मँगो कुकीज

Submitted by वावे on 14 April, 2020 - 00:18
mango cookies
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आंब्याचा आटवलेला रस - १ वाटी ( हा तयार हवा)
कणीक - २ वाट्या
लोणी ( घरचं किंवा विकतचं अनसॉल्टेड) - १ वाटी
साखर- ५-६ टेबलस्पून
दालचिनी पूड - चिमूटभर
बेकिंग पावडर- १/२ टीस्पून
दूध- लागेल तसं

क्रमवार पाककृती: 

आंब्याचा आटवलेला रस घरात होता. तो तसा नुसता खाऊनही संपतो. पण यावेळचा रस जरा कडक, खुटखुटीत होता. मला चिकट असलेला आवडतो Happy त्यामुळे हा संपला नाही. मनीमोहोर यांनी लिहिलेल्या रसाच्या पोळ्या करण्याचाच विचार होता, पण तेवढ्यात लक्षात आलं की आपण नेहमी खजुराच्या कुकीज करतो, तशा या रसाच्या करून बघू. केल्या आणि चांगल्या झाल्या.

आता कृती:
आटवलेला रस किसून घ्या. त्यात लागेल तसतसं अक्षरशः थेंब थेंब दूध घालून चिकट कन्सिस्टन्सी येऊ द्या. अजिबात पातळ व्हायला नको. साधारण सैलसर, चिकट व्हायला हवा. मुळात चिकट असेल तर ही पायरी गाळायची.
कणकेत रूम टेंपरेचरचं लोणी आणि साखर घालून बोटांनी मिसळा. ते मिश्रण ब्रेडक्रंब्ससारखं दिसायला लागेपर्यंत मिसळायचं आहे. तसं ते दिसू लागलं, की त्यात आटवलेला रस , दालचिनी पूड आणि बेकिंग पावडर घालून एकत्र करा. गोळा मळून घ्या. लाटता येईल असा गोळा तयार झाला पाहिजे. कोरडा वाटला तर दुधाचा हात लावून मळा.

IMG-20200414-WA0003.jpg

असा गोळा तयार झाला पाहिजे.

ओव्हन १८० अंश सेल्सिअसला प्रीहीट करून घ्या.

पोळपाटावर थोडं पीठ भुरभुरवून बऱ्यापैकी मोठी लाटी घेऊन लाटून घ्या. साधारणपणे पाव इंच जाडीची पोळी लाटायची आहे. लाटून झाली, की कुकी कटरने किंवा कातण्याने कुकीज कापा. बेकिंग ट्रेला तुपाचा हात लावून त्यात कुकीज मांडून २० ते २५ मिनिटे बेक करून घ्या.

१५-१६ मिनिटांनंतर कुकीजकडे लक्ष ठेवावं लागतं. कधीकधी अचानक करपतात. खरपूस रंग आला तर लगेच बाहेर काढा.

कातून/ कापून उरलेल्या मिश्रणाचा परत गोळा करून परत त्याची पोळी लाटायची. मी मोठी वाटी भरून रस घेतला होता त्याच्या जवळजवळ ४-५ batches झाल्या. शंकरपाळे जसे कधीकधी लाटून संपता संपत नाहीत तसा प्रकार झाला. पण कुकीज मात्र चवीला छान झाल्यामुळे वैताग आला नाही.

IMG-20200414-WA0004.jpg

तयार कुकीज

वाढणी/प्रमाण: 
मोठी वाटी भरून असलेल्या रसाच्या ७०-७५ मध्यम आकाराच्या कुकीज झाल्या
अधिक टिपा: 

आंब्याच्या आटवलेल्या रसाबद्दल सविस्तर चर्चा मनीमोहोर यांच्या या धाग्यावर झालेली आहे.
वैधानिक इशारा:
घरात हा रस तयार असेल तरच या कुकीज कराव्यात Happy कुकीज करण्यासाठी आंब्याचा ताजा रस आटवायच्या फंदात पडू नये.

माहितीचा स्रोत: 
मूळ खजूर कुकीजची रेसिपी तरला दलाल यांच्या पुस्तकातली. पुढचा प्रयोग माझा.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. छान दिसतायेत.
मला स्वतः ला mango flavored गोष्टी आवडत नाही.त्यामुळे माझा पास.
पण काहीतरी वेगळं घालून प्रयत्न करेन.

Superb distayt cookies, ghari magchya varshicha daba bharun atavlela ras ahe! mago milkshae peksha he chan ahe, karun baghtech!

मस्त दिसतायत कुकीज. पण बेकिंगपासून जरा लांबच राहते त्यामुळे बघण्यावरच समाधान मानेन.

वावे मस्तच झाल्यात कुकीज. जाई म्हणलीय तस तुझ्या आयडीया ला सलाम .

ह्या दिवसात विकतच काही आणण्यापेक्षा घरच्या घरी केलेला हा खाऊ किती तरी पटीने चांगला.

रसाच्या पोळ्यांपेक्षा खूप कमी झाली असेल खटपट . चवीला छानच असतील आणि टिकतील ( म्हणजे शेल्फ लाईफ ) ही खूप . म्हणजे गपागप सम्पल्या नाहीत तरच टिकतात की नाहो ते कळेल.

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!
मनीमोहोर, गपागप सम्पल्या नाहीत तरच टिकतात की नाहो ते कळेल. >> शेवटची बॅच होईहोईपर्यंतच २५-३० संपल्या. ७०-७५ झाल्या त्यापैकी डब्यात फक्त २०-२५ गेल्या असतील. त्याही सगळ्या २ दिवसांत संपल्या. Lol

खटपट खरंच कमी झाली मात्र.

खासच दिसतायत कुकीज, त्यानिमित्ताने ममोच्या रसाच्या पोळ्याच्या धाग्यावर पण फिरून आले. मानलं तुम्हाला.

हाहाहा! रसाला पर्याय म्हणजे खजूर. खजूर बारीक चिरायचा. त्यात दुप्पट पाणी घालून शिजवायचा. mash करायचा. प्रमाण आणि कृती सेम. (जेवढा खजूर तेवढं लोणी आणि दुप्पट कणीक)
लोण्याला पर्याय नसावा. तूप वापरून होतील की नाही याची शंका आहे. नाही तर पुऱ्या / शंकरपाळे करून तळा.
नवीन प्रतिसादकांचे आभार!