माझ्या आठवणीतली मायबोली हा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्यासाठी. हा उपक्रम दिल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार.
२१ वर्षांच्या आठवणी त्यानिमित्ताने पुन्हा वरती आल्या आणि मायबोली हा आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे हे नव्याने जाणवलं. २१ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या सुमारासच मी सभासद झाले. मला अजूनही आठवतंय की हरतालिकेचा दिवस होता आणि मी रात्री बर्याच उशीरापर्यंत ऑनलाईन होते आणि हितगुजवर टाइमपास करत होते त्यावेळी हवाहवाईने 'हरताळका जागवते आहेस की काय?' अशीच सुरूवात केली होती बोलायला.
त्यावेळी इंटरनेट, बुलेटिन बोर्ड हे सगळंच नवीन होतं. काय शोधत असताना मायबोली सापडली होती हे आता आठवत नाही. पण इतकं आठवतं की इथल्या गप्पा वाचताना रमायला झालं. वास्तविक मी पुण्यात होते तेव्हा आणि आसपास सगळी मराठीच लोकं होती. पण तरीही ही सातासमुद्रापार असलेली मराठी लोकं कोण आहेत, कशी आहेत याची उत्सुकता वाटली. चुकतमाकत का होईना पण मायबोलीवर गप्पा मारणं जमायला लागलं. तेव्हा सभासदपण खूप नव्हते. जे होते त्यांनी पटकन मला माबो परिवारात सामील करून घेतलं. आणि थोड्याच काळात माबोमैत्र हे माझ्या तेव्हाच्या, पुण्यात असलेल्या मित्रमैत्रिणींपेक्षाही जवळचे होऊन गेले. त्या वेळी आमच्याकडे 'क्रॅ क्रॅ कुईंईंईंईं' वाजणारा मोडेम होता आणि तो चालू केला की फोन बंद व्हायचा त्यामुळे सतत इंटरनेट वापरणं शक्य नसायचं. नाहीतर बाबांचा ओरडा खावा लागायचा पण माबोचं व्यसन इतकं जास्त इतक्या अल्पावधीत लागलं की ओरडा खाऊनही तासन्तास इथे पडीक असायचे मी. GTP आणि USPJ (म्हण्जे यू एस मधली पुणेकर जनता) हे धावते धागे होते. त्यावर सतत बडबड चालू असे. पेशवा, हवाहवाई, मिल्या, असामी, समीर, सम्र्या आणि अजून कित्येक जुने मायबोलीकर धमाल करत असत अगदी. या सर्वांशी तेव्हा मैत्र्या झाल्या (ज्या आजही तेवढ्याच छान टिकून आहेत). अज्जुका (आताची नीधप) आणि बेटी या तर चक्क माझ्या जुन्या मैत्रिणीच निघाल्या (अज्जुका चा अर्थ मला अजूनही माहिती नाहीये. पण तिला तो विचारला की ती जाम चिडत असे. त्यामुळे आजतागायत मी तिला तो विचारला नाहीये).
हितगुजवर तेव्हा यूएस मधली किंवा जनरलच भारताबाहेर असलेली जनता बरीच होती. कधीकधी त्यांचे काही काही रेफरन्स अगदीच डोक्यावरून जायचे. पण त्यामुळे गप्पा मारताना कधी काही अडलं नाही. सुरूवातीला हे असं ओळखदेख नसलेल्या माणसांशी बोलणं खूप विचित्र वाटलं. पण हळुहळू सवय झाली. यथावकाश गप्पांच्या धाग्यांपलिकडे जाऊन बाकीचे धागे एक्स्प्लोअर करणं सुरू झालं आणि खजिनाच गवसला. गुलमोहर विभागात कितीतरीजण कथा, कविता लिहितायत हे लक्षात आलं आणि आपणही आपल्या कविता इथे पोस्ट कराव्यात असं वाटलं. जास्तीत जास्त काय होईल, लोकं काही रिस्पॉन्स देणार नाहीत पण निदान त्यानिमित्ताने आपण काय लायकीचं लिहितोय हे लक्षात येईल अश्या विचाराने गुलमोहरात कविता टाकायला लागले. आणि चक्क अनपेक्षित सुखद धक्का बसला. माझ्या कविता लोकांना वाचायला आवडतायत हे जामच भारी वाटलं.
V&C, पाककला वगैरे धाग्यांशी माझी काही फारशी नाळ जुळली नाही. पण एक मिंग्लीशचा धागा होता तेव्हा त्यावर खूप धमाल यायची. मिंग्लीश म्हणजे अधूनमधून इंग्लिश शब्दांचं शब्दशः भाषांतर करून लिहीणे. उदा: storvi या आयडीला तिथे चक्क गोदामवी असं नाव पडलं होतं. अश्या पद्धतीने वाक्यच्यावाक्यं लिहीणं सोपं नव्हतं पण सवय झाल्यावर काही वाटेनासं झालं. बाकी एक भाषा आणि साहित्य विभाग मला खूप आवडायचा. त्यात प्रत्येक लेखकासाठी स्वतंत्र धागा होता आणि त्या त्या लेखकाचे फॅन्स तिथे गप्पा मारत असत. कधी कधी काही वाक्यं, कधी उतारे असं शेअर होत असे. कधी चक्क वादही होत असत.
मेंबर झाल्यानंतर काहीच महिन्यांत पुण्यातल्या मेंबरांनी भेटूया अशी एक टूम निघाली. पुण्यात तेव्हा फक्त मिल्या होता. किंवा बहुधा तेव्हा फक्त त्यालाच भेटायला जमत होतं. मग असा प्रश्न पडला की असं एकट्याच अनोळखी मुलाला कसं भेटायचं? मग मी माझ्या एका मैत्रिणीला मेंबर करून घेतलं. जबरदस्तीने. आणि फायनली आम्ही तिघे भेटलो. माझी मैत्रिण म्हणजे आत्ताचा पूनम आयडी ( तेव्हा तिने माझ्यासारखा psg असा आयडी घेतला होता आणि बरेच लोक त्याला psq समजत असत.)
त्यानंतर मग जसजसे मेंबर्स पुण्यात येत राहिले तसतशी आमची गटग होऊ लागली आणि अनोळखी लोकांना भेटायची भीडही चेपली. मग कधीतरी मायबोली हितगुजचे टीशर्टस तयार करायची टूम निघाली. मला वाटतं मृ ने ही जबाबदारी घेतली होती. मग ते टीशर्ट मिरवण्यासाठी एक AMBA आयोजित केलं गेलं. पुण्याबहेरचेही काही माबोकर यासाठी आले होते. त्याचा वृत्तांत इथे सापडेल - https://www.maayboli.com/hitguj/messages/34/37603.html?1009972409
यानंतर मी अजून एका AMBA च्या आयोजनात सहभागी झाले होते. आम्ही बरेच जण किनारा रेस्टॉरंटला भेटलो होतो. इथे झक्की आणि वाकड्या आयडीजची ऐतिहासिक भेट याची देही पाहाण्याचा योग आला याचा वृत्तांत इथे आहे - https://www.maayboli.com/hitguj/messages/34/44578.html?1037420893 पण हा कसा वाचायचा ते आता मलाही समजत नाहीये.
अश्या अजून अनंत आठवणी आहेत. सगळ्या कदाचित सुसंगत मांडताही येणार नाहीत. काही अगदीच रँडम आहेत. पण त्या आठवणींमधे काही ठळक आठवणी आहेत त्या मिल्या-पेशवाच्या 'जावाकसम'च्या, हवाहवाई आणि असाम्याच्या 'डायरी दोघांची'च्या, मिल्याच्या टेरिफिक विडंबनांच्या, हवाहवाईच्या कुजबुजच्या (हे एक मी माबोवर खूप मिस करते आजही), सानुलीच्या चित्रकवितांच्या, मिलिंदाच्या निळ्या रंगात लिहीलेल्या सार्कॅस्टिक पोस्ट्सच्या (हा एकटाच निळ्या रंगात लिहायचा. मॉडरेटर्स पैकी होता ना!) आणि अजून कितीतरी!
आता प्रश्न -
- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले
भरपूर बदल आहेत. एकतर मायबोली इंटरफेस बदलला. आधी ट्री स्ट्र्क्चर मधे सगळे धागे दिसत. त्यामुळे व्हायचं असं की जे सेक्शन टाळायचे असतील ते सहज टाळता यायचे. आता सगळ्याच धाग्यांची लिस्ट समोर दिसते. म्हणजे एखादे दिवशी मला कविता, कथा वगैरे धागे पहायचे नसले तरीही मी त्या ग्रूपची मेंबर आहे म्हणून ते मला सक्तीने दिसतातच.
अर्थातच इथले मेंबर बदलले. तेव्हाचे बरेच मेंबर्स आता माबोवर दिसतच नाहीत. त्यांची जी मजा, वाद, संवाद चालू असायचे ते त्यामुळे अर्थातच आता दिसत नाहीत.
आतासारखं प्रत्येक धाग्यावर काही ठराविक मेंबर्स काही ठराविक वादाचे विषय घेऊन येत नसत. वाद घालण्यासाठी वेगळा सेक्शन होता. काय मारामार्या व्हायच्या त्या तिथेच.
तेव्हा मॉडरेटर्स होते जे वादविवादांना अनावश्यक वळण लागायला लागलं की मध्यस्थी करायचे.
पाऊलखुणा आता पाहता येत नाहीत. त्या तेव्हा अव्हेलेबल होत्या. एखादा मेंबर कुठे कुठे पोस्टी टाकून आलाय ते पाहता यायचं.
आता इथे कोणी मिंग्लीश बोलत नाही
- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली
गप्पांचे धागे.
- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती
असं काही आठवत नाही.
- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं
जगभरातले मित्र दिले. आयुष्यभराच्या मैत्र्या दिल्या. कुठेही गेले तरी मदतीचा हात असेलच याची खात्री दिली. माझ्या कवितांसाठी, लेखनासाठी व्यासपीठ दिलं. गटग आयोजित करताना अनेक अनोळखी लोकांशी बोलण्याचा आत्मविश्वास दिला. उपक्रमांचं संयोजन करण्याची संधी दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जन्माचा जोडीदार मला मायबोलीमुळे मिळाला.
- तुम्ही मायबोलीला काय दिलं
कविता इथे माझी रिक्षा फिरवायचा स्कोप आहे त्यामुळे माझ्या रंगीबेरंगी पानाची लिंक देते आहे -
https://www.maayboli.com/blog/645
जुन्या मायबोलीत रंगीबेरंगी सेक्शन नव्हता. तेव्हा सगळ्याच कवितांच्या धाग्यांवर माझ्या कविता फिरत असत (बहुधा त्यांना कंटाळून
) तेव्हा वेमांनी मला 'रूपावली' नावाचा एक स्वतंत्र धागा काढून दिला होता. दुर्दैवाने तो जुन्या मायबोलीबरोबरच हरवला. त्यामुळे त्याची लिंक देणं शक्य नाही.
- तुमचं कुठलं लेखन गाजलं
बर्याच कविता गाजल्या तेव्हा दुसर्याच्या कवितांना उत्तर देणं असा एक प्रकार चालू असायचा त्यात मी पेशव्याच्या कवितांना लिहीलेली उत्तरं गाजली. माझ्या दिवाळी अंकांना दिलेल्या कविताही गाजल्या बहुधा
बाकी बे एरिया (बेकरी) मधल्या माझ्या पोस्टींना लेखन म्हणत असाल तर त्यात बरंच मटेरिअल सापडेल.
- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
हे मायबोलीकरांना विचारलं तर जास्त बरं होईल पण पटकन आठवलेल्या एक-दोन गोष्टी इथे डकवते -
https://www.maayboli.com/node/59586
https://www.maayboli.com/node/39274
अजून कदाचित लिहीण्यासारख्या आठवणी बर्याच असतील. पण तूर्त इतकेच पुरे. नाहीतर या वरच्या प्रश्नाच्या उत्तरात माझ्या या लेखाचा समावेश व्हायचा.
मस्त! तू आधीपासून होतीस हे
मस्त! तू आधीपासून होतीस हे माहीत होते पण ही डीटेल्स माहीत नव्हती. तुझा आधीचा आयडीसुद्धा वेगळा होता ना? बेकरी वर आपण गप्पा मारल्या आहेतच पण तू स्वतंत्र लेख फारसे लिहील्याचे लक्षात नाही.
तुझा आधीचा आयडीसुद्धा वेगळा
तुझा आधीचा आयडीसुद्धा वेगळा होता ना >>> नाही रे. माझा आजन्म हाच आयडी आहे मायबोलीवर
जेव्हा मायबोली जॉईन केली तेव्हा आपली खरी ओळख इंटरनेटवर द्यायला नको अशी एक भीती होती. शिवाय आयडी काहीतरी कूल असावा वगैरे अक्कलही नव्हती. मग त्यातल्यात्यात सेफ (!) म्हणून इनिशिअल्स वापरून हा आयडी घेतला.
जन्माच्या जोडीदाराची एका ओळीत
जन्माच्या जोडीदाराबद्दल जेमतेम एक ओळ ?? जोडीने बेकरीत गायलेल्या गाण्यांबद्दल लिहायचं की!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मूळ मुद्दे सोडून बाकीचेच डिटेल्स दिल्यासारखं वाटलं.. :प
छान लेख!! नव्या लोकांना
छान लेख!! नव्या लोकांना required minimum distribution (rmd) असा आय डी का घेतला असेल हिने हे कोडे पडतेच! असो. दृष्यावरून धाग्यावर फार कमी वेळा आलीस पण आलीस तेव्हा गांजलस![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान असला तरी.... लोकांनी करीना-सलमानचा म्हणून "बजरंगी भाईजान" बघायला जावं नि त्यात फक्त सलमानचा पाक प्रवास असावा तसं झालं आहे बरं लेखात!! जरा काय निदान "आज की पार्टी मेरी तरफसे" इतपत तरी रोमान्स टाकायचा...
अरे काय! रोमान्स काय इतका
अरे काय! रोमान्स काय इतका जुना नाही आमचा की आठवणीतली मायबोली मध्ये टाकावा.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
)
पण कालपासून काही जुन्या माबोकारांनी मी फारच त्रोटक लिहिलं आहे अशी तक्रार केली आहे. जर जमलं तर आज जरा अजून डिटेल्स लिहिते तेव्हाच्या मायबोलीबद्दल (मायबोलीबद्दलच. रोमान्स बद्दल नव्हे
छान, पण अजून लिहायचे होते.
छान, पण अजून लिहायचे होते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जे गांजले मध्ये टाकलेय ते तसे वाटत नाही
ओके लोक्स.... लेख अपडेट केला
ओके लोक्स.... लेख अपडेट केला आहे. अजून लिहीलं आहे. पहा आवडतंय का?
कविता आवडतात तुमच्या.
कविता आवडतात तुमच्या.
मायबोलीबद्दलच. रोमान्स बद्दल
मायबोलीबद्दलच. रोमान्स बद्दल नव्हे >> निव्वळ ह्या एका कारणामूळे मी लिहू शकत नाही ह्या टॉपिकवर.
पण ज्याने-तीने लिहिले तर मजा येईल वाचायला. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त! तू आधीपासून होतीस हे माहीत होते पण ही डीटेल्स माहीत नव्हती. तुझा आधीचा आयडीसुद्धा वेगळा होता ना? बेकरी वर आपण गप्पा मारल्या आहेतच > फा ह्याबद्दल सविस्तर वाचायला आवडेल . कोणाशी र्म्ड समजून काय गप्पा मारल्या आहेस ते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रुपा, जावा कसम शैल्या- समर्या - स्टोर्वीचे होते. बिचार्या मिल्या - jayaa ला कुठे फसवलस त्यात.
२००४ च्या आधीचे कोणि तरी लिहिले हे वाचून मजा आली.
@rmdतुम्ही मायबोलीला काय दिलं
@rmd
तुम्ही मायबोलीला काय दिलं
एका "अज्ञात" आयडी ने मायबोली सुरु रहावी म्हणून "त्या काळात" १०,००० रू रोख दिले. ते मायबोलीपर्यंत पोहोचवायचं मोठं काम तू केलंस. सुरुवातीच्या काळात मायबोली भक्कम आर्थिक पायावर उभी राहण्यासाठी त्याची खूप मदत झाली.
@सीमंतिनी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
rmd = required minimum distribution हा विनोद बहुतेक मायबोलीकरांना डोक्यावरून गेला असले. मायबोलीला ५० वर्षे झाल्यावर नक्की समजेल.
खूप छान . शुभेच्छा !
खूप छान . शुभेच्छा !
मस्त लिहिलय, तुमच्या कविता
मस्त लिहिलय, तुमच्या कविता खूप आवडत। पण तेव्हा प्रतिसाद देणं झालं नाही। त्यावेळी नवीन असल्याने दडपण वाटे।पण या निमित्ताने सांगता आलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजयनी सांगितलेलं वाचून धन्यवाद दिल्याशिवाय रहावत नाही। मायबोली चालू राहिली हे किती महत्वाचं!
शुभेच्छा__/|\__
मस्त लिहिलंय rmd.
मस्त लिहिलंय rmd.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
खूप सिनियर मेंबराच्या आठवणी वाचायला मिळाल्या यानिमित्ताने.
अजय, ही आठवण काढून एकदम
अजय, ही आठवण काढून एकदम इमोशनलच केलंस की! पगले, रूलायेगा क्या?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सामो, अवल, mi_anu, एस : थँक्यू!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल : अहो जाहो नको गं
जावा कसम शैल्या- समर्या - स्टोर्वीचे होते. बिचार्या मिल्या - jayaa ला कुठे फसवलस त्यात. >>>
होतं असं कधीकधी
तुम्ही मायबोलीला काय दिलं
तुम्ही मायबोलीला काय दिलं
एका "अज्ञात" आयडी ने मायबोली सुरु रहावी म्हणून "त्या काळात" १०,००० रू रोख दिले. ते मायबोलीपर्यंत पोहोचवायचं मोठं काम तू केलंस. सुरुवातीच्या काळात मायबोली भक्कम आर्थिक पायावर उभी राहण्यासाठी त्याची खूप मदत झाली.
>>>>>
ओह ग्रेट.. हे भारीय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहीलंय.
मस्त लिहीलंय.
याचा वृत्तांत इथे आहे - https://www.maayboli.com/hitguj/messages/34/44578.html?1037420893 पण हा कसा वाचायचा ते आता मलाही समजत नाहीये. >>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Shivaji05 font install केल्यावर साक्षर होशील
छान मनोगत...!
छान मनोगत...!
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जन्माचा जोडीदार मला मायबोलीमुळे मिळाला.>>> खूपच सुंदर आठवणी जुळलेल्या आहेत तुमच्या मायबोलीशी..!
वाढीव मजकूर आवडला.
वाढीव मजकूर आवडला.
ओह तो वाढीव भाग नोटिस केला
ओह तो वाढीव भाग नोटिस केला नव्हता. तो ही छान आहे.
फा ह्याबद्दल सविस्तर वाचायला आवडेल . कोणाशी र्म्ड समजून काय गप्पा मारल्या आहेस ते >>> लोल असामी. ते र्म्द आयडीशीच. ती दोन्ही वाक्ये एकमेकांशी संबंधित नाहीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वतःच्या जोडीदाराबरोबरच
स्वतःच्या जोडीदाराबरोबरच इतरही माबोकरांना जोडिदार मिळवून देण्यात तुम्ही हातभार लावला आहे हे माहिती नव्हते![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
किती कमी लिहिलंयस रुपा..
किती कमी लिहिलंयस रुपा..
ऋ, ल-प्री, रूप्री, फा :
ऋ, ल-प्री, रूपाली, फा : थँक्यू!
मंदारः झाले साक्षर एकदाची
अजूनही २००४ वगैरे चे दिवाळी अंक वाचता येत नाहीच आहेत. पण असो. AMBA वृत्तांत वाचता आला आणि मजा आली.
टण्या : कोणाबद्दल बोलतोयस ते समजायला आख्खं मिनीट लागलं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नी : खूप आणि खूप छान लिहायचं काम तुमचं राव!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही मायबोलीला काय दिलं
तुम्ही मायबोलीला काय दिलं
>>
शेवटच्या दिवाळी अंकाच्या संपादक मंडळात सहभागी होवून अंकच बन्द पाडला हे महत्वाचे राहिले !![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
शेवटच्या दिवाळी अंकाच्या
शेवटच्या दिवाळी अंकाच्या संपादक मंडळात सहभागी होवून अंकच बन्द पाडला हे महत्वाचे राहिले >> हो हो
त्यात मुख्य कलाकार तुम्हीच! आम्ही फक्त सहभागापुरते
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)