दिवस पहिला
तालुक्याच्या गावाला पोचले. बाबांच्या व्यावसायिक ओळखीतल्या एक मध्यमवयीन बाई ही या गावातली एकमेव परिचित व्यक्ती. त्यांच्याच ओळखीने दोन महिन्यांसाठी एका छोट्याश्या बंगलीतल्या दोन खोल्या भाड्याने घेतल्यात. गेल्या वर्षी ज्या गावात काम केलं तिथे एका हॉटेल मधे राहिले होते. तिथला मुक्काम छानच झाला पण भाड्याचं घर खूपच स्वस्त पडतं आणि सुरक्षितही वाटतं. त्यामुळे आमची स्वारी खूष!
त्या बंगल्यात सत्तरीच्या घरातले मालक - मालकीण रहातात. त्यांची सगळी मुलं परगावी रहायला आहेत. पण लोक चांगले आहेत. चार दिवसांपूर्वी जागा बघून भाडं देऊन गेले तेव्हाच मला ते आणि त्यांना मी पसंत पडले होते. घर पण छान आहे. शहाबादी फरश्यांचं, माझ्या आजोळच्या आठवणी ताज्या करणारं. आणि माझ्या खोलीच्या दारातून चार पायर्या उतरतात त्या फरशी घातलेल्या अंगणात. कडेने आंबा, सीताफळाची झाड, काही फुलझाडं आणि हौद. अगदी गोष्टीच्या पुस्तकात वाचतो ना तसंच!
काकांकडे चौकशी करून रात्रीच्या जेवणाचा डबा पण लावून टाकलाय.
माझ्याबरोबरचं सामान म्हणजे कपडे, कॅमेरा, होकायंत्र, टेप, खुरपी / trowel, मांजरपाटाच्या पिशव्या (खापरं गोळा करायला), नकाशे, नोंदणीवही, कोरडा फराळ, अभ्यासाची वह्या-पुस्तकं, २-४ गोष्टींची पुस्तकं, आणि सटरफटर. विंचवाचं बिर्हाड मांडायला कितिसा वेळ लागतो? साबण, कुंचा, मेणबत्त्या अशा संसारोपयोगी गोष्टींची खरेदीही झाली..
इकडेतिकडे चौकशी करून आणि एका इतिहासाच्या स्थानिक प्राध्यापकांशी फोनवरून बोलून एक विद्यार्थी मदतनीसही मिळालाय. त्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो माझ्याबरोबर येणार आहे.
रात्रीच्या जेवणाचा डबा पुण्याहून येतानाच आणला होता. ७ - ७॥ च्या सुमारासच खाऊन घेतला. आता निवांतपणे खोलीसमोरच्या पायर्यांवर बसलेय. उद्या सकाळपासून काम सुरू. उद्या ज्या ज्या गावांना जायचंय त्याची यादी करून, त्यांचे काही पूर्वीचे संदर्भ आहेत का ते तपासून, त्यांचे नकाशे सखोलपणे पाहून झालेत. इथे यायच्या आधी एकदा गूगल अर्थ वर जाऊन ही ठरवलेली गावं एकदा वरून न्याहाळून झालीत - त्याची टिपणं काढून झालीत.
पण आत्ता करायला काहीही नाहीये. फक्त चढणार्या रात्रीची शांतता मनात उतरवतेय. आणि उद्याची आतुरतेने वाट पहातेय. फील्डवर्क करताना इतर वेळी संसारात, अभ्यासात, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात, स्वैपाकपाण्यात हरवलेली मी माझी मलाच भेटायला येते. आता तिच्या-माझ्यात आणखी कुणीच नसतं. पुढचे काही दिवस फक्त स्वतःसाठी...
असो. ९ वाजलेत. नवर्याला फोन केला, त्याचा दिवसातला शेवटचा चहाचा कप पिणं चाललं होतं. मग माहेरीही फोन केला. आता झोपावं.
दिवस सहावा
सकाळी नेहमीप्रमाणेच ६ला उठले. पटकन आवरून केळी (यक! :(), लाडू असा पौष्टिक नाश्ता करून ७च्या सुमारास घराबाहेर पडले. बरोबर पाणी, कॅमेरा, नोंदणीवही, इतर औजारं/ हत्यारं घेतली. तशीही फील्डवर मी दुपारची जेवत नाहीच, पण अगदीच वाटलं तर असावं म्हणून बरोबर फळं, केक असं घेतलंय.
गेल्या पाच दिवसात १६ गावं हिंडून झाली आहेत. आपल्या देशात प्रत्येक गावात काही ना काही ऐतिहासिक अवशेष असतातच. अगदीच काही नाही तरी उत्तर मराठा कालीन वाडे तरी दिसतातच. पण मी शोधते आहे त्या सुमारे ३००० - ४००० वर्षांपूर्वीच्या वसाहती. मी काम करते त्या प्रदेशात पुरातत्त्वीय सर्वेक्षण जवळजवळ न झाल्यातच जमा आहे, त्यामुळे माझ्या कामाशी संलग्न नसले तरी जे काही unreported ऐतिहासिक पुरावे असतील (अगदी मध्ययुगापर्यंतच्या वस्त्यांचे अवशेष, मूर्ती, देवळं, वीरगळ, तटबंद्या, गढ्या, असं सगळं) त्यांची तपशीलवार नोदणी करते. कारण ज्या वेगाने हे पुरावे नष्ट होत आहेत ते पहाता आणखी ५ वर्षांनी तरी यातलं किती शिल्लक राहील माहित नाही. त्यांची निदान प्राथमिक नोंदणी असावी असं मला वाटतं.
वीरगळ
गेल्या पाच दिवसात भेट दिलेल्या गावांमधील १० गावांत इ.स. १० व्या शतकापासूनचे पुरावे मिळालेत. आणि उरलेल्या ६ गावांची प्राचीनता मात्र सुमारे २००० वर्षं मागे जाते. म्हणजेच तिथे सातवाहन कालीन वसाहती होत्या.
आज काय काय मिळणार आहे? माहीत नाही!
बसस्टँडवर आले. ज्या गावाला जायचं ठरवलं होतं त्याला जायला ८ वाजताची बस होती. (एस्टी च्या लाल डब्यांचं मात्र खरंच कौतुक आहे. ९० - ९५% गावांना निदान दिवसातून एकदा तरी गाडी जाते.) आजही माझा मदतनीस माझ्या बरोबर होता. खूपच चटपटीत आणि छान मुलगा आहे. मला मनापासून मदत करतो.
८ ची गाडी ८। ला सुटली. मी आणि माझा मदतनीस एकूण या गर्दीत उठूनच दिसत होतो. त्यामुळे नेहेमीप्रमाणेच लोक आमच्याकडे माना वळवून वळवून पहात होते. त्यात माझा पोषाख नक्कीच विनोदी दिसत असणार - अंगात धुवट सलवार कुर्ता, ओढणी, गळ्यात ठसठशीत काळी पोत, कपाळाला कुंकू, वरती एकदम छोटे कापलेले केस आणि पायात भरभक्कम ट्रेकिंग शूज. गळ्यात स्कार्फ आणि पाठीला सॅक!
कुंकू आणि मंगळसूत्र हे फील्डमधले माझे सर्वात महत्त्वाचे साथीदार. एरवी या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहणारी मी खेडोपाडी हिंडताना मात्र आदर्श भारतीय नारी असते. कारण गळ्यात काळी पोत पाहिल्यावर गावातल्या लोकांची माझ्याकडे पहायची नजर आमूलाग्र बदलते. बहुतेक वेळा आपुलकीच (आणि काही ठिकाणी खणा-नारळाची ओटीही) वाट्याला येते. घर-संसार असूनही असं काम करत हिंडणार्या माझं त्यांना जेवढं आश्चर्य वाटतं त्यापेक्षाही सगळ्यांना अगणित पट कौतुक वाटतं ते मला हे सगळं करायची परवानगी देणार्या माझ्या मालकांचं (नवर्याचं) आणि सासूचं. त्यांची ती स्तुती ऐकून माझा नवरा म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला देवदूतच असा मला साक्षात्कार होतो आणि अशा संतमहात्म्यांचे घर माझ्या नशीबात आल्याचे लक्षात येऊन मी धन्य धन्य होते!
असो. नकाशात दिसत होतं की गाव क्र.१ जवळून नदी वहाते आणि पल्याडच्या काठाला २-३ छोट्या टेकाडांसारखे उंचवटे होते. तसेच गावाच्या बाजूला, अल्याडच्या काठाला पांढरीचा मळा असा उल्लेख दिसत होता. आधी पल्याडच्या काठाला गेलो. तिथे पोचल्यावर लक्षात आलं की हे उंचवटे खडकाचे / नैसर्गिक होते. तरीसुद्धा आसपास थोडीशी शोधाशोध केली. गारगोटीची हत्यारं कुठे मिळताहेत का पाहिलं. काहीच नव्हतं! मग परतून चालत चालत मुख्य रस्त्याला लागलो. पुलाच्या अलिकडे एक पत्र्याच्या भिंतींची पण मोठ्ठी शाळा होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात बरेचसे शिक्षक अजूनही बाहेरच रेंगाळत होते. शिवाय थोड्या वेळापूर्वी त्यांनी आम्हाला तिकडे ओढ्याच्या दिशेने जाताना पाहिलेले असणार.. त्यांनी लगेच आम्हाला थांबवून चौकशी सुरू केली. मला आता या चौकशीची सवय झाली आहे. साधारणपणे प्रश्नांचा क्रम असा -
१. तुम्ही कोण?
२. कुठून आलात?
३. काय काम?
४. या कामाचा काय उपयोग?
५. सरकार तुम्हाला या कामासाठी किती पैसे देतं? (मी विद्यावृत्तीवर किंवा वर्षभर काम करून त्या पैशांवर हे काम करते हे उत्तर बहुतेक लोकांना खोटंच वाटतं..)
६. तुमचे मालक काय करतात? कुठे रहातात? (या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर मी पुणे असंच देते. माझा नवरा अमराठी आहे आणि मी कलकत्त्याहून इतक्या दूर फक्त कामासाठी आलेय ही लोकांच्या समजशक्तीच्या परिघाबाहेरची गोष्ट असते असा माझा अनुभव आहे.)
७. मुलंबाळं?
८. सासरी कोणकोण असतं? ते तुम्हाला असा संसार सोडून कसं काय बरं जाऊ देतात?
९. इथे तालुक्याच्या गावाला कुठे / कोणाकडे रहायला? ते तुमचे नातेवाईक का? असल्यास नक्की नाते काय? त्यांच्या घरी कोण कोण असतं? या सर्वांचा पोटापाण्याचा उद्योग काय?
हे सगळे अगदी चाकोरीतले प्रश्न. यात स्थळकाळसापेक्षतेनुसार भर पडत असतेच. म्हणजे जमीन अधिग्रहणाची काही भानगड होणार नाही ना? तुम्हाला गुप्तधन मिळतं का? सोनं शोधायला आलात का? आमच्या गावातली अमकीतमकी अडचण सरकारी अधिकारी समजावून घेत नाहीत, तुम्ही त्यांच्या वरच्या अधिकार्यांना सांगाल का? इ. एवढी सगळी उत्तरं देऊनही कधी कधी लोक गावातून हाकलून देतात..
तर या शिक्षकांबरोबर हे नेहेमीचे संवाद झाल्यावर त्यातले एकजण म्हणाले, 'माझं गाव इथून ५-६ किमी वर आहे. आमच्याच शेतात पूर्वी एक पांढरीचं टेकाड होतं. तुम्हाला पहायचं असेल तर दुपारी १ वाजता शाळा सुटते तेव्हा या. मी घेऊन जाईन." लगेचच हो म्हणून टाकलं. आणि मोर्चा गाव क्र. १ कडे वळवला.
गावात गेल्यावर आम्हाला पाहून लोक जमा झालेच. परत एकदा प्रश्नोत्तरांचं सत्र झालं. या सर्व लोकांनी मला एका सुरात ठामपणे सांगितलं की इथे असं जुनं टेकाड वगैरे काहीच नाही. गावात फक्त एक सतीचा हात, खंडोबाचं देऊळ आणि म्हसोबाचं देऊळ आहे. मग थोडसं खोदून विचारलं की इथला पांढरीचा मळा कुठे आहे म्हणून. तेव्हा २-३ जणांनी एकमेकांकडे पाहिलं आणि जरा उग्रपणेच मला सांगण्यात आलं की पूर्वी एका शेतात होतं पण आता तिथे काहीही नाही. तुम्ही तिथे जाऊ नका. तरीही चिकटपणाने आणखी थोडा मन वळवायचा प्रयत्न केला. पण गावकर्यांनी जाम दाद लागू दिली नाही. मीही मग निघाले. पुढच्या गावाला...
गाव क्र.२ फाट्यावरून साधारण २-३ किमी आत डांबरी रस्त्याने सरळ चालत गेल्यावर. सकाळची एकमेव बस कधीच निघून गेल्याने बाकी कुठल्याही वाहनाची वाट न पहाता त्या दिशेला पाय वळवले. हे या तालुक्यातलं सर्वात छोटं गाव. ३०० च्या आतबाहेर लोकसंख्या. पण एकूण नकाशातल्या खाणाखुणा सांगत होत्या की इथे हटकून काहीतरी मिळायची शक्यता आहे. दोन्ही बाजूला शेतं, शिवारं आणि माणसांचीही वर्दळ नसणारा निवांत रस्ता - चालायला मजा येत होती.
गावात पोचलो. माझ्या अवताराकडे बघून भराभरा लोक गोळा झाले. एक छोटीशी शाळा होती. तिथले शिक्षक, विद्यार्थी सगळेच शाळा सोडून आमच्या भोवती जमले. परत एकदा प्रश्नोत्तरं! हा कार्यक्रम चालू असताना तिथला एक माणूस माझ्याकडे आ वासून पहात होता. त्याने शेवटी न राहवून विचारलंच की, "पण मला एक सांगा, तुम्हाला आमच्या गावाचं नाव मुळात कळलंच कसं? आमचं गाव इतकं छोटं आहे तालुक्याच्या अधिकार्यांना सुद्धा पटकन लक्षात येत नाही. मग तुम्हाला नाव कसं कळलं? आणि आमच्या गावात जुनी खापरं मिळतात हे तरी कसं कळलं?" शांतपणे पाठपिशवीतून नकाशा बाहेर काढला. त्यात गावाचं नाव लिहिलेलं दाखवलं, आणि गावात पांढर आहे का अशी फक्त चौकशी करतेय, नक्की माहित नाही असं सांगितलं. मग तो संशयात्मा शांत झाला. आता सगळेच माझ्या बरोबर निघाले. गावाच्या कडेला एक अवशिष्ट टेकाड आहे - तिथे खापरं मिळतात म्हणून त्याला कुंभारवाडा म्हणतात.
पांढरीच्या टेकाडावर पडलेला खापरांचा खच
खापरं पाहून लक्षात आलं की इथे सुमारे २००० वर्षांपूर्वी वस्ती होती. नदीच्या काठापासून जरा आत, चढावर, जिथे पावसाळ्यात पुराचे पाणी पोचणार नाही अशा ठिकाणी सातवाहन कालात एक छोटंसं गाव त्यांची छोटीशी सुखं-दु:खं पोटाशी धरून इथे नांदत होतं. त्यानंतरच्या कालखंडातल्या वस्तीचा मात्र काहीच पुरावा दिसला नाही. कोण्या अज्ञात कारणाने उजाड झालेल्या गावाची एक अज्ञात कहाणी...
या अवशेषांची व्यवस्थित पहाणी, मोजणी, नोंदणी करून खापरं गोळा केली, फोटो काढले, गावाची इतर माहिती लिहून घेतली. एका म्हातारबुवांनी त्यांच्या व्याह्यांच्या आजोळच्या गावात पण एक मोठी पांढर आहे अशी माहिती पुरवली. हे गाव पण माझ्या कामाच्या कक्षेत येत असल्याने त्याचे नाव टिपून ठेवले. मग शाळेच्या व्हरांड्यात बसून फळं आणि केक खाल्ला. गावकर्यांनी चहाही पाजला. सगळ्यांना अच्छा म्हणून गाव सोडलं.
चालत चालत शाळेपर्यंत यायला सव्वा वाजला. ते शिक्षक त्यांच्या मित्राबरोबर वाटच पहात होते. तेवढ्यात खाजगी वाहतूक करणारा टेंपो आला आणि त्यात बसून आम्ही गाव क्र.३ कडे निघालो. गावात पोचल्यावर परत एकदा प्रश्नोत्तरांचं सत्र! पण या वेळी उत्तरं द्यायचा भार बहुतांशी माझ्या मदतनिसाने आणि त्या शिक्षकांनी सांभाळला (मदतनिसाची ही सगळ्यात महत्त्वाची मदत - गावकर्यांशी बोलणे. कारण गटागटाने येऊन गावकरी तेच तेच प्रश्न विचारतात, आणि तीच तीच उत्तरे परत परत देताना तोंडाला अक्षरशः फेस येतो! काम करायला अजिबात सुचत नाही) मग २-३ मोटरसायकली घेऊन आम्ही त्या शेताकडे निघालो.
गावापासून शेत साधारणपणे ३ कि.मी, नदीच्या काठावर. १३ एकरांचं. या शिक्षकांच्या पणजोबांनी जेव्हा ही जमीन विकत घेतली तेव्हा इथे १० एकरांपेक्षा मोठं आणि १५-२०फूट उंच असं एक पांढरीचं टेकाड होतं. जमीन लागवडीखाली आणण्यासाठी म्हणून ही पांढर पूर्णपणे खणून काढली आणि जवळजवळ हजारभर बैलगाड्या पांढरीची माती आसपासच्या शेतकर्यांना विकली. (या मातीत नायट्रोजन आणि फॉस्फेटचं प्रमाण जास्त असल्याने खत म्हणून या मातीचा फार उत्तम उपयोग होतो. बहुतेक सगळ्याच गावांमधे पांढरीची माती राजरोसपणे विकली जाते. शिल्पं, देवळं निदान धर्माच्या नावाखाली तरी जतन करून किंवा किमानपक्षी आहेत त्या अवस्थेत ठेवली जातात. पण ही पांढरीची टेकाडं मूर्ती, देऊळ या कुठल्याही अवशेषांपेक्षा कैकपट महत्त्वाचे पुरावे असतात..) गेले ७० वर्षं त्या जमीनीत शेती होतेय. सध्या जमीन नांगरटीसाठी मोकळीच पडली आहे. हे सगळं ऐकून माझ्या उंचावलेल्या अपेक्षा एकदम जमिनीवर आल्या. तरी उभं पीक नाही हे काय कमी आहे अशी मी स्वतःची समजूत घातली. तिथे पोचले आणि आजूबाजूला पहिलं तर काय - अहो आश्चर्यम! त्या शेतात सातवाहनकालीन खापरं, गारगोटीची हत्यारं इ. चा खच पडला होता. शिवाय अनेक हाडं, शंखांच्या बांगड्यांचे तुकडे असं काय काय होतंच! इतके वर्षांच्या शेतीनंतरही मला इतकं मिळतंय तर मुदलात ते टेकाड पुरातत्त्वीय पुराव्यांनी किती समृद्ध असणार! आत्तापर्यंत मला मिळालेली बहुतेक सर्व सातवाहनकालीन गावं छोटी, २-३ एकरांची होती. पण इथली गोष्टच वेगळी असणार!
सर्व जागेची तपशीलात पहाणी, मोजणी, नोंदणी केली, खापरं व इतर अवशेष गोळा केले. एवढ्यात ते शिक्षक म्हणाले की इथे नदीच्या पात्रात एक महादेवाचं ठाण आहे, ते पण तुम्ही बघा.
ठीक आहे. चला. इथे नदीचा काठ चांगलाच उंच आहे - किमान ३०-४० फूट. आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेला धरून डिसेंबर मधे सुद्धा नदीचं पात्र कोरडं ठणठणीत होतं. या पात्रात मधोमध काही उंच खडक आहेत. त्यावर आडोशाला ठेवलेली एक शंकराची पिंड आहे. दरवर्षी गावोगावहून काही विशिष्ट समाजाचे लोक इथे यात्रेसाठी येतात. ही सगळी माहिती लिहून घेतली. आता ऊन अगदी कळाकळा तापलं होतं, हिवाळा चालू आहे याचा संशयसुद्धा येऊ नये इतकं! आणि नदीच्या पात्रातल्या खडकांमुळे तर आणखीच चटके बसत होते. तेव्हा तिथलं काम आटपून गावाकडे परतलो.
गावात गेल्यावर ते शिक्षक जेवायला घालायला निघाले होते. कसंबसं त्यांना थोपवलं. आणि जेवणाचा आग्रह चहाच्या कपावर आणून थांबवला.
या गावात पण पांढर आहे, म्हणजे गावच पांढरीच्या टेकाडावर वसलंय. अशी पांढरीवर वस्ती असली की फार अडचण होते. कारण खाली काय आहे याचा पत्ता लावणं अवघड होतं. कुठेतरी गावात खोदकाम चाललं असेल तर थोडासा अंदाज येतो, पण असं खोदकाम करताना आपण तिथे हजर असणं हा एक दुर्मिळ योग असतो. नाहीतर मग कुठेतरी थोडीशी मोकळी जागा असेल तर खापरं दिसतात, पांढरीत काय दडलंय त्याचा अंदाज येतो. आणि बहुतेक सगळ्या गावांत अशी मोकळी जागा म्हणजे गावचा उकीरडा-कम- सार्वजनिक उघड्यावरचा संडास. तेव्हा या सगळ्या जागेची बारकाईने छाननी/ पहाणी करून त्यातून खापरं वगैरे वेचणं ओघाने आलंच. अगदी शब्दशः उकीरडे फुंकणं!! बरेच वेळा गावातली माणसंच काय पण उकीरड्यातली कुत्री आणि डुकरं पण आश्चर्याने बघत रहातात माझ्याकडे.
असो. तर ही खापरं वेचून परत येऊन एका घराच्या पायरीवर बसले. थोडं पाणी मागवून ती खापरं धुऊन पाहिली, तेव्हा लक्षात आलं की सगळीच साधारणपणे १२ व्या शतकाच्या नंतरची आहेत. असू देत. पिशवीत भरली. गावाची इतर माहिती, मौखिक इतिहास इ. लिहून घेतलं. तालुक्याच्या गावाला जाणारी बस ५-५। ला होती. वेळ कमी होता पण तेवढ्यात गावातले जीर्णोद्धार केलेले खंडोबाचे देउळ पाहून घेतले. आजचा दिवस नेहमी पेक्षा थोडा वेगळा ठरलाय कारण गावोगाव आढळणारी मंदिरं, मूर्ती, वीरगळ यापैकी आज काहीच दिसलं नाहीये. एवढ्यात गाडी आलीच. गाडीत चढताना लक्षात आलं की देवळाच्या समोरच्या पारावर एक गजलक्ष्मीचं सुंदर शिल्प ठेवलंय. मघाशी त्या बाजूला बसल्याने झाडाच्या आड असलेलं शिल्प इतका वेळ दिसलंच नव्ह्तं. मग घाईघाईने उतरून त्याचा फोटो काढला आणि पळतपळतच सुटणार्या बसमधे चढले.
गजलक्ष्मी
घरी परतेपर्यंत ६॥ झाले. येऊन आंघोळ करून कपडे धुऊन वाळत टाकले. खापरांच्या पिशव्या एकीकडे नीट लावून ठेवल्या. थोडं कंटाळल्यासारखं झालं होतं पण चालढकल करण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून परत एकदा वही-पेन हातात घेतलं. दिवसभराच्या कामाचा कच्च्या नकाशांसह, आराखड्यांसह एक तपशीलवार वृत्तांत लिहिला. हिशोब लिहिला. यात तास-दीड तास गेलाच. तेवढ्यात रात्रीचा डबा आला. जेवता-जेवताच नवर्याचा फोन आला. आज काय काय मिळालं याची परत एकदा उजळणी झाली.
उद्याच्या दिवसाची तयारी केली. कुठल्या गावांना जायचंय, त्याची यादी निश्चित केली, नकाशांवरून नजर फिरवली. खापरांसाठी नव्या पिशव्या सॅकमधे घातल्या, पाण्याची बाटली भरून ठेवली. आणि मग सकाळी स्टँडवर घेतलेलं आणि संध्याकाळपासून खुणवणारं वर्तमानपत्र हातात घेतलं.
फील्डमधे सगळेच दिवस सारखे नसतात. बरे वाईट सगळेच प्रकार वाट्याला येतात. त्या तुलनेत आजचा दिवस फारच आरामाचा गेला - शिवाय कामही बर्यापैकी मनासारखं झालं. या आनंदात डोळे कधी मिटले कळलंच नाही.
(टीपः इथे लिहिलेले सर्व प्रसंग, लोक, गावे खरीखुरी आहेत. फक्त माझं हे संशोधन अजून पूर्ण झालेलं नसल्याने इथे गावांची नावं वगैरे दिली नाहीयेत. आणि मजकुराबरोबर दिलेले फोटो त्या त्या गावांचे नसून प्रातिनिधिक आहेत. हे सर्व फोटो माझ्या अप्रकाशित संशोधनाचा भाग असल्याने कृपया कुणी कॉपी करून वापरू नयेत. धन्यवाद )
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: २ http://www.maayboli.com/node/12433
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ३ http://www.maayboli.com/node/12477
फारच छान. जियो. इरावतीबाईंची
फारच छान. जियो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इरावतीबाईंची आठवण आली, यातच काय ते आलं.
अगा बाबौ!!!!!!!!!!! एवढ काम
अगा बाबौ!!!!!!!!!!!
एवढ काम ते ही सगळीकडे फिरुन फिरुन करायला किती कष्ट पडत असतील ह्याची कल्पना करुनच दमलो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांगल लिहिताय. अजुन अनुभव वाचायला आवडेल.
आणखी वाचायला आवडेल. दोनच
आणखी वाचायला आवडेल. दोनच दिवसात रोजनिशी संपत नसतेच नाही तरी.
मुख्य म्हणजे संशोधनाचा निबंध जेव्हा केव्हा प्रकाशित होईल तेव्हा तोही वाचायचा आहे.
एक प्रश्नः खापर म्हणजे नक्की
एक प्रश्नः खापर म्हणजे नक्की काय? >>> माझ्या माहीतीप्रमाणे- भाजलेल्या मातीच्या मडक्याचा तुकडा
फारच छान. सहज, सोपं आणि
फारच छान. सहज, सोपं आणि उत्कंठापूर्ण लेखन. खूप आवडलं.
पांढर म्हणजे काय?
वरदा, फोटो टाकल्याबद्दल
वरदा, फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद. फोटो वर वाटरमार्क करा नाहीतर चोरी व्हायची शक्यता असते. तुमचे संशोधनाचे आहेत म्हणून हे करणे अधिक गरजेचे.
..
..
उत्तम लेख! जरी हा तुमच्या
उत्तम लेख! जरी हा तुमच्या संशोधनाचा भाग आहे, तरी तुमच्या मेहेनतीचं कौतुक वाटलं. इतक्या कामाच्या गोंधळात वेळात वेळ काढून हा लेख मायबोलीकरांसाठी टाकल्याबद्दल आभार!
वरदा, किती महत्त्वाचं काम करत
वरदा, किती महत्त्वाचं काम करत आहेस गं तू!! खरच, आर्किऑलॉजी हा तसं पाहिलं तर अतिशय दुर्लक्षीत विषय आहे आपल्याकडे अजूनही. मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटला तुझा लेख वाचून की तुझ्यासारखी लोकं ह्या नॉन-ग्लॅमरस विषयाला धरुन आहेत आणि आपला देश आणि संस्कॄती ज्या पुरातन वैभवाला विसरली आहे त्या वैभवाचे अवशेष शोधून काढून त्याची नोंद करण्याचं फार मौलीक काम करत आहेत.
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा !!
खापर म्हणजे भाजक्या मातीच्या
खापर म्हणजे भाजक्या मातीच्या भांड्यांचा तुकडा. पूर्वीच्या काळी साह्जिकच धातूच्या भांड्यांपेक्षा मातीच्या भांड्यांचा वापर जास्त प्रमाणात होता. ही भांडी करायला सोपी, धातूपेक्षा कमी मूल्यवान आणि भंगुर असल्याने कुठल्याही पुराणावशेषांमधे खापरांचं संख्यात्मक प्रमाण सर्वात जास्त असतं. शिवाय जगभर प्रत्येक संस्कृतीत, कालखंडात आणि प्रदेशात वेगवेगळी खापरे वापरली जात. एकासारखे दुसरे मिळत नाही. ती खापरे त्या त्या काळाची आणि संस्कृतीची निदर्शक (signature) असतात.म्हणूनच खापरांना पुरातत्त्वशास्त्राची वर्णमाला असं म्हणलं जातं.
वीरगळ म्हणजे वीराची स्मृती म्हणून उभा केलेला दगड. कानडी कल्लु/ कल (=दगड) वरून बनलेला हा शब्द आहे. तमिळनाडू ते बस्तर पर्यंत असे दगड उभारायची प्रथा सुमारे ८-९ व्या शतकापासून जवळ्जवळ मध्ययुगापर्यंत चालू होती. महाराष्ट्रात आढळणार्या या वीरगळांवर सहसा ३ भाग करून शिल्पांकन केलेले असते. सर्वात खालच्या भागात त्या वीराचा मृत्यु कसा झाला (सहसा लढाईतच) ते दाखवतात, मधल्या भागात त्याला घेऊन अप्सरा कैलासात जाताना दाखवतात आणि सर्वात वरच्या भागात तो कैलासात गेलेला दाखवतात - म्हणजे पिंडीसमोर बसलेला दाखवतात
पांढर म्हणजे पांढरीचं टेकाड. मला वाटतं त्याचं स्पष्टीकरण लेखातच आलंय.
सगळ्यांना परत एकदा धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वाती. फोटो वॉटरमार्क कसे करतात? सांगशील का प्लीज?
फारच छान
फारच छान लेख...................
पुलेशु.................
मस्त... अजून वाचायला आवडेल.
मस्त... अजून वाचायला आवडेल.
वरदा, खाली दिलेल्या दुव्यावर
वरदा,
खाली दिलेल्या दुव्यावर माहिती आहे. तुमच्याकडे कुठले सॉफ्टवेअर आहे त्यावर पद्घत अवलंबून राहील.
http://cameras.about.com/od/printing/ss/watermark.htm
आई शप्पथ! मस्तच! मला
आई शप्पथ! मस्तच!
मला लहानपणापासूनच आर्कियोलॉजी बद्दल एक सुप्त आकर्षण आहे. डिस्कवरीवरचेही त्या प्रकारचे कार्यक्रम मला सर्वात जास्त आवडतात.
बापरे! काय आवाका आहे
बापरे! काय आवाका आहे कामाचा.धन्य आहेस तू.
वेगळ आणि मस्त लिखाण. अजुन वाचायला आवडेल. तुझ्या ह्या वेगळ्या वाटेला खुप सार्या शुभेच्छा.
पिकासा मध्ये वॉटर मार्क टाकता
पिकासा मध्ये वॉटर मार्क टाकता येइल जर फोटोशॉप सारखे सॉफ्टवेअर नसेल तर.
वरदा तुमचा लेख वाचुन तुमच खुप
वरदा
..... शुभेच्छा ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमचा लेख वाचुन तुमच खुप कौतुक वाटल, अभीमान वाटला आणि आनंद झाला :).... खुपच सुरेखपणे तुम्ही तुमच्या कामाच आणि अनुभवांच वर्णन केल आहे
किती परिश्रम आणि चिकाटी लागत
किती परिश्रम आणि चिकाटी लागत असेल ह्या कामाला! तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे.
ह्या लेखाबद्दल धन्यवाद. जसे जमेल तसे इकडे लिहित रहा..
सुंदर लिहिलय. विषयाचा आवाकाच
सुंदर लिहिलय. विषयाचा आवाकाच खूप इंटरेस्टींग आहे आणि लिहिण्याची शैलीही सुरेख आहे. उत्खनन, पुरावे, त्यातून काय सिद्ध झालं, आलेल्या अडचणी याबद्दल अजून वाचत जायला खूप आवडेल. वेळ मिळेल तशी टाकत जा इथे रोजनिशीतली पाने.
शोधनिबंधासाठी शुभेच्छा!
सॉलिड इंट्रेस्टींग काम आहे ग
सॉलिड इंट्रेस्टींग काम आहे ग तुझं. टोप्या उडवल्या !!! ( हॅट्स ऑफ )
अजुन वाचायला नक्कीच आवडेल, पण तुला वेळ होइल तसं सावकाश लिहि , चालेल.
इंटरेस्टींग !! पुढची पाने
इंटरेस्टींग !! पुढची पाने लिहा......आम्ही वाचतोय!
खूप शुभेच्छा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहे. आमच्या रोजच्या
मस्तच आहे. आमच्या रोजच्या आयुष्यापेक्षा इतकं वेगळं आहे ना त्यामुळे अजुनच interesting वाटतं. खूप परिश्रम आहेत या कामात. तुम्हाला शुभेच्छा!
वेळ मिळेल तसं इथे update टाकत जा.
वेगळ्या विषयावरचा लेख वाचायला
वेगळ्या विषयावरचा लेख वाचायला खूपच मस्त वाटलं. तुमची भाषा पण अगदी ओघवती आहे. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत
ते वॉटरमार्कचं लवकरात लवकर करुन टाका.
फारच मस्त! अतिशय छान काम
फारच मस्त! अतिशय छान काम करताय तुम्ही त्याबद्दल अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा!!
अतिशय सुंदर लेख. या
अतिशय सुंदर लेख. या क्षेत्रातले लोक नक्की कसे काम करतात, हे माहितीच नव्हतं. किती अवघड काम आहे खरंच. ते 'वीरगळ' मी पण काही गावांत बघितले होते, पण फार डोके ताणूनही त्यातले काहीच समजले नही. ती गजलक्ष्मी पण किती सुरेख! कित्येक पिढ्यांपुर्वीच्या लोकांची वंशजांशी संपर्क साधण्याची कला.. कुठच्याही भाषा किंवा लिपीपलीकडची.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'अवशिष्ट' म्हणजे काय?
लेखनाची शैली अतिशय ओघवती, सहज अन आकर्षक आहे. "..संतमहात्म्यांचे घर माझ्या नशीबात आल्याचे लक्षात येऊन मी धन्य धन्य होते!"; "...माणसंच काय पण उकीरड्यातली कुत्री आणि डुकरं पण आश्चर्याने बघत रहातात माझ्याकडे..." असले काही पंचेस सही आहेत. या सुंदर नॅरेशनमुळे वाचणारा गुंगत जातो, अन सांगितलेले सहज समजते. आणखी लिहा भरपूर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहे लेख गं वरदा.... खूप
मस्तच आहे लेख गं वरदा.... खूप वर्षांपूर्वीची आपली भागीमारी गावाची मोहीम आठवली!
तू खूप छान लिहिलं आहेस! अजून भरपूर लिखाणाची अर्थातच तुझ्याकडून अपेक्षा आहे. खरंच.... त्यामुळे नक्कीच अनेकांना प्रेरणा तर मिळेल, माहितीत भर पडेल, आणि आजूबाजूच्या परिसराकडे - ऐतिहासिक स्थळांकडे पाहण्याची एक शोधक दृष्टी मिळण्यास मदत होईल! तुला खूप खूप शुभेच्छा!!
सप्रेम
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
छान लिहिलंय. अजूनही वाचायला
छान लिहिलंय. अजूनही वाचायला आवडेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(मलाही रैना म्हणाली तसं इरावतीबाईंची आठवण झाली.)
रैना, स्वाती, इरावतीबाईंनी,
रैना, स्वाती,
इरावतीबाईंनी, दुर्गाबाईंनी पाडलेल्या अनघड पायवाटेचा आज मोठा हमरस्ता झालाय आमच्या क्षेत्रात! अनेक मुली अशा एकेकट्या दुर्गम भागात जाऊन भारतभर काम करताहेत. तितकंच श्रेय इरावतीबाईंनंतरच्या पिढीतल्या स्त्री संशोधकांचंही आहे. त्या तितक्याशा प्रसिद्ध नाहीत, पण त्यांनीही डोंगराएवढं काम करून ठेवलंय.. या सर्वांकडे पाहूनच आम्हाला खूप निराशेच्या क्षणीही प्रेरणा मिळते. आणि या सर्वांइतकंच श्रेय मी आमच्या (पुरुष) शिक्षकांनाही देते - त्यांनीही आम्हाला कधी स्त्री म्हणून वेगळी वागणूक दिली नाहीये.
साजिरा - अवशिष्ट म्हणजे उरलेला/ उरलासुरला. ते पांढरीचं टेकाड बरंचसं नष्ट झालंय आता, त्याचा काही भाग उरलाय फक्त म्हणून हा शब्द वापरला.
अरुंधती, कधीतरी वेळ मिळाला की आपल्या त्या भन्नाट भागीमारी ट्रिपबद्दल पण लिहेन. खरंतर तूच लिही ना-- मजा येईल!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच सुंदर. वेगळ काहीतरी
फारच सुंदर. वेगळ काहीतरी वाचायला मिळाल्याच समाधान मिळाल.कौतुक वाटल.
तुमचे फोटो बघुन मला उत्तर कर्नाटकतल्या काही भागांची आठवण झाली.
वरदा, लेख मस्त आहे. खूप
वरदा, लेख मस्त आहे. खूप आवडला. माझ्या टॉपटेनमध्ये घालतेय. वेळ मिळेल तेव्हा आणखी लिहा प्लीज. वाचायला आवडेल.
Pages