भारत का दिल देखो - चटपटे मटाळू/करांदे (पाककृती)

Submitted by मनिम्याऊ on 2 November, 2020 - 12:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भारत का दिल देखो या (माझ्या मध्य भारतातील लोकजीवनावर आधारित) मालिकेत आज एक करांद्याची छत्तीसगढी पाककृती सांगते.
करांदे ही एक जंगली वेल आहे. या वेलीला बटाट्यासारखीच पण जरा कडक सालीची आणि दाणेदार फळे धरतात. छत्तीसगढी भाषेत याला 'जंगलीअजूबा' असे नाव आहे. बालाघाट भागात याला 'डांग कांदा' असे म्हणले जाते. तर भंडारा गोंदिया भागात याला मटाळू / माटाळू असे म्हणतात.
air potato.jpg
(फोटो - इंटरनेट वरून साभार)

जिन्नस
कांदा १ मध्यम आकाराचा उभा चिरून
टोमॅटो १ बारीक चिरलेला
लसूण पाकळ्या ४-५ बारीक चिरून
हिरव्या मिरच्या २-३ बारीक चिरून

मसाल्यासाठी
हळद १ चमचा
तिखट पावडर १ चमचा
धणेपूड १ चमचा
जिरेपूड १ चमचा
गरम मसाला पाव चमचा
चिमूटभर हिंग
जिरे-मोहरी (फोडणीसाठी)
मीठ चवीनुसार
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम मटाळू स्वच्छ धुवून घ्या. पातेल्यात मटाळू बुडतील इतके पाणी घालून दहा मिनिटे उकडून घ्या.
मटाळूंचा रंग बदलून ते काळे झाले की शिजले असे समजावे.
IMG-20201102-WA0004.jpg

थोडे थंड झाल्यावर साले काढून गोलाकार जाडसर चकत्या करून घ्या. (मी आधी चकत्या करून मग साले काढते ते सोप्पे जाते)

एका कढईत तेल तापवून घ्या. त्यात या मटाळूंच्या चकत्या मंद आचेवर अगदी सावकाश लाल रंग येईस्तोवर तळा.
(ह्यावर नुसते तिखट मीठ आणि चाट मसाला भुरभुरून चिप्स सारखे खाता येतील आणि जास्त चकत्या इथेच संपतात Lol )
Picture1.jpg

त्याच उरलेल्या तेलात जिरे -मोहरी-हिंगाची फोडणी करून त्यावर चिरलेल्या मिरच्या आणि लसूण टाका. लसूण लाल झाला की कांदे घालून मंद आचेवर शिजू द्या. कांदे गुलाबी झालेत की टोमॅटोच्या बारीक फोडी घाला. आता थोडेसेच मीठ घालून झाकण ठेवून शिजू द्या. या स्टेप ला मीठ घातले की कांद्या टोमॅटोला पाणी सुटते आणि त्या अंगच्या रसात भाज्या शिजल्या की भाज्यांची मूळ चव कायम राहाते.

एकीकडे हळद, तिखट पावडर, धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला एका बाऊल मध्ये एकत्र करून थोडेसे पाणी घालून सरसरीत कालवून घ्या.
Picture2.jpg
.
Picture3.jpg

हे मिश्रण अर्धे कढईत घाला व जरा वेळ शिजू द्या. पाणी पूर्णपणे आटले की यात तळलेल्या मटाळूच्या चकत्या घालून नीट परता व उरलेले मसाल्याचे मिश्रण वरून हळूहळू घाला आणि परत थोडेसे मीठ घाला. नीट परतून झाकण ठेवून वाफेवर ५ मिनिटे शिजू द्या.
Picture4.jpg

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून सजवा आणि लिंबू पिळून (हे मस्ट आहे) गरमागरम चपाती / भाकरी किंवा पेजेवरल्या आसट भातासोबत खायला घ्या
20201102_220318.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४
अधिक टिपा: 

ज्या वेळी ताजी भाजी उपलब्ध असेल तेव्हा मोठ्या प्रमाणात उकडून काप करून कडकडीत उन्हात वाळवून ठेवतात. मग गरज पडेल तसे रात्रभर भिजत घालून दुसर्या दिवशी कालवण करतात.

ही भाजी पोटाच्या विकारांवर विशेषतः डायरियावर अतिशय प्रभावी आहे. तसेच खवखवणारा घसा आणि मूळव्याधावर देखील गुणकारी आहे.

वेगळ्या पद्धतीने शिजविल्यास उपवासाला चालते .

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

सुरण अळुकंद सारखे होत असेल

जबरदस्त आणि अभिनव रेसिपी. धन्यवाद. Happy
आता इथे शोधणे आले. कुणाला याला अमेरिकेत काय म्हणतात हे माहिती असेल तर सांगा प्लीज.

>>>नुसते तिखट मीठ आणि चाट मसाला भुरभुरून चिप्स सारखे खाता येतील आणि जास्त चकत्या इथेच संपतात>>> जबरदस्त टेस्टी फोटो आहे.

आमच्या आईकडे याला करांदे म्हणतात. मी जिथे राहते तिथे तरी मी पाहिले नाहीत पण एखाद्या एशियन्/चायनीज ग्रोसरीमध्ये शोधावं लागेल.
आई फक्त उकडून मीठ लावून उपासाला डब्यात न्यायची. आमच्यासाठी थोडे जास्त उकडवायची. असेच आवडायचे तेव्हा. ही रेसिपी देखील नक्की छान लागत असणार. Happy

हे छान लागतात. उकडून संध्याकाळी खातो. ओगस्ट महिन्यात वेलावरचे कच्चेच खाता येतात.
नवरात्रीत हे बाजारात येतात. पण वेलाच्या मुळाशी असणारे केसाळ कंद ( खरे कंद) दिवाळीपासून विकायला येतात ते खूप छान लागतात. सुरणासारखे पण खाजरे नसतात. किंचिंत कडसर. अळूसारखे गुळबुळीत अजिबात नाही.

>> करांदे ही एक जंगली वेल आहे. >>
जंगली वेल ही कडू कारांदेची असते. त्याचे जमिनीतील कारांदे पहिला पाऊस झाल्यावर आगरी, कातकरी,ठाकर लोक रानातून आणतात। औषध म्हणून खातात. पण याच्या वेलास जो फुलांचा सुंदर घोस ( २-४ किलो वजनाचा, तीनचार फुट लोंबता) तो खाण्याच्या कारंद्याच्या वेलास येत नाही.

काय मस्त दिसतीये गं भाजी. आम्ही यांना करांदे म्हणतो. मी हे नेहमी उकडून मीठ, तूप लावून नुसतेच खाल्ले आहेत. आईला फार आवडतात. मी वेलही पाहिलीये याची.

इथे उषानं पण केलीये.
जंगली अजूबा की स्वादिस्ट सब्जी जो आपने कभी देखि और खाए भी नहीं होगी: https://www.youtube.com/watch?v=V1zCPkc-pjQ

ह्याची भाजी करतात माहीत नव्हते. कोकणात असताना आमच्या घराजवळ मोकळ्या जागी रान माजायचे त्यात हे बघितलंय. आम्ही ही फळं लहान असताना खेळायला घ्यायचो. बऱ्याच वर्षात कुठे बघितली ही नाही. छान पाकृ.

जबरदस्त आहे रेसिपी. फोटोही भन्नाट.

करांदे आम्ही असेच मावेत शिजवून तिखट मीठ लाऊन खातो. माझ्याकडे वेल मागे दोनदा मोठा झाला पण फळ काही येत नाही त्याला. आता नाहीये.

शरदकाका मस्त आहे वेल.

सर्वान्चे आभार.

<<कुणाला याला अमेरिकेत काय म्हणतात हे माहिती असेल तर सांगा प्लीज.Submitted by अस्मिता. >>
बहुतेक air potato / air yam म्हणतात.

शरदकाका मस्त आहे वेल. +1

@मामी.. link साठी धन्यवाद. मस्त channel दिसते आहे.

करांदे... मस्तच कच्चे खायला पण छान लागतात.. अन चुलीत भाजलेले पण मस्तच... भाजी नाहि केली कधी पण उकडुन खाल्लेत ..पावसात गावी हवे तितके मिळतात. Happy

आमच्या आईकडे याला करांदे म्हणतात.>>>> याला करांदे म्हणतात होय. माझी एक मैत्रिण हे माहेरी गेली की खाते. आण म्हणले तर आणलेच नाही तिने. खमंग कृती आहे. चिप्स केले पाहीजेत मिळाले की.

वेलाच्या मुळाशी असणारे केसाळ कंद ( खरे कंद) दिवाळीपासून विकायला येतात ते खूप छान लागतात. सुरणासारखे पण खाजरे नसतात. किंचिंत कडसर. अळूसारखे गुळबुळीत अजिबात नाही.>> बरोबर. हा खाली मुळाशी जितका मोठा कंद असतो त्याप्रमाणात वेलीवरची फळं असतात.