गोपाळकाला..

Submitted by सुलेखा on 10 August, 2012 - 05:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ वाटी ज्वारीच्या लाह्या.
[चाळणीवर चाळुन घ्याव्यां.नंतर ३-४ वेळा पाण्याने धुवुन घ्याव्या.म्हणजे लाह्यांमधली कचकच निघुन जाईल .धुताना लाह्या चोळु नये.धुतल्यावर चाळणीतच उपसुन ठेवाव्या.]
१ वाटी चणाडाळ आणि अर्धी वाटी दाणे -धुवुन साधारण एक तासभर आधी भिजवुन घ्यावे.भिजलेली चणाडाळ मिक्सरमधे जाडसर वाटुन घ्यावी.
मुठभर पोहे धुवुन घ्यावे.
लहान काकडीच्या बारीक फोडी साधारण पाऊण वाटी..
नारळाचा ताजा चव किंवा किसलेले सुके खोबरे पाव वाटी
अर्धा लिटर दह्याचे दाटसर ताक.
हिरवी मिरची २ ते ३ बारीक चिरलेली..तिखट आवडत असेल तर जास्त घालावी.
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी .
किसलेले आले १ टेबलस्पुन.
साखर चवीप्रमाणे.दही आंबट असेल तर साखर जास्त लागेल.
मीठ चवीप्रमाणे.
मुरलेल्या लिंबाच्या लोणच्याच्या २ फोडी व थोडासा खार.
८-१० तुळशीची पाने हाताने तोडुन घ्यावी.बेसिल ची पानेही चालतील.

क्रमवार पाककृती: 

ही सर्व तयारी असली कि, गोपाळकाला लगेच तयार करता येतो.हे सर्व कोरडे जिन्नस एकत्र करुन शेवटी ताक घालावे.व छान कालवावे.
आस्वाद घेण्यासाठी तयार आहे " गोपालकाला"

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक द्रोण ..
अधिक टिपा: 

ज्वारीच्या लाह्या पचायला हलक्या.पोटातील गरमी कमी करणार्‍या असतात.गोपाळ काला खरे तर इतर वेळीही खायला हवा.
ज्वारीच्या लाह्यांबरोबर साळीच्या लाह्या ही घ्याव्या..

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा...तोंपासु एकदम!! मी कधीपासुन याच्या शोधात होते. Happy
ऑफीसमधे एकीने सांगितलं की पेरुच्या फोडी आणि डाळींबाचे दाणेही टाकाय्चे.

मी_आर्या,
पेरु,केळे,डाळिंबाचे दाणे,थोडीशी गोड पपई,मुरमुरे असे काहीही घालुन गोपाळकाल्याची चव छान लागते.वरुन तुप-जिर्‍याची फोडणी घालुन ही खमंग होतो.

छान लागेल हा प्रकार !

आमच्याकडे नसायचा हा प्रकार. दहीहंडी फोडली कि आई हातावर दहीपोहे द्यायची.

गोव्यातला या दिवशीचा खास प्रकार म्हणजे आंबाड्याचे रायते.

बाकी कोकणात, मूगाची खीर, चपाती आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी.. त्यांच्याकडे प्रसादाचे हेच जेवण असते. गोकुळाष्टमीनंतर मात्र शेवग्याच्या पाला, पुढची पालवी येईपर्यंत खात नाहीत.

आमच्या सासुबाई फार सुंदर करतात गोपाळकाला.
पण त्या पोहे वापरतात. लाह्या नावाला.

इंद्रधनु +१. त्या त्यावेळेस जे हाताशी असेल ते सर्व जिन्नस जातात. मधुनच कधीतरी हुक्की आली की आम्ही करतो गोपाळकाला. Happy

मी सगळ्या प्रकारच्या लाह्या घालते तसेच डाळींब (मस्ट) टाकल्याने काला चांगला लागतोच तसेच दिसातोही छान. मीठ टाकत नाही आंब्या लोणचे व गोड लिंबाच्या लोण्च्यातले मीठ पुरेसे होते. चणाडाळ न वाटता टाकते.. काला, एक परिपूर्ण आहार आहे. मला अतिशय आवडतो. काला करते त्यादिवशी जेवणाला सुट्टी.

दिनेशदा ,

मुगाची खीर, रेसिपी प्लिज !!!

खास कोकणात / कारवारी मुगाची खिर करतात, तशी !!

सुलेखा मस्तच. मी पहिल्यांदाच वाचली ही रेसिपी. गोपाळकाला हा खायचा प्रकार असतो हे माहीतच न्हवते.
आमच्याकडे जन्माष्टमी ला आंबोळ्या, काळ्या वाटाण्याचे सांबार, खीर आणि शेवग्याची भाजी.
आता तू सांगितलेल्या पद्धतीने गोपाळकाला करून बघीन.
फोटो हवा होता Happy

सुलेखाताई,
हे आपले जमेल ते जिन्नस घेऊन. वाचल्यापासून अजिबात रहावत नव्ह्ते. घरी येऊन केले तेव्हा आत्मा शांत झाला. Proud

Gopalkala.jpg

हं.. मस्तच की हा गोपाळकाला! मीपण पेरूच्या फोडी, डाळिंबाचे दाणे घालून करते. छानच आणि पौष्टिक डिश आहे ही. एकदम फेव्हरिट!!

मस्त आहे हा गोपाळकाला. एरवीही करुन बघायला पाहिजेच असा, पोटभरीचा.

आमच्याकडे जन्माष्टमी ला आंबोळ्या, काळ्या वाटाण्याचे सांबार, खीर आणि शेवग्याची भाजी.

सेम हिअर.. माझ्या वडलांना तर हाच मेन्यु लागायचाच अष्टमीच्या रात्री. वडिल होते तोपर्यंत कृष्णजन्माला दुसरे काही खाल्ल्याचे मला तरी आठवत नाहीय..... . मला तर वाटते सगळ्या मालवण्यांच्या घरात अष्टमीच्या रात्री हाच मेन्यु असतो.

मी एका मैतरणीने सांगितलेल्या कृतीने गोपाळकाला केला.
ज्वारी लाह्या, चुरमुरे, जाडे पोहे पाण्यात भिजवून उपसून ठेवले. दही फेटून त्यात मिरची ठेचा, मीठ, साखर मिसळले. हे मिश्रण भिजवलेल्या लाह्यांवर ओतले. थोडे दूध घातले. लोणच्याचा खार घातला. कोथिंबीर चिरून घातली. वरून फोडणी. आले, खोबरे, दाणे, काकडी या रेसिपीत नसल्यामुळे घातले नाहीत. पण चव छान आली आहे काल्याला. वरून तुळशीचे पान.

आमच्याकडे जन्माष्टमी ला आंबोळ्या, काळ्या वाटाण्याचे सांबार, खीर आणि शेवग्याची भाजी.>>>>>>> खिरीऐवजी सांजोर्‍या,काळे वाटाणे घालून केलेली शेवग्याच्या पाल्याची भाजी.

आमच्याकडे घरच्या कुटुन केलेल्या पोहे-गुळ लाडु, केळ्याचे पोहे आणि तांदूळ रवा घालून अप्पे, मूगाचा शीरा, घरी कुटलेला सुंठवडा( मला अतिप्रिय) हे सर्वांना प्रसाद म्हणून आणि जेवायला, गरमागरम घावन, शेवग्याची कोरडी भाजी आणि केळफुलाची भाजी, गोड घट्ट दही आणि ताकातले तिखट पोहे अगदी हा मेनु वर्षानुवर्षे बनत आला आहे. रात्री १२ वाजता असे तुडुंब खावून पावसातल्या थंडीत मग भजन म्हणत पहाटे डोळा लागायचा.

आम्ही गोपाळ्काला कधीच नाही बनवत. पण दूधदह्यातली ज्वारीचीच कुस्करलेली भाकरी, गुळातले पोहे नारळाचे दूध घालून, आंबोळ्या आणि उपवासाची चवळी बटाटा उसळ,
प्रसादाला ओल्या नारळाची करंजी. सुंठवडा आम्हीपण बनवतो.

रात्रीच दही नाही खायचं म्हणून दूधात किंचित दही-साखर घालून गरम भाकरी कुस्करायची, वरून घरचं तूप.

बाजूचे मद्रासी चकली, अप्पे, तांदूळाची बोरं, मद्रासी फरसाण, पोह्याचा लाडू आणि काय काय गोड बनवत.
रात्रीचा तो गोडाचा ओवरडोस होवून धिंगाणा असायचा तो आठवला. आता काहीच ह्यातले बनवत नाही का खात नाही... कालाय तस्मे नमः

गोपाळकाला : द बिगिनिंग
आज थोडे करुन बघितले.

शनिवारी हॉस्पिटलमध्ये मोठ्या पातेल्यात गोपाळकाला : द कन्ल्युजन