झटपट रवा बटाटा ढोकळा

Submitted by मनिम्याऊ on 24 April, 2021 - 11:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रवा १ कप
दही पाऊण कप
बटाटा - १ मोठा
हिरव्या मिरच्या - २
साजूक तूप - १ लहान चमचा
मीठ चवीनुसार
साखर - २ लहान चमचे
इनो/ खायचा सोडा - 1 चमचा.

फोडणीसाठी तेल
मोहोरी - १ लहान चमचा
कढीपत्ता - २ पाने
तीळ - १ लहान चमचा

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम बटाटा सोलून त्याच्या बारीक फोडी करून घ्या. मिक्सरमधे बटाटयाच्या फोडी आणि हिरव्या मिरच्या घालून बारीक करून घ्या. आता यातच दही घालून पुन्हा फिरवून घ्या. लागत असल्यास पाणी घालून सैलसर पेस्ट करा.
एका भांड्यात एक कप रवा घेऊन त्यात हे मिश्रण ओता. परत फेटून घ्या. यात चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घाला. हे मिश्रण इडलीच्या बॅटर इतके पातळ झाले पाहिजे. १० मिनिटे झाकून ठेवा.

१० मिनिटांनंतर

एका मोठ्या पातेल्यात/ कुकरमध्ये पाणी घेऊन उकळी आणायला ठेवा.
ढोकळ्याचे बॅटर आता जरा फुगले असेल. त्यात चमचाभर साजूक तूप घाला (हे ऑप्शनल आहे पण तुपाने छान वेगळाच फ्लेवर येतो.)
इनो घालून त्यावर किंचित (चमचाभर) पाणी घाला आणि एका दिशेने फेटून घ्या.
ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्याला आतून तेलाचा हात लावून घ्या. आणि हे मिश्रण त्यात घाला. आता अजिबात फेटायचे नाही. पातेल्यात/ कुकरमध्ये खाली जाळी / स्टॅन्ड ठेवून त्यावर हे मिश्रणाचे भांडे ठेवा आणि २० मिनिटे वाफवून घ्या. (प्रेशर कुकरमध्ये करत असल्यास शिट्टी काढून ठेवणे).
२० मिनिटे वाफवले की गॅस बंद करून ५-१० मिनिटे तसेच थंड होऊ द्या नंतर बाहेर काढा.

फोडणीसाठी एका लहान कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता, तीळ घालून तडतडून घ्या. गॅस बंद करून १ चमचा साखर घाला आणि ही फोडणी ढोकळ्यावर नीट सगळीकडे सारखी लागेल अशी ओता . आणि खायला घ्या. Happy

IMG_20210424_180521.JPG

वाढणी/प्रमाण: 
३-४ जण
अधिक टिपा: 

शक्यतो बारीक रवा वापरणे

माहितीचा स्रोत: 
कलिग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पाकृ...!! पण बटाटा घालण्यामागील कारण कळले नाही. नेहमीच्या धोकळ्यापेक्षा चवीत नक्कीच फरक पडेल पण ती चव कशी असेल? वेफर्स? टेक्सचर मध्ये बटाट्याने काही फरक पडतो का..? आणि बटाटा कच्चाच सोलून बारीक चिरून मिक्सरला लावायचा का की आधी उकडून घ्यायचा?

धन्यवाद रानभुली, DJ .
बटाटा वापरून चवीत फ़रक पडतोच पण ती चव इथे कशी सांगू? छानच चव येते. बटाटा कच्चाच वापरायचा. नक्की करून बघा. हमखास जमणारी पाककृती आहे. Happy

बटाटा वापरून चवीत फ़रक पडतोच पण ती चव इथे कशी सांगू?
>> ROFL.. खुर्चीतून खाली पडता पडता वाचलो... Happy
मी हा ढोकळा ट्राय करेन आणि बनवताना इडली पात्रात बनवेन.. लहान मुलांसाठी पौष्टिक पदार्थ आहे.. इडली शेप मध्ये खातील देखील...

साहित्य मध्ये इनो राहिलंय टाकायचे, पण त्याला काही पर्याय आहे का?

च्रप्स, इडली आयडिया भारिये, पण त्याला लहान लहान छिद्र असतात तर त्यातून बॅटर खाली पडणार नाही का?

मलापण हे करावेसे वाटतंय म्हणून विचारतेय

साहित्य मध्ये इनो राहिलंय टाकायचे,
thanks. संपादन केलंय.

पण त्याला काही पर्याय आहे का>>
नाही गं. इनो/ खायचा सोडा मस्ट आहे कारण ही झटपट प्रकारातली पाककृति आहे ना.

त्याला लहान लहान छिद्र असतात तर त्यातून बॅटर खाली पडणार नाही का?
>नाही पडणार... इडली पात्राचे डिझाईनच तसे असते की बॅटर खाली नाही पडत...

मस्त पाककृती... ट्राय करून बघावी लागेल. मी नेहमी झटपट बेसन पिठाचेच करतो.
माझ्यामते बटाट्यामुळे ढोकळ्याला एक खरपूस अशा प्रकारची चव येत असावी (जी शक्यतोवर उकडलेल्या कुठल्याच पदार्थाला नसते.)

छान रेसिपी..!!
ढोकळ्याचा फोटो पण छान..
.

पाकृ, फोटो दोन्ही छान.
ढोकळा आवडतो पण बटाटा घालून ...
चवट्युब Lol , खरच हवं होतं.
बाकीच्यांनी करून कसा लागतो इथे सांगा नक्की.