Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा
मायाबोली.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.
दुसरे असे की जर अशा सोशल फोरवरील काही मुद्दे असोत किंवा धागे असोत ते शासनातले अधिकारी व्यक्ती, मंत्री की ज्यांच्या हातात नियम बनवणे आणि राबवणे शक्य आहे त्यापर्यंत जर गेले आणि त्यांनी गंभीरपणे यातील तथ्थे जाणून घेवून जर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला तर अशा पाळल्या गेलेल्या नियमांमुळे नागरीकांचे जगणे अधीक सुखावह होवू शकते.
वरील प्रस्तावना अजून समजली नसेल तर खालील लेख वाचून समजू शकते. थोडक्यात लेख आधी आणि वरील प्रस्तावना नंतर असे असते तर ते अधिक योग्य असते हे लक्षात यायला लेख वाचावा लागेल. लेखाची प्रकृती थोडी गंभीर आहे.
काल मी शहरातल्या उपनगराच्या रस्त्याने रात्री पायी जात होतो. तेव्हा समोरून वाहने येत होती. त्यात चारचाकी आणि दुचाकी होत्या. सदर वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश हा सरळ डोळ्यांवर येत होता. एका वाहनाचा प्रकाश इतका तिव्र होता की माझेच नव्हे तर माझ्या मागे येणार्या पादचार्याचेही डोळे दिपले. त्याने आणि मी तेथेच थांबून घेतले. त्याच्या आणि माझ्यात डोळ्यांवर आलेल्या हेडलाईट संदर्भात संवाद झाला.
असाच मुद्दा आमच्या वाहनविषयक व्हाटसअॅप वर चर्चेला आला होता. त्या क्षणीक बीजचर्चेला या धाग्याच्या निमित्ताने सार्वजनीक रुप देण्याचा प्रयत्न आहे. ( सर्वसामान्यपणे तांत्रीक इंग्रजी प्रतिशब्द बोलतांना जास्त वापरले जात असल्याने लेखातही तेच वापरले आहेत.)
वाहनांचे हेडलाईट्स - हाय बीम - लो बीम - अप्पर लाईट - लोअर डिप्पर लाईट
वाहनांमध्ये जे हेडलाईट्स असतात त्यात दोन सेटींग असतात. बटन दाबून हेडलाईट्स हाय बीम - लो बीम - अप्पर बीम - लोअर बीम (डिप्पर) अशा प्रकारे ते चमकवता येवू शकतात. रात्रीच्या वेळी असे हेडलाईट शहरात - जेथे रस्त्यावरील (स्ट्रीट) लाईट्स असतात तेथे - वाहन कायम लो बीमवर चालवणे गरजेचे आहे. नव्हे तसा नियमच आहे. आणि असा नियम आहे हेच बहूदा बर्याच वाहनचालकांना माहीत नाही. केवळ कार किंवा मोठ्या गाड्याच नव्हे तर लहान अगदी दोन चाकी वाहनांचेही हेड लाईटस आताश: प्रखर असतात. अशा अपर बीममुळे समोरच्या वाहनधारकांचे डोळे दिपतात.
जेथे स्ट्रीट लाईट्स नसतात तेथे, ग्रामीण रस्त्यांवर अपर बीमवर वाहन चालवायला हरकत नाही. परंतू तेथेही समोरून वाहन येत असल्याचे दिसल्यास दोनही वाहनांनी डिपर किंवा लो बीमवर वाहन चालवावे. हाच नियम आपले वाहन इतर वाहनापासून साधारण २०० ते ३०० मिटर मागे असते तेव्हापासून आपले वाहन लो बीमवर चालवणे गरजेचे आहे असा समजायला हरकत नाही. असे केल्याने आपल्या वाहनाचे हेडलाईटस पुढच्या वाहनाच्या आतील मागे बघण्याच्या (IRVM) काचेमध्ये चमकत नाही.
वाहन कायम लो बीमवरच चालवणे हे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी गरजेचे आहे. आणि हा नियम असल्याने तो पाळायलाच हवा.
हाय बीम वाहन चालवणे आणि जंगली प्राणी सुरक्षा
हा एक नवा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. यात किती तथ्य असावे ते सांखिकीयदृष्ट्या आणि इतर संशोधनाने सिद्ध व्हावे लागेल याची मला कल्पना आहे.
तर आजकाल अज्ञात वाहनाच्या धडकेने जंगलातले प्राणी (हरीण, बिबटे किंवा इतर प्राणी) गतप्राण होण्याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतो आहे. लक्षात घ्या की या पृथ्वीवर आपला जसा हक्क आहे तसाच प्राणी, वनस्पती यांचाही हक्क आहे. रात्री वाहनचालक आपले वाहन अपर बीमवर चालवत असल्याने या जंगली प्राण्यांचे डोळे दिपतात. ते गोंधळून जातात आणि ते तेथेच उभे राहत असतील किंवा ते बचावासाठी इतरत्र पळत असतील किंवा वाहनांवर हल्ला करण्याच्या हेतूने ते वाहनाकडे झेपावत असतील. कारण काही का असेना पण मानवाप्रमाणेच या प्राण्यांचे डोळे वाहनांच्या तिव्र प्रकाशाने दिपतात आणि ते वाहनाखाली येवून गतप्राण होतात.
पुन्हा सांगतो या मुद्यावर प्राण्यांची मानसीकता, त्यांचे प्रकाशाप्रती होणारे वर्तन या सर्वांगाने संशोधन होणे गरजेचे आहे.
वाहनातील हाय बीम - लो बीम हेडलाईट योग्य कसे वापरावे?
आपण येथ पर्यंत वाचत आलात तेव्हा आपल्याला हेडलँपमधील हाय बीम आणि लो बीम किती महत्वाचे आहे याचे महत्व पटले असेल. हाय बीम - लो बीम योग्य कसे वापरावे हे खालील प्रकारे समजावून घेता येते.
- जेथे स्ट्रीट लाईटस आहेत (शहरात) तेथे वाहन कायम लो बीमवरच चालवावे. यात चारचाकी तर येतातच पण दुचाकी वाहनेही येतात.
- ग्रामीण भागात वाहतूक नसेल तेव्हा हाय बीम ठिक आहे. पण तेथेही आजकाल वाहने जास्त धावत असल्याने लो बीमच योग्य आहे. वाहनाचा वेग विनाकारण न वाढवता वाहन चालवायचे असल्यास (डिफेन्सीव ड्रायव्हींग) हेडलँप लो बीमवर योग्य आहे.
- काही वाहनात डॅशबोर्डजवळ हेडलाईटचे सेटींग करायचे बटन असते. त्याची पोजीशन कायम शुन्य ठेवावी. ड्रायव्हरच्या उंचीनुसार एखादी पातळी वर किंवा खाली त्या त्या वेळी बदलली तर हरकत नाही. पण खरोखर तशी आवश्यकता नसते.
- समोरील वाहन किमान ५०० मिटर दुर असेल तर आपल्या वाहनाचे बीम लो करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे.
- आपल्या पुढे एखादे वाहन असल्यास म्हणजेच आपण किमान ३०० मिटर मागे असल्यास आपल्या वाहनाचे दिवे हे लो बीम करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे.
- पासींग लाईटचा उपयोगदेखील आपण हाय बीमसाठी तात्पुरता करू शकतात.
- पासींग लाईट ओव्हरटेक करतांना योग्य भान ठेवून चमकवावा. दुसर्या वाहनाने आधी चमकवला असता आपण त्याला अनुमोदन (अॅक्नॉलेज) द्यावे आणि पहिल्यांदा त्याने पासींग मागीतले म्हणून आपण त्याला योग्य वाट करून द्यावी - ओव्हरटेक करू नये. हे देखील सभ्यपणाचे लक्षण आहे आणि चांगले वाहन चालवण्याच्या एथिक्समध्ये येते.
हॅलोजन लॅम्प आणि पांढरा प्रकाश असणारे दिवे
आजकाल वाहनांत हॅलोजन लॅम्प आणि पांढरा प्रकाश असणारे दिवे येतात. काही मॅन्यूफॅक्चररच ते नव्या वाहनात आधीच बसवून वाहन विकतात. ( यात कायद्याचे उल्लंघन होते का हे पाहणे आरटीओचे काम आहे. ते जबाबदारीने वागतात का हा वादाचा मुद्दा आहे.)
आपल्या वाहनांत जर असे दिवे आधीच बसवून आलेले असतील तर आपण ते दिवे काढून केवळ इतरांसाठी साधे पिवळे दिवे बसवू एवढे समाजाप्रती संवेदनशील आपण निश्चित नाही. ( हे वाक्य फार दु:खाने लिहावे लागते आहे.) पण आपले वाहन जुने असेल तर आपल्या वाहनात असे हॅलोजन किंवा पांढरा प्रकाश देणारे दिवे शक्यतो बसवू नये. जास्तीचे दिवे, फॉग लँप, मोटरसायकलींच्या हॅन्डलजवळ तिव्र प्रकाशाचे एलईडी लावणे असे प्रकार शक्यतो टाळावेत. (यात जास्त आवाजाचा सायलेंसर, रिवर्स हॉर्न आणि जास्त किंवा निराळा आवाज असलेले हॉर्न बसवणे देखील येते.) अशा प्रकारच्या दिव्यांची खरोखरच आवश्यकता आहे का हा प्रश्न मनाला विचारावा. इतरांनी केले म्हणून मी पण केले पाहीजे हि वृत्ती नसावी. अर्थात वाहन घेणे ही एक लग्झरी समजली जाते. ठिक आहे तसे समजा. वाहनाचा आतील भाग कितीही सजवा पण वाहनाच्या बाह्य भागात काही बदल करणे, इतरांना हानी पोहोचेल असे बदल करणे कायद्याने कितपत योग्य आहे त्याचा विचार करावा. नियम आणि कायदे हे आपल्या भल्यासाठी असतात. भले आपल्याला आपल्या जीवाची काळजी नसेल पण खाजगी वाहन रस्त्यावर आले तर ते सार्वजनीक होते. तेथे सामाजीक वर्तनच केले पाहीजे. समाजाप्रती आपली जी जाणीव आहे ती प्रगल्भ ठेवली पाहीजे.
पोलीस, आरटीओ - सरकारी खात्यांची कर्तव्ये
पोलीस, वाहतूक पोलीस शाखा, आरटीओ यांनी वेळोवेळी निरनिराळ्या माध्यमातून या नियमांबद्दल जागरूकता आणणारे कार्यक्रम केले पाहीजे. भारतीय लोकांत - समाजात ब्रेनवॉश केल्याशिवाय एखादी गोष्ट त्यांच्या डोक्यात शिरतच नाही. एखादा नियम, कायदा त्यांच्या डोक्यात भिनवावा लागतो तरच तो अंगवळणी पडतो. आरटीओ, पोलीसांनी झेब्रा क्रॉसींगबाबत बर्यापैकी जाणीव केली आहे. त्यामुळे वाहने जरी झेब्रा कॉसींगवर (अजूनही!) थांबत असतील पण कमीतकमी (!) झेब्राक्रॉसींगच्या पुढे तर थांबत नाहीत हा असल्या शिकवणूकीचा (की पोलीसांनी दंड घेतल्याचा) फायदाच समजायचा! (समजले नसेल तर वाक्य पुन्हा वाचा.)
असलीच जागरूकता, वारंवार सांगणे, ब्रेन वॉश करणे हे अपर बीम, लोअर बीम ( हाय बीम- लो बीम, अप्पर- डिप्पर), रिव्हर्स हॉर्न, मोठ्या आवाजाचे सायलेंसर, पांढरे, हॅलोजन, तिव्र प्रकाश देणारे हेडलँप, टेल लँपला सजवणे, वाहनात बाह्य बदल करणे या बाबतीत पोलीस, वाहतूक पोलीस शाखा, आरटीओ तत्सम शासकीय खाते आदींनी जनतेत केले पाहीजे. वेळोवेळी जनतेला सजग केले पाहीजे. अपर बीम आणि तत्सम नियम, कायदे वारंवार सांगितले पाहीजे.
मला एक आश्चर्य वाटते, आवाज मोठे असणारे सायलेंसर गाडीला लावतात तर मग त्याला सायलेंसर का म्हणतात. विनोद सोडा, पण आपण समाजाप्रती किती सिरीअस आहोत हेच ही बाह्य लक्षणे दाखवतात. असो.
या असल्या अपर लोअर, हाय लो बीम वर एक युट्यूबवर बंगलोरच्या आदीत्य कुमार - विषयम मेडीआ याने "EDUCATED SUTIYA... ARE YOU ONE OF THEM?" हे टायटल असणारा विडीओ अपलोड केला आहे. वाहनांविषयी, अपर बीम विषयी असलेल्या भारतीय मानसीकतेला "एज्यूकेटेड सुतीया....त्यातले आपण तर नाही ना?" हे शिर्षक अगदी परफेक्ट फिट होते आहे. या विडीओला फक्त ६०४ व्हूज, ५ लाईक्स, १ डिसलाईक आणि एक कमेंट मिळालेले आहेत. (तो एक डिसलाईक देणारा एज्यूकेटेड सुतीया असावा.) याच्या विरूद्ध "जेसीबीकी खुदाईला" या विडीओला किती लाईक्स आणि किती व्ह्यूज मिळाले असतील याची गणती आपल्यापैकीच बर्याच जणांच्या तोंडावर असेल. खरोखर आपण एज्यूकेटेड सुतीया आहोत का याच ज्याने त्याने विचार करायचा आहे. काल रात्री रस्त्याने जातांना माझे आणि माझ्या बरोबर चालणार्या पथीकाचे डोळे समोरच्या वाहनाच्या प्रकाशाने दिपले तेव्हा मी असलेच उद्गार काढले होते. माणसे शिकून शिक्षित झालीत पण सुशिक्षीत झाली नाहीत.
एका वाहन बनवणार्या कंपनीने डिप्पर या नावाने गर्भनिरोधक बाजारात आणले होते. कारण बर्याच ट्रक्सवर "Use Dipper at Night" हे स्लोगन लिहीलेले असते. यामुळे वाहनधारकांमध्ये कितपत आणि नक्की कोणत्या "विषयाची" जागरूकता झाली असेल याची आपल्याला कल्पना आली असेलच. हे असले धेडगूजरी आणि आपलाच फायदा होणारे जाहिरातीचे प्रयोग त्या त्या कंपन्यांनी थांबावावेत आणि या बाबतीवर खर्च होणारा पैसा योग्य ठिकाणी सत्कारणी लावावा. रस्ते अपघात खूप होत आहेत. या बाबतीत सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. सरकारला वाहनधारक, वाहनचालक, वाहन मॅन्यूफॅक्चरर आदींकडून खूप पैसा मिळतो आहे. त्यातील काही भाग हा सोशल अवेअरनेस या कारणाखाली खर्च करून या अशा न पाळल्या जाणार्या वाहतूक नियमांबाबत जागरूकता आणली पाहीजे.
वाहतूक पोलीस रात्री ड्युटी संपवतात. वाहतूक पोलीस आपले मित्र आहेत. त्यांच्या कामाचे तास खूप आहेत याची मला जाणीव आहे. त्यांच्या संख्येत अधीक वाढ करून त्यातील अधीकचे पोलीस रात्री काही प्रमाणात शहरात नाकेबंदीसाठी नेमून करून असे नियम न पाळणारे वाहनधारक - जे अप्पर लाईट लावून, सायलेंसर बदलून किंवा प्रखर हेड लँप लावून, रिव्हर्स हॉर्न लावून वाहन चालवतात - त्यांना समज दिली पाहीजे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवला पाहीजे. पण यात दंड वसूल करायला अजून एक निमित्त भेटले असे व्हायला नको. राज्यात स्पिडगन असलेल्या नव्या गाड्या पोलीस खात्यात दाखल झाल्या आहेत. त्या देखील असे अपर बीम असलेली वाहने पकडू शकतात.
हा लेख शासनापर्यंत हस्ते परहस्ते जावा. शासन जे काही करते आहे त्यात सुयोग्य बदल व्हावा अशी या लेख लिहीण्यामागे प्रेरणा आहे. सोशल मिडीया फार अॅक्टीव्ह असल्याने मायबोली सारख्या माध्यमातून तो लोकांपर्यंत जावा अशी इच्छा आहे. या लेखाच्या भरपूर कॉपी होवोत. हा लेख कॉपीराईट वगैरे मुक्त आहे. कुणाचे नाव नाही लिहीले तरी चालेल. छोटी वाक्ये, परिच्छेद कॉपी झालेत तरी हरकत नाही. पण समाजाच्या तळापर्यंत वाहतूकीच्या नियमात असे काही आहे याची जाणीव होणे महत्वाचे आहे. कारण वाहतूकीचा किंवा वाहन चालवण्याचा परवाना कसा मिळतो हे आपण जाणतोच. त्यात वाहतूकीच्या नियमांबाबत शिक्षण किती होते या बाबतीत संशोधन करावे लागेल.
लेखात काही तृटी असतील तर त्या जरूर सांगा. आणि हा लेख संपल्यानंतर पहिले दोन परिच्छेद पुन्हा वाचा.
ट्रकवर जसे मागे लिहीतात तसे या लेखाच्या शेवटी लिहीतो की: Use Dipper at Night - रात के समय डिप्पर इस्तेमाल किजीए - आणि हो, या वाक्याचा कृपया योग्य तो अर्थ घ्या. हॅपी अॅन्ड सेफ ड्रायव्हींग!
मी यापैकी कुठल्याही प्रकारचा
मी यापैकी कुठल्याही प्रकारचा लाईट वापरत नाही. माझ्या गाडीच्या पुढे मी मोठ्या आकाराचा कंदील लावला आहे. त्या प्रकाशात मी हळूहळू गाडी चालवतो.
नशीब ते शीर्षकामध्ये नाइट
नशीब ते शीर्षकामध्ये नाइट नंतर पूर्ण एक वाक्य दिलंय नाहीतर मघाशी पटकन वाचले की - यूज डायपर ऐट नाईट
बाकी लेखकाने नॅशनल हाइवे आणि एकाकी घाट रस्ते कितपत ड्रायव्हिंग केलंय रात्री त्यावर काही स्वानुभवाचा अप्पर / डिपर टाकला तर अस्मादिक अजुन काही मुद्दे मांडण्यास इच्छुक आहेत.
लोक ऐकणार नाहीयेत.हाय बीम
लोक ऐकणार नाहीयेत.हाय बीम लावणे हा स्वतः लै भारी असं दाखवण्याचा एक प्रकार आहे.
पूर्वीच्या काळी नाईट व्हिजन गॉगल मिळायचे रात्रीच्या दुचाकी ड्रायव्हिंग साठी, आता हाय बीम ला सामोरं जाण्यासाठी काही विशिष्ट चष्मे बनले आहेत का?
माझा एक भाऊ समोरच्या हाय बीम मुळे रात्री बाजूला जाऊन खड्ड्यात पडला.प्लास्टर आणि टाके दोन्ही बरेच दिवस होते.
नवीन दुचाकींना जे एलईडी
नवीन दुचाकींना जे एलईडी डोकंदिवे (हेडलँप) आहेत ते समोर्च्याचे डोळे अक्षरश: आंधळे करतात. यात नं १ वर नवीन अॅक्टिव्हा आहे.
आणि हो, कुठेतरी वाचलेलं आठवतंय हे जे पांढर्या प्रकाशाचे एलईडी आहेत (किंवा मुळात एलईडी हेडलँप्सच, सर्व प्रकारचे) ते रस्ता कोरडा असतांना फार चांगली कामगिरी करतात पण पाऊस असेल तर आणि / किंवा रस्ता ओला असेल तर त्याचा बीम डिस्पर्स होतो आणि विजिबिलिटी फार लिमिटेड असते त्या वेळापुरती. साधे हॅलोजन्स जास्त प्रभावी असतात असं एअकंदरीत लेख वाचल्यावर वाटतं. बहुधा टीम-बीएचपी वर वाचला होता.
https://www.team-bhp.com/forum/technical-stuff/194637-hid-led-headlamps-...
आणि या अजून काही लिंक्स आहेत - https://www.google.com/search?q=halogen+or+led+headlight+team+bhp&rlz=1C...
हाय वे / गावा बाहेरील
हाय वे / गावा बाहेरील रस्त्यावर समोरुन वाहन येत असताना डीपर मध्येच गाडी चालवणे म्हणजे वेग खुप कमी करावा लागतो.
समोरून वाहन येत असताना, आधी कुणीतरी एक डीपर टाकतो पुन्हा अप्पर देतो. हा समोरच्या वाहनाला तू सुद्धा डीपर दे असा सिग्नल आहे. समोरचे वाहन मग ३ ते ४ सेकंदा करता डीपर देते. या वेळात आधीच्या वाहनातील चालक समोरच्या वाहना पलिकडे पर्यंत रस्ता नीट पाहून घेतो आणि त्याप्रमाणे आपल्या वाहनाचा वेग ठरवतो. आणि मग तो सुद्धा समोरच्या वाहनाला एकदा ३ ते ४ सेकंदा करता डीपर देतो आणि त्याचा ड्रायव्हरही रस्ता नीट बघून आपल्या वाहनाचा वेग ठरवतो.
दोन्ही वाहने क्रॉस होण्यापूर्वी गरज पडल्यास परत डीपर देण्याचा सिग्नल एकमेकांना देतात.
वरील प्रमाणे अप्पर डीपर वापरण्याची अपेक्षा आहे. अलीकडे ते पाळणारे खूप कमी झाले आहेत, पण बरेच ट्रक / बस ड्रॅयव्हर्स पाळतात.
रस्त्यावर लाईट असतील तर मात्र कायम डीपर मध्येच चालवणे, शहरात / गावात रस्त्यावरील लाईट गेले असतील तरी सुद्धा डीपर मध्येच चालवणे आवश्यक आहे.
चांगला लेख आहे. आचरट
चांगला लेख आहे. आचरट प्रतिसाद कडे दुर्लक्ष करावे....
अप्पर चा उपयोग नक्की काय आहे
अप्पर चा उपयोग नक्की काय आहे मग ?
अप्पर चा उपयोग नक्की काय आहे
अप्पर चा उपयोग नक्की काय आहे मग ?......दिवसा लाईट सुरु करुन बंद करुन समोरच्या वाहनाला संदेश देता येतो पण रात्री अप्पर डिपरने संदेश द्यावा लागतो.
आजकाल बहुतेक कारमधे हाय बिमसाठी सेटींग असते. त्यामुळे जर हाय बिमचा अँगल कमी केला तर समोरच्याला कमी त्रास होतो.
आकाराचा कंदील लावला आहे. त्या
आकाराचा कंदील लावला आहे. त्या प्रकाशात मी हळूहळू गाडी चालवतो.
थोड तुमच्या मनाला समाधान म्हणून गॅस बत्ती वापरून बघा
अप्पर चा उपयोग नक्की काय आहे
अप्पर चा उपयोग नक्की काय आहे मग ?...
>> एकदम सुनसान आणि खड्डे, चढ उतारवाल्या, वळणावळणाच्या रस्त्यावर अप्पर लाईट वापरावी लागते. नाहीतर पुढे काय आहे त्याचा अजिबात अंदाज येत नाही. काहीवेळा तर अशा रस्त्यावर वळणासाठी लावलेले पांढरे दगडही नसतात. रस्त्याला दुभाजक नसतो, मधली पांढरी रेघही नसते. कधी कधी अशा रस्त्यावर एकदा सायकलस्वार , चालत जाणारा कोणीतरी, गाई गुरं असतात, सायकल ला रिफ्लेक्टर वगैरे पण नसतात. हे सगळे दुरून दिसायला हवेत म्हणून अप्पर लाईट वापरावी लागते कारण इतर कुठलाही प्रकाश नसतोच.
अशावेळी समोरून गाडी आली की लाईट डीपर करायचे आणि हळू चालवायची.
शहर, गाव असेल तर मात्र डीपर लाईट पुरेसा आहे.
(एकदा अशाच एका पांढरे दगड नसलेल्या रस्त्यावर वळणावर फसून गाडी रस्त्यावरून उतरणार होती, खाली काय होतं ते देवच जाणे.)
(No subject)
A - Low Beam
B - High Beam
-- Courtesy Internet
Upar लाईट मुळे लांब पर्यंत
Upar लाईट मुळे लांब पर्यंत रस्ता दिसतो आणि डीपर लाईट मध्ये काही मर्यादित अंतरपर्यंत च रस्ता दिसतो.
घाट रस्ता किंवा सूनसन रस्ता असेल तर uppar लाईट चांगले काम करते.
रस्ता लांब पर्यंत कसा आहे खड्डे,कोणते वाहन उभे नाही ना हे माहीत पडते.
पण ह्या upar dipar चा समोरच्य व्यक्तीला खूप त्रास होतो काही वेळासाठी दिसणेच बंद होते आणि रस्त्याचा अंदाज न आल्ामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
तेव्हा इशारा दिल्या नंतर दोन्ही चालकांनी क्रॉस होताना upar लाईट बंद करावी हे योग्य वर्तन आहे..
मोठी वाहने हा नियम पाळतात.
पण दुचाकी वाले आणि काही car वाले हा नियम पाळत नाहीत असा अनुभव आहे.
सफेद प्रकाश देणाऱ्या हेड लाईट वर सर्रास बंदी च घातली पाहिजे.
ना रस्ता साफ दिसत आणि डोळे dipavnara प्रकाश खूप त्रास दायक आहे
बोकलत माबोवरचा सुटिया आहे.
बोकलत माबोवरचा सुटिया आहे. इतरही अनेक आहेत. लेखकाने तळमळीने हे लिहिले आहे. त्यावर बोकलत सुतिया ने पहिल्या प्रतिसादाने घाण टाकली आहे.
विषय महत्वाचा आहे...
विषय महत्वाचा आहे... आणि मला अनेकवेळा या हाय बीमचा त्रास होतो. आमच्या कडे, कॅनडामधे, वर्षातले पाच महिने थंडी / मोठा काळ रस्त्यावर बर्फ असतो... आणि गाडी हाकणे तुलनेने जास्त आव्हानात्मक बनते.
मला समोरुन येणार्या गाड्यांच्या हाय बीम हेडलाइट्सचा रात्रीच्या वेळी खूपच त्रास होतो.... परवा सिग्नलला समोर मोठा ट्रक हाय बीम मधे थांबला होता... सिग्नल मिळाल्यावर काही काळ अक्षरश: अंधारुन आले होते/ काही क्षण काहीच दिसत नव्हते.
कॅनडामधे विभाजित महामार्गावर (divided highway) गाडी चालवतांना बहुतेक वेळा हाय बीम मधे गाडी चालवतात. रस्ता एकपदरी झाल्यावर लोक लो बीम मधे जायला विसरतात, पण समोरचे येणार्याला त्रास झाल्यावर तो त्याच्या गाडीचे लो-हाय-पुन्हा लो बीम हेडलाइट्स ने तुम्हाला सावध करतो. बहुतेक वेळा असा इशारा काम करतो.
अनेक वेळा महामार्गावर गाडी हाकतांना जनावरे/ स्नो/ बर्फ /रस्त्याचा खूप पुढचा अंदाज येण्यासाठी लो-हाय (काही क्षण) - पुन्हा लो बीम असे प्रकार करतो. जेणेकरुन रस्त्याचा चांगला अंदाज येतो.
स्नो पडत असतांना हाय बीम वर गाडी जास्त वेळ ठेवताच येत नाही, हाय बीम परावर्तित स्वरुपात गाडी चालवणार्यालाच जास्त त्रास देतो. पण रस्त्याचा अंदाज घेण्यासाठी लो-हाय (फार थोडा वेळ)-लो असे केल्यावर मदत होते.
मुंबई मध्ये राणीच्या नेकलेस
मुंबई मध्ये राणीच्या नेकलेस भागात bmc नी ह्या तीव्र सफेत प्रकाश झोत देणाऱ्या स्ट्रीट लाईट लावल्या होत्या.
खूप त्रास होयाचा डोळ्यांना शेवटी टीका झाल्यावर त्या काढल्या गेल्या आणि पिवळा प्रकाश देणाऱ्या लाइट्स लावल्या 3 किंवा 4 वर्षा पूर्वीची गोष्ट आहे
आपल्या कडे नियम बाबत सावळा
आपल्या कडे नियम बाबत सावळा गोंधळ
च आहे.
Divider ला पिवळे पट्टे असायलाच हवेत किती ही फुशारक्या मारणारे चालक असले तरी पिवळे पट्टे नसलेलं divider स्पष्ट दिसत नाहीत.
तसेच रस्त्या chya कडे पासून 1 feet अंतरावर रिफ्लेक्टर असलेच पाहिजेत म्हणजे रस्ता कुठे संपत आहे ह्याचा अंदाज येतो.
पक्का रस्ता आणि बाजूची कच्ची पट्टी
हे सामान लेव्हल
वर असावेतत खूप ठिकाणी 6 इंचा पेक्षा जास्त फरक असतो पातळी मध्ये
@ लबाड कोल्हा, काही हरकत नाही
@ लबाड कोल्हा, काही हरकत नाही हो. येवूदा. त्यांचे कुठलेतरी प्रेशर असेल ते रिलीज होत असेल. खेळीमेळीत घ्यायचे आपण. आपल्याला समजत नाही का की तिरकस चौकस आहे ते.
@ बोकलत आपण लिहीलेले वाचले आणि काही हरकत नाही मला मजा आली वाचायला. माझाही स्वभाव तुमच्यासारखाच आहे, विनोदी. तुमच्या कंदीलाची कल्पना सगळ्यांनी घेतलीत तर निश्चितच आपण आपली गाडी हळू चालवू आणि अपघात टळतील.
@ भिकाजी, रस्त्याच्या ट्रीप्स बद्दल लिहायचे झाले तर प्रत्येक ट्रीप्सच काय साधे एखाद किलोमिटर देखील भारतातल्या शहरात गाडी चालवली तर अनेक अनूभव येत असतात. मग किती अन कसे लिहावे? त्यात शक्यता तरी किती असतात? बर्याच. सायकलवाला जातो, रस्त्यात एखादी बाई माणूस आडवा येतो, शाळेतली मुले, शालेय वाहने, रिक्षा, बस, वाट अडवून बोलणारे, थुंकणारे, सिग्नल्स. राष्ट्रीय महामार्गावरची कथा वेगळी. तेथे भरधाव वाहणारे, रस्ता मध्येच दुरूस्त केलेला, खड्डे, मध्येच येणारे कंबरब्रेकर, अपघात, वळणे, टोल नाके, येणारी छोटी गावे. अनेक शक्यता. त्यात ड्रायव्हरच्या सवयी निराळ्या, आपली मनस्थिती, गाडीची परिस्थिती. काय अन कसे लिहीणार? आणि घाट रस्ते यांचा अनूभव तर निराळाच.
तुम्ही म्हणताच तर एक अप्पर चमकवतो.
एका एकदम रिमोट एरीयातील कमी शिक्षण असलेला तरूण ड्रायव्हर रात्रीच्या वेळी अगदी व्यवस्थित अपर डिपर देत वाहन चालवत होता.
मी प्रवासी होतो त्याच्या खाजगी वाहनात. मला कौतूक वाटले त्याचे. त्याचे अभिनंदन केले लगेच.
आपणच आपले अनूभव लिहीलेत तर आम्हालाही शिकायला मिळेल.
@मी_अनू, मला नाही वाटत की केवळ हाय बीमसाठी काही गॉगल वगैरे असतील. तुमच्या भावाच्या हाय बीम मुळे झालेल्या अपघातामुळे त्यांना सहानुभूती आहे. (तसे लिहील्यामुळे फस्ट हॅन्ड एक्सीबीट मिळाला या लेखासाठी.)
@योकू, @ अॅक्टीव्हा - भारतातील बरेच दुचाकी मॅन्यू. वाहन डिझाईन करतांना त्याच्या बॉडीबाबत काही आरडी करत असतील असे वाटत नाही. निरनिराळे कार्टूनसारखे वाहन तयार करायला काय मिळते काय माहीत. मी तर अनेक सजेशन्स देवू शकतो अशा वाहनांबाबत. अॅक्टीव्हा आणि तत्सम स्कुटरेटमधील हेडलँप रचना खराब आहे हे मान्यच आहे.
@ मानव पृथ्वीकर (माझाही एक डूआयडी होता - भारत नेटकर! वापरला नाही कधी.) आपण जी अपर डीपर अॅक्नॉलेज करत वाहन चालवायची पद्धत आहे ती अगदी योग्य आणि सभ्यपणाची आहे. झालंच तर या आपल्या लिखाणाचे इंग्रजीत अनुवाद करून नेटवर आणि येथे लिहा. लागला तर धागा काढा. एखाद्याने इंग्रजीत सर्च केले तर तो त्यांना मिळावा हि इच्छा. (इंग्रजीत जास्त हिट्स मिळतात. कारण इंग्रजीतच जास्त शोधले जाते.)
@ वेडोबा- ट्रोल्स इज अवर फ्रेंड! आणि अपरचा उपयोग काय यासाठी मानव पृथ्वीकर, हरिहर, सावली, हायझेनबर्ग - एक..., Rajesh188 यांचे प्रतिसाद वाचावे. त्यांनी समजावून दिले आहे.
@ सावली, बरोबर लिहीले आहेत आपण. तुम्ही एक चांगले आणि सभ्य ड्रायव्हर असाल.
@हायझेनबर्ग - एक... आपल्या इमेजेस लेखाला पुरक आहेत. गुड जॉब!
@ उदय यांचा प्रतिसाद आताच वाचला. वेळोवेळी अपर डिपर करत चालवणे योग्य आहे. त्याने ड्रायव्हरही जागरूक असतो. मला असे ड्रायव्हर आवडतात.
@Rajesh188 आपले निरीक्षण अचूक आहे. सफेद प्रकाश देणाऱ्या हेड लाईट वर सर्रास बंदी असलीच पाहिजे. पिवळे प्रकाश देणारे दिवे घातक आहेत. लाईट इंजीनीअर्सनी याबाबत आपले संशोधन वाहन निर्मीती करणार्यांना द्यायला हवे. रस्ते अन त्याची परिस्थिती हा वेगळाच विषय आहे. भयानक परिस्थिती असते रस्त्यांबाबत.
समोरचा ड्रायव्हर अगदीच हेकट असेल अन तो अपरवरच गाडी आणत असेल तर आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करण्यावाचून गत्यंतर नसते. अशा वेळी आपले वाहन पास होतांना ते वाहन क्रॉस झाले की लगेच आपले दिवे अपर डीपर करावेत म्हणजे आपल्याला समोरचे दिसते. सरावाने हे जमेल.
भरपुर महसूल, दंड, पैसे मिळत असूनही पोलीस, आरटीओ या मुद्याबाबत उदासीन आहेत. सरकारी बाबू पाट्या टाकत पुढे जातात. अहो मला एकदा रस्त्यात अडवले. बाजूला आरटीओ ऑफीसर उभा होता तीन स्टारवाला. मी त्याला रिव्हर्स हॉर्न अयोग्य आहेत. बहूतेक वाहनांत तो असतो. असे सांगितले असता त्याबाबत त्याला काहीच माहीत नव्हते. आडातच नाही तर पोहोर्यात कुठे उतरेल?
लेखाचे प्रयोजन अपर डीपर बाबत जागरूकता आणणे हे होतेच पण त्याहून पुढे मला हे अपेक्षीत आहे की अशा अपर डिपर बीमबाबत जागरूकता आणणे हे पोलीस, आरटीओ, वाहतूक खाते यांची जबाबदारी आहे. हा एक लेख कुठपर्यंत पोहोचणार?
( हा समारोपाचा प्रतिसाद नाही. कृपया आपले अनूभव, म्हणणे येथे सांगा. )
डोळे दिपले की काही क्षण जो
डोळे दिपले की काही क्षण जो काळोख पसरतो डोळ्या समोर त्या वेळात आपण जे अंतर पार करतो त्या अंतरतील सुरेक्षेची जबाबदारी पूर्णतः नशीब वर अवलंबून आहे.
मी माझ्या बऱ्याच मित्रांना ह्या वर मत विचारले तर काहींनी सरळ ठोकून दिले आम्हाला दिसतो रस्ता.
मला माझ्यात दोष आहे असा काही क्षण भास झाला
नशीब ते शीर्षकामध्ये नाइट
नशीब ते शीर्षकामध्ये नाइट नंतर पूर्ण एक वाक्य दिलंय नाहीतर मघाशी पटकन वाचले की - यूज डायपर ऐट नाईट Uhoh >>>>> नवीन Submitted by भिकाजी on 12 December, 2019 - 08:42
कालच 'use dipper at night ' असे एका भल्या मोठ्या पंजाबी ट्रक च्या मागे लिहिलेले माझ्या वाचनात आले. वाहतूक नियम एवढे खोलवर माहित नसल्याकारणाने मला हि डायपर असेच वाटले , पंजाबी ट्रक वाल्याची इंग्लिश चुकीची असेल आणि लहान मुलांसाठी रात्री डायपर वापरा असा संदेश ट्रक ड्रायव्हरला द्यायचा असावा असे मला पाहताक्षणी वाटले).
चांगला लेख आणि खूप उपयोगी
चांगला लेख आणि खूप उपयोगी माहिती.. मला पण भयंकर चीड आहे कायम अप्पर लाइट लावून गाडी चालवणार्यांची.
आडातच नाही तर पोहोर्यात कुठे उतरेल? >> खरंय.. पोलिस स्वतःच अप्पर वर गाडया चालवत असलेलं बघितलंय मी..
ओव्हरटेक करू नये
ओव्हरटेक करू नये
ओव्हरटेक चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे.
दिवसा सुद्धा काळजी घ्यावी लागते.
रस्ता रुंदीला लहान असेल पण उत्तम दर्जाचा असेल तर इथे सुद्धा वाहनांचा वेग जास्त असतो.
ओव्हरटेक करताना समोर चालल्या वाहनाचा वेग ,समोरून येणाऱ्या वाहनाचा वेग,आपल्या वाहनाचा वेग आणि आपल्या पाठीमागून येणारे वाहन आणि त्याचा सुधा ओव्हरटेक करण्याचा हेतू नाही ना अशा मल्टिपल शक्यतांचा विचार करावा लागतो.
पण काही नग असे असतात आपल्या समोर जाणाऱ्या वाहनाला इशारा न देता समोरच्या गाडीच्या वेगाचं विचार न करता आणि पाढी मागची गाडी न बघता ओव्हरटेक करतात .
त्या मुळे खूप प्रसंगात अंदाज चुकतो सर्व च संबंधित वाहन चालकांचा आणि अपघात होतो.
आणि त्यांच्या पाठीमागे
आणि त्यांच्या पाठीमागे लिहिलेलं असतं
बघतोस काय रागाने
ओव्हरटेक केलाय वाघाने
एक्वेळ असा रिस्की ओवर टेक
एक्वेळ असा रिस्की ओवर टेक परवडतो पण खरे टेंशन असते जेव्हा एखाद्या ट्रेलरला एक कार ओवरटेक करतेय आणि तिचं पाहुन स्फुरण चढलेली त्या कारच्या मागची कार सुद्धा ओवरटेक करतेय जिला प्रत्यक्ष समोरून येणारे वाहन निटसे दिसत नसते तेथे अपघाताची शक्यता नक्कीच वाढते.
एसटीला असे बाइकर्स ओवरटेक करताना समोरून येणाऱ्या टेंपोमुळे दोन्ही अवजड वाहनांमध्ये सैंडविच बनून आरायपी झालेले पाहिलेत ... नसता घरच्याना घोर आणि जीवाशी खेळ..
असे वाघ कोण असतील ह्याचा
असे वाघ कोण असतील ह्याचा अंदाज गाडीची सजावट,नंबर प्लेट ची नक्षी ,आणि चालकाचा पेहराव बघून ओळखण्याची कसब थोडी आत्मसात केली आहे
हे boklat sir साठी
>> ओव्हरटेक केलाय वाघाने
>> ओव्हरटेक केलाय वाघाने
काही ठिकाणी 'वरटेक केलाय वाघाने' असेही लिहीलेले पाहीले आहे.
पाभा, केवढा वेळ काढून अभ्यासू
पाभा, केवढा वेळ काढून अभ्यासू लेख लिहिला आहेत, खरंच कौतुक आणि आभार. माजोरडेपणाने अपर बीमवर गाड्या चालवणाऱ्या बायकर्स आणि कार ड्रायव्हर्सची चीड येते. आणि मोठ्या गाड्यांचे (बस ट्रक) ड्रायव्हर (mostly) फारसे शिक्षित नसूनही बऱ्यापैकी जबाबदारीने हा नियम पाळतात.
तुमच्या लेखाने 4 डोकी जरी सुधारली तरी सार्थक झालं.
माहितीपूर्ण लेख.
माहितीपूर्ण लेख.
तुमच्या लेखाने 4 डोकी जरी सुधारली तरी सार्थक झालं.>>+१
WhatsApp var share kela tar
WhatsApp var share kela tar chalel ka lekh??
घोर अज्ञान, किती जणांना
घोर अज्ञान, किती जणांना नवसाक्षर पक्षी चालक यांना गाडीचे कित्येक फीचर कसे वापरायचे हेच माहीत नसते.
@वेडोबाजी, शेवटच्या तिसर्या
@वेडोबाजी, शेवटच्या तिसर्या परिच्छेदात तेच आवाहन केलेय आणि मधल्या एका प्रतिसादात तेच सांगितले आहे. म्हणजे फार काही वेगळे नाही लिहीले. मला वाहन चालवतांना जाणवले ते लिहीले.
आणि वाहनचालकांपेक्षा जे सरकारी अधिकारी आहेत ज्यांच्या हातात नियम बजावण्याची पॉवर आहे असे पोलीस ऑफीसर, आरटीओ अधिकारी यांच्यापर्यंत हा लेख गेला तर काही प्रमाणात ठिक होईल.
एक मुद्दा सांगायचा राहिला. आरटीओ किंवा पोलीस खात्याने अपर बीम वर वाहन चालवले म्हणून दंड केला आहे याची आकडेवारी त्या खात्याकडे तरी असेल काय?
Pages