भाऊबंदकी
अब्राहमच्या महानिर्वाणानंतर ( अब्राहम एक प्रेषित होते , या वस्तुस्थितीला अनुसरून त्यांच्या मृत्यूला महानिर्वाण असं संबोधनच उचित ठरेल ) पुढच्या काळात घडलेल्या अनेक घटना या प्रदेशाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. याआधी पाहिल्याप्रमाणे अब्राहमच्या तीन पत्नींपासून जन्माला आलेली आठ मुलं - ज्यांच्यातली इश्माएल आणि आयझॅक ही महत्वाची - आपापल्या कबिल्यांद्वारे भूमध्य समुद्र, लाल समुद्र ते थेट आत्ताच्या सौदी अरेबियाच्या इराण सीमेपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार करत गेली। तेव्हाच्या समाजपद्धतीनुसार प्रत्येकाची आपापली टोळी होती. ईश्वराने अब्राहमला दिलेल्या आशिर्वादाप्रमाणे त्या प्रदेशाची सत्ता अब्राहमच्याच वंशजांकडे होती.
इश्माएल आणि हेगर यांना जेव्हा अब्राहमने बीरशेबाला निघून जायला सांगितलं, तेव्हा प्रत्यक्ष यहोवा देवतेनेच अब्राहमचा ' उत्तराधिकारी ' म्हणून थोरल्या इश्माएलला नव्हे, तर धाकल्या आयझॅकला निवडलेलं होतं. या आयझॅकची बायको रेबेका ही मेसोपोटेमिया भागातल्या अरामीयान या सेमेटिक वंशात जन्मलेल्या बेथूएल नावाच्या मनुष्याची मुलगी होती.
आयझॅक ही बायबल आणि तोरा या दोन्ही ग्रंथांमध्ये उल्लेख असलेली एक विलक्षण व्यक्ती. आपल्या ऐन तारुण्यातच आपल्या वडिलांकडून बळी जाण्याच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन आल्यामुळे आयझॅकला जवळ जवळ पुनर्जन्मच मिळालेला होता. त्या घटनेनंतर यहोवाने कधीही अब्राहमशी थेट संवाद साधला नाही, आणि सारानेही मरेपर्यंत अब्राहमबद्दल मनात अढी ठेवली. या घटनेमुळे असेल कदाचित, पण आयझॅक हा शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवणारा म्हणून बायबल आणि तोरामध्ये ओळखला जातो. या आयझॅक आणि अब्राहमच्या आयुष्यात अनेक घटना जवळ जवळ सारख्याच पद्धतीने घडल्या आहेत, हाही एक विलक्षण योगायोग.
साराप्रमाणेच रेबेका ही आयझॅकची बायकोसुद्धा अतिशय सुंदर होती. अब्राहमऐवजी यहोवा त्या बळीच्या घटनेनंतर आता आयझॅकबरोबर थेट संवाद साधत असल्यामुळे एका अर्थाने तो अब्राहमनंतरचा प्रेषित ठरतो. हा आयझॅक अब्राहमच्या मृत्यूनंतर रेबेकाबरोबर बीर-लहाई-रोई नावाच्या फिलीस्तीनच्या सीमेपासून जवळच्या प्रांतात गेला आणि राहू लागला. तिथे पडलेल्या दुष्काळामुळे त्याला तिथून आपलं बस्तान हलवावं लागलं आणि मजल दरमजल करत तो फिलीस्तीनी प्रांतापर्यंत गेला, परंतु यहोवाने त्याला पुढे इजिप्तमध्ये जाण्यापासून थांबवलं अशी कथा आहे. या फिलीस्तीनी प्रांताचा राजा अजूनही अबिमेलेच हाच होता. एकदा आपल्या महालाच्या बाहेरच्या उद्यानात बघत असताना त्याला तिथे रमलेले आयझॅक आणि रेबेका दृष्टीस पडले. योगायोग असा, की साराप्रमाणे त्याला रेबेकासुद्धा आवडून गेली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आयझॅकनेही रेबेका आपली बहीण असल्याची बतावणी केली. बाप-बेट्याच्या आयुष्यात आलेले हे प्रसंग इतके सारखे आहेत, की त्यामागे काही दैवी योजना असावी, अशी शंका सतत येत राहते.
आपल्या वडिलांनी खोदलेल्या विहिरी त्यांच्या मृत्यूनंतर फिलीस्तीनी टोळ्यांनी बजावलेल्या बघून त्याने पुन्हा त्या विहिरी खोदून त्यांची डागडुजी केली आणि यथावकाश त्याने पाण्याच्या विहिरींच्या व्यवसायात शिरकाव केला. अबिमेलेचबरोबर वाटेत अधिकाधिक विहिरी खोदण्याचा करार करून त्याने आपल्या वडिलांप्रमाणेच बीरशेबाच्या दिशेने प्रयाण केलं. पुढची अनेक वर्ष त्याने रेबेकाबरोबर या बीरशेबामध्ये घालवली.
यथावकाश वयपरत्वे आयझॅकच्या डोळ्यांना कसलातरी आजार होऊन तो पूर्ण अंध झाला होतं, असा उल्लेख बायबलमध्ये आढळतो. अब्राहमच्या या वारसदाराच्या आयुष्यात एकच पत्नी असल्यामुळे जरी गृहकलह झालेला नसला, तरी त्याला अनेक वर्षांनी ईश्वराच्या कृपेने ( पुन्हा येथे अब्राहम आणि जेकबच्या आयुष्यात साधर्म्य आढळून येतं ) इसाऊ आणि जेकब ( लॅटिन उच्चार येकब ) ही दोन जुळी मुलं झाली आणि माशी शिंकली.
रेबेकाचा काही मिनिटांच्या अंतराने जन्माला आलेल्या धाकल्या जेकबवर विशेष जीव होता , तर आयझॅकचा थोरल्या इसाऊवर. याच इसाऊने इश्माएलच्या महालात नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं. बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे लाल केसांचा, मजबूत बांध्याचा , निष्णात शिकारी असलेला हा इसाऊ रांगडा गडी होता. एकदा भुकेलेल्या अवस्थेत तो आपल्या भावाकडे आला आणि अन्नाची मागणी करू लागला, तेव्हा जेकबने अन्नाच्या बदल्यात त्याच्याकडून आयझॅकच्या उत्तराधिकाराचे हक्क आपल्या नावावर करून घेतले. अडीअडचणीच्या वेळी आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घ्यायचे प्रकार तेव्हासुद्धा हे असे होत असत.
झाल्या प्रकारानंतर आयझॅकच्या कोपाच्या भीतीने रेबेकाने या नव्या उत्तराधिकाऱ्याला - जेकबला - आपल्या आजोळी मेसोपोटेमियामध्ये जाण्यास फर्मावले. रेबेकाच्या भावाच्या घरातली मुलगी बायको म्हणून जेकबने स्वीकारावी , जेणेकरून दोन्ही बाजूने पुढच्या पिढ्या आपल्याच 'वंशाच्या' जन्माला येतील असा त्यामागचा तिचा मुख्य हेतू होता. त्याप्रमाणे जेकब जवळ जवळ वीस वर्ष आपल्या मामाकडे - लबानकडे राहिला आणि त्याच्या मुलीशी - लियाशी त्याने लग्नही केलं. अर्थात आपल्या वडिलांप्रमाणे एका लग्नापर्यंत न थांबता त्याने लियाच्याच लहान बहिणीशी - रेचेलशीसुद्धा लग्न केलं. या दोन बायकांव्यतिरिक्त जेकबने दोन अंगवस्त्र बाळगलेली होती - एक होती बिल्हा, जी रेचेलची मदतनीस होती आणि दुसरी होती झिलपा,जी एक गुलाम स्त्री असून लियाची मदतनीस होती. या चौघींकडून जेकबला एकूण बारा अपत्यांची प्राप्ती झाली.
गृहकलह कदाचित अब्राहमच्या घराण्याला मिळालेला शाप असावा , कारण जेकबच्या दोन बायकांमध्ये नेमकी धाकली रेचेल त्याची आवडती होती आणि थोरली लिया नावडती. नशिबाने लिया स्वभावाने करारी नसल्यामुळे घरात तंटेबखेडे झाले नाहीत. ही लिया दिसायला साधारण होती, पण तिची लहान बहीण रेचेल मात्र अतिशय सुरेख असल्यामुळे जेकबला ती आवडत होती. आधी सियाच्या लग्नाच्या वेळी सात वर्ष आपल्या मामा आणि सासऱ्याकडे राबण्याचं वचन दिलेलं असूनही अजून सात वर्ष पडेल ते काम करण्याच्या वचनावर त्याने आपल्या मामाकडून या मामेबहिणीचा हात मागून घेतला अशी कथा बायबलमध्ये वाचायला मिळते , ज्यावरून जेकबला ती किती आवडलेली होती हे स्पष्ट होतं.
जेकबला लियापासून एकूण चार अपत्य झाली . त्यानंतर रेचेलने एका विशिष्ट 'मँड्रेक' नावाच्या औषधी वनस्पतीच्या मुळ्या लियापासून मिळवण्याच्या ' मोबदल्यात ' तिला नवऱ्याबरोबर एका रात्रीपुरता वेळ घालवायची ' मुभा ' दिली, ज्यानंतर तिने अजून दोन मुलांना जन्म दिला . या घटनेवरून जेकब रेचेलच्या किती मुठीत होता हे दिसून येतं.खुद्द रेचेलपासून मात्र जेकबला दोनच मुलांची प्राप्ती झाली - थोरला जोसेफ आणि धाकटा बेंजामिन . जिथे थोरल्या लग्नाच्या बायकोचं - जी रेचेलचीच सक्खी मोठी बहीण सुद्धा होती - रेचेलसमोर काही चाललं नाही, तिथे झिलपा आणि बिल्हा यांचं काय चालणार? त्यांच्याकडून जेकबला प्रत्येकी दोन अपत्य झाली , इतकीच काय ती त्यांची कामगिरी.
अर्थातच जोसेफ हा जेकबचा उत्तराधिकारी होणार हे आता निश्चित होतं. या जोसेफच्या जन्मानंतर जेकबने आपल्या कुटुंबासहित पुन्हा आपल्या स्वगृही परतायचा निर्णय घेतला . लबानला हा निर्णय मुळीच रुचला नाही .शेवटी जेकब हा खुद्द प्रेषिताचा वंशज होता, त्यामुळे त्याच्या पावलांनी लबानच्या घरात भरभराट आलेली होती . शिवाय आपल्या मुलीशी लग्न करून द्यायच्या बदल्यात त्याने जेकबकडून स्वतःची कामं करून घेतलेलीच होती . त्याने जेकबला ' कनानला न परतण्याच्या ' मोबदल्यात अपेक्षित असलेली किंमत विचारली .
सरतेशेवटी आपल्या बायको - पोरांसकट जेकबने आपल्या सासऱ्याच्या कचाट्यातून पलायन केलं . त्याच्या सासऱ्याकडे घरात एका देवतेची मूर्ती होती . आपल्याकडे घराच्या गृहदेवता असतात, तसाच हा काहीसा प्रकार . या देवतेचं नाव होतं तेराफीम . रेचेलने आपल्याबरोबर ती मूर्ती पळवून आणली . जेकबला या सगळ्याची काहीही कल्पना नव्हती .
आपल्या मुली आणि देवतेची मूर्ती पळवून हा आपला जावई कनानच्या भूमीकडे निघाल्याची वार्ता समजताच लबान खवळला आणि त्याने त्यांचा पाठलाग सुरु केला . शेवटी देवदूतांनी मध्यस्थी केली आणि लबानला जेकबला इजा पोचवण्यापासून परावृत्त केलं . शेवटी झालं गेलं विसरून जाऊन त्याने आपल्या जावयाकडे आपल्या देवतेच्या मूर्तीची मागणी केली . जेकबला त्याची काहीच कल्पना नसल्यामुळे त्याने कानावर हात ठेवला आणि खात्रीसाठी लबानला आपल्या त्या तांड्यातल्या कोणाचीही झडती घेण्याची मुभा दिली . रेचेलने एकूणच रागरंग पाहून त्या मूर्तीवर बैठक मारली आणि ' आपली मासिक पाळी आल्यामुळे ' आपण उठू शकत नसल्याचा कांगावा केला . अखेर सासरा आणि जावई आपापसातली भांडणं तिथेच स्वाहा करून आपापल्या मार्गी चालू लागले.
कनान प्रांताच्या वेशीजवळ आल्यावर जेकबने इसाऊकडे आपण येतं असल्याचा निरोप पाठवला . इसाऊ आपल्या ४०० माणसांबरोबर ' स्वागताला ' येतं असल्याचं कळताच जेकब सावध झाला. काही बरंवाईट घडलंच तर आपल्या कुटुंबाची रक्षा व्हावी या हेतूने त्याने रातोरात आपल्या सगळ्या कुटुंबियांना जबॉकच्या भागात नेऊन सुरक्षित केलं आणि स्वतः पुन्हा वेशीपाशी परतला. इथे त्याच्या स्वागताला एक ' गूढ ' व्यक्ती हजर होती. जेकब आणि त्या व्यक्तीमध्ये पाहात फुटेपर्यंत झटपट सुरु होती. दोघांनी एकमेकांशी तुल्यबळ लढत दिली. या मल्लयुद्धात कोणाचीच सरशी झाली नसली, तरी त्या व्यक्तीने आपल्या गुढघ्याने जेकबच्या मांडीवर केलेल्या प्रहारामुळे जेकबच्या पायात व्यंग निर्माण होऊन तो आयुष्यभर एका पायाने लंगडत चालला, अशी दंतकथा आहे . आजही ज्यू लोक या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ कोणत्याही प्राण्याच्या 'सिन्यू' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कूर्चांचं / स्नायूंचं आपल्या आहारात सेवन करत नाहीत .
ही गूढ व्यक्ती म्हणजे चक्क ईश्वराने पाठवलेला देवदूत होता, हे नंतर जेकबला समजलं. इतका दीर्घ काळ चाललेल्या मल्लयुद्धानंतरही जेकबला आपण हरवू शकलो नाही, म्हणून त्या देवदूतांने प्रसन्न होऊन जेकबला आशीर्वाद दिला. त्या क्षणापासून जेकबच नाव ' इस्राएल' झालं, ज्याचा अर्थ ' प्रत्यक्ष देवाबरोबर झटापटीत पराभूत न होऊ शकलेला' असा होतो. अनेक अभ्यासकांच्या मते हा देवदूत कदाचित इसाऊच्या बाजूच्या देवदूतांपैकी असावा आणि जेकबला पराभूत न करू शकल्यामुळे तो त्याच्यावर प्रसन्न झाला असावा. या देवदूताने आपलं नाव सांगण्यास स्पष्ट नकार दिला असल्यामुळे त्याची ओळख काही जेकबलाही पटू शकली नाही.
आता जेकबने आपल्या कुटुंबासह कनानच्या दिशेला चालायला सुरुवात केली. इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे, की झिलपा,बिल्हा आणि त्यांच्यापासून झालेली मुलं सगळ्यात पुढे, त्यानंतर लिया आणि तिच्यापासून झालेली मुलं आणि सगळ्यात मागे तो स्वतः, रेचेल आणि त्यांची दोन्ही मुलं अशा पद्धतीने जेकबने आपल्या तांड्याची रचना केलेली होती, ज्यावरून रेचेल आणि तिच्यापासून झालेली दोन्ही मुलं त्याला किती जवळची होती हे स्पष्ट होतं. परंतु त्याला ज्या गोष्टीची भीती होती, ते काही झालं नाही.इसाऊ आणि त्याची भेट अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. जेकबकडून मिळालेल्या उंट, मेंढ्या आणि इतर जनावरांच्या भेटीने इसाऊ सुखावला. दोन्ही भाऊ कडकडून भेटले .
इसाऊने जेकबला कनानला सोबत घेऊन जायचा प्रस्ताव दिला, परंतु जेकबने आपली मुलं लहान असल्याचं कारण देऊन कनानऐवजी सीर नावाच्या टेकड्यांच्या भागात जायची इच्छा व्यक्त केली. तो पुढे सीर येथे ना जाता सुकूथ येथे गेला आणि तिथून पुढे शेचेम येथे आला. तिथल्या राजाने जेकबच्या एकुलत्या एका मुलीला - दीना हिला पळवून नेलं, तिच्यावर जबरदस्ती केली आणि नंतर तिच्याशी लग्न करण्याची इच्छासुद्धा बोलून दाखवली. ही दीना म्हणजे लियाकडून जेकबला झालेली मुलगी . दिनाच्या दोन सक्ख्या भावांनी - शिमोन आणि लेवाय यांनी जेकबच्या वतीने परस्पर या लग्नाला संमती दिली ती एका अटीवर - त्या राजसकट राज्यातल्या सगळ्यांनी आपला सुंता करून घ्यावा. त्याप्रमाणे सुंता झाल्यावरच्या तिसऱ्या दिवशी आपल्या जखमांमुळे कावलेल्या आणि बेसावध अवस्थेत असलेल्या सगळ्यांचं या दोन भावांनी शिरकाण केलं आणि आपल्या बहिणीला सोडवून आणलं. त्याचबरोबर त्यांच्या इतर भावांनी एकत्र येऊन शेचेम प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केली.
जेकबला हे सगळं समजल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या प्रकाराने आपल्या मुलांनी आपल्याला शरमेने मान खाली घालायला लावलेली आहे, असे त्याने उघड उघड बोलून दाखवले. कदाचित नावडतीची मुलं आहेत म्हणून असेल, पण त्याने त्यांना कधीही माफ केलं नाही.
या घटनेनंतर जेकब आपल्या कुटुंबासह बेथेल या जागी आला. याच ठिकाणी त्याच्या आईला - रेबेकाला दफन केलं गेलं होतं. काही दिवसांनी तिथून त्याने बेथलेहेमला प्रयाण केलं. या प्रवासाच्या वेळी रेचेल गर्भवती होती. तिने बेथलेहेमच्या वेशीजवळच आपापल्या दुसऱ्या मुलाला - बेंजामीनला जन्म दिला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. आजही बेथलेहेम शहराकच्या वेशीबाहेर रेचेलला दफन केली ती जागा आहे.
सरतेशेवटी मेमरे या जागी जेकब आणि आयझॅकची भेट घडली. अनेक वर्षांनी बापबेटे एकमेकांना कडकडून भेटले. याच जागी दोन्ही भाऊसुद्धा नंतर भेटले , पण ते आपल्या पित्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी. वयाच्या १८० व्या वर्षी आयझॅकच्या देहाचं अब्राहाम आणि साराच्या जवळच ' केव्ह ऑफ द पॅट्रीआर्च ' मध्ये दफन करताना दोघे भाऊ तिथे एकत्र हजर होते.
जेकब आपल्या मामाच्या घरी पळून गेला असता इसाऊचं दोन कानानाईट मुलींशी वयाच्या चाळीसाव्या वर्षी लग्न झालं. एक होती ज्युडिथ आणि दुसरी बसमथ.त्यांच्या व्यतिरिक्त इश्माएलच्या मुलीशी - महालतशीही त्याने लग्न केलं होतं. या तीन पत्नींकडून त्याला पाच मुलं झाली.
पित्याच्या दफनानंतर जेकब आपल्या कुटुंबासह हेब्रॉन येथे राहू लागला. या ठिकाणी त्याच्या कुटुंबाच्या भाऊबंदकीचा एक वाईट अध्याय लिहिला गेला. जेकबचा ओढा जोसेफकडे इतर मुलांपेक्षा जास्त होता, हे त्या सगळ्यांना डोळ्यात खुपत होतंच. त्यात जेकबने फक्त जोसेफसाठी एक सुरेख रंगीत कोट तयार करून त्याला दिला.तशात जोसेफ आपलं सगळं कुटुंब आपल्यासमोर नतमस्तक होणार, अशा प्रकारची स्वप्न आपल्याला पडत असल्याचं सगळ्यांना सांगायला लागला. जेकबनेही बाकीच्या सगळ्या मुलांनी तक्रार करूनही आपल्या या लाडक्या जोसेफचीच तळी उचलली.
आता मात्र बाकीच्या सगळ्या भावंडांना आपल्या या भावाचा काटा काढणं महत्वाचं वाटू लागलं. आपल्या शेळ्या-मेंढ्यांना डोंगरावरच्या कुरणात चरायला नेलं असताना त्यांनी जोसेफला मेंढ्या नीट आहेत की नाही, हे बघायच्या निमित्ताने पायथ्याशी पाठवलं आणि तेथे त्याला बेसावध पकडून इजिप्तच्या दिशेने निघालेल्या एका तांड्याच्या प्रमुखाकडे गुलाम म्हणून विकून टाकलं. त्याच्या त्या कोटावर खोटे रक्ताचे डाग लावून त्यांनी जेकबला जोसेफ जंगली जनावराच्या हल्ल्यात मृत्यू पावल्याची खोटी बातमी दिली, जेकबला याचा जबरदस्त धक्का बसला.
इंटरेस्टिंग !
इंटरेस्टिंग !