लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे?

Submitted by कोहंसोहं१० on 1 November, 2019 - 22:10

माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.

पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.

त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जर ६० च्या आधी रिटायर झाल्यास काही काळ स्टॉक मध्ये टाकु शकतो . ६० नंतर आपला बाजार भाव (human captial) कमी झालेले असते त्या काळात जर स्टॉक मध्ये पैसे गुंतवुन रिस्क घेणे जोखमिचे ठरेल. रिटायरमेंट मध्ये डेरिवेटिव्ज प्रचंड रिस्की आहे . Calculation प्रमाणे जर excess money असतिल तर हरकत नाही .

तसेच ७५-८० नंतर सहकारी बॅका , BBB+ कंपन्या (DSK किंवा त्यासारख्या ) पण रिस्की आहेत. PPF, RBI Bond, Post Office सेफ आहेत.

मेडिकल ईन्सुरन्स हा खुप खर्चिक ठरु शकतो. जसे वय वाढेल तर प्रिमियम वाढत जाते. २० वर्षापुर्वी ५ लाखाला १० हजार असलेले वडलाचे प्रिमियम आता ३० हजार झाले आहे . वयाच्या ९० व्या वर्षी ते ५० हजार आहे. मेडिकल साठी जास्त खर्चाची तरतुद केली पाहिजे.

जर मुल बाळ नसेल किंवा मुल वेल सेटल्ड असतिल घर पण एक गुंतवणुक आहे. धाग्याकर्त्या ने दिलेल्या उदाहरणात घर एक गुंतवणुक आहे जी सगळ्यात शेवटी कॅश करता येते.

ॲमी, हाब, छान प्रतिसाद.
रिटायरमेंट घेऊन मिळालेल्या पैश्यांवर शेयर मार्केट मध्ये खेळणे मला तरी पर्सनली खूप रिस्की वाटते आणि तुम्ही म्हणालात तसा एक स्ट्रेसफुल जॉब होऊ शकतो...त्याऐवजी अगदी करायचंच असेल तर सरळ पार्ट टाइम छोटा मनाला भावेल असा जॉब करावा असे सुचवेन. ज्यांना मार्केट मध्ये ट्रेडिंग जमते त्यांनी डेरिव्हेटीव्ह मध्ये अवश्य खेळावे परंतु रिस्की आहे हे नक्की.
अमेरिकेप्रमाणे भारतात डिव्हिडंड देण्याऱ्या कंपन्या फारश्या नाहीत. अगदी नगण्य डिव्हिडंड मिळतो. त्यात पुन्हा २३% च्या आसपास डिव्हिडंड टॅक्स जातो त्यामुळे त्याकडे इन्कम म्हणून अवघड वाटते. म्युच्युअल फंड मध्ये डिव्हिडंड टाईप असतो पण पुन्हा टॅक्स गेल्यामुळे बरेच जण ग्रोथ चा पर्याय स्वीकारतात.
शेयर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये काही भाग अतिशय लॉन्ग टर्म साठी ठेऊन (१५-२० वर्ष) द्यावा आणि FD च्या व्याजवर जगणे जेंव्हा अवघड होईल (महागाई किंवा इतर खर्च वाढल्याने) तेंव्हा हळूहळू तो पैसा FD मध्ये आणावा त्यामुळे रिस्क पण कमी होते आणि १५-२० वर्षात साधारणपणे शेयर आणि फंड द.सा.द.शे १० ने रिटर्न देऊ शकतात ज्यामुळे ओरिजिनल गुंतवलेली रक्कम जवळपास तिप्पट होते.
बाकी ३-५% तरी पैसा सेविंग मध्ये असावा जो इमर्जन्सी साठी आणि नित्य खर्चासाठी केंव्हाही काढता येईल. हल्ली अश्याही स्कीम्स आल्यात म्हणे की सेविंग अकाउंट मध्ये एका विशिष्ठ रकमेच्या वर बॅलन्स गेला की तो पैसा आपोआप कमी कालावधीच्या डेट फंड मध्ये ट्रान्सफर होतो आणि काढायचा असल्यास एका दिवसात मिळतो.
अर्थात हे सगळं प्लांनिंग हे गृहितकच तेही जमेच्या बाजूने विथ हाय रिस्क (आणि म्हणूनच मी पर्सनली मिड-५० च्या आधी रिटायर होण्याच्या विरुद्ध आहे)

>>>हे सगळे खरंतर कॉमन सेन्स ठोकताळेच आहेत. तुम्हाला डिटेल्स जाणून घेण्याची ईच्छा असल्यास.. कंपनी अ‍ॅनालिसिस आणि वॅल्युएशन, ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, क्वांट स्रॅटेजी ईन्वेस्टिंग, फॅक्टर ईन्वेस्टिंग आणि मुख्यत्वे थीमॅटिक ईटीएफ्स, पीई वा हेज फंड्स बद्दल अजून डीटेलमध्ये माहिती सांगू शकेन. काही पुस्तके सुचवू शकेन.>>

ये हुई ना बात!!

[[ हायझेनबर्ग - एक... आणि हायझेनबर्ग हे दोन वेगळे आईडी?? ]]

"म्हणजे समजा ५०-६० या वयात त्यांचे ६ लाखात भागेनासे झाले, ८ लाखांची गरज पडू लागली. तर ते वरचे २ लाख मूळ भांडवलातून मिळवावे लागतील.">>>>>> मूळ भांडवल शक्य असेपर्यंत तसेच ठेवावे असे मला वाटते. विक्रमसिंह यांनी दिलेल्या लिंक मध्ये जी ३ बकेट स्ट्रॅटेजी आहे त्याप्रमाणे उतारवयात शेयर आणि फंड मधील दीर्घकालीन गुंतवणूक अश्या वेळी कामाला येऊ शकेल बहुधा.

Power of Compounding-
वयाच्या २५ व्या वर्षी सुरु केलेली १०००० ची एसआयपी १२% वार्षिक दराने ६० व्या वर्षी ५.५ कोटींचा कॉर्पस देते आणि त्यापुढे महिन्याला ५ लाख जरी काढले तरी ८० व्या वर्षी त्याच दराने (१२%) ती रक्कम १० कोटी पर्यंत वाढलेली असते.
Source:
https://www.youtube.com/watch?v=BQ3od3gps5c

कोहंसोहं प्रत्यक्ष पहाण्यात अशी उदाहरणे आहेत का? या केसेस हायपोथेटीकल असतात किंवा पश्चात विश्लेषण असतात. एखादा अपवाद असू शकतो. मी एका ठिकाणी असाच मित्राकडून फसलो गेलो आहे. हा प्रतिसाद पहा
https://www.misalpav.com/comment/786949#comment-786949

माझा एक सिद्धांत आहे.

जर राहते घर कर्जमुक्त असेल तर मध्यमवर्गीय जोडप्याला कोणत्याही काळात १० ग्राम सोन्याच्या भावात समाधानाने राहता येते.

आजमितीला पुण्यात ३८५०० रुपयात नवरा बायकोला सुखात राहता येईल.
अशीच स्थिती १९९० साली होती जेंव्हा सोन्याचा भाव ३२०० रुपये होता. तेंव्हा पासून आतापर्यंत मी हे पाहत आलो आहे.

यात मुलाबाळांचे शिक्षण लग्न इ गोष्टी गृहीत नाहीत परंतु वर्षात एकदा भारतात केसरी सारख्या संस्थेतर्फे सहल गृहीत आहे.

साधारण २ माणसांचा खाण्यापिण्याचा( यात दारू गृहीत नाही) खर्च १०,००० पर्यंत आहे. अजून १०,००० रुपये घरभाडे विजेचे मोबाईल बिल मोलकरणीचे पगार इ मध्ये जातात. विमा खर्च ५ हजार रुपये महिना( साठ हजार वर्षाला यात आरोग्य विमा सुद्धा येईल) वरील १२-१३ हजार रुपये( दीड लाख रुपये वर्षाला) हॉटेलिंग, सहल, लग्नाचा आहेर कारचे सर्व्हिसिंग इ इ ला लागतील.

दर दहा वर्षांनी नवीन कार घ्यायची असेल तर कदाचित हे पैसे पुरणार नाहीत.
आपली वृत्ती जर नवीन आय फोन आला कि घ्यायचाच अशी असेल तर कितीही पैसे पुरणार नाहीत.

जर आपली संचित ठेव १ कोटी असतील तर येणाऱ्या ३५ वर्षात आपल्याला या जीवनशैलीने जगात येईल. वय वर्षे ८० नंतर मूल बाळ नसेल तरी घर रिव्हर्स मोर्टगेज वर टाकून पुढची १५ वर्षे जगता येईल

बहुसंख्य लोकांना बाजारात असलेल्या समभाग फ्युचर्स आणि ऑप्शन्स समजून घेणे आणि त्यात मध्ये भाग घेणे फार कठीण जाते असा अनुभव आहे आणि ते करण्यासाठी लागणार अभ्यास हा सर्वाना जमतोच असे नाही. आणि तसा सर्वांचा कल असतोच असे नाही.

कोणत्याही गोष्टीत नैपुण्य मिळण्यासाठी त्याचा १०,००० तास अभ्यास लागतो असा एक सिद्धांत आहे. एवढा नव्हेच त्याच्या या एक दशांश सुद्धा अभ्यास करणे किती लोकांना जमेल? तसे जमले असते तर बरेच लोक बऱ्याच भाषा शिकले असते.( याला मानसिक जिद्द आणि कल लागतो तो सामान्य माणसांमध्ये नसतो असा अनुभव आहे.

नोबेल प्राईज पध्दत वापरायची. म्हणजे दरवर्षी रक्कम वाढतच राहते.
त्यासाठी जेवढा खर्च असतो त्याच्या दुप्पट उत्पन्न असले पाहिजे.

समजा दरमहा खर्च ₹२५००० होतो असे गृहितक आहे.
तर त्यानुसार ₹१ कोटीचे एफडी आहे. व्याजदर ६% आहे. म्हणजे ₹५०००० दरमहा व्याज मिळू शकते.
दरमहा खर्च ₹२५००० होणार असेल तर दरमहा ₹२५००० गुंतवत रहावयाचे.

दरवर्षी एफडी कमीतकमी ₹३ लाखाने वाढत राहते. दरमहा उत्पन्न दरवर्षी कमीतकमी ₹१५०० ने वाढत राहते.
अर्थात या ₹१५०० मधले ₹७५० परत गुंतवायचे व ₹७५० च खर्च करायचे.

मला वाटते दरवर्षी ₹७५० ची मासीक उत्पन्न वाढीचा पर्याय महागाई वगैरेवर मात करू शकतो.

आकस्मिक खर्चासाठी ठराविक रक्कम एफडीमधे ठेवावी. ही रक्कम ₹१ कोटीच्या व्यतिरिक्त असावी. त्यावरचे व्याज परत गुंतवत रहावे. आपल्या तब्येतीनुसार ही रक्कम ठरवावी.

एफडी ऐवजी शेअरबाजार चांगला पर्याय आहे. पण हा पर्याय ज्याचा त्याने त्याच्या कुवतीनुसार ठरवायचा आहे.

पण फावल्या वेळेचा उपयोग शेअरबाजार शिकून घेण्यासाठी जरूर करावा. त्यासाठी शिक्षणाबरोबरच कागदावर व्यवहार १-२ वर्षे करत रहावेत.

उत्तम चर्चा.

माझे दोन पैसे.....

मी पण असेच सर्व विचार करून 2016 मध्ये नोकरी सोडली. घरचे बांधकाम चालू असल्याने 6 महिने छान गेले. नंतर रिकामा वेळ खायला उठला. खेळ, घरची कामे, मुलाची शाळा ईतके सर्व असून 3 ते 4 महिन्यात frustrate झालो. आधी जो पगार आणि सोयी मिळायच्या त्याच्या 75% मिळून सुद्धा दुसरा जॉब घेतला.

आणि हे सर्व खात्यात बक्कळ पैसे असताना.

नोकरी सोडताना खरेच खूप विचार करावा. दिवसाचे 24 तास आणि आयुष्यतली पुढची तीस ते चाळीस वर्षे काय करणार आहात, कशाला वाहून घेणार आहात हे मनाशी पक्के करूनच जॉब सोडावा.

ऐसीच्या खरडफळ्यावरील ह्त्ती' यांचे स्वानुभवाचे बोल त्यांच्या परवानगीने इथे पेस्टवत आहे ->> मला ह्यांचे प्रतिसाद खूप आवडले.
कोसों च्या मित्राने हत्ती ह्यांचे हे अनुभव जरूर वाचावेत.

Technical analysis वाईट नाही पण त्याला एक सॉलिड असा academic base नसल्याने allopathy चे practitioners जसे आयुर्वेद किंवा होमिओपॅथी प्रती भावना ठेवतात तसेच fundamental analysis करणारे technical analysis बद्दल ठेवतात.
आम्हा Quant लोकांचे गाडे आमच्या मॉडेल्स ना academic references चे, ते सुद्धा डझनावारी नैवेद्य दाखवल्याशिवाय इंचभर देखील पुढे सरकत नाही.

१ कोटीचे चार भाग करून २५ लाख एकेका बँकेत लॉन्ग टर्म एफडी केले. आणि त्याचे व्याज दर तिमाहीला एका वेगळ्याच अकाउंटमधे टाकायला सांगितले. आणि त्या अकाउंटमधून रोजचा नियमित खर्च भागवला.>> हो करता येईल पण जर तुम्ही हर तिमाहीत व्याज घेऊ लागला तर मग तुम्हाला निम्मा व्याजदर सुद्धा मिळणार नाही. 3% मिळाला तर 3 लाखात वर्षाचा खर्च भागणार आहे का?

जर दोघांच्या मृत्यूवेळे पर्यंत बहुतांश पैसे वापरून संपवण्याची मनिषा असेल, मागे काही इस्टेट कुणासाठी ठेवण्याचा प्लॅन नसेल तर reverse mortgage किंवा home equity loan चांगला ऑप्शन आहे.

किंवा 68-70 नंतर annuity चालू होईल अशी तजवीज करण्यासाठी आजपासूनच काही पैसे अशा life annuity product मध्ये टाकू शकता. जी एकदा का हप्ते संपले की मृत्यू येईपर्यंत मग तो यायला 10 वर्षे लागो नाही तर 50 वर्षे monthly पेमेंट करत राहतील. जोडीदाराला गुंतवणुकीच्या डोकेदुखीतून वाचवायचे असेल तर पेंशन टाईप्स पेमेंट करणारी अशी पॉलिसी नक्कीच चांगली ठरेल. पण ईन्श्युरन्स देणारी कंपनी पुढचे ४०-५० वर्षे टिकेल का ह्याचा थोडा अभ्यास कंपनीच्या हिस्ट्री वरून करावा लागेल.
शक्यतो endowment insurance टाळा असे म्हणेन कारण मॅचुरिटीला जी लंपसम अमाऊंट मिळेल ती कुठे गुंतवायची हा नवीन प्रश्न वृद्धापकाळी ऊभा राहिल. ही अमाऊंट जर नेमकी डाऊन मार्केट असतांना मिळाली तर अजून अवघड होऊन बसेल.

पण एक लक्षात ठेवा सगळे insurance products किंवा बॅंकेने ठेवीवर व्याज देणे सगळे आतून जागतिक स्टॉक मार्केट बरोबरच संबंधित असते. बँक्स किंवा insurance companies तुम्हाला तेव्हाच काही फिक्स्ड रिटर्न्स देतात जेव्हा तुम्हाला promise केल्यापेक्षा जास्त रिटर्न्स ते त्यांच्या risk weighted assets वर मिळविण्याचा विश्वास बाळगून असतात. बँकांची विश्वासार्हता शेवटी त्यांनी त्यांचे assets कुठे गुंतवलेले आहेत त्यावर अवलंबून आहे. मोदी, मल्या किंवा इराण, आफ्रिकेत रिस्क व्यवस्थित assess न केलेले प्रोजेक्ट, रेटिंग agency च्या फसव्या कारभाराला भुलून subprime बॉन्ड्स सारखे complicated products घेणे अशा shady investments बॅंकेने केलेल्या असतील तर त्याचा निगेटिव परिणाम तुम्हाला तुमच्या ठेवीवर मिळणार्‍या व्याजासह तुमच्या liquidity वर सुद्धा होऊ शकेल.
अर्थात आपण बंअ‍ॅकेच्या अंअतर्गत व्यवहारांबद्दल काहीच करू शकत नसल्याने ते टाळण्यासाठी काही उपाय आपल्याकडे नाहीत, आपले deposits १००% insured आहेत ना वगैरे आपण बघू शकतो. ह्या सगळ्याबद्दल करता येण्यासारखे ऊपाय नसले तरी जागरूक असणे महत्वाचे.

> हो करता येईल पण जर तुम्ही तिमाहीत व्याज घेऊ लागला तर मग तुम्हाला निम्मा व्याजदर सुद्धा मिळणार नाही. 3% मिळाला तर 3 लाखात वर्षाचा खर्च भागणार आहे का? > व्याजदरात फरक नाही पडत ना? तोच राहतो. फक्त चक्रवाढचा फायदा मिळणार नाही.
https://www.icicibank.com/calculator/fd-calculator.page

गुंतवणूक धोकादायक होत चालली आहे आणि अगोदर शेअर मार्केटचे टक्केटोणपे न खाल्लेला कसा काय तो जुगार खेळणार अचानक?

आपले deposits १००% insured आहेत ना वगैरे आपण बघू शकतो. >>
Only up to Rs 1 lakh are insured under the Deposit Insurance & Credit Guarantee Scheme of India.
म्हणजे आपली एक करोडची एफडी बुडाली तर फक्त १ लाख मिळतील.

मुळात it मध्ये 20 वर्षे, onsite, नामांकित कंपनीत मोठया हुद्द्यावर काम करून 25 लाखच शिल्लक?
हे गणित काही पटत नाही

या वर्णनात बसणारी आमची मित्रमंडळी याच्या 10 पट कॉर्पस बाळगून आहेत.

दुसरे असे, 20 25000 खर्च खूप कमी आहे. यामध्ये वार्षिक खर्च धरलेले आहेत का, जसे की मिळकतकर, policy premium, दिवाळी खरेदी, घरातील वस्तू जसे की tv washing machine जुन्या झाल्यावर नवीन घ्याव्या लागणे, 5 7 वर्षानी घर रंगवणे, घराचे किरकोळ काम निघणे and so on

शिवाय medical खर्च लागलाच दुर्दैवाने, तर तो.
हल्ली हॉस्पिटल ची बिले भयानक असतात. Policy पुरेशी पडत नाही.

धागालेखकाने पंधरा दिवसांनी सर्व प्रतिसादांचा आढावा घेऊन संपवावा. १ एप्रल २०२० ला पुन्हा नवीन काढावा. कारण आर्थिक उलथापालथ सतत बदलत असते.

"Only up to Rs 1 lakh are insured under the Deposit Insurance & Credit Guarantee Scheme of India.
म्हणजे आपली एक करोडची एफडी बुडाली तर फक्त १ लाख मिळतील." ------ माझ्या मते १ लाख इन्शुरन्स हा प्रत्येक एफडी वर असावा. उदा. मी २ लाखाच्या ५ एफडी केल्या आणि सगळ्या बुडाल्या तरी मला ५ एफडी वरील ५ लाख मिळू शकतात. बरोबर ना?

मोठ्या रकमेची एफडी शक्यतो nationalized बँकेत करावी जरी रिटर्न कमी मिळत असला तरी...निदान पैसे सुरक्षित राहण्याची हमी बरीच जास्त असते. हल्ली काहीच सांगता येत नाही. तसेच एक मोठ्या रकमेची करण्याऐवजी छोट्या छोट्या रकमेच्या तेही जमल्यास १-२ वेगवेगळ्या मुदतीच्या कराव्यात. अगदीच गरज लागल्यास सगळ्या मोडाव्या लागत नाहीत आणि व्याजाचे नुकसान कमी होते.
प्रायव्हेट बँकेत एफडी करायची असेल तर शक्यतो मोठ्या बँकेत जश्या की HDFC, ICICI, Kotak, Karnatak Bank, CITI bank, IndusInd, AXIS इत्यादी बँकेत त्याही २-३ वर्ष मुदतीच्या कराव्यात आणि वेळोवेळी quarterly results मधून बँकेच्या परफॉर्मन्स वर लक्ष ठेवावे. सहकारी बँकेच्या भानगडीत पडूच नये असे मला वाटते.
टॅक्स बेनिफिट हवा असेल तर डेट फंड उत्तम.
दुर्दैवाने नुकसान झाल्यास त्यातल्या त्यात कमी होईल

मुळात it मध्ये 20 वर्षे, onsite, नामांकित कंपनीत मोठया हुद्द्यावर काम करून 25 लाखच शिल्लक? हे गणित काही पटत नाही ---->> अहो घर झाले ना त्याचे लोन फ्री. २५ लाख शिल्लक नाहीत ते शेयर मध्ये आहेत. बाकीपण सेव्ह केलेच असणार कुठे आहेत ते मला नाही माहिती.

दुसरे असे, 20 25000 खर्च खूप कमी आहे. ----- मी अजूनतरी हे त्याला विचारले नाही की २५ मध्ये काय काय धरले आहे. ते सर्व व्यवस्थितपणे धरले असावे असा अंदाज.

माझ्या मते १ लाख इन्शुरन्स हा प्रत्येक एफडी वर असावा. उदा. मी २ लाखाच्या ५ एफडी केल्या आणि सगळ्या बुडाल्या तरी मला ५ एफडी वरील ५ लाख मिळू शकतात. बरोबर ना? >>>
प्रति व्यक्ती, प्रति बँक (त्याच बँकेच्या प्रति शाखा नव्हे) १ लाख रुपये.
थोडक्यात तुमचे १ करोडचे सगळे एफडीज एकाच बँकेतील १०० वेगळ्या शाखेत असतील आणि ती बँक बुडाली तर इन्शुरन्स असेल फक्त एक लाखाचे.
आणि हे इन्शुरन्स फक्त बँक एफडी साठी. एनबीएफसी इन्स्टिट्यूट / कंपनी एफडी करता नाही.

सहकारी बँकेच्या भानगडीत पडूच नये असे मला वाटते.
>> सहमत.

टॅक्स बेनिफिट हवा असेल तर डेट फंड उत्तम.
>> माझ्या माहिती नुसार डेट फ़ंडवर LTCG २०% आहे. इक्विटीवर १०%. आणि एफडी वर आपल्या टॅक्स ब्रॅकेट प्रमाणे - STCG प्रमाणेच.

म्हणजे एफडीच्या तुलनेत, जर तुम्ही डेट फ़ंड मध्ये किमान तीन वर्षे गुंतवणार आहात आणि मिळणारा कर एवढा आहे की तो एफडीतून मिळाला असता तर २०% पेक्षा अधिक ब्रॅकेट मध्ये गेला असता तर ते फायद्याचे ठरेल.

थोडक्यात तुमचे १ करोडचे सगळे एफडीज एकाच बँकेतील १०० वेगळ्या शाखेत असतील आणि ती बँक बुडाली तर इन्शुरन्स असेल फक्त एक लाखाचे.
आणि हे इन्शुरन्स फक्त बँक एफडी साठी. एनबीएफसी इन्स्टिट्यूट / कंपनी एफडी करता नाही.>> बरोबर.
आणि १ लाखाची ईंशुअर्ड अमाऊंट मिळणार असली तरी ती मिळवण्यासाठी अनेक महिने लागू शकतात.

"माझ्या माहिती नुसार डेट फ़ंडवर LTCG २०% आहे. इक्विटीवर १०%. आणि एफडी वर आपल्या टॅक्स ब्रॅकेट प्रमाणे - STCG प्रमाणेच.
म्हणजे एफडीच्या तुलनेत, जर तुम्ही डेट फ़ंड मध्ये किमान तीन वर्षे गुंतवणार आहात आणि मिळणारा कर एवढा आहे की तो एफडीतून मिळाला असता तर २०% पेक्षा अधिक ब्रॅकेट मध्ये गेला असता तर ते फायद्याचे ठरेल" >>>>>>>>
डेट फ़ंड मध्ये किमान तीन वर्षे गुंतवणूक लागेल हे बरोबर परंतु टॅक्ससाठी मिळालेला नफा indexation प्रमाणे असेल ना की एफडी प्रमाणे सरळसोट. Indexation मुळे नफा कमी दिसतो आणि कर सुद्धा कमी लागतो हा मोठा फरक आहे त्यामुळे २०% ब्रॅकेट मध्ये असले तरी फायदाच होतो बहुतेक.
चुकले असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.

आणि एफडी वर आपल्या टॅक्स ब्रॅकेट प्रमाणे - STCG प्रमाणेच.>>
हे नाही कळले.
STCG 15% असतो ना? टॅक्सब्रॅकेट कोणतीही असली तरी.

Indexation मुळे नफा कमी दिसतो आणि कर सुद्धा कमी लागतो हा मोठा फरक आहे त्यामुळे २०% ब्रॅकेट मध्ये असले तरी फायदाच होतो बहुतेक. >>
बरोबर कोहंसोहं. मी इंडेक्सेशन विसरलो. ३ पेक्षा जेवढी जास्त वर्षे तेवढा इंडेक्सेशन मुळे जास्त फायदा होईल.

STCG 15% असतो ना? टॅक्सब्रॅकेट कोणतीही असली तरी. >>
भागवत सर, हे इक्विटी साठी, डेट साठी नाही. डेट साठी टॅक्स ब्रॅकेट प्रमाणे.

जॉब मध्ये स्ट्रेस आहे म्हणून तो सोडून ओप्शन्स मध्ये रिटायरमेंट इनकम ठेवायला ते मिपावरचे सदस्य सांगताहेत! Rofl चालू द्या!

'जॉब मध्ये स्ट्रेस आहे म्हणून तो सोडून'---->> हल्ली भारतात IT मध्ये वरच्या हुद्द्यांवर असलेल्यांवर बेरोजगारीची तलवार लटकते आहे असे ऐकले. आधी IT मध्ये फक्त कामाचा ताण असायचा...जॉब बऱ्यापैकी सुरक्षित असायचे. परंतु आता त्यात बेरोजगारीची चिंता पण भर घालत आहे. २०-२२ वर्षे IT मध्ये काम करून लोक कसे कंटाळत नाहीत काय माहित...किंवा कंटाळत पण असतील पण अरे संसार संसार म्हणत तसेच चालू ठेवत असणार.
(३-४ वर्षातच भारतीय IT च्या कचाट्यातून बाहेर पडलेला सुदैवी मी)
माझ्यामते जॉब सोडून ऑपशन्स आणि फ्युचर्स मध्ये तेच खेळू शकतात ज्यांना याचा दीर्घ अनुभव आणि ज्ञान आहे आणि आत्तापर्यंत बऱ्यापैकी फायदाही झालेला आहे. नाहीतर जॉब मधला स्ट्रेस बरा होता असे म्हणायची वेळ येईल Lol

जॉब मध्ये स्ट्रेस आहे म्हणून तो सोडून ओप्शन्स मध्ये रिटायरमेंट इनकम ठेवायला ते मिपावरचे सदस्य सांगताहेत! Rofl चालू द्या! >>अरे! हीच तर खरी फॉली आहे... लहान पोर्टफोलिओ वर अर्ली रिटायरमेंट घेण्याची.
तुमच्या ९०-९५% अ‍ॅसेट्स वर तुम्ही फार रिस्क घेऊ शकत नाहीत आणि ते नेहमीच लाँग टर्म साठी ईन्वेस्टेड असतात. मग कॅपिटल ग्रोथ कशी होणार? पुन्हा ऊरलेले ५-१०% (पैशांमध्ये ५-१० लाख) एवढे कमी आहेत की नशिबाने पर्फॉर्मिंग ग्रोथ स्टॉक्स सापडले तरी ओअवरऑल प्रॉफिट फार तकलादू असणार आणि ग्रोथ स्टोरी मटेरिअलाईझ व्हायला वेळ लागेल तो वेगळा. त्यासाठी ईकॉनॉमिक ईन्वायर्नमेंट फेवरेबल असेल नसेल.

त्यामुळेच ऑप्शन्स आणि ईतर डेरिवेटिव्ज शिवाय खरेच काही पर्याय ऊरत नाही. मान्य आहे ही स्ट्रॅटेजी counter intuitive आहे पण रिटायरमेंटच्या अर्ली डेज मध्ये (ज्यावेळी वय कमी आहे, जॉब स्कील्स अजूनही कंपॅरेटिवली रिलेवंट आहेत) कॅपिटल बेस वाढवण्यासाठी रिस्क घ्यावीच लागेल. रिस्क स्मार्टली मॅनेज केल्यास आणि होल्डिंग पिरिअड तासापेक्षाही कमी ठेवल्यास ऑप्शन ट्रेडिंग एका ट्रान्झॅक्शनमध्ये लहान लहान असे (१०००-२००० रुपये) अनेक रिटर्न बट्स चटकन देऊ शकते.
रिटायरमेंट म्हणजे मी अगदी पहिल्या दिवसापासून फक्त छंदच जोपासणार आणि काळजी देणारे, स्ट्रेस देणारे ईतर कुठलेच काम करणार नाही (including money management) अशी भीष्मप्रतिज्ञा नसावी अशी अपेक्षा आहे. रिटायरमेंट मध्ये देखील me-time अर्न करावा लागेल तो ही चढत्या आलेखाने... धीमे धीमे.

'त्यामुळेच ऑप्शन्स आणि ईतर डेरिवेटिव्ज शिवाय खरेच काही पर्याय ऊरत नाही'------>> जर तशी गरज पडलीच तर जॉब सोडण्याआधी खरंच ह्या गोष्टी जमतात का पाहून घ्यावे आणि मग ठरवावे. वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे सर्वांना यात गती नसते. मी भारतात असताना डे ट्रेड आणि ऑप्शन्स ट्राय केले होते.. मला लवकरच समजले की त्यात इंटरेस्ट असला तरी गती नाही...त्यामुळे सोडून दिले....नंतर काही वर्षे मार्केट पासून दूर होतो.....काही वर्षांपूर्वी मुलीच्या शिक्षणासाठी एसआयपी सुरु केलीये बायकोच्या नावावर... १५-२० वर्षे ठेवायचा प्लॅन आहे....बघुयात कसे जमते.

Pages