लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- कविन

Submitted by कविन on 29 August, 2020 - 06:18

"You-Know-Who"

सध्या त्याने थैमान घातलय
सध्या त्याने होम अरेस्टवर पाठवलय

बातम्या म्हणू नका
सोशल मिडीया म्हणू नका
त्याने सगळच हायजॅक केलय

तो म्हणजे तोच हो तो, you know who! right?

हे असं त्याच्याबद्दल लिहून काढलं त्यालाही महिना दिड महिना होऊन गेलाय आता. आधी तो तसा दूर म्हणजे परदेशगमनाची हिस्टरी असलेल्यांशी सलगी दाखवून होता. नंतर हळूहळू हात पाय पसरत माझ्या गावातही येऊन पोहोचला. अमुक ईमारत सील, तमुक भाग सील अशा बातम्या ऐकता ऐकता खरोखर आमच्या भागात याची डोळा अशी परिस्थिती बघितली आणि जवळ म्हणजे किती जवळ आलाय हा याची जाणीव झाली.

तरिही तसा तो त्याच्या जागी आणि आम्ही आमच्या जागी, मधे बॅरिअर ठेवून वावरत होतो. सॅनिटाईझ करा, हात धुवा, अधूनमधून वाफारा घ्या सुरु होते. वर्क फ्रॉम होमही यथातथाच सुरु होते त्यामुळे रिकामा वेळ भरपूर हाताशी मिळाला होता. त्यावेळेत करायचे काय?, असलेही प्रश्न पडत नव्हते इतके काय काय करुन पाहिले जात होते.

अमेझॉन प्राईमवर सिनेमांच्या जोडीला पुस्तकांचाही खजिना उपलब्ध होता. बागकामाचे यूट्यूब व्हिडीओ आणि ब्लॉग्ज वाचून प्रयोग करुन पहाण्याइतका निवांत वेळ हाताशी होता. स्वयंपाक घरातही अधूनमधून वेळखाऊ पदार्थ करुन पहायची इच्छा उचल खात होती, तर कधी आता बाहेर उपलब्धच नाही म्हणतही आजवर न केलेले प्रयोग करुन पहाण्यात वेळ बऱ्यापैकी मजेतच जात होता. सगळ्यांसोबत लॉकडाऊन व्हिडीओ करण्यातली मजाही घेऊन झाली. write in times of corona नावाच्या मैत्रिणीच्या फेसबुक गृपवर थोडीफार खर्डेखाशीही करुन झाली.

आपल्या डोक्यावर छप्पर आहे, खायला दोनवेळचं व्यवस्थित मिळत आहे, याचाच अर्थ आपण सध्या सुखी जीव आहोत. किमान त्या आघाडीवर आपल्याला काळजीचे कारण नाही आहे याबाबत आभार मानत, 'घरातच तर रहायचय राहू की मजेत न रडता, आपलच तर घर आहे' असं म्हणत ज्यांना हे सूख नाही त्यांचं काय होत असेल? याची टोचणी, जुजबी मदत करत किंवा मदतीच्या सेतूत खारीचा वाटा उचलत थोडी कमी करुन झाली किंवा तसा मनाला भ्रम तरी करुन देण्यात थोडेफार यश आलं.

पण या सगळ्यात 'तो' त्याच्या जागी आणि 'आम्ही' आमच्या.. मधे एक भक्कम फळी होती. त्यामुळे जरी वर्तमानपत्रे, न्युज चॅनल्स दिवसभर आकड्यांची चढती कमान दाखवत असले तरी, "आपण घेतोय की काळजी" या वाक्याने मनाला शांती लाभत होती.
नाही म्हंटले तरी जेव्हा घराजवळ आणि ओळखीत केसेस आढळल्या तेव्हा या शांतीला थोडं भगदाड पडायला सुरुवात झाली तरीही तसा तो पल्याडच होता आणि अचानक एकदिवस 'तो' आमच्या घरात येऊन दाखल झाला, अगदी बेलही न वाजवता, पावलांचा आवाजही न करता दाखल झाला, तेव्हा मात्र पायाखालची जमीनच हादरली.

अर्धांग 'आवश्यक सेवा विभागात' कामाला असल्याने रोज ऑफीसला जात होता. त्याच्या डिपार्टमेंटमधेही कुठे कोणी पॉझिटिव्ह निघाल्याचे समजत होते. थोडी भिती वाटायची पण आल्यावर अंघोळ करणे, कड्या नळ वगैरे सॅनिटाईझ करणे, त्याचे कपडे वेगळे धुणे वगैरे सुरु होतेच. पण इतके करुनही हा मात्र खुशाल घरात शिरला गुपचूप. नवरा पॉझिटिव्ह म्हणून आमच्या टेस्ट करुन घेतल्या तर आम्हीही पॉझिटिव्ह. 'हम साथ साथ है' सिनेमाचा शो'च जणू.

नवऱ्याला ब्रॉन्कायटीसची हिस्टरी म्हणून आयसोलेशन सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला मिळाला आणि आम्ही होम क्वारंटाईन. पहिले दोन दिवस मला, आम्हा तिघांच्याही काळजीने झोप लागली नाही. लागलीच तर मधेच हाक मारल्याचा भास होऊन दचकून जाग यायची. मनाला तेव्हाच म्हंटले, "बेटे तुम इस खेल मे महत्वपूर्ण खिलाडी हो, तुम्हे तन के साथ साथ चलना है, रुकना नही |"

ज्यांना समजले त्या प्रत्येकाने 'काळजी घ्या, काळजी करु नका' असे सांगितले. आदर्श वाक्यरचना आहे ही पण व्यवहारात आचरणात आणायला महा कठीण. बुद्धीला कळतं पण मनाला कळत नाही. त्यातून जर तुमच्या वयाची तुमच्या रोजच्या परिचयातली मैत्रिण जर या साथीने तुम्ही गमावली असेल, अगदी थोड्याच दिवसांपूर्वी तर कितीही काहीही म्हणा मन वेडं भिरभिरुन दमतच.
आणि जर तुम्हाला लिखाणाचा किडा असेल तर नको तिथे कल्पनेचे वारु सुसाट धावत सुटते.
एरव्ही तुम्ही जर सकारात्मकतेचे पुतळे समजत असाल स्वतःला तर ही नकारात्मकता येण्याचाही ताण येतो. त्यातून आमच्या भागात एक मशीद आहे आणि तिथे जे काही अनाऊन्स होते ते त्या भागात सगळ्यांना ऐकू जावे म्हणून समोरच्या ईमारतीवर स्पिकर बसवला आहे. एरव्ही प्रार्थना वगैरे ठीक पण या दरम्यान तिथे "मैयत का ऐलान है" अशी सुरुवात होऊन घोषणा ऐकायला मिळायच्या आणि त्या सुचना जेव्हा दिवसाला एक किंवा दोन अशा रेटने त्याच आठवडाभरात ऐकू यायला लागल्या तेव्हा आधीच भित्र झालेलं, हळवं झालेलं मन वेड्यासारखं वागू लागलं, या सगळ्याचा ताण घेऊ लागलं.

यावर उपाय करायला हवा हे कळत होतं कारण मानसिक तणाव शरिरावर परिणाम करतो हे ही माहिती होते.

मग ठरवले आपले आपण उपाय शोधायला हवेत यावर. यावर म्हणजे मानसिक स्थितीवर. कारण कोविडची तीव्र अशी शारीरिक लक्षणे नव्हती. ताप नव्हता, कफ नव्हता. ब्रिदिंग इश्यू नव्हता, बिपी डायबेटिस किंवा तत्सम काही को मॉर्बिड सिच्युएशन नव्हती ही तब्येतीच्या दृष्टीने जमेची बाजू होती. चार पाच दिवसांनी loss of smell मात्र जाणवले. कफ नव्हता पण ड्राय कफ काही दिवस जाणवत होता तो त्रासही नंतर कमी होत बंद झाला.

BMC Health workers आम्हाला झिंक मल्टिव्हिटॅमिन टॅबलेट्स देऊन गेले होते आणि पहिल्या दिवशी टेंपरेचर बिपी आणि ऑक्सिजन वगैरे चेक करुन गेले होते.

आमचा आधार कार्डवरचा पत्ता KDMC च्या अखत्यारीत येत असल्याने, त्यांना पत्ता बदल कळवूनही १४ दिवस आमची चौकशी मात्र KDMC करत होती. शेवटी माहेरची माणसं असा जोकही मारुन घेतला मी त्यातल्या त्यात. ४०+ वर्ष तिथे राहिल्यामुळे,तिथे अर्थातच मोठा गोतावळा होता आमचा. मित्र मैत्रिणी,नातेवाईक, माहेर, सासर सगळंच तिथे होतं. तिथे असतो तर नक्कीच कुठे मदत मागायची असा प्रश्न पडला नसता. इथे येऊन जेमतेम वर्ष होतय. माणसांची, परिसराची आत्ता कुठे ओळख होतेय नीट. त्यात ही स्टाफ क्वार्टर्स म्हणजे जेमतेम चार घरांची वस्ती आम्ही धरुन. त्यामुळे मदत मागायच्या कल्पनेनेच संकोचायला झाले होते. पण आपणहून मदत मिळत गेली.

इथल्या फॅमिली डॉक्टरांनी BMC ने दिलेल्या मल्टीव्हिटॅमिनच्या जोडीला 'विटॅमीन सी' सुरु ठेवायला सांगितले आणि आठवड्यातून एकदा असे तीन आठवडे 'विटॅमीन D3' घेण्यास सुचवले. कफ सिरप आणि ओआरएस पावडर गरज लागल्यास घेण्यासाठी आणून ठेवण्यास सांगितले. बाकी वाफारा, गरम पाणी सुरु होते. बेटाडीन गुळण्या तर कधी मीठ किंवा हळद मीठ घालून गुळण्या हे ही सुरु होते. हळद घालून उकळलेले दूध आणि आल्याचा चहा वगैरे आलटून पालटून सुरु होते.

आमच्या इथे तरी घर सॅनिटाईझ करायला कोणी येत नाही. पण BMC च्या पेस्ट कंट्रोल डिपार्टमेंटकडून माहिती घेऊन मी BMC staff कडून हायपोक्लोराईडचे डायल्युट केलेले द्रावण मागवून घेतले व त्यांच्या सल्ल्याने लादी, कड्या, नळ, बेसिन, टॉयलेट व बाथरुम साफ केले. उरलेले द्रावण एका बाटलीत भरुन त्याला स्प्रे करायची नळी बसवली. हे दरवेळी नाही वापरलेत तरी चालेल असे त्यांच्याकडून ऐकल्यामुळे एरव्ही व्हॅक्युम क्लिनर, सॅनिटायझर स्प्रे, डेटॉल स्प्रे, डेटॉल फिनाईल इत्यादी फरशी पुसायला वगैरे वापरले.

मला शारीरिक दमणूक कमी पण मानसिक दमणूक मात्र जाणवत होती आणि ती कमी करणे केवळ माझ्याच हातात म्हणजे मनात होते. त्यासाठी मी केलेले उपाय लिहून काढते

१) वर्तमान पत्रे वाचन बंद केले. न्यूज चॅनल बघणे बंद केले
कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही माहिती आहे, पण मन अशांत असताना बाहेरुन येणाऱ्या निगेटिव्ह बातम्यांचा मारा कमी करणे फायद्याचे ठरते. आतल्या निगेटिव्हिटीशी लढायला आपली एनर्जी पुरवून वापरता येते.

२) अलमोस्ट ज्या ज्या मित्र मैत्रिणींना कळवले होते / कळले होते त्यांना,"एकेकाने फोन करु नका असे सांगून टाकले."
प्रत्येकाची आस्था काळजी मला माहिती होती पण त्याच त्या चर्चा करत रहाणे टॅक्सिंग होते माझ्यासाठी म्हणून मी पहिले ते काम केले. तरी बोलायची गरज वाटल्यावर मी आपणहून फोन करुन व्यक्त होत होते.

३) नवरा आयसोलेशन सेंटरमध्ये असल्याने त्याची काळजी होती. ती कमी करायला व्हिडीओ कॉल ठराविक वेळी उपयोगी ठरला.

४) आवश्यक ती कामे करत होतेच म्हणजे सॅनिटाईझ करणे वगैरे. पण पोळी भाजीसाठी मात्र मी एका ओळखीच्या डबे देणाऱ्या काकुंना रिक्वेस्ट केली. ब्रेकफास्ट आणि वरण भात वगैरे बाकी मी करत होते. पण त्यांच्यामुळे एक काम हलके झाले माझे.

५) जमेल तसा हलका व्यायाम करायचे. जसे आपले शाळेचे कवायती प्रकार, सूर्यनमस्कार जमतील तितके, प्राणायाम, अनुलोम विलोम, आणि जेवण झाल्यावर श्लोक वगैरे म्हणत शतपावली. श्लोक म्हणताना पावले मोजावी लागत नाहीत आणि आरामात १५-२० मिनिटे चालणे होते.

६) औषधे, गुळण्या, वाफारा, गरम पाणी हे सुरु होतेच.

७) हलक्या फुलक्या मालिका / सिनेमे बघणे हे ही मूड हलका ठेवायला मदत करायचे

८) एका क्षणी जेव्हा ताण आहे जाणवले आणि तो माझ्या एकटीच्या अवाक्याबाहेरचा आहे हे ही समजले तेव्हा समुपदेशक मैत्रिणीला म्हणजे आपल्या मायबोली id manee असलेल्या मंजिरी वेदकला मेसेज केला. तिच्या सल्ल्याने श्वासाच्या ऱ्हिदमवर लक्ष देऊन स्लो ब्रिदिंग आणि one day at a time मंत्र जपत हे ही दिवस जातील याचा पुनरुच्चार करत त्यावर काम केले

९) माझी श्रद्धा आहे म्हणून गजानन महाराज विजयग्रंथ वाचन सुरु केले. रोज जमतील तसे अध्याय वाचायचे. आम्हा दोघांचीही श्रद्धा असल्याने तो घरी आल्यावर सोबतही परत वाचन केले.
आधीपासूनच रामरक्षा ऐकायचा नेम होताच पण आता नियमीतपणा आणला त्यात म्हणजे रात्री झोपताना ऐकणे सुरु केले.
यामुळे मन शांत व्हायला खूप मदत झाली.

ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे त्या गोष्टीचा आधार मन शांत करायला खूप महत्वाचा ठरतो.

याच दरम्यान भारती ठाकूर लिखीत 'नर्मदा एक अंतर्यात्रा' नावाच्या पुस्तकाचे अभिवाचन ऐकायला मिळाले. निसर्गाचे भरभरून वर्णन, माणूसकीचे दर्शन - याचे वर्णन आणि मदत मिळत जाते हा विश्वास त्यांच्या लिखाणात जागोजागी होता आणि नकळत तो माझ्याही मनात रुजायला मदत झाली.

१०) यासोबतच सकारात्मक विचार मुद्दाम करायची सवय लावली मनाला. नकारात्मक विचार आले तर नाकारायचे नाहीत पण त्यांना 'हवा' द्यायची नाही. त्यांची रेघ पुसता येत नाही ना पूर्णपणे, मग बाजूला दुसरी सकारात्मकतेची रेघ ओढायची मोठी. हळूहळू नकारात्मकतेची रेघ बिंदू होईल इतकी रोज नेटाने ती सकारात्मकतेची रेघ गिरमिटायची.

रोज झोपताना गेलेल्या दिवसाबद्दल कृतज्ञता आणि येणारा दिवस उत्तम असणार आहे याबद्दल मनाला खात्री देऊन सकाळी पुन्हा दिवस सुरु झाल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुन दिवसाची सुरुवात करायची. हे एरव्ही माहिती असतच, मनात हे भाव असतात पण प्रगटीकरण होत नाही ते मुद्दाम ठरवून केले. सकारात्मकतेची रेघ ठळक व्हायला हे ही उपयोगी ठरले.

११) छोट्या-छोट्या आनंदाच्या नोंदी करायची सवय लावून घेतली आणि जाणवलं की बऱ्याच सकारात्मक गोष्टीही घडत आहेत आजूबाजूला आणि मग हे ही पटलं की -
"this too shall pass
This is just a phase
If days can be gloomy
there can be happy days"

१२) लिखाणही माझ्यासाठी थोडेफार मेडीटेशनचे काम करते म्हणून आधी लिहीलेली ती फुलांचे अर्थ असलेली प्रेमकथा अजून थोडी एडीट करायला सुरु केली. त्यात आता नव्याने अभ्यास करा, नोट्स काढा प्रकार करावा लागणार नव्हता पण थोडावेळ का होईना त्या एडीटच्या नादात सगळ्याचा विसर पडून वेळ मजेत जात होता आणि आपोआपच ताण हलका होऊन एक हलका मूड मनभर पसरायला मदत होत होती.

१३) बाहेर जाता येत नव्हते पण तरी जाळीच्या दरवाजातून माझ्या बागेतल्या कुंडीत रोज फुलणारी फुले बघणंही समाधानकारक होतं. त्यातही पावसाने झोडपून पार झोपवून टाकलेली नवीन रोपे परत ताठ मान करुन वाऱ्यासोबत डुलत वाढताना पहाणे हे ही एकप्रकारचे मेडीटेशनच होते.

मन शांत असेल तरच ते सकारात्मक राहू शकते किंवा सकारात्मकता वाढवू शकते. प्रत्येकाचे मन शांत करायचे मार्ग वेगळे असू शकतात. आपला मार्ग कोणता आहे हे फक्तं आणि फक्तं आपल्यालाच लक्षात येऊ शकतं. पण मन आणि तन ही दोन जर चाके आहेत असं इमॅजीन केलं तर दोन्ही जमिनीवर व्यवस्थित हवी, जे गाळात गेलय असे समजतेय त्याला बाहेर काढायचे उपाय करायला हवेत. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.

नवराही आठवड्याभरात घरी आला. त्यालाही सुरवातीचे दोन दिवस ताप येऊन गेला होता आणि हलका ड्राय खोकला होता जो कमी होत गेला. विकनेसही त्यामानाने लवकर कमी झाला.

बाकी रुटीन जसे सुरु होते तसेच सुरु राहीले. पुढले १० दिवसही आम्ही होम आयसोलेशनमधेच होतो. आम्ही तिघेही ऑक्झिमिटरने ऑक्सिजन लेव्हल चेक करणे, टेंपरेचर चेक करणे, बाकी लक्षणे काही जाणवत आहेत का यावर लक्ष ठेवणे वगैरे करत होतोच. यादरम्यान फॅमिली डॉक्टरना तब्येतीचे अपडेट देणे आणि त्यांचा सल्ला घेणेही सुरु होते. सुदैवाने लक्षणे माईल्ड होती आणि वेळेत सगळे निर्णय घेतले गेले त्यामुळे लवकर बरे वाटायला मदत झाली.

१४ दिवसांचा होम आयसोलेशनचा कालावधी संपूनही आता दहा एक दिवस होतील. या पुढल्या दहा दिवसांच्या काळातही आम्ही पूर्णपणे घरीच होतो. अजूनही तसं म्हणाल तर अमेझॉन पॅंट्री, बिग बास्केट वगैरेची मदत घेत आम्ही घराबाहेर पडायचं टाळलेच आहे. सध्या पाऊसही जोरदार आहे त्यामुळेही टाळले आहे.

वासाचे सेन्सेशन देखील परत आले पहिल्या आठवड्याभरातच. आम्हाला तिघांनाही उरलेल्या या काळात काही लक्षणे नव्हती. परत टेस्ट करायची तशी गरज नाही असे health officer आणि फॅमिली डॉक्टर दोघांनीही सांगितले. आमच्या मनाचे समाधान म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्लड टेस्ट करुन ॲंटीबॉडी डेव्हलप झाल्या आहेत का हे तपासून घेतले. त्याचे रिपोर्ट्स समाधानकारक आले.

आता आम्ही घराबाहेर पडू शकतो असे BMC health officer आणि आमचे डॉक्टर दोघांनी सांगितले आहे. तरीही आम्ही आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडणार आहोत. त्याचे ऑफीस सुरु झाल्यावर जरा अधिकची खबरदारी घेऊच. कारण आता उलट जास्त डोळसपणे याकडे बघायला हवेय. म्हणजे अती घाबरून किंवा अती सैल सुटून चालणार नाही. कधीतरी भिती वाटणार थोडी आणि कधीतरी भितीच्या ना ची टांग म्हणावेसेही वाटणार पण आत्ताचा काळ महत्वाचा आहे. बाऊ न करताही आत्तापर्यंत घेतली तशीच काळजी घेत सक्षम होण्याचा आहे. घाबरून किंवा आता काही होत नाही म्हणत दोन टोके गाठण्याचा हा काळ नाही.

याकाळात शेजाऱ्यांची खूप मदत झाली. बाहेरून काही सामान हवे असल्यास आणून देणे वगैरे त्यांनी आपणहून केले. फोन करु नका म्हंटले असले तरी सगळ्याच मित्र मैत्रिणींनी व्हॉट्स ॲप गृपवर वातावरण हलके राहील अशा गप्पा मारुन माझ्या मन:स्वास्थ्याची काळजी घेतली. माझी मैत्रीण डॉक्टर अंजली आणि माबोकर डॉक्टर ज्ञाती दोघींनी उत्तम माहिती तर दिलीच पण धीरही दिला. ज्ञाती फक्तं आवाज ऐकण्यासाठी फोन करायची. "आवाजावरुन तब्येतीची कल्पना येते डॉक्टरला थोडीतरी म्हणून आवाज ऐकायला फोन केला" म्हणायची. बॉसने ऑफीसचे टेन्शन विसरुन तब्येतीची काळजी घे कळवून टाकलं. कंपनीच्या ओनरनी स्वतः फोन करुन पैशाची मदत लागली तर संकोच करु नकोस कळवले. तशी वेळ आली नाही सुदैवाने पण आम्ही आहोत पाठीशी असं सुचीत करणारा आधार हे मोठे बळ असते अशावेळी. कितीतरी मित्र मैत्रिणींनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या, शुभेच्छा व्यक्त केल्या.

'आमचे डॉक्टर, केडीएमसीचे चौकशी करणारे कर्मचारी, शुभेच्छा देणारे मित्र मैत्रिणी, जवळचे नातेवाईक, मदत करणारे आमचे शेजारी, वर लिहीलेली औषधे- गुळण्या - वाफारा वगैरे उपचार आणि आमची श्रद्धा' या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून यातून बाहेर आलो.

शरीर आणि मन दोन्हीचा एकत्रित प्रवास होतो सुधारणेच्या दिशेने, तेव्हा तो अधिक परिणामकारकरित्या होतो आणि तुमच्या पाठीशी इतक्या सगळ्या सुहृदांच्या शुभेच्छा आहेत हे मनाचं या प्रवासातलं विटॅमीन सी, मल्टी व्हिटॅमिन सबकुछ असतं.

फार मोठं अनुभव कथन झालं तरीही बरच काही राहून गेलं असेल याची कल्पना आहे. एकच विनंती, प्रश्न काही विचारु नका सध्या. कारण उत्तरे देण्याइतकी किंवा शंका समाधान करण्याइतकी मनाने त्रयस्थ व्हायला बराच वेळ आहे अजून. इतपत लिहून काढले आणि पब्लिक फोरमवर ते तरेल बुडेल याचा विचार न करता नाव पाण्यात सोडावी तसे ते सोडण्याचे जमवलेय हीच सध्याची मोठी गोष्ट आहे.

२०२० ने काय दिले विचारले जर स्वतःला तर उत्तर असेल, स्वत: मधल्या व्हल्नरेबिलिटीची ओळख दिली, 'मदत मिळते - विश्वास हवा' हे शिकवले, उद्या आपल्यालाही, 'असा विश्वास दुसऱ्याला वाटेल असे वागायचे आहे' याचे भान दिले, one day at a time मंत्र ठळक केला आणि अनुभव नावाच्या गाठोड्यात अजून एका न विसरता येणाऱ्या अनुभवाची भरती केली.

गणपती गजाननाच्या कृपेने हे संकट लवकर दूर होऊन, तुम्हा आम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो यासाठी गणपती गजानना तुझ्यापुढे ही माझी प्रार्थना -

करिते मी धावा । संकट निवारा ।
भयमुक्त करा । गजानना ॥

चिंता क्लेष माझे । जाणसी तू सारे ।
रक्षण करावे । विघ्नहारा ॥

जाऊदे जळून | अमंगल सारे |
रुजू दे विचार | मांगल्याचा ||

स्विकारुनी सेवा । आशिर्वाद द्यावा
सुखी व्हावे सर्व । आप्तजन ॥

Group content visibility: 
Use group defaults

कवे, मला हे काहीच माहीत नव्हतं. तेंव्हा सगळ्यात आधी तर तुझ्या या कठीण काळात तुझ्या साठी अवेलेबल नव्हते म्हणून खूप खूप सॉरी.

'तू'झ्याकडून जसं अपेक्षित आहे तसंच हे लेखन झालंय. तुझं नाव वाचून धागा उघडायचा ठरवला करण माहीत होतं की यातून पोजिटीव्हीटीच मिळणार आहे. त्यात तुम्ही स्वतःचं त्याला हरवून आलाय म्हणजे ती पोसिटीव्हीटी *100 झालीये.

मी म्हणेन लेख आवडला कारण एकतर आपल्या वरची ती निगेटिव्ह छटा गेलीये आणि लेख हा 100 लोकांना वाचायला द्यावा असा झालाय.
कोविड ला अति घाबरणारे किंवा अजिबातच किंमत न देणारे असे सगळेच यातून शिकतील.

सानू कशी आहे ? तिला मात्र एक जोरदार हग कर माझ्याकडून

लेखनस्पर्धेत अशा प्रकारचा स्वानुभव असलेले हे एकमेव लिखाण असेल. श्वास रोखायला लावलात मध्यंतरी. पण तुमच्या अनुभवातून इतरांना खूप उर्जा मिळेल. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. काही वाक्ये खूप भिडली....

>> नकारात्मक विचार आले तर नाकारायचे नाहीत पण त्यांना 'हवा' द्यायची नाही. त्यांची रेघ पुसता येत नाही ना पूर्णपणे, मग बाजूला दुसरी सकारात्मकतेची रेघ ओढायची मोठी. हळूहळू नकारात्मकतेची रेघ बिंदू होईल इतकी रोज नेटाने ती सकारात्मकतेची रेघ गिरमिटायची.

>> मन शांत असेल तरच ते सकारात्मक राहू शकते किंवा सकारात्मकता वाढवू शकते. प्रत्येकाचे मन शांत करायचे मार्ग वेगळे असू शकतात. आपला मार्ग कोणता आहे हे फक्तं आणि फक्तं आपल्यालाच लक्षात येऊ शकतं.

>> घाबरून किंवा आता काही होत नाही म्हणत दोन टोके गाठण्याचा हा काळ नाही.

>> लिहून काढले आणि पब्लिक फोरमवर ते तरेल बुडेल याचा विचार न करता नाव पाण्यात सोडावी तसे ते सोडण्याचे जमवलेय

या सर्व वाक्यांना: +११११

डोकं सुन्न झाल्यासारखे वाटतंय. थरारक बातम्या वाचून, ऐकूनच घाबरायचे दिवस तुम्ही स्वतः अनुभवले आणि ते अतिउच्च सकारात्मक लिखाणाने वाचकांपर्यत पोहचविले त्याबद्दल तुमचे शतशः आभार. मला काही होणार नाही तू घाबरू नकोस तू तुझी काळजी घे असे म्हणणारे डोळ्यासमोर हे जग सोडून गेले. तुम्ही सगळ्यांनी वेळेवर काळजी घेऊन या कठीण प्रसंगावर यशस्वी मात केल्याबद्दल संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन. जय गजानन महाराज. श्री स्वामी समर्थ.

कविन, तुझ्या मनात उमटणाऱ्या भाव-भावनांची स्थित्यंतरे फार ताकदीने आणि प्रांजळपणे मांडली आहेस.
संपूर्ण लेख पॉझिटिवव्हीटीने भरलेला आणि म्हणूनच प्रेरणादायी आहे.
काळजी घ्या सगळे

२०२० ने काय दिले विचारले जर स्वतःला तर उत्तर असेल, स्वत: मधल्या व्हल्नरेबिलिटीची ओळख दिली, 'मदत मिळते - विश्वास हवा' हे शिकवले, उद्या आपल्यालाही, 'असा विश्वास दुसऱ्याला वाटेल असे वागायचे आहे' याचे भान दिले, one day at a time मंत्र ठळक केला आणि अनुभव नावाच्या गाठोड्यात अजून एका न विसरता येणाऱ्या अनुभवाची भरती केली.>>>>> अगदी खरंय.

नकारात्मक विचार आले तर नाकारायचे नाहीत पण त्यांना 'हवा' द्यायची नाही. त्यांची रेघ पुसता येत नाही ना पूर्णपणे, मग बाजूला दुसरी सकारात्मकतेची रेघ ओढायची मोठी. हळूहळू नकारात्मकतेची रेघ बिंदू होईल इतकी रोज नेटाने ती सकारात्मकतेची रेघ गिरमिटायची.+++१११

सुंदर लिहिलंय, सगळ्या भावना व्यवस्थित पोहोचतायत.

अभिनंदन कविन.
कविन च्या लिखाणाची अजून एक चुणूक हवी असेल तर तिच्या कथेवर आधारित 'फिंगर्स क्रॉसड' शॉर्ट फिल्म नक्की बघा.(हे
पेड प्रमोशन नाहीये Happy )
https://youtu.be/N_nVx3XB-LQ
(यातले काही कलाकार मायबोलीकरही आहेत.ओळखा पाहू.)

Pages