माझा मायबोली सदस्यत्वाचा कालावधी एक अंकीच आहे पण तरीही या विषयावर आवर्जून लिहावेसे वाटले कारण या उपक्रमासाठी प्रॉम्प्ट म्हणून दिलेले प्रश्न! या प्रश्नांची उत्तरे शोधायला आवडतील असे वाटले त्यामुळे लिहीत आहे. मी माबोवर कशी आले ते आठवत नाही पण सदस्यत्व घेण्याची मुख्य कारणे म्हणजे बेफिकीर आणि नंदिनी यांच्या कथा किंवा कथा मालिका! इतक्या उत्तम लिखाणाला दाद देता यावी म्हणून मी सदस्य झाले. गेल्या आठ वर्षात माझ्या आयुष्यात मायबोलीचे एक स्वतःचे असे हक्काचे स्थान तयार झाले आहे. आजवर मायबोलीच्या ज्या सदस्यांना प्रत्यक्षात भेटले त्यांच्याशी इतक्या मस्त आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या की आपण प्रथमच भेटतो आहोत अशी जाणीव झाली नाही.
तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले?
एकूण स्वभावाचा विचार करता माबो फारशी बदलली नाहीये.
तांत्रिक बदल मात्र बरेच झाले आणि ते चांगल्यासाठीच झाले असं वाटतं - चाहते बनण्याची सोय, संपादनाची कमी झालेली मुदत, नवीन लेखनाचे तीन टॅब्स, मायबोलीचे आणि पाककृतींसाठी apps हे काही ठळक आठवणारे बदल. संयुक्ता हा उपक्रम बंद झाला त्यावेळी मी जेमतेम वर्षभर त्या गटाची सदस्य होते पण त्या वेळी बाहेर मायबोलीवर आणि आत संयुक्तामध्ये होत असलेल्या लिखाणाच्या मोकळेपणामधला फरक लक्षणीय होता. बाहेर मायबोलीवर काय जोरात आहे त्याचे प्रतिबिंब क्वचितच संयुक्तामध्ये उमटायचे. संयुक्तामध्ये वेगळेच विषय चर्चेला असायचे. सदस्यत्व हे व्हेरिफिकेशन केल्यावरच मिळत असल्याने सगळ्याजणी खूप मोकळेपणाने लिहीत असत. संयुक्तामधल्या अनेक लेखांनी, चर्चांनी माझ्या जाणिवांच्या कक्षा रुंदावल्या असे मला वाटते. अर्थात त्यावेळी मी संयुक्तामध्ये जास्त करून वाचनमात्र मोड मध्ये होते. एका महिला दिनाच्या उपक्रमाच्या संयोजन समितीमध्ये मी काम केले तो अनुभव छान होता.
मायबोलीचे सदस्य हे तिचे बलस्थान आहेत. कितीही मतमतांतरे असली तरी या संकेतस्थळावरील लेखनाचा सर्वसाधारण दर्जा हा नेहमी चांगलाच राहिलेला आहे. इथले घरगुती, खेळीमेळीचे वातावरण राखण्यात सर्वच सदस्य हातभार लावत असतात. राजकारणावरचे धागे हा नियम सिद्ध करणारा अपवाद म्हणता येईल. पण जुन्या जाणत्या माबोकरांच्या मते कोणे एकेकाळी याही विषयावर गंभीर आणि मुद्देसूद चर्चा होत असत. मी मात्र तो काळ पाहिलेला नाही. त्या अनुषंगाने मायबोलीवरचा मी पाहिलेला एक नकोसा कालखंड मात्र नमूद करावासा वाटतो तो २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेचा. अत्यंत दर्जाहीन आणि असभ्य भाषेतल्या पोस्ट्स त्यावेळी प्रचंड प्रमाणात आल्या होत्या. त्यातील बऱ्याच या पोस्ट या नवीन आयडींनी टाकल्या होत्या. यामुळे संपूर्ण मायबोलीचे वातावरण दुषित झाले होते. कोणत्याही धाग्यावर राजकारण आणून पोस्ट्स टाकल्या जात होत्या. निवडणुका संपल्या तरी या राजकीय शिमग्याचे कवित्व संपायचे नाव घेईना. फारच वैताग आला होता तेव्हा. मला वाटते या आयडींना रोखण्यासाठी काही काळ नवीन मायबोली सदस्यत्वाची सोय बंद देखील ठेवावी लागली होती. आपल्या सुदैवाने तो काळ संपला. २०१९ साली याचीच पुनरावृत्ती होते की काय अशी मला धास्ती वाटली होती पण तसे काही झाले नाही.
इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली?
वाहत्या पानांची सोय, चाहते असण्याची सोय या दोन्ही गोष्टी आवडतात. या लेखाच्या निमित्ताने अजून दोन सोयी ज्या पाहायला आवडतील त्या नोंदवून ठेवते.
१. लेखाची किती वाचने झाली याचा ट्रॅकर असला तर आवडेल - हा ट्रॅकर सगळ्यांना पाहता आला तर फारच उत्तम पण किमान लेखकाला पाहता आला तरी चांगलेच आहे.
२. आवडलेल्या लेखांना किमान अप व्होट करता आले तर रोमातील वाचकांचा कौल कळायला मदत होईल. त्यासाठी सर्व नवीन लेखन मध्ये सॉर्ट बाय - लोकप्रियता आणि वेळ असे options देता येतील.
कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती?
माहिती नसलेली सोय नसावी बहुधा. एकदा तो फेमस ट्री व्ह्यू "दिसतो कसा आननी" ते पहायची इच्छा मात्र निर्माण झाली आहे सगळ्यांच्या आठवणी वाचून!
गेल्या २५ वर्षात मायबोलीनं तुम्हाला काय दिलं?
बरंच काही! चांगले, दर्जेदार लिखाण वाचायला मिळाले. कोणत्याही अति फालतू ते अति गंभीर विषयांवर मायबोलीवरचे प्रतिसाद देतात त्याने एकतर मनोरंजन होते किंवा ज्ञानात भर पडते. आपण एरवी वाचणार नाही असे अनेक विषय वेगवेगळ्या धाग्यांमुळे किमान वाचले जातात. हळूहळू मायबोली हे केवळ मराठी साहित्याचे संकेतस्थळ न राहता ते जगभरातील मराठी समाजमनाचे व्यासपीठ आणि प्रतिबिंब झाले आहे ही गोष्ट मला फार विशेष वाटते. मायबोलीवरच्या वावराने आपले म्हणणे कसे मांडावे आणि कसे मांडू नये या दोन्ही गोष्टी शिकायला मिळाल्या. काही गोष्टी असतात ज्यातून आपण वयपरत्वे किंवा कालपरत्वे बाहेर पडतो (you grow out of it) मात्र काही गोष्टी या आयुष्यभरासाठी पुरतात. मायबोली ही दुसऱ्या प्रकारची गोष्ट आहे आणि अशा गोष्टी फार कमी असतात.
तुम्ही मायबोलीला काय दिलं?
मायबोली हा जगन्नाथाचा रथ आहे. वेबमास्तरांनी त्याचे सुकाणू योग्य दिशेला राहील याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहेच पण या रथाला पुढे नेण्यात इथल्या ज्या असंख्य लेखक आणि वाचकांनी हातभार लावला आहे त्यात माझाही खारीचा वाटा आहे. मुळात जे जे आपणासी ठावे ते ते सर्वांना सांगावे अशी वृत्ती असल्याने मायबोलीकर झाल्यापासून मला ज्या ज्या गोष्टी आवर्जून इतरांना सांगाव्याशा वाटल्या त्या सार्या मी मायबोलीवर लेखांच्या व प्रतिसादांच्या रूपात मांडल्या आहेत. मग त्या आवडलेल्या पाकिस्तानी मालिका असोत किंवा पर्यावरण विषयावरचे विविध लेख. या साऱ्यातून मला खूप आनंद मिळालेला आहे.
माझे स्वतःचे आवडते लेख दोन आहेत - घटना आणि स्वातंत्र्य आणि शब्दपुष्पांजली - विषय पहिला: कुणा एकाची भ्रमणगाथा/ यशोदा. हे दोन्ही लेख लिहिताना मी स्वतः काही नवीन विचार केला असे मला वाटले. या दोन्हीत मांडलेली जाणीव माझ्यासाठी आजही महत्त्वाची आहे. Downton Abbey वरचा लेख मी २०१५ साली जेव्हा लिहिला तेव्हा त्यावर काहीच प्रतिसाद आले नव्हते. पण गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये अनेकांना ती मालिका पुन्हा सापडली आणि तो धागा धावता झाला!
माझे आत्तापर्यंतचे मायबोलीवरचे सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते असे विचारले तर मी इतक्यात लिहिलेली “नाते निसर्गाशी” ही लेखमाला असे म्हणेन. मराठी आंतरजालावर इकॉलॉजी या विषयावर फारसे लिखाण आढळत नाही; ती कमी दूर करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे.
तुमचं कुठलं लेखन गाजलं?
प्रतिसादांच्या संख्येवरून बघायचं तर गाजलेला धागा अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना हा आहे. त्यातले अनेक प्रतिसाद हे पुन्हा वाचावेत असे आहेत.
कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं?
हाहाहा! अर्थात माझ्या पर्यावरणावरच्या पोस्ट्सने मी अनेक धाग्यांवर भरपूर लोकांना गांजलं आहे आणि ती भूमिका यापुढेही मी पार पाडत राहणार आहे. त्यासाठी खास पर्यावरणाची अवांतरे असा धागाही काढून ठेवला आहे. या बाबतीत लोक काय म्हणतात याची मी पर्वा करत नाही. पर्यावरणऱ्हासावर काही ठोस उपाय करू शकणारी ही आपली शेवटची पिढी आहे. त्यामुळे तुम्ही जर १८ ते ६० या वयोगटात असाल तर तुमची इच्छा असो वा नसो, तुमची भूमिका ही फार म्हणजे फार महत्त्वाची असणार आहे. या जबाबदारीपासून आणि मायबोलीवरच्या माझ्या गांजवणाऱ्या पोस्ट्सपासून सुटका नाही!
असो, या निमित्ताने गेली २५ वर्षे जगभरातील मराठी वाचकांना मायबोलीसारखे उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी वेबमास्टर/ऍडमिन यांचे आभार मानते. आपली मायबोली ही पुढची अनेक वर्षे अशीच नांदती, हसतीखेळती, आणि वर्धिष्णू राहो अशा माझ्या शुभेच्छा!
जि, खुप छान लिहिलं आहेस.
जि, खुप छान लिहिलं आहेस. नेमक्या शब्दात मस्त आढावा घेतला आहेस.
छान लिहिलंय जिज्ञासा.
छान लिहिलंय जिज्ञासा.
एकदा तुझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल(आयपी राईट्स मध्ये येणार नसतील/गुप्तताभंग होणार नाही अश्या प्रकारे) लिहिशील का?
खुप छान लिहीले आहे
खुप छान लिहीले आहे
छान लिहिलं आहे!
छान लिहिलं आहे!
'नातं निसर्गाशी' चे सगळे भाग वाचून नाही झाले माझे. आता वाचते.
जि, खूप छान लिहीलंय !
जि, खूप छान लिहीलंय !
छान....
छान....
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडतात नेहमी.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
तुमचे प्रतिसाद आवडतात नेहमीच. पर्यावरणविषयक दृष्टिकोन खरंच सर्वांनी बाळगणे, ही काळाची गरज आहे. त्याविषयी तुमची तळमळ नेहमीच दिसून येते.
जि, छान लिहिलंय
जि, छान लिहिलंय
नाते निसर्गाचे पुढचे भाग लवकर येऊ दे
छान लिहिलंयस जि. एक अभ्यासू,
छान लिहिलंयस जि. एक अभ्यासू, व्यासंगी आणि तळमळीनं लिहिणारी व्यक्ती आहेस तू.
मस्त लिहिलं आहेस जिज्ञासा...
मस्त लिहिलं आहेस जिज्ञासा...
छान, आणि ज्या सोई असलेल्या
छान, आणि ज्या सोई असलेल्या आवडतील हे सांगितलंय त्या दोन्ही एकदम apt.
या रथाला पुढे नेण्यात इथल्या
या रथाला पुढे नेण्यात इथल्या ज्या असंख्य लेखक आणि वाचकांनी हातभार लावला आहे त्यात माझाही खारीचा वाटा आहे >>> १००% सहमत. इथे ज्यांच्या लेखनाद्वारे विविध विषयांवर समृद्ध लेखन उपलब्ध झाले आहे त्यात तू नक्कीच आहेस. पर्यावरणावरचे सर्व लेख अजून वाचलेले नाहीत पण जे वाचलेत ते thought provoking होते. लिहीत राहा!
घटना आणि स्वातंत्र्य लेख कसा हुकला लक्षात नाही. आता वाचतो. एकूण अशा अनेक लेखांबद्दल - लेख इथे प्रकाशित केल्यावर लगेच, म्हणजे पहिल्या काही दिवसांत किती प्रतिक्रिया आल्या यावर तो जमला आहे की नाही याबद्दल काही समज करून घेउ नये. लेख दर्जेदार असेल तर ज्यांना तसे लेख आवडतात अशांच्या समोर तो कधी ना कधीतरी येतो व त्यावरच्या प्रतिक्रिया आपोआप वाढत जातात. अशा लेखांना लॉन्ग टर्म व्हॅल्यू असते. कितीही खालच्या पानांवर दाबले गेले तरी असे लेख पुन्हा उसळी मारून वर येतातच.
छान लिहिले आहे. त्या
छान लिहिले आहे. त्या पर्यावरणाच्या गांजणाऱ्या पोस्ट चालू राहू दे. त्यातून मिळणारी माहिती ईतरांशी शेअर करता येते.
पर्यावरण आणी जिज्ञासा हे
पर्यावरण आणी जिज्ञासा हे माझ्या मेंदूत इतके फिट्ट बसले आहे की टेक आउट मधून जेवण घेताना काउंटरवरच्या मुलीने "प्लॅस्टिक चे काटे चमचे देऊ का?" असे विचारले तर "नको, जिज्ञासा रागावेल" असे पुटपुटलो !
छान.
छान.
जबाबदारीपासून आणि मायबोलीवरच्या माझ्या गांजवणाऱ्या पोस्ट्सपासून सुटका नाही! >>>> ज्जे बात
छान.
छान.
जगन्नाथाचा रथ - व्वा. समर्पक शब्दात वर्णन.
छान लिहिलंयस जि. एक अभ्यासू,
छान लिहिलंयस जि. एक अभ्यासू, व्यासंगी आणि तळमळीनं लिहिणारी व्यक्ती आहेस तू. > + १
तुमच्या पासून स्फूर्ती घेऊन शाश्वत विकासाबद्दल बरच वाचायला सुरुवात केली.
(अद्याप सुरवातीच्या पुढे फारसा गेलो नाही.)
>>>>>>>जगन्नाथाचा रथ - व्वा.
>>>>>>>जगन्नाथाचा रथ - व्वा. समर्पक शब्दात वर्णन.
वाह!!! क्या बात है. खरच खूप समर्पक वर्णन आहे हे.
संपूर्ण लेखच संयत आणि 'अगदी अगदी' करणारा आहे. याला अपवाद 'गांजवणारे लेखन' हा प्रश्न. गांजवले बिंजवले काही नाही.
छान लिहिलंयस जि. एक अभ्यासू,
छान लिहिलंयस जि. एक अभ्यासू, व्यासंगी आणि तळमळीनं लिहिणारी व्यक्ती आहेस तू. > + १००
छान लिहिलं आहेस. पर्यावरणात
छान लिहिलं आहेस. पर्यावरणात गांजलंस तरी अवांतरेत लिहित रहा. तुझ्या लेखमालेवर सगळीकडे प्रतिसाद दिला नसला तरी ती वाचतो आणि आवडते.
मायबोली हा जगन्नाथाचा रथ आहे.
मायबोली हा जगन्नाथाचा रथ आहे. >> अगदी खरं आहे.
या जबाबदारीपासून आणि मायबोलीवरच्या माझ्या गांजवणाऱ्या पोस्ट्सपासून सुटका नाही!>> ज्जे बात!
मी तुझ्या पर्यावरण विषयक अभ्यासाची आणि तळमळीची प्रशंसक आहे.
छान लिहिले आहेस.
'नाते निसर्गाशी' आवर्जून
'नाते निसर्गाशी' आवर्जून वाचतो..
लिहित रहा..
छान लिहिलंयस जि. एक अभ्यासू,
छान लिहिलंयस जि. एक अभ्यासू, व्यासंगी आणि तळमळीनं लिहिणारी व्यक्ती आहेस तू.>+ अगणित
छान लिहिलंस. हो,
छान लिहिलंस. हो, पर्यावरणाबद्दल नियमीत लिहीत रहाच. जे गांजले असतील त्यांनाही हे माहिती आहे की तु बरोबरच लिहीलेस, तुझी कळकळ त्यांनाही माहिती आहे. … त्यांना तु न वैतागता उत्तरे देतेस त्याचेही खूप खूप कौतुक.
काही लेख वाचायचे राहिलेत अजुन.
धन्यवाद ममो, मी_अनु, कविन,
धन्यवाद ममो, मी_अनु, कविन, वावे, मंजूताई, उदय, mrunali.samad, माऊमैया, हर्पेन, मामी, केया, Bhakti Salunke, फा, ऋन्मेऽऽष, विकु, maitreyee, प्राचीन, मानव पृथ्वीकर, सामो, सी, अमितव, वंदना, निरू, धनुडी, सुनिधी! तुमच्या प्रोत्साहनासाठी तुमचे आभार! अजून बऱ्याच विषयांवर लिहावं असं मनात आहे. वेळ होईल तसं लिहीन असं ठरवलं आहे.
गेल्या रविवारी डेडलाईन गाठण्याच्या हेतूने अगदी थोडक्यात लिहिले! बाकीच्यांच्या आठवणी वाचताना मग काही काही गोष्टी नंतर आठवल्या. मला जि हे इतके सुटसुटीत टोपणनाव माबोवरच मिळाले आहे - बहुतेक बेकरीवर सी कडून मिळाले आहे! मला ते फार आवडतं. अजून काही आठवले तर प्रतिसादात लिहीन बहुतेक.
मी_अनु, मी एका communications company मध्ये scientific writer म्हणून काम करते. Peer-reviewed journals मध्ये प्रकाशित होणारे रिसर्च पेपर्स लिहिणे किंवा त्या संदर्भातली इतर documents लिहिणे असे साधारण काम असते. संशोधन (प्रत्यक्ष नाही पण data interpretation) आणि लिहिणे या दोन्ही आवडत्या गोष्टी या कामात करायला मिळतात.
फा, खरं आहे! मी पण अनेकदा लेख वाचते पण प्रतिसाद दिला जातोच असं नाही. एकदा मायबोलीवर रुळल्यावर प्रतिसाद किती आले आहेत यावरून काही निष्कर्ष काढू नयेत हे कळायला लागतं. पण नवीन लेखकांना प्रोत्साहन मिळायला ट्रॅकर आणि अपव्होट्स या सोयींचा नक्की फायदा होईल.
विकु,
मानव पृथ्वीकर, तुम्हाला सापडलेले लेख, व्हिडीओ यांच्या लिंक्स पर्यावरणाची अवांतरे या धाग्यावर जरूर शेअर करा.
धन्यवाद जि.
धन्यवाद जि.
भारी प्रोफाइल आहे.
सुंदर आढावा. मायबोलीने
सुंदर आढावा. मायबोलीने तुम्हाला काय दिले मनोगत आवडले.
छान लिहिलंयस जि. एक अभ्यासू,
छान लिहिलंयस जि. एक अभ्यासू, व्यासंगी आणि तळमळीनं लिहिणारी व्यक्ती आहेस तू. > + १००
>>> अभ्यासू, व्यासंगी आणि
>>> अभ्यासू, व्यासंगी आणि तळमळीनं लिहिणारी
+१००,०००