ऑस्कर गरेरो हा मूळचा कोलंबिया देशाचा मुक्त पत्रकार, पण आपल्या देशातल्या अनागोंदीला कंटाळून तो ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीला निघून आला आणि ' सिडनी मॉर्निंग हेराल्ड ' या प्रतिष्ठित वर्तमानपत्रासाठी काम करायला लागला. त्याने आपल्या संपादकांना ही सगळी खळबळजनक माहिती सांगितली. ऑस्ट्रेलियामधल्या सध्या टॅक्सीचालकाकडे अशी स्फोटक माहिती असेल, यावर अर्थात संपादक महाशयांचा विश्वास बसणं अशक्य होतं. त्यांची ही चूक त्यांना चांगलीच महागात पडली, कारण ऑस्करने थेट ब्रिटन गाठून तिथल्या ' संडे टाइम्स ' ला ही बातमी पुरवली. त्यांनी सुरुवातीला या बातमीत किती दम आहे, हे तपासण्यासाठी सावध पवित्र घेतला आणि आपला एक प्रतिनिधी सिडनीला पाठवायचा निर्णय घेतला.
पीटर हौनाम - संडे टाइम्सचा एक महत्वाचा संपादक - लंडनहून थेट सिडनीला आला, तो थेट वानूनूला भेटला. ऑस्कर बरोबर होताच....पुढचे दोन आठवडे या पीटरने वानूनूकडचे सगळे दस्ताऐवज डोळ्यांखालून घातले. एक एक छायाचित्र नीट तपासलं. वानूनूने पुरवलेल्या माहितीमध्ये किती सत्य आहे हे या सगळ्या ऐवजांशी पडताळून बघितल्यावर पीटर नखशिखांत हादरला. एका पत्रकाराने केलेला अमेरिकेच्या ' वॉटरगेट ' प्रकरणानंतरचा हा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट ठरणार होता.
या सगळ्याची कुणकुण मोसादसारख्या चोवीस तास दक्ष असणाऱ्या गुप्तचर संस्थेला न लागणं अशक्यच होतं...त्यांच्या खास हस्तकांकडून संडे टाइम्स त्यांच्या अणुकार्यक्रमाबद्दल जगासमोर अनेक नव्या गोष्टी उघड करणार आहे हे त्यांना समजलेलं होतं. पंतप्रधान शिमोन पेरेझ आपल्या कार्यालयात आपल्या आतल्या वर्तुळातल्या मोजक्या लोकांबरोबर बसलेले होते. काहीही करून आपल्या या घरभेद्याला जगासमोर येण्याआधी संपवायचं हा या बैठकीचा उद्देश होता. बराच काळ चर्चा चालली. त्यात अनेक महत्वाचे मुद्दे निघाले. जर आपल्या हस्तकांतर्फे वानूनूचा काटा काढला, तर जगासमोर आपली नाचक्की होईल आणि वानूनूच्या सगळ्या बोलण्यात तथ्य होतं हेही जगाला कळेल ही भीती होतीच...त्याचं हस्तांतरण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे रीतसर अर्ज केला तरीही एका साध्या टॅक्सीचालकासाठी इस्राएलचं हे वागणं कोणालाही खटकू शकत होतं...संडे टाइम्समुळे आता ब्रिटनसाठी वानूनू एक अतिमहत्वाची व्यक्ती झालेली होती, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतीही कृती करताना बराच विचार करणं इस्राएलसाठी गरजेचं झालं होतं. एक असाही विचार पुढे आला, की वानूनू जी माहिती जगापुढे आणणार आहे ती येऊ द्यावी, जेणेकरून आपोआप इस्राएलचं सामर्थ्य जगाला कळेल...पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे इस्राएलला अण्वस्त्रबंदी करारावर सह्या करणं टाळता येणार नव्हतं....
या सगळ्या पार्श्वभूमीवर पेरेझ यांनी पाचारण केलं मोसादप्रमुख नाहुम अडमोनी यांना. ऐचमन यांच्याप्रमाणे वानूनू यालाही येनकेनप्रकारेण इस्राएलला परत आणावं यासाठी मोसादने आता हे प्रकरण हाती घ्यावं अशी त्यांनी अडमोनी यांना विनंती केली. ही सुरुवात होती ' ऑपरेशन वानूनू ' ची. तिथे ऑस्ट्रेलियामध्ये पीटर हौनाम यांनी त्वरेने हालचाली सुरु केल्या होत्या. त्यांना त्यांच्या मनाला विश्वसनीय वाटणाऱ्या छायाचित्रांना एखाद्या तज्ज्ञ अणु - भौतिक शास्त्रज्ञाकडून बारकाईने तपासून घ्यायच्या होत्या. हा विषयच इतका गुंतागुंतीचा होता की याची सखोल शहानिशा होणं अत्यावश्यक होतं. वानूनू आता ब्रिटिश सरकारच्या संरक्षणात होता. त्यांनी त्याला सतत वेगवेगळ्या हॉटेल, अपार्टमेंट किंवा घरांमध्ये ठेवायला सुरुवात केली....उद्देश हाच, की मोसाद त्याच्यापर्यंत पोचू नये. मोसादच्या कार्यशैलीचा दराराच तसा होता....
संडे टाइम्सने आपल्या बाजूने सगळ्या छायाचित्रांची सखोल शहानिशा करून घेतली. तोवर पीटर हौनाम यांनी आपल्या पत्रकारांच्या फौजेला कामाला लावून अतिशय बारकाईने या माहितीला शब्दबद्ध करून घेतलं. अनेक कच्चे खर्डे तयार करून शेवटी त्यांनी ' अंतिम खर्डा ' आकाराला आणला. संडे टाइम्ससाठी ही बातमी त्यांच्या पत्रकारितेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी बातमी ठरणार होती. त्यांनी बातमी जाहीर करण्याच्या ठरलेल्या तारखेआधी या बातमीचा सात-आठ पानी सारांश मुद्दाम इस्राएलच्या वकिलातीकडे पाठवला....उद्देश हाच की त्यांच्याकडून या सगळ्यावर नक्की काय उत्तर येतंय हे बघावं. त्यांनी जर या बातमीची सत्यता स्वीकारली असती, तर संडे टाइम्ससाठी हा गौप्यस्फोट ऐतिहासिक ठरला असता आणि जर त्यांनी त्याचा ठाम विरोध केला असता तर त्यांच्या बातमीला जबरदस्त उपद्रवमूल्य मिळालं असतं....उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक असा यामागचा साधा सरळ विचार होता.
पूतित्झर पुरस्कार विजेते विख्यात शोधपत्रकार सेमूर हर्ष यांनीही या प्रकरणावर विस्तृत लिखाण केलं आहे. त्यांच्या मते इस्राएलसाठी या प्रकरणातले सगळ्यात मोठी डोकेदुखी त्यांचा अण्वस्त्र प्रकल्प जगासमोर येणार इतकीच नव्हती.... या प्रकरणाच्या अधिक सखोल चौकशीतून त्यांनी तेव्हाच्या दक्षिण आफ्रिकन सरकारशी गुप्तपणे शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याचा जो करार केला होता, तो जगासमोर उघड व्हायची त्यांना खरी धास्ती होती. एक तर तेव्हाचं दक्षिण आफ्रिकन सरकार वर्णद्वेषी धोरणांमुळे जगाने बहिष्कृत केलेलं...कोणीही या सरकारशी कसलेही संबंध ठेवले तर त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्भत्सना होणार हे नक्की होतं...तशात हे काम इस्राएलसारख्या देशाने केलं असल्यामुळे ते प्रकार उघड झाल्यावर त्याचा बागुलबुवा उभा करून आजूबाजूचे अरब देश इस्राएलला हैराण करून सोडणार आणि मध्यपूर्वेत पुन्हा एकदा वातावरण तापणार हे ओळखायला पेरेझ यांना वेळ लागला नाही.
इस्राएलचं राजकारण हे असं होतं...ज्यू लोक पक्के व्यापारी होते ते असे. आपल्या देशाच्या डोक्यावर अण्वस्त्रनिर्मितीचा भार आल्यावर तो हलका करण्यासाठी जगणे निषिद्ध केलेल्या देशाशी आतून संधान बांधून त्यांना शस्त्रास्त्रविक्री करणं त्यांना जराही चुकीचं वाटत नव्हतं. काही वर्षांपूर्वी इस्राएलला ' छोटा सैतान ' म्हणणाऱ्या अयातोल्ला खोमेनींच्या इराणलाही त्यांनी शस्त्रं विकली होतीच....सेमूर हर्ष यांनी या सगळ्या प्रकरणावर बराच काळ प्रदीर्घ लिखाण केलं.
मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ११
Submitted by Theurbannomad on 9 February, 2021 - 08:46
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचतेय
वाचतेय
छान सुरू आहे ही लेखमालिका.
छान सुरू आहे ही लेखमालिका.
पु भा प्र
वाचतोय, पुभाप्र
वाचतोय, पुभाप्र