बदनेकायी हेवन / वांग्याची सुकी भाजी

Submitted by पार्वती on 21 October, 2020 - 12:49
बदनेकायी हेवन / वांग्याची सुकी भाजी
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ किलो वांगी (मी लांब हिरवी वापरली) थोडी लांबट कापून मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा
३-४ चमचे तेल
मोहरी
३-४ लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या
१ कांदा उभा चिरलेला (लहान सांबार कांदे सुद्धा वापरू शकता)
हळद
कढिपत्ता

सुकं वाटण :
३ ब्याडगी मिरच्या
३ गुंटूर मिरच्या
४-५ लसणाच्या पाकळ्या
पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं
हे सगळं पाणी न घालता मिक्सर मध्ये फिरवून घ्या

क्रमवार पाककृती: 

१. एका उथळ पॅनमध्ये किंवा खोल तव्यावर तेल गरम करा. खोल कढईत ही भाजी पाणीदार होण्याची आणि वांगी तांबूस न होण्याची शक्यता आहे.
२. तेल तापलं की मोहरी घाला.
३. उभा चिरलेला कांदा आणि ठेचलेला लसूण घाला. छान परतून घ्या.
४. आता चिरलेली वांगी घाला. हळद, कढिपत्ता घालून हलवून घ्या.
५. झाकून ५ मिनिटं शिजवून घ्या. पाणी घालायचं नाहीये.
६. वांगी थोडी मऊ झाली की मीठ आणि वाटण घाला.
७. झाकण लावून भाजी चांगली शिजू द्या. पाणी घालायचं नाहीये.
८. कोरडी भाजी भाक-यां/पोळ्यांबरोबर वगैरे छान लागतेच पण गरम गरम वरण भाताबरोबर सुद्धा यम्मी
९. ह्यात माझा स्वतःचा टच म्हणजे, भाजीत मीठ घालताना मी थोडा गूळ ही घातला. वांग्याची भाजी आणि गूळ नाही म्हणजे मला चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. एकदा गूळ नव्हता म्हणून ब्राऊन शुगर घातली होती.

वाढणी/प्रमाण: 
२-३लोकांसाठी
अधिक टिपा: 

विचित्र नावं देऊन लक्ष वेधून घेण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये मी. पण ह्या भाजीला हेच नाव रास्त आहे. बदनेकायी म्हणजे वांगी आणि हेवन म्हणजे काय हे आपल्याला माहीतच आहे.

झालं काय की, लॉकडाऊन मध्ये निरनिराळ्या पाककृती करून पाहायचं वेड लागलं होतं. दररोज तिन्ही त्रिकाळ घरचंच खायचं म्हणजे काही ना काही तरी चमचमीत हवंच होतं. त्या नादात सगळ्यांची वजनं मात्र वाढली ते पाहायचं नाही. इथल्या एका लोकप्रिय फेसबुक ग्रुपवर ही भाजी पाहिली आणि तोंडाला पाणी सुटलं. रेसिपी मागितली, मिळाली, करून पाहिली आणि इतकी आवडली की, नव-यानं त्या भाजीचं बारसं बदनेकायी हेवन असं केलं. ज्वारी/बाजरीच्या भाकरी, ठेचा आणि ही भाजी म्हणजे स्वर्गच!

आता पाककृती तिनं दिल्याप्रमाणे. ह्यात घरी जे असेल ते घालून, नसेल ते वगळून, थोडं बहुत अडजस्ट करून बनवा.

माहितीचा स्रोत: 
बंगलोर फूडीज ग्रूपमधील एक सदस्य
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

वांगे अमर रहे

मस्त आहे .
गुंटूर मिरची म्हणजे कोणत्या मिरच्या

अहाहा ! फोटो केवळ कातिल आहे. नवरात्र झाले की नक्कीच करणार म्हणजे करणार. कारण सध्या कांदा लसुन वर्ज्य आहे. धन्यवाद, खूप मस्त पाककृती. Happy

अजून लिहीत रहा, म्हणजे तुमच्या पद्धतीने केलेल्या पाकृ लिहा.

BLACKCAT, जाई, किल्ली, लावण्या, mi_anu, रश्मी - धन्यवाद सगळ्यांना प्रतिसादांसाठी.
जाई – ब्याडगी मिरच्या रंगासाठी आणि गुंटूर मिरच्या तिखटपणासाठी प्रसिद्ध आहेत. गुंटूर मिरच्यांऐवजी नेहेमीचं तिखट घातलं तरी चालेल आणि ब्याडगी मिरच्यांऐवजी कश्मिरी लाल मिर्च पण चालेल.
किल्ली – तुमची रेसिपी मस्तच. करून पाहीन.
mi_anu, रश्मी – केलीत की सांगा. मूळ फोटो पाहूनच पाठपुरावा केला आणि पाकृ मिळवली.

काल अळू, अंबाडी, टॉमेटो, वांगी , कार्ली , मिरच्या इत्यादींचा शेवटचा पिकप झाला गार्डन मधून.

वांगी एकदम कोवळी होती. या पद्धतीने केली भाजी - फार छान झाली होती. इथे तयार किसलेलं सुकं खोबरं मिळतं त्यामुळे करायला एकदम सोपी. गूळ घातला नाही . पुढ्च्या वेळेस कांदे जरा जाडसर चिरायला हवेत. मी फोटो नीट पाहिला नव्हता त्यामुळे अंमळ बारीक चिरले होते.