एक जुडी मेथी- शक्यतो फक्त पाने घ्यावी निवडून व स्वच्छ धुवून
तीन वाट्या ताक
दोन वाटी बेसन पीठ
तूप , जिरे, १ तमालपत्र, दोन-तीन लवंगा, मीठ, साखर
फोडणीसाठी तेल
लाल सुक्या मिरच्या ८-९
आज पुण्यामध्ये अगदी पावसाळी वातावरण आणि सोसाट्याचा वारा सुटला आहे. अशावेळी गरम गरम कढी गोळे, त्यावर लाल मिरचीची चटकदार फोडणी आणि वाफाळणारा भात.... स्वर्गसुख!
मूळ कढीगोळे हरभऱ्याची डाळ भिजत घालून तीन-चार तासाने बारीक वाटून त्याचे गोळे कढीमध्ये किंवा साधी फोडणी घालून अशी आहे. परंतु माझ्या आईने यात काही बदल केले होते. आई मराठवाड्यातली तेव्हा तिने कदाचित कोणाकडे तरी हे पाहिले अथवा खाल्ले असावेत. मी मात्र लहानपणापासून असेच मेथीचे कढीगोळे खात आहे.
कढी- आपली नेहमीची-
एकीकडे तुप जिरे तमालपत्र आणि लवंगा घालून फोडणी करावी. तीन वाट्या ताक आणि त्यात अगदी थोडेसे म्हणजे चमचाभर डाळीचे पीठ घालून फोडणी वर ओतावे. अंदाजाने मीठ आणि साखर घालून उकळायला ठेवावे.
आता गोळ्यांसाठी-
मेथी धुवून, पुसून आणि बारीक चिरून घ्यावी. मेथी पुसून घेतली तर बरे कारण पाणी जास्त झाले तर गोळे फुटतील आणि मग कढीगोळ्या ऐवजी मेथीची ताकातली भाजी खावी लागेल! तर मेथीत दोन वाट्या बेसन पीठ घालावे थोडे मीठ घालून व्यवस्थित एकत्र करावे. घट्ट गोळा झाला पाहिजे.
हाताला तेल लावून गोळे करून घ्यावेत.
गोळ्यांमध्ये आता असंख्य व्हेरीएशन्स करता येतील जसे की जिरे धणे पूड, ओवा, लसुण घालता येईल. हिरव्या मिरच्या वाटून घालता येईल. तिखट पण चालेल. हे होईपर्यंत कढीला एक उकळी आली असेल. हे अत्यंत महत्त्वाचे आहे की कढी ला एक उकळी आल्याशिवाय गोळे त्यात सोडायचे नाहीत.
आता हळू हळू एकेक गोळा सोडायचा आणि अजिबात न हलवता झाकून दहा ते पंधरा मिनिटं गोळे होऊ द्यायचे.
गोळे शिजल्याची खूण म्हणजे ते आकाराने मोठे होतात आणि कढीच्या वर तरंगू लागतात.
कढी गोळ्या चा महत्वाचा घटक आहे वरून घातलेली फोडणी! छोट्या कढल्यात तेल चांगले गरम करून हिंग आणि मोहरी घालावी. तडतडली की लाल सुक्या मिरच्या घालाव्यात आणि गॅस बंद करावा. सुक्या मिरच्या चांगल्या कुरकुरीत होतात . नंतर त्यावर दोन चमचे लाल तिखट घालावे आणि फोडणी दुसर्या एका वाटीत काढून घ्यावी.
वाढताना बोल मध्ये कढी गोळे आणि वरून झणझणीत फोडणी असे द्यावे. भाकरी, पोळी आणि खास करून वाफाळणारा भात याबरोबर अप्रतिम लागते!
माझ्या माहेरी दोन जुडी मेथीचे कढीगोळे जेमतेम पुरतात. सर्वजण वन डिश मील सारखे खातात.
१. बेसन अंदाजाने कमी जास्त करावे लागेल.
२. गोळ्या चा आकार लहानच ठेवावा. शिजून ते मोठे होतात.
३. कढी पातळ करावी. गोळे शिजल्यावर ती दाट होते.
मी पुणेकर, धन्यवाद! ताट
मी पुणेकर, धन्यवाद! ताट अमेझिंग दिसतंय!
करून बघितली कढी ..मस्त झाली
करून बघितली कढी ..मस्त झाली चवीला..पण आ रा रा नी सांगीतल्याप्रमाणे मेथीचे गोळे आधी गरम पाण्यात उकळून घेतले आणि मग कढीत घातले...अजिबात फुटले नाहीत आणि चव भन्नाट आली होती..
thank you prajakta आणि आ रा रा
Pages