या आधीचा भाग आपण ईथे वाचू शकता
पन्हाळ्यावर एकच लगबग सुरु होती. दारुगोळ्याच्या कोठ्याची तपासणी सुरु होती. कोल्हापुर परिसरातील बैलगाड्या धान्य भरुन रोज पन्हाळ्याचा चढ चढीत होत्या. गंगा,जमूना कोठीत छतापर्यंत धान्याच्या पोत्यांची रास लागलेली. गडाचा चोख बंदोबस्त झालेला होता. आणि एके दिवशी लांब पुर्वेकडून मोठी धुळ उडू लागली.गर्जना एकू येउ लागल्या, हिरवा चांदतारा फडकताना दिसत होता. जोहर पन्हाळ्याच्या रोखाने येत होता. पन्हाळ्याचा औरसचौरस आकार लांबूनच नजरेस येत होता. फक्त दहा कोसावर विजापुर फौजेची छावणी पडली होती. रात्री सगळे बैठकीत जमले होते. पन्हाळ्यावर कसा हमला करायचा याचा खल सुरु होता. बरोबर भरपुर सैन्य होते, त्यामुळे फाझल उतावीळपणे म्हणाला, "हम कल ही पन्हालेपे हमला बोल देंगे , इतनी बडी फौज के सामने ये किला टिक नही पायेगा.एक ही दिन मे हम कब्जा कर देंगे और फिर उस सिवा को कैद करके विजापुर ले जायेंगे"
"दिन मे सपना देखना छोड दो फाझल. मत भुलो ईस सिवा के हात तुम दो बार शिकस्त खा चुके हो" जोहर शांतपणे फाझलला म्हणाला.
"तो फिर क्या करेंगे ?" रुस्तमने विचारले.
"आपल्यापाशी फौज मोठी आहे,पण पन्हाळा आडवा तिडवा पसरला आहे, हे विसरू नका. एकदम हल्ला केला तरी दुष्मन उंचावर आहे,त्याला उंचीचा फायदा मिळणार. मत भुलो वो पुरंदरकी दास्तान. पथ्थरो कि बौछार से फत्तेखान जैसे सुरमा को मात दि थी. आपलेही तेच हाल होतील.मला वाटते आपण गडाला वेढा घातलेला चांगला. एकतर आपल्याकडे पुरेशी रसद आणि फौज आहे. एकदा वेढा आवळला कि ना तो कोई अंदर जा सकेगा ना ही कोई बाहर आ सकेगा. फिर कितने दिन सिवा किले पे रहेगा ? उसे बाहर तो आनाही पडेगा. यामध्ये आपल्या फौजेला लढाई करावी लागणार नाही.बस सिर्फ ईंतजार करना है"
सगळ्या सरदारांना पटले. त्यांनी संमतीदर्शक माना हलवल्या. ठरले पन्हाळ्याला वेढा घालायचा. दुसर्या दिवशी फौजा विखुरल्या आणि जोहार,फाझल, रुस्तम,बडेखान यांच्या फौजा वाडी रत्नागिरी डोंगराच्या बाजूने पन्हाळ्याकडे गेल्या आणि त्यांनी गडाची पुर्व बाजु रोखून धरली. मसुदच्या नेतृत्वाखाली दुसरी तुकडी गडाच्या मावळतीकडे गेल्या, यामध्ये सादातखान्,घोरपडे, भाईखान गेले आणि त्यांनी त्या बाजुने सैन्य पसरवले. दोन्ही बाजुने फौजा पसरत गेल्या आणि त्यांनी उत्तरेकडची बाजू अडवली. गडाला आता पुर्ण फास पडला.
चैत्राच्या उन तावत होते, गडाखाली आदिलशाही राहुट्यांची गर्दी उभारली गेली. तटबंदीवर उभारुन महाराज ही हालचाल न्याहाळत होते. सोबत बाजी, गोदाजी, त्रिंबक पंत होते. गोदाजी म्हणाला, "महाराज, मला वाटल ह्यो सिद्दी चढाई करेल.मावळी हिसका दाखवायला हात शिवशिवत होते.पण ह्यो तर गड वेढायला निघालाय".
"हं ! सिद्दी हुशार दिसतोय गोदाजी. आधीच्या विजापुरी सरदारांनी ज्या चुका केल्या त्याचा अभ्यास करुन जोहर आलेला दिसतो आहे.थेट हल्ला केला तर गडावरुन तिखट प्रतिकार होणार, त्यात बरीच फौज कामी येणार. आधीच याच फौजेने प्रतापगडाखाली आणि कोल्हापुरात मात खाल्ली आहे. मनातून धास्तवलेले हे सैन्य असा एखादा तडाखा खाल्ला कि कोसळणार. मग धीर सुटून सैन्य पळायला वेळ लागत नाही. जोहरने हे ओळखले म्हणून थेट लढाईला तोंड न फोडता, वेढा आवळला म्हणजे थेट युध्द न करता हवे ते साध्य करता येईल हि त्याची योजना आहे. एखादा हुशार सेनानीच हे करु शकतो." राजे शांतपणे म्हणाले.
"राजे तुम्ही या सिद्दीचे कौतुक करताय ?" त्रिंबकपंत आश्चर्याने म्हणाले.
"पंत ! शत्रु असला तरी त्याचे गुण महत्वाचे. आता हे नुसते युध्द असणार नाही, हा बुध्दीबळाचा डाव असणार आहे. विचारपुर्वक चाली कराव्या लागणार. अर्थात नेतोजी, सिद्दी हिलाल अजून विजापुर मुलुखात धुमाकुळ घालत आहेत्,ते बाहेरुन येउन जोहरच्या वेढ्यावर हल्ला करतील, त्याचवेळी गडावरुन सैन्य सोडता येईल. दोन्हीकडून मारा झाला तर वेढा टिकेल असे वाटत नाही".
एका दिवसात वेढा आवळून झाल्यावर दुसर्या दिवशी सिद्दीने तोफा तैनात करायचा हुकूम दिला. जमीन दाबत वजनदार तोफा पुढे आल्या. तोफा पुढे आणि मागून शाही फौज गडाला जवळ करु लागल्या.वर फांजीवरुन मावळे शांतपणे हि चाल बघत होते. तोफा आणि विजापुर फौज टप्प्यात आल्यावर गडावर एकच आरोळी उठली "हर हर महादेव" आणि अचानक गडावर तैनात केलेल्या तोफांनी एकच कडकडाट केला. धडाम ! धुडूम !! तोफांनी आग ओकली आणि सटकन सुटलेले गोळे तुफानी वेगाने खालच्या दिशेने आदिलशाही फौजेच्या दिशेने सुटले. प्रचंड वेगाने अनपेक्षित प्रतिकार झाल्याने शाही फौज बिचकली. तोफगोळे लागून काही सैनिक मेले तर काही जखमी झाले. या धडाक्याने फौज मागे सरुन पळत सुटली आणि डेर्याजवळ येउन थांबल्या. आपल्या तंबुच्या कनातीजवळ उभा राहून हे आक्रमण बघणार्या जोहरची भिवई चढली. पहिली चाल नाकामयाब ठरली होती. गड चांगलाच भांडणार हे नक्की होत. शिवाजी,शिवाजी म्हणत होते, ती काय चीज आहे, हे त्याला पहिल्याच झणझणीत मार्यात समजले.तोफा फार पुढे नेणे म्हणजे मार खाणे ठरलेले हे स्पष्ट झाले.ईतक्यात फाझल जवळ आला,"खानसाहेब, रात को हमला बोल दे तो?"
"ठिक है, कोशीश करते है. रात को दुबारा थोडी एतीहाद बक्षते है और फिर हमला बोल देंगे. आसान नही पनाला" सिद्दी थोडा विचारात पडला.
रात्री फार काही वेगळे झाले नाही. गड बेसावध असेल अश्या कल्पनेने जोहरने एका बाजुने आणि मसुदने एकाचवेळी यल्गार केला. पण गडावरुन असा काही धमाका झाला कि शाही फौजांना पळता भुई थोडी झाली. पुन्हा एकदा आणखी थोडी सैन्याची हानी होण्यापलिकडे विजापुर फौजेच्या हाती काही लागले नाही. आहे ह्या तोफा पन्हाळ्यापुढे निकम्म्या आहेत, त्यांचे गोळे तटापर्यंत पोहचत नाहीत, तेव्हा मारा करुन काही फायदा नाही, हे सगळ्यांनाच समजले. गडावर हल्ला करायचा तर लांब पल्ल्याच्या तोफा पाहीजेत.विजापुरवरुन तोफा आणायच्या तर फार वेळ जाणार होता. काय करावे?
ईतक्यात तिथे फाझल आला. "काय विचार करताय सरदार ?"
"हमारी तोफ के गोले किले कि दिवारोतक पहूंच नही पा रहे है. क्या कर सकते है ? लांब पल्ल्याच्या तोफा विजापुरवरुन मागवायच्या तर वेळ जाणार" जोहरने चिंतेचे कारण सांगितले.
"काळजीचे कारण नाही. ईथून राजापुर जवळ आहे. राजापुरचे अंग्रेज व्यापारी आहेत. अंग्रेजाकडून विजापुर दरबार तोफा आणि दारु खरेदी करतो. मी एकले आहे कि राजापुरमध्ये काही नवीन तोफा अंग्रेजांच्या मुल्कमधून आलेल्या आहेत. तोफा छोट्या आहेत, लेकीन बहोत दुर तक का हमला कारिगर कर सकते है. आपल्याला याच तोफा पाहिजेत" फाझलने तोड सुचवली.
"हं. पण मी एकले आहे कि नुकतेच सिवाने या अंग्रेजांशी सला केलेला आहे.अंग्रेज उसे जंजिरे के सिद्दी के खिलाफ मदत करने को राजी हो गये है. मग हे अंग्रेज आम्हाला मदत करतील ?" सिद्दीला शंका वाटू लागली.
"क्यों नही हुजुर ! आता हा सिवा संपलाच म्हणून समजा. या वेढ्यातून तो आता सुटत नाही. अंग्रेज समुंदरपर घुमनेवाले खलाशी लोक आहेत्,त्यांना वार्याची दिशा बरोबर समजते" फाझल आशावादी होता.
"ठिक आहे.तु म्हणतोस तर आजच आपला खलिता राजापुरला पाठव" सिद्दी आता खुशीत आला.
लगेचच एक जासूस राजापुरला रवाना झाला.
बरोबर पंधरा दिवसांनी चट्यापट्याचा तांबडा डगला घातलेला आणि उन्हामुळे लाल बुंद झालेला हेन्री रिव्हींग्टन जोहरच्या तंबुता आला.डोक्यावरची टोपी काढून कंबरेत झुकून तो म्हणाला, "खानसाब, आपल्या ईच्छेला मान देउन राजापुर वखारीतून मी नवीन तोफ आणली आहे. लांब पल्ल्याच्या या तोफेने आपण पन्हाळ्याला खिंडार पाडू शकतो. आपली आज्ञा असेल तर लगेच तोफ दक्षीण बाजुला तैनात करतो"
"सुभानल्ला ! बहोत शुक्रीया जनाब. आम्ही आपलीच वाट पहात होतो.आपल्या येण्याच्या बातम्या मिळत होत्या. चला, अच्छे काम मे देरी नही चाहीये.आपण आजच तोफेची चाचणी करुया".
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
"धड्डाम !" प्रचंड मोठा आवाज झाला आणि तीन दरवाजा व पुरा गड हादरला. सदरेवर बैठकीत महाराज आणि सवंगड्याना हा आवाज कशाचा समजेना. सगळेजण घाइघाईने उठले व आवाजाच्या रोखाने तीन दरवाज्याकडे गेले. तीन दरवाज्याच्या फांजीवर पोहचल्यावर घाईघाईने हवालदार पुढे झाला आणि मुजरा घालून राजांना म्हणाला,"महाराज ! दोन दिस झालं, खाली वेढ्यात हालचाल चालु होती. बहुतेक नवीन लांब पल्ल्याची तोफ सिद्दीने तैनात केलीया. आधीच्या तोफेचे गोळे गडापातुर पोहचत नव्हते, पण या तोफेचा दणका मोठा आहे. हिकड या , या कड्यावर बघा तोफगोळ्याने टवका उडवलाय" तोफेचा मारा बघून राजे चिंतेत पडले. सिद्दीने एकही मोठी तोफ आणल्याची खबर हेरांनी आधी आणली नव्हती.याचा अर्थ हि तोफ आत्ताच आली होती. राजांनी दुर्बिण मागवली आणि डोळ्याला लावली. थोडा वेळ बघीतल्यानंतर त्यांची आठी चढली आणि मुठी वळाल्या. बरोबर असलेल्या बाजी, सिदोजी,हिरोजी होते. त्यांना हा मामला समजेना. दुर्बिण डोळ्यावरुन बाजुला करुन राजे म्हणाले, "अखेरीस घात झाला तर ! घर फिरले कि वासे फिरतात".
"काय झाले राजे ?" बाजींनी विचारले.
"काय होणार ? अवघ्या दोन महिन्यापुर्वी या राजापुरच्या टोपीकरांना आम्ही जंजीर्याच्या सिद्दीविरुध्द मदत करण्याचे वचन घेउन त्या गिफर्डला सोडून दिले होते. हे आता या दुसर्या सिद्दीला मदत करायला आलेत. दगलबाज अंग्रेज आज उलटलेच. यांचा विश्वास धरुन उपयोग नाही.आम्ही वेढ्यात अडकलो म्हणजे संपलो असा समज या टोपीकरांनी करुन घेतला आहे. स्वताचे निशाण फडकवत त्यांनी आणलेल्या तोफातून गोलंदाजी सुरु आहे. आज आमचा नाईलाज आहे, पण आम्ही या वेढ्यातून सुटल्यानंतर या टोपीकरांना आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवू."
"हवालदार ! तुम्ही मागे हटू नका. असा जोरदार तडाखा द्या कि हे ईंग्रज मागे पळाले पाहीजेत" राजांनी आज्ञा दिली आणि सर्वजण पुन्हा सदरेकडे निघाले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
चैत्र उलटला आणि वैशाष वणवा सुरु झाला. अचानक एके दुपारी जोरदार वावटळ उठली. प्रचंड वार्याबरोबर तुफानी धुळ हवेत उडाली. विजांचे तांडव सुरु झाले आणि टिपरी वाजावी तशा सरी बरसू लागल्या. वळवाच्या त्या पहिल्याच तडाख्याने सिद्दीची छावणी सैरभैर झाली.कित्येक तंबु उडाले. हशमांना जागेवर थांबणे जमेना. पावसाचे ते रौद्र रुप बघून सिद्दीने फाझल व रुस्तमला बोलावणे धाडले,
"यहां पे ईतनी तुफानी बारिश रहती है क्या ? तुम लोग इस मुल्क के बारे मे जानते हो.रुस्तम, ये तो तुम्हारी जागीर है, बताओ" सिद्दीने विचारणा केली.
"हाँ, खानसाहेब.इथे शेवाळाने दगड हिरवे होतात. धुके ईतके उतरते कि पाच-सहा हातावरचा माणुस दिसत नाही, पाउस असा कोसळतो कि जणु आभाळ फाटले कि काय असे वाटावे.चालताना पाय जागेवर ठरत नाही असा चिखल असतो" रुस्तमने माहिती पुरवली.
"हं" जोहर विचारात पड्ला. ह्या बरसातीच्या मोसमाची सिवा नक्कीच वाट पहात असणार. पावसापुढे मी टिकणार नाही आणि वेढा फोडून बाहेर पडू अशी त्याला आशा असेल.पण हा सिद्दी जोहर आहे. त्याने तातडीने फाझल आणि रुस्तमला छावणीबाहेर पडून आजुबाजुच्या गावातून बुरुड लोक पकडून आणण्यास सांगितले. त्यांना बांबू देउन तट्ट्या विणून तंबुला झडी लावण्याचा हुकुम केला.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पन्हाळ्यावर संध्याकाळची वेळ झाली. राजे त्यांच्या महाली विचार करत पुढचा मनसुबा रचत होते. ईतक्यात वर्दी आली, कि रायबा म्हणून कोणी भेटू ईच्छीतो. "रायबा ! त्याला तातडीने आत पाठव आणि दरवाजा बंद करुन घे.कोणाला सोडू नको".
रायबा आला, म्हणजे काहीतरी खबर होती खास. आत आल्यावर रायबा मुजरा घालून म्हणाला, "राजे आजच विजापुरच्या मुलुखाकडून आलो.नेतोजीराव आणि सिद्दी हिलाल यांनी तिकडे दंगल उडवून दिली आहे. गदग, लक्ष्मेश्वरचा मुलुख नेतोजींनी पार उध्वस्त करुन टाकला आहे"
"शाब्बास !" राजे खुष झाले. "काका आता आदिलशाहीला चांगलेच सळो कि पळो करुन सोडणार याची आम्हाला खात्री होतीच. नेतोजी काकांना आमचा निरोप पोहचवा. ईकडे सिद्दी जोहर अपेक्षेपेक्षा चिवट निघाला आहे.आमचा भरोसा या भागात पडणार्या पावसावर होता.पण जोहर चलाख निघाला, त्याने छावणीला झडी लावल्या आहेत.एकंदरीत वर्षाकाळातही वेढा कसून चालणार असे दिसते आहे.तेव्हा काकांना थेट विजापुरला धडक द्यायला सांगा. खुद्द राजधानीला शह बसला कि बादशहाला हा वेढा उठवून जोहरला माघारी बोलवावेच लागेल."
"जी ! जशी आज्ञा " मुजरा घालून रायबा गेला.
खुप दिवसांनी काही दिलासा देणारी बातमी आली होती. राजांनी जगदंबेला हात जोडले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
जोहर छावणीत अस्वस्थपणे बसला होता. चार महिने झाले अखंडपणे वेढा चालु होता, पण पुढे काही होते नव्हते. अंग्रेजांच्या तोफ्या मागवल्या, त्याचा गडावर मारा केला पण किरकोळ टवके उडण्याशिवाय गडावर ढीम्म परिणाम झाला नव्हता. तो खर्च वायाच गेला होता. शेवटी जोहरने पन्हाळ्याच्या पुर्व अंगाला असणार्या टेकडीवर तोफा तैनात करायचा प्रयत्न केला, पण तो ही मराठ्यांनी हाणुन पाडला. नाही म्हणायला एकच गोष्ट चांगली झाली होती. पालीचा सरदार सुर्यराव सुर्वे व शृंगारपुरचा सरदार जसवंतराव पालवणीकर हे दोघे जोहरला येउन मिळाले होते. त्यांना जोहरने थोडी वेगळीच कामगिरी दिली. त्यांना या भागाची असलेली माहिती लक्षात घेता, खेळणा ताब्यात घेण्यासाठी दोघांना रवाना केले.
पुढच्याच आठवड्यात विजापुरवरुन जासूस आल्याचा निरोप सिद्दीला आला. त्याला शामियानात बोलावून निरोप विचारला. जासुसाने वृत्तांत सांगायला सुरवात केली," सिद्दीने इकडे सिवाला वेढ्यात कैद केले असले तरी त्याचा सेनापती नेतोजी व हिलाल तिकडे आदिलशाही मुलुखात मन मानेल तसा धुडघूस घालत होते.गदगची संपन्न पेठ लुटल्यानंतर नेतोजीने थेट विजापुरजवळच्या शहापुरवर स्वारी करुन विजापुरला धोका निर्माण केला. बादशहा अली सिद्दीला विजापुरच्या रक्षणासाठी बोलावणार होते. पण एनवेळी नेतोजी आणि हिलालकडे फार फौज नाही हे समजल्यामुळे खवासखानाने पिटाळून लावले.पण सिवावरची मोहीम ईतके दिवस का चालु आहे? असा बादशहा हुजुरांचा सवाल आहे. वेढा अजून कारिगर का झाला नाही, सिवा का कैद होत नाही, हे सवाल बादशहा सलामत यांनी खानसाहेबांना विचारले आहेत."
खलित्यातील मजकुर एकून जोहरची डावी भिवई चढली. 'या अश्या पावसात तसुभर न हलता मी बादशहा सलामतचे काम नेकीने करतो आहे, तरी अजून माझ्यावर शक आहेच. आता काहीही लवकरात लवकर पनाला काबीज केला पाहिजे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही.' त्याच बरोबर त्याने फाझलखानाला तातडीने बोलावून घेतले आणि एक महत्वाची चाल खेळली,"फाझल, आताच मला विजापुरचा खलिता आला आहे. आता आपल्याला लवकरात लवकर या सिवाला शरण आणायचे आहे. नुकताच नेतोजीने विजापुरवर हल्ला केला, पण तो नाकामयाब झाला. आता तो नेतोजी आपल्या फौजेवर हल्ला करणार.तेव्हा आजपासून पाच हजाराचे घोडदळ घेउन सादतखानाला वेढ्याभोवती फिरते रहायचा निरोप दे. नेतोजीने हमला केला तरी तो वेढ्याच्या नजदीक येता कामा नये. त्याला बाहेरुनच पिटाळून लावा".
"जी ! जैसा हुक्म" ताबडतोब फाझल हुकुमाची ताबेदारी करायला निघून गेला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
आकाश काळ्या ढगांनी भरून गेले होते.हाच काळोख जणु पन्हाळगडावर उतरला होता. सुटकेचा अजून तरी काही मार्ग दिसत नव्हता. पावसात वेढा ढिल्ला होईल आणि काहीतरी करुन सुटका करु अशी आशा व्यर्थ झाली होती. संकट आली कि चार हि बाजूने येतात.याचा प्रत्यय राजांना येत होता. गेल्या दहा-पंधरा दिवसात गडावर आलेल्या खबरा फार आशादायक नव्हत्या. नेतोजींनी थेट विजापुरवर हल्ला करुन अजगराच्या शेपटीला हात तर घातला परंतु एनवेळी फौज कमी पडली, नाही तर सिद्दीला वेढा उठवून विजापुरच्या रक्षणासाठी जावे लागले असते. दुसरी खबर तर भयंकर होती. जुन्नर आणि अहमदनगरच्या लुटीने आधीच चिडलेल्या औरंगजेबाला आदिलशहाकडून खलिता मिळाला होता.आयता हा सिवा वेढ्यात सापडला आहे आणि एक दुश्मन कमी होतो आहे, हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या मामाला शास्ताखानाला स्वराज्यावर चालून जाण्यास सांगितले.हा शास्ताखान सासवडजवळ पोहचल्याची खबर आली होती. आता एकच मार्ग होता नेतोजींनी वेढ्यावर बाहेरुन हल्ला करायचा.
मोठ्या निराश मनाने नेतोजी आणि सिद्दी हिलाल राजगडाच्या पायर्या चढत होते. पडलेल्या चेहर्याने आणि झुकलेल्या खांद्यानी ते दोघे राजगडाच्या सदरेवर पोहचले. आउसाहेब सदरेवर बसून हिशेब आणि आलेले महजर तपासत होत्या. या दोघांना बघून त्यांनी हातातील काम बाजूला ठेवले आणि विचारले, "नेतोजी काका, काय खबर ? राजे अद्याप वेढ्यात आहेत आणि तुम्ही दोघे त्यांना सोडावयचे सोडून ईथे राजगडावर काय करताय ? स्वराज्याचे सरनौबत असे हताश बघायचे का ?"
या सरबत्तीने नेतोजीनी मान खाली घातली आवंढा गिळून ते म्हणाले, "आउसाहेब, आम्ही राजांनी सांगितलेल्या मसलतीनुसार विजापुरचा मुलुख मारला.खुद्द विजापुरच खस्ता व्हायचे, पण नेमकी खबर त्या खवासखानाला लागली. आमची फौज कमी आहे हे समजल्यावर तो आमच्यावर चालून आला. आम्हाला जराही पुढे सरकू देईना.शेवटी माघार घेण्याशिवाय मार्ग सापडेना. पुढे काय करायचे काहीच कळेना झाले आहे. शेवटी आपला सल्ला घ्यायला राजगडावर आलो".
हे एकल्यानंतर जिजाउ साहेब ताडकन जागेवरुन उठल्या आणि कडाडत्या आवाजात म्हणाल्या."स्वराज्याचे सरनौबत इतके कचदिल आहे हे माहित नव्हते.तुमचा राजा तिकडे चार मास झाले वेढ्यात अडकला आहे आणि तुम्ही त्याला सोडवायचा प्रयत्न करायचा सोडून ईकडे मावळात येताय ? काय अर्थ काढायचा याचा ? पुरंदरवर पराक्रमाची शर्थ करणारे नेतोजी थकले, प्रतापगडाच्या पायथ्याशी शाही फौजांना मार देणारे नेतोजी गोंधळले कि अफझलला मारल्यावर मागोमाग विजापुरचा मुलुख घेणार्या सरनौबतांची तलवार दमली ? काय विश्वास धरावा ? काका, तुम्हाला शिवबाला सोडवणे जमत नसेल तर राहु दे. हिरवी काकणे घातलेली आमची मनगटे अजून तलवार घरण्याची धमक राखतात.आम्ही जातीने जातो आणि या मुलुखाच्या राजाला परत आणतो.ईथे गडाखाली फौज नाही तरी आम्ही स्वस्थ बसलो नाही. प्रतापगडाखालची फौज पाठवून वासोटा घेतला. शिवबा ईकडे पन्हाळ्यावर अडकलेत त्याच वेळी स्वराज्यावर मोघलांचे आक्रमण झाले आहे. औरंगजेबाचा मामा स्वराज्यावर आला आहे. शिरवळ जिंकून तो सासवडला जात असताना वारोडीच्या खिंडीत त्याला धडा दिला. काका आम्ही स्वराज्य स्थापन करण्याच्या हेतूने बेंगळुरुवरुन इथे कर्यात मावळात आलो, ते अशी प्राणांतिक संकटे येणार हे गृहित धरुन. रयतेचे राज्य उभा करायचे तर त्याला रुधिराचा अभिषेक लागतो. हार जीत होणारच, पण प्रयत्न सुरुच ठेवायला हवेत."
एरवी मासाहेब म्हणजे आईच्या प्रेमाचा सागर.गडावर येणार्या सर्वांशी जिव्हाळ्याने वागणार्या आणि प्रत्येक मावळ्याला आपल्या आईच्या जागी वाटणार्या आउसाहेबांचे हे रौद्र रुप नवे होते. एखादी वीज कोसळावी तसे ते बोल एकून नेतोजी व सिद्दीला काही सुचेना. घाईघाईने नेतोजी पुढे झाले आणि आउसाहेबांचे पाय पकडून म्हणाले, "चुकलो माँसाहेब ! आता एक पळ न दवडता लगोलग फौज पन्हाळ्यावर नेतो आणि त्या सिद्दीला चांगलाच हिसका दाखवतो. येतो मी".
तातडीने दोघे गड उतार झाले आणि फौज पुन्हा कोल्हापुरच्या बाजुला रवाना झाली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
बेभान पावसाच मारा सुरुच होता.गडाचा माथा पुर्ण धुक्याने भरुन गेला होता. संध्याकाळी सदरेवर बैठक भरली होती. सगळ्यांचेच चेहरे चिंताक्रांत होते. राजांनी चर्चेला तोंड फोडले, "गेले काही दिवस आपण या वेढ्यात अडकून पडलो आहोत. आपल्याला वाटले त्यापेक्षा हा जोहर हुशार निघाला. आमच्या आशा आधी पावसावर होत्या. या पावसाचा मारा विजापुर फौजेला सोसायचा नाही असे वाटले, पण जोहरने त्याच्यावरही मात केली. बाहेरुन नेतोजी काका वेढ्यावर हल्ला करतील आणि आपण ईकडे गडावरुन फौज उतरवायची. दोन्हीकडून झालेल्या कात्रीचा फायदा घेउन निसटायचे असा बेत केला. पण अफझल खानाला मारल्यापासून जवळपास सहा सात महिने नेतोजी पालकर व मावळे सततच्या घोडदौडीमुळे थकलेले दिसतात. नेतोजी काकांनी पन्हाळ्याचा वेढा फोडण्यासाठी पराक्रमाची शिकस्त केली. दमलेले सैन्य घेउन नेतोजींनी पराक्रमाची शर्थ केली पण जोहरची फौज नव्या दमाची. शिवाय वेढ्याबाहेर त्याने काकाना अडविले, या ताज्या दमाच्या फौजेपुढे नेतोजींचा टिकाव लागला नाही.या लढाइत सिद्दी हिलालचा मुलगा सिद्दी वाहवाह शत्रूच्या सैन्यात घुसून त्यांच्यावर तुटून पडला परंतु जोहरच्या सैन्याने वाहवाला घोड्याच्या अग्रभागावरून खाली पाडले व त्यात तो बेशुद्ध पडला. शरीर छिन्नविछिन्न झाले. शाही सैन्य हिलालच्या मुलाला वाहवाहला आपल्याकडे कैद करत सोबत घेवून गेले. ईकडे वेढ्यातून बाहेर पडावे तर पहार्यातील एकही माणूस हालवला नाही.उलट आम्ही निसटू या विचाराने त्यान वेढा अजून बळकट केला.स्वत: तो मोर्चांवर लक्ष ठेऊन होता.
त्यात पुण्याच्या बाजुने आलेली बातमी काळजी वाढवणारी आहे. शास्ताखान पुण्यात येउन बसला आहे.आमचा चाकणचा संग्रामदुर्ग त्याने वेढला आहे. फिरंगोजी काका भांडत आहेत, पण त्यांना बाहेरुन मदत नाही. मोघली फौजा रोज जाळपोळ करीत आहेत. आमच्या स्वराज्याच्या रयतेला हि अशी तोषीश लागणार असेल तर आम्ही स्वस्थ राहू शकत नाही. एकाच वेळी दोन आघाड्यावर लढावे ईतकी फौज आपल्याकडे नाही. शिवाय गेले नउ महिने सततच्या स्वार्यांनी मावळ्यांनी दम खाल्ला नाही. तेव्हा दोन शत्रु अंगावर घेण्यापेक्षा आदिलशहाशी सुला केलेला बरा. पण आधी आम्हाला गडावरुन स्वराज्यात परत जायला लागेल. त्रिबंकपंत गड आम्ही तुमच्या हवाली करतो. आम्ही गडावरुन सुटकेची योजना तयार करतो".
"पण राजे वेढा तर कडक आहे.मुंगीही ईकडची तिकडे जायची नाही असा डोळ्यात तेल घालून पहारा चालु आहे.जोहर अजगरासारखा गडाभोवती पसरला आहे.आपल्या काही माणसांनी वेढा ओलांडायचा प्रयत्न केला पण सगळे मारले गेले.कसे साध्य होणार हे ?" सोबत्यांनी काळजी व्यक्त केली.
"हं ! निघेल काही तरी मार्ग. शिवशंभू पहिल्यापासून आमच्या पाठीशी आहे.आई भवानी या ही परिस्थित यश देईल असा विश्वास आहे" राजे ठामपणे म्हणाले तरी सदरेवरच्या कोणाच्याही चेहर्यावरच्या चिंतेच्या रेषा गेल्या नाहीत.
रात्री राजे महाली एकटेच येरझार्या घालत होते. चेहर्यावर दृढनिश्चय होता आणि डोक्यात योजना पक्की झाली होती. इतक्यात निरोप मिळालेला शिवा काशिद आत आला आणि मुजरा घालून म्हणाला,"राजे ! काय हुकूम आहे ? आपली वर्दी सांजच्याला मिळाली तसा टाकोटाक नेवापुरातून लगेच गड जवळ केला".
"बर झालस शिवा लगेच आलास ते. तु या मुलुखाचा जाणकार आहेस. आज तुझ्यावर मोठी जबाबदारी द्यायची आहे. या उत्तर अंगाच्या बाजुला रुस्तमेजमानची छावणी आहे. रुप बदलून तुला रुस्तमची भेट घ्यायची आहे आणि आमचा निरोप त्याला द्यायचा आहे. अजून तरी गडावर आणि खाली सगळ्यांना तु शिवा काशीद म्हणूनच माहिती असलास तरी फार थोड्यांना तु हेर आहेस याची जाणीव आहे, त्यामुळे गडावरुन खाली उतरुन छावणीत जायला अडचण यायची नाही. उद्या रात्री रुस्तमचा निरोप आम्हाला दे".
त्यानंतर बराच वेळ राजे शिवाला काहीतरी सांगत होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
दुसर्या दिवशी छावणीत सकाळची नमाज झालेली होती. रुस्तमेजमान त्याच्या छावणीत खलिता लिहीत होता, इतक्यात बाहेर आवाज आला,"या खुदा इस फकीर को मदद हो. रहेम करो". अचानक हा फकीर एन वेढ्यात आलेला पाहून शिपाई सावध झाला आणि त्याने फकीराला भाला आडवा घातला,"कौन हो तुम? यहाँ कैसे आये ? और किसने तुम्हे आने की ईजाजत दि ?"
"बेटा इस अल्ला के बंदे को कौन इजाजत देगा. हमे तो ये पुरी जमीं खुदाने बक्ष दी है और तुम ईजाजत कि बात करते हो ?" फकीराने उलट सवाल केला.
"ठिक है, लेकीन ये कोई गाव नही, यंहा सब सिपाही पहेरा दे रहे है, तुम्हे यहाँ घुमने की इजाजत नही दे सकते" पहारेकरी थोडा नरमला.
"कोई बात नही, मुझे बस आप के सरदार से मिलाओ. हम उन दुवा देंगे और चले जायेंगे" फकीर ठामपणे उभारला.
"ठिक है, यही रुको. हम खानसाब को पुछ के आते है" पहारेकरी छावणीत गेला आणि रुस्तमेजमानला कुर्निसात घालून बाहेर उभ्या असलेल्या फकीराविषयी सांगितले. या एन वेढ्यात, फौजेत आपल्याला भेटायला फकीर आला आहे ? रुस्तमला थोडे आश्चर्य वाटले, तरीही त्याने पहारेकर्याला सांगितले, "ठिक है, भेज दो उसे"
त्यानंतर फकीर आत गेला.पण खुप वेळ तो बाहेर आला नाही. एक फकीर खानसाहेबांना इतका वेळ कोणती दुवा देतो आहे याचे पहारेकर्याला आश्चर्य वाटले. बर्याच वेळाने तो फकीर हातात मोरपिस घेउन बाहेर आला, त्याच्या चेहर्यावर विलक्षण समाधान होते.
रात्री शिवा पुन्हा एकदा राज्यांच्या महाली गेला. दार बंद करुन दोघांची चर्चा सुरु झाली. शिवाने आपल्या धोकटीतून मोरपिस काढून दाखवले आणि निरोप दिला, "पुनवेच्या रात्री पश्चिमेला चंद्र जाईल". हा निरोप कोणी एकला असता तरी त्याच्या काही डोक्यात काहीही प्रकाश पड्ला नसता.पण राजांच्या चेहर्यावर स्मित उमटले. त्यांनी लागोलग शिवाला पुढची कामगिरी सांगितली, "शिवा, तुला विशाळगडाकडे जाणार्या जवळच्या आणि अवघड वाटेची माहिती आहे का ? शक्य तितक्या या वाटेने पोहचायला हवे."
"हो महाराज ! तसा रस्ता आणि समदी वर्दळ मलकापुर न्हाईतर आंब्याच्या वाटेने असतीया.पर मधली एक वाट ठाव हाय मला.धनगर्,कातकरी याच वाटंन अणुस्कुर्याला जात्यात आणि खाली कोकणात उतरत्यात. पर लई चिखुल. असल्या पावसात तर नवखा शेवटाला जायचा न्हाई. जळवा तर मोप. एकदा लागली की पोट भरुन रगात पिल्याशिवाय उतरायची न्हाई. वाटंत झाडी लई दाट हाय, वढं बी हायेत. पावसाळ्यात तट्ट फुगत्यात, पाय घालायला भ्या वाटतयं. जादा कोन या वाटंन जात न्हायी,पर विशाळगड जवळ हाय तो याच वाटंन".
"ठिक आहे, तू आणि बाबाजी या वाटेने दोन-तीनदा जाउन या. या वाटेचे प्रत्येक तपशील आम्हाला हवे आहेत.आम्ही तुला सांगतो त्या सर्व गोष्टी नीट निरखायच्या आणि चार दिवसांनी आम्हाला येउन भेट".
त्यानंतर राजे शिवाला बराच वेळ खुपकाही सांगत होते. मध्यरात्र उलटली तसा मान हलवून शिवा महालाबाहेर पडला.
अखेरीस त्रयोदशीचा दिवस उजाडला. राजांनी सगळ्यांना मसलतीसाठी बोलावले आणि निर्वाणीचे सांगितले,"दोनच दिवसांनी पौर्णिमा आहे.आम्ही त्याच दिवशी गड उतार होउन विशाळगडावर जाणार आहोत. त्रिंबकपंत तुम्ही पन्हाळ्याचे गडकरी, गडाची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतो आहोत. आमच्या सोबत आम्ही बांदलसेना घेउन जाणार आहोत. सहाशे बांदल्,बाजीप्रभु,फुलाजी प्रभु, रायाजी बांदल, शंभुसिंग जाधव हे वीर आमच्यासोबत येतील".
"महाराज आम्हालाही तुमच्या सोबत यायचे आहे.जीवावरचे हे धाडस तुम्ही करणार आणि त्यावेळी आम्ही तुमच्या सोबत नाही, हे शक्य नाही.आम्हालाही येउ द्या" सगळे सरदार पुढे होउन आर्जव करु लागले.
"तुमच्या भावना आम्ही जाणतो, पण गड सांभाळणे हि तितकीच मोलाची जबाबदारी नाही का. आम्हाला सैन्य घेउन हा वेढा ओलांडायचा आहे.फार फौज बरोबर घेता येणार नाही.आम्ही राजगडी गेल्यावर पन्हाळा आदिलशहाला देउ, तेव्हा गड मोकळा करुन नवीन मसलतीसाठी आपण पुन्हा एकत्र येउन झुंजायचे आहे.स्वराज्यावर दुसरा शत्रु आधीच आपली वाट पहातो आहे." राजे निश्चयी स्वरात बोललयावर सोबत्यांचा नाईलाज झाला.
"पण राजे सिद्दी जोहरला कसे सांभाळणार ? पहारा तर चोख आहे. " सोबत्यांच्या स्वरात काळजी आणि प्रश्नचिन्ह, दोन्ही होते.
"त्याचाही विचार झाला आहे. आम्ही जोहरला बिनशर्त शरण जाणार !" राजे स्मित करत म्हणाले.
"काय ??? शरण ??" एकदम गोंधळ उडाला.
"होय, शरणागतीचा निरोप घेउन आजच गंगाधरपंत गडउतार होतील. गेले चार महिने एकाच जागी उभारुन विजापुरची फौज कंटाळली आहे. त्यात हा असा महामुर पाउस. शरणागतीची बातमी जरी वेढ्यात पसरली तरी आदिलशाही फौज खुशीने बेहोश होईल. आनंदाच्या भरात बेसावधपणा येतो. फौजेची हि मानसिकता असते, एकाच जागी उभारुन सैनिक कंटाळतो, त्याला सतत काही कामगिरी द्यावी लागते.जोहरने नेमकी हिच चुक केली आहे. या कंटाळ्यातून तह होणार हि बातमी समजली तर सैनिक शिथील पडतो. युध्दशास्त्र हेच सांगते.आम्ही नेमके याच मानसिकतेचा फायदा घेणार आहोत. एकदा वेढ्यातून पार झालो तर फार अवघड नाही, अर्थात तरीही पुढच्या सर्व संकटाचा विचार करुन पर्यायाची आखणीही आम्ही केली आहे. बस्स काही काळासाठी जोहर बेसावध व्हायला पाहीजे."
कान टवकारून सर्व सदर हा मनसुबा एकत होती. राजांनी सुक्ष्म विचार केला होता. बेत कारिगर होणार याची सर्वानाच खात्री पटली.मनातून सर्वांनीच आपआपल्या दैवतांना नवस बोलला असणार.
आषाढ पुनव दिवस उगवली. गुरुपौर्णिमा ! आज चांगलाच धडा एक विजापुरकर शिष्य शिकणार होते.दिवस वर चढला आणि गडावरुन गंगाधरपंत एक थैली घेऊन निघाले. खुद्द महाराजांच्या शिक्का मोर्तबाची पत्रे त्या थैलीत होती.अर्थात हा खलिता होता खाश्या जौहरसाठी.गडावरुन गंगाधरपंत गड उतरताना जौहरचे छावणीला दिसत होते.सततच्या उनपावसात रात्रंदिवस पहारा करुन वेढ्यात उभारुन पुर्ण वैतागलेल्या सैन्याला हे दृश्य नवी आशा पालवणारे होते.सततची दमदाटी, आधी घामाच्या धारा काढून भाजून काढणारे उन आणि आता अंगावर एक दोराही कोरडा न ठेवणारा पाउस, याने वैतागलेल्या सैनिकांची नजर कायमच गडाच्या दरवाजाकडे लागलेली असायची. कधी त्या सिवाचा वकील येतो, बोलणी होतात आणि कधी आम्ही इथून निघतोय.
गंगाधरपंत गड उतर होताना पाहून फौजेच्या आशा पालवल्या. “सिवाचा वकील अखेरीस आला.आता आपला हा वनवास संपणार.ईतके महिने उन्हा पावसात राबलो, शेवटी फतेह झाली तर!”
गंगाधरपंत जोहरच्या छावणीत पोहोचले.त्यांनी थैलीतून खलिता काढून जौहरच्या हातात दिला.वकीलाला पाहून जोहरच्या मनात आनंदाने कारंजे थुईथुई उडायला लागले. तरीही चेहरा स्थितप्रज्ञ ठेवून खलिता उघडला आणि मजकुरावरुन नजर फिरवली.जसजसा तो वाचत गेला तसतसा त्याचा चेहरा उजळला. "शिवाजीने बिनशर्त शरणागती पत्करली होती !". इतके परिश्रम घेतले त्याचे सार्थक झाले होते. आता विजापुरात ताठ मानेने जाता येणार होते.गेले काही दिवस बादशाहाची पत्र येत होती, त्यात जोहरवर थेट बंडखोरीचा आरोप केला जात होता.आता त्याला चोख उत्तर देता येणार होते.जोहर विचारात गढला होता, इतक्यात गंगाजीच्या उदगारांनी तो भानावर आला," हुजूर, काय सांगू राजांना ?"
"आप थोडे देर रुकीये. मै सला मशवरा करके आपको जवाब देता हुं" सिद्दीने थोडे धीराने घेण्याचा निर्णय घेतला.लगोलग त्याने फाझल्,रुस्तम यांना छावणीत येण्याचा निरोप दिला. दोघे आल्यानंतर त्यांच्या समोर शिवाजी राजांचा खलिता दाखवला आणि मत विचारले.
फाझल ताडकन उत्तरला ,"सिवा ईतने आसानीसे हार कबुल करेगा, ये मै नही मानता. शायद ये उसकी यहांसे छूटने की कोशीश होगी. मी माझ्या वालिद खानसाहेबांबरोबर गेलो होतो तेव्हा अशीच बतावणी करुन त्याने आम्हाला जावलीच्या जहन्नुमसारख्या मुलुखात बोलावून घेतले आणि दगा दिला".
रुस्तमने मात्र वेगळाच सुर लावला, "खानसाहेब, माझ्या मते अर्जी मंजुर करावी. तसेही सिवाला आपण या पन्हाळ्यावर कोंडले आहे.जरी सिवा शरण आला नाही तरी तो वेेढ्यातून पळून जाणे शक्य नाही. आपले मोर्चे पहारे कडक आहेत.जर आता आपण अर्जी मंजुर केली नाही आणि उद्या पुन्हा नेतोजी चालून आला तर थकलेली फौज तोंड देईल ? शिवाय अली बादशहा आपसे वैसेही खफा आहेत. त्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावायला सांगितला आहे.खानसाहेब, सुला मंजुर असल्याचा खलिता आजच रवाना केलेला बरा"
एकूण परिस्थितीचा विचार केला तर रुस्तमचे म्हणने जोहरला पटले. मात्र फाझलला हि सुला मान्य नव्हती. पण अखेरचा निर्णय सेनापती या नात्याने जोहरचा असणार होता. निमुटपणे फैसला मान्य करुन चडफडत तो आपल्या तंबुकडे गेला.
प्रसन्न चेहर्याने गंगाधरपंत खलिता घेउन गड चढू लागले. ईतकी महत्वाची बातमी वेढ्यात पसरली नसती तरच नवल होते. सगळ्या फौजेच्या चेहर्यावर तणाव दुर झाल्याने हास्य फुलले. तुफान पावसाने आणि रोगराईने बेजार झालेल्या सैनिकांना कधी आपल्या मुलुखात परत जातो आहे, याचे वेध लागले. सैनिक पहार्याएवजी जागोजागी एकत्र जमून चर्चा करु लागले.
क्रमशः
उत्कंठावर्धक. पुढील भाग लवकर
उत्कंठावर्धक. पुढील भाग लवकर टाका.