भारत का दिल देखो : रानभाजी अमलताश (पाककृती )

Submitted by मनिम्याऊ on 2 May, 2021 - 04:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अमलताश / बहाव्याची फुले - ५-६ झुंबरे
कांदे - २ मध्यम आकाराचे
लसूण - ४-५ पाकळ्या
हिरव्या मिरच्या - २ (तुकडे करून)
मोहरी - १ लहान चमचा
हिंग - पाव चमचा
हळद - १ लहान चमचा
लाल तिखट - १ लहान चमचा
मीठ - चवीनुसार
बेसन- २ चमचे .
IMG_20210502_114917.JPG

क्रमवार पाककृती: 

'भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतीय लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत ही एक रानभाजी.
होळी सरून चैत्र महिना लागला की वातावरणातील उष्णता वाढायला लागते तशी पानगळ झालेल्या बहाव्यातून लहान लहान पिवळी-सोनेरी झुंबरे डोकावू लागतात. साधारण तीन ते ५ मीटर उंच असलेला हा वृक्ष उन्हाळ्यात जंगलामधील आकर्षणाचे केंद्र ठरतो. (आता शहरांमध्येपण बहाव्याची शोभेचा वृक्ष म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड केलेली दिसून येते.) फुलांच्या सौन्दर्यामुळे याला 'गोल्डन शॉवर' असं पण नाव आहे. याला संस्कृतमध्ये व्याधिघात, हिंदीत 'अमलतास' आणि बंगालीत 'सोनालू' म्हणतात. शास्त्रीय नाव 'Cassia fistula'. या बहाव्याच्या झाडाची एक गंमत सांगते. असं म्हणतात की बहाव्याची फुले उमलली की त्यानंतर ४५ दिवसांत पावसाळा सुरु होतो. म्हणून याला 'इंडियन रेन इंडिकेटर ट्री' म्हणून पण ओळखले जाते.

या वृक्षाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यापैकी मुख्य म्हणजे पोटाच्या विकारांवर यापासून बनविलेली औषधें सारक म्हणून काम करतात. विदर्भातील गावांमध्ये वर्षातून एकदा ही बहाव्याच्या फुलांची भाजी खाण्याची पद्धत आहे. खरेतर वर्षभर कोणत्या महिन्यात काय खावे आणि काय खाऊ नये याची एक Do's N Don'ts असलेली कविता लहानपणी ऐकलेली होती. त्यात पण बहाव्याचा उल्लेख आहे. पूर्ण कविता तर आठवत नाहीय पण थोड्याश्या ओळी आठवतात-
चैती कैरी, बहावा वैशाखी...... श्रावणात कांटोळे, केना भादवी.....
IMG_20210502_104223.JPG

असो. तर मूळ मुद्दयाकडे वळू.

भाजी करायला अत्यंत सोपी.
बहाव्याच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून २ पाण्यातून धुवून घ्या व निथळत ठेवा.
कांदा उभा चिरून घ्या. (जितका कांदा जास्त तितकी चव छान येते.) लसूण ठेचून घ्या.
कढईत तेल गरम करून हिंग-मोहरीची फोडणी करा .
त्यात ठेचलेला लसूण घालून खरपूस होऊ द्या.
आता कांदा घालून गुलाबीसर होऊ द्या. हळद, लाल तिखट घाला. त्यात बहाव्याच्या पाकळ्या घालून परतून घ्या. पाकळ्या शिजल्या म्हणजे volume एकदम कमी होतो. त्यानुसार नंतर मीठ घाला. २ चमचे बेसन लावून झाकण ठेवा आणि ५ मिनिटे दणदणीत वाफेवर शिजवून घ्या.
बहाव्याची भाजी/ झुणका तयार आहे. वर कोथिंबीर पेरून भाकरी सोबत खा.
IMG_20210502_120414.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

चव सांगायची झाल्यास - as name suggests 'अमलतास' = अम्ल = आंबटसर

पुढे उन्हाळ्यात पोटाचे विकार सतावू नयेत म्हणून विदर्भात वर्षातून एकदा हि भाजी खाण्याची परंपरा आहे.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या सुंदर नाजुक मुली ला संसाराच्या धबडग्यात लोटुन दिल्यासार खे वाट्ते. ही काव्यात्मक फुले .. बास्केट मध्ये ठेवलेली सुरेखच दिसत आहेत. आमच्या तिथे एक दोन आहेत झाडॅ पण ते बहर उंचावर आहेत. काढून कोण देइल तर भाजी बणवील मी. विदर्भातला उन्हाळा बाकी भारी कडक असे अजून नुस्खे लिहा. माहिती मिळते.

नवीन आहे रेसिपी माझ्या साठी.
छान वाटते पण असे नवीन नवीन जाणून घ्यायला.

ही फुलं खातात माहीत नव्हते. काय सुरेख रंग येईल भाजीला. अमलताशची भाजी, बीटाची कोशिंबीर, पालक पुरी, दही बुत्ती... असा रंगीत बेत करता येईल.

मस्त पाककृती! छान चालू आहे पाकमाला ! NDA मध्ये आहेत ही झाडं ... जाऊ देत असतील तर आणता येतील फुलं . आजच ह्या पध्दतीने घोळाची भाजी केली थोडी मातकट लागते पण उन्हाळ्यात दोन तीनदा तरी खातोच.
मामी, रंगबिरंगी ताट डोळ्यासमोर आलं

तेजो, +१
हादग्याच्या फुलांची भाजी अशीच करतात. लाल भोपळ्याच्या फुलांचीही भाजी अशीच होते. फक्त देठाजवळ पाकळ्यांवरचे हिरवे आवरण (calyx) काढून टाकावे लागते.

बहावा च्या फुलांची भाजी होते हे नव्यानेच कळले! परंतु हे सुंदर आणि अतिशय आवडणारे झुंबर झाडावरच बघायला आवडेल. खाण्यासाठी मन धजावणार नाही.

Prajakta Y,
Agadi मनातले बोललीस. आता थोड्या वेळापूर्वी ते सोनेरी झुंबर पाहून आले आहे.

ही फुलं खातात हे पहिल्यांदा समजलं.

परडीतली फुलं फार आवडली. झाडावरची तर प्रचंड नजरसुख देतात. खायला मन धजावेल की नाही माहिती नाही पण ती कविता पूर्ण मिळाली तर वाचायला आवडेल.

सगळ्यांचे मनापासून आभार.

स्वयंपाकात फुलांचा उपयोग आपण मराठी लोक सहसा करत नाहीत. तरी पण गुलकंद, केळफुलं, अगस्ती, शेवग्याची आणि भोपळ्याची फुले इ. प्रकार आपल्याला नवीन नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही भागात बहावा, कमळ, मोहाची फुले सर्रास खाण्यात वापरतात. मोहफुलांची पुरणपोळी हे अजून एक झाडीपट्टीतलं वैशिष्ट्य. (झाडीपट्टी = भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे चार जिल्हे). तसेच निळ्या गोकर्णाची कोवळी फुले घालून भात पण काही core जंगल भागात केला जातो.

खरंतर स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या फुलांवर एक स्वतंत्र धागा असावा का? की ऑलरेडी आहे इथे? शोधून बघते. Happy

Thanks Nanaba...
This food really helps in digestion.
Lol Light 1

बहावा च्या फुलांची भाजी होते हे नव्यानेच कळले! परंतु हे सुंदर आणि अतिशय आवडणारे झुंबर झाडावरच बघायला आवडेल. खाण्यासाठी मन धजावणार नाही. >>> + १००००
अमलताश ईतक सुंदर नाव असणार्या फुलांना का चिरावं .

रच्याकने , अमलताश , पलाश - नावं गोड असल्यामुळे ही फुलं जास्त आवडतात की गोड नाव जास्त आवडतात ?? जे काही असेल ते . Happy

his food really helps in digestion >> Lol
Lol..

Jokes.apart .. Thanks 4 introduction to this aspect.

खरंतर स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या फुलांवर एक स्वतंत्र धागा असावा का? की ऑलरेडी आहे इथे? शोधून बघते. >> आहे. मीच काढला होता. लिंक देते

बहावा च्या फुलांची भाजी होते हे नव्यानेच कळले!>>+१
या फुलांची चव आंबटसर असेल तर मी भाजी करायचेही कष्ट घेणार नाही, तशीच खाईन. लहानपणी गुलमोहराची फुले खूप खाल्ली आहेत. त्यातली लाल-पिवळे ठिपके असलेली पांढरी पाकळी जास्त आवडायची.

अरे, याची भाजी करतात आणि ती गुणकारी आहे माहीत नव्हते. मला मिळतील ही फुलं, बघते करून . सोनाली ,आम्ही पण गुलमोहराची फुलं आवडीने खायचो , त्या ठिपकेवल्या पाकळी ला कोंबडा म्हणायचो . ही सिरीज खूप छान चालू आहे. छान माहिती मिळतेय. वरची बुट्टी ,त्यातली फुलं खूप मस्त दिसतायत.

अवांतर:
चिंचेला काय सुरेख मोहोर आलाय सध्या..
फुलं तोडून घरी आणून धुवून खाल्ली... वा! कमाल चव..

गुलमोहराची फुलं खातात हेही ज्ञान मला नव्याने प्राप्त झालं. सोनमोहराची खातात का, त्याचा सडा पडलेला असतो सोसायटीत म्हणून सहज विचारते, मस्करी वगैरे नाही करत.

Pages