संध्याकाळी सात वाजता ऑफीस बंद करतानाच मोबाईल वाजला.
"काय रे भ्रमा, कुठल्या गाडीने निघालायस?" फोनवर मायबोलीकर योगी (Yo.Rocks!) होता.
"कोकण कन्या, ११:०५ ला सिएसटी ला"
"कोण कोण जाताय?"
"सगळेच रे. मी, आई, आणि अर्थात शुभांगी- मनवा"
"लग्न कधी आहे?"
"२९ ला आहे रे. आदल्यादिवशी साखरपुडा. एक दिवस आधी जातोय."
"मग नंदिनीच्या लग्नाला जाणार ना?"
"मी ३१ ला परत येतोय, तिचं लग्न ३ तारखेला आहे. पण तिला भेटुन यायचा विचार तर आहेच."
"घरुन...."
मोठ्याने आचका देत मोबाईल बंद पडला. बॅटरी डाउन झाली होती. ’रात्रीच्या प्रवासात फारसा लागणार नाहिये, त्यामुळे घरी जाऊन थोडा चार्ज करु, तसं ट्रेन मधे पण चार्ज करता येईलच की’ असा विचार करतच ऑफिस बंद करुन निघालो. वाटेत मिठाई घेऊन घरी पोचलो. मनवा - माझी दोन वर्षाची मुलगी वाट बघतच होती.
"बाबा, चला चला, सुलु मावशीच्या लग्नाला जायचं. झुक झुक गाडीने जायचं, य्ये य्ये"
"हो रे पिल्ला, जाऊया हां."
मोबाईल चार्जिंगला लावुन सामानावर एक नजर टाकली. एक मोठी सुटकेस आणि दोन खांद्याला मारता येतील अशा बॅग्स एवढं सामान होतं. साडेतीन माणसांचे कपडे, थंडीचे दिवस असल्याने स्वेटर्स, लग्नासाठीचे कपडे, भेटवस्तु यामुळे बॅग्स भरल्या होत्या. मी एकदा उचलुन बघितल्या. "भलत्याच जड की. कुलीच करावा लागेल" असं मनाशी म्हणत मी फ्रेश व्हायला गेलो.
लग्न सराईचे दिवस, आणि सि.एस.टी. ला टॅक्सीने जायचं होतं. एअर पोर्टच्या जवळच्या बर्याच हॉटेल्स मधे लग्नसमारंभ असतात आणि त्यामुळे ट्राफीक बर्यापैकी जाम होत असतं. सेंटॉर होटेल जवळच्या फ़्लायओवरच काम देखिल तेव्हा सुरु होतं. उशीर होण्यापे़क्षा लवकर गेलं तरी हरकत नाही असा विचार करुन मी ९.०० वाजता घर सोडण्याचं निश्चित केलं होतं. आठ वाजता जेवुन मी पावणे नऊ ला टॅक्सी आणण्यासाठी बाहेर पडलो. दोघा-तिघांची नकार घंटा ऐकुन घ्यावी लागलीच. एक टॅक्सीवाला तयार झाला, त्याला घरी घेऊन आलो. गोरेगावातच राहणारा भाऊ तोवर आला होता. सामान भरुन, शेजार्यांना घरावर लक्ष ठेवायला सांगुन आम्ही टॅक्सीत बसलो आणि निघालो तेव्हा वाजले होते रात्रीचे नऊ आणि तारीख होती २६ नोव्हेंबर २००८!!!!
*******************************************
वाटलं होतं तसं ट्राफीक काही मिळालं नाही. फ़्लायओवर कडे सुद्धा फार त्रास न होता आम्ही पुढे निघालो. टॅक्सी ड्रायवर बडबड्या होता. पोलीस कसे हैराण करतात याच्या कहाण्या ऐकवत होता. होता होता आम्ही सि.एस.टी. ला पोचलो. टॅक्सीचे तीनशे रुपये देऊन मी सामान उतरवलं आणी एका कडेला नेऊन ठेवलं. "हॅपी जर्नी साब" अशा शुभेच्छा देऊन टॅक्सीवाला निघाला आणि मी कुली शोधायला लागलो. पण सगळे कुली तितक्यातच आलेल्या गाडीतून उतरणार्या प्रवाशांचं सामान उतरवण्यात मग्न दिसत होते. एका कुलीने "१०० रुपये" सांगितले.
"आयला भलतच की. एकच बॅग तर घ्यायची. ह्या दोन मी घेईन." त्याला काही रस नसावा, तो पुढे गेला. मी घड्याळ्यात पाहिलं, ९:४० झाले होते. गाडीला बराच वेळ होता.
"आई, तू ईथे उभी राहतेस का? मी ह्या दोघांना सोडुन आणि ही सूटकेस ठेवुन परत येतो. मग आपण जाऊया."
आई हो म्हणाली. मी तिला कडेला उभं केलं, दोन बॅगा तिच्या पायाकडे ठेवल्या आणि मोठी सूटकेस घेऊन निघालो.
सि.एस.टी. ला जिथे मधे वेटींग हॉल आहे त्याच्या उजव्या बाजुन आम्ही प्रवेश केला. वेटींग हॉल खचाखच भरला होता. सगळी बाकडी अगदी फुल्ल होती. बरीच माणसं खाली बसली होती. वेटींग हॉल संपला की एक मोठा कॉरीडॉर लागतो आणि हा कॉरीडॉर संपला की प्लॅट्फॉर्म नंबर १६ सुरु होतो जिथुन कोकणकन्या सुटते. प्लॅटफॉर्मवर आलो तेव्हा गाडी लागली होती. जनरल खचाखच भरला होता, पत्रे फुटुन माणसं बाहेर येतील की काय असं वाटण्याईतपत गर्दी होती. मी पटापट पुढे चालत होतो. हातातल्या जड बॅगमुळे हाताला रग लागली होती. ईतक्यात मनवाने मागुन हाक मारली. मी थांबलो.
"काय गं?"
"हळु चाला ना बाबा, मी पण येते ना?"
हसुन मी हळु चालु लागलो. थ्री टीयर एसी बराच पुढे होता, तिथवर येऊन पोचलो. बॅग खाली ठेवुन मी कंपार्टमेंट शोधलं, पण दरवाजा आतुन बंद होता.
"साफ सफाई चालु है साब, पाच मिनट लगेगा और"
"तुम्ही ईथे बसा, मी तोवर आईला घेऊन येतो." असं शुभांगीला सांगुन मनवाला टाटा करुन मी मागे फिरलो.
प्लॅटफॉर्मवर माणसं येत होती. एक फिरंगी टोळकं पण उभ होतं. मी सगळीकडे बघत पटापट कॉरीडॉरच्या दिशेने जात होतो.
कॉरीडॉरच्या तोंडाशी आलो मात्र, समोरुन काही माणसं धावत येताना मला दिसली.
"गाडी सुटायला अजुन बराच वेळ आहे, कशाला धावतायत" असा विचार करत मी दोन पावलं पुढे सरकलो.
"फायर, फायरींग. भागो भागो" असे म्हणत आणखी काही माणसं धावत आली. मला कळेना की आग नक्की कुठे लागलिये.
मी जागीच खिळुन उभा राहिलो. क्षणात मला आठवल की आई बाहेर आहे. मी पुढे सरकलो आणि....
"फट फट फट फट" असे आवाज ऐकु आले. आणि समोर गोळ्या सुटलेल्या दिसल्या. काही गोळ्या धातूच्या कमानीवर आपटल्या आणि ठिणग्या उडाल्या. चार-पाच माणसं खाली पडली होती, अगदी निपचित होती. मी थोडा पुढे सरकलो ईतक्यात "ढम्म" असा मोठा आवाज झाला. कॉरीडॉरमधली सगळी माणसं पटापट आजुबाजुच्या वेटींग रुम मधे घुसली. मला मात्र आईचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. काय करावं अशा मनस्थितीमधे असताना आणखी गोळ्यांचे आवाज ऐकु आले आणि मी प्लॅटफॉर्मच्या दिशेने पळालो. प्लॅटफॉर्मवर मात्र कोणाला काहीच चाहुल लागलेली दिसत नव्हती. मी धावत शुभांगी उभी होती तिथे पोचलो.
"फायरिंग झालयं. काही माणसं पडलीत."
"आई कुठेत?" तिने घाबर्या आवजात प्रश्न केला.
"ती बाहेरच आहे. मी बघतो काय ते, तु मात्र गाडीत बसुन रहा"
मी परत धावत निघालो. कॉरीडॉरमधे आलो. सगळे वेटींग रुममधे घुसले होते. परत गोळ्यांचे आवाज आले आणि मी पण आत घुसलो.
माणसं प्रचंड घाबरली होती. काही बायका रडत होत्या. बाहेर आवाज थांबले आणि मी वेटींग रुमचा दरवाजा उघडु लागलो. एक बाई मला अडवु लागली.
"रुको, मत खोलो"
"अरे मेरी मां बाहर है, आपके उमरकी है!"
मी बाहेर आलो. एक रेल्वेचा कॉंस्टेबल होता.
"बाहर जानेक और कोई रास्ता है क्या? मेरी मां बाहर खडी है"
त्याने माझ्याकडे बघितलं.
"कैसे ईन्सान हो तुम, बाहर छोडके आ गये"
"रस्ता आहे तर सांग ना" माझा आवाज चढला.
"नही, ये एकही रास्ता है"
मी कॉरीडॉरच्या टोकाशी आलो. एक माणूस भिंतीच्या आडोशाला उभा राहुन हळुच वाकुन बघत होता.
"क्या हुआ है??"
"दो लोग है, फायरींग कर रहेले है! भाग, वो फिरसे ईधर मुड गये"
आम्ही दोघेही मागे पळालो. मी पटकन एका पार्सल ऑफिसात घुसलो. आत स्टाफ कुणिच नव्हता. दोन-तीन प्रवासी होते, टेबलाखाली दडुन बसले होते. त्या स्थितीतही माझ्य मनात विचार आला की हे तकलादु दार मोडुन आत यायला कितीसा वेळ लागेल? दोन मिनिटे मी तिथेच थांबलो. बाहेर कानोसा घेतला. आवाज येत नव्हते. मोबाईल काढुन भावाला फोन लावला, रींग वाजुन गेली. त्याच्या बायकोच्या मोबाईलवर केला. तेच! ईतक्यात फोन वाजला. भावानेच केला होता.
"काय रे? पोचलात?"
"ईथे फायरींग झालय. शुभांगी आणि मनवा गाडीकडे आहेत आणी आई बाहेर आहे."
"एक मिनीट, हे बघ टीव्हीवर दाखवतायत काहीतरी गॅंगवॉर आहे म्हणुन. कुलाब्याला पण फायरींग झालं."
"मी आईला शोधुन तुला फोन करतो"
फोन कट करुन पुन्हा एकदा मी वेटींग हॉल कडे वळलो. हॉलकडे बघितलं मात्र ... माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. सगळीकडे मृतदेह पडले होते, रक्ताचा नुसता सडा पडला होता. मी एकटा तिथे उभा होतो. मी जोरात हाका मारल्या " आई, आई". त्या प्रचंड घुमटात आवाज घुमला. मी परत हाक दिली " अरुणा माईणकर" न जाणो तिने माझा आवाज ओळखला नाही तर म्हणुन. पण छे! ईतक्यात परत लांबुन गोळ्यांचे आवाज आले. आणि कसलाही विचार न करता मी स्वत:ला जमिनीवर झोकुन दिलं. सरपटत सरपटत मी बाहेरच्या दिशेने निघालो. एक प्रचंड शरीरयष्टीचा मुसलमान खाली पडला होता, त्याच्या पायाला गोळी लागली होती. पुढे आलो तर एका पुरुष मरुन पडला होता, त्याचा चक्क मेंदु कवटीच्या बाहेर आला होता. मी सरपटत दरवाजापाशी आलो. ईथुनच काही वेळापूर्वी मी आणि शुभांगी आत आलो होतो. तिथे एक पोलीस शिपाई जखमी होऊन पडला होता. मी उभा राहिलो. मागे बघितलं. बापरे!! कित्येक माणसं मरुन पडली होती. त्यात म्हातारे, तरुण, मुलं!!! पण त्याक्षणी मला काहिच जाणवत नव्हतं. मला फक्त आईला सुखरुप बघायचं होतं. मी बाहेर आलो.
सगळीकडे सन्नाटा पसरला होता. काही वेळापूर्वी गजबजलेलं स्टेशन अगदी शांत होतं. टॅक्सीस्टॅंड मधे एकही टॅक्सी नव्हती, एक लहान मुलाचा मृतदेह पडला होता. मी जिथे आईला उभं केलं होतं तिथे आलो. मला काय बघायला मिळणार या कुशंकेने धडधड वाढली होती. मी तिथे पोचलो आणि....
आईला जिथे सोडुन आलो होतो तिथे काचांचा खच पडला होता. वजन यंत्र, वेंडींग मशिन्स, तिकीट काउंटर्स फुटली होती. आईचा मात्र पत नव्हता. मी "आई, आई" अशा हाका मारल्या, तिकिट काउंटर मधे वाकुन पाहिलं. काही माणसं तिथे लपली होती. त्यांना मी विचारलं " ईधर कोई औरत छिपी है" त्यानी नकारार्थी मान हलवली. त्यांच्या डोळ्यात भिती स्पष्टपणे दिसत होती.
आई नाही हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी वॆडाच झालो. परत ईकडे तिकडे बघत, हाका मारत मी हॉल मधे आलो. फोन वाजला. अनोळखी नंबर होता.
"हॅलो"
"ईथे बोला" एका पुरुषाचा आवाज.
"आई मिळाल्या?" शुभांगी होती.
"नाही. जिथे उभं केलं होतं तिथे नाहिये"
"तुम्ही ईथे या, आम्ही पण येतो"
"तु गाडीतच रहा. आत बसुन रहा, खाली उतरु नकोस. आई भेटली की मी येतोच"
"मला या मोबाईलवर फोन करा"
"ठीक आहे"
परत फोन वाजला. भावाचा फोन. त्याला मी सगळं सांगितलं. तोवर "लिओपोल्ड" ची खबर त्याने बघितली होती. "मी येउ का?" त्याने विचारलं "नको, मधे आणखी काही प्रॉब्लेम असेल तर अडकशील. मी तुला फोन करेन" आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज नाहिये. आणिबाणीच्या परिस्थितीमधे मला फोनची गरज लागेलच.
मी परत हॉलमधे आलो. तोपर्यंत स्ट्रेचर आली होती. परत फोन वाजला. योगीचा फोन. मी त्याला थोडक्यात कल्पना दिली आणि फोन कट केला. एक-दोघा जखमींना मी स्ट्रेचर वर चढवायला मदत केली. फार भयाण दृश्य होतं. माझी नजर मात्र आईला , तिच्या बॅगला शोधत होती.
पण कुठेच काही दिसत नव्हतं. ईतक्यात एक पोलिसशिपाई आणि ईन्स्पेक्टर बंदुक आणी रिवॉल्व्हर घेऊन आले आणि सेंट्रलच्या गाड्या सुटतात तिथे आडोसा घेत घेत पुढे गेले.
"अरे देखो देखो, ईधर बम पडा है"
मी बघितलं तर एक न फुटलेला बॉंब पडला होता. मी परत बाहेर आलो. समोरच रेल्वेचीच एक ईमारत होती. तिथे पोचलो. काही डॉक्टर तिथे होते अणि जखमींवर उपचार करत होते. मी तिथे जाऊन पाहिलं. आई नव्हती. एक रेल्वे पोलीस आला. त्याला विचारलं " यहा कोई औरत आई है छिपने"? त्याने दोन-तीन बंद खोल्यावर थाप मारली. आतुन भेदरलेले चहेरे डोकावले.
"बाहरका कोई छिपा है क्या?"
"नही"
आता मात्र मी प्रचंड निराश झालो. परत भावाचा फोन आला. मी त्याला सगळं सांगितलं आणि म्हणालो की माझ्या मोबाईलची बॅटरी डाउन आहे. मी त्याला एसेमेस करुन काय ते कळवेन.
ईतक्यात परत फोन वाजला. शुभांगीने ज्या मोबाईलवरुन केला होता तोच नंबर.
"मी दादरला उतरते आणि बेबीमावशीकडे जाते. हेगडेकाकांना कळवते, मग ते न्यायला येतील मला."
बेबीमावशी म्हणजे शुभांगीच्या काकीची बहिण. दादरला सेनाभवनाजवळ राहतात.
"चालेल, मला कळव मात्र. मनवा काय कततेय?"
"शेजारच्या लहान मुलीबरोबर खेळतेय"
"बरं"
मी तिथुन परत सि.एस.टी. च्या प्रवेशद्वारा कडे निघालो. कुठुन आईला तिथे उभं केलं असं वाटत होतं. ईतक्यात डोक्यात एक विचार आला.
’आई नाहिये, पण तिच्या बॅगापण नाहियेत. आणि जिथे उभी होती तिथे काही अघटीत घडल्याच्या खुणा पण दिसत नाहियेत. म्हणजे आई कुठेतरी असेल’. आता मला थोडा हुरुप आला आणि मी दोन पावले पुढे गेलो तोच ....
"हात उपर, हात उपर. हलु नकोस. कोण आहेस तू?"
सि. एस. टी. च्या प्रवेशद्वारामधुन ७-८ पोलीस आत आले होते आणि त्यांनी माझ्यावर बंदुका रोखल्या होत्या. बरोबरच होतं. त्या कंपाउंडमधे मीच एकटा असा बाहेर फिरत होतो.
" आईला शोधतोय, आईला शोधतोय" मी जोरात ओरडुन सांगितलं.
"पळ, बाहेर पड चल" त्यांनी हुकुम दिला.
मी पटापट चालत त्यांच्याच मागे गेलो. सगळेजण सि.एस.टी. च्या तिकिट काउंटर कडे गेले. तिथे तर काचांचा प्रचंड खच पडला होता. पोलिसांच्या बोलण्यावरुन कळलं की दोनजण आहेत आणि तोंडावर मास्क वगैरे लावुन ते आले होते. पोलीस आपापसात बोलताहेत तोवर बाहेरुन पुन्हा गोळिबाराचे आवाज ऐकु आले. सगळे पोलीस आत पळाले. दोन हवालदार बाजुला असलेल्या व्हॅन मधे बसले आणि व्हॅन सुरु केली. मी व्हॅनच्या मागुन धावलो आणि आत उडी मारली. व्हॅन सुसाट स्टेशनच्या बाहेर आली. सि.एस.टी. च्या समोरच डि.सि.पी - झोन १ चं ऑफिस आहे. तिथे व्हॅन थांबली आणि मी उतरलो. बघ्यांची अफाट गर्दी झाली होती. एक उसवाला उसाची मोळी टाकुन पळाला असावा. बरेच पोलीस उसाची कांडकी हातात घेऊन "सज्ज" होते. त्याही स्थितीत मला गंमत वाटली. कुठे त्या बंदुका आणि कुठे हे उसाची कांडकी फिरवणारे पोलीस!
परत फोन वाजला. शुभांगीच्या भावाचा - देवदत्तचा फोन.
"काय झालं? तुम्ही कुठे आहात?
मी त्याला सगळी कथा ऐकवली, शुभांगी आणि मनवा गाडीत आहेत, गाडी सुटली तर दादरला उतरतील हेही सांगितलं. हेगडेकाकांना कळवा हे देखिल सांगितलं.
फोन वाजला. ईंद्राचा होता, त्याने काही लागलं तर कळव सांगितलं. आता मात्र बॅटरी संपण्याच्या दिशेने कूच करत होती. परत वाजलेला फोन मी कट केला. शुभांगीच्या आतेभावाने केला होता. मी त्याला एसेमेस केला की देवदत्तला फोन कर.
आजुबाजुला प्रचंड संख्येने पोलीस होते. आजुबाजुला राहणारी बरीच बघे मंडळी खाली उतरली होती. सि.एस.टी.च्या प्रवेशद्वारामधुन आत जायला मज्जाव होता. मी स्वत:कडे पाहिलं. जमिनीवर सरपटत आल्यामुळे कपडे, हात संपूर्ण काळे झाले होते. घशाला कोरड पडली होती. पण आई कुठे असेल आणि गाडीत शुभांगी-मनवा कशा असतील या शंकेने मी प्रचंड व्याकुळ झालो होतो. गाडीचं तिकीट माझ्याकडे होतं. शुभांगीकडे पर्स पण नव्हती. परत फोन वाजला. सुलुचा- माझ्या मेव्हणीचा होता. मी कट केला. तिने परत केला. मी पुन्हा कट केला. मला काही दुखापत झाली असावी किंवा मी परत कुठे अडकलो असेन अशा शंकेने तिने एसेमेस पाठवला "तुम्ही फोन का नाही घेत आहात?" मी तिला बॅटरीची समस्या असल्याचे उत्तर पाठवले. जरा मागे आलो. तिथे एक लॉजिंग होतं. मी तिथल्या पायरीवर बसलो. मालकाकडॆ पाणी मागितलं. त्याने मला कुठुन आला विचारलं. मी सगळी हकीकत सांगितली. त्याच्या चेहर्यावर माझ्याबद्दल करुणा दाटुन आली. त्याने माझ्या खांद्यावर थोपटलं. ईतक्यात एसेमेस आला. देवदत्तने पाठवला होता " आई सापडली".
मी लागलीच त्याला फोन केला.
"कुठे आहे आई?" मी अधिर्या स्वरात विचारलं.
"शुभांगीच्या मोबाईलवर करा. सुलु बोलली त्यांच्याबरोबर."
मी लगेच कट करुन शुभांगीला फोन केला.
"आई तुझ्याबरोबर कशी आली?"
"आई? ईथे नाहिये"
"अरे मला आताच देवदत्तने सांगितलं. मी करतो त्याला.
मी परत देवदत्तला फोन केला.
"आई नाहिये शुभांगीजवळ. सुलु कशी बोलली? मी आताच शुभांगीला फोन केला होता"
"अहो शुभांगीच्या मोबाईलवर करा"
आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. काय झालं हे माझ्या लक्षात आलं. घरुन निघतानाच शुभांगीचा मोबाईल आईच्या हॅंडबॅगमधे टाकला होता. ईतका वेळ शुभांगी दुसर्याच्या मोबाईल वरुनच फोन करत होती. पण गडबडीत माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं. मी भावाला फोन केला. त्याला आई सापडल्याचं सांगितलं. शुभांगी ज्या फोन वरुन फोन करत होती तो नंबर त्याला दिला. त्याला म्हटलं की माझी बॅटरी कुठल्याही क्षणी दगा देईल. तू या दोघींच्या संपर्कात रहा आणि मला एसेमेस करत रहा.
मला प्रचंड हायसं वाटलं. आम्ही सगळे सुखरुप होतो. आता प्रश्न होता तो पुन्हा सगळे एकत्र येण्याचा. पोलिसांकडे गेलो, त्यांना म्हटलं की मला आत जाऊद्या, बायको आणि लहान मुलगी गाडीत आहेत. पण त्यांनी नकार दिला. साहजिकच होतं. आत सगळीकडे झडतीसत्र चालु होतं. आजुबाजुचे रहिवासी मदत करायला सि.एस.टी. मधे गेले होते. तिथली बरीचशी दुकानं उघडुन बिस्कीटं, दूध वगैरे घेऊन बरेचसे स्वयंसेवक निघाले होते. ऍंब्युलन्स धावत होत्या. मधेच काही वरीष्ठ अधिकारी तिथे आले. त्यांनी उभ्या उभ्या आढावा घेतला. ते गेल्यावर पोलीस पांगले. प्रत्येक जण मोबाईलवर आपल्या आपल्या घरी, मित्रांना खबर करत होता.
भावाचा परत एसेमेस आला. आई एका दुकानात असल्यांचं आणि ती अगदी सुखरुप असल्याचं त्याने कळवलं होतं. शुभांगीची गाडी अजुन सुटली नव्हती. पण ती दादरलाही उतरणार नव्हती. गाडी सुटलीच तर रत्नागिरीलाच पोचायच असं ठरलं होतं. तिकीट नसल्याची समस्या होती खरी, पण टीसी नक्कीच ऐकला असता. आई नक्की कुठे आहे हे मी भावाला विचारलं. कळवतो असं त्याने सांगितलं.
वातावरणात प्रचंड तणाव होता. चॅनल्स च्या ओबी व्हॅन्स धावत होत्या. काही पत्रकार आतून आलेल्या एका माणसाचे "चावे" (बाईट्स) घेत होते. ईतक्यात भावाचा एसेमेस आला. त्याने ’आई जिपिओ च्या जवळच्या दुकानात आहे’ असं त्यात म्हटलं होतं. मी पोलीस डॉग घेऊन उभा असलेल्या एका पोलीसाकडे गेलो. "जिपिओ कुठे" असं विचारलं. "कशाला?" या अपेक्षित प्रश्नावर मी त्याला सगळं सांगितलं.
"जिपिओ मधे मिलिटरी थांबवलीये. तो सगळा एरीया कॉर्डन ऑफ केलाय. आई सुखरुप आहे ना? गाडीतली मंडळी पण सुखरुप आहेत ना? मग आता काही करु नका. आहात तिथे ठीक आहात. कारण अजुन आम्हालापण माहित नाहिये की काय काय होतयं. ताजवर पण हल्ल्ला झालायं." मी सुन्न झालो.
परत त्या मगाच्याच लॉजिंगजवळ आलो. मालकाने विचारलं " मिले क्या? ". मी त्याला हो म्हटलं. ईतक्यात पोलिसांनी सगळ्यांना पांगवायला सुरुवात केली. अतिरेकी एक क्वालीस घेऊन फरार झालेत अशी खबर आली होती. पटापट सगळे पांगले. मालकाने मला आत बोलावलं. मी जाऊन बसलो आणि मोठ्ठा बीप देऊन मोबाईलने राम म्हटला.
"आपके पास चार्जर होगा क्या? छोटा पिनवाला? मेरा बॅटरी खतम हुआ"
त्याने ३-४ चार्जर काढले. पण सगळे मोठ्या पिनचे होते. त्याने एका नोकराला बोलावलं आणि "नीचे जाके छोटा पिनवाला चार्जर ढुंढके ला" म्हणुन सांगितलं.
समोर टीव्ही चालु होता. त्यात ताज-ट्रायडंट वरील हल्ला, टॅक्सीत झालेला बॉंबस्फोट ई. बातम्या येत होत्या. हा हल्ला किती मोठ्या प्रमाणावर आहे याची हळुहळु कल्पना येऊ लागली होती. ईतक्यात "ब्रेकींग न्यूज" झळकली. "करकरे शहीद" लागोपाठ पुन्हा बातम्या आल्या. "साळसकर, कामटे शहीद" बापरे!! मुंबई पोलीसांचे तीन खंदे वीर हल्ल्यात मरण पावले होते. साळसकर आमच्याच भागात राहत असल्याने नियमित दिसत.
ईतक्यात नोकर चार्जर घेऊन आला. मी मोबाईल चार्जिंगला लावला आणी सुरु केला. पहिलाच एसेमेस शुभांगीने केला होता. "गाडी सुटली. आम्ही ठीक आहोत. तुम्ही काळजी घ्या".
भावाचा पण एसेमेस आला. त्यानेही तीच बातमी दिली होती.आणि त्यात आई असलेल्या दुकानाचा व्यवस्थित पत्ता दिला होता. मोबाईल आता थोडाफार चार्ज झाला होता. पहाटेचे तीन वाजले होते.
मालकाच्या भावाला मी विचारलं "यह ब्लॅकीज हाऊस कहां है? मेरी मां वहीं हैं!"
"ये क्या सामने"
मी बरोबर त्याच ईमारतीच्या मागच्या बाजुस होतो. म्हणजे पाच तास मी आईपासून काही अंतरावरच होतो.
मी त्या ईमारतीत गेलो.
"ये दुकान कहा है? मेरी मां है वहां"
"अकेली है ना? थोडी उम्रवाली?"
"हां, यही है क्या?"
"ये देखो सोयी है"
एका बाईला त्याने उठवलं. काळोखात मला आधी काही दिसलं नव्हतं. पण ती भलतीच बाई निघाली.
"यहा आओ, यहा भी कुछ औरते सोयी है"
एका बॅगांच्या दुकानात काही बायका झोपल्या होत्या. पण त्यात आई नव्हती. मी बाहेर आलो. ईतक्यात दोन तरुण आले.
"आपकी मां है क्या? दो बॅग है उनके पास?"
"बिल्कुल"
त्यांनी एका बंद दुकानावर थाप मारली. एका बाईने दार उघडलं.
"मेरी मां है अंदर?"
"तुम्ही अजय का?"
"मी त्याचा भाऊ"
तिने मला आत बोलावलं. आई झोपली होती.
"मावशी उठा, तुमचा मुलगा आलाय"
आई पटकन जागी झाली. मला एकदम गहिवरुन आलं. मनात नको त्या शंकानी घर केलं होतं, पण आईला मी सुखरुप बघत होतो.
"तू झोप थोडावेळ, आपण नंतर निघुया."
"मनवा आणि शुभांगी"
"त्यांची गाडी सुटली. रत्नागिरीला उतरतील त्या"
मी बाहेर आलो. बरीच मंडळी वर्तमानपत्रं, पुठ्ठे टाकुन झोपली होती. मी पण त्यातच पाठ टेकली. पण झोप येईना. उठुन बसलो. माझा अवतार बघुन एक-दोघे जवळ आले.
"आप अंदर थे क्या"
परत सगळी कथा त्यांना ऐकवली. ते सिएसटीच्या बाहेर बसणारे फेरीवाले होते.
"सब माल उधर पडा है खुल्लेमे. ईसलिये बैठे है. अभी कलसे हमको सतायेंगे पोलीस वाले."
"वो शिंदे भी मारा गया. अच्छा आदमी था"
"आपका नसीब अच्छा है, आप सब बच गये"
पहाटेचे चार वाजले. सकाळच्या गाडीने जाणारे प्रवासी हळु हळू येऊ लागले होते. रात्री एव्हढा प्रकार होऊनही माणसं घराबाहेर पडली होती.
"मुंबई स्पिरीट" माझ्या मनात आलं.
आता वेळ घालवण्यापेक्षा घरीच जावं असा विचार करुन मी आईला जाऊन उठवलं. त्या बाईनी आईच्या पिशव्या आणुन दिल्या. आता आईचा बांध फुटला.
"यांनी मला खुप मदत केली. मला ईथे ठेवुन घेतलं" असं म्हणुन आईने त्या बाईना मिठी मारली. माझेही डोळे पाणावले.
त्या बाईंचा निरोप घेऊन आम्ही टॅक्सीने निघालो.
मुंबई शहर झोपलं होतं. वाटेत काही ठिकाणी पोलीस गाड्या उभ्या होत्या. पण एकाही ठिकाणी आम्हाला अडवण्यात आलं नाही. मला आश्चर्य वाटलं. पुरते आठ तास नव्हते झाले तरी असं कसं?
साडेचारच्या सुमारास घरी आलो. भावाला फोन केला, देवदत्तला एसेमेस केला. दोघेही जागे होते.
पंधरा मिनिटांत भाऊ आणि त्याची बायको घरी आले. तिने चहा केला. चहा घेता घेता आईची हकीकत कळली.
************************************************
आई उभी होती, त्याच्या मागेच तिकीट काउंटर होतं. आई ईथे तिथे बघत असताना, तिच्या भाषेत सांगायचं झालं तर "पत्र्यावर काठ्या मारल्यावर होतात तसे आवाज" ऐकु आले आणि माणसं पळायला लागली. आईला क्षणभर काहीच कळलं नाही. ईतक्यात एक पोलीस ओरडला "मावशी, पळा, फायरींग होतयं"
"कुठुन अंगात ताकद आली माहित नाही, पण दोन्ही बॅगा मी उचलुन मी पळाले. बॅगांमुळे नीट पळता येत नव्हतं, तरी मी जीव खावुन पळाले.एका माणसाने आपल्या मुलाला माझ्या बॅगा घ्यायला सांगितल्या. मग आम्ही सगळे बाहेर आलो".
बाहेर पडलेले सगळे समोरच्या ईमारतीत शिरले. तिथे ’बॅंक ऑफ महाराष्ट्र’ ची शाखा होती. एवढी माणसं येताना पाहुन तिथली वॉचमन धावत आले आणि यांना आत शिरण्यापासुन रोखु लागले. मग पोलिसांनीच मध्यस्थी केली. ज्या बाईंनी आईला आसरा दिला त्या सौ. वाघ त्या दुकानात काम करतात. दुकान बंद करुन त्या घरी निघाल्या होत्या, पण फायरींग झाल्याचं कळल आणि त्या बसस्टॉप वरुन परत आल्या. आई एकटीच बघुन त्यांनी आईला आपल्यासोबत ठेवुन घेतलं.
त्या दुकानाच्या पायर्यांवर बसली असताना आईच्या बॅगेत असलेला मोबाईल वाजला. आईला प्रथम काहीच कळलं नाही. परत जेव्हा वाजला तेव्हा एका माणसाने आईला तसं सांगितलं. त्यानेच मोबाईल रिसिव्ह केला आणि आई सुलुशी बोलली आणि मी तिला शोधु शकलो.
माझी आई गावात सातवी शिकलेली. ४० वर्षं मुंबईत राहिली खरी पण एकटं फिरण्याचा प्रसंग तिच्यावर कधीच आला नाही. गोरेगावच्या बाजारात जाऊन येणं ईतकच तिला माहित. त्यामुळे त्या प्रसंगाला तिने खरच धीराने तोंड दिलं. तिच्याकडे असलेल्या एका बॅगमधे या दोघींचे दागिने होते. एका माणसाने तिला विचारलं की "आपके थैलीमें कुछ जोखम तो नही?" त्यावर तिने "आम्ही गावच्या जत्रेसाठी जातो आहोत, पिशवीत नातीचे कपडे आहेत"असं सांगितलं.
भाउ घरी गेल्यावर आम्ही झोपायचा प्रयत्न केला पण रात्रीचा प्रसंग वारंवार डोळ्यासमोर येत होता. शुभांगी आणि मनवाचा विचार पण मनात येत होता. शेवटी मी टिव्ही लावुन बसलो. ताज-ट्रायडंट-सिएसटी - सगळीकडच्या घटना दाखवत होते.
आठ वाजता मी शुभांगीला फोन केला. तिला भेटलेलं कुटंब तिच्या ओळखिचचं निघालं. म्हणजे शुभांगीने जेव्हा हेगडेकाकांना फोन केला, तेव्हा त्या गृहस्थाने - श्री. वागळेंनी तिला "हे हेगडे म्हणजे अमुक का, अमुक ठिकाणी राहतात का" वगैरे विचारलं. वागळे हे हेगडेंचे भाचेच निघाले. त्यांनी बरीच मदत झाली. त्यांच्या फोनची बॅटरी डाउन होईल ईतके फोन शुभांगीने केले. सकाळी त्यांनी ब्रेकफास्ट मागवला. ईतकचं नाही तर रत्नागिरीला उतरताना "कदाचित तुझा भाऊ यायला उशीर झाला तर असुंदे" म्हणुन काही पैसे पण दिले.
त्या रात्री मी आणि आई खाजगी बसने रत्नागिरीला गेलो. साखरपुडा, लग्न अगदी मस्त पार पडलं. लग्नात सगळ्यांच्या नजरेचा केंद्रबिंदु होती ती आई. सगळी कथा परत परत सगळे ऐकत होते.
३१ तारखेला आम्ही परत आलो. रुटिन आयुष्य पुन्हा सुरु झालं.
त्या रात्रीचा मी विचार करतो तेव्हा काही शक्यता माझ्या लक्षात येतात -
१. आमची टॅक्सी उशीरा पोचली असती तर आम्ही उतरता - उतरता कदाचित फायरींग मधे सापडले असतो.
२. मी आणि शुभांगी-मनवा किंवा मी एकटा किंवा मी आणि आई वेटींग हॉल ओलांडुन जात असताना फायरींग मधे सापडलो असतो.
३. सर्वात थरकाप उडवणारी शक्यता म्हणजे मी आईला बाहेर उभं न करता वेटींग हॉलमधे बसवलं असतं तर!!
त्या रात्री माणुसकीला काळिमा फासणारे नराधम पाहिले तसेच आम्हाला मदत करणारी "माणसं"ही भेटली. माझ्याबाबत बोलायचं तर "देवमाणूस" या संज्ञेवरचा माझा विश्वास अजुन दृढ झाला.
भयंकर आहे हे सगळं. नशिबाने
भयंकर आहे हे सगळं. नशिबाने तुमचा शेवट गोड झाला. त्या वेटींग रूममधल्या लोकांच्या नातेवाईकांना तर जगणे अशक्य झाले असेल.
, अतिशय कठीण परिस्थितीतुन
:-(, अतिशय कठीण परिस्थितीतुन निभावलात.
आणि आज हराम खोर कसाब चा वाढदिवस साजरा केल्या सारख वातावरण.
भयानक प्रसंग! तुमच्या आईच्या
भयानक प्रसंग! तुमच्या आईच्या हिमतीला दाद!
खुपच भयकर प्रसंग , माणसाची
खुपच भयकर प्रसंग , माणसाची दोन रुपं बघायला मिळाली , एक संकटात देवासारखी धावुन येणारी आणि दुसरं नराधम हरामखोर अतिरेकी .
सर्व २६/११ च्या शहिदाना भावपुर्ण श्रद्धाजंली .
विलक्षण प्रसंग !
विलक्षण प्रसंग !
मन सुन्न झाले. लिहायला शब्द
मन सुन्न झाले. लिहायला शब्द नाहीत !
भ्रमर, तुम्ही त्या ४-५ तासात
भ्रमर,
तुम्ही त्या ४-५ तासात काय अनुभवल असेल याची कल्पनाही करवत नाही. कितीकांची आयुष्ये त्या दिवशी उध्वस्त झाली असतील. तुम्ही सर्व दैव बलवत्तर म्हणून वाचलात.तुम्हाला खरोखरच देव माणसे भेटली.
२६/११ च्या सर्व हुतात्म्यांना मानवंदना.
भ्रमरा खरच थरारक.......... पण
भ्रमरा खरच थरारक..........
पण करकरेंसारखे मोहरे कामी आले हे दु़खःही असह्यच.
बापरे, वाचुनच इतक सुन्न
बापरे, वाचुनच इतक सुन्न व्हायला झाले, तुमची तिथे प्रत्यक्ष आईला शोधतांना काय अवस्था झाली असेल. विचार सुद्धा करवत नाही.
...
...
बापरे... !!!
बापरे... !!!
गेल्या वर्षी कसाब ने जिथे
गेल्या वर्षी कसाब ने जिथे पाऊलखुणा सोडल्या त्या लिओपोल्डमध्ये आत्ता जल्लोष सुरू आहे.. कामाच्या ग्ल्लीत मात्र शांतता आहे..... मरणाची
मन सुन्न झाल, वाचता वाचता
मन सुन्न झाल, वाचता वाचता डोळे घळाळत होते... २६/११ च्या सर्व हुतात्म्यांना मानवंदना!!!
सगळ वाचुन तो दिवस आठवला...
सगळ वाचुन तो दिवस आठवला... तुम्हाला खरच सलाम. हे सगळ प्रत्यक्ष अनुभवण भयंकर आहे.
टिव्ही वर पहाताना सुद्धा रात्री नीट झोप येत नव्हती.
२६/११ च्या शहिदांना मानवंदना...
त्या दिवशी आम्ही तिघे घरीच होतो पण माझे दिर, जाउ आणि पुतणी कोंकणकन्या साठी सिएसटी ला पोचलेले. रात्री १० च्या सुमारास जावेचा फोन आला. टिव्ही वर काही दाखवतायत का बघ अस म्हणत होती.
ते ट्रेननी CST ला गेलेले आणि उतरले तेव्हा बंदुकीचे आवाज येत होते आणि लोक धावत होती. काहितरी जाम गडबड आहे अस वाटुन त्यांनी पुन्हा धावत लोकल पकडली आणि ट्रेन मधे बसुन आम्हाला फोन केलेला.. टीव्ही वर तेव्हा काहितरी दोन टोळ्यांमधे गोळीबार चाल्लय अस दाखवत होते. त्यांनी कुर्ल्याला उतरुन तिथुन ठाण्याला जाउन गाडी पकडायच ठरवल. बराच वेळ गाडी काही आली नाही. मधे आमची फोनाफोनी चालुच होती. तोवर न्युज मधे हा अतिरेकि हल्ला आहे हे कळल. त्यांना लगेच फोन करुन घरी जायला सांगितल. कुर्ल्याहुन रिक्षा पकडुन ते घरी पोचले तेव्हा आमच्या जिवात जिव आला..
थोडे लवकर पोहचुन ते तेव्हा चुकिच्या जागी असते तर... विचारही करवत नाही.
भ्रमर, तुमच्या आईच्या
भ्रमर,
तुमच्या आईच्या प्रसंगवधानाच कौतुक कराव तेवढ थोड. बाकी तुमच्यावरचा प्रसंग म्हणजे काळजाचा थरकाप उडवणारा आहे. आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्द्ल धन्यवाद.
<<काही पत्रकार आतून आलेल्या एका माणसाचे "चावे" (बाईट्स) घेत होते.>>
भरलेल्या डोळ्याने, दाटलेल्या कंठाने सुद्धा हसू फुटल!
(No subject)
काय लिहू? वाचताना डोळे भरून
काय लिहू? वाचताना डोळे भरून आले. अश्या अनपेक्षित आपत्तीला तुम्ही धाडसाने सामोरे गेलात म्हणून तुमचे अभिनंदन.
आज वर्षभराने परत हे सर्व लिहिताना तो थरार तुम्ही नव्याने अनुभवला असेल.वाचताना अंगावर काटा उभा राहिला.
असेच काही प्रसंग आपल्याला माणूसकीवर परत विश्वास ठेवायला भाग पाडतात.
बाप रे! अंगावर काटा आला
बाप रे! अंगावर काटा आला वाचताना. आईंच्या आणि तुमच्या हिमतिची दाद द्यायला हवी
बापरे! किती भयानक वाटलं असेल
बापरे! किती भयानक वाटलं असेल तुम्हाला सगळ्यांना... cant imagine!
मन सुन्न झालं!!!! २६/११ च्या
२६/११ च्या सर्व हुतात्म्यांना
२६/११ च्या सर्व हुतात्म्यांना श्रध्दानंजली!!!
भ्रमर, बापरे काय परिस्थितीतून गेलात!
तुम्हा सर्वांच प्रसंगावधान वाखणण्याजोगं
मंडळी, हे सर्व लिहितांना हा
मंडळी, हे सर्व लिहितांना हा थरार मी पुन्हा अनुभवला, पण यावेळेस तेच अनुभव मात्र मला सुन्न करुन गेले. जेव्हा ही घटना घडली, जेव्हा मी आजुबाजुला पडलेले मृतदेह पाहिले त्यावेळी माझ्या मनापर्यंत त्याची भीषणता नव्हती पोचली. कारण 'खाली पडलेली जखमी अथवा मृतव्यक्ती आई नाही ना' एवढचं मेंदुपर्यंत पोचत होतं. पण हे लिहीत असताना त्या जखमी अथवा मृत नागरीकांप्रती मी प्रचंड संवेदनशील झालो. मी पाहिलेलं दृश्य खूप भीषण होतं, परंतु सार्वजनिक ठिकाणी लिहिताना काही तारतम्य बाळगलचं पाहिजे म्हणुन मी ते सर्व लिहिलं नाही.
आपल्यापैकी काही जणांनी मला शूर, धैर्यवान वगैरे संबोधलं आहे. पण ते सगळं त्यावेळच्या परिस्थितीमधुन आलेल्या अपरिहार्य असहाय्यतेतुन, हतबलतेमधुन आलेलं होतं. आपल्यापैकी कुणावरही असा प्रसंग ओढवला ( तसं कधीच होऊ नये हीच प्रार्थना!) तर आपण ही असेच वागाल याची मला खात्री आहे.
हा प्रसंग मी लिहावा म्हणुन एका मायबोलीकर मैत्रिणीने मला बरच सांगितलं, पण त्यावेळी मी नाही लिहिला. २६/११ बद्दल बरीच चर्चा मायबोलीवर झाली, त्यात भाग घ्यावा असंही नाही वाटलं. एक तर "लिखाण" हा माझा प्रांत नाही. आणि ईतका भीषण अनुभव लिहावा का अशी साशंकता मनात होती. पण जसजसं एक वर्ष जवळ येऊ लागलं, तशी हा अनुभव लिहीण्याची उर्मी दाटुन येऊ लागली. वर उल्लेख केलेल्या मैत्रीणीची प्रतिक्रिया प्रथम आली, तिने फोन केला आणि ती रडायलाच लागली. त्यावेळी 'लिहुन चूक केली' असं देखिल वाटुन गेलं. असो.
तो प्रसंग आम्ही विसरु शकतच नाही पण मागच्या या वर्षभरात आमच्या घरात आम्ही या विषयावर कधिच चर्चा केली नाही. २६ नोव्हेंबर याच दिवशी मी शुभांगीला प्रथम भेटलो होतो. सगळं ठीक झालं म्हणुन,अन्यथा......... ! (आयुष्यातले मोठ अपघात याच दिवशी घडतात असं मी तिला कधी कधी म्हणतोही
)
मनात एक खंत अजुन आहे की मी कुणा जखमी व्यक्तींना त्यावेळी काहीच मदत नाही करु शकलो.
त्य घटनेत मृत पावलेले नागरीक, पोलीस कर्मचारी यांच्या स्मृतीला अभिवादन!! आपले पोलीसदल, सैनिक, कमांडोज आणि अग्निशमन दल तसेच अनेक सामान्य नागरीक यांना माझा सलाम!
धन्यवाद!
बाप रे!
बाप रे!
वाचताना जीवाचा थरकाप उडाला.
वाचताना जीवाचा थरकाप उडाला. तुम्ही त्या प्रसंगाला ज्या धीराने सामोरे गेलात त्या धैर्याला सलाम!!
भ्रमर आपल अभिनंदन आणि तुमच्या
भ्रमर आपल अभिनंदन आणि तुमच्या आईंच पण.
याच दिवसच्या माझ्या नवर्याच्या आणि आमच्या एका मित्राच्या आठवणी सांगते.
१. माझा नवरा त्या दिवशी ऑफिसमधल्या सहकर्यांबरोबर काही कामाकरिता मुंबई मध्ये होता. सकाळी त्यांच्या घाटकोपर ऑफिसमधल काम आटोपून ते सर्वजण संध्याकाळी सेमिनार साठी "ताज" हॉटेल मध्ये जाणार होते. अचानक माझ्या नवर्याच्या मनात काय आल कोण जाणे त्याने पुण्याला परत येण्याचा हट्ट धरला. त्याच ऐकून त्याचे सहकारी पण परत आले. साधारण ९:०० - ९:३०च्या सुमारास घरी आल्यावर जेवताना टि.व्हीचे channels बदलत असताना अचानक त्याची नजर या बातमीवर पडली, आणि त्याने सांगितल कि "आज आम्हि या वेळेस तिथे असणार होतो, पण मी (माझ्या नवर्याने) फोर्स केल्याने आम्हि परत आलो."
खरच सांगते! जिवात जिव येण म्हणजे काय हे मी त्यावेळेस अनूभवल.
२. आमचा एक मित्र "ताज" मध्ये काम करतो. २५ नोव्हेंबर २००८ पर्यंत त्याची ड्युटी वरच्या रेस्टॉरंट्मध्ये होती आणि नेमका त्याच दिवसापासून (२६ नोव्हेंबर २००८) त्याला तळमजल्यावरच्या दाराजवळच्या रेस्टॉरंट्मध्ये शिफ्ट केल होत. काल डिस्कवरीवर त्याची मुलाखत पण झाली. कोणी बघितली असेल तर त्याच नाव "अमित पेशवे" आहे. त्याने त्या दिवशी तिथे असलेल्या कस्ट्मरना सुखरूप बाहेर पडायला खूप मदत केली.
अमेझिंग आहात. पुन्हा
अमेझिंग आहात. पुन्हा तक्रारीचा सूर नाही तुमचा कुठे. जे झालं, जसं झालं ते प्रामाणिकपणे आणि संयमाने मांडलत.
निशब्द.
निशब्द.
भ्रमा... वाचुन अंगावर काटा
भ्रमा...
वाचुन अंगावर काटा उभा राहिला... तुला प्रत्यक्ष अनुभवुन काय झाल/वाटल असेल ह्याची कल्पनाही करवत नाही...
भयानक!....
भयानक!....
काळ आला होता पण वेळ नव्हति
काळ आला होता पण वेळ नव्हति आलि....
भयानक आहे...
वाचुन अंगावर काटा उभा राहिला...
Pages