"त्यांना म्हणावं बाकी काहीही चालेल, पण यात साके मात्र ठेऊ नका" माझ्या नवीन बॉसने मला सांगायला सांगितलं.मी तसं सांगितल्यावर योशिदा उमजून हसले...नेहेमीप्रमाणे एक सोनेरी दात आत लुकलुकला.
शेवटच्या दिवशी 'फेअरवेल' समारंभात योशिदा या जपानी सदगृहस्थाला आम्ही म्हणजे आमच्या देशी डिपार्टमेंटने आपल्या सत्यनारायणाच्या किंवा तत्सम पूजेत ठेवला जाणारा एक नक्षीदार चांदीचा कलश भेट म्हणून दिला होता. त्याचा 'सदुपयोग' व्हावा एव्हढ्याच कळकळीच्या इच्छेने माझ्या नवीन बॉसने त्याचा उपयोग योशिदांनी 'कसा' करु नये यावर तेव्ह्ढ्यात एक टिप्पणी मला त्यांच्यापर्यंत पोचवायला सांगितली होती. मी तो हुकुम पाळलाही.
नेहेमीप्रमाणे पाठोपाठ कॅंटिनमधल्या सामोश्यांचं ताट आणि बर्फीचा बॉक्स सर्वांमध्ये फिरला. आतापर्यंत भारतीय खाद्यपदार्थांना अत्यंत विनम्र नकार देणार्या योशिदांनी यावेळेस मात्र एक बर्फीचा छोटा तुकडा स्वीकारल्याचं मी पाहिलंच. माझ्या चेहेर्यावरचं आश्चर्य पाहून हसून त्यांनी औपचारिकपणे का होईना पण ती बर्फी स्वादिष्ट असल्याचं सांगितलं.
आजची त्यांची एकेक कृती कुठेतरी सांगून जात होती...हे सगळं आज शेवटचं आहे. उद्यापासून मी नसेन इथे.
म्हणजे? सकाळी आल्या आल्या जपानीत गुड मॉर्निंग मी कुणाला करू आता? आमच्या ऐसपैस डिपार्टमेंटच्या खिडकीजवळच्या कोपर्यातलं 'एल' आकाराचं टेबल आणि खुर्ची रिकामी असणारे आता उद्यापासून? ठीक नऊच्या ठोक्याला दररोज चालू हो्णार्या आणि उभ्याउभ्याच चालणार्या 'मॉर्निंग मिटिंगमध्ये' मी आज काय काम करणार आहे हे ऐकायला आता जपानी कान नसतील? सकाळी सकाळी पार पाडण्याचं '५ एस' नावाचं टापटीप-व्यवस्थितपणा अंगात मुरवणारं जपानी आन्हिक आता जपानी बारीक नजरेच्या अभावामुळे केवळ 'उरकून' टाकलं जाईल का?
'फेअरवेल' समारंभाच्या आड लपलेले एकेक प्रश्न आता माझ्या मनात हळूहळू भिनायला लागले...तसंतसं जाणवू लागलं...कुठेतरी खूप वाईट वाटतंय...हा ऋणानुबंध इथे संपल्याचं वाईट वाटतंय. आज यांचा इथला शेवटचा दिवस. आज रात्रीच ते जपानला परत जातील. उद्यापासून त्यांची उणीव भारी जाणवेल...
खरं तर बॉस हा नोकरदार मंडळींच्या आयुष्यातला एक अविभाज्य आणि न टाळता येण्यासारखा घटक. हा घटक बहुतेक वेळेस 'नकोनकोसा'च असतो...शनिवार-रविवार मस्त मजेत घालवल्यावर सोमवारी सकाळी ऑफिसात गेल्यावर अचानक 'आज बॉस येणार नाहीये' ही सुवार्ता अनपेक्षितपणे कानावर पडली तर ती सकाळ अगदी शुक्रवार संध्याकाळ किंवा रविवार सकाळपेक्षा अधिक रमणीय का नाही वाटणार! वातावरण कसं आपसूकच सैल होतं.....:)
असो. तर या बॉस नामक घटकाशी सर्वांप्रमाणे माझीसुद्धा गाठ पडली...पण शेवटी ती सोडवताना भारी वाईट वाटलं....कारण ती व्यक्तिच तशी होती.माझ्यासाठी त्या व्यक्तीने 'बॉस' ही दोन अक्षरं कधीच ओलांडली होती..ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते नव्हे, अजून आहेत.
मी अर्थशास्त्राची द्विपदवीधर (चुकुन!) झाले खरी पण जीव रमला होता जपानी भाषेत. जपानी 'येत' असल्याचा पुरावा दाखवणारे दोन कागदही गाठीशी जमले होते तोपर्यंत. तर अचानक कळलं की एका मोठ्ठ्या जपानी कंपनीत जपानी जाणणारी व्यक्ति पाहिजे. कंपनीचं नाव आणि पत्त्याव्यतिरिक्त फारसं काहिही ठाऊक नसताना सरळ तिकडे अर्ज ठोकून दिला. (आता आठवलं की हसू येतं..पण तेव्हाचा माझा अर्ज हा अत्यंत बाळबोध स्टाईलचा, हाताने लिहिलेला होता आणि वर बायो-डाटा असं मोठ्ठ्याने लिहिलेलं होतं! आताच्या लेसर प्रिंट केलेल्या, प्रचलित फॉर्मॅटमध्ये लिहिलेल्या, 'प्रोफेशनल सीव्ही'च्या पुढे तो म्हणजे एखाद्या आधुनिक तरुणीपुढे एखादं गावरान ध्यान जणू! :))) असो. विषयांतर झालं!) तर म्हटलं बघूया निदान बोलावणं तरी येतंय का. गंमत म्हणजे त्यांचा फोन आला मुलाखतीसाठी. आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू असल्याने आनंद आणि भिती या संमिश्र भावनांनी सरळ ठरवलं जाऊन तर येउ....फार फार तर काय होईल.. निरोपाचा नारळ मिळेल...पण मुलाखत म्हणजे काय करतात ते तर कळेल..न जाणो पुढे किती ठिकाणी मुलाखती देत फिरावं लागणार आहे...जरा सवय तरी होईल.
तोपर्यंत इकडे तिकडे चौकशी केल्यावर कळलं की ती एक जपानी बहुराष्ट्रीय इंजिनियरींग कंपनी आहे..भारतात त्यानी हल्लीच काही वर्षांपूर्वी प्लांट टाकलाय आणि ही कंपनी कसलीतरी मशिन्स बनवते. एवढी माहिती कळेस्तोवर मुलाखतीचा दिवस उजाडलाही. ठरलेल्या वेळेच्या आधीच पोचले. मी एकटीच होते तिथे. अजून कोणी उमेदवार आलेला दिसत नव्हता. बाहेर लॉबीत बसून आत कधी बोलावतायत याची वाट पहात असतानाच दोन-तीन जपानी इकडून तिकडे गेले. थोड्यावेळाने अजून एक तिसराही दिसला (की एकच जपानी तीन वेळा तिकडून गेला होता की काय कुणास ठाऊक) आणि लक्षात आलं की हे सर्व सारखेच दिसतायत आणि चेहेर्यांप्रमाणेच त्यांचा पोशाखही सारखा आहे...ओह म्हणजे इथे युनिफोर्म आहे तर....अच्छा....बसल्याबसल्या माझं विचारचक्रं चालू झालं. इथे जपानी लोक किती आहेत कुणास ठाऊक....बरेच दिसतायत...म्हणजे....माझी मुलाखतही जपानी माणूसच घेणार वाटतं.....हं...बापरे...जपानी बोलता येतं तसं मला पण आतापर्यंत क्लासमध्ये सरांबरोबर किंवा इतर मैत्रिणींशी जपानी फाडलंय तेव्हढंच...खर्याखुर्या असली जपान्याशी कुठे बोललोय आपण कधी!.....समजा त्यांचे उच्चार मला कळलेच नाहीत तर....बोललेलं कळलंच नाही तर मी काय उत्तरं देणार!....अरे देवा काय होणार आहे कुणास ठाऊक....देवा....वाचव..
आता पाय थरथरायला लागले. तोंडातून शब्द फुटेल की नाही ही नवीन चिंता भेडसावू लागली. आधीच नाही म्हटलं तरी ते चकचकीत वातावरण अंगावर आलंच होतं. तेव्ह्ढ्यात रिसेप्शनिस्टने सांगितलं जा आत डावीकडील पहिली ट्रेनिंग रुम. धडधडत्या हृदयाने उठले. तो काचेचा जड दरवाजा लोटून आत गेले. डावीकडे पाहिलं..त्या ट्रेनिंग रुममधे त्या ऐसपैस टेबलवरचे कागद (माझा अर्ज) चाळणारा एकच जपानी दिसला. मी मग जपानीत अभिवादन केलं तसं त्या माणसानेही केलं. त्याचा उच्चार स्पष्ट होता..मला अगदी व्यवस्थित कळलं. टेन्शन एका टक्क्याने जरा कमी झालं.
'मी योशिदा.' त्या माणसाने त्याचं नाव सांगितलं. पाच फुटाच्या आसपास उंची, किंचीत पिकलेले केस, सोनेरी काडीचा चष्मा, लुकलुकणारे जपानी डोळे आणि चेहेर्यावर शांत भाव. मला थोडं हायसं वाटलं. माझी योशिदांशी झालेली ही पहिली भेट.
मग काय करतेस वगैरे बेसिक माहिती ते विचारु लागले. त्यांचे उच्चार सुस्पष्ट असल्याने मला समजण्यात काहीही अडचण आली नाही त्यामुळे संधीचा फायदा घेऊन जेव्ह्ढं येत होतं तेव्ह्ढं जपानी त्याच्यासमोर मनसोक्त फाडलं. इंप्रेशन पाडायला सोबत माझ्या जपानी लिपी गिरवलेल्या हस्ताक्षराच्या वह्या नेल्या होत्या...त्याही दाखवल्या. सुदैवाने माझं अक्षर (तेव्हा) चांगलं असल्याने ते त्यांना आवडलं आणि जपानी लिपीचा असाही सराव भारतात केला जातो हे पाहून त्यांना आनंद झाला. (माझा वह्या नेण्याचा हेतू सफल झाला. :)तेवढ्यात रुमचं दार लोटून एक चष्मा लावलेला उंच जपानी आत आला. त्यानेही त्याची ओळख करुन दिली 'मी या कंपनीचा डायरेक्टर'. त्याच्या हातात एक जपानीतला ईमेल होता. योशिदा म्हणाले, हा इमेल ट्रान्सलेट करुन देऊ शकशील का? पाहिलं तर टेक्निकल भाषेतला तो काही मजकूर होता..देवाचा धावा करत ते दिलं जमेल तसं ट्रान्सलेट करुन.
मुलाखत तिथेच आटोपली. मी नंतर कळवतो असं आश्वासन योशिदांनी दिलं. त्यांचे आभार मानून, नेलेला पसारा उचलून मी रुमच्या बाहेर आले. आता रिझल्ट काहीही लागो, आपल्याला जपानी माणसांशी जपानीत व्यवस्थित बोलता येतं हा आत्मविश्वास मात्र निर्माण झाला होता.मी केलेलं भाषांतर त्यांना रुचलं असावं कारण लगेचच काही दिवसांनी तिथून फोन आला. ऑफर लेटर आणि इतर डिस्कशनसाठी या. म्हटलं चला नोकरी तर मिळाली. आयुष्यातली पहिलीच.
पहिली नोकरी! त्यामुळे अप्रूपाची!! पॉकेटमनी पर्व संपलं आता...आता माझी स्वकमाई चालू होणार....कुठेतरी मनाला सुखद गुदगुल्या झाल्या.५ तारखेला पहिला दिवस होता. जपानी वक्तशीरपणा, शिस्त वगैरे लक्षात घेऊन चांगली अर्धा तास आधीच जाऊन पोचले. सकाळचा बहुतेक वेळ एच आरचे फॉर्म्स भरण्यात गेला. मग रिसेप्शनीस्टने मला माझ्या भावी डिपार्टमेंटमध्ये नेलं. योशिदांच्या पुढ्यात मला उभं करुन ती निघून गेली.
मी त्यांना जपानीत अभिवादन केलं. तसं त्यांनी त्यांच्या टेबलाच्या जवळ असणार्या एका क्यूबिकलमधली रिकामी जागा माझ्यासाठी असल्याचं सांगितलं आणि लागलीच एक तोशिबाचा लॅपटॉप आणून ठेवला. कामाचं स्वरुप वगैरे जेवणानंतर मला सांगणार होते. तेव्ह्ढ्यात बेल झाली. लंच टाईम!ही कंपनी एक टिपिकल 'फॅक्टरी' असल्याने इथे शाळेसारख्या बेल्स व्ह्यायच्या. तीन शिफ्ट्स, चहाकॉफी, लंचच्या वेळा वगैरे अधोरेखित करायला त्या होत असत. जोडीला युनिफॉर्मही होताच. एका शिक्षकाची कमी होती तीही योशिदांच्या रुपाने पूर्ण झाली होती.
पहिलीच नोकरी असल्याने कामाचा पूर्वानुभव नसण्याव्यतिरिक्त एखाद्या फ्रेशरमध्ये आढळणारा नवखेपणा, बुजरेपणा माझ्यात ठासून भरलेला होताच. त्यातच पुढ्यात लॅपटॉप ठेवून योशिदांनी माझ्या टेन्शनमध्ये भर घातली होती. मी कधीही लॅपटॉप त्यापूर्वी पाहिला नव्हता. नाही म्हणायला घरी कॉम्प्युटरचे नुकतेच आगमन झाले असल्याने इंटरनेटबद्दल थोडी ज्ञानप्राप्ती झाली होती पण ती तेव्हढीच. लॅपटॉप एव्ह्ढ्या जवळून प्रथमच पहात होते. घाबरत घाबरत तो ऑन केला. आणि जपानीतून ऑपरेटिंग सिस्टिम अवतीर्ण झाली. 'स्टार्ट' च्या जागी जपानीतलं 'सुताssतो' बघून आवंढा गिळला. हा जपानी लॅपटॉप कसा काय आपल्याला वापरायला जमणारे या विचाराने जीव घाबरा झाला. माझी उडालेली घाबरगुंडी जपानी नजरेतून सुटली नव्हतीच. त्यांनी हसून मला मिटिंगरुम मध्ये बोलावलं आणि पहिलंच वाक्य म्हणाले, "टेन्शन अजिबात घेऊ नकोस". इतकं हायसं वाटलं त्या उद्गारांनी!
त्यानंतर त्यांनी माझ्या कामाविषयी मला आढावा दिला. माझी कामं नीट समजाऊन दिली. मुख्य जबाबदारी जपानमधले हेडऑफिस आणि ही कंपनी यातलं आमच्या डिपार्टमेंटचं कम्युनिकेशन सांभाळणे ही होती. साहजिकच तो संपर्क जपानी-इंग्लिश या दोन्ही भाषांमधू्न चालवायचा होता. पहिले काही दिवस योशिदांच्यासोबत बसून त्यांची सर्व कामे बघून ठेवायची असं ठरलं.
माझं ट्रेनिंग चालू झालं. पहिल्या फटक्यात त्यांच्या कामाच्या पद्धतीमधलं एक वैशिष्ट्य चटकन नजरेस पडलं. व्यवस्थितपणा! टेबलवर कुठेही कागदांची भेंडोळी पडल्येत, अनावश्यक पोस्ट-इट्स सर्वत्र चिकटल्यात, फाईलींमधून कागद बाहेर डोकावतायत, पेनपेन्सिली, मार्कर्स विखुरलेत असं चित्र कदापि दिसलं नाही. उत्तम क्वालिटीच्या जपानी फाईल्समध्ये कागद व्यवस्थित ठेवून वर त्या त्या संदर्भाचा जपानीत स्टिकर चिकटवलेला. मोठाली इंजिनियरींग ड्रॉईंग्ज व्यवस्थित घडी घालून फाईल केलेली. हाच प्रकार त्यांच्या लॅपटॉपमध्येही, 'माय डॉक्युमेंट्स'मध्ये विविध फोल्डर्स इतके व्यवस्थित नावं घालून तयार केलेले असत की एखादी फाईल कुठे सेव्ह केली आहे या शोधाशोधीत कधीही वेळ गेला नाही. त्या विषयाच्या फोल्डरमध्ये असणारच ती फाईल. वेगवेगळ्या फाईल्स चटकन डेस्कटॉपवरच सेव्ह करुन तो चित्रावून ठेवण्याची माझी सवय त्यामुळे चांगली मोडीत निघाली.
जपान आपल्या तीन-साडेतीन तास पुढे असल्याने त्यांनी सकाळी त्यांचा आऊटलूक मेलबॉक्स उघडला की त्यात जपानहून ढिगाने आलेले इमेल्स दिसायचे. ते सिनियर ऍडवायजर असल्याने ते सहाजिकच होतं. विषयानुसार त्यांची विभागणी करुन, अतिमहत्त्वाच्या इमेल्सवर ते त्वरीत काम चालू करत. त्यांच्या समवेत काम करताना 'आत्ता नको, नंतर बघू', 'उद्या केलं तरी चालेल' असल्या विचारांना काडीचाही थारा नसायचा.
जसजसे दिवस जात राहिले, तसतसा हळूहळू भारतीय आणि जपानी कामाची पद्धत आणि त्याहीपेक्षा विचारसरणीतच तफावत असल्याचं लक्षात येऊ लागलं. प्रामुख्याने या बाबी दुभाषी म्हणून काम करताना फार जाणवत. शॉपफ्लोअरवर मशिनच्या बाजूला उभं राहून योशिदा आणि भारतीय इंजिनियर किंवा टेक्निशियनसमवेत दुभाष्याची भूमिका बजावताना हे लक्षात येई. उदाहरणार्थ अमुक एका पार्टला पॉलिशींग करायचं आहे, तर त्या प्रोसेस संबधित सर्व माहिती म्हणजे कुठल्या प्रकारची, क्वालिटीची आयुधं, केमिकल्स वापरायची इथपासून पॉलिशिंगची पद्धत अगदी आकृत्यांसकट स्टेप बाय स्टेप वर्णन केलेली जपानी मॅन्युअल्स असत त्यानुसार'च' पॉलिशिंग केलं पाहिजे हा जपानी अट्टाहास आणि 'एखाददुसरी स्टेप नाही झाली, दुसर्या प्रकाराने पॉलिशिंग केलं तरी कुठे बिघडलं, काय फरक पडतो..' ही भारतीय विचारसरणी यात अनेकदा खटके उडालेले अनुभवले आहेत. या 'काय फरक पडतो' या वृत्तीचा असलेला अभाव हेच जपान्यांच्या यशामागच्या कारणांमधलं एक कारण असावं हे मत ठाम होऊ लागलं.
जपानी कामाची पद्धत हळूहळू ओळखीची होत असताना ती अधिकाअधिक मनावर बिंबली जाण्यामागे योशिदांनी मला त्याविषयी दिलेलं ज्ञान हे एक प्रमुख कारण होतं. 'अमुक एक पद्धत इथे आहे म्हणून ती तू पाळली पाहिजेस' असा कोरडा हुकुम देण्यापेक्षा ती पद्धत का आहे, त्याचं महत्त्व काय हे समजावणंही त्यांना गरजेचं वाटलं हे माझं भाग्य! सकाळी सकाळी कॉम्प्युटरही चालू करण्याआधी ठीक नऊच्या ठोक्याला सर्वांनी डिपार्टमेंटच्या मध्यभागी एकत्र जमून, उभ्याउभ्याच का होईना पण 'आज तुम्ही कोणतं काम करणार आहात' हे त्रोटक सांगितलं तरी चालेल पण ते सांगण्यासाठी केली जाणारी 'मॉर्निंग मिटिंग' हे शिक्षण त्यापैकीच एक. यामुळे सगळ्यांनाच एकंदरीत सर्वांची काय कामे आहेत याचा ढोबळ अंदाज येतो आणि मग त्या दिवसातली कामे आखायला त्याचा निश्चितच फायदा होतो. हे विशेषत: ज्यांची कामे एकमेकांच्या कामांवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी फार उपयोगी पडते. त्याचप्रमाणे 'फाईव्ह एस' आणि 'काईझेन' ही अशीच अजून दोन जपानी यशरहस्ये. आमच्या कंपनीत शॉपफ्लोअरपासून इतरही डिपार्टमेंट्स मध्ये ५एस आवर्जून पाळले जात असे. 'काईझेन' साठी शॉपफ्लोअरवर काईझेन बोर्डच उभे केलेले असत. शिवाय वार्षिक काईझेन अवॉर्डही असत. या सर्वांचं महत्त्व योशिदांनी समजाऊन सांगितलं होतं. कितीही मोठा जपानी साहेब असला तरी तो ही अन्हिके उरकताना दिसत असे. याला अपवाद अगदी एम.डी.सुद्धा नव्हते.
जपानी माणूस 'वर्कोहोलिक' म्हणून प्रसिद्ध आहे पण म्हणून मला तरी योशिदा कधीही काम करत उशीरापर्यंत बसले आहेत असं अपवादात्मक प्रसंग सोडल्यास आढळले नाहीत, सकाळी नऊ पासून साधारणपणे संध्याकाळी साडेसहा-सातपर्यंत ते ऑफिसमध्ये असत. इथे भारतात एकटे असल्याकारणाने (त्यांचं कुटुंब जपानमध्ये असल्याने), घरी लवकर जाऊन तरी काय करणार अश्या भावनेतूनही बहुतेक वेळ ऑफिसमध्ये घालवणार्यांपैकी ते नव्हते. कामाच्या वेळेत काम करुन ते घरी वेळेवर जाणारे ते एक सहृदय पिता होते. त्यांना तीन मुली होत्या. त्यांच्या बायकोचे आणि मुलींचे जपानमधले फोटो त्यांनी मला दाखवले होते. गोल्फची आवड असणारे योशिदा एक कुटुंबवत्सल गृहस्थ होते. खरं म्हणजे तीन वर्षांच्या डेप्युटेशनवर ते आले होते पण कधीही ते कंटाळलेत किंवा जपानच्या तुलनेत भारतात हवामानापासून खाद्यपदार्थ, वाहतुकीपर्यंत सर्वच बाबतीत प्रचंड फरक जाणवत असूनही कधीही त्यांच्याकडून हेटाळणीचा किंवा तक्रारीचा सूर ऐकला नव्हता. त्याच्याउलट एका तरुण जपानी टेक्निशियनचं वर्तन चांगलंच लक्षात राहिलंय. ते साहेब आले होते फक्त एका महिन्यासाठी पण आल्याआल्या सर्वात आधी त्याने भिंतीवर कॅलेंडर लावलं आणि जसजसा एकेक दिवस जाईल तसतसा तो त्यावर एक एक फुली मारत जाई. जशी काही अगदी काळ्या पाण्याची सजाच दिलीय त्याला कोणी! खाण्यापिण्यापासून, रस्ते, वाहतूक, हवा, गरीबी हे विषयही त्याने अनेकदा त्रासिक चेहेर्याने छेडले होते!
योशिदा स्वभावानेही खूप साधे होते आणि रागावता तर त्यांना मुळीच यायचं नाही.:) दुसर्याला लागेल असं अपमानास्पद बोलणं किंवा कामातही तश्या प्रकारची कडक भाषा ते कधीच वापरत नसत. याचा अर्थ ते चुका दाखवत नसत असं मुळीच नाही. कुठे चुकतंय हे अचूकपणे, संयमाने, तोल सुटू न देता दाखवण्याची त्यांची शाब्दिक आणि लेखनिक हातोटी विलक्षण होती. कंपनीत काही इतर जपानी अधिकारी, टेक्निशियन्स होते त्यांच्या भारतीयांच्या केवळ चुकाच हेरायच्या आणि वर त्या अक्षरश: ज्याला इंग्रजीत हार्श म्हणतात अश्या भाषेत मांडून ते खरडपट्टीवजा रीपोर्ट वरपर्यंत पोचवायचे यातच धन्यता मानणार्या स्वभावाच्या पार्श्वभूमीवर योशिदा खूप वेगळे वाटायचे. चांगलं काम केल्यावर एखाद्या टेक्निशियनच्या पाठीवर कौतुकाची थाप तर ते नेहेमी द्यायचे. अशी जपानी शाबासकी कोणाला नाही आवडणार! त्यामुळेच ते शॉपफ्लोअरवरही चांगलेच लोकप्रिय होते.
भाषांतरकार किंवा त्याहीपेक्षा दुभाषा म्हणून काम करताना वेगवेगळे अनुभव यायचे. कधीकधी आपलेच लोक मध्येच काहीतरी असंबद्ध बोलून विनोदनिर्मितीही करतात. एकदा एका भारतीय इंजिनियर आणि योशिदांसाठी दुभाषीगिरी करत असता त्या संभाषणात २ तास कसे गेले तेच कळलं नाही..शेवटी ती चर्चा संपत आली. दिवाळीचे दिवस होते आणि अचानक भारतीय इंजिनियरने मधेच एक मराठीत वाक्य टाकलं "त्यांना विचार, फटाके उडवले का त्यांनी" गंभीर टेक्निकल चर्चेच्या समारोपाच्या वाक्यांच्या जागी हे वाक्य ऐकून मला हसू लोटणार होतं पण मी स्वत:ला सावरलं. भाषेचा कितीही अडसर असला तरी माणसाचे चेहेर्यांवरील भाव सर्वत्र सारखेच असतात. मी दाबलेलं हसू आणि त्या भारतीय इंजिनियरच्या चेहेर्यावरचे भाव योशिदांच्या नजरेतून काही सुटले नाहीत आणि लागलीच त्यांनी विचारलं 'काय झालं'. मी काय ते सांगितल्यावर मिस्किलपणे तेही हसले. भाषेचा अडसर होता म्हणून की काय पण 'फेस रीडींग' त्यांना चांगलं जमायचं. ते जपानला सुटीवर जाऊन आले की येताना न चुकता सर्वांसाठी काहीतरी ओमियागे (छोटीशी भेटवस्तू) किंवा जपानी स्नॅक्स/मिठाई घेऊन यायचे. जपानी चव न झेपणारे माझ्यासारखे खूपजण डिपार्टमेंटमध्ये होते. पण म्हणून काय झालं, तोंडदेखलं का होईना पण ती मिठाई स्वीकार करावी आणि हसतमुखाने आभार मानावेत ना! पण आमच्या डिपार्ट्मेंटमधल्या काही बहाद्दरांना हा अभिनय तेव्हढा जमायचा नाही. तुकडा तोंडात टाकल्यावर काढा प्यायल्यासारखा चेहेरा करायचा आणि तोंडाने मात्र योशिदांना सांगायचं 'छान होती. धन्यवाद". आता हा विरोधाभास, ते चेहेर्यावरचे कडू भाव योशिदांपासून लपणारेत का! ते मला नंतर हळूच म्हणायचे, "खरं तर त्याला हे आवडलेलं दिसत नाही.." पुढेपुढे मग त्यांनी 'सेफ प्रॅक्टिस' म्हणून सरळ चॉकलेटचा बॉक्सच आणायला सुरुवात केली.
त्यांचं ३ वर्षांचं डेप्युटेशन अखेरीस संपत आलं. अर्थात आवश्यकतेनुसार त्यानंतर ते काही दिवसांच्या बिझिनेस टूरवर येणारच होते. त्या दिवशीच्या फेअरवेल समारंभातल्या त्यांच्या औपचारिक भाषणानंतर प्रत्येकाला भेटून, हस्तांदोलन करुन ते निघून गेले. मला आवर्जून त्यांनी जपानला येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर मीसुद्धा ती कंपनी सोडली, नवीन ठिकाणी रुजू झाले. कामानिमित्त जपानलाही दोनदा वास्तव्य झालं. पण दुर्दैवाने मी तोक्योत आणि योशिदासान दूर दुसर्या राज्यात रहात असल्याने वेळेअभावि त्यांना भेटायचं राहून गेलं.
जपानमधल्या वास्तव्यात अनेक जपानी भेटले. पण योशिदांची सर कोणालाच नव्हती.आजही त्यांच्याकडून खुशालीची विचारपूस होते आणि मेलमध्ये जपानला त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रणही न चुकता दिसतं...आता मात्र जपानची वारी परत झालीच तर त्यांना न भेटता जपान सोडायचा नाही असं ठरवलंय!
समाप्त.
मनापासून
मनापासून आलय ललित. खूप आवडले योशिदा. पहिल्या नोकरीत प्रत्येकाला असे योशिदांसारख्या प्रवृत्तीचे बॉस भेटावेत.
जपानी पद्धति
मग यातून भारतीयांना काही घेण्याजोगे आढळले का? भारतात काम करताना असे जाणवते का की जपानमधे ही कामे लवकर व चांगली होतील?
अमेरिकन पद्धति नि भारतीय पद्धति यावर बोलताना सॅम पेट्रोडाने सांगितले की दोन्ही पद्धति निराळ्या आहेत, पण भारतात भारतातील पद्धतच चांगली चालेल, तिथे अमेरिकन पद्धति आणण्यात अर्थ नाही.
अर्थात् जगात कार्यक्षमतेमधे भारताचा क्रमांक फार खाली लागतो, असे म्हणतात. मलाहि तसेच वाटले. पण भारतात असेच चालते असे म्हणतात. विशेषतः कुठलेहि काम रेंगाळून ठेवायचे, दर वेळी निराळे नियम, काम करणार्याच्या मर्जीप्रमाणे, असे असते. त्यातून बरेच चांगले लोक पण भेटले, त्यांनी कामे भराभर उरकून दिली. पण तितकेच इतर लोक, कामचुकार, काही ना काही कारणे सांगून काम टाळणारे किंवा चुकीचे करणारे हि भेटले.
अमेरिकेत त्या मानाने सोपे. प्रत्येक कामाची पद्धत काय हे ठरवलेले असते, नि ती पद्धत काय हे विचारले की एकाच प्रकारचे उत्तर मिळते. त्यामुळे कामे जशी व्हायला पाहिजेत तशी होतील याची खात्री वाटते. भारतात नाही.
असो. देश तसा वेष नि व्यक्ति तितक्या प्रकृति.
Good one
चान्गले लिहिले आहे.
सुंदर लेख
सुंदर लेख सायुरी,
इतर अनेक जपानी भेटले असतील ना ? त्यांचीपण ओळख करुन घ्यायला आवडेल.
एकदम सही
मनापासून आवडलं. एकदम मस्तच!!!!!!!
छान लिहिलं
छान लिहिलं आहेस सायुरी.. आवडलं
मस्त लिहिलंय
सायूरी, मस्त लिहिलंयस. पहिल्याच जॉबमध्ये असा मस्त बॉस मिळणं नशिबात असावं लागतं. भाग्यवान आहेस तू!! योशिदांकडून चांगले ऑफिस संस्कार मिळाले तुला.....
मस्तच
सही लिहीलेय गं सायुरी. व्यक्ती पण छान आहे आणि तू केलेलं व्यक्तिचित्रण पण.
सायुरी,
सायुरी, तुझा लेखाची सुरुवात छान झालीये. अजून वाचून पूर्ण झाला नाहीये म्हणून बाकी काही लिहित नाही. प्रतिसाद ह्याकरता देतेय की वाचता वाचता जाणवलं की जेव्हा माझ्या जपानी क्वालिफिकेशनचा वापर व्हावा म्हणून त्या क्षेत्रातली नोकरी शोधेन तेव्हा तुझ्या सारखीच गत असेल माझीही. बाकी डिटेलमध्ये वाचून नंतर प्रतिसाद देईनच. कीप ईट अप.
धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद.
झक्की,
होय, भारतीयांना जपान्यांकडून शिकण्यासारखं बरंच आहे. जपान्यांच्या कामाच्या पद्ध्तीपासून, शिस्तबद्धता, दर्जामध्ये सातत्य राखणे यासारख्या बाबी विशेष उल्लेखनीय वाटतात.
(अवांतरः आमच्याकडे जपानमधल्या हेडऑफिसकडून भारतातून डिस्पॅच केलेल्या कंटेनरमध्ये असलेल्या मशिनमध्ये चक्क कामगाराची चप्पल, कॅप पडलेली आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या.....कधीकधी मशिन्स कस्टमरकडेही डायरेक्ट डिस्पॅच होत असतात, तेव्हा हाच प्रकार कस्टमरला आढळला तर!! :(( बाकी मशिनच्या पेंटची क्वालिटी खराब असल्याने पेंटचे पोपडे निघणे, मशिन गंजणे अश्या क्वालिटी संबंधित तक्रारीही कॉमनली यायच्या. हे सुधारणं सहज शक्य आहे ना आपल्याला!)
दिनेशदा,
होय नंतरही जपानी भेटले..पण त्यांचे अनुभव लिहून ठेवण्यासारखे अजिबात नाहीत. योशिदासान सारखे नंतर नाही कोणी भेटले. सॉफ्टवेअर कंपनीतील जपान्यांशी कामाव्यतिरिक्त कधीच बोलणं झालं नाही.
सायोनारा! धन्यवाद!
बॉस
बॉस ची कल्पनाच बदलली.
सगळ्याना योशिदा सारखे बॉस मिळाले तर.....:)
झालं
झालं वाचून. मस्तच लिहिलं आहेस. ओळं न ओळ पटली. जपानमध्ये राहिल्यावर किती शिस्तप्रिय देश आहे ह्याचा अंदाज येतोच पावलोपावली.
योशिदासानचं व्यक्तीचित्रणही मस्तच जमलंय.
आवडला लेख
छान केलयस व्यक्तीचित्रण. करीअर च्या सुरुवातीला असे सगळ असे समजवुन सांगणारे बॉस नक्कीच छान. अश्या बर्याचश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी एकंदर त्या क्षेत्राकडे, कामाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकवतात.
मस्तच
मस्तच लिहिलयस, सायुरी. माझा नवरा तोशिबा मध्ये काम करतो. त्यामुळे अनेक कथा ऐकल्यात. जपानला जाऊन तिथल्या माणसांना "जवळून" बघण्याची इच्छा आहे. बघू.
छान लिहिल
छान लिहिल आहे. पण मला एक कळेल का कि तुम्हि जपानी कुठे शिकलात
छान लिहिलयस
छान लिहिलयस सायुरी.
धन्यवाद
सर्वांना धन्यवाद!
संगीता,
मी ठाण्यात शिकले जपानी.
पण पुणे-मुंबई इथेही जपानीचे क्लासेस हल्ली बरेच आहेत.
सायुरी,
सायुरी, ठाण्यात पाध्ये सरांकडे शिकलीस कां जॅपनीज?
सायोनारा,
सायोनारा,
हितगुज मार्फत तुला इमेल केली आहे.
अरे वा.
अरे वा. सहीच लिहीले आहे.. मलाही आमच्या (हो हक्काने आपलेसे वाटतील असे नाकानीशी. (कृपया यावर विनोद करु नये.)) जपानी बॉसची व माझ्या अशाच जॉबची आठवण झाली. आता पुर्ण वाचतो.
सायुरी,
सायुरी, खरच खूप छान लिहील आहेस. नक्की आठवत नाहीये मला... तुझ्या नावाचा अर्थ काय?
पण यात साके मात्र ठेऊ नका>
बॉस ची संकल्पनाच बदलून ठेवलीस की ग तू !
दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"
छान
छान लिहीलंयस, सायुरी.
बर्याच
बर्याच दिवसांनी इकडे आले.
सर्वांना धन्यवाद
आवडलं
आवडलं
एकदम interesting लेख आहे.
एकदम interesting लेख आहे.
जपानी मिठाई मी पण खाऊन बघितलेली, मला नव्हती आवडली. अत्यंत कमी गोड, काहींना वेगळा विशिष्ट वास असा काहीस होत.
मनापासून आलंय ललित. खूप आवडले
मनापासून आलंय ललित. खूप आवडले योशिदा >>>> +९९९९९
छान व्यक्तिचित्रण. आवडले.
छान व्यक्तिचित्रण. आवडले.
ओमियागे दिले-घेतले आहेत. खूप सुंदर प्रथा आहे. देतांना उच्चप्रतीचा भारतीय चहा, हस्तकलेच्या वस्तू, CD चा जमाना असतांना इंस्ट्रुमेंटल म्युझिकच्या CDs वगैरे. आलेल्या जपानी स्नॅक्स आणि मिठाया मात्र आवडल्या नाहीत आणि ते लपवता आले नाही अपवाद फक्त तोक्योच्या रिबीन केकचा - स्वर्गीय चव ! (Juchheim Baumkuchen cake)
कशावरून..आपला उच्च प्रतीचा
कशावरून..आपला उच्च प्रतीचा चहा त्यांना आवडला असेल? तसेच...आपला चिवडा, चकली वगैरेही.......
कशावरून..आपला उच्च प्रतीचा
कशावरून..आपला उच्च प्रतीचा चहा त्यांना आवडला असेल?…
नसेलही. पण त्यांना ते लपवता आले
ओमियागेची प्रथा आवडली हे सांगायचे होते.
अरे किती दिवसांनी हा लेख वर
अरे किती दिवसांनी हा लेख वर आलाय. धन्यवाद छन्दीफन्दी, अनिंद्य, आंबटगोड, शशांक... मीच भूतकाळात परत रमून गेले.
@ अनिंद्य होय होय, चांगली प्रथा आहे. जपानी शिकत असताना सेन्सेईंनी 'अगदी साधं पेन दिलं तरीसुद्धा चालेल' पण जपान्यांना भेटताना नक्की ओमियागेची प्रथा पाळावी असं वारंवार बजावल्याचं आठवतंय. जपानी मिठाया ह्म्म्म... पण इथे (अमेरिकेत) ९९ रँच या चायनीज ग्रोसरी स्टोरमध्ये गोड मोची मिळतात वेगवेगऴ्या रंगात, तीळ वगैरे लावलेल्या, आत बिन्सची गोड पेस्ट असलेल्या, त्या मात्र मला बेहद्द आवडतात.
Pages