बटाटा मटार झणझणीत रस्सा भाजी - शून्य तेलातली

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 September, 2020 - 08:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वाटणासाठी:

  • ओले/सुके खोबरे कीस - १/२ वाटी
  • कोथिंबीर - १/२ वाटी
  • मध्यम कांदा चिरुन
  • मध्यम टोमॅटो चिरुन
  • आले १/२ इंच चिरुन
  • लसुण १०-१२ पाकळ्या सोलून
  • हिरव्या मिरच्या देठ काढुन - २

भाजी साठी:

  • मध्यम आकाराचे बटाटे - ४ -५, धूवून मोठ्या फोडी करुन, साली सकट.
  • ताजी/गोठवलेली मटार - १ मोठी वाटी
  • जिरे - १ छोटा चमचा
  • हिंग - १/४ चमचा
  • हळद - एक छोटा चमचा
  • गरम मसाला - १ चमचा
  • लाल तिखट - १ -२ चमचे आवडी नुसार
  • मीठ - १ छोटा चमचा
  • तेल - अजिबात नाही
  • पाणी - ३ कप
क्रमवार पाककृती: 

बिनातेलाची भाजी म्हटले की बहुतेकांना उकडेली बेचव भाजी असे वाटते.
जर तुम्हालाही असे वाटत असेल तर तुमचा गैरेसमज आता पूर्णपणे दूर होणार आहे.
शून्यतेलातूनही अगदी तशीच चवदार झणझणीत, अथवा हवी तशी मसालेदार भाजीही करता येते.
ही शून्यतेलातली भाजी आहे असे सांगीतल्या शिवाय खाणार्‍याला कळणार सुद्धा नाही.
आता पाककृतीकडे वळु या.

वाटणाचे सामान मिक्सर मधून काढुन वाटण करुन घ्या.
ओट्यावार हाताशी एका बाउल मध्ये पाणी घेउन त्यात एक चमचा ठेवा.
गॅसवर एकी कडे मंद आचे वर ३ कप पाणी गरम करायला ठेवा.
दुसरी कडे मध्यम आचेवर नॉनस्टिक कढई तापत ठेवुन त्यात अर्थात तेल अजिबात न घालता जिरे आणि हिंग घाला.
लाकडी सराट्याने (सराटा = उलथणे; विदर्भी शब्द) हलवत रहा.
जिरे तडतडले की त्यात वाटण घाला आणि ते ढवळत रहा.
त्यातले पाणी पूर्ण आटले आणि ते खाली चिकटतेय असे वाटते तेव्हाच त्यात जिथे चिकटतेय तिथे चमचा / दोन चमचे पाणी घाला आणि हलवत रहा.
पाणी आटते तेव्हा तपमान वाढलेले असते. न चिकटू देता / न करपु देता आपल्याला तपमान वाढते तेवढे वाढु द्यायचे आहे आणि जेव्हा चिकटु लागते तेव्हाच पाणी टाकायचे आहे. चिकटु नये म्हणुन आधीच पाणी टाकले तर तपमान वाढणार नाही आणि आपला मसाला व्यवस्थीत परतल्या जाणार नाही. तेव्हा हलवत रहाणे आणि चिकटु लागले की चमचाभर पाणी घालणे ही प्रक्रिया सुरु ठेवा.
जो पर्यंत खमंग वास सुटत नाही तो पर्यंत ही प्रक्रिया सुरु ठेवा. वाटण व्यवस्थित परतल्या गेल की वास सुटेल, आणि त्याला तेल सुटल्या सारखे दिसेल. असे झाले म्हणजे वाटण व्यवस्थित परतले आहे.

आता त्यात हळद, गरम मसाला, लाल तिखट, मीठ घालून कालवून घ्या.
मग बटाटे घालून व्यवस्थीत कालवून घ्या. मग त्यात तीन कप गरम पाणी घाला आणी छान उकळी येउ द्या.
मग त्यावर झाकण ठेवून पाच मिनीट बटाटे थोडे शिजवून घ्या.
आता त्यात मटार घालू्न बटाटे पूर्ण शिजवून घ्या.
गॅस बंद करुन भाजी वाढणीच्या भांड्यात काढुन घ्या आणि वरुन कोथींबीर घालुन सजवा.
(मी वरुन सजावटीसाठी कोथींबीर वेगळी काढायला विसरलो, आणि या खेपेला मी लाल तिखटही अजिबात घातले नव्हते. त्यामुळे फोटोत झणझाणीत रंंग दिसत नाहीय.)

झणझणीत बटाटा मटार रस्सा तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
चार ते पाच जण.
अधिक टिपा: 

इतर कुठली भाजी शून्यतेलात करायची असल्यास थोडी कांद्याची पेस्ट करुन घ्यायची आणि थोडा कांदा चिरुन घ्यायचा. मोहरी, जिरे तडतडिले की कांद्याची पेस्ट घालून लगेच चिरलेला कांदा घालून वरिल प्रमाणे नीट परतून घ्यायचा.

आपापल्या आवडीच्या मसाल्याप्रमाणे, आवडीच्या (कोल्हापूरी वगैरे) तिखटाप्रमाणे आपल्याला हवी तशी आणि तेवढी झणझणीत भाजी करु शकता.

माहितीचा स्रोत:
गावाकडच्या Recipe
Zero oil cooking by Dr. Bimal Chhajer

आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bhari

भरत, हो या भाजीत खोबरं वापरलंय खरं. (मी ओलं खोबरं वापरलं)
त्याचा शिजवण्यासाठी उपयोग होतो असे नाही, पण खोबरं हा तेलाचा स्रोत झाला.
हीच भाजी खोबरे न घालताही होते. भरपूर भाज्या अधिक टिपा मध्ये सांगितल्या प्रमाणे शून्य तेल आणि खोबरे / शेंगदाणे न वापरता करतो.

चांगली लागणार.
लहानपणी दळण आणण्यासाठी गिरणीत जायचो तेव्हा तिथे बसल्यावर भैय्याला बिनतेलाचा बटाटा रस्सा करताना पाहिलं आहे. आणि फुकटच्या पिठाचे फुलकेही. मिनिमलिस्टिक म्हणतात त्याला हे मोठेपणी कळले. शिवाय ओथेन्टिक आणि नेटिव. कारण वापरलेले पदार्थ उप्रत पिकणारे.

सर्वांना धन्यवाद.
मस्तच लागते भाजी, करून बघा आणि कळवा कशी लागली ते.

काल मी अशीच पण तेलातली केली होती. पुढच्या वेळी शुन्य तेलातली करून बघणार. खमंग वाटतेय तुमची पाककृती. धन्यवाद मानवदादा. Happy