लोक फलज्योतिषाकडे धाव का घेतात?
अनेकदा लोक ज्या कारणांसाठी फलज्योतिषाकडे जातात ती कारणं जीवनातल्या नेहमीच्या अनिश्चितीततांमुळे निर्माण झालेली असतात. अनिश्चितता खरंतर सगळ्यांच्या जीवनात असतात; पण काही लोकांना त्यांचा जास्त त्रास होतो किंवा काही लोकांच्या बाबतीत त्या अनिश्चिततांची परिणती काही विशिष्ट घटनांद्वारे जास्त एकांगी वाटते. उदाहरणार्थ, घटस्फोट, कुटुंबातील अकाली मृत्यू किंवा अपंग करणारा एखादा अपघात. हे असं माझ्याच बाबतीत का व्हावं असा विचार आला की आपण अनेकदा सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून नको त्या गोष्टींच्या नादी लागू शकतो. अशावेळी खरं तर लोकांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. भारतात तो एक ठपका असल्यामुळे पंचाईत होते. या धर्तीच्या अनेक प्रसंगांमध्ये पुढील घटना टाळण्यासाठी ओळखीतल्या अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास त्यानेही मदत होऊ शकते. अर्थात ते स्वतः अंधविश्वासू नसतील तर.
IGNOUच्या अभ्यासक्रमाबाबत
सरकारने फलज्योतिषावर योग्य असे पर्याय बनवायला हवेत; जेणेकरून लोकांना कठीण परिस्थितीतही मानसिक स्थैर्य मिळवायला मदत होईल. शाळा–कॉलेजेसमधून अशी मदत उपलब्ध हवी. याउलट सरकारी अनुदानाने विद्यापीठांमधून फलज्योतिषाचे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठाने इतक्यातच असाच एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक लोक “काय हरकत आहे” असं म्हणून त्या अभ्यासक्रमाला पाठिंबा देत आहेत. “इतर अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात, त्याप्रमाणे हाही एक आणि हा तर विज्ञानशाखेत नसून कलाशाखेत आहे; त्यामुळे असाही दावा नाही की ते एक शास्त्र किंवा विज्ञान आहे” असा त्यांचा युक्तिवाद असतो. कलाशाखेत जरी हा असला तरी अभ्यासक्रमाच्या विवरणात एक वाक्य असं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांना त्यांच्या उपजीविकेचे एक साधन या अभ्यासक्रमाद्वारे देऊ करणार आहोत. तसं असल्यामुळे असा अभ्यासक्रम कोण शिकवू शकेल, त्या अभ्यासक्रमामध्ये काय हवं, हे प्रश्न साहजिकच निर्माण होतात. अशा प्रश्नांना एक सरधोपट असं उत्तर नसतं कारण त्यात अनेक मिती असतात. अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक असलेल्या अनेक बाबींचा अंतर्भाव न केल्यामुळे हे अभ्यासक्रम घातक ठरतात. यासंबंधीच्या एक-दोन आवश्यक पण कदाचित अपुऱ्या बाबी पाहूया.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रमात जे शिकवले जाणार आहे त्याविरुद्ध असलेले सिद्धांत आणि मतप्रवाहसुद्धा नमूद केले जायला हवे. तसे नसल्यास जे शिकवले जाणार ते एकांगीच ठरणार. अभ्यासक्रमात जे काही शिकवले जाते त्याबद्दल संख्यात्मक विश्लेषण देता यायला हवे. ज्योतिषाचा अभ्यासक्रम भाकितांबद्दल असल्यामुळे ‘कोणत्या घटकांवर आधारित किती भाकितं केली? केली त्यातील किती खरी ठरली? ती किती अंशी खरी ठरली? किती खोटी ठरली?’ वगैरे या सर्व बाबी यायला हव्यात. हा कलाशाखेत जरी असला तरी कलाशाखेतील इतर अभ्यासक्रमांमध्ये जशा परीक्षा असतात तशा इथे होतील याची काहीच चिन्ह नाहीत. उदाहराणार्थ, रंगचित्राच्या परिक्षेस बसलेला विद्यार्थी रंगचित्रे काढतात. त्या रंगचित्रांना परीक्षक गुण देतात. त्याचा जगात होऊ घातलेल्या घटनांशी संबंध नसतो. फलज्योतिषात तसा असल्याने त्याची तपासणी कशी केली जाणार? वर्ष–दोन वर्ष किंवा भकितात असतील तेवढी वर्षे थांबून?
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असे अभ्यासक्रम शिकवायला प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षक हवेत. म्हणजे जे स्वतः केवळ पुस्तकातून शिकले ते का? तसे असतील तर कोणत्या पुस्तकांमधून? की व्यावसायिक ज्योतिषी हवेत? हे दोन्ही गट तसे कुचकामी. येथे असेच शिक्षक हवेत ज्यांना या प्रकारात कोणतेतरी प्रमाणपत्र मिळाले आहे, पदवी मिळाली आहे. आणि हे प्रमाणपत्र किंवा पदवी अशा दुसर्या एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून नसावी जिथले शिक्षक पदवीधर नव्हते. कोणी म्हणेल की हे तर कोंबडी आधी की अंडे याप्रमाणेच होईल. याचे कारण असे की जर अभ्यासक्रम सुरू होऊ शकणार नसेल, अभ्यासक्रम फक्त पदवीधर शिक्षक देऊ शकणार असतील तर ही पदवी ते शिक्षक मिळवतीलच कसे? विज्ञानात किंवा इतर ठिकाणी ते कसे होते ते पाहूया.
एखादं क्षेत्र जेव्हा नवीन असतं तेव्हा आधी त्यातील संशोधनाकरता काही लोक प्रस्तावांद्वारे अनुदान मिळवतात. तो प्रस्ताव एखादी विवक्षित गोष्ट करण्यासाठीचा असतो. संलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ अशा प्रस्तावाची तपासणी करतात आणि मग अनुदान द्यायचं की नाही ते ठरवतात. अनुदान ज्या प्रयोगासाठी मिळाले आहे तो जाहीर केल्या जातो आणि प्रयोग झाल्यानंतर त्यातून काय निष्पन्न झालं ते पण जाहीर केलं जातं. असे काही प्रकल्प जेव्हा यशस्वी होतात तेव्हा यशस्वी गट एकत्र येऊन एखादी संघटना बनवू शकतात. त्या संघटनेद्वारे आधीचे प्रकल्प/प्रमेय जास्त काटेकोरपणे तपासून परिपूर्ण केले जाते. अशा या सर्व अग्निपरीक्षेतून गेल्यानंतर जे लोक तयार होतात ते अशा गोष्टी शिकवू शकतात.
फलज्योतिष कशावर आधारित आहे?
पत्रिका मांडणं हे पूर्णपणे गणिती आहे. पंचांगात जी ग्रहस्थिती दिलेली असते ती वापरून खरं तर कोणीही काही मिनिटांमध्ये पत्रिका मांडणं शिकू शकतो. पंचांगातली ग्रहस्थिती ही खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरूनच मिळवलेली असते आणि ते तंत्र इतकं प्रगत आहे की ती स्थिती अचूक असते. पत्रिका ही खऱ्या ग्रहांची स्थिती वापरून मांडली गेली असल्यामुळे त्याचा खगोलाशी संबंध नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. त्यामुळे पत्रिकेतील ग्रह जर खगोलीय असतील तर त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम का होऊ शकत नाही ते आधी आपण पाहूया की.
पत्रिकेतील नवग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह, त्याचप्रमाणे सूर्य हा तारा, चंद्र हा उपग्रह आणि राहू आणि केतू हे पृथ्वी आणि चंद्र यांच्या सावल्यांपासून निर्माण झालेले काल्पनिक छेदनबिंदू. यातील मंगळ आणि शनी फलज्योतिषात वाईट समजले जातात. ग्रहांचे गुणधर्म लक्षात घेऊ लागलो तर सर्वात महत्त्वाचे ठरावेत ते त्यांचे वस्तुमान आणि त्यांचे आपल्यापासूनचे अंतर. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच इतर ग्रहही फिरतात आणि त्यांची गती वेगवेगळी असते त्यामुळे त्यांचे आपल्यापासूनचे अंतर सदोदीत बदलत असते. त्यामुळे त्यांचा परिणाम हा ते सूर्याशी किती अंशांचा कोन करतात यापेक्षा त्यांचे आपल्यापासून अंतर किती आहे यानुसार ठरायला हवा. भौतिकशास्त्राला ज्ञात चारच बलं आहेत. त्यातील एकच बल अर्थात गुरुत्वाकर्षणशक्ती ही लांब पल्ल्यावर काम करते. म्हणजेच जर शनी, मंगळ, गुरू यांचं एखादं बल आपल्यावर काम करत असेल तर ते गुरुत्वीय बलच असू शकतं. गुरुत्वीय बल हे वस्तुमानाप्रमाणे वाढतं. वस्तुमान दुप्पट झालं तर बलही दुप्पट होतं. त्याउलट अंतर वाढलं की बल कमी होतं आणि तेही वर्गाप्रमाणे. म्हणजेच अंतर जर दुप्पट झालं तर बल चतुर्थांश होतं.
या गणितानुसार जर आपण मंगळाचा आपल्यावर किती परिणाम होऊ शकतो हे पाहिलं आणि त्याची तुलना १०० किलोग्राम वजनाच्या, एका मीटरवर असलेल्या एका व्यक्तीच्या बलाशी केली तर ती दोन्ही बले जवळजवळ सारखीच असतात हे दिसतं. मंगळाचे वस्तुमान एकावर २४ शून्य इतके किलोग्राम आहे आणि त्याचं सरासरी अंतर साधारण एकावर ११ शून्य इतके मीटर आहे. म्हणजेच १०० किलोच्या पहलवानापेक्षा एकावर २२ शून्य इतकं बल वजनामुळे जास्त, पण अंतर एकावर ११ शून्य इतकी मीटर कमी असल्यामुळे त्याचा वर्ग अर्थात एकावर २२ शून्य इतक्या प्रमाणात कमी आणि हे दोन घटक सारखेच असल्यामुळे एकमेकांना रद्द करतात. आता जर फक्त ५० किलोग्राम वजनाचा डॉक्टर एखाद्या व्यक्तीपासून अर्ध्या मीटरवर असेल तर वस्तुमान अर्धे झाले म्हणून बल अर्धे होणार पण अंतर अर्धे झाले म्हणून बल चौपट होणार. म्हणजेच मंगळाच्या दुप्पट. या गणितानुसार एका व्यक्तीचं शेजारच्या दुसऱ्या व्यक्तीवर असलेले गुरुत्वीय बल हे दूर असलेल्या मंगळापेक्षा जास्त असतं. यामुळेच मुलाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या डॉक्टरचे किंवा सुईणीचे गुरुत्वीय बल बालकावर जास्त असतं.
या निर्विवाद युक्तिवादामुळेच अनेकदा फलज्योतिषी म्हणतात की पत्रिकेतले ग्रह फक्त त्यांच्यामधील कोनांपुरते. बाकी मात्र त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. क्षणभर ते खरं आहे असं मानलं, तरीदेखील त्यांचे गुणधर्म कोणते हे सांगायला हे फलज्योतिषी तयार नसल्यामुळे पुढे सगळं अडतं. थोडक्यात काय तर, फलज्योतिष हे पूर्णपणे निराधार आहे. जादूगार ज्याप्रमाणे पोतडीतून हवं तेव्हा हवं ते काढतो त्याचप्रमाणे फलज्योतिषी वाटेल तेव्हा वाटेल ते गुणधर्म या ग्रहांच्या माथी मारतात आणि त्यांच्याद्वारे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या कपाळी काहीबाही थोपतात. खरं तर फलज्योतिषांची हि स्थिती ग्रहांनी ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं‘ अशी केलेली आहे. तरी पण लोक साधारण कोणत्यातरी परिस्थितीमुळे अगतिक झाल्यावरच ज्योतिष्यांकडे जातात. वर दिलेल्या युक्तिवादाची त्यांना माहिती नसते, किंवा त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे काहीही खरं मानण्याची त्यांची मनस्थिती असते, आणि त्यामुळेच फलज्योतिषांचे फावते.
लग्नासारखी नातीसुद्धा सामंजस्यावर, प्रेमावर न बेतता दूरवर असलेल्या निर्जिव आणि त्यामुळे निर्बुद्ध ग्रहांवर सोपवून लोक अजाणता आपल्या (व आपल्या पाल्यांच्या) पायावर कुऱ्हाड मारून घेतात. अनेकदा यातील विजोड लग्न घटस्फोटाच्या दुसऱ्या टॅबूमुळे त्रासदायक संसाराला कारणीभूत होऊ शकतात.
त्यामुळे गरज आहे ती प्रबोधनाची, वरील युक्तिवाद सगळ्यांपर्यंत पोचवण्याची. कार, कंप्युटर वगैरे घेतल्यावर जशी हमी मिळते तशी फलज्योतिषी देऊ लागले तर बहुतांश भाकिते कशी निराधार असतात हे आपसूकच सिद्ध होईल, त्याचा एक संख्याशास्त्रीय पडताळासुद्धा येईल.
खगोलशास्त्राची प्रगती
काही शतकांपूर्वीपर्यंत विजा, वादळे, पूर वगैरे दैवी प्रकोप समजले जायचे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ठरावीक महिन्यांमध्ये ठरावीक नक्षत्रं दिसतात. पावसाळ्यात दिसणाऱ्या नक्षत्रांचा आणि पावसाचा संबंध जोडला जाणे साहजिक होतं. पण ती नक्षत्रं दिसतात तेव्हा पाऊस पडतो याऐवजी त्या नक्षत्रांमुळेच पाऊस पडतो अशी धारणा जुन्या काळी होती. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे रात्री दिसणारे तारे ठरावीक वेगाने त्यांची स्थानं बदलत. याउलट आपल्याच सौरमालेतील ग्रहांचे खगोलातील भ्रमण अनियमित वाटे. त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं. डोळ्यांनी पाच ग्रह दिसत असल्यामुळे त्यांनाच पत्रिकेत डांबलं. सोबतीला सूर्य–चंद्र होतेच. नंतर सापडलेले युरेनस नेपच्यूनसारखे ग्रह लोकांच्या पत्रिकेत फार काही उच्छाद मांडतांना दिसत नाही. पंधराव्या शतकाच्या सुमारास सौरमालेबद्दलच्या विज्ञानाच्या कल्पना नवीन ज्ञानामुळे उत्क्रांत झाल्या. पृथ्वीसकट इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात हे लक्षात आलं. तेव्हापासूनच खरंतर खगोलशास्त्राची आणि फलज्योतिषाची फारकत झाली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे गुरू आणि शनीभोवती अनेक चंद्र आहेत हे कळलं. मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान असलेल्या लाखो लघुग्रहांबद्दल कळलं. त्याहीपलीकडे असलेल्या आणि धूमकेतूंना जन्म देणाऱ्या ऊर्ट क्लाउडबद्दल कळलं. धूमकेतू विनाशाचे प्रेषित न राहता वैज्ञानिक कुतूहलाचे विषय बनले. विसाव्या शतकात मानव पृथ्वीभोवती उपग्रह स्थापू लागला. मानवाने अवकाशात भरारी घेतली. तो चंद्रावर जाऊन पोचला. मानवनिर्मित याने मंगळावर तर उतरलीच पण दूरच्या एका धुमकेतूवर*, तसेच एका लघुग्रहावर** देखील जाऊन पोचली. व्हॉयेजर*** याने तर सौरमालेच्या वेशीपर्यंत जाऊन पोचली आहेत. हे सर्व आपल्या सौरमालेतील. ह्यापलीकडे देखील अनेक सुरस शोध मानवाने लावले.
भारतानेही अनेक उपग्रह पृथ्वीभोवती स्थापले, चंद्र–मंगळावरील मिशन्स साध्य केल्या, आणि लवकरच भारतीय मानवालापण अवकाशात पाठवणार आहे. असं सर्व असताना भारतीयांनी, भारतीय समाजाने खगोलीय प्रगतीला प्राधान्य द्यायला हवं कि जुन्या तर्कहीन समजुतींमध्ये अडकून राहून पुढच्या पिढीला अज्ञानात लोटावे हे सुज्ञास सांगणे न लगे. पण अशा सुज्ञ लोकांनी इतरांपर्यंत हे विचार पोहोचवणे अतिशय आवश्यक झाले आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
* https://en.wikipedia.org/wiki/Philae_(spacecraft)
** https://www.nasa.gov/osiris-rex
*** https://voyager.jpl.nasa.gov/
या लेखाचा काही भाग इतक्यातच दिलेल्या दोन भाषणांवर आणि त्यांच्यावर आलेल्या काही प्रतिक्रियांवर तसेच लोकायत ग्रुपवरील काही चर्चांवर आधारित आहे.
नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक प्रकाशन (१ ऑगस्ट २०२१) https://tinyurl.com/6vrhmj42 (मिनीट २७ पासून)
ब्राइट्स सोसायटी (७ मार्च २०२१) https://tinyurl.com/85stfbpd (मिनीट ८ पासून)
लेख सुधारक ऑगस्ट २०२१ अंकात पूर्वप्रकाशीत.
You can't solve a problem by
You can't solve a problem by having the same mindset that created it. विद्यापीठात ज्योतिषाचे शिक्षण न देणे हा सध्याचा माईंडसेट. त्याने स्तोम वाढतेच आहे. हार्वर्डसारख्या विद्यापीठात प्रेडिक्टीव्ह सायन्सेसच्या कोर्सेससाठी ज्योतिषाचे फ्रेशमन सेमिनार्स देतात. ज्योतिष कला/शास्त्राची अभ्यासक्रमात नीट 'पोझिशनिंग' न झाल्याने भारत ह्या बाबतीत ही कॅच-अप खेळणार. येऊ दे विद्यापीठात, होऊ दे संशोधन, होऊ दे सिद्ध की आता जेनेटीक्स/ ए.आय इ मुळे अधिक बरे 'प्रेडीक्टीव्ह सायन्स' उपलब्ध आहे. ज्योतिषाची गरज कमी होईल. Let that industry drive the education needed.
मानवदादा, दारू कशी तयार करायची, तंबाखू उत्पादन इ बद्दल कोर्सेस असतात.
मायबोलीवरील आयडी र* या
मायबोलीवरील आयडी र* या अक्षराने सुरू होत असेल तर, तो आयडी एखाद्या विषयातले कळत असो वा नसो, ठामपणे आपली बिनबुडाची मते, इतर जगाला तुच्छ लेखत मांडतो, असे अनुमानम, दोन उदाहरणांवरून करता येईल का?
ऋ ला आधुनिक अंकलिपीतून हद्दपार करून र ची स्थापना केलेली आहे - वक्री ग्रहांप्रमाणे.
@बोकलतः तुमच्यासारखेच विकुंनीही मिरजेत काही वर्षे घालवली आहेत. मिरजेत राहिलेल्या आणि योग्य जागी वेळ घालवलेल्याची मटक्यात पीएचडी होते.
सीमंतिनी, हार्वर्ड
सीमंतिनी, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं म्हणजे
https://www.predictionx.org/modern-predictions
हे का? त्यात ते ज्योतिष सांगायला शिकवत नाहीत, तर भविष्यात काय होणार हे सांगण्याच्या पद्धती कशा कशा बदलत गेल्या आणि आता काय पद्धती आहेत त्याची माहिती देतात.
हार्वर्डसारख्या विद्यापीठात
हार्वर्डसारख्या विद्यापीठात प्रेडिक्टीव्ह सायन्सेसच्या कोर्सेससाठी ज्योतिषाचे फ्रेशमन सेमिनार्स देतात
हे name dropping आहे. वरती वावेंनी दिलेले स्पष्टीकरण बोलके आहे.
माझं मत असं आहे - उपलब्ध
माझं मत असं आहे - उपलब्ध असलेलं सगळं फलज्योतिष.१ चं साहित्य, लिखाण, आर्टिफॅक्ट्स इ. चा डेटा डिलिजंटली गोळा करुन, एए प्लॅटफॉर्मवर त्याचं स्वरुप बदलायला (फलज्योतिष.२) आणण्याची गरज आहे. >>> +१ याच्याशी मी सहमत आहे.
हे जर ऑब्जेक्टिवली केले गेले तर यातून नक्की कार्यकारणभाव - कॉजेशन आहे, की बहुतांश नुसतेच कोरिलेशन आहे हे ही कळून येइल. पण यातही किमान दोन चॅलेंजेस आहेतः
१. निष्पक्षपणे प्रत्येक व्हेरिएबल ची निवड व त्याचे "वजन" (वेटेज). यात तो प्रयोग करणार्याचा बायस १००% येणार. तो बायस यावरच्या विश्वासाचाच असेल असे नाही, एखादे व्हेरिएबल किती महत्त्वाचे किंवा रिलेव्हंट आहे याबद्दलचाही असू शकतो.
२. दुसरे म्हणजे सगळी व्हेरिएबल्स धरलीच गेली नाहीत तर निष्कर्षही अपूर्ण असू शकतो. एक उदाहरण म्हणजे एका ठराविक ग्रहस्थितीमधे एका ठराविक गटातील लोकांना पैसे मिळतात अशी थिअरी आहे असे समजा. असेही समजा, की प्रत्यक्ष अनुभव असे आहेत की काही लोकांना मिळाले, काहींना नाही.. पण प्रतक्षात जर विश्वातील आणखी पन्नास गोष्टी ठराविक ठिकाणी असल्या तरच ते होत असेल, तर त्या गोष्टींबद्दलची व्हेरिएबल्स वगळून हे नक्की कधीच कळणार नाही. या पन्नास गोष्टी - म्हणजे पन्नास व्हेरिएबल्स - पारंपारिक ज्ञानाच्या हस्तांतरणात विस्मृतीत गेली असतील - म्हणजे बापाने पोराला किंवा गुरूने शिष्याला "पण त्यावेळेस हिवाळा हवा, व त्या व्यक्तीचा जन्म रविवारी झालेला असावा" हे सांगितलेच नाही. त्यामुळे हे नक्की कधी खरे होते व कधी होत नाही हे त्या भविष्य सांगणार्यालाही माहीत नाही. त्याचबरोबर ती व्हेरिएबल्स आधुनिक विज्ञानाच्या कसोट्या सुद्धा विचारात घेणार नाहीत, कारण ती चर्चेतच नाहीत - आणि त्यामुळे कोणत्याच पद्धतीने हे सिद्ध होउ शकत नाही. हे जास्त मोठे आव्हान आहे.
ते हिवाळा, व्यक्तीचा जन्म वगैरे पूर्णपणे अशास्त्रीय आहे हे मला माहीत आहे. केवळ उदाहरण म्हणून ते लिहीले आहे. अशा प्रयोगांच्या दृष्टीने ती सगळी केवळ व्हेरिएबल्स आहेत. त्यातील कार्यकारणभाव आहे की नाही हे या प्रयोगांमधूनच कळते.
आता हे शाळेत शिकवा वगैरे मी म्हणत नाही. पण असे प्रचंड मोठा डेटा वापरून प्रयोग करायला हरकत नाही.
वावे, हो, मी ही तेच लिहीले
वावे, हो, मी ही तेच लिहीले आहे ना. प्रेडीक्टीव्ह सायन्स मध्येच लिहीले आहे पण लेजिटीमाईझ होतचं ना. त्याला विरोध आहे ना?? म्हणजे इतिहास म्हणून चर्चा केली तर चालेल विद्यापीठात पण भविष्य बघायचं कसं ते शिकवू नका असं आहे का? मुले एकदा ह्या माहितीला एक्सपोज झाली की ते काय करणार ह्यावर काय कंट्रोल ठेवणार कोण?? (वेगळं उदाहरण द्यायचं तर एव्होल्यूशन शिकवताना कुणी दशावतार किंवा अॅडम-इव्ह शिकवा म्हणाले तर उत्तर नाहीच पाहिजे.) . जाऊ दे, आता मी इथे थांबते.
ज्योतिष भरपूर विस्मयकारी विषय
ज्योतिष भरपूर विस्मयकारी विषय आहे आणि मी काही इंटरेस्टिंग अनुभव घेतले आहेत या बाबतीत पण ते नियमबद्ध विज्ञान आहे यावर माझा विश्वास नाही. मुळात हे तर्कशास्त्रात बसत नाही - समजा आपण असं मानतो आहोत की अमुक ग्रहस्थिती आहे म्हणून अमुक एक गोष्ट होईल. समजा अकाली मृत्यू. आता आपल्याला तो टाळायचा असेल आणि काही उपायांनी तो टळला तर मग मूळ भविष्य खोटं होईल ना? आणि जर उपाय करूनही नशीबात असलेला अपमृत्यू टळला नाही तर मग भविष्य बघण्याचा फायदा काय? There is no "control group" to test such hypothesis. विज्ञानातली वस्तुनिष्ठता यात तुम्ही आणू शकत नाही. पु. लं. म्हणतात ना तसं तुमच्या कुंडलीत चांगला ज्योतिषी भेटण्याचा योग असला पाहिजे!
तुम्हाला जेव्हा अनिश्चितता भेडसावत असते तेव्हा तुम्ही अशा गोष्टींचा आधार शोधता - एखादा मंत्र म्हणून एखाद्याला बरं वाटत असेल तर ते बरं वाटणं खरच असतं पण म्हणून दुसर्या व्यक्तीला बरं वाटेलच असं नाही. ज्योतिष हे शास्त्र नसून एक आधार व्यवस्था आहे. जितकी समाजात अव्यवस्था आणि अनिश्चितता अधिक तितकी या आधाराची गरज अधिक (घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे?) It is very easy to dismiss something as unscientific but if we truly want to make a difference then we should find out why people need this belief system.
राज, तुम्ही AI विषयी अधिक लिहावं अशी विनंती. मला तुमचे argument फारसे कळलेच नाही.
सध्याच्या अवस्थेतलं फलज्योतिष
सध्याच्या अवस्थेतलं फलज्योतिष.१ बर्याच कारणांमुळे बदनाम झालेलं आहे. माझं मत असं आहे - उपलब्ध असलेलं सगळं फलज्योतिष.१ चं साहित्य, लिखाण, आर्टिफॅक्ट्स इ. चा डेटा डिलिजंटली गोळा करुन, एए प्लॅटफॉर्मवर त्याचं स्वरुप बदलायला (फलज्योतिष.२) आणण्याची गरज आहे.>>>
राज विचार चांगला आहे. predictive analytics modeling वापरता येवू शकेल. फक्त इशु असा दिसतो कि दोन व्यक्तींचे स्वभाव, आवडी निवडी वगैरे कदाचीत सांगता येईल. म्हणजे ही व्यक्ती याग्रहात जन्मली म्हणुन तिचा स्वभाव तापट असु शकेल. (बेस्ड ऑन हिस्टॉरिक डाटा ) पण भविष्य वर्तविणे , कॅन्सर होईल, लग्न कधी होईल हे तरीही अवघ्डच आहे. कारण समजा २ व्यक्ती एका हॉस्पिटल मध्ये एकाच वेळी जन्मल्या तरीही पॅरेंट्स, आर्थिक स्थिती,वगैरे त्या दोन बाळांच्या आयुष्यावर परिणाम करण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजेच एक्स्टरनल फॅक्टर ह्या डाटा सेटचे प्रेडीक्शन संपुर्ण बदलू शकतात. अॅझ्युम करुया कि सब पॅटर्न तयार करताना ,भोवतालच्या परिस्थितीनुसार केले. तरीही पालकांची परिस्थिती कधीही (डायव्होर्स , मृत्यु, लॉटरी, व्यवसायतले अपयश ) बदलु शकते. म्हणजे मग पालकांचा एक डाटा मॉडेल तयार करायला पाहिजे.
बरं इतके सगळे असून आउटलायर्स आहेतच. उदा.सचिन तेंडुलकर ,ओबामांचे
एकूनच अशा बिन भरवशाच्या डाटावर मॉडेलिंग करण कितपत योग्य आहे.
>>https://www.predictionx.org
>>https://www.predictionx.org/modern-predictions हे का?<<
हि ३० मिनिटांची प्रो. अॅवि लोबची क्लिप तुम्ही पाहिलीत? पाहिली नसेल तर प्लीज पहा, एस्पेशिय्ली १७व्या मिनिटाच्या पुढे. तो ब्लु स्काय रिसर्चबाबत काय म्हणतोय ते बघा, आणि त्यावर तुमचं मत इथे मांडा...
>>एकूनच अशा बिन भरवशाच्या डाटावर मॉडेलिंग करण कितपत योग्य आहे.<<
दॅट्स व्हेअर डेटा सायंस कम्स इंटु प्ले. मी जास्त खोलात शिरणार नाहि, पण तुम्हि आउटलायर्सचा जो उल्लेख वर केलेला आहे, ते हँडल करण्याकरता बर्याच टेक्निक्स आहेत - रिग्रेशन अनॅलिसिस इज वन ऑफ देम...
फारच डोक्यावरून चालली आहे
फारच डोक्यावरून चालली आहे चर्चा.
फारएन्डने जे मुद्दे मांडलेत, तेच मुद्दे इतर प्रेडीकटीव्ह मॉडेल्समध्येही येतीलच ना? म्हणजे वेदर रिपोर्ट साठी जे सिम्युलेशन करतात त्यात तरी कुठे सगळे इंपुट्स माहीत असतात? शेवटी केऑसच म्हणतात ना हवामानातल्या व्हेरिएबल्सना (तोच तो, ज्यातून कॉसमॉस निर्माण होतो)? एकीकडे फुलपाखराच्या पंखांच्या फडफडीमुळे जगाच्या दुसऱ्या टोकात वादळ येऊ शकते (बटरफ्लाय इफेक्ट) - असली काहीतरी अतर्क्य विधानं ते लोक करत असतात. मला तर ए आय ही पण एक अंधश्रद्धाच वाटते बुवा!
तो ब्लु स्काय रिसर्चबाबत काय
तो ब्लु स्काय रिसर्चबाबत काय म्हणतोय ते बघा, आणि त्यावर तुमचं मत इथे मांडा>>
छानच आहे ती मुलाखत. बरं झालं ऐकली. ब्लू स्काय रिसर्चबद्दल त्यांनी असं म्हटलंय की शास्त्रीय संशोधनात वास्तवाचं सखोल आकलन (deeper understanding of reality) करून घेऊन केलेलं संशोधन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे अनेक नवीन दिशांनी नवीन नवीन संशोधनाच्या शक्यता निर्माण होतात. असं खुलं संशोधन मोलाचं आहे! त्यांनी उदाहरण दिलं की आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत हा मुळात विश्वातील घडामोडींचं स्पष्टीकरण म्हणून मांडला गेला. पण त्याचा उपयोग नंतर जीपीएससाठी केला जाईल याची कल्पना त्याला अर्थातच नव्हती.
तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की ज्योतिष या शाखेचा दरवाजा बंद करून आपण अशा खुल्या संशोधनाची दारं बंद करतोय, तर मी म्हणेन की ज्योतिष सांगण्यावर बंदी आणली पाहिजे असं इथे कुणीही म्हणत नाहीये! In fact, फलज्योतिष हे विज्ञान आहे की नाही हे प्रयोगांती सिद्ध करण्याचा प्रयत्नही आपल्याकडे डॉ. जयंत नारळीकरांच्या सहभागाने झालेला आहे. (उत्तर नकारार्थी आलं). पण परत, अधिक डेटा गोळा करून नवीन तंत्रं वापरून जर कुणी शास्त्रीय पद्धतीने असा प्रयोग करायचा म्हटला तर जरूर करावा!
वरील लिंकमधे, त्याच मुलाखतीत तिसाव्या मिनिटाच्या पुढे ते म्हणालेले आहेत की today we know that astrology bears no scientific credibility! माया संस्कृतीतल्या लोकांनी आकाशातल्या ग्रहताऱ्यांचा भरपूर डेटा गोळा केलेला होता. पण भरपूर डेटा गोळा करून पुरत नाही. थिअरी चुकीची होती.
सीमंतिनी, उत्क्रांती शिकवताना दशावतार आणि adam-eve वगैरे शिकवणं बरोबर नाही, पण माणूस कसा निर्माण झाला किंवा मुळात जगच निर्माण कसं झालं याबद्दलच्या निरनिराळ्या संस्कृतींमधल्या चालत आलेल्या कल्पना जरूर सांगाव्यात.
बाहेर गेलेला माणूस लवकर घरी परत आला नसेल तर उंबरठ्यावर मीठ ठेवण्याची प्रथा होती असं सांगणं आणि उंबरठ्यावर मीठ ठेवलं की बाहेर गेलेला माणूस सुखरूप परत येतो असं सांगणं यात मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे!
आपण ज्या ठिकाणी जन्म घेतो
आपण ज्या ठिकाणी जन्म घेतो त्या ठिकाणचे को-ओर्डीनेट वेगवेगळे असतात. त्या ठिकाणी असेल्या ग्रहांचा प्रभाव वेगवेगळा असतो. त्यामुळे एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी जन्म घेतलेल्या बाळांचं भविष्य वेगवेगळं असतं. ईथली चर्चा वाचून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तुमच्या सगळ्यांचे बेसिक खूपच कच्चे आहे. मी जमेल तसं इथे लिहीत राहीन जेणेकरून तुमच्या ज्ञानात भर पडेल. आता जसं मी वर बोललो कि को-ओर्डीनेट वेगवेगळे असतात तर मला वाटत नाही तुमच्यापैकी कोणी हा विचार यापूर्वी केला असेल.
मागे सिंगापूरच्या एका
मागे सिंगापूरच्या एका विद्यापीठातून एक रिसर्च पेपर पब्लिश झाला. फर्स्ट एव्हर सच रिसर्च वगैरे दावा करून. "Eating out is related to high risk of hypertension"
वाचल्यावर कळलं की बाहेर खाल्ल्याने जास्त कॅलरीज आणि मीठ खाल्ल्या जातं त्यामुळे. (आपल्या कडची घरचीच लोणची, पापड, जितकी जास्त साखर तितका चांगला चहा, तो कितीही वेळा पिऊ शकतो पद्धत यांना ठाऊक नसावी.)
हे म्हणजे ऍनोफेलेस डासाची मादी चावल्याने मलेरिया पसरतो या ऐवजी रात्री पंखा न लावता झोपल्याने मलेरिया पसरतो असा रिसर्च पेपर पब्लिश करणं झालं. (या आधी मलेरियावर कसलंच संशोधन झालं नसतं तर गोष्ट जरा वेगळी.)
काय कारण आहे याच्या आधी शक्य तितक्या मुळाशी जाऊन (जे आजच्या काळात बऱ्या पैकी शक्य ) तथ्य दिसल्यास मग त्याचा योग्य पद्धतीने AI मध्ये वापर करायचा, की आहे AI तर टाकत बसा कुठलाही डेटा करायचं?
मी डासांसाठी पेस्ट कंट्रोक करुन घेतलंय, दारा खिडक्यांना डास न येणाऱ्या जाळ्या बसवल्यात, मच्छरदाणी लावली आहे, थंडी कडाक्याची पडली आहे आणि पंखा नाही लावला म्हणुन मला माझं गॅजेट मला मलेरिया वॉर्निंग देतंय.
वर वावेंनी लिहिलं तसं इच्छुकांनी सगळी अत्याधुनिक तंत्रे वापरून डेटा ऍनालाईझ करावा, रॉ डेटा आणि निष्कर्ष दोन्ही जगा समोर मांडावेत, असेल तथ्य तर जग ते स्वीकारेल, घ्यावे अधिकृत अभ्यासक्रमात.
वावे, छान उदाहरण!
वावे, छान उदाहरण!
राज, बेसिकली ज्योतिषी हे त्यांना माहीत असलेले नियम आणि समोर बसलेल्या व्यक्तीचे माहिती असलेले subjective variables वापरून आपल्या मेंदूने (पक्षी: natural intelligence) एक संभाव्य भविष्य वर्तवत असतो. तुम्ही तीच प्रोसेस automate करून AI च्या सहाय्याने भविष्य सांगितले तर ते किती जुळेल असे करून बघावे असे म्हणत आहात. आणि या प्रकारे आत्ताची पद्धत validate करावी. पण हा द्राविडी प्राणायाम वाटतो आहे. शिवाय एवढी सगळी resource intensive process कशासाठी तर एका पंचांग घेऊन करता येणाऱ्या एका जवळपास zero resource intensive process च्या validation साठी? याचा end goal नक्की काय आहे?
इतका खटाटोप करणं worth आहे का?
बोकलत, मी केला होता तो विचार,
बोकलत, मी केला होता तो विचार, पण म्हणलं जाऊ दे, सोप्या शब्दात समजावून सांगणं अवघड जाईल. त्यापेक्षा बटरफ्लाय इफेक्ट कसा, अगदी शेमड्या पोराला/पोरीलाही कळेल असा आहे.
फलज्योतिषातील शास्त्रत्व
फलज्योतिषातील शास्त्रत्व तपासण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर संशोधन करून या वादाचा निर्णय लावता येईल अशी आशा पुष्कळ बुद्धिवादी लोकांना वाटते. परंतु हे शास्त्र अशा संशोधनासाठी निरुपयोगी आहे असे आम्हास वाटते. याची कारणे:-
१) या शास्त्रातल्या फलित दर्शवणाऱ्या मापदंडांची संख्या अगणित बनत जाते. शिवाय पूर्वसंचितासारखे अज्ञेय मापदंड त्यात आहेत.
२) ग्रहस्थितीची तंतोतंत पुनरावृत्ती कधीच होत नसते. त्यामुळे पुन:प्रत्यय घेणे शक्य नसते. म्हणजे हे संशोधन प्रत्यक्षात आणणे शक्य नाही.
३) सौख्य व स्वभावविश्लेषण या गुळमुळीत अथवा सापेक्ष बाबींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर संशोधन कसे आणणार? त्यासाठी नि:संदिग्ध बाबी घेतल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, मृत्यू, मोठे आजारपण, मोठा अपघात, शारीरिक व्यंग, इत्यादी.
४) पुरेसा विदा मिळणं व्यक्तिगत पातळीवर शक्य होत नाही. वि.म.दांडेकरांनी संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढण्याइतपत विदा मिळाला नाही असे सांगितले होते. परदेशात पुन:पुन्हा प्रायोगिक तत्त्वावर संशोधने केली गेली. पण त्यातून फारसे काही हाती आले नाही. फलज्योतिषाचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध ते निष्कर्ष गेले की ते संशोधनात त्रुटी काढतात. जसे की डेटा करप्ट होता, डेटा अपुरा होता, डेटा मॅनिपुलेटेड होता. प्रचलित फलज्योतिष, विज्ञान म्हणून सिद्ध होण्यास संशोधनाचा आतापर्यंत काहीही उपयोग झाला नाही. भविष्यात झाला तर आनंदच आहे.
राज यांचे मुद्दे futurology
राज यांचे मुद्दे futurology ला लागू होतील पण Astrology ला लागू होतील असे वाटत नाही
ज्योतिषशास्त्र पॉवरफुल आहे पण
ज्योतिषशास्त्र पॉवरफुल आहे पण आताच्या मनुष्यजातीला त्यातलं जवळपास काहीच माहीत नाही. जेव्हा एखादा बोलतो की त्याला ज्योतिष माहीत आहे तेव्हा त्याला प्रत्यक्ष काहीच माहीत नसतं. कारण जे खरेखुरे ज्योतिष विषयात पारंगत आहेत ते कधीच लोकांसमोर येत नाहीत. ज्योतिष शास्त्रात सांगितलंय की तुम्हाला अवगत असलेली ही विद्या नेहमी मनुष्यजातीच्या कल्याणकरता वापरा. पण आताचे ज्योतिषी पैसे कमावण्यासाठी याचा वापर करतात. आणि हे खूप सेफ फिल्ड आहे. जो शाळेत कधी गेला नाही तोपण ज्योतिषी होऊ शकतो. मनाने खचलेली लोकं यांच्याकडे लगेच आकर्षित होतात.
लेख पूर्ण वाचला .एवढच
लेख पूर्ण वाचला .एवढच महत्वाचं वाटलं --आपण अनेकदा सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून नको त्या गोष्टींच्या नादी लागू शकतो. अशावेळी खरं तर लोकांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.-- आणि वेडे लोकच मानसोपचार घेतात ही धारणा बदलायला हवी . मानसोपचार घेणाऱ्या रुग्णावर कोणताही स्टीग्मा नसावा. खरच अजूनही भारतात हे कठीण आहे.
आणि वेडे लोकच मानसोपचार घेतात
आणि वेडे लोकच मानसोपचार घेतात ही धारणा बदलायला हवी . >>>>>>+१२३४५६७
ये तो मै बाबा आदम के जमानेंसे बोल रही हूं !
>>>>>>आपण ज्या ठिकाणी जन्म
>>>>>>आपण ज्या ठिकाणी जन्म घेतो त्या ठिकाणचे को-ओर्डीनेट वेगवेगळे असतात. त्या ठिकाणी असेल्या ग्रहांचा प्रभाव वेगवेगळा असतो. त्यामुळे एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी जन्म घेतलेल्या बाळांचं भविष्य वेगवेगळं असतं.
बोकलत तुम्ही म्हणताय की २ बाळं एकाच वेळी पण २ वेगवेगळ्या खोल्यांत (= कोऑर्डिनेटस) जन्मास आली म्हणून भविष्य बदलतं?
म्हणजे कित्येक प्रकाशवर्षे दूर असलेले चंड-प्रचंड ग्रहं असे फूटा फूटाने वेगळे परीणाम घडवु शकतात???? मग ज्योतिषात फक्त स्थान का विचारतात = पुणे, महाराष्ट्र, भारत. ज्योतिषात अॅक्च्युअल इतके फाईन को ऑर्डिनेटस कोणीच विचारत नाहीत. म्हणजे तर मूळातच ते शास्त्र चूकीच्या विद्यावर भविष्य वर्तवत बसत.
हे मला पण नाही कळले.
हे मला पण नाही कळले.
वेगवेगळ्या खोल्यांत (=
वेगवेगळ्या खोल्यांत (= कोऑर्डिनेटस) जन्मास आली म्हणून भविष्य बदलतं?>>> हो.
म्हणजे कित्येक प्रकाशवर्षे दूर असलेले चंड-प्रचंड ग्रहं असे फूटा फूटाने वेगळे परीणाम घडवु शकतात???? >>>> हो. सगळ्यात प्रथम तुम्ही लक्षात घ्या की बाळाचा जन्म होतो तेव्हा अमुक एक ग्रहस्थिती असते ती ज्योतिषशास्त्राची पहिली स्टेप आहे. नन्तर तुम्ही जशा खोलात शिराल तसे अनेक पैलू तुमच्यासमोर उघडले जातील पण आताच्या मनुष्याना हे बाकीचे पैलु माहीत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्हाला अमेरिकेत कोणी विचारलं भारतात लाइफस्टाइल कशी आहे तर तुम्ही एक ढोबळमानाने थोडक्यात सांगाल. हे झालं आताच ज्योतिषशास्त्र जे मनुष्याना माहीत आहे.पण तेच तुम्हाला विचारलं की भारतातील महाराष्ट्रात तुमच्या नेटिव्ह ठिकाणची लाइफस्टाइल कशी आहे तर तुम्ही अजून अचूकतेने वर्णन कराल. हे झाले ज्योतिषशास्त्राचे पैलू जे कोणालाच माहीत नाहीत.
ज्योतिषात अॅक्च्युअल इतके फाईन को ऑर्डिनेटस कोणीच विचारत नाहीत. म्हणजे तर मूळातच ते शास्त्र चूकीच्या विद्यावर भविष्य वर्तवत बसत. >>> मी वर सांगितलं आहे त्याप्रमाणे खरं ज्योतिषशास्त्र आज जवळजवळ कोणालाच माहीत नाही आणि ज्यांना माहीत आहे ते पैशांसाठी त्याचा वापर नाही करत. आपण असं बोलू शकत नाही की ज्योतिषशास्त्र चुकीचं आहे. ज्योतिषशास्त्र हे ढोबळ आहे , फक्त पहिल्या स्टेजवर म्हणजे ग्रहांच्या स्थितीवर आहे त्यामूळे एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी जन्म घेतलेल्या दोन बाळांचं ढोबळ भविष्य सारख असत पण त्यामधील पुढचे पैलू वेगळे असतात आणि भविष्यही.
>>अधिक डेटा गोळा करून नवीन
>>अधिक डेटा गोळा करून नवीन तंत्रं वापरून जर कुणी शास्त्रीय पद्धतीने असा प्रयोग करायचा म्हटला तर जरूर करावा!<<
करावा नाहि, केला गेला पाहिजे. तुम्हि किती बारकाईने ती क्लिप बघितली याची क्ल्पना नाहि, पण त्या क्लिपचा गाभा - ब्लु स्काय रिसर्च्स सोल एम इज टु एक्स्प्लोर अन्चार्टेड टेरिटोरी हा आहे. लोबने इवन सद्ध्याच्या शास्त्रज्ञांवर मस्त टिप्पणी केली आहे. कंझरवेटिव अॅप्रोच, प्रेजुडिस रिडुसेस द एफिशियंसी ऑफ डिस्कवरी. पुढे जाउन त्याने जुपिटरचं अतिशय चपखल उदाहरण दिलं आहे. बघा परत एकदा.
>>पण भरपूर डेटा गोळा करून पुरत नाही. थिअरी चुकीची होती.<<
बरोबर. पण पुढे जाउन तो म्हणतोय कि हॅविंग केपलर्/मायन डेटा इज नॉट इनफ (फलज्योतिष.१), वी नीड सम्थिंग मोर (फलज्योतिष.१+एआय = फलज्योतिष.२) टु ब्रिंग इट मेन्स्ट्रीम फॉर जनरलाय्ज्ड अंडरस्टँडिंग. हाच पॉइंट मी सुरुवाती पासुन मांडतोय; लोबहि तेच सांगतोय हे मात्र तुम्ही सोयिस्कररित्या स्किप केलंत. असो...
जुपिटरसारखा (वजनदार) ग्रह
जुपिटरसारखा (वजनदार) ग्रह ताऱ्याच्या जवळ असेल तर काय होईल याच्याबद्दल म्हणताय ना? त्याचं काय?
तुम्ही आत्ता जी लिंक दिली आहे ती ३० मिनिटांच्या व्हिडीओची आहे. https://www.predictionx.org/podcast-1 ही लिंक त्याच मुलाखतीच्या ऑडिओची आहे आणि ती ३९ मिनिटांची आहे. पुढची ९ मिनिटं व्हिडिओमध्ये नाहीत.
फलज्योतिषाबद्दल त्यांनी सरळसरळ म्हटलं आहे की त्याला काहीही वैज्ञानिक आधार नाही (पण ते पुढच्या नऊ मिनिटांत आहे. ते तुम्ही नक्की ऐका) फलज्योतिष मेनस्ट्रीममधे यावं असं त्यांनी कुठेही अजिबात म्हटलेलं नाहीये!
>>जुपिटरसारखा (वजनदार) ग्रह
>>जुपिटरसारखा (वजनदार) ग्रह ताऱ्याच्या जवळ असेल तर काय होईल याच्याबद्दल म्हणताय ना? त्याचं काय?<<
१९५२ मधे एकाने ती थियरी मांडली, तेंव्हाच्या हाय टेबल्च्या मेंबर्सनी ती धुडकावली, आणि चाळीस वर्षांनंतर तीला मान्यता मिळाली. परत एकदा ब्लुस्काय रिसर्च.. यु मिस्ड द पॉइंट...
>>फलज्योतिष मेनस्ट्रीममधे यावं असं त्यांनी कुठेही अजिबात म्हटलेलं नाहीये<<
ओके, तुमचा प्रॉब्लेम फलज्योतिषाचा उल्लेख एक्स्प्लिसिटली आलेला नाहि हा आहे. लोब आणि त्या मुलाखत घेणार्या बाईंचं जनरल मत आहे कि डेटा, क्रिएटिविटी आणि ओपन माइंडेडनेस यांची सांगड घालता आली पाहिजे. सायंटिस्ट कम्युनिटीचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, इन्टेड ऑफ गेटिंग ब्लाइंडसाय्डेड, दे नीड टु एक्स्पँड देर बाउंडरीज्/होरायझन इ. इ. अॅक्च्युअली, असे बरेच नगेट्स त्या क्लिपमधे आहेत, वेचता यायला हवे. असो...
हॉनेस्टली, मी तुमचे आभार मानतो, हि क्लिप इथे शेअर केल्याबद्दल. चौकटिच्या बाहेर पडुन विचार करणे या मताला त्यामुळे पुष्टी मिळाली...
१९५२ मधे एकाने ती थियरी
१९५२ मधे एकाने ती थियरी मांडली, तेंव्हाच्या हाय टेबल्च्या मेंबर्सनी ती धुडकावली, आणि चाळीस वर्षांनंतर तीला मान्यता मिळाली. >> करेक्ट. तेव्हा त्या थिअरीला पुष्टी मिळण्यासाठी टेलिस्कोपमधून निरीक्षणे घेण्याची गरज होती. ती निरीक्षणे कुणी घेऊ दिली नाहीत. पण कोंबडं झाकलं तरी ... न्यायाने उशिरा का होईना, त्या थिअरीला मान्यता मिळाली. अशी अनेक उदाहरणे सापडतील. नोबेल पारितोषिक विजेते चंद्रशेखर यांनी व्हाईट ड्वार्फ ताऱ्यांच्या वस्तुमानाच्या कमाल मर्यादेवरची थिअरी मांडली तेव्हा त्यांच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. पण तब्बल पन्नास वर्षांनी ते सर्वमान्य झालं!
फलज्योतिषाच्या बाबतीत उलट क्रम आहे असं नाही का वाटत? जेव्हा निरीक्षणे घेण्यासाठी डोळ्यांची मर्यादा होती, एकंदरीत सगळीच संसाधनं मर्यादित होती, माणसाच्या सृष्टीच्या आकलनाला मर्यादा होत्या, तेव्हा माणसाने फलज्योतिष तयार केलं. हळूहळू जसजसे डिटेल्स जास्त समजत गेले, विश्वाचं भान आलं, तसतशा फलज्योतिषातल्या उणिवा समजत गेल्या. वैज्ञानिक प्रगतीमुळे जी नवीन माहिती मिळालेली आहे तिच्या आधारे फलज्योतिष कसोटीवर घासून बघायचं की या नवीन आकलनाला जमेसच घ्यायचं नाही? नवीन तंत्रज्ञान तर आपण वापरणार आहोत, मग नवीन आकलनही जमेस धरायला नको का?
Prejudice limits horizons of
Prejudice limits horizons of scientific research हे बरोबरच आहे. सायंटीफिक कम्युनिटी कडुन असे ब्लंडर्स झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
फल ज्योतिष्याची सगळी गणिते, डेटा फीड करून तपासून पहाण्यात काही हरकत नाही. त्यावरून फलज्योतिष२ येईल की नाही हे कळेल. पण हे करणे मस्ट आहे म्हणायला (monetary आणि man power costs ) खर्च करण्यापूर्वी त्यात तेवढे तथ्य आहे का हे establish व्हायला हवे ना?
मला राज यांनी आधी दिलेल्या लिंकवर व्हिडिओ दिसला नव्हता, आता वरच्या पोस्टवर दिसला. वावेंनी दिलेल्या लिंक वर ऑडीओ क्लिप सापडली नाही. त्यात त्या म्हणतात तसे त्याला काही आधार नाही म्हटले असेल तर पुढे जाण्यात अर्थ आहे का?
परत prejudice नको म्हणुन जायचे असेल तर आधी त्यातून फलजोतिष्य २ निघेल की नाही हे ठरवणे ही पहिली स्टेप असेल. मग पुढच्या गोष्टी.
--------
मी टाईपुन पोस्ट करे पर्यंत वर दोन पोस्ट आल्या.
मानव, त्या लिंकवर गेल्यावर
मानव, त्या लिंकवर गेल्यावर खाली जाऊन शेवटचा पॉडकास्ट.
https://www.predictionx.org/podcast-1/episode/1a317392/predicting-the-fu...
ओके, ऐकली, धन्यवाद.
ओके, ऐकली, धन्यवाद.
Pages