मेथीचे कढीगोळे

Submitted by Prajakta Y on 16 May, 2021 - 05:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक जुडी मेथी- शक्यतो फक्त पाने घ्यावी निवडून व स्वच्छ धुवून
तीन वाट्या ताक
दोन वाटी बेसन पीठ
तूप , जिरे, १ तमालपत्र, दोन-तीन लवंगा, मीठ, साखर
फोडणीसाठी तेल
लाल सुक्या मिरच्या ८-९

क्रमवार पाककृती: 

आज पुण्यामध्ये अगदी पावसाळी वातावरण आणि सोसाट्याचा वारा सुटला आहे. अशावेळी गरम गरम कढी गोळे, त्यावर लाल मिरचीची चटकदार फोडणी आणि वाफाळणारा भात.... स्वर्गसुख!

मूळ कढीगोळे हरभऱ्याची डाळ भिजत घालून तीन-चार तासाने बारीक वाटून त्याचे गोळे कढीमध्ये किंवा साधी फोडणी घालून अशी आहे. परंतु माझ्या आईने यात काही बदल केले होते. आई मराठवाड्यातली तेव्हा तिने कदाचित कोणाकडे तरी हे पाहिले अथवा खाल्ले असावेत. मी मात्र लहानपणापासून असेच मेथीचे कढीगोळे खात आहे.

कढी- आपली नेहमीची-
एकीकडे तुप जिरे तमालपत्र आणि लवंगा घालून फोडणी करावी. तीन वाट्या ताक आणि त्यात अगदी थोडेसे म्हणजे चमचाभर डाळीचे पीठ घालून फोडणी वर ओतावे. अंदाजाने मीठ आणि साखर घालून उकळायला ठेवावे.

आता गोळ्यांसाठी-
मेथी धुवून, पुसून आणि बारीक चिरून घ्यावी. मेथी पुसून घेतली तर बरे कारण पाणी जास्त झाले तर गोळे फुटतील आणि मग कढीगोळ्या ऐवजी मेथीची ताकातली भाजी खावी लागेल! तर मेथीत दोन वाट्या बेसन पीठ घालावे थोडे मीठ घालून व्यवस्थित एकत्र करावे. घट्ट गोळा झाला पाहिजे.

Screenshot_20210516-144322.jpg

हाताला तेल लावून गोळे करून घ्यावेत.

Screenshot_20210516-144332.jpg

गोळ्यांमध्ये आता असंख्य व्हेरीएशन्स करता येतील जसे की जिरे धणे पूड, ओवा, लसुण घालता येईल. हिरव्या मिरच्या वाटून घालता येईल. तिखट पण चालेल. हे होईपर्यंत कढीला एक उकळी आली असेल. हे अत्यंत महत्त्वाचे आहे की कढी ला एक उकळी आल्याशिवाय गोळे त्यात सोडायचे नाहीत.
आता हळू हळू एकेक गोळा सोडायचा आणि अजिबात न हलवता झाकून दहा ते पंधरा मिनिटं गोळे होऊ द्यायचे.

Screenshot_20210516-144339.jpg

गोळे शिजल्याची खूण म्हणजे ते आकाराने मोठे होतात आणि कढीच्या वर तरंगू लागतात.

कढी गोळ्या चा महत्वाचा घटक आहे वरून घातलेली फोडणी! छोट्या कढल्यात तेल चांगले गरम करून हिंग आणि मोहरी घालावी. तडतडली की लाल सुक्या मिरच्या घालाव्यात आणि गॅस बंद करावा. सुक्या मिरच्या चांगल्या कुरकुरीत होतात . नंतर त्यावर दोन चमचे लाल तिखट घालावे आणि फोडणी दुसर्‍या एका वाटीत काढून घ्यावी.

Screenshot_20210516-144348.jpg

वाढताना बोल मध्ये कढी गोळे आणि वरून झणझणीत फोडणी असे द्यावे. भाकरी, पोळी आणि खास करून वाफाळणारा भात याबरोबर अप्रतिम लागते!

माझ्या माहेरी दोन जुडी मेथीचे कढीगोळे जेमतेम पुरतात. सर्वजण वन डिश मील सारखे खातात.

Screenshot_20210516-144400__01.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

१. बेसन अंदाजाने कमी जास्त करावे लागेल.
२. गोळ्या चा आकार लहानच ठेवावा. शिजून ते मोठे होतात.
३. कढी पातळ करावी. गोळे शिजल्यावर ती दाट होते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

छान रेसिपी...
फोटो इतका छान दिसतोयं की, मी नक्की करून बघणार हि रेसिपी...

भन्नाट प्रकार आहे.. काल कैरीची डाळ करण्यासाठी हरभरा डाळ भिजत घातली पण ते जास्त झाल्यामुळे फ्रीजात ठेवली आहे. आजच बेत करतो. इथे पण पाऊस सुरूच आहे... खुप गार वाटतंय तेंव्हा हे कढी गोळे अप्रतिम लागतील असं वाटतंय.

पण दोन शंका आहेत.. कढीपत्त्या ऐवजी तमालपत्र टाकून कढी केल्यात ती चवीला मराठमोळी कशी लागेल...? Uhoh आणि कढीला उकळी येईपर्यंत गोळे टाकू नये म्हणता तर उकळी आल्यावर कढी फुटणार नाही का..??

सर्वांना धन्यवाद!
DJ-
कढीपत्ता घातला तर तोंडात येतो. मेथीची काही पाने सुटी होतातच ती खाताना कढीपत्ता तोंडात आला तर मुलांना फारसा आवडत नाही म्हणून घातला नाहीये पण तुम्ही ट्राय करू शकता.

तमालपत्र घातल्याने किंचित मसालेदार हलकासा सुवास येतो पण तुम्ही म्हणालात तसे ही मराठमोळी कढी नाही लागत, किंचित गुजराती कढीची चव येते.
ताक फोडणीला घालताना चमचाभर बेसन घालायचे आहे जेणेकरून उकळी आल्यावर ते फूटू नये . परंतु जास्त नाही कारण गोळ्यातील बेसन कढी मध्ये उतरते आणि ती घट्ट होत जाते.

कढीगोळे जीव की प्राण आहेत. फार आवडतात मला. मेथी घालून, शेवग्याची कोवळी पाने घालून, अनेक व्हेरिएशन्स आहेत.

***
आता माझे एक्स्ट्रा दीड पैशाचे टिप्स.

१. उकळत्या कढीत गोळे सोडून ते फुलून वर आणून वगैरे करणे हा थोडा सुगरण आयटम आहे. टेम्परेचर अन गोळ्याची कन्सिस्टन्सी/चिकटपणा वगैरे जमायला अनुभव लागतो तोवर १-२ दा कढी-पिठले बनवावे लागू शकते. सो, नुसते गोळे इडल्या वाफवतो तसे वाफवून मग नंतर कढीत सोडणे हा एक इलाज आहे.

२. कढीपत्ता चिरून्/कापून घालावा, तसेच फोडणीत घातल्यावर तो कुरकुरीत तळला गेला, तर तोंडात निबर जून पाने येऊन रसभंग होत नाही. व फ्लेवर पूर्ण येतो. कढीलिंबाशिवाय कढी बनूच कशी शकते? :अश्चर्यचकित भावला:

ते अख्खं झाड परमेश्वराने कढीसाठी बनवलं आहे. म्हणून तर त्याला कढीपत्ता/ कढीलिंब म्हणतो आपण Wink

आ.रा.रां. नी सगळ्या शंका कुशंका पार काढून टाकल्या.... चला आता बनवतो कढी गोळे. Bw

हा नवीन पदार्थ खायला घालतो सर्वांना.. तेवढेच त्यांच्या चेहर्‍यावर नवा पदार्थ खाण्या आधीचं टेंशन आणि तो खाल्ल्यावरचं "मस्तै की" अनुभवायला मिळेल Proud

हा नवीन पदार्थ खायला घालतो सर्वांना..
<<
फोटोतल्यापेक्षा मेथी थोडी कमी घाला, अन खाण्या आधी गोळे चिरून्/कुस्करून त्यावर हिंग-मोहोरी/जिरे-लाल तिखटाची ताजी फोडणी अंमळ करपवून घाला. मग त्यावर कढी घालून अह हा हा..

कढी थोडी जास्त च करा. अन डिश पूर्ण तयार झाल्यावर कढी थोडी पातळ करून घ्या. खूप दाट झाली की सोबत प्यायला मजा येत नाही.

ते अख्खं झाड परमेश्वराने कढीसाठी बनवलं आहे. म्हणून तर त्याला कढीपत्ता/ कढीलिंब म्हणतो आपण Wink >>>ज्जे बात

ते उकडून घालणे छान सांगितलंत आरारा. नाहीतर माझे हमखास कढी पिठलं व्हायचं, धन्यवाद.

मेथीत पीठ्+हिरव्या मिरच्यांचं वाटण + मीठ् + हळद घेऊन मळून गोळे बनवून झालेत... आता कढीच्या ताकात बेसन पीठ टाकुन घेतो. चला.. आता जेवण झाल्यानंतरच बोलु. Bw

आ.रा.रा. शेवटच्या टीप्स चेरी ऑन द टॉप ठरतील असं वाटतंय... हे असं वरून फोडणी घेण्याचं मी मराठवाडी/विदर्भातील लेखक/मित्रांकडून वाचलं/ऐकलं होतं पण ते धारिष्ट्य आज पश्चिम महाराष्ट्रातील माझ्या कुटुंबियांना दाखवावं लागेल. Wink

ते उकडून घालणे छान सांगितलंत आरारा. नाहीतर माझे हमखास कढी पिठलं व्हायचं, धन्यवाद.
<<

यल्कम. पण तो झाला शॉर्टकट.

मूळ रेस्पीप्रमाणे गोळा थोडा विरघळून कढीची चव वेगळीच लेव्हल गाठते.

सो, प्रो टिप अशी आहे :

कढी खळ्खळ उकळवा. पाणी अंमळ जास्तच असू देत. मग त्यात पहिला गोळा टाकला की दुसरा टाकण्याआधी उकळी आधीइतकी येऊ द्या. गोळा गार आहे, तो अ‍ॅड केला की टोटल टेंपरेचर कमी होते. ते पुन्हा वाढू द्या मग दुसरा घाला. मग तसेच अंतर ठेवून तिसरा अँड सो ऑन.

गॅस मोठा असू देत. नंतर थोडा मध्यम-तीव्र करा.

छान आहे पाककृती.... मी कढीगोळे करताना गोळे तळून घेते आणि नंतर गोळ्याचा एक एक घास कढीत बुडवून खायचा... खूप छान लागते...

वाह छान, रेसिपी आणि फोटो दोन्ही.

मी मेथीचे मुटके घालते कधी कधी कढीत पण मावेत शिजवून घेते, अर्थात क्वचित घालते. एरवी साधे गोळे तळून किंवा मिक्स डाळीची भजी घालते.

छान रेसिपी... नक्की करून बघणार...

.. आमच्याकडे कढी करतात, त्यात उन्हाळा सीजन मध्ये, variation म्हणून पिकलेले रसाळ गरे घालतात...( जे मला अजिबात आवडत नाहीत)...

उकडलेल्या आठळ्या छान लागतात कढीत. पिकलेले गरे मलाही आवडणार नाहीत. त्यात बरका तर आवडत नाही मला, असाही खायला.

Pages