मित्रांनो नमस्कार,
आपण माझ्या लेखावर दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे..
या लेखावर आलेल्या काही प्रतिसादांवर मी व्यक्त होऊ इच्छितो.
पहिली गोष्ट म्हणजे, मी माझ्या ब्लाॅगची आपल्या माध्यमातून जाहिरात करु इच्छितोय, हा गैरसमज आहे. पुन्हा मला माझ्या ब्लाॅगवर वाढलेल्या ट्राफिकमुळे पैसे मिळातात किंवा मिळतील, हा तर भलताच गैरसमज आहे. मुळात जेंव्हा मी मुंबईच्या इतिहासाबद्दल एखादा लेख लिहितो, तेंव्हा त्या मागे मी खूप काम केलेलं असतं. त्या विषयावरील पुस्तकं घेणं, त्या त्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देणं, जास्तीत जास्त अस्सल संदर्भ जमा करणं, अनेक माहितगार माणसांना भेटणं इत्यादी गोष्टींसाठी माझी मोठी पदरमोडही झालेली असते. मला त्याचं दु:ख नाही. मी हे माझ्या समाधानासाठी करतो.
हे लिखाण मी आणखीही एका गोष्टीसाठी करतो. ती आणखी एक गोष्ट म्हणजे, मुंबंईच्या इतिहासाची माहिती इथल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला व्हावी, ही. त्याला जर ही माहिती नसेल, तर त्याला मुंबईबद्दल प्रेम निर्माण होणार नाही. ह्या शहराचा इतिहास माहित असेल तरच ह्या शहराबद्दल प्रेम निर्माण होईल. म्हणून मी ही माहिती, माझं काहीही उत्पन्न नसताना, पदरमोड करुन इतरांना फुकटात वाचायला देत असतो. फक्त ती माहिती त्यांनी माझ्या ब्लाॅगवर जाऊन वाचावी, एवढीशी लहान अपेक्षा मी ठेवलेली आहे. यात मी चुकलो का, ते मला समजत नाहीय..!
मी यापुढचंही इथलं माझं लेखन, लेखाची ओळख व त्यासोबत ब्लाॅगची लिंक, अशाच पद्धतीने करणार आहे. तसं जर आपल्याला मान्य नसेल, तर मला तसं नि:संकोचपणे सांगावं. मी लिहिणार नाही. पण एका गोष्टीची मी आपल्याला खात्री देतो, मी जे देईन, तेवढी संदर्भासहितची डिटेल माहित किमान मराठीत तरी तुम्हाला कुठेही वाचायला मिळालेली नसेल वा नसणार..!
धन्यवाद..!!
माझं म्हणणं अधिक स्पष्ट करण्यासाठी मी लिहिलेला एक लेख सोबत पोस्ट करतोय, मग तुम्हा महानुभवांना माझं म्हणणं अधिक चांगल्या प्रकारे समजेल.
मुंबई शहर; खुल्या आसमानाखालचं संग्रहालय –
मुंबईबद्दल माझ्या मनात जबरदस्त कुतूहल आहे. ह्या कुतूहलाचा बीज माझ्या मनात पडलं त्याला कारणीभूत झाले दैनिक लोकसत्ताचे तत्कालीन संपादक डॉक्टर अरुण टिकेकर. नेमकं कोणतं ते आता आठवत नाही, पण १९९२-९३ साल असावं, डॉक्टर अरुण टिकेकरांची ‘जन-मन’ आणि ‘स्थल-काल’ नावांची एक साप्ताहिक लेखमाला त्यावेळी रविवारच्या लोकसत्तेत प्रसिद्ध व्हायची. मुंबईच्या गत तीन-चारशे वर्षांच्या वाटचालीत महत्वाची भुमिका बजावलेली विविध ऐतिहासिक स्थळ, मुंबई शहराला घडवणारी देशी-विदेशी (ह्यात ब्रिटिश जास्त हे ओघानेच येतं) व्यक्तिमत्व, इथले रस्ते आणि त्यांचा मुंबईच्या जडणघडणीत असलेला वाटा, इथल्या इमारती, गाड्या-घोडे इत्यादींची अत्यंत सुंदर शब्दांत टिकेकर माहिती देत असत. ती लेखमाला वाचताना डोळ्यासमोर तो काळ अक्षरक्ष: उभा करण्याचं सामर्थ्य टिकेकरांच्या शब्दांत होतं. मी. भान विसरून ते सारं वाचायचो, मनानेच त्या काळात क्षणबर जाऊन मी तो काळ जगायचे. मी तेंव्हाच ठरवलं होत की, पुढे कधीतरी संधी मिळताच टिकेकरांनी त्या लेखांतून दिलेल्या ठिकाणांना भेट द्यायची, मुंबईचा आपण आपल्या नजरेने शोध घ्यायचा म्हणून. मुंबईच्या वाटचालीचा शोध घ्यायचं बीज टिकेकरांनी माझ्या मनात माझ्याही नकळत पेरलं होत.
तशी संधी मला त्यानंतर जवळपास २५ वर्षांनी मिळाली. एव्हाना मी नोकरीतून मुक्त होऊन पूर्णवेळ वाचन आणि जमल्यास लेखन या माझ्या छंदांना देण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान माझ्या वाचनात इसवी सनाच्या १८६२ सालात गोविंद नारायण मडगांवकर यांनी लिहिलेलं, ‘मुंबईचे वर्णन‘ हे पुस्तक आलं. या काळाच्या मुंबईच मडगावकरांनी त्याकाळच्या मराठी भाषेच्या वळणात जे बहारदार वर्णन केलंय, त्याला तोड नाही. ते पुस्तक वाचताच, मला टिकेकरांच्या २५ वर्षांपूर्वीचे ते सारे लेख आठवले. मडगावकरांचं पुस्तक वाचून, जुन्या मुंबईवरील आणखी वाचन करण्याची उर्मी माझ्या मनात दाटून आली आणि वर्तमानातील मुंबईत, काळाच्या दीर्घ माऱ्याला तोंड देत अद्यापही टिकून असलेल्या जुन्या काळातल्या मुंबईच्या काही पाऊलखुणा शिल्लक आहेत का आणि असल्यास त्या कोणत्या परिस्थितीत आहेत, याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली.
सुरुवात करताना, मुंबईवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांच्या जास्तीच्या वाचनापासून केली. मुंबईवर विविध काळातल्या विविध लेखकांनी प्रचंड प्रमाणावर लेखन केलंय. ह्यातलं बरंचसं लेखन स्वातंत्र्यपूर्व काळात झालेलं आहे आणि ते बहुतेक सर्व इंग्रजीत आहे. मराठीतही मुंबईवर लेखन झालंय, पण त्याच प्रमाण खूपच कमी आहे. त्यातही, काही अपवाद वगळता, फारशी विस्तृत माहिती मिळत नाही. तरीही ती पुस्तकं मी मिळवून वाचली आणि जास्तीच्या संदर्भासाठी मी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचा सदस्य झालो. एशियाटिक सोसायटीत मुंबई ह्या विषयावरची इंग्रजीतली अनेक पुस्तक मला वाचायला, अभ्यासायला मिळाली. मुंबईवरच्या पुस्तकांचं वाचन करताना, ह्या विषयाचा एकूण आवाका आणि माझे एकूण इतर व्याप लक्षात घेऊन, माझा मुंबईवरचा अभ्यास, मुंबई शहरापुरता, म्हणजे कुलाब्यापासून पश्चिम बाजूस माहीम आणि पूर्व बाजूस सायन इथपर्यंतच मी मर्यादित ठेवला. काळाचा विचार करता, पोर्तुगीजांकडून मुंबईची बेटं १६६१ साली आंदण म्हणून जेंव्हा ब्रिटिशांकडे आली तेंव्हा पासून, ते साधारण आपल्या स्वातंत्र्यपर्यंतचा कालावधी मी अभ्यासाकरीता घेतला. माझ्या सारख्या इतिहासाच्या अभ्यासाचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या हौशी अभ्यासकासाठी ह्या मर्यादा आखून घेणं आवश्यक होत.
विविध पुस्तकातून जुन्या मुंबईचा शोध घेताना, मुंबई शहारातील म्युझियम्सना भेटी देणं साहजिकच होत. ह्यापूर्वी म्युझियमच्या आणि माझा संबंध लहानपणीच काय तो आला होता. काळा घोडा नजिकच्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमबद्दल त्यामुळे माहिती होती, पण बालपणीच्या ह्या म्युझियम भेटीमागे ज्ञानार्जनापेक्षा सहलीचा आनंद घेणे एवढाच हेतू होता. आता मात्र मी म्युझियम सजगतेने पाहायला सुरुवात केली. मुंबईच्या राणी बागेत भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय आहे आणि तिथे जुनी मुंबई उलगडून दाखवणाऱ्या अनेक वस्तू-शिल्पे आहेत हे मला ह्याच वेळी समजलं. भाऊ दाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर ब्रिटिश कालीन मुंबईवर अधिकार गाजवणाऱ्या आणि त्याकाळात मुंबईच्या फोर्ट भागात नाक्या नाक्यावर बसवलेल्या अनेक इंग्रजांचे पुतळे हारीने मांडून ठेवलेलं आढळले आणि मला पुस्तकातून माझ्या वाचनात आलेली जुनी मुंबई प्रत्यक्षात भेटायला सुरुवात झाली.
भाऊ दाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर ठेवलेल्या पुतळ्यांमध्ये मला राणी व्हिक्टोरियाचा, आता उन्हा -पावसाच्या माऱ्याने विद्रुप झालेला, परंतु कधीकाळी देखणा असलेला संगमरवरी पुतळा दिसला आणि पुस्तकात वाचलेली ह्या पुतळ्याची आठवण जागी झाली. राणी व्हिक्टोरियाच्या हा पुतळा चर्चगेट नजीकच्या सीटीओच्या मागे, म्हणजे आता जो टाटा कम्युनिकेशन्सचा (पूर्वीचं विदेश संचार लिमिटेड)उंच टॉवर उभा आहे, बरोबर त्या जागी होता. पण जुन्या पुस्तकातून पाहिलेल्या तिच्या पुतळ्याच्या चित्रात, एक शोभिवंत कलाकुसर केलेला संगमरवरी मखरही पाहिलेलं मला आठवत होतं. तो काही मला इथे दिसेना. मी म्युझियममध्ये चौकशी केली, पण त्यांनाही सांगता येईना. मग मी तो मखर कुठे असेल या दिशेने शोध घ्यायला सुरुवात केली. पुढे बऱ्याच काळाने इंटरनेटवर मुंबईवरचा लेख वाचताना, व्हिक्टोरियाच्या तो मखर जुहू येथे एका उद्योगपतीच्या बंगल्यात असल्याचं समजलं. लगेच तिथे गेलो, पण तिथे तो नव्हता. शोध सुरूच राहिला आणि अचानक एके दिवशी मला तो मखर मुंबईच्या नेपियन सी रस्त्यावरच्या एक आधुनिक इमारतीच्या दर्शनी भागावर असल्याचं कळलं आणि मी तो लगेच पाहूनही आलो. जुन्या मुंबईचा पुस्तकायुन वाचलेला, चित्रातून पाहिलेला अस्सल तुकडा, असा मला रस्त्यावर सापडला आणि माझ्या लक्षात आलं, की मुंबई शोधायची असेल तर, केवळ पुस्तक वाचून भागणार नाही, म्युझियमना भेटी देऊनही ती मिळणार नाही, तर डोळे उघडे ठेऊन रस्त्यातून फिरल्यासच ती सापडू शकेल. आणि मी मुंबईचा शोध तिच्या रस्त्यावर उतरून घ्यायला सुरुवात केली आणि जुनी मुंबई माझ्या डोळ्यासमोर, मधला काळाचा जाड पडदा दूर करून येऊन उभी राहू लागली.
त्याच दरम्यान कधीतरी मुंबईत अजुनही अस्तित्वात असलेल्या ब्रिटीश कालीन माईलस्टोन्सची माहिती देणारा एक लेख माझ्या वाचनात आला. त्यातील एक माईलस्टोन माझ्या नेहेमीच्या रस्त्यावर, दादरच्या आंबेडकर मार्गावर असलेल्या चित्रा सिनेमासमोर असल्याचं समजलं. लगेच तिथे गेलो अगदीच दुर्लक्षित आणि बेवारस स्थितीत असलेला तो मुंबईच्या गेल्या दोन-अडीचशे वर्षांतील बदलांचा ऐतिहासिक मूक साक्षीदार पाहून मला भरून आलं. त्याच्यासमोर उभा राहिलो आणि दादरच्या आंबेडकर रोडवरची प्रचंड वाहतूक माझ्या समोरून आपोआप नाहीशी झाली. कडेला घनदाट झाडी असलेला, तेंव्हाही आता एवढाच रुंद असलेला आंबेडकर रोड नाहीसा होऊन त्याजागी ब्रिटिश काळातला व्हिन्सेंट रोड मला दिसू लागला. बग्गीतून जाणारे विदेशी लाटसाहेब आणि देशी व्यापारी, बैलगाडीतून जाणारे एतद्देशीय त्या रस्त्यावरून जाताना मला दिसू लागले. त्यावेळची साधी, तरीही मनाला मोहवणारी मुंबई मला दिसू लागली. हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता. मला टाईम मशिनमधून दोन-अडिचशे वर्षांचा उलटा प्रवास केल्याचा अनुभव आला. असाच अनुभव मला पुढे सायन, आर्थर रोड, दादरच्या कबुतर खान्याजवळचा माईलस्टोन्स पाहताना आला.
त्या माईलस्टोन्सवर असलेला चर्चगेटच्या सेंट थॉमस ह्या १८१८ साली बांधकाम पूर्ण झालेल्या चर्चचा उल्लेख पाहुन मी त्या चर्चला भेट दिली. तिथे तर मुंबईच्या इतिहासाला वैभवशाली बनवणारे अनेक ब्रिटिश दिग्गज चिरनिद्रा घेत असल्याचं मला समजलं. त्यातलादेणारा, तो ही चर्चमध्ये, देणार हा मला माहित असलेला एकमें ख्रिश्चन मानून. एकमनव त्याची समाधी ह्या चर्चमध्ये आहे असा उल्लेख मला अन्य एका पुस्तकांतही सापडला होता, ती मी प्रत्यक्ष पहिली. जोनाथन डंकन, ज्याने मुंबई उपनगराशी रास्ता मार्गाने जोडण्याचा सर्वात पहिला यशस्वी प्रयत्न केला. तो रस्ताही त्याने श्रमदानातून बांधून घेतला होता आणि खर्च वसूल करण्यासाठी त्या रस्त्यावर टोलही बसवला होता. हा देशातला पहिला टोल रोड. ऐतिहासिक महत्वाचा हा एकेकाळचा हमरस्ता, आज दिनवाणा होऊन एका बाजुला पडलेला अजुनही पाहाता येतो. मी पाहिला. त्यावरुन अदबीने चार पावलं चाललोही.
गव्हर्नर म्हणून डंकनचं वास्तव्य ज्या इमारतीत होतं, ती देखणी इमारत ह्या चर्चपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. वेळ मिळाला तशी ह्या इमारतीही भेट दिली. याच इमारतीत डंकनचं निधन झालं होतं. आज वडापाव, सॅडविच आणि चहाच्या ठेल्यांनी वेढलेली फोर्टमधली ही देखणी इमारत म्हणजे, त्या काळचं ‘गव्हर्नमेट हाऊस’, म्हणजे आजच्या भाषेत ‘राजभवन’,होतं. त्याचा अभ्यास करताता मला समजलं की, मलबार हिलवर असलेलं ‘राजभवन’ धरून मुंबईत एकून पांच राजभवन(गव्हर्नमेंट हाऊस’) आहेत आणि त्यातील चार तर आजही सर्वांना पाहाता येतात, हे समजलं आणि त्या चारही वास्तूंमधे मी फिरुन आलो. ती राजकीय खलबतं, हल्ले आणि तहनाम्याच्या चर्चा आणि कारस्थानही ऐकलेल्या तिथल्या भिंतींवर हात फिरवला. तो काळ नजरेसमोर आणला. त्या काळात क्षणभर वापरूनही आलो.
मुंबईच्या आणि देशाच्याही औद्योगिक जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या जमशेटजी नुसेवानजी टाटा यांच्या फोर्टमधल्या मूळ घरावरून लाखो मुंबईकर दररोज ये जा करतात. मी ही करायचो. पण ते टाटांचं घर आहे हे मला एका पुस्तकातून समजलं आणि नंतर माझी त्या घराकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली. तिथूनच पुढे काही मीटर्सवर त्यांचा पुत्र नवल टाटा यांचं हवेली सारखं प्रशस्त घर आहे, ते ही मला सापडलं. मी इथे गेलो. माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखी असणाऱ्या त्या दोन्ही वास्तू नव्या दृष्टीने डोळे भरून पाहिल्या. त्या समोरच्या रस्त्यावरून जाणारी टाटांची, पहिल्या भारतीयाची देशातील पहिली मोटरगाडीही मला दिसू लागली.
जोनाथन डंकन, राजभवन किंवा जमशेदजी टाटा ही केवळ काही उदाहरण झाली. पुढे मी मुंबईतील ऐतिहासिक अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. ती ती ठिकाणं, मधला तीन-चारशे वर्षांचा काळाचा पडदा कल्पनेनं दूर करून, त्या त्या काळात कल्पनेनेच जाऊन पाहण्याचा, अनुभवण्याचा नवाच छंद मला जडला. त्यात मुंबईची प्राचीन देवस्थान आहेत, दर्गे आहेत, चर्च आहेत, रस्ते आहेत, गल्ल्या आहेत, पूल आहेत आणि मुंबईच्या कुशीत, तीन-चारशे वर्षांपूर्वीच पोर्तुगीजकालीन वैशिष्ट्य आजच्या काळातही टिकवून जगणारं एक अक्ख गावही आहे. ही सर्व माहिती अनेक पुस्तकांतून दिलेली आहे, पण मुंबई पुस्तकांतून आणि म्युझियममधून मला जेवढी समजली, त्याहीपेक्षा ती प्रत्यक्ष त्या त्या जागेवर जाऊन पाहिल्यानंतर कितीतरी पटीने जास्त चांगली समजली. किंबहुना, अखंड मुंबई शहर हेच एक मोठं पुस्तक आणि खुल्या आभाळाखालच संग्रहालय आहे, मुंबई खुल्या आसमानाखाली जेवढी चांगली समजते, तेवढी पुस्तकाच्या उघडलेल्या पानातून आणि बंदिस्त वस्तुसंग्रहालयातून समजत नाही, मी हे मुंबईविषयी बोलत असलो तरी, हे आपल्या देशातील प्रांतांना, ठिकाणांना, शहरांना सारखंच लागू असलेलं समीकरण आहे. इतिहास पुस्तकातून वाचता येतो, संग्रहालयातून त्याचे काही जीर्ण तुकडे पाहताही येतात. पण इतिहास साक्षात अनुभवायचा असेल तर, त्या त्या ठिकाणांना भेटी देण्याला पर्याय नाही..!
मी पाहिलेल्या मुंबईतील ऐतिहासिक ठिकाणांचा मला आलेला अनुभव मी शब्धबद्ध करत गेलो आणि तो पुस्तकी संदर्भासहित सोशल मीडियावर लोकांसाठी टाकत गेलो. त्याला प्रचंड म्हणावा असा प्रतिसाद मला मिळाला. माझ्या लेखांतून उल्लेख केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आल्याचही मला अनेकांनी कळवलं. मुंबईच्या इतिहासात रस निर्माण होऊन, अनेकांनी त्या इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात केल्याचाही मला आवर्जून सांगितलं. रोज पाहण्यात येणारी मुंबईतली काही ठिकाण, पायाखालचा एखादा रोजचा रस्ता, एखाद देऊळ ऐतिहासिक दृष्ट्या किती महत्वाचं आहे हे लोकांना समजलच नाही तर, त्यांना त्याच महत्वच समजणार नाही आणि एखाद्या गोष्टीच महत्वच समजलं नाही तर त्याविषयीचा अभिमान निर्माण तरी कसा होणार?
एक उदाहरण सांगतो. परेलच्या चौकात, जिथे आज महानगरपालिकेच्या एफ विभागाचं कार्यालय आहे, त्या चौकाला ‘मडकेबुवा चौक‘ असं नांव दिल आहे. ह्या ठिकाणाला आदल्या पिढीचे लोक ‘परेल पोयबावडी‘ किंवा ‘परेल टीटी‘ म्हणून ओळखायचे. मुंबईतील वाहतुकीचा मुख्य साधन घोडागाड्या, बैलगाड्या असतानाच्या काळात इथे त्या गाडयांना जुंपलेल्या घोडयाना किंवा बैलांना पाणी पाजायचं हे ठिकाण होत. त्याच्या समोरच्या बाजूला पारेलच ट्राम टर्मिनस होत, जिथून ट्राम परतीचा प्रवास सुरु करत सत. आजच्या पिढीपैकी किती जाणं हे माहित असेल या बषांकाचं आहे. आज त्या चौकात नांव ‘मडकेबुवा चौक आहे. एका महत्वाच्या चौकाला ज्यांचं नांव दिलाय, ते मडकेबुवा कोण होते, त्यांचं चरित्र काय, त्यांनी मुंबई शहरासाठी नेमकं काय केलाय, हे किती मुंबईकरांना माहित आहे? दहा पैकी आठ जणांना ते माहित असण्याची शक्यताच नाही. आता जे माहीतच नाही, त्याविषयी प्रेम, आपुलकी कशी काय निर्माण होणार.? मग तसं प्रेम, आपुलकी निर्मण होणासाठी काय करावं लागेल? तर काही भव्यदिव्य करायची गरज नाही. एक लहानशी पाटी, जीवर त्या ठिकाणचा इतिहास संक्षिप्त पद्धतीने लिहिला गेलाय, अशी तिचे लावली तरी मोठं काम होण्यासारखं आहे. फोर्ट मधल्या काळा घोड्याची अशी माहिती तिथे दिल्याने, त्या ठिकाणाचं वेगळेपण लोकांना माहित होऊ लागलय आणि त्यांची त्या ठिकाणाकडे पाहायची दृष्टीच बदलून गेलेली मी अनुभवलंय.
पाश्चिमात्य देशात इतिहास कितीही काळाकुट्ट असला तरी तो निगुतीने सांभाळला जातो. तो इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा तिथल्या वैयक्तिक, सरकारी आणि संस्थापातळीवर यशस्वी प्रयत्नही केला जातो. येणाऱ्या पिढयांना आपल्या भूमीचा, निदान आपण राहतो त्या ठिकाणचा इतिहास, तो घडवणाऱ्या आपल्या पूर्वजांची कर्तबगारी माहित असेल तर आणि तरच त्या पिढीची इतिहासाशी नाळ जोडली जाऊ शकते आणि आपल्या देशाविषयी, भूमीविषयी, प्रांताविषयी वा अगदी शहराविषयीही तिच्यात अभिमान निर्माण होऊ शकतो. परदेशातून असे करण्यात तिथल्या अभ्यासकांचा,साहित्यिकांचा, कलावंतांचा आणि अगदी सरकारचाही प्रयत्न सुरु असतो. आपल्याकडे त्याविषयी उदासीनताच दिसते.
तसं आपल्याकडेही इतिहासाचं लेखन होतं, नाही असं नाही. पण ते बरंचसं इंग्रजी भाषेत असतं किंवा मग कुठल्यातरी ग्रंथालयातील कपाटाची शोभा आणि धूळ वाढवीत असतात. सामान्य लोकांना समजेल अशा लोकभाषांमधे इतिहासाचं फारसं लिखाण होत नाही, काही तुरळक सन्माननीय अपवाद सोडले तर, मराठीत तसे फारसे प्रयत्नही होताना दिसत नाहीत. नवीन पिढीला आपल्या इतिहासाची ओळख करून देण्याची जबाबदारी आपण आणि म्हणून नवीन पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाविषयी काहीच कल्पना नसते आणि ज्याची काही कल्पनाच नाही, त्याचा अभिमान निर्माण व्हायचा तरी कसा, याचा विचारही कुणी करताना दिसत नाही.
मुंबई हे सर्वांचं आश्रयस्थान आहे असं सर्वच म्हणतात, परंतु मुंबई हे माझे घर आहे असं म्हणताना सहसा कोणी आढळणार नाही..आपल्या घराची जशी आपण आपुलकीने देखभाल करतो, त्याला जपतो, घराचा इतिहास जपला जातो, अभिमानाने मिरवला जातो.. धर्मशाळेबाबत अशी कोणतीच भावना कोणाच्या मनात नसते..आपल्या मुंबईचं नेमकं हेच झालंय.।.
इथल्या रस्त्यावरून चालताना सहज म्हणून पायाने उडवलेला दगडही त्याच्या उरात इतिहास जपून आहे. तो माहित नसतो म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि आपल्या शहराबद्दल आपल्या उरात प्रेम निर्माण होत नाही. ते व्हावं असं वाटत असेल तर, आपल्यापैकी प्रत्येकाने इथला इंच न इंच सजग नजरेने पहिला पाहिजे. आणि ज्यांना ह्याबद्दल माहिती आहे, ती त्यांनी लोकांच्या भाषेत उपलब्धही करून दिली पहिले. तर आणि तरच आपल्या शहराबद्दल प्रेम निर्माण होऊ शकेल
आपली मुंबई हे एक खुलं पुस्तक आणि खुल्या आभाळाखालच एक म्युझियम आहे. फक्त तए पुस्तक आणि म्युझियम पाहण्याची दृष्टी खुली हवी.. !! तशी दृष्टी देण्याचं काम लोकभाषेत लिहिणाऱ्या इतिहासकारांचं आहे, लेखकांचं आहे आणि शासनाचंही आहे.
– नितीन साळुंखे
9321811091
सर आपण खुपच तळमळीने लिहले
सर आपण खुपच तळमळीने लिहले
आहे. बऱ्याच दिवसांनी इतका माहितीपुर्ण लेख वाचायला मिळाला. धन्यवाद.
फारच सुंदर लेख. आपल्याकडे
फारच सुंदर लेख. आपल्याकडे असा शहरांचा आणि गावांचा मोठा इतिहास आहे. त्याबद्दल तळमळीने अभ्यास केल्याबद्दल अभिनंदन आणि आम्हास ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
तुमचा मागचा लेख वाचला आणि त्याखालची टीप वाचल्याने "आले अजून एक जाहीरात करणारे" अशी धारणा झाली होती. पण या लेखामुळे तुम्ही खरच अभ्यास केला आहे हे कळले.
पुढील लेखनाला शुभेच्छा. आम्ही वाचत राहू !!
छान लेख आणि प्रस्तावना. नितिन
छान लेख आणि प्रस्तावना. नितिन साळुंखे, तुमचा उद्देश, एकादी गोष्ट करण्यामागे असलेला मोटिव्ह एकदा समजला की तुमच्या लेखांकडे वेगळ्या नजरेतून बघितले जाते. कंटेंट उत्तम असेल तरी मोटिव्ह माहित नसला तर मनाची पाटी कोरी ठेवून वाचलं जातच असं नाही, थोडं हातचं राखुनच वाचलं जातं.
तुमच्या पहिल्या लेखात फारच जुजबी माहिती आणि आणखी माहिती साठी ब्लॉग कडे जा असं लिहिलेलं असल्याने माझ्याही मनात 'ब्लॉगची जाहिरात आणि ट्रॅफिक वाढवून मॉनेटरी गेन' असेल बहुतेक हेच आलेलं. अर्थात त्यात गैर काहीच नाही. पण नव्या/ अनोळखी व्यक्तीने पहिल्याच लेखात ब्लॉग बघा सांगणे हे थोडं औचित्याला धरुन नाही वाटले आणि पूर्वानुभावरुन मनात स्टिरिओटाईप बनल्याने वेगळ्या प्रकारे बघितले गेले. इतरांचे ही गेले असावे. असो.
आणखी वाचायला आवडेल. इथे लेख लिहा असंच सुचवेन.
साळुंखेसाहेब, मस्त लिहिलंय.
साळुंखेसाहेब, मस्त लिहिलंय. मुंबई म्हणजे हृदयातला एक हळवा कोपरा, कुणिहि आणि कधीहि हा असा समोर उलगडुन मांडला कि अतिशय आनंद होतो.
तुमचा दुसरा, माहिम कॉजवे वरचा लेख संपुर्ण अजुन वाचला नाहि, पण वाचणार नक्कि. इथे संपुर्ण टाकायचा फेरविचार करा, प्लीज. कारण माझ्या अल्पशा माहितीनुसार अर्धा लेख, किंवा नुसती प्रस्तावना इथे आणि उर्वरीत ब्लॉगवर, हे मायबोलीच्या धोरणात बसत नाहि. (चूभूद्याघ्या) माबोच्या या नियमामुळे आणि तुमच्या क्रमशः लेख पोस्ट न करण्याच्या स्टँड मुळे तुमचे पुढिल लेख वाचायला मिळतील कि नाहि याची चिंता वाटतेय. असो.
वर लेखात जोनॅथन डंकनने बांधलेल्या उपनगरीय टोल रस्त्याचा उल्लेख आलेला आहे. हा कुठला रस्ता? सध्याचा इस्टर्न एक्स्प्रेस, कि "ओल्ड आग्रा" (एल्बीएस) रोड?
फोटो?
फोटो?
धन्यवाद मित्रांनो..
धन्यवाद मित्रांनो..
जर का एखादी गोष्ट आपल्या नियमांत बसत नसेल तर तू मी करणार नाही. मला नियमात राहायला आणि नियमाने वागायला आवडतं. पण तसं करताना, मी माझेही काही नियम माझ्यासाठी(च) घालून दिले आहेत, त्याच्याशी तडजोड मलाही शक्य नाही. सबब, मला हा समूह आवडलेला असल्याने, मी इथे एक वाचक या नात्याने जोडलेला राहिन. मी आपल्या समूहाच्या नियमांचा आदर करतो. तसंच आपण सर्वांनी माझी भुमिकाही समजून घ्यावी, अशी आपणांस नम्र विनंती करतो..
धन्यवाद जी..!!
छान लेख
छान लेख
पण मुंबईतील दोन फोटो तरी टाका
पण मुंबईतील दोन फोटो तरी टाका ना!
साहेब, जुन्या मुंबईचे बक्कळ
साहेब, जुन्या मुंबईचे बक्कळ फोटो नेटवर उपलब्ध आहेत. पुन्हा मी संगणक हाताळणीत अद्याप पूर्व प्राथमिक यत्तेत असल्याने, मला ते कसे अपलोड करायचे, ते समजत नाहीय सर..
छान लिहिले आहे. मी मुंबई
छान लिहिले आहे. मी मुंबई पाहिलीच नाहिए फक्त ऐकून आणि टिव्ही मध्ये बघूनच माहिती आहे.
ओके.
ओके.
एक प्रसंग आठवला. शीव ( आता सायन म्हणतात, पण = वेस. ) आणि शीवचा किल्ला. लहानपण तिकडं गेलं. दुसरा माहीमचा. तिसरा वडाळा- शिवडीचा. पण हे किल्ले म्हणजे सात बेटं होती तेव्हाची ठाणी होती टेहळणीची. एकदा एक रस्ता खोदला होता ('६८) त्या मातीत खूप दगडी गोळे निघाले फुटबॉल एवढे. हेच समुद्रातल्या जहाजांवर फेकत असावेत.
छान विस्तृत ,माहितीपूर्ण
छान विस्तृत ,माहितीपूर्ण लिहिले आहे. लहानपणी एकदा मुंबई दर्शन केले होते बसमधून दिवसभर तेवढीच मुंबई माहिती होती.
मुंबईचा इतिहास बडा रंजक आहे.
मुंबईचा इतिहास बडा रंजक आहे. मी एकूण ५० भाग लिहिलेयत. तुम्हाला ते पुस्तकात वाचायला मिळतील. आणि मी जी माहिती देईन, ती तुम्ही इतरत्र कुठेच वाचलेली नसणार..
नितीन दादा, ते म्हणतात तसं
नितीन दादा, ते म्हणतात तसं फोटो टाकायचं तंत्र आत्मसात करणं आता मनावर घ्याच. लेख छान आहे, परंतु तुम्ही जे बारकावे सांगता ते लक्षात यायला सोबत फोटो हवेत. गुगल वर ते बारकावे टिपणारे फोटो सापडतीलच असं नाही. अथवा, निदान इथे त्या फोटोच्या लिंक्स द्या (हे माबो च्या नियमात बसतं का माहीत नाही, त्यामुळे तुम्हीच फोटो टाकणं श्रेयस्कर). फोटो सकट वाचायला खूपच मजा येईल!
पालवसाह्ब, मी तुमच्या
पालवसाह्ब, मी तुमच्या सुचनांचा आदर करतो. पण तुम्ही म्हणता तसं करणं मला अवघड आहे. जुन्या मुंबईवरचे माझे लेख तुम्हाला वा इतर कुणालाही वाचायचे असतील तर, तुम्हाला माझ्या ब्लाॅगला भेट द्यावी लागेल. त्याला माझा नाईलाज आहे..
बाय द वे, १२५ वर्षांपूर्वीचं दादर पश्चिम कसं होतं, याचा पुराव्यांसहितचा नवा लेख मी लिहितोय. व्हेरी इंटरेस्टींग. मी अस्सल पुपावे शोधण्यासाठी जीवाचं रान करतो(ही माझी हौस आहे. त्यामुळे मी कुणावर उपकार करतो, असं मी समजत नाही आणि तुम्हीही समजू नका). मग तुम्हा सर्वांना माझ्या ब्लाॅगवर भेट द्यायचे थोडेसे कष्ट घ्यायला काहीच हरकत नसावी..होय ना?
४०-४५ वर्षांपूर्वी ' ललित'
४०-४५ वर्षांपूर्वी ' ललित' मासिकाच्या दिवाळी अंकांत श्री ना पेंडसे यांचा दादरच्या आठवणी असा लेख आला होता. त्यांनी खूप जुन्या, काही ऐकीव, काही लिखित घटना आणि काही स्वानुभव असे बरेच काही लिहिले होते आणि ते खूप रंजक होते.
श्री. ना. च्या त्या आठवणी
श्री. ना. च्या त्या आठवणी माझ्या संग्रहात आहेत बरं का..!
'त्या आठवणी आणि इतर काही अस्सल माहिती असलेला लेख 'आजचं दादर पश्चिम, 1895 सालात, म्हणजे 125 वर्षांपूर्वी कसं होतं', ती कथा लवकरच माझ्या ब्लॉगवर वाचा..
साष्टीची बखर ऊर्फ वसईचा
साष्टीची बखर ऊर्फ वसईचा धर्मसंग्राम या नावाचे एक जुने पुस्तक scan करून मी जालावर अपलोड केले आहे. फॉन्ट मध्ये आणायचे आहे पण सध्या वेळ नाही. कै न. चि. केळकर यांचे चिरंजीव इतिहास संशोधक य. न. केळकर यांनी गेल्या शतकाच्या सुरुवातीला या हस्तलिखिताची संपादित आवृत्ती प्रसिद्ध केली होती. पण मी अपलोड केलेले पुस्तक अधिक माहितीपूर्ण आणि खोलात जाऊन संशोधित आणि संपादित आहे असे मला वाटते.
वाह. तो लेख आहे का तुमच्याकडे
वाह. तो लेख आहे का तुमच्याकडे? छानच.
मला मुंबईच्या स्थळ नामांत (त्यांच्या उगमाविषयी) खूप रस आहे. काही माहिती आणि तर्क आहेत.
छान लेख आहे. आवडला. तो ब्लॉग
छान लेख आहे. आवडला. तो ब्लॉग वरचा माहीम कॉजवेवरचाही आवडला. पुस्तक प्रकाशित झाले की जरून इथे अपडेट करा. इण्टरेस्ट आहे ते विकत घेउन वाचण्यात.
बाकी तुमच्या ब्लॉगवरचे किती लेख इथे द्यायचे तो तुमचा चॉईस आहे. फक्त जे इथे लिहाल ते स्पेसिफिक लेख पूर्णपणे इथे द्या इतकेच. या लेखांमधून तुमची मेहनत जाणवते आहे. तेव्हा ब्लॉगवर व पुस्तकांमधेही ते पुढे वाचण्यात इण्टरेस्ट आहेच. मुंबईचे फॅसिनेशन लहानपणीपासून असल्यानेही आवडेल वाचायला.
इथे लिहाल ते स्पेसिफिक लेख
इथे लिहाल ते स्पेसिफिक लेख पूर्णपणे इथे द्या इतकेच.
हा लेख दिलात तसेच लिहा. ब्लॉगवर जाण्याचा धोशा कशाला? लेखात किंवा अकाउंटला ब्लॉगचा पत्ता द्या. वाचणारे वाचतातच. इथे कित्येकांचे वाचनीय ब्लॉगज आहेत पण कधीही तिकडे जाण्याचा आग्रह नसतो.
मायबोली किंवा इतर संस्थळांंतून आपल्या आवडीच्या विषयावर गप्पा मारणे हा आहे. ते ब्लॉग माध्यमातून होत नाही.
खूप च माहितीपूर्ण लेख. तो
खूप च माहितीपूर्ण लेख. तो लिहिण्यामागची तुमची तळमळ आणि त्यासाठीचे परिश्रम जाणवतात तुमच्या लेखामधून.
धनि आणि अमितव यांच्या
धनि आणि अमितव यांच्या प्रतिसादांना दुजोरा.
बाकी तुमच्या मताचा आदर आहेच.
पण पुस्तक प्रसिद्ध झाले की नक्की कळवा.
नक्कीच विकत घेऊन संग्रही ठेवण्याइतके चांगले होणार हे वरील लेखावरून जाणवते आहे.