लोक फलज्योतिषाकडे धाव का घेतात?
अनेकदा लोक ज्या कारणांसाठी फलज्योतिषाकडे जातात ती कारणं जीवनातल्या नेहमीच्या अनिश्चितीततांमुळे निर्माण झालेली असतात. अनिश्चितता खरंतर सगळ्यांच्या जीवनात असतात; पण काही लोकांना त्यांचा जास्त त्रास होतो किंवा काही लोकांच्या बाबतीत त्या अनिश्चिततांची परिणती काही विशिष्ट घटनांद्वारे जास्त एकांगी वाटते. उदाहरणार्थ, घटस्फोट, कुटुंबातील अकाली मृत्यू किंवा अपंग करणारा एखादा अपघात. हे असं माझ्याच बाबतीत का व्हावं असा विचार आला की आपण अनेकदा सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून नको त्या गोष्टींच्या नादी लागू शकतो. अशावेळी खरं तर लोकांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. भारतात तो एक ठपका असल्यामुळे पंचाईत होते. या धर्तीच्या अनेक प्रसंगांमध्ये पुढील घटना टाळण्यासाठी ओळखीतल्या अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास त्यानेही मदत होऊ शकते. अर्थात ते स्वतः अंधविश्वासू नसतील तर.
IGNOUच्या अभ्यासक्रमाबाबत
सरकारने फलज्योतिषावर योग्य असे पर्याय बनवायला हवेत; जेणेकरून लोकांना कठीण परिस्थितीतही मानसिक स्थैर्य मिळवायला मदत होईल. शाळा–कॉलेजेसमधून अशी मदत उपलब्ध हवी. याउलट सरकारी अनुदानाने विद्यापीठांमधून फलज्योतिषाचे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठाने इतक्यातच असाच एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक लोक “काय हरकत आहे” असं म्हणून त्या अभ्यासक्रमाला पाठिंबा देत आहेत. “इतर अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात, त्याप्रमाणे हाही एक आणि हा तर विज्ञानशाखेत नसून कलाशाखेत आहे; त्यामुळे असाही दावा नाही की ते एक शास्त्र किंवा विज्ञान आहे” असा त्यांचा युक्तिवाद असतो. कलाशाखेत जरी हा असला तरी अभ्यासक्रमाच्या विवरणात एक वाक्य असं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांना त्यांच्या उपजीविकेचे एक साधन या अभ्यासक्रमाद्वारे देऊ करणार आहोत. तसं असल्यामुळे असा अभ्यासक्रम कोण शिकवू शकेल, त्या अभ्यासक्रमामध्ये काय हवं, हे प्रश्न साहजिकच निर्माण होतात. अशा प्रश्नांना एक सरधोपट असं उत्तर नसतं कारण त्यात अनेक मिती असतात. अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक असलेल्या अनेक बाबींचा अंतर्भाव न केल्यामुळे हे अभ्यासक्रम घातक ठरतात. यासंबंधीच्या एक-दोन आवश्यक पण कदाचित अपुऱ्या बाबी पाहूया.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रमात जे शिकवले जाणार आहे त्याविरुद्ध असलेले सिद्धांत आणि मतप्रवाहसुद्धा नमूद केले जायला हवे. तसे नसल्यास जे शिकवले जाणार ते एकांगीच ठरणार. अभ्यासक्रमात जे काही शिकवले जाते त्याबद्दल संख्यात्मक विश्लेषण देता यायला हवे. ज्योतिषाचा अभ्यासक्रम भाकितांबद्दल असल्यामुळे ‘कोणत्या घटकांवर आधारित किती भाकितं केली? केली त्यातील किती खरी ठरली? ती किती अंशी खरी ठरली? किती खोटी ठरली?’ वगैरे या सर्व बाबी यायला हव्यात. हा कलाशाखेत जरी असला तरी कलाशाखेतील इतर अभ्यासक्रमांमध्ये जशा परीक्षा असतात तशा इथे होतील याची काहीच चिन्ह नाहीत. उदाहराणार्थ, रंगचित्राच्या परिक्षेस बसलेला विद्यार्थी रंगचित्रे काढतात. त्या रंगचित्रांना परीक्षक गुण देतात. त्याचा जगात होऊ घातलेल्या घटनांशी संबंध नसतो. फलज्योतिषात तसा असल्याने त्याची तपासणी कशी केली जाणार? वर्ष–दोन वर्ष किंवा भकितात असतील तेवढी वर्षे थांबून?
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असे अभ्यासक्रम शिकवायला प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षक हवेत. म्हणजे जे स्वतः केवळ पुस्तकातून शिकले ते का? तसे असतील तर कोणत्या पुस्तकांमधून? की व्यावसायिक ज्योतिषी हवेत? हे दोन्ही गट तसे कुचकामी. येथे असेच शिक्षक हवेत ज्यांना या प्रकारात कोणतेतरी प्रमाणपत्र मिळाले आहे, पदवी मिळाली आहे. आणि हे प्रमाणपत्र किंवा पदवी अशा दुसर्या एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून नसावी जिथले शिक्षक पदवीधर नव्हते. कोणी म्हणेल की हे तर कोंबडी आधी की अंडे याप्रमाणेच होईल. याचे कारण असे की जर अभ्यासक्रम सुरू होऊ शकणार नसेल, अभ्यासक्रम फक्त पदवीधर शिक्षक देऊ शकणार असतील तर ही पदवी ते शिक्षक मिळवतीलच कसे? विज्ञानात किंवा इतर ठिकाणी ते कसे होते ते पाहूया.
एखादं क्षेत्र जेव्हा नवीन असतं तेव्हा आधी त्यातील संशोधनाकरता काही लोक प्रस्तावांद्वारे अनुदान मिळवतात. तो प्रस्ताव एखादी विवक्षित गोष्ट करण्यासाठीचा असतो. संलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ अशा प्रस्तावाची तपासणी करतात आणि मग अनुदान द्यायचं की नाही ते ठरवतात. अनुदान ज्या प्रयोगासाठी मिळाले आहे तो जाहीर केल्या जातो आणि प्रयोग झाल्यानंतर त्यातून काय निष्पन्न झालं ते पण जाहीर केलं जातं. असे काही प्रकल्प जेव्हा यशस्वी होतात तेव्हा यशस्वी गट एकत्र येऊन एखादी संघटना बनवू शकतात. त्या संघटनेद्वारे आधीचे प्रकल्प/प्रमेय जास्त काटेकोरपणे तपासून परिपूर्ण केले जाते. अशा या सर्व अग्निपरीक्षेतून गेल्यानंतर जे लोक तयार होतात ते अशा गोष्टी शिकवू शकतात.
फलज्योतिष कशावर आधारित आहे?
पत्रिका मांडणं हे पूर्णपणे गणिती आहे. पंचांगात जी ग्रहस्थिती दिलेली असते ती वापरून खरं तर कोणीही काही मिनिटांमध्ये पत्रिका मांडणं शिकू शकतो. पंचांगातली ग्रहस्थिती ही खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरूनच मिळवलेली असते आणि ते तंत्र इतकं प्रगत आहे की ती स्थिती अचूक असते. पत्रिका ही खऱ्या ग्रहांची स्थिती वापरून मांडली गेली असल्यामुळे त्याचा खगोलाशी संबंध नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. त्यामुळे पत्रिकेतील ग्रह जर खगोलीय असतील तर त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम का होऊ शकत नाही ते आधी आपण पाहूया की.
पत्रिकेतील नवग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह, त्याचप्रमाणे सूर्य हा तारा, चंद्र हा उपग्रह आणि राहू आणि केतू हे पृथ्वी आणि चंद्र यांच्या सावल्यांपासून निर्माण झालेले काल्पनिक छेदनबिंदू. यातील मंगळ आणि शनी फलज्योतिषात वाईट समजले जातात. ग्रहांचे गुणधर्म लक्षात घेऊ लागलो तर सर्वात महत्त्वाचे ठरावेत ते त्यांचे वस्तुमान आणि त्यांचे आपल्यापासूनचे अंतर. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच इतर ग्रहही फिरतात आणि त्यांची गती वेगवेगळी असते त्यामुळे त्यांचे आपल्यापासूनचे अंतर सदोदीत बदलत असते. त्यामुळे त्यांचा परिणाम हा ते सूर्याशी किती अंशांचा कोन करतात यापेक्षा त्यांचे आपल्यापासून अंतर किती आहे यानुसार ठरायला हवा. भौतिकशास्त्राला ज्ञात चारच बलं आहेत. त्यातील एकच बल अर्थात गुरुत्वाकर्षणशक्ती ही लांब पल्ल्यावर काम करते. म्हणजेच जर शनी, मंगळ, गुरू यांचं एखादं बल आपल्यावर काम करत असेल तर ते गुरुत्वीय बलच असू शकतं. गुरुत्वीय बल हे वस्तुमानाप्रमाणे वाढतं. वस्तुमान दुप्पट झालं तर बलही दुप्पट होतं. त्याउलट अंतर वाढलं की बल कमी होतं आणि तेही वर्गाप्रमाणे. म्हणजेच अंतर जर दुप्पट झालं तर बल चतुर्थांश होतं.
या गणितानुसार जर आपण मंगळाचा आपल्यावर किती परिणाम होऊ शकतो हे पाहिलं आणि त्याची तुलना १०० किलोग्राम वजनाच्या, एका मीटरवर असलेल्या एका व्यक्तीच्या बलाशी केली तर ती दोन्ही बले जवळजवळ सारखीच असतात हे दिसतं. मंगळाचे वस्तुमान एकावर २४ शून्य इतके किलोग्राम आहे आणि त्याचं सरासरी अंतर साधारण एकावर ११ शून्य इतके मीटर आहे. म्हणजेच १०० किलोच्या पहलवानापेक्षा एकावर २२ शून्य इतकं बल वजनामुळे जास्त, पण अंतर एकावर ११ शून्य इतकी मीटर कमी असल्यामुळे त्याचा वर्ग अर्थात एकावर २२ शून्य इतक्या प्रमाणात कमी आणि हे दोन घटक सारखेच असल्यामुळे एकमेकांना रद्द करतात. आता जर फक्त ५० किलोग्राम वजनाचा डॉक्टर एखाद्या व्यक्तीपासून अर्ध्या मीटरवर असेल तर वस्तुमान अर्धे झाले म्हणून बल अर्धे होणार पण अंतर अर्धे झाले म्हणून बल चौपट होणार. म्हणजेच मंगळाच्या दुप्पट. या गणितानुसार एका व्यक्तीचं शेजारच्या दुसऱ्या व्यक्तीवर असलेले गुरुत्वीय बल हे दूर असलेल्या मंगळापेक्षा जास्त असतं. यामुळेच मुलाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या डॉक्टरचे किंवा सुईणीचे गुरुत्वीय बल बालकावर जास्त असतं.
या निर्विवाद युक्तिवादामुळेच अनेकदा फलज्योतिषी म्हणतात की पत्रिकेतले ग्रह फक्त त्यांच्यामधील कोनांपुरते. बाकी मात्र त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. क्षणभर ते खरं आहे असं मानलं, तरीदेखील त्यांचे गुणधर्म कोणते हे सांगायला हे फलज्योतिषी तयार नसल्यामुळे पुढे सगळं अडतं. थोडक्यात काय तर, फलज्योतिष हे पूर्णपणे निराधार आहे. जादूगार ज्याप्रमाणे पोतडीतून हवं तेव्हा हवं ते काढतो त्याचप्रमाणे फलज्योतिषी वाटेल तेव्हा वाटेल ते गुणधर्म या ग्रहांच्या माथी मारतात आणि त्यांच्याद्वारे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या कपाळी काहीबाही थोपतात. खरं तर फलज्योतिषांची हि स्थिती ग्रहांनी ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं‘ अशी केलेली आहे. तरी पण लोक साधारण कोणत्यातरी परिस्थितीमुळे अगतिक झाल्यावरच ज्योतिष्यांकडे जातात. वर दिलेल्या युक्तिवादाची त्यांना माहिती नसते, किंवा त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे काहीही खरं मानण्याची त्यांची मनस्थिती असते, आणि त्यामुळेच फलज्योतिषांचे फावते.
लग्नासारखी नातीसुद्धा सामंजस्यावर, प्रेमावर न बेतता दूरवर असलेल्या निर्जिव आणि त्यामुळे निर्बुद्ध ग्रहांवर सोपवून लोक अजाणता आपल्या (व आपल्या पाल्यांच्या) पायावर कुऱ्हाड मारून घेतात. अनेकदा यातील विजोड लग्न घटस्फोटाच्या दुसऱ्या टॅबूमुळे त्रासदायक संसाराला कारणीभूत होऊ शकतात.
त्यामुळे गरज आहे ती प्रबोधनाची, वरील युक्तिवाद सगळ्यांपर्यंत पोचवण्याची. कार, कंप्युटर वगैरे घेतल्यावर जशी हमी मिळते तशी फलज्योतिषी देऊ लागले तर बहुतांश भाकिते कशी निराधार असतात हे आपसूकच सिद्ध होईल, त्याचा एक संख्याशास्त्रीय पडताळासुद्धा येईल.
खगोलशास्त्राची प्रगती
काही शतकांपूर्वीपर्यंत विजा, वादळे, पूर वगैरे दैवी प्रकोप समजले जायचे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ठरावीक महिन्यांमध्ये ठरावीक नक्षत्रं दिसतात. पावसाळ्यात दिसणाऱ्या नक्षत्रांचा आणि पावसाचा संबंध जोडला जाणे साहजिक होतं. पण ती नक्षत्रं दिसतात तेव्हा पाऊस पडतो याऐवजी त्या नक्षत्रांमुळेच पाऊस पडतो अशी धारणा जुन्या काळी होती. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे रात्री दिसणारे तारे ठरावीक वेगाने त्यांची स्थानं बदलत. याउलट आपल्याच सौरमालेतील ग्रहांचे खगोलातील भ्रमण अनियमित वाटे. त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं. डोळ्यांनी पाच ग्रह दिसत असल्यामुळे त्यांनाच पत्रिकेत डांबलं. सोबतीला सूर्य–चंद्र होतेच. नंतर सापडलेले युरेनस नेपच्यूनसारखे ग्रह लोकांच्या पत्रिकेत फार काही उच्छाद मांडतांना दिसत नाही. पंधराव्या शतकाच्या सुमारास सौरमालेबद्दलच्या विज्ञानाच्या कल्पना नवीन ज्ञानामुळे उत्क्रांत झाल्या. पृथ्वीसकट इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात हे लक्षात आलं. तेव्हापासूनच खरंतर खगोलशास्त्राची आणि फलज्योतिषाची फारकत झाली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे गुरू आणि शनीभोवती अनेक चंद्र आहेत हे कळलं. मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान असलेल्या लाखो लघुग्रहांबद्दल कळलं. त्याहीपलीकडे असलेल्या आणि धूमकेतूंना जन्म देणाऱ्या ऊर्ट क्लाउडबद्दल कळलं. धूमकेतू विनाशाचे प्रेषित न राहता वैज्ञानिक कुतूहलाचे विषय बनले. विसाव्या शतकात मानव पृथ्वीभोवती उपग्रह स्थापू लागला. मानवाने अवकाशात भरारी घेतली. तो चंद्रावर जाऊन पोचला. मानवनिर्मित याने मंगळावर तर उतरलीच पण दूरच्या एका धुमकेतूवर*, तसेच एका लघुग्रहावर** देखील जाऊन पोचली. व्हॉयेजर*** याने तर सौरमालेच्या वेशीपर्यंत जाऊन पोचली आहेत. हे सर्व आपल्या सौरमालेतील. ह्यापलीकडे देखील अनेक सुरस शोध मानवाने लावले.
भारतानेही अनेक उपग्रह पृथ्वीभोवती स्थापले, चंद्र–मंगळावरील मिशन्स साध्य केल्या, आणि लवकरच भारतीय मानवालापण अवकाशात पाठवणार आहे. असं सर्व असताना भारतीयांनी, भारतीय समाजाने खगोलीय प्रगतीला प्राधान्य द्यायला हवं कि जुन्या तर्कहीन समजुतींमध्ये अडकून राहून पुढच्या पिढीला अज्ञानात लोटावे हे सुज्ञास सांगणे न लगे. पण अशा सुज्ञ लोकांनी इतरांपर्यंत हे विचार पोहोचवणे अतिशय आवश्यक झाले आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
* https://en.wikipedia.org/wiki/Philae_(spacecraft)
** https://www.nasa.gov/osiris-rex
*** https://voyager.jpl.nasa.gov/
या लेखाचा काही भाग इतक्यातच दिलेल्या दोन भाषणांवर आणि त्यांच्यावर आलेल्या काही प्रतिक्रियांवर तसेच लोकायत ग्रुपवरील काही चर्चांवर आधारित आहे.
नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक प्रकाशन (१ ऑगस्ट २०२१) https://tinyurl.com/6vrhmj42 (मिनीट २७ पासून)
ब्राइट्स सोसायटी (७ मार्च २०२१) https://tinyurl.com/85stfbpd (मिनीट ८ पासून)
लेख सुधारक ऑगस्ट २०२१ अंकात पूर्वप्रकाशीत.
पूर्वीच्या लोकांना
पूर्वीच्या लोकांना खगोलशास्त्र आतापेक्षा जास्त माहीत होतं कारण पूर्वीचे लोकं एलियन्ससोबत संपर्कात होते.असंही असू शकतं की मानवजात ही कदाचित एलियन्स प्रजाती आहे. आपल्या पूर्वजांकडे असलेलं ज्ञान आता आपल्याकडे नाही काळाच्या ओघात ते लुप्त झाले. त्यामुळे फलज्योतिष बरोबर आहे. आपण खगोलशास्त्रात जास्त संशोधन केलं पाहिजे. तुम्ही लेखाचं नाव बदला आणि 'फलज्योतिषाच्या प्रगतीपुढे खगोलशास्त्र आहे कुठे?' असं ठेवा.
मी कुठलेही काम कधीही पत्रिका
मी कुठलेही काम कधीही पत्रिका/मुहूर्त इ बघून केले नाही (व्हिसा अपाँईंटमेट्स तर कमी गर्दी म्हणून हमखास अवसेला घेतल्या!!), माझा ज्योतिषावर विश्वास नाही हे डिस्क्लेमर देवूनः
एकता कपूरसारख्या लोकांच्या आयुष्यात ना घटस्फोट झाले, ना अपघात, ना अपंगत्व. तिच्या सिरीयल फ्लॉप गेल्या तरी कुठलीही अनिश्चितता आयुष्यात नाही अशी अनेक मंडळी ज्योतिषाला शरण जातात - परंपरा म्हणून, श्रद्धा म्हणून, घरच्यांना दुखवायचे नाही म्हणून. आज ज्योतिष २ बिलियनची वर्ल्डवाईड इंडस्ट्री आहे. दारू, तंबाखू सारखे हे एक हानिकारक प्रॉडक्ट आहे हे अगदी मान्य. वापरायचे त्याने वापरावे. ज्योतिषाची खगोलशास्त्राशी सांगड झेपली नाही. ज्योतिष अभ्यासक्रम अन्य अभ्यासक्रमांप्रमाणेच रेग्यूलेट करणे, व्यवसाय रेग्यूलेट करणे मात्र गरजेचे आहे.
खूप छान लेख. आवडला.
खूप छान लेख. आवडला.
IGNOU चा अभ्यासक्रम म्हणाल तर तो BJP/RSS च्या प्रयोगशाळेत टेस्ट केल्या जाणाऱ्या उपक्रमांपैकी एक आहे.
मध्य प्रदेशात इंजिनिअरिंग च्या अभ्यासक्रमात रामायण /महाभारत समाविष्ट केलं जाण्याची बातमी होती काही दिवसांपूर्वी. (https://www.timesnownews.com/education/article/madhya-pradesh-adds-epics...)
हार्वर्ड पेक्षा हार्डवर्क महत्वाचं आहे असं मानणारे पंतप्रधान सध्या राज्य करताहेत. आपले आरोग्यमंत्री ऐन करोनाच्या काळात करोनील चा प्रचार करत होते. शासकीय पातळीवर समाज जुन्या तर्कहीन समजुतींमध्ये अडकून राहावा म्हणून जे प्रयत्न होत आहेत त्याचाच हा भाग आहे. पुरोगामी हा शब्द इथे मायबोलीवरदेखील शिवीसारखा वापरला जातो. त्यामुळे हा प्रॉब्लेम ज्योतीषाबद्दल मर्यादित नसून अधिक व्यापक आहे.
तुमच्या लेखाचे पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत
छान, विचारप्रवर्तक लेख आहे!
छान, विचारप्रवर्तक लेख आहे!
मला माझा दृष्टीकोन मांडायला आवडेल जो युवाल नोहा हरारी यांनी मांडलेल्या fictional reality या संकल्पनेवर आधारित आहे.
माझ्यासाठी खगोलशास्त्र ही physical reality वर आधारित शास्त्र शाखा आहे तर ज्योतिष हे fictional reality वर आधारित आहे. ते शास्त्र (विज्ञान/science) नाही पण त्याचे काही anecdotal नियम आहेत ज्यातून ते शास्त्र असल्याचा भास होतो. Science deals with physical reality.
Fictional reality ची माणसाला गरज असते. देव, धर्म किंवा आजच्या काळात सांगायचे तर देश/राष्ट्र (Nation state), पैसा (चलन) या साऱ्या माणसाच्या सुपीक डोक्यातून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत ज्यांना आपण fictional reality म्हणू शकतो. डंबलडोरच्या शब्दात सांगायचे तर "Of course it is happening inside your head, Harry, but why on earth should that mean it is not real?"
आयुष्यात जसे physical reality चे स्थान आहे तसेच fictional reality चे ही आहे. जोपर्यंत या दोन्हीत गल्लत करत नाही तोपर्यंत ज्योतिषाचा आधार घेणे हे अगदीच गैर आहे असे मला वाटत नाही. जसे म्युच्युअल फंडाच्या जाहीरातीखाली लिहून येते तसेच या ज्योतिषांच्या भाकीताविषयी म्हणायला हवे!
छान लेख. आवडला.
छान लेख. आवडला.
मस्त लेख अस्चिग. इथे
मस्त लेख अस्चिग. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
लेख खुप आवडला. ऊगीच धरले
लेख खुप आवडला. ऊगीच धरले सश्रद्ध आणि झोडले असे न करता अमूक एक गोष्ट का अयोग्य याचे शांतपणे मुद्देसुद विवेचन केलेय हे खुप आवडले. ते मुद्दे कुणाला पटतील, कुणाला नाही हा प्रश्न वेगळा.
जिद्न्यासा, तुमचा प्रतिसाद
जिद्न्यासा, तुमचा प्रतिसाद आवडला.
छान लेख! इथे लिहिल्याबद्दल
छान लेख! इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद!
मंगळाच्या गुरुत्वीय बलापेक्षा डॉक्टर किंवा सुईणीचं गुरुत्वीय बल बाळासाठी जास्त असतं हे आर्ग्युमेंट आवडलं
जिज्ञासा, फलज्योतिष imagined reality असेल, पण त्या imagined reality चा आधार घेऊन जेव्हा कुणी कुणाचं आर्थिक/ मानसिक शोषण करत असेल तेव्हा ते निरुपद्रवी रहात नाही.
खगोल ज्ञानाच्या प्रगतीपुढे
खगोल ज्ञानाच्या प्रगतीपुढे भाकित शास्त्र नगण्य असे बऱ्याच लोकांना वाटते. किंवा शास्त्रच नाही म्हणजे चर्चा कशाला? आणखी अभ्यासक्रमही सुरू केला यावरही आक्षेप असेल.
तरीही त्या आधारे माझं काय भलं होईल हे मात्र बघणारे आहेतच.
हे न बघताही भलं होणारे लोक भरपूर आहेत.
(तसंच महाराज, देव दर्शन याचंही म्हणता येईल. "दरवेळी अडचण आली की ***** च्या दर्शनास जातो आणि माझी सुटका होते सांगणारे आहेत.)
काही देशांत भविष्य सांगणे कायद्याने बंदी आहे. Alan Leo विरुद्ध खटला भरला गेला" की हा भविष्य सांगतो. " त्याने बचाव केला की मी " व्यक्तिच्या प्रवृत्ती tendencies वर्तवतो, ज्योतिष नाही." हे एकदा मान्य झाले पण नंतर मात्र ग्राह्य न धरता शिक्षा झाली.
जर का आपल्याकडे ज्योतिष सांगणे विरुद्ध कायदा नसेल तर ज्योतिषाला कसे आटोक्यात ठेवणार?
छान लेख आणि उत्तम लिहीले आहे.
छान लेख आणि उत्तम लिहीले आहे. अजून लिहीत जा.
छान लेख, आवडला.
छान लेख, आवडला.
फल ज्योतिष्य हे एक मानशास्त्राचा भाग बनलंय असे मला वाटते. म्हणजे त्यात विज्ञान नाही, आणि त्याचा उद्देश मानसशास्त्रात वापरासाठी नव्हता, तरी ते त्याचा भाग बनून गेलं.
वर सीमंतिनीनी लिहिलंय तसं केवळ अनिश्चितता हेच कारण नसावं लोक त्याच्या मागे जातात. त्यात खरंच काही तथ्य आहे, त्यात विज्ञान आहे असे समजून त्यामागे जाणारे सुखवस्तु लोकही दिसतात. (आणि पूर्वजांनी केलं म्हणजे बरोबरच असणार असे ठाम समजूत असणारे लोकही.)
यातले अनिश्चितता असणारे आणि कंसातले लोक वगळले तर इतरांना तुम्ही लिहीले त्याप्रमाणे प्रबोधनकरून समजावता येईल. (पण जर पुढे जीवनात अनिश्चितता निर्माण झाली तर त्यातील काही परत यामागे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.)
आधुनिक मानसशास्त्राचा मी काही अभ्यासक नाही, पण त्याची व्याप्ती अद्याप तोकडी आहे असे मला माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातुन वाटते. (चुकत असल्यास दुरुस्त करावे). आणि दुसरे असे की ते टॅबूमुळे अथवा अजून कुठल्या कारणामुळे लोकांना सहज उपलब्ध होत नाही. तेवढे मानसशास्त्रज्ञ, मानसरोगतज्ञ भारतात शहरी भागातही नाहीत. तेव्हा देव (लोक साधारणपणे जसा देव समजतात - नवसाला पावणारा, भक्ती केली की प्रसन्न होणारा, नाही केली की दुर्लक्ष करणारा/शिक्षा करणारा), फल ज्योतिष्य आणि तत्सम गोष्टीं जर काढून टाकायच्या म्हटले तर त्याच्या ऐवजी अनिश्चितता असणाऱ्या लोकांना मानसिक आधार देणारे, समाधान करणारे मानसशास्त्र लगेच आणि सहजतेने उपलब्ध व्हायला हवे. जे आज शक्य नाही.
ते उपलब्ध होत नाही तोवर ठोकून प्रबोधन करण्यात अर्थ नाही कदाचित ते योग्य ही होणार नाही.
त्याची व्याप्ती जसजशी वाढत जाईल (त्यासाठी जे करता येईल ते करावे) तसतसे लोक अशा गोष्टींपासुन दूर जाऊ लागतील.
ज्योतिषाची खगोलशास्त्राशी
ज्योतिषाची खगोलशास्त्राशी सांगड झेपली नाही. ज्योतिष अभ्यासक्रम अन्य अभ्यासक्रमांप्रमाणेच रेग्यूलेट करणे, व्यवसाय रेग्यूलेट करणे मात्र गरजेचे आहे. >>> सी चे हे म्हणणे पटले.
ज्योतिष हानीकारक आहे असे वाटणारे जितके आहेत त्याहून जास्त जण उपयोगी आहे असे वाटणारे आहेत त्यामुळे तर रेग्युलेशन अधिकच निकडीचे वाटते.
शोषण करणे हा मनुष्यस्वभाव आहे
शोषण करणे हा मनुष्यस्वभाव आहे. विज्ञानाने शोधलेल्या तन्त्रज्ञानाचा वापर करुनही भरपुर शारिरीक, मानसिक व आर्थिक शोषण झालेले आहे. गर्भातला जीव हवासा की नकोसा हे तन्त्रज्ञानाचा वापर करुन ठरवतात व नकोसा गर्भ मारुन टाकतात हे तर डोळ्यासमोरचे उदाहरण. ज्योतिषि अज्ञाताची भिति घालुन फसवतात.
त्यामुळे तर रेग्युलेशन अधिकच
त्यामुळे तर रेग्युलेशन अधिकच निकडीचे वाटते.
स्वत:वर.
फलज्योतिष आणि खगोलशास्त्राची
फलज्योतिष आणि खगोलशास्त्राची सांगड घालण्याचं कारण म्हणजे फलज्योतिषात ग्रहांची गती, त्यांचं (राशी/नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवरचं) स्थान यांचा विचार व्यक्तीची जन्मकुंडली मांडताना केला जातो. ग्रह, तारे हे खगोलशास्त्राच्या अभ्यासाच्याही कक्षेत येतात.
तंत्रज्ञानाचा गैरवापर करून शोषण होतं हे अगदीच मान्य. पण विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा भरपूर फायदाही (वैद्यकीय क्षेत्रात, रोजच्या आयुष्यात पदोपदी) आपल्या सगळ्यांना होतो. मग आपला विज्ञानावर विश्वास असो वा नसो. फलज्योतिषाचं तसं आहे असं म्हणता येणार नाही.
जिज्ञासा:
जिज्ञासा:
physical reality वि. fictional reality या आपल्या मांडणीत मला जाणवलेली त्रुटी नम्रपणे नमूद करू इच्छितो. देश/राष्ट्र, पैसा या अमूर्त संकल्पना असल्या तरी पक्क्या कार्यकारणभावावर आधारित आहेत. देशाचा नागरिक असल्याचे पुराव्याने सिद्ध करता येते, तसेच त्यानुसार मला काही अधिकार आणि कर्तव्ये प्राप्त होतात. पैसा बँकेत ठेवल्यास तो सुरक्षित राहण्याची आणि त्यावर व्याज मिळण्याची हमी असते. मला वाटतं, या संकल्पनांच्या संदर्भातील व्यवहार हे श्रद्धेवर (belief) आधारलेले नसून भरवशावर/विश्वासावर (trust) आधारलेले असतात. त्यासंबंधीचे नियम सार्विक असतात आणि ते स्थल-काल-व्यक्तिसापेक्ष बदलत नाहीत.
कार्यकारणभाव तर दूरच, फलज्योतिष्याची परिणामकारकता सांख्यिकीच्या (statistics) कसोटीवरदेखील सिद्ध होऊ शकलेली नाही. यासंबंधी आजवर केल्या गेलेल्या बऱ्याच चाचण्यांची माहिती या व्हिडिओ मध्ये आहे... https://www.youtube.com/watch?v=7cOzknp4Soc&t=1634s
फल ज्योतिष्य आणि तत्सम
फल ज्योतिष्य आणि तत्सम गोष्टीं जर काढून टाकायच्या म्हटले तर त्याच्या ऐवजी अनिश्चितता असणाऱ्या लोकांना मानसिक आधार देणारे, समाधान करणारे मानसशास्त्र लगेच आणि सहजतेने उपलब्ध व्हायला हवे. जे आज शक्य नाही>>>>
सहमत... मुळात धर्म, देव वगैरे सगळे माणसाने त्याच्या मानसिक दुर्बलतेवर उपाय म्हणुन जन्माला घातले. ती दुर्बलता विज्ञान अद्यापही कमी करु शकले नाही..
छान चर्चा चालू आहे!
छान चर्चा चालू आहे!
सारंग वंदना, बरोबर आहे. पण trust is also based on some belief system. Trust feels like a better word because it indicates things that are part of our congregate belief. Majority of us believe in RBI so there is trust. However, majority of us don't believe in astrology so there is less trust. Both are fictional realities. दोन fictional realities ची तुलना करता येणार नाही जशी तुम्ही केली आहे. पण त्या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत हा गुणधर्म कॉमन आहे. अशा काल्पनिक गृहितकांमुळे माणसाचे आयुष्य सोपे झाले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे एवढाच मुद्दा आहे.
खगोल शास्त्र.
खगोल शास्त्र.
नासा किंवा तशाच संस्था ज्या ब्रह्मांड चा अभ्यास करतात,ग्रह ,ताऱ्यांचा अभ्यास करतात.
त्या त्यांना माहीत पडलेल्या माहिती चा १% पण भाग लोकांशी शेअर करत नाहीत.
त्या मुळे अर्ध्या हळकुंडाने सामान्य लोकांनी पिवळे होवू नये.
खगोल शास्त्र मध्ये काय माहिती द्यायची काय द्यायची नाही ह्याचे कडक नियंत्रण होते.
जिज्ञासा,सारंग वंदना
जिज्ञासा,सारंग वंदना फलज्योतिष हे विज्ञान नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले तर त्यामागे धावणाऱ्यांचे प्रमाण किती कमी होईल? ते विज्ञान आहे अशा भूमिकेतून फलज्योतिषावर विश्वास ठेवणारे व त्याचा वापर करणारे लोक किती?
https://faljyotishachikitsa.blogspot.com/2010/01/blog-post.html
एसार्डी, जर का आपल्याकडे
एसार्डी, जर का आपल्याकडे ज्योतिष सांगणे विरुद्ध कायदा नसेल तर ज्योतिषाला कसे आटोक्यात ठेवणार? या आपल्या मुद्द्याविषयी विचार शंभर वर्षांपुर्वी मांडलेला हा पहा.
'फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य' या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यावेषी लिहितात," .........एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानास या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधितुन द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरुन सिद्धांत केलेला खरा असतो, सिद्धांतात चुक राहु नये यास्तव कोणते दोष टाळायचे असतात हे तर्कशास्त्रज्ञास माहित असते. यास्तव काहीतरी अनुमान काढायचा प्रमाद त्याच्याकडून फारकरुन घडत नाही. ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या नाही हे आकडेवार माहितीने ठरवुन ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषाविरुद्ध सरकार कडुन एखादा कायदा पास करवून घ्यावा." हे सत्यान्वेषी म्हणजे साहित्य समीक्षक प्रा. न.र.फाटक
हेमंत तुम्ही बरोबर बोलतात.
हेमंत तुम्ही बरोबर बोलतात. आणि जे तथाकथित ज्योतिषी आहेत त्यांना पण ज्योतिष 1% पेक्षा कमी माहीत असते. पूर्वी ही विद्या होती पण काळाच्या ओघात लुप्त झाली आहे. खरेतर आपण जसजसे पुढे चाललोय तसतसे आपण अज्ञानी बनत चाललोय. पण आपण ज्या सिम्युलेशन मध्ये राहतो ते आपल्याला असं भासवतंय की आपण ज्ञानी बनत चालतो आहोत. याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे होणारा पर्यावरण ऱ्हास. हे एकच उदाहरण झालं असे अनेक देता येतील. आता आपली जी प्रगती होत आहे ती प्रगती नसून विनाश आहे दिसत आहे. प्रगतीचा वेगळा रस्ता माणसाने निवडला रादर त्या सिम्युलेशनने त्याला निवडायला भाग पाडला.
प्रकाश सर, फलज्योतिष हे
प्रकाश सर, फलज्योतिष हे विज्ञान आहे की नाही हा प्रश्नच नाही. ते विज्ञान नाही हेच सत्य आहे. विज्ञानामध्ये physical reality चा अभ्यास होतो. फलज्योतिष हे विज्ञान का नाही हे अश्चिग यांनी उत्तम प्रकारे लेखात स्पष्ट केले आहे.
फलज्योतिष विज्ञान नाही हे कळले तर त्याचा फायदा निश्चित होईल पण आधीच्या काही प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे जर मानसिक समुपदेशनाच्या सोयी वाढल्या आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असेल तर मुळात या अशा fictional reality ची गरज कमी होईल.
जिज्ञासा
प्रकाश घाटपांडे
तुम्हाला जे शालेय जीवनात शिकवले ,उच्च शिक्षणात शिकवले ते फक्त आर्थिक हेतू साठी जे उद्योग आहेत त्या साठी माणूस हवा .
इतकेच शिकवले आहे
संशोधक, हे देशाचे गुलाम आहेत आणि खूप मोठी माहिती सामान्य लोकांना माहीत च नाही.
त्या मुळे चार बुक शिकली ती पण एडिट केलेल्या माहिती वर.
म्हणजे तुम्हांला दिव्य ज्ञान प्राप्त झाले हा सर्वात मोठा गैर समज पहिला काढून टाका.
बोकलत
बोकलत
स्व बुध्दी असणारा कोणी ही व्यक्ती तुमच्या मता शी सहमत होईल
आंधळे होणार नाहीत ज्यांना स्व बुध्दी नाही आणि स्वतःचे मत पण नाही.
बोकलत
बोकलत
स्व बुध्दी असणारा कोणी ही व्यक्ती तुमच्या मता शी सहमत होईल
आंधळे होणार नाहीत ज्यांना स्व बुध्दी नाही आणि स्वतःचे मत पण नाही.
हेमंत संशोधकांनी सर्व माहिती
हेमंत संशोधकांनी सर्व माहिती दिली तरी ती सामान्य लोकांना झेपणार नाही. ती झेपावी अशी अपेक्षाही नाही. अनेक संशोधक लोकोपयोगि माहिती सोप्या भाषेत देत असतात.
लेख आवडला. सुईणीचे/ डॉ चे
लेख आवडला. सुईणीचे/ डॉ चे गुरुत्व बल आर्ग्युमेंटला फारच भारी आहे.
आज ज्योतिष फ्रिंज मध्ये काम करतय, उद्या मुख्य धारेत आले तर? मुंबई विद्यापीठात आणि तेथील शिक्षण संस्थात त्याचे डिग्री कोर्सेस असतील आणि आपल्याकडे लोकसंख्या इतकी आहे, की मुलं (त्यांचे आई बाप) एक मान्यता प्राप्त अभ्यास म्हणून तिकडे टाकतील. हे स्वप्न रंजन नाही का भीती घालणं नाही.
रेग्युलेट करा समजू शकतो, ज्यात चार्टर ऑफ राईटस प्रोटेक्ट होतील, फसवणूक होणार नाही( फसवणूक हा पाया हे क्षणभर विसरून जाऊ) इ. पण म्हणून त्याचे विद्यापीठात शिक्षण? शरीरविक्रय रेग्युलेट होतो म्हणून सरकार अनुदान देऊन तो शिकवत नाही.
मानसोपचार तज्ज्ञ नाही म्हणून एकवेळ धरून चालू की लोक.ज्योतिष बाबा इ रस्ते शोधतात. पण ते समाजात त्यांना मिळत असेल तर ठीकच आहे. त्यासाठी नवा हमरस्ता तयार करायची गरज नाही. ज्या वाटा आहेत त्या शिक्षणाने पुसायच्या का नव्या तयार करायच्या?
ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमात
ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमात अजिबात ठेउ नये. जो विषय प्रयत्नवादाची कास सोडून दैववादाची कास धरण्यास शिकवतो - असा उपक्रम अजिबात ठेउ नये.
छंद वेगळा, अभ्यासक्रम वेगळा.
Pages