Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा
मायाबोली.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.
दुसरे असे की जर अशा सोशल फोरवरील काही मुद्दे असोत किंवा धागे असोत ते शासनातले अधिकारी व्यक्ती, मंत्री की ज्यांच्या हातात नियम बनवणे आणि राबवणे शक्य आहे त्यापर्यंत जर गेले आणि त्यांनी गंभीरपणे यातील तथ्थे जाणून घेवून जर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला तर अशा पाळल्या गेलेल्या नियमांमुळे नागरीकांचे जगणे अधीक सुखावह होवू शकते.
वरील प्रस्तावना अजून समजली नसेल तर खालील लेख वाचून समजू शकते. थोडक्यात लेख आधी आणि वरील प्रस्तावना नंतर असे असते तर ते अधिक योग्य असते हे लक्षात यायला लेख वाचावा लागेल. लेखाची प्रकृती थोडी गंभीर आहे.
काल मी शहरातल्या उपनगराच्या रस्त्याने रात्री पायी जात होतो. तेव्हा समोरून वाहने येत होती. त्यात चारचाकी आणि दुचाकी होत्या. सदर वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश हा सरळ डोळ्यांवर येत होता. एका वाहनाचा प्रकाश इतका तिव्र होता की माझेच नव्हे तर माझ्या मागे येणार्या पादचार्याचेही डोळे दिपले. त्याने आणि मी तेथेच थांबून घेतले. त्याच्या आणि माझ्यात डोळ्यांवर आलेल्या हेडलाईट संदर्भात संवाद झाला.
असाच मुद्दा आमच्या वाहनविषयक व्हाटसअॅप वर चर्चेला आला होता. त्या क्षणीक बीजचर्चेला या धाग्याच्या निमित्ताने सार्वजनीक रुप देण्याचा प्रयत्न आहे. ( सर्वसामान्यपणे तांत्रीक इंग्रजी प्रतिशब्द बोलतांना जास्त वापरले जात असल्याने लेखातही तेच वापरले आहेत.)
वाहनांचे हेडलाईट्स - हाय बीम - लो बीम - अप्पर लाईट - लोअर डिप्पर लाईट
वाहनांमध्ये जे हेडलाईट्स असतात त्यात दोन सेटींग असतात. बटन दाबून हेडलाईट्स हाय बीम - लो बीम - अप्पर बीम - लोअर बीम (डिप्पर) अशा प्रकारे ते चमकवता येवू शकतात. रात्रीच्या वेळी असे हेडलाईट शहरात - जेथे रस्त्यावरील (स्ट्रीट) लाईट्स असतात तेथे - वाहन कायम लो बीमवर चालवणे गरजेचे आहे. नव्हे तसा नियमच आहे. आणि असा नियम आहे हेच बहूदा बर्याच वाहनचालकांना माहीत नाही. केवळ कार किंवा मोठ्या गाड्याच नव्हे तर लहान अगदी दोन चाकी वाहनांचेही हेड लाईटस आताश: प्रखर असतात. अशा अपर बीममुळे समोरच्या वाहनधारकांचे डोळे दिपतात.
जेथे स्ट्रीट लाईट्स नसतात तेथे, ग्रामीण रस्त्यांवर अपर बीमवर वाहन चालवायला हरकत नाही. परंतू तेथेही समोरून वाहन येत असल्याचे दिसल्यास दोनही वाहनांनी डिपर किंवा लो बीमवर वाहन चालवावे. हाच नियम आपले वाहन इतर वाहनापासून साधारण २०० ते ३०० मिटर मागे असते तेव्हापासून आपले वाहन लो बीमवर चालवणे गरजेचे आहे असा समजायला हरकत नाही. असे केल्याने आपल्या वाहनाचे हेडलाईटस पुढच्या वाहनाच्या आतील मागे बघण्याच्या (IRVM) काचेमध्ये चमकत नाही.
वाहन कायम लो बीमवरच चालवणे हे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी गरजेचे आहे. आणि हा नियम असल्याने तो पाळायलाच हवा.
हाय बीम वाहन चालवणे आणि जंगली प्राणी सुरक्षा
हा एक नवा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. यात किती तथ्य असावे ते सांखिकीयदृष्ट्या आणि इतर संशोधनाने सिद्ध व्हावे लागेल याची मला कल्पना आहे.
तर आजकाल अज्ञात वाहनाच्या धडकेने जंगलातले प्राणी (हरीण, बिबटे किंवा इतर प्राणी) गतप्राण होण्याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतो आहे. लक्षात घ्या की या पृथ्वीवर आपला जसा हक्क आहे तसाच प्राणी, वनस्पती यांचाही हक्क आहे. रात्री वाहनचालक आपले वाहन अपर बीमवर चालवत असल्याने या जंगली प्राण्यांचे डोळे दिपतात. ते गोंधळून जातात आणि ते तेथेच उभे राहत असतील किंवा ते बचावासाठी इतरत्र पळत असतील किंवा वाहनांवर हल्ला करण्याच्या हेतूने ते वाहनाकडे झेपावत असतील. कारण काही का असेना पण मानवाप्रमाणेच या प्राण्यांचे डोळे वाहनांच्या तिव्र प्रकाशाने दिपतात आणि ते वाहनाखाली येवून गतप्राण होतात.
पुन्हा सांगतो या मुद्यावर प्राण्यांची मानसीकता, त्यांचे प्रकाशाप्रती होणारे वर्तन या सर्वांगाने संशोधन होणे गरजेचे आहे.
वाहनातील हाय बीम - लो बीम हेडलाईट योग्य कसे वापरावे?
आपण येथ पर्यंत वाचत आलात तेव्हा आपल्याला हेडलँपमधील हाय बीम आणि लो बीम किती महत्वाचे आहे याचे महत्व पटले असेल. हाय बीम - लो बीम योग्य कसे वापरावे हे खालील प्रकारे समजावून घेता येते.
- जेथे स्ट्रीट लाईटस आहेत (शहरात) तेथे वाहन कायम लो बीमवरच चालवावे. यात चारचाकी तर येतातच पण दुचाकी वाहनेही येतात.
- ग्रामीण भागात वाहतूक नसेल तेव्हा हाय बीम ठिक आहे. पण तेथेही आजकाल वाहने जास्त धावत असल्याने लो बीमच योग्य आहे. वाहनाचा वेग विनाकारण न वाढवता वाहन चालवायचे असल्यास (डिफेन्सीव ड्रायव्हींग) हेडलँप लो बीमवर योग्य आहे.
- काही वाहनात डॅशबोर्डजवळ हेडलाईटचे सेटींग करायचे बटन असते. त्याची पोजीशन कायम शुन्य ठेवावी. ड्रायव्हरच्या उंचीनुसार एखादी पातळी वर किंवा खाली त्या त्या वेळी बदलली तर हरकत नाही. पण खरोखर तशी आवश्यकता नसते.
- समोरील वाहन किमान ५०० मिटर दुर असेल तर आपल्या वाहनाचे बीम लो करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे.
- आपल्या पुढे एखादे वाहन असल्यास म्हणजेच आपण किमान ३०० मिटर मागे असल्यास आपल्या वाहनाचे दिवे हे लो बीम करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे.
- पासींग लाईटचा उपयोगदेखील आपण हाय बीमसाठी तात्पुरता करू शकतात.
- पासींग लाईट ओव्हरटेक करतांना योग्य भान ठेवून चमकवावा. दुसर्या वाहनाने आधी चमकवला असता आपण त्याला अनुमोदन (अॅक्नॉलेज) द्यावे आणि पहिल्यांदा त्याने पासींग मागीतले म्हणून आपण त्याला योग्य वाट करून द्यावी - ओव्हरटेक करू नये. हे देखील सभ्यपणाचे लक्षण आहे आणि चांगले वाहन चालवण्याच्या एथिक्समध्ये येते.
हॅलोजन लॅम्प आणि पांढरा प्रकाश असणारे दिवे
आजकाल वाहनांत हॅलोजन लॅम्प आणि पांढरा प्रकाश असणारे दिवे येतात. काही मॅन्यूफॅक्चररच ते नव्या वाहनात आधीच बसवून वाहन विकतात. ( यात कायद्याचे उल्लंघन होते का हे पाहणे आरटीओचे काम आहे. ते जबाबदारीने वागतात का हा वादाचा मुद्दा आहे.)
आपल्या वाहनांत जर असे दिवे आधीच बसवून आलेले असतील तर आपण ते दिवे काढून केवळ इतरांसाठी साधे पिवळे दिवे बसवू एवढे समाजाप्रती संवेदनशील आपण निश्चित नाही. ( हे वाक्य फार दु:खाने लिहावे लागते आहे.) पण आपले वाहन जुने असेल तर आपल्या वाहनात असे हॅलोजन किंवा पांढरा प्रकाश देणारे दिवे शक्यतो बसवू नये. जास्तीचे दिवे, फॉग लँप, मोटरसायकलींच्या हॅन्डलजवळ तिव्र प्रकाशाचे एलईडी लावणे असे प्रकार शक्यतो टाळावेत. (यात जास्त आवाजाचा सायलेंसर, रिवर्स हॉर्न आणि जास्त किंवा निराळा आवाज असलेले हॉर्न बसवणे देखील येते.) अशा प्रकारच्या दिव्यांची खरोखरच आवश्यकता आहे का हा प्रश्न मनाला विचारावा. इतरांनी केले म्हणून मी पण केले पाहीजे हि वृत्ती नसावी. अर्थात वाहन घेणे ही एक लग्झरी समजली जाते. ठिक आहे तसे समजा. वाहनाचा आतील भाग कितीही सजवा पण वाहनाच्या बाह्य भागात काही बदल करणे, इतरांना हानी पोहोचेल असे बदल करणे कायद्याने कितपत योग्य आहे त्याचा विचार करावा. नियम आणि कायदे हे आपल्या भल्यासाठी असतात. भले आपल्याला आपल्या जीवाची काळजी नसेल पण खाजगी वाहन रस्त्यावर आले तर ते सार्वजनीक होते. तेथे सामाजीक वर्तनच केले पाहीजे. समाजाप्रती आपली जी जाणीव आहे ती प्रगल्भ ठेवली पाहीजे.
पोलीस, आरटीओ - सरकारी खात्यांची कर्तव्ये
पोलीस, वाहतूक पोलीस शाखा, आरटीओ यांनी वेळोवेळी निरनिराळ्या माध्यमातून या नियमांबद्दल जागरूकता आणणारे कार्यक्रम केले पाहीजे. भारतीय लोकांत - समाजात ब्रेनवॉश केल्याशिवाय एखादी गोष्ट त्यांच्या डोक्यात शिरतच नाही. एखादा नियम, कायदा त्यांच्या डोक्यात भिनवावा लागतो तरच तो अंगवळणी पडतो. आरटीओ, पोलीसांनी झेब्रा क्रॉसींगबाबत बर्यापैकी जाणीव केली आहे. त्यामुळे वाहने जरी झेब्रा कॉसींगवर (अजूनही!) थांबत असतील पण कमीतकमी (!) झेब्राक्रॉसींगच्या पुढे तर थांबत नाहीत हा असल्या शिकवणूकीचा (की पोलीसांनी दंड घेतल्याचा) फायदाच समजायचा! (समजले नसेल तर वाक्य पुन्हा वाचा.)
असलीच जागरूकता, वारंवार सांगणे, ब्रेन वॉश करणे हे अपर बीम, लोअर बीम ( हाय बीम- लो बीम, अप्पर- डिप्पर), रिव्हर्स हॉर्न, मोठ्या आवाजाचे सायलेंसर, पांढरे, हॅलोजन, तिव्र प्रकाश देणारे हेडलँप, टेल लँपला सजवणे, वाहनात बाह्य बदल करणे या बाबतीत पोलीस, वाहतूक पोलीस शाखा, आरटीओ तत्सम शासकीय खाते आदींनी जनतेत केले पाहीजे. वेळोवेळी जनतेला सजग केले पाहीजे. अपर बीम आणि तत्सम नियम, कायदे वारंवार सांगितले पाहीजे.
मला एक आश्चर्य वाटते, आवाज मोठे असणारे सायलेंसर गाडीला लावतात तर मग त्याला सायलेंसर का म्हणतात. विनोद सोडा, पण आपण समाजाप्रती किती सिरीअस आहोत हेच ही बाह्य लक्षणे दाखवतात. असो.
या असल्या अपर लोअर, हाय लो बीम वर एक युट्यूबवर बंगलोरच्या आदीत्य कुमार - विषयम मेडीआ याने "EDUCATED SUTIYA... ARE YOU ONE OF THEM?" हे टायटल असणारा विडीओ अपलोड केला आहे. वाहनांविषयी, अपर बीम विषयी असलेल्या भारतीय मानसीकतेला "एज्यूकेटेड सुतीया....त्यातले आपण तर नाही ना?" हे शिर्षक अगदी परफेक्ट फिट होते आहे. या विडीओला फक्त ६०४ व्हूज, ५ लाईक्स, १ डिसलाईक आणि एक कमेंट मिळालेले आहेत. (तो एक डिसलाईक देणारा एज्यूकेटेड सुतीया असावा.) याच्या विरूद्ध "जेसीबीकी खुदाईला" या विडीओला किती लाईक्स आणि किती व्ह्यूज मिळाले असतील याची गणती आपल्यापैकीच बर्याच जणांच्या तोंडावर असेल. खरोखर आपण एज्यूकेटेड सुतीया आहोत का याच ज्याने त्याने विचार करायचा आहे. काल रात्री रस्त्याने जातांना माझे आणि माझ्या बरोबर चालणार्या पथीकाचे डोळे समोरच्या वाहनाच्या प्रकाशाने दिपले तेव्हा मी असलेच उद्गार काढले होते. माणसे शिकून शिक्षित झालीत पण सुशिक्षीत झाली नाहीत.
एका वाहन बनवणार्या कंपनीने डिप्पर या नावाने गर्भनिरोधक बाजारात आणले होते. कारण बर्याच ट्रक्सवर "Use Dipper at Night" हे स्लोगन लिहीलेले असते. यामुळे वाहनधारकांमध्ये कितपत आणि नक्की कोणत्या "विषयाची" जागरूकता झाली असेल याची आपल्याला कल्पना आली असेलच. हे असले धेडगूजरी आणि आपलाच फायदा होणारे जाहिरातीचे प्रयोग त्या त्या कंपन्यांनी थांबावावेत आणि या बाबतीवर खर्च होणारा पैसा योग्य ठिकाणी सत्कारणी लावावा. रस्ते अपघात खूप होत आहेत. या बाबतीत सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. सरकारला वाहनधारक, वाहनचालक, वाहन मॅन्यूफॅक्चरर आदींकडून खूप पैसा मिळतो आहे. त्यातील काही भाग हा सोशल अवेअरनेस या कारणाखाली खर्च करून या अशा न पाळल्या जाणार्या वाहतूक नियमांबाबत जागरूकता आणली पाहीजे.
वाहतूक पोलीस रात्री ड्युटी संपवतात. वाहतूक पोलीस आपले मित्र आहेत. त्यांच्या कामाचे तास खूप आहेत याची मला जाणीव आहे. त्यांच्या संख्येत अधीक वाढ करून त्यातील अधीकचे पोलीस रात्री काही प्रमाणात शहरात नाकेबंदीसाठी नेमून करून असे नियम न पाळणारे वाहनधारक - जे अप्पर लाईट लावून, सायलेंसर बदलून किंवा प्रखर हेड लँप लावून, रिव्हर्स हॉर्न लावून वाहन चालवतात - त्यांना समज दिली पाहीजे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवला पाहीजे. पण यात दंड वसूल करायला अजून एक निमित्त भेटले असे व्हायला नको. राज्यात स्पिडगन असलेल्या नव्या गाड्या पोलीस खात्यात दाखल झाल्या आहेत. त्या देखील असे अपर बीम असलेली वाहने पकडू शकतात.
हा लेख शासनापर्यंत हस्ते परहस्ते जावा. शासन जे काही करते आहे त्यात सुयोग्य बदल व्हावा अशी या लेख लिहीण्यामागे प्रेरणा आहे. सोशल मिडीया फार अॅक्टीव्ह असल्याने मायबोली सारख्या माध्यमातून तो लोकांपर्यंत जावा अशी इच्छा आहे. या लेखाच्या भरपूर कॉपी होवोत. हा लेख कॉपीराईट वगैरे मुक्त आहे. कुणाचे नाव नाही लिहीले तरी चालेल. छोटी वाक्ये, परिच्छेद कॉपी झालेत तरी हरकत नाही. पण समाजाच्या तळापर्यंत वाहतूकीच्या नियमात असे काही आहे याची जाणीव होणे महत्वाचे आहे. कारण वाहतूकीचा किंवा वाहन चालवण्याचा परवाना कसा मिळतो हे आपण जाणतोच. त्यात वाहतूकीच्या नियमांबाबत शिक्षण किती होते या बाबतीत संशोधन करावे लागेल.
लेखात काही तृटी असतील तर त्या जरूर सांगा. आणि हा लेख संपल्यानंतर पहिले दोन परिच्छेद पुन्हा वाचा.
ट्रकवर जसे मागे लिहीतात तसे या लेखाच्या शेवटी लिहीतो की: Use Dipper at Night - रात के समय डिप्पर इस्तेमाल किजीए - आणि हो, या वाक्याचा कृपया योग्य तो अर्थ घ्या. हॅपी अॅन्ड सेफ ड्रायव्हींग!
जसे गाडी चालवतांना फोन वापरू
जसे गाडी चालवतांना फोन वापरू नका, घाई करू नका, झोप येत असल्यास थांबून घ्या वगैरे रेडियम वापरून बनवलेले सूचनाफलक रस्त्याच्या बाजूला लावलेले असतात तसेच सरकारने 'गरज असेल तेव्हाच हाय-बीम वापरा आणि ईतरांच्या अपघातास कारणीभूत होणे टाळा' असे रिमायंडर सूचनाफलक लावायला हवे.
हायबीम वापरण्यासाठी दोन सेटींग्ज असतात... एक परमनंट (हेडलाईटच्या लीवरच्या वरचा टोपी-नॉब फिरवून) आणि एक टेंपररी (लीवर बोटाने आपल्याकडे पुश करून)
ह्या टेंपररी सेटिंग मध्ये बोट काढले की बीम पूर्ववत म्हणजे लो होतो त्यामुळे, परमनंट सेटिंग मध्ये बीम हाय राहून विसरायला झाले असे होत नाही.
ह्याशिवाय हाय-बीम सरळ रेषेत जात असल्याने ह्यात वहानाला आडव्या येणार्या गोष्टी दिसत असल्या तरी रस्त्यावरचे खड्डे दिसत नाहीत. सातत्याने हाय-बीम वापरणार्या ड्रायवर्सच्या गाड्यांच्या शॉक-ऑब्ज, व्हील अलाईनमेंट, बॅलन्सिंग अशा गोष्टींची लवकर वाट लागते.
काही वाहनाच्या सेटिंग मध्ये
काही वाहनाच्या सेटिंग मध्ये सुद्धा गडबड असते माझ्या हिरो maestro ची पण सेटिंग अशीच गडबड होती लो बीम लाईट खूप लांब पर्यंत जायची त्या मुळे जवळच स्पष्ट दिसायच नाही आणि हाय बीम लाईट तर आपल्या साठी नाहीच असा भास व्हायचा.
ते आपण घरी पण ठीक करू शकतो असा सल्ला आणि मार्गदर्शन मित्राने केले मग घरीच हवं तशी adjust केली.
लोकांना लो बिम हाय बिम काय
लोकांना लो बिम हाय बिम काय असतं आणि केव्हा वापरतात हे माहीत नसतं हे आश्चर्यच म्हणावे.
ड्रायव्हिंग लायसन्स हे फक्त वाहन चालवता येण्यासाठी मिळते हा समज आपल्याकडे आहे. बहुतेक ड्रायव्हिंग स्कुलचे ध्येय ही हेच असावे. रहदारीचे नियम म्हणजे उगाच एक syllabus मध्ये घुसडलेला नको तो विषय म्हणून त्याकडे पार दुर्लक्ष केल्या जाते.
ड्रायव्हिंग टेस्ट घेणारे पोलिसही या बाबतीत उदासीन असतात.
पाट्यांकडे बघतं कोण? पुढे शाळा आहे हळु चालवा, स्टॉपलाईनच्या आधी थांबा, नो हॉर्न झोन इत्यादी पाट्यांची खिल्ली उडवणारे अ/सुशिक्षित वाहक रोजच आपण बघतो.
यावर उपाय हा की पोलिसांकरवी नियमांची कडक अंमलबजावणी करवून घेणे. दंड वाढवणे, पुन्हा पुन्हा तीच व्यक्ती नियम तोडत असेल तर कस्टडीत घेऊन मॅजिस्ट्रेट समोर उभे करून त्यांच्याकडून दंड ठोठावणे, चालन परवाना रद्द करणे आणि बिना परवाना चालवताना आढळल्यास मोठा दंड / परवाना रद्द असून चालवत असल्यास मोठी सजा
अशा नियमांची कडक अंमलबजावणी हा यावर उपाय आहे.
दंड वाढवला म्हणजे तो आपल्याला भरणे सक्तीचे करत आहेत असे वाटणे सोडून द्यावे.
ह्याशिवाय हाय-बीम सरळ रेषेत
ह्याशिवाय हाय-बीम सरळ रेषेत जात असल्याने ह्यात वहानाला आडव्या येणार्या गोष्टी दिसत असल्या तरी रस्त्यावरचे खड्डे दिसत नाहीत. सातत्याने हाय-बीम वापरणार्या ड्रायवर्सच्या गाड्यांच्या शॉक-ऑब्ज, व्हील अलाईनमेंट, बॅलन्सिंग अशा गोष्टींची लवकर वाट लागते.
Submitted by हायझेनबर्ग - एक... on 13 December, 2019 - 21:49
असं झालं तर आनंदच आहे. त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळेल पण सध्या बाजारात असलेल्या अनेक वाहनांमध्ये अप्पर बीम चालू केला तर अप्पर व लोअर दोन्ही चालू राहतात आणि त्यांना जवळचे व लांबचे दोन्ही दिसते त्यामुळे ते बिनधास्त अप्पर बीम लावून वाहन चालवतात.
बहुसंख्य लोक जर लो बीम आणि
बहुसंख्य लोक जर लो बीम आणि हाय बीम
चा वापर योग्य पद्धतीने करत नसतील तर कायद्या मध्ये बदल करून गाडीच्या लाईट ह्या स्वयंचलित पद्धतीने चालल्या पाहिजेत असे टेक नी वापरण्याची सक्ती सरकारने करावी..
हाय बीम आणि लो बीम लाईट करणे हे ड्रायव्हर chya हातात न राहता ते ऑटोमॅटिक झाले पाहिजे.आणि ही सिस्टम जर योग्य चालत असेल तर सक्ती करता येईल .
आता हे नवीन टेक ज्या गाड्या चालवण्यासाठी ड्रायव्हर ची गरज नाही त्या गाड्या मध्ये हेड लाईट ऑटोमॅटिक च असतील.
असे पण ज्या कंपन्यांना ड्रायव्हर लेस गाड्या बाजारात आणायच्या आहेत ते सरळ सांगतात जगातील जे अपघात होतात त्याला मानवी चुकाच जबाबदार असतात.
ते काम यंत्राने केले तर अपघात कमी होवून त्याचे प्रमाण 0 वर सुद्धा येईल
कायदे लोकांना सुधरवू शकणार नाहीत
हाय-लो बिमचा प्रॉब्लेम तर
हाय-लो बिमचा प्रॉब्लेम तर आहेच पण काहीजण फॉग लॅम्प बदलून प्रखर दिवे बसवतात. त्यानेही त्रास वाढतो. जीपसारखी वाहने कस्टमाईज करुन घेणारीही एक जमात आहे. ते तर जीपच्या डोक्यावर चार चार प्रखर दिवे बसवून घेतात.
या त्रासाव्यतिरिक्त बाकीही त्रास देणारे आहेतच. पार्किंग लाईट बंद न करणारे. रात्री पार्किंग लाईट न लावणारे. वळताना इंडिकेटर न देणारे किंवा ऐनवेळी देणारे. लेनची शिस्त न पाळणारे. अरुंद पुलावर ऐनवेळी वेग वाढवून पुलावर गाडी घालणारे व समोरच्याचा अंदाज चुकवणारे, विचित्र हॉर्न असणारे आणि तो बाईकर्सच्या अगदी शेजारी कर्कश्शपणे वाजवणारे (या प्रकाराने एक मुलगी भर रहदारीत जोरात पडलेली पाहिली आहे.) टेंपोमध्ये असुरक्षीत पध्दतिने सामान वाहून नेणारे वगैरे वगैरे.
आणि अगदी महत्वाची जमात आहे एक. टल्लीरामांची. तुम्ही कितीही नियमांचे पालन करत गाडी चालवा, रस्त्याने चाला किंवा अगदी फुटपाथवर उभे राहा, हे केंव्हाही तुमच्यावर चाल करुन येवू शकतात.
महामार्गावरील ट्रक ड्रायव्हर्सना मी अपवाद वगळता, नेहमी हाय-लो बिमचा वापर करताना, व इतर नियम पाळताना पाहीले आहे. हे वेग कमी करुन ओव्हरटेकसाठी जागा देतात, इंडीकेटरचा वापर करतात, पार्किंग करतानाचे नियम पाळतात, टायर्स बदलताना योग्य ती काळजी घेतात. रिफ्लेक्टर्स नसतील तर दोन्ही बाजूला दुर अंतरावरच लक्षात येईल अशी एखादी मार्किंग ठेवतात. कार्स वापरणाऱ्यांना बरेचदा हे माहितच नसते की कंपनीने इमर्जन्सिच्या वेळी वापरण्यासाठी रिफ्लेक्टरची जोडी दिलेली असते. ज्यांना माहित आहे त्यांनीही कधी याचा वापर केलेला पाहिला नाही.
हरिहर, प्रतिसादाशी पूर्ण सहमत
हरिहर, प्रतिसादाशी पूर्ण सहमत.
हायबीम वापरण्यासाठी दोन
हायबीम वापरण्यासाठी दोन सेटींग्ज असतात... एक परमनंट (हेडलाईटच्या लीवरच्या वरचा टोपी-नॉब फिरवून) आणि एक टेंपररी (लीवर बोटाने आपल्याकडे पुश करून)
<<
नाही.
लिव्हर ओढून जो येतो, तो नुसता हाय बीम नसतो. ही तिसरी सेटिंग आहे.
बेसिकली गाडीच्या दिव्यात २ फिलॅमेंट्स असतात. त्या फिलॅमेंट्स व दिव्यापाठीच्या रिफ्लेक्टरची पोझिशन यातून हाय व लो बीम तयार होतो.
लो बीमला एक फिलॅमेंट पेटते, दुसरी हाय बीमला पेटते. एका वेळी एक.
लिव्हर ओढून, एकाच वेळी दोन्ही पेटतात. याला 'पासिंग बीम' म्हटलंय वरती. यात जवळ व दूर दोन्ही अंतरे दिसतात. हे एक्झॅ़क्टली दोन वाहने एकमेकांना समोरासमोर पास करतात, तेव्हा कामास येते. कारण समोरच्या दिव्यात डोळे दिपलेले असताना, अधिक तीव्रतेचा प्रकाश उपयोगी ठरतो.
सामान्यतः, (वर पाभेंनी जे प्राण्यांबद्दल म्हटलंय, त्यात) मनुष्यप्राण्याची एक टेन्डन्सी देखिल असते. समोरच्या वाहनाच्या दिव्याकडे पहात, त्याच्या ड्रायव्हरशी आय काँटॅक्ट करायचा प्रयत्न अंधारातही सहाजिकपणे केला जातो. कसलेले/प्रोफेशनल ड्रायव्हर कधीही समोरच्या लाईटकडे पहात नाहीत. ते टाळून ते वाहनाच्या बाजूला, आपल्या लेनमधे जो अंधुक प्रकाश आहे, तिथे लक्ष केंद्रित करतात, मधे मधे पासिंग बीम देतात. जेणेकरून, पादचारी, बैलगाड्या, हातगाड्या इ. बिना-टेल-लाईटच्या गोष्टी ध्यानी येतात.
***
पार्किंग लाईट बंद न करणारे
<<
पार्क केलेल्या वाहनाचा पार्किंग नव्हे तर मेन बीम सुरू ठेवणारे तुम्हाला अभिप्रेत असावेत.
गाडीच्या हेडलाईटमधे पाहिलं तर मोठ्या दिव्याखाली एक छोटा दिवा असतो. हा पार्किंग लाईट आहे. स्ट्रीट लाईट असताना केवळ याच्या प्रकाशात गाडी चालवलेली उत्तम. समोरून येणार्यास तुम्ही दिसलात की पुरे, इतपत लाईट हवा.
मोठ्या गाड्यांना मेन लाईटच्या खाली एक फॉग लाईट असतो. शिवाय हाय बीम्/लो बीम यांचे अंतर अॅडजस्ट करण्याचा एक वेगळा फिरकी स्विच दिलेला असतो. त्यायोगे मोटर वापरून रिफ्लेक्टरची पोझिशन बदलली जाते व प्रकाशाची फेक किती जाइल याचे अंतर सेट करता येते.
फॉग लाईट्स बहुधा पिवळट रंगाचे व नावाप्रमाणे धुक्यात दिसण्यासाठी असतात.
या अनुषंगाने अजून एक मुद्दा.
तो म्हणजे हॅझार्ड लाईट्स.
आपल्या वाहनाची ४ही इंडीकेटर्स सुरू करता येतील असे एक बटन गाडीत असते. याचा अर्थ, "मी अडचणीत आहे. माझ्यापासून दूर रहा" असा असतो. उदा. माझे चाक पंक्चर झालेय, ब्रेक लागत नाहिये किंवा तुम्ही काही कारणाने भर ट्रॅफिकमधे गाडी उभी केली आहे, जसे पंक्चर चाक बदलण्यासाठी इ.
आपल्याकडची महान मंडळी याचा वापर बोगद्यात करतात! बोगद्यात फक्त नॉर्मल लाईट सुरू करायला हवे. हॅझार्ड लाईट्स नाही.
इंडिकेटर्सचा वापर यावर एक लेख येऊ द्या असे सुचवतो.
***
हेडलाईटखाली दिलेली एलईडी दिव्यांची माळ दिवसाही सुरू रहाते, याला रनिंग लाईट म्हणतात. दिवसाही समोरच्या वाहनास तुम्ही दिसावे यासाठी ही सोय आहे. काही डार्क्/ग्रेइश रंगाची वाहने, दिवसा, विशेषतः संधिप्रकाशात समोरून चट्कन दिसत नाहीत. त्यासाठी ही सोय आहे.
***
मध्यंतरी कोर्टाने निर्णय देऊन २चाकींचे हेडलाईट कायम सुरूच राहतील अशी सोय करा असा निर्णय दिला होता अन त्यामुळे भर दिवसाही हाय बीम तोंडावर येणे होत होते.
हा नियम बारगळला किंवा कसे ठाऊक नाही, पण हे दिवे आजकाल दिसत नाहीत. या वाहनांना रनिंग लाईट लावणे हा अधिक योग्य मार्ग होता, असे माझे मत आहे.
***
शेवटी रिक्षा.
नियम बारगळला किंवा कसे ठाऊक
नियम बारगळला किंवा कसे ठाऊक नाही, पण हे दिवे आजकाल दिसत नाहीत.
बरेचजण डिलर कडून बाइक घेऊन झाली की दिवसा हेडलाईट बन्द रहावे म्हणून बाहेरच्या दुकानातून एक स्विच लावून घेतात. (सतत बल्ब जळत राहून त्याचं लाइफ कमी होईल की काय ही एक भीती आणि हेडलाइट सेटिंग मुळे टेल लैंप सुद्धा कायम ऑन राहतो ते दिवसा ब्रेकलाइट लागल्यासारखे वाटत रहायला नको असे कदाचित कारण असावे )
__________रिक्षासाठी धन्यवाद______
लेखात काही तृटी असतील तर त्या
लेखात काही तृटी असतील तर त्या जरूर सांगा.
<<
त्रुटी.
यू आल्वेज *पृव्ह* व्हाय वी आर
यू आल्वेज *पृव्ह* व्हाय वी आर युवर फॅन्स!
:रिस्पेक्ट दिग्दर्शक बाहुली:
<< यू आल्वेज *पृव्ह* व्हाय वी
<< यू आल्वेज *पृव्ह* व्हाय वी आर युवर फॅन्स! >.
------ सहमत...
पार्किंग लाईट बंद न करणारे>>>
पार्किंग लाईट बंद न करणारे>>>>आ.रा.रा. मी हॅझार्ड लाईट फ्लॅशरबद्दलच लिहिले आहे हे. मी पार्किंग लाईट हा शब्द वापरला फक्त. काही जण जरा वेळा साठी गाडी बाजूला थांबवतात व आवर्जून ही लाईट सुरु करतात, काही तुम्ही म्हटल्याप्रमाणे टनेलमध्येही सुरु करतात. (एकाचे पाहून हमखास दुसराही सुरु करतो) आणि नंतर बंद करायला सोयीस्कर विसरुन जातात. मग वळणावर त्यांनी दिलेला इंडिकेटर समजत नाहीत कारण चारही इंडीकेर लाईट ब्लिंक होत असतात. त्यासाठी मी हे म्हणालो होतो.
किती ते अपृप!
किती ते अपृप!
(व्याकरण काढू नका. ते अपऋप आहे हे मला माहीत आहे !!)
>>आपल्याकडची महान मंडळी याचा
>>आपल्याकडची महान मंडळी याचा वापर बोगद्यात करतात! बोगद्यात फक्त नॉर्मल लाईट सुरू करायला हवे. हॅझार्ड लाईट्स नाही.<<
हॅझर्ड लाइटचा वापर "ड्राइव विथ कॉशन" याकरता हि केला जातो. बोगदा लांबलचक, अपुरा प्रकाश किंवा इतर काहि आपल्या कंट्रोलच्या बाहेरची परिस्थिती (पुअर विजिबिलिटि) असेल तर हॅझर्ड लाइट लावायला हवा. मागच्यांना ती संभाव्य धोक्याची सूचना असते, सावध करायला. मुसळधार पाऊस किंवा ब्लिझर्डमधे हि वाहनं हॅझर्ड लाइट लावुन मर्यादित वेगात गाड्या चालवतात. सॉर्ट ऑफ ड्रायविंग एटिकेट्स...
खूप वर्षांपूर्वीचे आढवते की
खूप वर्षांपूर्वीचे आठवते की मुंबई-पुणे घाटात आर.टी.ओ,. चे लोक सर्व वाहाने थांबवून हेडलाईटच्या मधोमध काळा ठिपका रंगवत असत. मी त्यांना विचारले पण होते की तुम्ही हे का करताय? तेव्हा मला सांगितले की त्यामुळे दिव्याचा उजेड पसरला जातो आणि बल्बचा प्रकाश थेट समोरच्या ड्रायव्हरला त्रासदायक होत नाही. या विषयावरून आज सहज आठवले. हल्ली तसे करताना दिसत नाही कुणी.
हाय बीम/लो बीम यापेक्षा अनावश्यक वाजवलेले हॉर्न जास्ती त्रासदायक आहेत, हे माझे वैयक्तिक मत आहे.
बोगद्यात अपुरा प्रकाश असला तर
बोगद्यात अपुरा प्रकाश असला तर हेडलाइट लावणार की इंडिकेटर्स?
मग बोगद्यात खरे अडचणीत असलेले वाहन, व महान एटिकेटी धारक यात फरक अंतरज्ञानाने करतात का? असेल बुवा. आम्रविकेत काय असेल ते आम्हाला कसे कळणार?
उबो, सहमत. फार पुर्वि, मुंबईत
उबो, सहमत. फार पुर्वि, मुंबईत गाड्यांच्या हेडलाइट्स्चा वरचा अर्धा भाग काळ्या रंगाने रंगवलेला पाहिला आहे. कारण तेच होतं, हायबीम सप्रेस करणं...
>>बोगद्यात अपुरा प्रकाश असला
>>बोगद्यात अपुरा प्रकाश असला तर हेडलाइट लावणार की इंडिकेटर्स?<<
हॅझर्ड लाइट लावले कि हेडलाइट्स बंद होतात का? ते लावायलाच हवेत. वर लिहिल्या प्रमाणे हॅझर्ड लाइट्स हि मागच्या/पुढच्यां करता सूचना आहे. त्याचा काहिंना त्रास होतो हे नव्याने कळलं...
हॅझर्ड लाईट वाले वाहन
हॅझर्ड लाईट वाले वाहन बिघडलेले आहे, सावकाश जात असेल किंवा थांबलेही असेल असे समजून बाकी वाहनांनी सांभाळून बाजूने जायचे असते.कधीही कुठेही हे लाईट लावायची प्रथा चालू केली तर 'वाहन थांबलेले असते' हे गृहीत असणे बंद होईल, आणि खरं हॅझार्ड लॅम्प लावून थांबलेल्या वाहनाला धडकले जाईल हा बोगद्यात हॅझार्ड न लावण्याचा मुख्य उद्देश असावा.(अर्थात हल्ली दुरुस्ती साठी कडेला नीट लाईट लावून थांबलेली वाहनं, माणसं यांना झोपेत गाडी चालवणाऱ्या मोठ्या वाहनांकडून ज्या प्रकारे उडवले जाते त्याप्रकारे अश्या नियमांना फार कोणी विचारत नसावे.एक प्रकारच्या तंद्रीत गाडी चालवणे, कितीही झोप आली, थकवा असला तरी मजल मारून नेण्याचा आग्रह याने सगळ्यांचंच आयुष्य पणावर. आपण नीट झोप घेऊन चांगली गाडी चालवली तरी आपल्या मागच्या लक्झरी बस किंवा ट्रक ड्रायव्हर ची पण झोप झाली असली पाहिजे.अजून गाड्याना मागच्या बाजूने बसणाऱ्या धक्क्यासाठी मागच्या बंपर मधून उघडणाऱ्या एअर बॅग्स नाही निघाल्या ना. ☺️)
कोण्या एकाने अज्ञानाने केवळ
कोण्या एकाने अज्ञानाने केवळ बोगदा सुरू झाला म्हणुन हॅझर्ड लाईट्स लावले आणि ते पाहून काही मागच्यांनी लावले, आणि केवळ बोगदा सुरू झाला तरीही हॅझर्ड लाईट्स लावायचे असतात असा निष्कर्ष काढला एवढा साधा प्रकार आहे हा.
बोगद्यात सुद्धा हॅझर्डस परिस्थिती असेल तरच हॅझर्ड लाईट्स लावावेत. आपण बोगद्यात आहोत हे सर्वांना हॅझर्ड लाईट्स लावल्या शिवायही कळते.
अप्पर च्या उलट 'डिप्पर' हा
अप्पर च्या उलट 'डिप्पर' हा नोबेल- किंवा गेलाबाजार ज्ञानपीठ-पारितोषिक विजेता शोध नक्की कुणी लावला काही कल्पना आहे का? शाळेत तरी अप्पर-लोअर असं शिकवत होते. डिप्परच्या अर्थ गूगलल्यास काहीतरी वेगळाच अर्थ दिसतो. तसंच आपल्या जेवणातल्या डाव/पळी इत्यादींना डिपर म्हणतात बहुतेक.
छान धागा आणि
छान धागा आणि
माहितीपूर्ण प्रतिसाद
बोगद्यांमध्ये हॅझार्ड
बोगद्यांमध्ये हॅझार्ड ब्लिंकर्स वापरायचे याला काही आगाडीपिछाडी नाही.
रच्याकने, नवीन गाड्यांबाबत अजून एक मुद्दा आजकाल दिसतोय. बहुतेक गाड्यांना आजकाल डेटाईम रनिंन एईडीज असतात. आणि ते पुरेसे प्रकाश देत असल्यानी वाहनचालक मेन हॅडलाईट्स लावायला विसरतात (?) आणि तशीच गाडी हाकतात. यामुळे टेल-लाईट्स लागत नाहीत आणि मागच्या गाड्यांना त्रास होतो.
मी पुण्या वरून मुंबई ला येत
मी पुण्या वरून मुंबई ला येत होतो pahte ची
3 - 4 वेळ असेल भाचा गाडी चालवत होता मी बाजूला बसलो होतो.
गप्पा चालू. होत्या मध्ये थोडा gap गेला गप्पा मध्ये मी सहज त्याच्या कडे वळून बघितलं तर तो झोपला होता गाडी स्थिर वेगात सरळ चालली होती .
मग एक फटका मारून त्याला जागा केला.
नशीब रस्त्याला वळण आल नाही किंवा कोणती गाडी मध्ये आली नाही.
सकाळी झोप येणे ही पण एक मोठी समस्या च आहे
हेडलाईटच्या मधोमध काळा ठिपका
हेडलाईटच्या मधोमध काळा ठिपका >> उपाशी बोका म्हणत आहेत त्यानुसार त्या काळ्या ठिपक्याची सक्ती केली होती ते चांगले होते. आता बंद झाली आहे का ?
पाषाणभेद. तुम्ही केलेली चर्चा
पाषाणभेद. तुम्ही केलेली चर्चा उदबोधक आहे. लोकांच अज्ञान अशा होणार्या चुकांसाठी कारणीभूत आणि मुख्य कारण असत असे मला वाटत. लोकांना अजून इंडिकेटर केंव्हा आणि कुठला द्यायचा हे सुद्धा नीट माहिती नसत. उदा : आपल्याला मागच्या गाडीला सांगायचय, पुढे धोका नाही , जा बाबा पुढे, तर कुठला इंडिकेटर दाखवायचा. आमच्या कंपनीच्या निम्म्या चालकांना याचे उत्तर बरोबर आले नाही. यासाठी वर्तमानपत्रातून , दूरदर्शान्वरून जनजागृती करणे आवश्यक आहे.
हेड लाइटचा सुरक्षेसाठी एक उपयोग.
कोलंबिया देशात ज्या गावे जोडणार्या रस्त्यांवर दुहेरी वाहतूक असते तिथे दिवसासुद्धा लोअर बीम वर गाडी चालवण्याचा नियम आहे. यामुळे लवकर समोरची गाडी दिसल्याने समोरासमोर टक्कर होणार्या अपघातांच प्रमाण कमी झाल अस दिसून आलं आहे. मी हे जेंव्हा भारतात करतो तेंव्हा दर किमी ला एकतरी पुढुन येणारे वाहन लाईट चालू आहेत अशा सूचना देतं.
हेड लाईटचा अजून एक उपयोग.
ब्राझिलमधे वेग नियंत्रण करण्यासाठी फिक्स्ड कॅमेरांप्रमाणे मोबाईल सर्व्हिलन्स कॅमेरे पण असतात. (एक पोलीस कॅमेरा लाउन जवळ गाडी पार्क करून बसलेला असतो. ) ही ठिकाणे नेहमी बदलत असतात. समोरून येणारे ड्रायव्हर पुढे मोबाईल कॅमेरा आहे हे दिव्यांची उघडझाप करून सांगत असतात. अगदी एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंथ.
किमी ला एकतरी पुढुन येणारे
किमी ला एकतरी पुढुन येणारे वाहन लाईट चालू आहेत अशा सूचना देतं. Happy>>अगदी हाच अनुभव अॅक्टिव्हा स्कूटरच्या फोर जी मॉडेल च्या हेडलाईटमुळे येतो. पादचारी लोक अतिशय तत्परतेने दिवा सुरू असल्याचे इशारे देत राहतात. आणि दुर्लक्ष केले तर "किती बेजबाबदार आहे "असे भाव.
कोण्या एकाने अज्ञानाने केवळ
कोण्या एकाने अज्ञानाने केवळ बोगदा सुरू झाला म्हणुन हॅझर्ड लाईट्स लावले आणि ते पाहून काही मागच्यांनी लावले, आणि केवळ बोगदा सुरू झाला तरीही हॅझर्ड लाईट्स लावायचे असतात असा निष्कर्ष काढला एवढा साधा प्रकार आहे हा.
बोगद्यात सुद्धा हॅझर्डस परिस्थिती असेल तरच हॅझर्ड लाईट्स लावावेत. आपण बोगद्यात आहोत हे सर्वांना हॅझर्ड लाईट्स लावल्या शिवायही कळते.
<<
नाय हो. एटिकेटी की एटीकेट का काय म्हणतात ते आहेत ते.
फार पुर्वि, मुंबईत
फार पुर्वि, मुंबईत गाड्यांच्या हेडलाइट्स्चा वरचा अर्धा भाग काळ्या रंगाने रंगवलेला पाहिला आहे. कारण तेच होतं, हायबीम सप्रेस करणं...
Submitted by राज on 16 December, 2019 - 00:44
लहानपणी 'बेस्ट' बसच्या बाबतीत हा प्रकार बघितला होता. पण मला त्याचे कारण कोणीतरी वेगळेच सांगितले होते. पूर्वी युद्धाच्या काळी शहरांमध्ये black out करायचे आणि दूर समुद्रात मुद्दाम रोषणाई करायचे, जेणेकरून शत्रू राष्ट्राची विमाने बॉम्बहल्ला करायला आलीच तर त्यांचे बॉम्ब शहरावर न पडता समुद्रात पडावेत. त्यासाठीच गाड्यांच्या दिव्यांचा उजेड वर आकाशात जाऊ नये म्हणून वरचा अर्धा भाग काळा करतात!
खरे-खोटे देव जाणे. तेव्हा रडार यंत्रणा अशी काही असते याची माहिती नसल्याने हे खरे वाटायचे!
Pages