१२७०, सदाशिव पेठ, पुणे.

Submitted by विक्रमसिंह on 26 August, 2009 - 12:33

सदाशिव पेठ, पुणे. हे उच्चारले, की सगळीकडे प्रतिक्रिया ठराविक. सदाशिव पेठी, पुणेरी , वगैरे.

माझा मात्र अनुभव एकदम या प्रस्थापित कल्पनेस छेदणारा. १२७०, सदाशिव पेठ, पुणे, येथील. अगदी खरा. जन्मभर जपून ठेवावा , मनात घर करून राहिलेला असा. कुठेतरी त्याची कृतज्ञता व्यक्त करायचीच होती. म्हणूनच खरा पत्ता शीर्षक म्हणून दिलाय.

तसा मी सदाशिव पेठेत उपराच. झाले काय, मी असेन १२ वर्षाचा. माझी बहिण १० वर्षाची. आई बाबा नोकरी निमित्त खेड्यात रहायचे. पुण्याजवळच. पण माझ्या भाषेची शिवराळ प्रगति बघून बाबांनी चांगला पण धाडसी निर्णय घेतला. मुलांना शिकायला पुण्यात ठेवायचे.

योगायोगाने १२७०, सदाशिव पेठ, येथे विद्यार्थांसाठी खोल्या आहेत असे कळले. आई बाबांनी चौकशी केली, मंडळी ओळखीची निघाली. माणसे चांगली वाटली , मालकांनी लक्ष ठेवायचे कबूल केले आणि आम्ही, म्हणजे मी आणि माझी छोटी बहिण, वैजू , तेथे रहायला आलो. आई बाबा दर आठवड्याला यायचेच भेटायला.

वाडा तसा नेहमी सारखाच. तीन मजली. १०-१२ कुटुंबे रहायची. शिवाय मालक, ४ भाउ आणि त्यांची कुटुंबे. भाडेकरूंना एक एक खोली. त्याच्यातच मोरी. मालकांना प्रत्येकी दोन खोल्या. मालक आणि भाडेकरू मध्ये येवढाच फरक. सगळ्यांची आर्थिक परिस्थिती जवळपास सारखीच. सगळे पगारदार. काटकसरीने जगणारे. वाड्यातील मंडळींचे खोलीसाठीचे मोजमाप ही मजेशीर होते. किती माणस झोपू शकतील? हे त्यांचे मोजमाप.

मोठे मालक म्हणजे बापूकाका. तेच सगळ बघायचे. त्यांचा थोडा वचक ही होता. पण आम्हा मुलांना उगाचच कधी रागवायचे नाहीत. त्यांची एक बुलेट होती. बाकी सगळ्यांच्या सायकली. आम्हाला खेळायला मिळावे म्हणून ते बुलेट सुद्धा बाहेरच ठेवत असत. त्यांचा नियम एकच. अंधार पडल्यावर क्रिकेट खेळायचे नाही.

आम्ही दोघे लहान. इतके की आम्हाला दाराला कडी व कुलुप लावायलाही खूप कसरत करायला लागायची. गॅलरीच्या कठड्यावर चढून वगैरे. हे बघून पहिल्याच दिवशी शेजारच्या वहिनी धावत आल्या. मला रागवल्या. अगदी तेंव्हापासून आख्या वाड्याने आमचे पालकत्व घेतले होते. ते अगदी चार वर्षानी वाडा सोडी पर्यंत. वैजूला तिची वेणी पण घालता यायची नाही, ते काम मालकीण बाईंचे. आईने तशी सुरवातीला प्रेमळ अटच घातली होती.

सगळ्या मोठ्या माणसांना आमचे भारी कौतूक. सारख त्यांच्या मुलांना ऐकवायचे. बघा दोघ किती लहान , पण शहाण्या सारख रहातात की नाही. आमच मित्रमंडळ मात्र जाम वैतागायचे, सारख सारख ऐकून.

समोरच्या पाटणकर खाणावळीतला डबा यायचा. पण तो नावालाच. आम्हाला दोघांना तो अजिबात आवडायचा नाही. पण का कोण जाणे वाड्यातल्या इतर मित्रमैत्रिणींना त्यातल्या भाज्या खूप आवडायच्या. मग काय, त्यांच्या आयांचा स्वयंपाक आमच्या ताटात आणि आमचा डबा त्यांच्या ताटात. वाड्यात अगदी वासावरून सुद्धा कुणाच्या घरी काय शिजतय हे कळायचे. अगदी लहानपणी गावाला असताना सगळी आळी आपले घर वाटायचे. पुण्याला एका वाड्यातच अख्खी आळी सामावलेली होती. सगळी कडे मुक्त प्रवेश. अगदी कधिही. मोठ्या सणांसाठी आम्ही आमच्या घरी जायचो. इतर वेळी आमचे सगळे सण १० घरी व्हायचे.

आमचा अभ्यास, दुखणी खुपणी, भांडणे हे सगळ वाड्याने संभाळल. थोडी सर्दी वा खोकला झाला तर संध्याकाळी घरगुती औषधे हजर. परिक्षेच्या आधी सगळ्यांचे रेडिओ बंद. शाळेच्या ट्रीपला जायचे तर उजूची किंवा चंदूची आई डबा देणार. ऐन वेळेला कोणी तरी तुटलेली बटण लावून देणार्, कोणी उसवलेली शिवण शिवणार तर कोणी सकाळच्या शाळेला उशीर होतोय म्हणून पाणि तापवून देणार, वहिनी आम्ही झोपून गेल्यावर तसाच पेटत राहिलेला स्टो बंद करणार आणि शिवाय जळलेले दुधाचे भांडे धुवून ठेवून आम्हाला पांघरूण घालून जाणार. एक ना अनेक. असंख्य छोट्या छोटया गोष्टी. आईची आठवण आली म्हणून कधी रडावेच लागले नाही. सगळ्या माउल्या आमच्यासाठी सदैव हजर.

आज सुद्धा त्या माउल्या आपल्या मुलीसारख आमच्या हिला वागवतात, माझ्या मुलांना आपल्या नातवासारखे जवळ घेतात. त्यांच्या यशाचे पेढे घेताना तेच अनेक वर्षांपूर्वी माझ्या इंजिनियर झाल्याचे पेढे घेताना दिसलेले कौतूक त्यांच्या डोळ्यात मला पुनः दिसत.

वैजू खूप वर्षानी नुकतीच वाड्यात जाउन आली. तिच्या मुलीने आमच्या तोंडून इतक्या वेळेला ऐकल होत की तिला प्रत्यक्ष पहायच होत. म्हणाली, पाच मिनिटात जाऊ म्हणून गेले आणि चार तास सुधीर कडे बसले. सगळे जण भेटायला आले होते.

माझे मित्र मोठे झालेत. वहिनी देवाघरी गेल्या. माझ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या. वाडा जाउन सदनिका आल्या. सायकली जाउन गाड्या आल्या. पण आनंद यात आहे, वाड्यातली आपुलकी गेली नाही. जाणार कशी.

आम्ही लहान होतो म्हणून आम्हाला चांगली वागणूक मिळाली का? मला नाही असे वाटत. आमच्या शेजारच्या खोलीत दोन सी.ए.करणारे होते.एम्.के. आणि पाटिलबुवा. सगळे त्यांना तसेच म्हणायचे. त्यांना पण तशीच वागणूक. ती सगळी माणसच चांगली होती.

वाडयातल्या वास्तव्याने एक गोष्ट मात्र माझ्या मनावर बिंबली आहे. सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी. या माझ्या विश्वासाला अजूनही कधी तडा गेला नाही, ही वाड्याची पुण्याई.

तो वाडाच तसा होता. अगदी ``१२७०, सदाशिव पेठ, पुणें,`` असून सुध्धा.

गुलमोहर: 

धन्यवाद मित्रमंडळींनो, लेख आवडल्याच्या आपल्या प्रतिक्रियांबद्दल पुनः एकदा धन्यवाद.
माझ्याही खूप छान आठवणी जाग्या झाल्या. अनेक मंडळी पुनः भेटली डोळ्यासमोर. Happy

मला खरच सगळीकडे चांगले शेजारी मिळाले. त्यांच्या बद्दल लिहायला पाहिजे. बघु कसे जमतय.

किती सुंदर लेख आहे हा!
लहानपणी आईवडीलांपासून दूर राहणार्‍या मुलांना मायेने बघणं, त्यांचं सगळं करणं अगदी प्रशंसनीय आहे.>>>>> +++१११ तुम्ही आणि बहीण धीराने एकटे राहिलात त्याबद्दल तुमचे आणी आईवडीलांचेही कौतुक. आमच्या १४ वर्षीय ला २-३ तास एकटे सोडून गेलो तरी तेवढ्यात किमान २ वेळा फोन होतात.

पुण्याबद्दल आणि खास करून सदाशिव पेठ बद्दल तर आत्यंतिक जिव्हाळा आहे. तो तुमच्या लेखात पण पूरेपूर जाणवतोय. माझे आजोळ सपे त्यामुळे खूप वेळा जाणे व्हायचे. टिळक रोड, साहित्य परिषदच्या समोरचा वाडा (खाली चंदू सायकल मार्ट होते)
त्या वाड्यात जायचा बोळ, वाड्याखालचा बसस्टॉप, वाड्यात शिरले की डावीकडे मोठी कॉमन मोरी, पुढे जाऊन अंधार्‍या बोळातून २ लाकडी जिने चढले की आजीचं घर. किती किती स्पष्ट आठवतंय. खूपच मजा यायची. २ खोल्या असल्या तरी कधी जागा कमी पडते असं वाटलंच नाही. किती जणांची ये-जा होती त्या घरात. संडास बाथरूम पण त्याच मजल्यावर होतं ३-४ फॅमिलीमधे कॉमन. ते पण एकदम अंधारं. बाथरूमला एकच छोटीशी खिडकी. कशी आंघो़ळ करायचो एवढ्या काळोखात तेच आठवत नाही. उंचावर एक कडी. ती उचलून खिट्टीत घालायची. मी बुटकी त्यामुळे बाथरूमच्या मोठ्या उंबरठ्यावर चढून ती लावावी लागे. घूस प्रकार पहिल्यांदा तिकडेच बघितला.
खाली उतरलं की दुकानंच दुकानं हे माझ्यासारखीला (पिंपरी चिंचवड मधल्या मोकळ्या जागेतून आलेलीला) फार भारी वाटायचं. ज्ञान प्रबोधिनी, साहित्य परिषद, पेरूगेट, भावे हायस्कूल, वनिता सदन, पाटील किराणा दुकान जिव्हाळ्याची ठिकाणं होती. Happy गणपती मिरवणूक साठी तर हमखास मुक्काम असायचाच तिकडे. फार मस्त आठवणी जाग्या झाल्या या लेखामुळे. अजूनही बरेचदा स्वप्नात ही ठिकाणं दिसतात.

कित्ती हृदयस्पर्शी, चित्रदर्शी लेख आहे हा. त्यावेळेचे लहान बहिण भाऊ आणि आजूबाजूचे सर्व डोळ्यासमोर उभे राहिले. पाणी आलं डोळ्यातून.

सगळे प्रतिसाद पण एकसेएक आहेत. सुधीर गाडगीळ प्रतिसाद पण भारी.

माहेरी पुण्याशी काहीच संबंध नाही, कोणीच जवळचे पुण्यात राहत नव्हते. आईचे एक चुलत काका काकू शुक्रवार बोरकर वाड्यात राहायचे, तिथेही एकदाच लहानपणी गेलेले.

लग्न झाल्यावर नवरा कोकणात वाढलेला आणि मुंबईत राहिलेला असून त्याचे बरेच सख्खे नातेवाईक पुण्यात इथे आणि तिथे, त्यामुळे पुण्याशी संबंध आला.

मामेसासरे सदाशिव पेठेत अजूनही राहतात, आता वाडा पाडून बिल्डींग झाली पण मला तो जुना वाडा माहितेय आणि आठवतोही, तिथे आम्ही जायचो. त्रिमूर्ती नाव होतं बहुतेक, पूर्वी राजवाडे मंगल कार्यालय होतं, आता आहे की नाही माहिती नाही, त्याला अगदी लागून होता हा वाडा. पुण्यात मला काही समजायचं नाही, सर्व सारखं वाटायचं पण नारायण पेठेतल्या नणंदेकडून मामेसासऱ्यांकडे एकटे जायला समजायचं, मध्ये विजय टॉकीज लागायचं.

पुण्यातल्या वाड्यात रात्री भीती वाटायची, तिथे फार मिणमिणते बल्ब. डोंबिवलीत किंवा नालासोपारा इथे चाळ असो वा सोसायटी, बाहेर जास्त प्रकाशमान लाईटस बघायची सवय होती.

मामेसासरे, मामे सासूबाई, आजेसासुबाई, त्यांच्या मुली जाम प्रेमळ कुटुंब. त्यावरून एकंदरीत सर्व वाड्याचा अंदाज यायचा, प्रेमाने राहायचे सर्वजण. आम्ही गेलो की मुलींच्या मैत्रिणी वगैरे गप्पा मारायला यायच्या. हल्ली दहा बारा वर्ष झाली तिथे tower होऊन.

Pages