Croissant / क्वॅसाँ/ क्रुसाँट

Submitted by Adm on 23 December, 2019 - 01:38
croissant
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

नुकत्याच झालेल्या पॅरीस ट्रीपच्या आधी वेगवेगळ्या फोरम्समध्ये "Top 10 things to do in Paris" शोधत असताना एकाने लिहिलं होतं की वेळ असेल तर एखादा बेकींगचा क्लास करा. टुरीस्टांसाठी कमी वेळाचे क्लास असतात. गेल्या वर्षभरात बेकींगचं भूत चढलेलं असल्याने ही आयडीया एकदम आवडली आणि मग इंटरनेटवर शोधाशोधी केली. एका बेकींग स्कूलमध्ये "Croissant / क्वॅसाँ/ क्रुसाँट" तयार करण्याचा क्लास माझ्या वेळेत उपलब्ध होता. मग लगेच रजिस्टर करून टाकलं. Croissant / क्वॅसाँ/ क्रुसाँट हा फ्रेंच ब्रेकफास्टचा अविभाज्य घटक. अमेरीकेतही बेकर्‍यांमध्ये तसच स्टारबक्स सारख्या ठिकाणी क्रुसाँट मिळतो. ह्याचा उच्चाराची जरा मजाच आहे. मी आधी क्रॉसाँ हा फ्रेंच उच्चाराच्या जवळ जाणारा उच्चार ऐकला होता. पण अटलांटात तसं म्हंटलं की लोकं "ओह, यू मिन क्रॉईसंट ?" अस अगदी तर्खडकरी उच्चारात विचारायचे. नंतर मग वेस्ट कोस्टला क्रुसाँट बरेच ठिकाणी ऐकलं. फ्रान्समध्ये ह्यात कोणाला "र" उच्चारताना ऐकलं नाही. (तसही ते शब्दातली अर्धी अक्षरं उच्चारत नाहीत!) तर त्या क्लासमध्ये शिकलेली आणि नंतर जरा ट्रायल अँड एरर करून जमलेली ही रेसिपी.

पीठासाठी (Dough)
१. २ कप केक फ्लोअर. (पॅरीसमध्ये T45 अश्या काहितरी श्रेणीचं पीठ मिळतं ते सगळ्यात चांगलं. इथे मी "केकसाठी चालेल" असं लिहिलेलं पीठ आणलं.
२. १ टीस्पून मीठ
३. ५ ग्रॅम इंस्टट यीस्ट
४. अर्धा कप पाणी
५. १ टेबलस्पून वितळवलेलं बटर.
६. ३ टेबलस्पून साखर

बटरब्लॉकः
१२५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर

- १ अंड
- शुगर सिरप साठी अंदाजे साखर आणि पाणी.

क्रमवार पाककृती: 

Dough:
१. इंस्टंट यीस्ट अर्धाकप कोमट पाण्यात घालावं. त्यात चमचाभर साखर घालून ढवळावं आणि बाजूला ठेऊन द्यावं. सुरुवातीला थोडासा फेस येतो.
२. Dough बनवण्यासाठी लागणारे सर्व कोरडे घटक (पाणी आणि बटर सोडता) एकत्र करून घ्यावे. मधे खोलगट खड्डा करून त्यात बटर आणि पाणी ह्याचं मिश्रण ओतावं. थोडं थोडं एकत्र करून मग त्यात यीस्ट घालावं. यीस्टचा फेस आतापर्यंत दुप्पट झाला असेल.

C_Start.jpg

३. सगळं मिश्रण चांगलं मळून घ्यावं. सुरूवातीला ते पिठूळ असतं पण जवळ जवळ १५ मिनीटे चांगलं मळल्यावर मिश्रण ताणलं जायला लागतं ( elastic mix) आणि छान मऊ होतं. ह्या पिठाचा गोळा करून तो प्लॅस्टीक रॅपमध्ये गुंडाळून किंवा घट्ट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेऊन द्यावं. तयार पीठ अजिबात बाहेर ठेऊ नये नाहीतर ते लगेच फुगायला लागतं. आत्ता ते फुगवायचं नाहीये. ही मिश्रण सुमारे सहातास फ्रीजमध्ये ठेवावं.

C_Dogh.jpg

बटरब्लॉकः
१. बटरपेपरची साधारण ८ इंच बाय ६ इंचाची घडी करून त्यात बटरची स्लॅब ठेवावी लाटण्याची ठोकून आणि लाटून बटरची आयताकृती स्लॅब बनवावी. बटर अजूनही बटरपेपरच्या आतच आहे. कडांपर्यंत बटर जायला हवं. ही स्टेप बटर फ्रीजमधून काढून लगेच करावी आणि ठोकून / लाटून झाल्यावर बेटरपेपरसकट पुन्हा फ्रीजमध्ये टाकावं.

मुख्य कृती:
१. पिठाचा गोळा फ्रीजमधून बाहेर काढून आयताकृती लाटावा. आतापर्यंत पीठ थोडसं फुगलं असू शकतं पण अगदी दुप्पट वगैरे होत नाही. पीठ एकदम सरसर लाटलं जातं आणि खूप ताणलं जातं. चांगलं फूट-दीड फुटापर्यंतही लाटता येऊ शकतं.
२. बटरब्लॉक फ्रीजमधून बाहेर काढून बटर पेपरची घडी उघडावी. (बटर काढू नये). आता बटरची बाजू लाटलेल्या पीठाच्या खालच्या कडेला जूळवून बटरपेपर उपडा टाकावा आणि वरून अलगद काढून घ्यावा. म्हणजे बटर हाताला न लागता बटरब्लॉक पीठावर लावला जाईल.

C_Doug_Butter.jpg

३. आता आयताकृती पीठाच्या बटरसकट, लांबीच्या बाजूने अर्ध्या घड्या घालाव्या आणि मध्यातून दुमडून घ्यावं. म्हणजे आता बटर आणि पीठ मिळून ५ थर तयार झाले.

C_Fold.jpg

४. आता पुन्हा हे आयताकृती लाटून घ्यावं. लाटताना जरा हलक्या हाताने लाटावं म्हणजे बटर पिठातून बाहेर येणार नाही. आकार आधीच्याच पिठाएव्हढा करून पुन्हा मघासारख्या घड्या घालाव्या. आता एकूण १० थर झालेत.

५. हे पीठ पुन्हा प्लॅस्टीक रॅपमध्ये गुंडाळून साधारण अर्धातास फ्रिजमध्ये ठेवावं. (इतकं लाटल्याने बटर मऊ होऊन पिठातून बाहेर येऊ शकतं त्यामुळे ही स्टेप महत्त्वाची आहे. नाहीतर मग ह्याच स्टेपला क्रुसाँटला आकार द्यायला सुरुवात करावी.)

६. पीठ फ्रिजमधून बाहेर काढून पुन्हा आयाताकृती लाटावं आणि वरच्या प्रमाणे घड्याकरून परत लाटावंं. आता एकूण २० थर झाले असतील. ***

७. चाकूने ह्या लाटकेल्या पीठाचे उंच निमुळते त्रिकोन करून घ्यावे. ह्या त्रिकोणाच्या बेसला छोटी खाच पाडावी (हा झाला आयफेल टॉवरचा आकार Proud ). आता ह्या आयफेल टॉवरच्या बेसच्या बाजू धरून वर गुंडाळी करत जावं. हे साधारण गोगलगाईच्या शंखासारखं दिसतं.

C_How to shape.jpg
*
C_Initial shape.jpg

ट्रे
C_Shaped.jpg

८. सगळे क्रुसाँट बेकींग ट्रेमध्ये ठेऊन त्यावर थोडं पाणी शिंपडावं आणि अवन सुरू न करता फक्त दिवा लावून अर्धा तास ठेऊन द्यावे. अवनमधल्या उबदार तापमानामुळे आणि यीस्ट मुळे क्रुसाँट फुगतात आणि आकाराने जवळ जवळ दुप्पट होतात! क्रुसाँटवर पाणी शिंपडायचं नसल्यास एका भांड्यात उकळत पाणी घेऊन ते ही अवनमध्ये ठेवावं. पाण्याच्या वाफेमुळे दमटपणा राहून क्रुसाँट कोरडे पडत नाहीत.

फुगलेले:
C_Expanded.jpg

ह्या फोटोत थर दिसतायत.
C_Layers.jpg

९. अवन २०० डीसेला प्रिहीट करायला लावावं आणि तोपर्यंत एक अंड फेटून ब्रशने फुगलेल्या क्रुसाँटना लावावं.
१०. क्रुसाँट १५ ते २० मिनीटे सोनेरी रंगावर बेक करून घ्यावे.
११. एकीकडे शुगर सिरप तयार करून ठेवावं. मी मायक्रोवेवमध्ये केलं. अंदाजानेच केलं.
१२. तयार क्रुसाँट अवन बाहेर काढून लगेच त्यावर शुगर सिरप लावावं. ह्याच उद्देश केवळ चमक येण्यासाठी. आपल्याला पाकातले क्रुसाँट करायचे नाहीयेत. ह्या शुगर सिरपची गोड चव लागता कामा नये. "शुगर सिरप लगाया भी और पता भी नही चला" इतपतच गोड आणि तितकच लावायचं.

C_Ready.jpg
*
C_Ready 2.jpg

१३. ताजे ताजे क्रुसाँट कॉफीबरोबर ब्रेकफास्टला खायला घ्यावे. एक दिवस टिकतात. फक्त गार झाल्यावर त्यातलं बटर घट्ट होतं. त्यामुळे गार झालेले खायला घेताना अवन किंवा मायक्रोव्हेवमध्ये गरम करावे. ताजे खाताना त्याचा वरचा थर कुरकुरीत लागतो पण शिळे मऊ लागतात. चवीत फार फरक वाटला नाही.

** - इथपर्यंत तयार केलेलं पीठ दोन दिवस फ्रिजमध्ये राहू शकतं किंवा त्यापेक्षा अधिक डीपफ्रिजरमध्ये राहू शकतं.

वाढणी/प्रमाण: 
वरच्या प्रमाणात साधारण १२-१३ होतात.
अधिक टिपा: 

१. जरा खटाटोप आहे. पण गरम गरम क्रुसाँट अत्यंत भारी लागतात! बटरी चव आणि वरून कुरकुरीत आणि आतून हलकं, मऊ, विरघळणारं टेक्श्चर एकदम अहाहा! लागतं.
२. ह्यात बरेच वेरीएशन्स करता येतात पण बटर क्रुसाँट हेच खरे 'क्रुसाँट'. तसच हा गोगलगाईचा आकार फक्त बटर क्रुसाँटलाच देतात. बाकी सगळे चौकोनी आपल्या पॅटीस सारखे करतात. ह्यात व्हॅनिला क्रिम, चोकोलेट चिप्स, बदाम / पिस्ते / आक्रोड ह्यांची पेस्ट, पेस्तो सॉस, बारीक चिरलेले कांदे, काय वाट्टेल ते भरुन वेगवेगळ्या चवी आणता येतात. आम्ही क्लासमध्ये बरेच प्रकार केले होते. पण मी घरी अजून केले नाहीत.
३. बटर वापरण्यात काटकसर करू नये. हवतर थोडा जास्त व्यायाम किंवा जरा जास्त आयएफ करावं.
४. अमेरीकन ब्रँडचं बटर वापरू नये, कारण त्यात फॅट कमी असतं म्हणे. शक्यतो युरोपीयन ब्रँडचं बटर चांगलं.
५. लाटताना बटर वितळून बटर बाहेर यायला लागू शकतं. तसं झालं तर घड्या घालून पटकन फ्रीजमध्ये टाकावं. नाहीतर पीठ आणि बटरचे थर नाहीसे होऊन सगळा लगदा होतो.
६. वेळेत फ्रिजींग / प्रुविंगचा वेळ धरलेला नाही.

माहितीचा स्रोत: 
बेकींग क्लास आणि माझ्या ट्रायल अँड एरर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे इतक्याजणांनी क्रुसाँटच कौतुक केलेलं बघून ब्रिटानियाचे चॉकलेट, व्हॅनिला क्रिम असे दोन क्रुसाँट खाऊन बघितले. नाही आवडले>>>>>

चुकीच्या कंपनीचे खाल्लेत. वेगळ्या प्रकारे रोल केलेला पाव यापेक्षा वेगळा अनुभव तुमच्या वाट्याला आला नसणार.

क्रोसां एक्स्पर्ट शेफने, एक्स्पर्ट टेक्निकने बनवलेलेच खावेत हा माझा निष्कर्ष आहे. बाकी सगळे फक्त पाव.

स्वस्ति,

गोळा “ डिप फ्रीझर“ मध्ये ५-७ मिनिटे ठेवायचा, रेफ्रिजरेटरच्या भागात नाही. तुम्ही तिथे ( फ्रीझर मध्ये) ठेवून असे हाल असतील तर फ्रीझ काम नसेल करत वा गर्दीने भरला असावा कदाचित.

अर्र ॲमी तुम्ही नेहमीचे साधे क्रुसाॅं खाऊन पाहिलेत का? आता सुट्ट्यांमध्ये काॅस्टकोचे आणले होते. सहज वाटलं ही लोकं एकदम जंबोवाले बनवतात.
154BFC1E-9EE2-4293-8FBD-CAB87D908B3C.jpeg

गोळा “ डिप फ्रीझर“ मध्ये ५-७ मिनिटे ठेवायचा, रेफ्रिजरेटरच्या भागात नाही. .>>> अच्च्च्चछा . ते धागा लेखक नुसते फ्रीजमध्ये फ्री जमध्ये म्हणतायेत , आम्हाला कसं काय कळायचं ????
आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याच प्रमाण गंडलं माझं.
>>>>४. अर्धा कप पाणी
>>>>इंस्टंट यीस्ट अर्धाकप कोमट पाण्यात घालावं.
>>>> मधे खोलगट खड्डा करून त्यात बटर आणि पाणी ह्याचं मिश्रण ओतावं.
आमच्या सारखे last benchers गोंधळतात मग

हे गोळे प्रत्यक्षात टेबल टेनिसच्या आकाराचे आहेत. फोटोत मोठे दिसतायेत. एकात पापुद्रे दिसतायेत

अ‍ॅमी, पॅरिसमध्ये 'Rue de croissant' नावाची गल्ली आहे. तिथेही टपालपेटीसमोरच्या दुकानात गुरुवारी सकाळी आठच्या आधी आन्त्वॉन नावाच्या शेफने बनवलेले क्र्वॉसाँ तेच खरे. (आठनंतर जनरली 'क्र्वॉसाँ संपले' ची पाटी लागते) बाकी जगातले सगळे बकवास.

सॉरी स्वस्ति हे असं झालं. Sad

ते धागा लेखक नुसते फ्रीजमध्ये फ्री जमध्ये म्हणतायेत , आम्हाला कसं काय कळायचं ???? >>>>> मी नुसत्या फ्रिजमध्येच ठेवले होते. डीप फ्रिजरमध्ये नाही ठेवले.

>>>>४. अर्धा कप पाणी
>>>>इंस्टंट यीस्ट अर्धाकप कोमट पाण्यात घालावं.
>>>> मधे खोलगट खड्डा करून त्यात बटर आणि पाणी ह्याचं मिश्रण ओतावं. >>>>> ह्यात नक्की काय गोंधळ झाला हे सांगितलत तर मी त्या प्रमाणे वर बदल करेन.

फोटोत ठिक दिसतायत खरतर. क्रिमरोल सारखे दिसतायत जास्त.

अहो पराग , sorry नका ओ म्हणू Sad
उलट तुम्ही इतके तपशीलवार लिहिले की करून बघण्याचा मोह आवरला नाही.
मी मस्करी करतेय.
पाण्याच म्हणाल तर , साहित्यात अर्धा कप पाणी सांगितल , मग अर्धा कप पाण्यात यीस्ट टाकल्यावर परत बटरसाठी किती पाणी घ्यायचं ??
कितीही समजावून सांगितल तरी आमचा हात प्रश्न विचारायला वरतीच !!!

मग अर्धा कप पाण्यात यीस्ट टाकल्यावर परत बटरसाठी किती पाणी घ्यायचं ?? >>>> ओह ! एकूण २ अर्धे कप हवे आहेत. म्हणजे पहिल अर्धा कप यीस्ट भिजवण्यासाठी आणि दुसरा अर्धा पीठ मळण्यासाठी. वर बदल करतो. Happy

सध्या कंपल्सरी घरात बसावं लागतय त्यामुळे आज अजून एक बॅच केली. आज मी माझ्या बाकी नोट्स वगैरे न बघता इथे लिहिलेली पाकृ वाचून करून बघितली. तेव्हा लक्षात आलं की लिहिताना पाण्याचं प्रमाण नीट लिहिलेलं नाहीये. यीस्ट मधलं पाणी आणि शिवाय पाणी+बटर असं दोनदा पाणी घेतलं तर ते १ कप पाणी होईल आणि ते जास्त होईल. आज मी दोन्ही मिळून अर्धा कपापेक्षा थोडसच जास्त घातलं आणि त्यामुळे पीठ जास्त चांगलं भिजलं गेलं. वर बदल करतो.
(हल्ली धागे एडीट करता येत नाहीत का? Uhoh मला संपादनाची लिंक दिसतच नाहीये!)

हा आजचा फोटो:
20200322_211317.jpg

मधून कट करून आतले पदर दाखवणारा फोटो हवा होता. >>>>>
हा असा म्हणत होतात का?

20200322_214210.jpg

कसले खतरा झालेत.
मी हा पदार्थ एकदाच खाल्ला आहे.पण वर फोटोत जे दिसतंय ते एकदम बेकरीच्या डिस्प्ले केस किंवा 5 स्टार हॉटेल च्या ब्रेकफास्ट बुफे मधल्या सारखं दिसतंय.चवीलाही छान असेल.
घरगुती साईड बिझनेस चालू करायचा विचार करायला हरकत नाही.

ही पोस्ट अनु गंमतीत घेतील अशी अपेक्षा ठेवून आणि राग आल्यास आधीच माफी मागून .....

अनु यांनी WFH नीट केले नाही आणी मंदी आली तर नवीन नोकरी शोधावी लागेल, अशा अर्थाची पोस्ट दुसर्या धाग्यावर टाकली होती. अशी वेळ कोणावरही येऊ नये. पण सकारात्मक दृष्टीकोनातून वरील साईड बिझनेसचा विचार केल्याबद्दल शुभेच्छा दिल्यात.

लोकमान्य टिळक मोड ऑन:
मी क्रॉसों खाल्ले नाहीत
मी क्रोसॉ बनवले नाहीत
मी क्रोसॉ चा धंदा टाकणार नाही

आयडिया पराग ने साईड होम बिझनेस चालू करण्याची होती. ☺️☺️☺️

तेव्हा लक्षात आलं की लिहिताना पाण्याचं प्रमाण नीट लिहिलेलं नाहीये. यीस्ट मधलं पाणी आणि शिवाय पाणी+बटर असं दोनदा पाणी घेतलं तर ते १ कप पाणी होईल आणि ते जास्त होईल. >>>> अच्छा , म्हणजे माझे क्रॉसों बनवताना जो पीठाचा राडा झाला त्याला तुम्ही जबाबदार आहात तर Happy

Pages