषयांची विभागणी केलेली दिसते. मग आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पानावर रेंगाळतो.
संपादकीय पान हा वृत्तपत्राचा आत्मा असतो. त्याचा एक कोपरा हा खास वाचकांच्या पत्रांसाठी राखीव असतो. त्यामध्ये अनेक वाचक अल्प शब्दांमध्ये आपापली मते, विचार, तक्रारी वा सूचना मांडत असतात. अशा सदरातून सातत्याने पत्रलेखन करणे हे एक जागरूक नागरिक असल्याचे लक्षण असते. एक प्रकारे ते समाजातील ‘जागल्या’ची भूमिका करतात ! मला खात्री आहे की आपल्यातील अनेकांनी असे पत्रलेखन केले असेल आणि अधूनमधून करतही असाल. अशा लोकांपैकी मीही एक. या धाग्याचा हेतू सांगण्याआधी थोडे माझ्याबद्दल लिहितो.
माझ्या पत्रलेखनाची सुरवात झाली वयाच्या २१व्या वर्षी. ते माझे पदवीचे अखेरचे वर्ष. अभ्यासाच्या पुस्तकांच्या गराड्यात बसून प्रचंड वाचन, मनन, पाठांतर आणि मग चर्चा असा तो व्यस्त दिनक्रम असे. पण या सगळ्यातून थोडी तरी फुरसत काढून काहीतरी अभ्यासबाह्य करावे असे मनातून वाटे. आपल्या आजूबाजूस असंख्य घटना घडत असतात त्यातील काही मनाला भिडतात. त्यावर आपण कुठेतरी व्यक्त झाले पाहिजे असे अगदी आतून वाटे. तशा आपण मित्रांबरोबर चर्चा करतोच. पण त्या विस्कळीत स्वरूपाच्या असतात. पुन्हा त्या ठराविक वर्तुळात सीमित राहतात. जर मला काही विचार मुद्देसूद मांडायचे असतील आणि ते समाजात व्यापक स्वरूपात प्रसारित व्हावे असे वाटले तर ते लिहून काढणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच लेखनाची ठिणगी मनात पडली आणि वाचकपत्र ही त्यासाठीची पहिली पायरी झाली.
तो जमाना हा फक्त छापील माध्यमाचा होता. रोज सकाळी घरी पेपर येऊन पडल्यानंतर तो प्रथम पटकावण्यासाठी घरच्या लोकांमध्ये स्पर्धा असायची ! वृत्तपत्रे ही बऱ्यापैकी गांभीर्याने वाचली जात. त्यांत लोक पत्रलेखन बऱ्यापैकी आवडीने करत. नामांकित वृत्तपत्रात आपले पत्र प्रसिद्ध होणे हे तितकेसे सोपे नव्हते आणि ते मानाचे समजले जाई. काही दैनिकांत या सदराबद्दलचे विशेष उपक्रमही राबवले जात. एका दैनिकात या सदरातील दरमहा १ पत्र हे बक्षीसपात्र ठरवले जाई. मग त्या पत्रलेखकाचा फोटो, परिचय इ. . प्रसिद्ध होई. काही पेपरांत एखाद्या मार्मिक पत्राला अनुरूप असे चित्र काढून ते विशेष चौकटीत प्रसिद्ध होई. तर एका दैनिकात त्यातले रोजचे मुख्य पत्र हे ठळक मथळ्यात असे. त्या पत्राच्या लेखकाला अंकाची एक प्रत वृत्तपत्राकडून भेट पाठवली जाई !
त्याकाळी पत्रलेखकाला आपले पेपरात छापून आलेले नाव पाहण्याचा आनंद काही औरच असे. त्यामुळे मलाही हे सर्व खुणावत होते. अशाच एका उर्मीतून मी पहिलेवहिले पत्र लिहीले. ते क्रिकेटवर होते. आता लिहून तर झाले पण छापून येण्याची काय शाश्वती? आपल्या शहरातील सर्वाधिक खपाच्या पेपरात तर ते छापून येणारच नाही असे मनोमन वाटू लागले. मग एक युक्ती केली. त्या पत्राच्या तीन हस्तलिखित प्रती सुवाच्य अक्षरात लिहिल्या आणि त्या तीन वृत्तपत्रांना पाठवल्या.
आता ते पत्र प्रसिद्ध होणार की नाही याची जाम उत्सुकता लागलेली. रोज सकाळी पेपर आल्यावर त्यावर झडप घालून ‘ते’ पान उघडायचे आणि त्यावर अधाशासारखी नजर फिरवायची. ८-१० दिवस गेले आणि एके दिवशी तो सुखद धक्का बसला ! पत्र छापले गेले होते. यथावकाश ते पत्र अन्य दोन पेपरांतही प्रसिद्ध झाले.
मग या प्रकाराची गोडी लागली. विविध विषयांवर पत्रलेखन हा माझा छंद झाला.
.....
आता ह्या धाग्याचा हेतू सांगतो. आपल्यापैकी काहीजण असेच पत्रलेखक असू शकतील. आपण पूर्वी लिहिलेल्या पत्रांची कात्रणेही जपून ठेवली असतील. तर अशा जुन्या पत्रांचे या धाग्यात पुन्हा प्रकाशन करावे अशी कल्पना आहे. एक पथ्य आपण पाळू. ते पत्र इथे लिहिल्यावर त्याखाली संबंधित वृत्तपत्र वा नियतकालिकाचे नाव, तेव्हाचा प्रकाशन दिनांक आणि ‘साभार’ अशी टीप यांचा उल्लेख करावा. म्हणजे ‘प्रताधिकार’ वगैरे समस्या येत नसावी ( येत असल्यास जाणकारांनी मत द्यावे). आपण स्वतःचेच पत्र इथे पुन्हा प्रकाशित करत आहोत. आपल्यातील तरुण पिढीतील लेखकांनी त्यांची पत्रे छापील ऐवजी फक्त इ-अंकास पाठवलेली असू शकतील. त्यांचेही स्वागत. एखाद्या विषयाचा पाठपुरावा पत्रांतून करून जर त्यावर काही शासकीय अंमलबजावणी झाली असेल, तर तेही जरूर लिहा. इतरांसाठी ते स्फूर्तीदायक ठरते. सध्या छापील वृत्तपत्रांतील वाचकपत्रे हे सदर आक्रसले आहे. पण त्याचबरोबर इ- अंकातील वाचक प्रतिसाद बरेच वाढलेले आहेत.
आपल्या गत लेखनाची पुनर्भेट अशी या धाग्यामागची कल्पना आहे. पत्र जेवढे अधिक जुने तेवढी अधिक मजा आता वाचताना येईल.
अजून एक.
आपल्यातील काही जण स्वतः पत्रलेखक नसले तरी ते सदर आवडीने वाचणारे असू शकतात. त्यांनीसुद्धा एखाद्या चांगल्या अथवा संस्मरणीय पत्राची आठवण लिहायला हरकत नाही.
तर मग मित्रांनो, काढा आपली जुनी कात्रणवही (किंवा इ-नोंद) आणि घडवूयात आपल्या पत्रांची पुनर्भेट !
धन्यवाद.
*********************************************
सुरवातीलाच आपले आभार मानतो या
सुरवातीलाच आपले आभार मानतो या धाग्याबद्दल. धाग्यातल्या भावना अगदी पटल्या. मला सुद्धा माझे पहिले पत्र मराठी चित्रपटांविषयी पाठवले होते व सकाळ मध्ये ते छापून आले होते ते या निमित्ताने अनेक वर्षांनी आठवले. त्यानंतर अजून काही पत्रे प्रसिद्ध झाली. हि सारी पत्रे असलेले अंक आहेत कुठेतरी अजून. जसे सापडतील तसे नक्की इथे पोस्त करतो.
आता आहे ती एक खूप कटू पत्राची आठवण. तसे हे पत्र नाही म्हणता येणार. बातमीखाली कॉमेंट लिहिली होती. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्ली येथे घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाने पूर्ण देश हादरला होता. काही दिवसांनी या मुलीचे सिंगापोर येथे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. तेंव्हा जी कॉमेंट मी बातमीखाली लिहिली होती ती मला ध्यानीमनी नसताना सकाळ ने दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध केली. आपण म्हणते ते बरोबर आहे कि: पत्रलेखकाला आपले पेपरात छापून आलेले नाव पाहण्याचा आनंद काही औरच असे. पण हा एकच प्रसंग असा असेल कि कधी नव्हे ते वृत्तपत्रात पहिल्या पानावर माझे नाव आले होते पण मला त्याचा जराही आनंद नव्हता. तो पूर्ण दिवस आत्यंतिक औदासीन्यात गेला होता....
अजूनही हे आठवले कि गहिवरून येते.
अतुल ,
अतुल ,
अनेक धन्यवाद !
तुमची आठवण हृदयस्पर्शी आहे.
अजून काही जरूर लिहा.
मला हे सदर वाचायची खूप सवय
मला हे सदर वाचायची खूप सवय लागली होती. काही पत्रलेखक रोजच काही ना काही विषयांवर लिहायचे. त्यांची नावे पाठ झाली होती. काही महाभाग दुसऱ्या लोकांच्या नावाने पत्रे पाठवित. एकदा माझ्या वर्गातल्या भाऊसाहेब मंडलिक याचे नाव पत्रलेखक म्हणून आले होते. लेखक दुसराच होता पण मी तो पेपर भाऊसाहेबला दाखवला तर तो खूप घाबरला व मी नाही मी नाही असे विनवायला लागला. आजही ते आठवले की खूप हसू येते.
आजही ते आठवले की खूप हसू येते
आजही ते आठवले की खूप हसू येते.>>>> ☺️
मस्त अनुभव !
कधी काळी या सदरातून लोक
कधी काळी या सदरातून लोक आपपल्या भागातल्या समस्या मांडत. त्यावर त्या त्या विभागाकडून त्वरेने कारवाई होई. अर्थात काही पत्रे उत्तम माहिती देणारी असत. काही नावे तेव्हां पाठ झालेली असत. असे लोक अनेक पत्रातून पत्रे लिहीत. त्यांना बहुधा वाचकांची पत्रेकार म्हणत असावेत.
मग त्याचे स्वरूप आताच्या फेसबुक पोस्टींप्रमाणे बनले. आपल्या विचारधारेसाठी वाचकांनावेठीस धरले जाऊ लागले.
फेसबुक म्हणजे न छापली गेलेली वाचकांची पत्रेच आहेत असे वाटते.
** फेसबुक म्हणजे न छापली
** फेसबुक म्हणजे न छापली गेलेली वाचकांची पत्रेच आहेत असे वाटते.>>>
चांगला मुद्दा, सहमत.
धाग्याची कल्पना आवडली. बरेच
धाग्याची कल्पना आवडली. बरेच वर्षांपूर्वी एक छोटे पत्र वाचले होते त्याची ही आठवण.
पत्रलेखकाने त्याचा आरटीओ चा कटू अनुभव लिहिला होता. त्याने कार चालवायचे शिक्षण एका खाजगी ड्रायव्हर कडून घेतले होते. व्यक्तिगत शिकल्यामुळे त्याला कार चालवणे छान जमले होते. आता वेळ आली लायसेन्ससाठी परीक्षा द्यायची. तो मोठ्या आत्मविश्वासाने त्याला सामोरा गेला. कार व्यवस्थित चालवली. पण त्याला नापास केले गेले. पुढे असेच 3 वेळा झाले. आता त्याची चिडचिड वाढली. शेवटी तिथल्या एजंटने स्पष्ट सांगितले की या परीक्षेसाठी ड्रायव्हिंग स्कूल कडूनच या, तरच पास व्हाल !
अडला नारायण, करतो काय ? नाईलाजाने स्कूलचे पैसे भरून तिथे गेला. त्या परीक्षेत 5 मिनिटात त्याला पास केले गेले.
सदर पत्रात त्याने सर्वांना कळकळीने लिहिले होते की अजिबात खाजगीरित्या जाऊ नका, स्कूलमार्फत ‘हप्ता’ पोचविल्या शिवाय ते लोक पास करीत नाहीत.
साद जी मला वेगळा अनुभव आला.
साद जी मला वेगळा अनुभव आला. मी २००० साली मोसाचे कच्चे लायसन्स काढलं. बरोबर एक महिन्याने पक्क्या लायसन्स ची परीक्षा दिली, तेव्हा साहेबाबरोबर एजंट कागदपत्रे घेऊन उभा होता. माझी मोसा नवीन होती तरीही प्रदुषण चाचणी सर्टिफिकेट लागेल म्हणून अडवले, मी दहाच मिनिटात सर्टिफिकेट आणले. माझा नंबर आला, मी व्यवस्थित आठचा आकडा हाताने योग्य ते इशारे देऊन पुर्ण केला. एजंट मारक्या म्हशीसारखा माझ्याकडे बघत होता, नंतर आरटीओने अनेक वाहतूक चिन्हं दाखवून प्रश्न विचारले. माझा बरोबर उत्तरे देण्याचा कॉन्फिडन्स बघून कोरड्या चेहऱ्याने पासचा शिक्का मारला.
२००० मध्ये कारचे लायसन्स काढलं तेव्हा आरटिओने गाडी रिव्हर्स घ्यायला लावली. व छान गाडी चालवता असे कॉंप्लीमेंट दिली. लायसन्स ही मिळाले.
या उलट पंचाण्णव साली पुण्यात मोसाचे लायसन्स काढायला स्वत: गेलो होतो तर आरटिओने काय करतो असे विचारले . मी म्हटलं सुशिक्षित बेकार आहे. मग उर्मटपणे म्हणाला तुला पोसतं कोण. मी म्हटलं तुला काय पंचायत पडली आहे माझा बाप मला पोसतोय. तो म्हणाला निघ. मी कागदपत्रे तिथेच फाडून त्याला आईवरून शिव्या दिल्या. पण त्याची काही करायची हिंमत झाली नाही.
बरेचदा आरटीओ भ्रष्ट आहे कि सज्जन यावर काम होणं अवलंबून असते. कित्येकदा पंच्याण्णव लोकांकडून पैसे खाल्ले की पाच लोकांचे फुकट काम करतात. कारण पापाची बोचणी लागलेली असते.
साद व शशिराम, धन्यवाद.
साद व शशिराम, धन्यवाद.
*** कित्येकदा पंच्याण्णव लोकांकडून पैसे खाल्ले की पाच लोकांचे फुकट काम करतात.>>>
ते पाच लोक खरेच भाग्यवान हो !
आणि कुमार सर पंचाण्णव लोक
आणि कुमार सर पंचाण्णव लोक दुर्भागी. हेच लोक एकत्र आले तर चित्र एकदम बदलेल. एखादा माणूस पत्रं लिहून आवाज उठवतो. भारतात कुठेही कार्यालयात गेले तरी सत्तर टक्के लोक आपले काम होणारच नाही अशा विचाराने घाबरलेले असतात व एजंट गाठतात किंवा लाच देतात.
हेच लोक एकत्र आले तर चित्र
हेच लोक एकत्र आले तर चित्र एकदम बदलेल.>>>> + 111
* शशिराम, सहमत.
* शशिराम, सहमत.
* अतुल यांच्या आणखी एका पत्राची प्रतीक्षा आहे !
** वृत्तपत्रांतील या सदराची अनेक नावे आहेत. त्यातले मटाचे नाव मला सर्वात जास्त आवडते : बहुतांची अंतरे.
माझ्या लहानपणी १ गृहस्थ नेहमी
माझ्या लहानपणी १ गृहस्थ नेहमी टाईम्स ऑफ इंडियाच्या संपादकांना पत्रे लिहायचे आणि ती बऱ्याचदा छापून येत असत, असे आठवले. नाव नक्की आठवत नाही पण बहूदा P. Warrier होते.
सातत्याने पत्रलेखन करणाऱ्या
सातत्याने पत्रलेखन करणाऱ्या लोकांची संघटना आहे आणि त्यांची संमेलनेही होतात.
हे पत्र किती वर्षे शोधत होतो
हे पत्र किती वर्षे शोधत होतो ते अखेर काही दिवसांपूर्वी एका जुन्या कागदांच्या बॅग मध्ये सापडले. पंचवीस वर्षे होतील याला आता
या पंचवीस वर्षाच्या काळात विचार बदलले, जग पाहिले त्यामुळे थोडीफार प्रगल्भता आली. त्यामुळे आता हे वाचताना खूप मौज वाटते. यातले अनेक विचार अजूनही पटतात काही आता तितकेसे पटत नाहीत
.
कुमार१ - मस्त विषय. नवीन
कुमार१ - मस्त विषय. नवीन प्रतिक्रियांमुळे मला आज पाहायला मिळाला. 'वाचकांची पत्रे' माझा अत्यंत आवडता विषय. वृत्तपत्रामध्ये नोकरीला लागलो, त्याची सुरुवात ह्याच छंदापासून. ह्या विषयावर एक मोठा लेखही लिहिला. त्यातील काही मुद्द्यांची ह्या निमित्ताने उजळणी करतो.
१. वृत्तपत्रांमध्ये नाव छापून येण्याचं आकर्षण आणि महत्त्व होतं, त्या काळातली ही गोष्ट आहे. त्याच आकर्षणापोटी पहिलं पत्र लिहिलं आणि ते 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालं. त्या वेळी मी एकोणीस वर्षांचा होतो आणि काहीच करत नव्हतो. सहज म्हणून पोस्टकार्डावर लिहिलेलं पत्र प्रसिद्ध झालं. ही गोष्ट ३८ वर्षांपूर्वीची. मग लागलेली चटक साधारण पाच वर्षं टिकली. पुढे ते निमित्त राहिलं नाही. कारण वृत्तपत्रातच नोकरी मिळाली.
२. तुम्ही अन्य एका लेखात म्हटल्याप्रमाणे 'सकाळ'मध्ये साधारण ८३-८४मध्ये पहिल्या पानावर एक पत्र प्रसिद्ध होई. त्या पत्रलेखकाला अंक पाठविला जाई. मला तीन-चार वेळा अंक (दोन-तीन दिवसांनी) टपालाने घरपोहोच आला. 'आपण किती भारी' असं प्रत्येक वेळी वाटलंच! एक चांगले पत्र चौकटीत सचित्र प्रसिद्ध करण्यास 'सकाळ'नेच सुरुवात केली. तसे चौकटीत पत्र आलेच पाहिजे, ह्या ईर्ष्येपोटी लिहिले आणि ते प्रसिद्धही झाले.
३, पुण्या-मुंबईच्या तीन-चार वृत्तपत्रांमध्ये माझी पत्रं प्रसिद्ध झाली. त्यातली बहुतेक कात्रणं होती. मध्यंतरी आवरताना ती सगळी रद्दीत टाकून दिली. किती दिवस नि कशासाठी संभाळणार म्हणून. 'म. टा.'मध्ये पहिलं पत्र प्रसिद्ध झालं, तेव्हा फार उत्तेजित झालो होतो. पत्र कुठं पाठवायचं हे पाहताना 'प्रेस लाईन'चा शोध लागला आणि त्यामुळं संपादक कोण आहेत, हे समजू लागलं. (त्या काळी संपादक लिहिण्यातून ओळखले जात.)
४. आधी पत्राच्या सुरुवातीला 'मा. संपादक' असा व्यवस्थित मायना लिहून 'पत्र प्रसिद्ध करण्याची विनंती' करीत होतो. पण पोस्टकार्डावरची जागा त्यामुळे आटू लागली. वर केवळ 'वाचकांचा पत्रव्यवहार' (किंवा त्या त्या वृत्तपत्रातील सदराचं नाव) असं लिहून पाठवलं तरी पत्र प्रसिद्ध होतं, हे नंतर लक्षात आलं. मोठा मजकूर असेल, तर आंतरदेशीय पत्र वापरत असे. ह्यासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून? म्हणजे आधी पत्र, मग ते प्रसिद्ध झालेला अंक वगैरे...(घरी एकच दैनिक येत असे. आणि वाचनालयातून हवा तो मजकूर ब्लेडने किंवा करकटकने कापण्याचे 'कौशल्य' माझ्याकडे नव्हते.) 'स्वराज्य'मध्ये विनोद लिहून जे पैसे मिळत, ते ह्या छंदासाठी वापरत होतो. तेथे एका विनोदाला तीन रुपये मानधन होते. माझ्या नावावर प्रसिद्ध झालेल्या विनोदांपैकी एकही माझा किंवा मला सुचलेला नव्हता. ती चक्क इकडे-तिकडे वाचलेल्या विनोदात थोडे-फार बदल करून केलेली चोरी होती!
५. नात्यातील एक जण काही कामानिमित्त पुण्यातील दैनिकाच्या संपादकांना भेटला. सहज म्हणून त्याने माझ्या पत्रांबद्दल चौकशी केली. 'राजकीय विषयांवरच फार पत्रे असतात,' असे त्याला संपादकांनी सांगितले. (ते खरेही होते. कारण राजकारणावर पिचकाऱ्या मारणे सोपे असते.) त्याचे फार कौतुक वाटले. साक्षात संपादक पत्रव्यवहारावर लक्ष ठेवून होते. वृत्तपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर दोन शिक्षकांशी (जे पूर्ण वेळ पत्रकारच व मोठ्या पदावर होते.) ह्या विषयावर कौतुकाने बोलायला गेलो. एकाने सांगितले, 'तो विषय आमचे संपादक पाहतात.' 'पत्र लिहिता म्हणजे कचराकुंड्या साफ होत नाहीत, मुताऱ्या तुंबल्या अशीच ना?', असे दुसऱ्याने जाहीरपणे तुच्छतेने विचारले होते. त्या दोघांचा हा अनुभव विसरलो नाही.
६. एका राष्ट्रीय विषयावर तावातावाने दीड-दोन पानी पत्र लिहिलं होतं. पुण्याच्या एका बिच्चाऱ्या दैनिकानं पत्राचं चक्क संपादकीय स्फुट बनवून टाकलं. त्या खाली माझं नाव वगैरे काही नाही. त्याची तक्रार पत्राद्वारे केली. त्याचीही कुणी दखल घेतली नाही.
७. वाचकांचे वाद रंगतात, हे वाचून माहीत होते. त्यात मजा येते. पुण्यातील एका क्रीडा नियतकालिकात काम करताना असाच खोटा वाद रंगवला होता. भोरच्या वाचकाच्या पत्राच्या विरोधात मीच मित्राच्या नावाने पत्रं लिहीत होतो. अशी पाच-सहा पत्रे झाल्यावर कंटाळा आला आणि 'आता हा वाद येथेच थांबवित आहोत' अशी हुकुमी ओळ टाकून पूर्णविराम दिला. ह्या नियतकालिकात काम करताना मित्र-भावंडे ह्यांच्या नावाने पत्रं लिहिली. त्यांना माहीतही नसायचं. कुणी तरी वाचून विचारायचं आणि ते बिचारे 'हो हो, मीच तो' असं म्हणून वेळ मारून न्यायचे.
८. वृत्तपत्रात काम करतानाच्याही खूप आठवणी आहेत. एकदा टपाल खात्याचा संप तब्बल दहा दिवस चालला. वाचकांची पत्रंच येत नव्हती. पहिले दोन-तीन दिवस शिलकी मजकूर पुरला. एक रविवार आला. त्यानंतर सलग चार-पाच दिवस रोज वेगवेगळ्या नावाने पाच-सहा पत्रं लिहीत राहिलो; पण आवडतं सदर शिळं होऊ दिलं नाही! वेगवेगळ्या (आणि अर्थातच खोट्या) नावानं लिहिणारे काही पत्रलेखकही पाहिले. आमच्या क्रीडानियतकालिकात नियमित लिहिणारा असाच एक पत्रलेखक एकाच दिवशी त्याची दोन वेगवेगळ्या नावानं पत्रं आल्याने लक्षात आलं. नंतर लक्षात आलं की, तो ह्याच तीन नावांनी मुंबईतल्या दैनिकांतही अधूनमधून पत्रं लिहीत असतो. फसणारे आपण एकटे नाही, ह्याचं समाधान तेव्हा लाभलं बुवा.
असाच अजून एक वाचक. दर आठ-दहा दिवसांनी येणाऱ्या कार्डांवर अक्षर एक नि नाव दर वेळी वेगळं, हे तीन-चार पत्रानंतर लक्षात आलं. मग त्याला धडा म्हणून एक नाव निवडलं - 'भुजंगराव कावळे'. लेखक चांगलं, मुद्देसूद लिहीत असे. त्या नावाने दीड वर्षं पत्रं प्रसिद्ध केल्यावर कंटाळा आला आणि त्याचं नाव 'नागनाथ ससाणे' केलं! दोनच दिवसांनी त्याचं पत्र आलं - 'नागनाथ ससाणे नको; आधीचं भुजंगराव कावळे हेच नाव चांगलं आहे!'
९. साधारण दोन हजारनंतर वाचकांची पत्रं कमी होऊ लागली. ठरावीक मंडळी तेच ते लिहितात. जिल्हा पातळीवरील दैनिकांना ही अडचण विशेष जाणवते. पण आता वाचकांच्या पत्रांकडं संपादकांचंही फारसं लक्ष असतं असं दिसत नाही. कारण ह्या जागेत कपात केली जात आहे. दैनंदिन जीवनातल्या समस्या ह्या सदरात नको म्हणून त्यासाठी वेगळं सदर सुरू करण्यात आलं. 'लोकसत्ता'च्या मुंबई आवृत्तीच्या शहर पुरवणीत (मुंबई वृत्तान्त) हे सदर 'तगादा' म्हणून प्रसिद्ध होई - तक्रारी-गाऱ्हाणी-दाद ह्या तीन शब्दांतली पहिली अक्षरे घेऊन सदराचं असं नामकरण करण्याची कल्पना नामीच होती!
ह्या विषयावर अजून भरपूर लिहिता येईल. पण थांबतो!
या धाग्याच्या निमित्ताने
या धाग्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि नुकताच पुढील पत्रव्यवहार झाला.
On Mon, Nov 8, 2021 at 10:11 AM xxx wrote:
Hello,
I vaguely remember that a certain person named "Warrier" used to write
letters to editor of Times Of India.
They used to be quite insightful and I always looked forward to his
letters. (sometime in 1980's).
I found your email from the internet when I was searching for his name.
I was wondering if you are the same person?
Regards,
आणि या पत्राचे उत्तर पण आले.
On 7/11/21 11:36 PM, PM Warrier wrote:
Dear Mr. xxx:
It certainly was flattering to receive your mail remembering a Warrier who wrote 'letters to the editor' in The Times of India in the 1980s! Thanks.
It could well be me but I mostly wrote what they call 'middle' articles, often in a light vein. Of course I did write an occasional letter to the editor, too, but my middles used to appear in both the Indian Express and The Times of India with some regularity from the late 1970s to the turn of the century -- when I used to live in Delhi. Both the ToI and Indian Express discontinued 'middles' from around 2005 or so. Now, at 93, I still contribute to The Hindu's weekly 'Open Page' occasionally. Old habits die hard!
Thanks for remembering me!
With best wishes,
PMWarrier
वाचकांच्या पत्रांकडे फक्त लेखकाचे आणि संपादकांचेच लक्ष नसते, पण इतर वाचकांचे पण लक्ष असते.
त्यानंतर मी माझ्याकडचे, त्यांच्या एका लेखाचे कात्रण श्री. माधवन वॉरीअर यांना पाठवले, ते त्यांना खूप आवडले.
जबरी आठवण, उ बो.
जबरी आठवण, उ बो.
सर्व नवीन प्रतिसाद छान आहेत.
सर्व नवीन प्रतिसाद छान आहेत.
….
अतुल
छान पत्र आणि विचारांशी सहमत आहे. मीदेखील यासारखे लिहित असे.
…
बेडर
ससाणे आणि कावळे मस्तच !
तगादा शब्दाची निर्मिती आवडली.
तुम्हाला महाराष्ट्र पत्रकार संघाने आयोजित केलेला 'पत्रलेखक गौरव ग्रंथ' हा उपक्रम बहुतेक माहित असेल. त्यातील एका ग्रंथात माझ्या प्रकाशित पत्राचा समावेश आहे. " गर्भलिंग तपासणी अयोग्यच" असे ते पत्र होते.
उ बो
** वाचकांच्या पत्रांकडे फक्त लेखकाचे आणि संपादकांचेच लक्ष नसते, पण इतर वाचकांचे पण लक्ष असते. >>>
+१
बेडर,
बेडर,
लेखातील या मुद्द्यावर तुमचे मत समजेल का ?
"म्हणजे ‘प्रताधिकार’ वगैरे समस्या येत नसावी ( येत असल्यास जाणकारांनी मत द्यावे). आपण स्वतःचेच पत्र इथे पुन्हा प्रकाशित करत आहोत"
...
आपले स्वतःचेच प्रकाशित पत्र अन्यत्र आपण स्वतः प्रकाशित करू शकतो ना? का त्यासाठीसुद्धा संबंधित वृत्तपत्राची परवानगी लागते?