घरच्या संभाषणाव्यतिरिक्त मराठीशी बाकी काहीही संबंध नसलेला माझा नवरा माझ्याआधी मायबोलीवर आला, ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट! २००७ साल असेल ते. इथे तो जो काही थोडे दिवस बागडला असेल, तेवढ्या काळात त्याला पुण्यातलं एक ओळखीचं जोडपं (!) इथे भेटलं. त्यानंतरच त्याने अशी अशी एक वेबसाइट आहे, वगैरे वर्णन करून मला सांगितलं. (ते जोडपं कोण होतं, हे आता त्याला आठवत नाही. त्याचा माबो आयडीही तो कधीच विसरलाय. )
मी ताबडतोब इथे माझं अकाऊंट उघडलं. आपली खरीखुरी ओळख इंटरनेटवर उघड करायची नसते हे तेव्हा डोक्यात पक्कं बसलेलं होतं. त्यामुळे ‘ललिता-प्रीति’ असा आयडी घेतला. (दोन्ही नावं माझीच आहेत.) पण तेव्हा (२००८) नेमकं माबोचं मेक-ओव्हर सुरू झालेलं होतं. मुख्य पानावरच्या काही लिंक्स तेवढ्या बघता येत होत्या. बाकी इथे काय करतात, वगैरे काहीही कळलं नाही. तेव्हा एकीकडे मी इंटरनेटवर मराठी टायपिंगची खटपट करत होते. मराठी टायपिंग आणि ब्लॉगिंग शिकण्यासाठी ब्लॉग सुरू केला होता. त्यातून अधूनमधून मी इथे येऊन बघायचे. पण बरेच दिवस जैसे थे होतं सगळं.
दरम्यान आम्ही गुजराथमधला मुक्काम महाराष्ट्रात हलवला. नव्या ठिकाणी बस्तान बसवून, नेट कनेक्शन वगैरे मार्गी लागून मला पुन्हा मायबोलीची आठवण येईपर्यंत २००९ उजाडलं. तोपर्यंत मेक-ओव्हर पूर्ण झाला होता. मग साईटची ओळख करून घेण्याची बेसिक झटापट करण्यात काही दिवस गेले. ‘कट्टा’ गप्पांचं पान गवसलं. माझ्या ब्लॉगवरच्या होतकरू पोस्टी मी इथे टाकायला सुरुवात केली. लगेच त्यावर तुरळक प्रतिसाद यायला लागले. भारी वाटलं ते मला एकदम.
सुरुवातीला काही पोस्ट करताना बिचकणे वगैरे मला कधीही जाणवलं नाही. एखादी नकारात्मक / खोचक टिप्पणी मनाला लावून न घेण्याची आधीपासून वृत्ती असल्यानं असेल. त्यामुळे मी सुरुवातीपासून इथे बेधडक बागडलेले आहे. एकदा मुख्य पानावर उजवीकडे तळात ‘विचारपूस(१)’ असं दिसलं आणि जाम आनंद झाला. ती बहुतेक स्मिता गद्रे होती. (पुढे विपुतल्या गप्पांमधून मंजूडीशी घरची ओळख निघाली. परागशी २-३ ओळखी निघाल्या. श्रीयुत स्वाती आंबोळे आणि मी शाळेत एका वर्गात होतो, हे समजलं. शाळेतले आजीमाजी इतर काही लोकही भेटले.)
मग आला २००९ चा मावळसृष्टी ववि. कमाल अनुभव होता तो माझ्यासाठी. किती कमाल ते या वृत्तांतात मी लिहिलं आहे. ( https://www.maayboli.com/node/9491) वविच्या वेळचं शिवाजी पार्क गटग, तेव्हा ठाणे स्टेशनवर पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलेले काही कट्टर्स (आनंद-सुजु, आनंद-मैत्री, अश्विनी-के हे आठवतात.) अश्विनी-के ही मी फोन नंबर्स एक्सचेंज केलेली पहिली माबोकर. वविच्या संयोजन समितीतर्फे घारुअण्णानं एकदा थेट फोन केला. तेव्हा पण भारी वाटलं होतं. (घारुचा फोन म्हणून नव्हे, तर संयोजक म्हणून ज्यांची नावं साइटवर दिसतात, ते माझ्यासारख्या नवख्या सदस्यालाही फोन करण्याची तसदी घेतात, या विचारानं.)
२००९ ते २०१२/१३ ही वर्षं मायबोलीवर जाम म्हणजे जाम टवाळक्या, धमाल केली. मी केलेला वेंधळेपणा, गाणी ओळखा, पुन्हा झुळूक, कट्टा, चिकवा, मालिका, पाकृचे धागे आणि सर्वात आवडता - मिवापु. गंभीरपणे चर्चा झालेला ‘कथालेखन - चर्चा आणि संवाद’ हा धागाही आठवतोय. रोज मायबोलीवर गप्पा आणि लेखन दोन्ही सुरू होतं. छोटे छोटे हलकेफुलके लेख लिहीत होते. त्यातल्या ‘अश्वेत राष्ट्राध्यक्ष आणि अश्वेत टी.व्ही.स्क्रीन’ या लेखावर पल्लीनं illustration काढलं आणि त्यासकट तो लेख मुख्यपृष्ठावर आला. (https://www.maayboli.com/node/5431) फार भारी वाटलं होतं त्यादिवशी. (ती लेखांची मालिका पुढे लोकसत्ताच्या पुरवणीतही प्रकाशित झाली. त्याच्याशी रिलेटेड आणखी काही लेख लोकसत्तासाठी म्हणून लिहिले. त्यासाठीचा confidence मायबोलीमुळेच मिळाला.) त्या ३-४ वर्षांत भरपूर गटग अटेंड केली.
२००९ सालीच ‘युद्धस्य कथा’ ही ६ लेखांची मालिका लिहिली. (https://www.maayboli.com/node/9147)
हळूहळू कथालेखन सुरू केलं.
२०१० साली ववि संयोजनात सहभागी झाले. त्याच वर्षी दिवाळी अंकाची मुख्य संपादक होणार का, म्हणून ॲडमिननी फोन केला. ते ऐकल्यावर आधी पोटात जरासा खड्डाच पडला. पण दणकून ‘हो’ म्हणून टाकलं. पाटी कोरी असल्यानं असेल, पण संपादन काम मी खूप एंजॉय केलं. दर वीक-एंडच्या ऑनलाइन स्काइप मीटिंग्ज वगैरे भारी वाटायचं मला (आणि घरच्यांना सुद्धा.) संपादक मंडळातले सगळे आपापल्या नोकर्या वगैरे सांभाळून हे काम करायचे, म्हणून मला त्यांचा नितांत आदर वाटायचा. त्यावर्षी दिवाळीत टेचात घरच्यांना सांगितलं- दिवाळीला येता येणार नाही, माबोचा दिवाळी अंक लॉन्च होतो, तेव्हा ऑनलाइन रहावं लागेल. हे सांगायला सुद्दा तेव्हा भारी वाटलं होतं.
(२०१० साली मनोगत साइटच्या दिवाळी अंकाचीही मी मुख्य संपादक होते. पुढे या दोन्ही संपादनकामाच्या अनुभवावर आधारित लेख ‘ललित’ मासिकाच्या वाचनसंस्कृती विशेषांकात लिहिला. आत्ता गेल्या महिन्यातच तो लेख आवडल्याचं एकांनी कळवलं. म्हणजे अजूनही तो वाचला जातोय.)
ववि आणि दिवाळी अंक यानंतर माझी इथली संयोजनाची हौस मात्र फिटली. (आजवर अनेक उपक्रमांच्या संयोजनात सहभागी झालेल्यांबद्दलही मला नितांत आदर वाटतो. :फिदी:)
साधारण २०१२-१३च्या सुमारास फ्रीलान्सिंग सुरू केलं, त्यानंतर इथे दिवसदिवस बागडणे कमी करावं लागलं. मात्र आजही इथे रोज एक तरी चक्कर मारल्याशिवाय चैन पडत नाही.
तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले
ड्यू-आयड्यांचा फार सुळसुळाट झालाय. बाकी विशेष बदल जाणवलेले नाहीत.
इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली
गप्पांचं पान हा प्रकार तेव्हा खूप आवडला होता. संपर्क सुविधाही आवडते. अलिकडचं सांगायचं, तर माझ्यासाठी नवीन / मायबोलीवर नवीन वगैरे tabs मला अतिशय आवडलेत. इथले विनाकारण वितंडवाद या tabs मुळे नजरेआड करण्याची सोय झाली.
कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती
ही सोय अशी नाही म्हणता येणार, पण गावांच्या नावांची गप्पांची पानं होती, तिथे त्या-त्या गावात राहणार्यांनीच गप्पा मारायच्या असं मी अनेक दिवस समजत होते. कुणीही कुठल्याही पानावर जाऊन गप्पा मारू शकतं, हे मला बरेच दिवस माहिती नव्हतं.
गेल्या २५ वर्षात मायबोलीनं तुम्हाला काय दिलं
एक म्हणजे ‘लले’ हे संबोधन दिलं, जे मला फार्फार आवडतं.
लेखनाचा आत्मविश्वास दिला. खूप मोठं मित्रमंडळ दिलं. अनेको विषयांबद्दलच्या स्वतःच्या जाणीवा विस्तारण्याची, चाचपून बघण्याची संधी दिली. ‘जगात माणसं काय काय करत असतात!’ यातल्या ‘काय-काय’ची माझी यादी मायबोलीमुळेच खूप वाढली.
आणखी एक स्पेसिफिकली सांगायचंय - माझी शाळेतली खास मैत्रीण, जिच्याशी माझा अनेक वर्षं संपर्क तुटला होता, ती मला पूनममुळे परत भेटली. याचाच उपसंहार, म्हणजे माझा मुलगा आणि त्या मैत्रिणीची मुलगी पुढे प्रेमात पडले आणि लवकरच त्यांचं लग्न होऊ घातलंय. पूनमला आमच्या मैत्रीतलं कनेक्शन आठवलं नसतं, आणि तिनं त्याबद्दल तेव्हा (२०१०/११) विपुत मला विचारलं नसतं, तर हे पुढचं काहीच घडलं नसतं. (मी पूनमलाही हे बोलून दाखवलं आहे. ती विनयानं याचं श्रेय घेण्याचं नाकारते.) ती पूनमची विपु आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. आणि मायबोली नसती तर कदाचित पूनमशीही माझी ओळख झाली नसती. (छत्रे-छत्रे म्हणून आम्ही सुरुवातीला बोलायला लागलो.) त्यामुळे मी स्वतःपुरतं याचं क्रेडिट मायबोलीलाही देते.
तुम्ही मायबोलीला काय दिलं
इथल्या सदस्यांना कदाचित थोडंफार चांगलं वाचायला दिलं असेल. आजवर ओळखीपाळखीच्या लोकांमध्ये मायबोलीच्या असंख्य लिंक्स शेअर केल्या आहेत. त्यामुळे हिट्स वाढले असतील. काही नवे सभासदही मिळाले असतील.
तुमचं कुठलं लेखन गाजलंअसं सांगता येणार नाही.
१) सर्वोत्कृष्ट रिअॅलिटी शो हा लेख तेव्हा सुमडीत लिहून पोस्ट केला होता. पण तो बर्याच जणांना आवडला.
३) गुपित (कथा)
४) एक विनोदी चित्रपट, प्रमुख भूमिकेत : चप्पल!
५) रस्ता (कथा)
६) ... आणि कल्पनेचं वारू (कायमचं) खाली बसलं
७) गोळीबाराच्या खुणा... अश्या आणि तश्या!
८) एका वाक्यातलं आर्ट ऑफ लिव्हिंग
९) पुठ्ठा, सेलोटेप आणि `पॅकर्स अँड मूव्हर्स'
११) या बीजाचें त्या बीजासिं ठावें । (कथा)
कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
वेगवेगळ्या मंडळींना वेगवेगळ्या लेखांमुळे गांजल्यासारखं वाटलेलं असू शकतं.
शिवाय गेली काही वर्षं मी मुशाफिरी, पासवर्ड अंकांत लेखन करण्यासाठी अनेक माबोकरांना मेसेजेस आणि विपुतून गांजलेलं आहे. एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्वांनी त्या-त्या वेळी लेख लिहून दिलेले आहेत. त्याबद्दल त्या सर्वांना पुन्हा एकदा थ्यांकू!
मायबोलीलाही खूप खूप थ्यांकू! (दिवाळी अंक परत सुरू करावा, आणि जुने दिवाळी अंक पाहण्याची सोय परत उपलब्ध करून द्यावी, अशी यानिमित्ताने ॲडमिन आणि वेमांना विनंती.)
मायबोली रॉक्स!
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
yess मायबोली रॉक्स
yess मायबोली रॉक्स
मस्त लिहीलयस पण अजून चाललं असत थोडं
याचाच उपसंहार, म्हणजे माझा मुलगा आणि त्या मैत्रिणीची मुलगी पुढे प्रेमात पडले आणि लवकरच त्यांचं लग्न होऊ घातलंय. >> माझ्या एका कवितेचे आणि कथेचे प्रेरणास्रोत तेच दोघ आहेत आणि या कथेचे सगळे ड्राफ्ट आधी तुलाच वाचायला दिले म्हणून विश्वेशला टेंशन आलं होतं पण अस काही होत नाही रे हे मी त्याला ऐकवलेल वाक्य खर ठरुन त्यांच्या साखरपुड्याला दोन्ही बाजूने मावशी म्हणून हजेरी लागली माझी. अर्थात त्यात वाटा ट्रेक कॅंपचा जास्त आहे
तू माबोवर आल्यामुळेच अजयला माबोसन्यास घेऊन 'आयडीपण विसरलो आता' असा सेफ स्टॅन्ड घ्यावा लागला असणार हे नक्की (विश्वेशपण विसरलाय त्याचा आयडी आणि पासवर्ड )
मस्त लिहिलंय ललिता.
मस्त लिहिलंय ललिता.
गाजलेलं लेखनमध्ये टाकण्यासारखं किती काय काय आहे तुझ्याकडे. ते टाक की !
मला तो डुकराच्या अंगावर शर्ट पडला वाल्या लेखापासून पासून ते रस्ता कथेपर्यंत बरच काय काय आठवतंय
मला तो डुकराच्या अंगावर शर्ट
मला तो डुकराच्या अंगावर शर्ट पडला वाल्या लेखापासून पासून ते रस्ता कथेपर्यंत बरच काय काय आठवतंय >> अगदी अगदी
पण नंतर नंतर लली जेव्हा प्रोफेशनली लिखाण या फिल्डकडे वळली तेव्हा ती उत्तम, लेखनातले सगळे निकष पाळून लिहायला लागली. seasoned player प्रमाणे लिहायला लागली. एक मापदंड झाला तिचं लेखन म्हणजे. पण उन्नीस बीसला वाव असलेली, स्पोंटेनिटी लिखाणात जास्त असलेली लली मी miss करते. ती मला आवडायची.
मस्त लिखाण ललिता प्रीती.
मस्त लिखाण ललिता प्रीती.
मी तुझा कधीतरी सिंगापूर(किंवा थायलँड) हनीमुन प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनीबरोबर असा एक लेख होता तो वाचला होता.तो खूप आवडला होता.
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
येस, डुकराच्या अंगावर शर्ट पडण्याचा किस्सा मला पण जाम आवडतो. ड्रायव्हिंग शिकण्यावरचा पण.
निर्वासितांच्या प्रश्नांवरचे लेख, युरोपचं प्रवासवर्णन हेही छानच.
याचाच उपसंहार, म्हणजे माझा मुलगा आणि त्या मैत्रिणीची मुलगी पुढे प्रेमात पडले आणि लवकरच त्यांचं लग्न होऊ घातलंय.
हे भारी आहे!
(माझ्या नवऱ्याने एकदा मायबोलीवर येण्याची इच्छा बोलून दाखवल्यावर मी त्याचा हा विचार हाणून पाडला.)
छान आठवणी! आपण पुण्यातील
छान आठवणी! आपण पुण्यातील कोणत्यातरी गटगला भेटलो आहोत हे अंधुक लक्षात आहे. का कोणास ठाउक पण तू आणि पूनम बहिणी आहात असा काही दिवस समज होता पण त्यातील लॉजिक गंडलेले होते हे तसे लगेच लक्षात आले
तुझे न्यूझीलंड, युरोप वगैरे भटकंतीबद्दलचे लेख आवडले. गॉन विथ द विंड वालाही. बाकी एकदा चेक करायला हवेत. आता लक्षात नाहीत. पण तुझे लेख एकदम दर्जेदार असतात हे नक्की.
मुलाच्या लग्नाची माहिती इंटरेस्टिंग - त्याबद्दल सेपरेट अभिनंदन आणि शुभेच्छा!
आपण पुण्यातील कोणत्यातरी
आपण पुण्यातील कोणत्यातरी गटगला भेटलो आहोत हे अंधुक लक्षात आहे. >>> नाही, तू माझ्या बहिणीला (मंजिरी सोमण) भेटला आहेस बहुतेक.
परागनं कान पकडल्यामुळे माझ्या
परागनं कान पकडल्यामुळे माझ्या गाजलेल्या लेखनाच्या लिंक्स आता मजकुरात अॅड केल्या आहेत.
`सावट' ही एक कथाही बर्याच जणांना आवडली होती. पण ती मी नंतर काही कारणानं इथून काढून टाकली होती. बहुतेक रिराइट करण्याचा विचार होता, जो आजपर्यंत प्रत्यक्षात उतरलेला नाही.
'रस्ता' ही कथा मी नंतर रिराइट केली होती, पण ती कुठेच पोस्ट केलेली नाही. (माबोवर आहे तो कथेचा पहिला ड्राफ्ट आहे.)
अरे तुझे बरेच लेख मिस झाले
अरे तुझे बरेच लेख मिस झाले होते की वाचायचे. आत्ता तो डुकराचा वाचला आणि मेले हसून ! !!
लले, मस्त लिहिलंय
लले, मस्त लिहिलंय
लले, मस्त लिहिलंय>>+१११ मला
लले, मस्त लिहिलंय>>+१११ मला तर तुझा अस्मिता वाला लेख पण खुप आवडतो. मराठी अस्मिता हिंदी अस्मिता ,खुपदा वाचलाय.
मस लिहिलंस लले..
मस्त लिहिलंस लले..
तुझी जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष भेट होते तेव्हा तेव्हा मायबोली ला धन्यवाद देते.. मायबोली नसती तर कशी भेटली असतीस तू
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.