तुमचं शिक्षण, वाचन, विचार या प्रक्रीयेला सुरुवात होण्याच्याही अगोदरच्या वयातल्या, बालपणातल्या गोष्टी त्यांच्या रंग, रूप, नाद, स्पर्श अशा शब्दांव्यतीरीक्त बाबींनी स्मरणात राहतात. 'घाशीराम कोतवाल' हे नाटक माझ्या आयुष्यात अशाच बालवयात शब्दांच्या आधी, त्या शब्दांच्या अर्थाच्या आधी त्यातील नाद, रंग, रूप, हालचाली, आवाज या स्वरुपात आलं.
नाटकाचा जड सुस्तावलेला पडदा, त्या बंद पडद्याआडून खणखणीत जोरदार घुमणारा तिसर्या घंटेचा आवाज, प्रेक्षागृहातला काळोख - त्यात माणसांची हलकीशी कुजबूज, पडदा उघडताना होणारा दोरखंडाचा 'सर्र सर्र' आवाज, मृदुंगावर पडलेली पहिली थाप आणि चढता आवाज,पडदा उघडल्यावर समोरच्या केशरी-शेंदरी रंगाच्या गणपतीवर पडलेला प्रकाशाचा पहिला झोत, खाली रंगमंचावर अंधारात हलणारे दिवे .... माझी नजर एकदा शेंदरी गणपतीवर - एकदा रंगमंचावर तरंगत नाचणार्या दिव्यांवर.
इतक्या वेळ आपल्या बरोबर असणारे आपले बाबा, प्रेक्षागृहातल्या एका सीटवर आपल्याला बसवून गायब झालेले. बरोबर कधी मोठी बहिण, किंवा ज्यांचे बाबा त्यांना सीटवर बसवून गायब झालेत असंच कोणीतरी. पण तेही माझ्याच वयाचे, किंवा थोडेसे मोठे. एकूणच अंधाराला घाबरण्याचं ते वय. मिट्ट काळोखात शांतता चिरडून प्रेक्षागृहात घुमणार्या त्या मृदुंगाच्या आवाजाची, अंधारात अधांतरी तरंगत नाचणार्या दिव्यांची भीती वाटत असताना - मंद प्रकाशात स्टेजच्या मधोमध समोर दिसणार्या त्या शेंदरी गणपतीचा आधार वाटायचा. 'कहा है मेरी लाडली, कहा है?' असं ओरडत ललितागौरीला शोधत येणारा घाशीराम, त्याच्या हातातल्या आसूडाचा आवाज आणि त्याच्या चेहर्यावरचा ओरखडा पाहिला की घाबरायला व्हायचं. चोरीचा आळ आलेल्या बाह्मणाच्या दिव्याच्या प्रसंगातले मंत्र, वातावरण - मायमिंग पाहिलं किंवा 'घाशीरामाला घेरला रे घेरला' या प्रसंगातला छातीवर दडपण आणणारा मृदूंग, चिडलेल्या ब्राह्मणांच्या हिंसक हालचाली आणि जेरबंद झालेला घाशीराम पाहिला की भीती वाटायची. थोडक्यात नाटकातल्या कोणत्याही प्रसंगात भीती वाटली, वातावरण गंभीर झालं, दडपण आलं की माझी नजर जायची समोरच्या काळ्या चौकटीच्या मधोमध असलेल्या त्या शेंदरी गणपतीकडे. 'तो गणपती तिथे आहे - घाबरायचं कारण नाही' हा त्या बालवयात मिळालेला दिलासा, आधार.
'घाशीराम कोतवाल' नाटकातला तो गणपती, तो श्रीगणराय आपल्या पुढील आयुष्यातही सदैव आपली साथ करेल, आपला आधार असेल, आयुष्यातल्या अनेक बर्या-वाईट क्षणांचा साक्षीदार ठरेल अशी पुसटशी कल्पनाही त्या बालवयात नव्हती.
'उमेश’ ... जगात कुठेही राहिले, कितीही रमले तरी जिथे माझा जीव अडकला ती जागा. पुण्यातलं आमचं घर.
चव्वेचाळीस वर्षाची, वय होऊ लागल्याच्या खुणा दिसू लागलेली वास्तू. भव्यदिव्य नसलेला, साधासा, लहानसा पण स्वतंत्र बंगला. दिवस-रात्र कोणत्याही वेळी माणसांचं खुल्या मनानं (आणि चहाच्या कपानं) स्वागत करायला कायम तयार.
घराच्या मुख्य दरवाजातून आत गेलं की सर्वप्रथम नजर जाते बरोब्बर समोरच्या दाराच्या चौकटीवर आणि त्या दरवाजाच्या वरच्या जागेत विराजमान झालेल्या ' केशरी शेंदरी रंगाच्या गणपतीवर'.
घरी आलेल्या-गेलेल्या प्रत्येकाला तो शाडूचा, भरीव आणि खूप वजनदार गणपती वाटतो. अनेकांच्या कुतुहलाचा तो विषय आहे. 'हा गणपती कुठलाय हो? कोणी केलाय? खूप जड असेल ना? भींतीवर लावायला काही खास रचना केली का?' हे प्रश्न ठरलेले. घाशीराम पाहिलेल्या, किंवा घाशीरामचे फोटो पाहिलेल्या अनेकांना लगेच या गणपतीची ओळख पटते. 'हा तोच गणपती आहे ना? इथे कसा?' हे त्यांचे नेहेमीचेच प्रश्न.
‘घाशीराम’ मधल्या या गणपतीच्या निर्मिती मागची थोडक्यात कहाणी अशी -
'घाशीराम कोतवाल' हे नाटक महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 'प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन (पीडीए)' या पुण्यातल्या हौशी प्रायोगिक नाट्यसंस्थेनं सादर केलं. घाशीरामचा पहिला प्रयोग झाला पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात - १६ डिसेंबर १९७२ रोजी. या प्रयोगापासून पहिल्या १९ प्रयोगात चौकटीवर गणपती होता, पण तो वेगळा गणपती होता, हा तो गणपती नव्हे.
एकीकडे घाशीराम चे प्रयोग गर्दी खेचत असतानाच दुसरीकडे या नाटकाविषयी वादंग उठलं. 'या नाटकात ब्राह्मणवर्गाची बदनामी आहे. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक मान्यता पावलेल्या नाना फडणीसांचे चारित्र्यहनन आहे. नाटक ताबडतोब बंद झाले पाहिजे' अशी भूमिका लिंगवाद निर्मूलन समितीनं घेतली. पीडीएचे अध्यक्ष भालबा केळकर यांच्यावर सांस्कृतिक दबाव आणला गेला आणि भालबांनी एके दिवशी वर्तमानपत्रातून 'या पापाचा मी धनी नाही' अशी जाहीर घोषणा केली. नाटकाचे पहिले १९ प्रयोग झाल्यानंतर केवळ सांस्कृतिक दबावामुळे नाटक बंद करावं हे संस्थेतल्या अनेकांना पटण्यासारखं नव्हतं. पीडीए मधून बाहेर पडून स्वतंत्र नाट्यसंस्था उभारायची असं ठरलं आणि २७ मार्च १९७३ - जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी 'थिएटर अॅकॅडमी' या नवीन प्रायोगिक संस्थेच्या स्थापनेची घोषणा झाली. या ‘थिएटर अॅकॅडमी’ तर्फे ‘घाशीराम’चे प्रयोग करायचे असं ठरलं आणि त्या दृष्टीनं नव्यानं जमवाजमाव सुरु झाली. घाशीरामच्या नेपथ्यातला चौकटीवरचा, वेशीवरचा हा केशरी रंगाचा गणपती तेव्हा तयार करण्यात आला.
हा भरीव, वजनदार वाटणारा गणपती आहे थर्माकोलचा आणि ही कलाकृती, किमया केली आहे प्राध्यापक सुधाकर चव्हाण यांनी. चव्हाण सर म्हणजे पुण्यातल्या श्री. लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील कलाशिक्षक. शाळेच्या स्पर्धेच्या नाटकांसाठी देखील अतिशय वेगवेगळे प्रयोग करुन, साध्या साध्या गोष्टीतून उत्तम नेपथ्य करण्यार्या चव्हाण सरांच्या नेपथ्याला नेहेमीच खास दाद मिळत असे. यावेळी 'घाशीराम' साठी लाकडी चौकटीवर लावता येईल, सामानातून सहज नेता येईल असा कमी वजनाचा गणपती तयार करून हवा होता. चव्हाण सरांनी पहिल्यांदाच असा थर्माकोलमधून भरीव शिल्प करण्याचा प्रयोग करून हा गणपती तयार केला. थिएटर अॅकॅडमीची पहिली लेटरहेडस आणि मोनोग्राम देखील त्यांनीच करुन दिले.
थोडक्यात, थिएटर अॅकॅडमी ही संस्था आणि हा गणपती या दोन्हींची निर्मिती एकाच सुमारास झाली.
काळ्या चौकटीवर विराजमान झालेल्या या गजाननाच्या साक्षीनं घाशीरामचे प्रयोग घडू लागले. हळूहळू नाटकाला होणारा विरोधही मावळला, किंबहुना पुण्याबरोबरच सर्व महाराष्ट्रात 'घाशीराम' चे प्रयोग हाऊसफुल्ल होऊ लागले. 'घाशीराम' आणि 'थिएटर अॅकॅडमी' या शब्दांभोवती एक प्रकारचं वलय निर्माण झालं.
पुढे जेव्हा 'घाशीराम कोतवाल' नाटकाला परदेशातून निमंत्रणं आली आणि परदेश दौरे आखले गेले तेव्हा या दूरच्या विमान प्रवासात सामानातून नेताना मोडतोड होऊ नये, खराब होऊ नये म्हणून फायबरचा अधिक टिकावू असा नवीन गणपती बनवून घेण्यात आला. 'घाशीराम'नं पहिल्या परदेश दौर्यासाठी २३ सप्टेंबर १९८० रोजी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'आग्राहून सुटका या थाटात' नाट्यमय प्रयाण केलं. त्यानंतर काही काळ भारतातल्या प्रयोगात जुना थर्माकोलचा आणि नवीन फायबरचा हे दोन्ही गणपती बहुधा आलटून पालटून वापरत असावेत.
त्यानंतर एके दिवशी सहजच बाबांनी अण्णा राजगुरुंना 'या आधीच्या गणपतीचं काय करणार?' असा प्रश्न विचारला आणि अण्णांनी सहज उत्फुर्तपणे 'जातोहेस का घरी घेऊन....जा. ठेव तुझ्या घरी ' असं उत्तर दिलं आणि 'घाशीराम'च्या नेपथ्यातला थर्माकोलचा केशरी गणपती आमच्या घरी आला - साधारण ८२-८३ सालाच्या सुमारास. तेव्हापासून तो गणपती आमच्या घरात दरवाज्याच्या चौकटीवर विराजमान झाला आहे.
लहानपणापासून आमच्या घरी देवधर्माचं फारसं काहीच असल्याचं मला आठवत नाही. देवघरात देखील विठ्ठलाच्या फोटो सोबत ज्ञानेश्वर, तुकारामांचे फोटो हेच देव म्हणून पहिल्यांदा नजरेला पडणारे. शिवाय आमच्या घरी 'उमेश' मध्ये गणपती - गौरी वगैरे काही बसत नाही. आमच्या घरचा गणपती माझ्या धाकट्या काकाच्या घरी बसतो. त्यामुळे लहानपणापासून गणपतीचं डेकोरेशन, मांडणी हे सगळं काकाकडे. कधी अडीअडचणीला 'बॅकअप प्लॅन' म्हणूनच 'उमेश' मध्ये गणपती बसवला जातो. त्यामुळे लहानपणी आणि आजही आजूबाजूचे मित्रमंडळी ‘गणपती उत्सव, कुणाकडे किती दिवसाचा गणपती, डेकोरेशन’ वगैरे बद्दल बोलायला लागली की 'आमचा गणपती काकाकडे बसतो' या वाक्यानं माझी सुरुवात ठरलेली. पण तो गणपती उत्सवातला गणपती - पाहुणा म्हणून येणारा, दहा दिवस राहणारा आणि पुढच्या वर्षी येण्यासाठी विसर्जित होणारा.
मात्र 'तुमच्या घरचा गणपती कोणता’ असा विषय निघाला की माझ्या डोळ्यासमोर, माझ्या आठवणीत पहिल्यांदा येतो तो 'घराच्या चौकटीवर स्थानापन्न झालेला शेंदरी गणपती'. वर्षभर आमच्यासोबत राहणारा, आमच्या घरचा एक सदस्य झालेला.
या गणपतीची कोणत्याही प्रसंगात कधीही खास पूजा वगैरे झालेली नाही, होत नाही. त्याच्या भोवती जमलेली कोळीष्टक काढणं हीच त्याची केलेली एकमेव सेवा. तसं पाहिलं तर ‘घाशीराम’ मधल्यासारखाच हा एका अर्थी गावाच्या वेशीवर असलेल्या गणपतीसारखाच. घरातली सगळी कार्य, आनंद- दु:ख, सगळ्या बर्या-वाईट प्रसंगांचा हा साक्षीदार. घरात येणारी माणसं, विविध विषयावरच्या चर्चा, लेखन, वाचन इतकंच नाही तर आम्हा बहिणींचा सगळा शैक्षणिक प्रवास - प्रगती याच्याच साक्षीनं.
'घाशीराम'चे परदेशात दौरे झाले तेव्हा हा थर्माकोलचा गणपती न नेता फायबरचा गणपती नेला गेला. कधीकधी वाटतं की ज्या गणरायाच्या साक्षीनं आपण लहानाचे मोठे झालो, साहित्य-कला यात रमलो, उत्तम रीतीनं शालेय महाविद्यालयीन शिक्षण घेतलं, उच्च शिक्षणासाठी परदेशी आलो, त्या या गणरायाचा परदेश दौरा मात्र अजून बाकी आहे. पुढच्या पीढीबरोबर आता जसे अनेकांचे पीढीजात देव देखील परदेशात पोचले आहेत, तसंच या गणपतीलाही घेऊन यावं आपल्याबरोबर अमेरीकेतल्या घरी. पण मग विचार येतो की हा गणपती कित्येक वर्ष आपल्या पुण्यातल्या घराची, घरातल्या मंडळींची, तिथे येणार्या जाणार्या पाहुण्यांची, मित्रमंडंळींची कळत-नकळत का होईना साथ करतोय. एका अर्थी या घराचा हा रक्षणकर्ता, राखणकर्ता विघ्नहर्ताच.
आम्ही दोघी बहिणी परदेशात घरापासून, आई-वडिलांपासून इतक्या दूर अंतरावर राहात असताना जेव्हा कधी काळजीचे, चिंतेचे प्रसंग येतात. अगदी हेल्पलेस वाटण्याच्या वेळा येतात. आपण घराजवळ, आई-वडिलांजवळ नाही याचं दडपणही येतं, अशावेळी माझ्या नजरेसमोर येतो घरातल्या दरवाजाच्या चौकटीवर, भींतीवर असलेला हा शेंदरी गणपती.
माझ्या मनाला आजही - 'तो गणपती तिथे आहे - घाबरायचं कारण नाही' हा आधार, दिलासा देणारा ‘श्रीगणराय’ !
------
('घाशीराम कोतवाल' या नाटकाचे मूळ संचातील लोकांनी केलेल्या प्रयोगाचे व्हीडीयो रेकॉर्डींग उपलब्ध नाही. पण उपलब्ध ऑडीयो रेकॉडींग आणि फोटोज यांना एकत्र करुन नाटकाची, त्या विषयाची, संवादांची, मांडणीची थोडी कल्पना येऊ शकेल यासाठी ही एक व्हिडीयो क्लीप तयार केली आहे.
त्याची लिंक - https://youtu.be/RsbvutzNetM )
छान लेख!! मोरया!!
छान लेख!! मोरया!!
(गणेशोत्सवाच्या निमित्ताने मायबोलीवर तुझे पुनरागमन झाले, अशा गोष्टींमुळेच श्रद्धा बसते देवावर.)
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
सुरेख गणपती आणि लेख आवडला.
सुरेख गणपती आणि लेख आवडला.
लेख खूप आवडला. तुंदिलतनु
लेख खूप आवडला. तुंदिलतनु गणपती सुरेख आहे. किती रेखिव आयुधे, लंबोदर, हातातील कंकणादि अलंकार. सुरेख आहे हो.
(No subject)
लेख आवडला.
छानच लिहिलंयस. या लेखाच्या
छानच लिहिलंयस. या लेखाच्या निमित्ताने एक महत्चाचं दस्तावेजीकरण (documentation) झालंय.
आवडला लेख!
आवडला लेख!
लेख खूप आवडला. Welcome back
लेख खूप आवडला. Welcome back
सुरेख गणपती. लेखही आवडला
सुरेख गणपती. लेखही आवडला
छान आहे लेख आणि गणपतीही.
छान आहे लेख आणि गणपतीही. केवढी छान आठवण जोडली गेली आहे ह्या गणपतीशी.
खूप वेगळा आणि छान लेख! आवडला.
खूप वेगळा आणि छान लेख! आवडला.