२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध
http://www.maayboli.com/node/58713
२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग १
http://www.maayboli.com/node/58938
२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग २
http://www.maayboli.com/node/59092
२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग ३
https://www.maayboli.com/node/59199
२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग ४
https://www.maayboli.com/node/74279
=====================================
नर्मदे हर
कालच्या दगदगीमुळे शांत झोप लागली. पहाटे ५ वाजता जाग आली. अनायसे जाग आली म्हणून सर्वांनीच लवकर आवरले. तेवढ्यात चहा आला. एका मोठ्या जगमध्ये बाबाजींनी चहा आणला. बाकी परिक्रमावासींनी आपापले ग्लास काढले आणि चहा भरून घेतला. आम्ही मात्र गृहपाठ न केलेल्या विद्यार्थ्यांसारखे चुपचाप एका कोपऱ्यात उभे होतो. तेवढ्यात बाबाजींनी आम्हाला चहा घ्यायला बोलावले. आम्ही आमची अडचण सांगताच त्यांनी आमच्यासाठी ग्लास मागवले आणि ग्लासभरून चहा दिला. दर वेळेप्रमाणे थंडीतला चहा सुरेखच लागतो आणि गुजरातमध्ये असल्याने अगदी 'खडा चम्मच' चहा होता. अहाहा! चहा झाल्यावर ग्लास धुवून परत दिले. परिक्रमेत एक महत्वाचा नियम आवर्जून पाळावा लागतो. आपण जी भांडी वापरू ती धुवून ठेवायची. आम्हाला नंतर कळले कि ९९% परिक्रमावासी स्वतःचे ताट आणि ग्लास सोबत ठेवतात. पण आम्ही या बाबतीत अडाणी असल्याने आम्ही यापैकी काहीच जवळ ठेवले नव्हते. नंतर लक्षात आले तेव्हा ठेवू शकलो असतो पण आधीच सर्व सामान पॅनिअरमध्ये कोंबून भरल्याने अजिबात जागा शिल्लक नव्हती. अगदीच प्रामाणिक सांगायचे झाले तर २०० ग्रॅम का होईना, तेवढे वजन वाहायला लागले असते म्हणून घेण्याचे टाळले.
चहा झाल्यावर एकदम तरतरी आली. लगेचच सर्व आयुधं (ग्लोव्हज, शूज, हेल्मेट इत्यादी) घालून सायकलवर खोगीरं चढवली. निघायच्या आधी बाबाजींचा निरोप घ्यावा म्हणून त्यांना नमस्कार करायला गेलो तर म्हणाले 'कहाँ जा रहे हो... बालभोग (नाश्ता) करके जावो.' (इकडे नाश्त्याला बालभोग असे म्हणतात.) ते असे बोलत असतानाच गरम गरम पोहे आमच्यासमोर आले. कालचे कमी झालेले अंतर भरून काढायचे म्हणून आम्ही लवकर निघायच्या तयारीत होतो. पण बाबाजी ऐकेनात. आग्रह झाला. शेवटी बाबाजींच्या विनंतीला मान देऊन पोहे खाल्ले आणि नर्मदे हर च्या घोषात निघालो.
साधारण ५-६ किमी झाले आणि अनिकेतची सायकल पंक्चर झाली. परिक्रमा सुरु केल्यापासून पहिल्यांदाच अनिकेतची सायकल पंक्चर झाली होती. नंदू काका आणि अनिकेत पंक्चर काढेपर्यंत आम्ही तिघे जवळ असलेल्या टपरीत गेलो. जवळपास अर्धा तास झाला तरी सायकल तयार होईना म्हणून मी जाऊन बघितले तर कळले की पंक्चर काढून ट्यूब आत बसवताना ट्यूबला लावलेला पॅच परत निघतो आहे. थोड्या वेगळ्या पध्धतीने बसवायचा प्रयत्न केल्यावर अखेर आम्हाला यश आले. जवळपास पाऊण तास गेला. आम्ही थांबलो होतो त्या टपरीवर उसाचे गुऱ्हाळ होते. तिकडे उसाचा रस पिऊन आम्ही नेत्रांगच्या (२८ किमी) दिशेने निघालो. सोबत थोडी केळी सुद्धा घेतली.
थोडे पुढे गेल्यावर माझ्या सायकलमधून कटकट असा आवाज यायला लागला आणि सायकल जड जाणवायला लागली. जाम ओढायला लागले. थांबून बघितले तर लक्षात आले माझे पॅनिअर स्पोक्सना घासत आहे. पॅनिअर काढून परत बांधले तरी काही फरक पडेना. मग इटी काकांमधल्या इंजिनिअरला जाग आली आणि त्यांनी दोरीने माझे पॅनिअर सायकलच्या कॅरियरला बांधून टाकले. ते गणित इतके चपखल जमले कि परिक्रमा पूर्ण होईपर्यंत माझे पॅनिअर कधीच परत स्पोक्सना घासले नाही. नर्मदे हर!
तो दिवस बहुदा अडचणींचा दिवस असावा. पुढे काही अंतर गेल्यावर इटी काकांचे चाक आउट झाले आणि सायकल डुगडुगायला लागली. थांबून त्यांच्या सायकलच्या चाकाचे आउट काढले आणि निघालो. पुढे नेत्रांगच्या अगदी अलिकडे नंदू काकांचे टायर पंक्चर झाले. पंक्चर काढून नाश्त्याचा ठरलेला बेत रद्द करून आम्ही थेट वालियाला (४२ किमी) जाऊन थांबलो. मध्ये फक्त १० मिनिटे पाणी आणि केळी खाण्यासाठी थांबलो.
वालियाला एका टपरीमध्ये फाफडा, जिलबी आणि ढोकळा खाल्ला. इकडची एक खासियत म्हणजे भौगोलिक बदलांनुसार कोणत्याही पदार्थासोबत दिली जाणारी चटणी सुद्धा बदलते. आधी आम्हाला चिंचेची चटणी मिळत होती. आता ढोकळा आणि फाफडासोबत कढीवजा चटणी मिळाली. नेहमीच्या कढीपेक्षा थोडी घट्ट पण अत्यंत चविष्ट. ते खाल्ल्यावर आम्हाला टपरीच्या मालकाने आग्रहाने कढी-भात खायला दिला. फारच सुंदर. पोटाला तड लागेपर्यंत खाऊनच उठलो. आम्ही आयुधं घालेपर्यंत नंदू काका पैसे द्यायला गेले. मालकाने पैसे घेतले तर नाहीतच वर काही हवे असेल तर सांगा, बांधून देतो असे म्हणायला लागला. नंदू काकांनी खूप आग्रह केला पण त्याने पैसे घेतलेच नाही. शेवटी नर्मदे हर म्हणून आम्ही अंकलेश्वरच्या दिशेने निघालो.
त्या दिवशी सर्वांच्याच सायकलने (बाबांची सायकल सोडून. याचा संदर्भ पुढे येईलच) त्रास दिला होता. नंदू काकांचा श्री. शशांक परांजपे नावाचा मित्र सुरतला राहतो. नंदू काकांनी त्यांना फोन करून आम्ही अंकलेश्वरला पोहोचणार असल्याचे सांगितले. सुरत ते अंकलेश्वर हे साधारण ७० किमीचे अंतर. पण फक्त आम्ही सायकलने परिक्रमा करतो आहे म्हणून श्री. परांजपे सुरतवरून अंकलेश्वरला येतो असे म्हणाले. आम्ही अंकलेश्वरला पोहोचेपर्यंत श्री. परांजपे आलेच. ओळख झाल्यावर त्यांनी त्यांच्या गाडीतून २ टायर, काही ट्यूब आणि स्पोक्स काढले. आम्ही अवाक झालो. मग नंदू काकांनी सांगितले कि मीच याला फोन करून हे सामान आणायला सांगितले होते. एवढ्या लांबून फक्त मित्राच्या एका हाकेवर एवढे सामान आणल्याबद्दल आम्हाला खरंच कौतुक वाटले. त्यांच्यासोबत चहा घेतला आणि पुढे कठपोरच्या दिशेने निघालो. कठपोर म्हणजे दक्षिण तटावरचे परिक्रमेतले शेवटचे गाव. तिकडे नावेतून समुद्र पार करून पलीकडच्या तीरावर (उत्तरतट) जायचे असते. हंसोटमार्गे संध्याकाळी ६.३० च्या सुमारास आम्ही कठपोरला पोहोचलो. त्याआधी एक आवर्जून नमूद करावेसे वाटते. कोणीही कोणत्याही मार्गाने (पायी, सायकल, गाडी, बस इत्यादी) परिक्रमा करू शकतो, पण हा टप्पा मात्र नावेतूनच पार करावा लागतो. जर पुलावरून पलीकडच्या किनाऱ्यावर गेले तर मैय्या ओलांडली जाते आणि परिक्रमा भंग होते.
कठपोरमध्ये एकच आश्रम आहे आणि त्याच आश्रमाकडे नावेचे कंत्राट आहे. हात पाय धुतल्यावर तिकडच्या बाबाजींनी चहा दिला आणि पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी माणशी ६५/- रुपये देऊन प्रत्येकाची नावे नोंदवायला सांगितली. बाबा आणि नंदू काका आमची नावे नोंदवायला गेले. थोड्या वेळाने काहीसे नाराज होऊन परत आले. काय झाले विचारले असता म्हणले कि नाव उद्या पहाटे २-३ च्या सुमारास निघू शकते. (नाव निघण्याची वेळ भरतीवर अवलंबून असते. हि वेळ नेहमीच मागे पुढे होत असते. नशीब वाईट असेल तर रात्री १२ वाजता सुद्धा निघावे लागते.) एका वेळी दोन नावा निघणे अनिवार्य आहे. तसा इथला नियमच आहे. आणि एका नावेमध्ये प्रत्येकी ५० परिक्रमावासी म्हणजेच एकूण १०० परिक्रमावासी असल्याशिवाय बोटी निघत नाहीत. तेव्हा फक्त ६० लोकांची नोंदणी झाली होती. १०० परिक्रमावासी होईपर्यंत बोटी निघणार नाहीत, त्यामुळे आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत थांबावे लागेल. हे सर्व ऐकल्यावर आम्हीपण जरा नाराज झालो. रात्रीचा प्रसाद घेऊन आम्ही परत त्याच चर्चेत गुंतलो. चर्चा करताना आमच्या डोक्यात एक कल्पना आली. आम्ही परत नाव नोंदणी करणाऱ्या बाबाजींकडे जाऊन त्यांना विचारले. 'अगर हमने आपको बाकी ४० परकम्मावासियो के पैसे दे दिये तो आप नाव छोडोगे?' आमचा प्रश्न ऐकून बाबाजी एवढे आश्चर्यचकित झाले कि त्यांना हा प्रश्न कधीच कोणी विचारला नसावा अशी आमची खात्री पटली. आम्ही विचारलेल्या प्रश्नाचा धक्का पचवून नॉर्मलला आल्यावर बाबाजी म्हणले 'इधर कोई परकम्मावासी ऐसे है कि वो खुदके पैसे देना नही चाहते और आप है कि ४० लोगोका पैसे देंगे?' आम्ही आमची लवकर निघण्याची इच्छा सांगितल्यावर बाबाजी लगेच तयार झाले. आम्ही सुद्धा खुशीत झोपायच्या तयारीला लागलो. पहाटे २ वाजता उठून समुद्रावर जायचे होते. पण एका गोष्टीचा आम्ही विचार केला नव्हता. सायकल आणि सामान दोन्ही नावेतून कसे न्यायचे. त्याआधी नावेपर्यंत कसे न्यायचे. कारण आधी माहिती घेतल्याप्रमाणे आश्रम ते नाव हा रस्ता खूपच ‘रोमांचकारी’ असतो हे आम्हाला कळले होते. चिखलातून जावे लागते. मध्ये कदाचित १-२ पाण्याचे प्रवाहसुद्धा ओलांडावे लागतात. आणि त्याउपर आश्रम ते नाव हे अंतर जवळपास २ किमीचे आहे. म्हणजे आधी सायकल आणि मग सामान अशा २ फेऱ्या त्या अंधारात मारणे सुद्धा अशक्य होते.
ठरल्याप्रमाणे पहाटे २ ला उठलो. आवरल्यावर बाहेर येऊन बघतो तर सर्व परिक्रमावासी समुद्रावर जाणयासाठी उभे होते. आम्ही सुद्धा त्या घोळक्यात सामील झालो. शेजारीच काही गुजराती संन्याशांचा चमू होता. आमचा पेहेराव बघून त्यांनी आमची चौकशी केली. बोलताना असे कळले कि ते गाडीने परिक्रमा करत आहेत. सर्व संन्याशी नावेने समुद्र पार करणार होते आणि त्यांची गाडी परत जाऊन पलीकडच्या किनाऱ्यावर त्यांना घ्यायला येणार आहे. वेळ न दवडता त्यांना आम्ही विचारले कि आमचे सामान तुमच्या गाडीतून पाठवून दिले तर चालेल का. त्यांनी लगेच संमती दर्शवली. खूप हायसे वाटले. आम्ही आमचे सामान गाडीत टाकले आणि थोड्याच वेळात बाबाजींनी नर्मदे हर केल्यावर आमचे ते 'रोमांचकारी' मार्गक्रमण सुरु झाले. आम्ही आणि आमच्या हातात आपापली सायकल, असे चालत होतो. रस्ता पूर्ण पायवाटीचा होता. ऐकिवात असल्याप्रमाणे अर्धा रास्ता पार झाला तरी चिखल लागला नव्हता. असाच रस्ता धक्क्यापर्यंत असेल तर काही अडचण नव्हती. पण अगदी १५-२० पावले पुढे गेले आणि चिखल सुरु झाला. शूज सामानाबरोबर गाडीतून पाठवून आम्ही साध्या चपला घातल्या होत्या. चिखल लागल्याने चपला जड होऊ लागल्या. सायकलच्या चाकांमध्ये चिखल लागायला लागला. शेवटी चपला काढून कॅरियरला लावल्या आणि पुढे जाऊ लागलो. जेमतेम ५० पावले पुढे गेलो नसू तर सायकल पुढे जायचं नाव घेईन. चाकांमध्ये इतका चिखल अडकला की सायकल जागची हलेना. सगळ्या सायकलींची तीच परिस्थिती. शेवटी थांबून आम्ही हातानेच थोडा चिखल काढला आणि पुढे जाऊ लागलो. पण पुढे गेल्यावर परत तीच बोंब. शेवटी इटी काकांनी सायकल खांद्यावर घेतली आणि चालायला लागले. मग आम्हीसुद्धा त्यांचे अनुकरण करून सायकली खांद्यावर घेऊन चालू लागलो. मजल-दरमजल करत आमची वरात धक्क्यावर पोहोचली. नाव अजून धक्क्यावर आली नव्हती. तेवढ्या वेळात आम्ही जमेल तेवढ्या सायकली स्वच्छ केल्या. थोड्याच वेळात नाव आली आणि आम्ही नावेत चढलो. नावेचा आकार अपेक्षेपेक्षा छोटा असल्याने आम्हाला सर्व सायकलींचे एक चाक काढावे लागले. सर्व सायकली नावेत ठेवल्यावर आणि सर्वजण नावेत बसल्यावर दोन्ही नावा निघाल्या. नर्मदे हर चा जयघोष सर्वत्र दुमदुमला.
नावेतल्या प्रवासाबद्दल आवर्जून सांगावेसे वाटते. सर्वसाधारणपणे जसे आपण एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर बोटीने जातो तसा हा प्रवास अजिबात नाही. नर्मदा मैय्या ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते तिकडे म्हणजेच खाडीजवळ आपल्याला नावेत बसावे लागते. नर्मदा मैय्या तिच्या प्रवाहामुळे जवळपास १५-२० किमीपर्यंत समुद्रात जाते. म्हणून दक्षिण किनाऱ्यावरून उत्तर किनाऱ्यावर सरळ रेषेत न जाता समुद्रात उलटे जाऊन परत यावे लागते जेणेकरून मैय्या ओलांडली जाणार नाही. हा सर्व प्रवास अंदाजे ५०-६० किमीचा असतो ज्याला एकूण ४-५ तास लागतात.
आमची नाव निघाली. समुद्रामध्ये असलो तरी कडाक्याची थंडी होती आणि बोचरं वारं वाहत होतं. साधारण १५-२० मिनिटे झाल्यावर आमच्या सोबत असलेली दुसरी नाव बंद पडली. चौकशीअंती कळले कि इंजिनमध्ये बिघाड झाला असल्याने इंजिन सुरु होत नाही. मग आमच्या नावेला दोरी बांधून आमची नाव मागच्या नावेला टो करत निघाली. (या इंजिन बिघाडाची खरी गम्मत अशी की आमचा नावेतला अनुभव ज्या परिक्रमावासींना पुढे सांगितला तेव्हा त्यांनी सुद्धा तसेच झाल्याचे सांगितले. प्रवास सुरु झल्यावर एक नाव बंद पडली आणि दुसऱ्या नावेने त्यांना ओढत नेले. अगदी प्रत्येकला हाच अनुभव. मग आमच्या लक्षात आले. नावाचे कंत्राट आश्रमाकडे असल्याने नावाड्याना मर्यादित मोबदला मिळतो. म्हणून प्रवास सुरु झाल्यावर काही वेळाने एक इंजिन बंद करतात आणि डिझेलचे पैसे वाचवून ते त्यातून ज्यादा पैसे मिळवतात.)
साधारण निम्मे अंतर पार केल्यानंतर आमचा केवट (नावाडी) म्हणाला 'मैय्या का दर्शन लेलो और केवटको दक्षिणा देदो.' सर्वांनी सोबत असलेले नर्मदा जल समुद्रातल्या पाण्याने भरू घेतले आणि केवटला दक्षिणा दिली. ज्यांनी दक्षिणा नाही दिली त्यांच्याकडे जाऊन केवटने दक्षिण आवर्जून घेतली आणि मगच नाव पुढे सोडली.
साधारण ७.३० च्या सुमारास किनारा दिसायला लागला. आम्ही अंकलेश्वरवरून भडोचला आलो होतो. खूप मोठे कारखाने आणि रिफायनरीज दिसू लागले. थोड्याच वेळात किनाऱ्याजवळ पोहोचलो. इकडे काही त्या किनाऱ्यासारखा धक्का नव्हता. त्यामुळे गुढघाभर चिखलात उतरावे लागले. उतरल्यावर सायकल आणि चाक हातात घेतले आणि किनाऱ्याच्या दिशेने चालू लागलो. चिखल संपला तरी वाळू होतीच त्यामुळे डांबरी रास्ता लागेपर्यंत सायकल आणि चाक हातात घेऊनच चाललो. रस्ता दिसल्यावर चाक सायकलला जोडले आणि सायकल हातातच घेऊन चालू लागलो. उत्तर तटावर पहिले गाव लागते त्याचे नाव मिठीतलाई. तिकडे एकमेव आश्रम आहे. बाकी परिक्रमावासींना फॉलो करत आम्ही आश्रमात पोहोचलो. समोरच एक मोठी विहीर होती आणि त्यावर असंख्य परिक्रमावासी आंघोळ करत होते. विहीर बघून जीव भांड्यात पडला. चिखलाने संपूर्ण शरीर आणि सायकल भरली होती. आधी आम्ही सर्वानी सायकली स्वच्छ धुतल्या आणि मग स्वतः आंघोळ केली. सायकलची दोन्ही चाकं काढून अगदी मन लावून सायकल धुतली. हा खेळ जवळपास ३-४ तास चालू होता. आंघोळी उरकून कपडे धुतले आणि मग आम्हाला भुकेची जाणीव झाली. आश्रमात सदावर्त (शिधा) मिळत होता. नावेतल्या प्रवासाने दमलो असल्याने स्वयंपाक करून जेवायचं कंटाळा केला. आश्रमाच्या बाहेर एका टपरीवर थोडे खाल्ले आणि निघायच्या तयारीला लागलो. दुपारचे २ वाजले असल्याने आज जास्त अंतर जायचे नाही असे ठरवले. मिठीतलाई पासून साधारण ३५ किमीवर भाडभूत नावाच्या गावी एक आश्रम आहे. आश्रम स्वच्छ आहे. गुजरातमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प्रत्येक आश्रमात / परिक्रमावासींच्या राहण्याच्या ठिकाणी व्यवस्थित बांधलेलं संडास आणि स्वच्छता. मध्य प्रदेशमध्ये याचा अभाव बराच जाणवतो. तिकडे 'होल वावर इज आवर' या तत्वावर सर्व चालते.
तिकडच्या पुजारींनी आमची राहायची सोय एका मोठ्या हॉलमध्ये केली. आमच्याशिवाय तिकडे दुसरं कोणीच नव्हतं. रात्रीच्या भोजनासाठी खिचडीचे सामान दिले. इटी काका आणि मी मिळून खिचडी केली आणि पुजारींना पण दिली. पहाटेपासून झालेल्या प्रवासाने बरीच दमणूक झाली असल्याने पटकन झोप लागली. आता संपूर्ण उत्तरतट पार करून अमरकंटकपर्यंत (मैय्याचे उगमस्थान) जायचे होते. म्हणायला गेलं तर आत्तापर्यंत २५% परिक्रमा पूर्ण झाली होती.
सुन्दर लेख आणि अतिशय छान
सुन्दर लेख आणि अतिशय छान प्रवास वर्णन!
छान प्रवासवर्णन! फोटो दिसत
छान प्रवासवर्णन! फोटो दिसत नाहीयेत पण.
मस्त लिहिलंय...
मस्त लिहिलंय...
वाचतोय आवडतंय
वाचतोय आवडतंय
फोटो दिसत नाहीयेत. +१
खूप सुंदर.
खूप सुंदर.
आयुष्याच्या मध्यान्हकाळी स्थिरता लाभलीच तर लागोपाठ काशी रामेवश्वर आणि त्यानंतर नर्मदा परिक्रमा करण्याचा मानस आहे.
नर्मदे हर, हर हर महादेव!
नमस्कार
नमस्कार
आपण सांगितल्याप्रमाणे फोटो दिसायला अडचण येत आहे. कोणी या संदर्भात मदत करू शकेल काय? मायबोलीच्या 'फोटोग्राफी विषयक' धाग्यावर जाऊन सुद्धा बघितले पण आता पिकासा बंद झाले असल्याने तो हि पर्याय बंद झाला आहे. या लेखात मी ड्राइव्ह वरून फोटो लिंक केले पण तरी दिसण्यास अडचण येत आहे. कृपया कोणाला चपखल उपाय माहिती असल्यास जरूर कळवा. या आणि पुढच्या भागांमध्ये उपयोग करता येईल.
आगाऊ धन्यवाद.
छान वर्णन!
छान वर्णन!
नवीन भाग लवकर येऊ देत.ही
नवीन भाग लवकर येऊ देत.ही पूर्ण झाली की तुमच्या पायी परिक्रमेचे वर्णन वाचायची उत्सुकता आहे
https://drive.google.com/file
१. श्री मेकलसुता धाम
२.आश्रमातून बोटींकडे जाताना
३. नावेतील प्रवास
४. इटी काका
५. सायकल धुवून झाल्यानंतर
मिसळपाव या संकेतस्थ्ळावर
वेदांग,
मिसळपाव या संकेतस्थ्ळावर कंजूस यांनी गुगल ड्राईव्हवरचे फोटो संकेतस्थळात कसे द्यायचे त्यावर लेख लिहिला आहे तो पहावा.