मसाले भात + मठ्ठा

Submitted by योकु on 22 July, 2019 - 16:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नेहेमी केल्या जाणारी कृती आहे. पण थोडेफार बदल आणि साहित्यात इकडे-तिकडे आहे. करून पाहा या पद्धतीनं, सुरेख होतो. याव्यतिरीक्त फक्त एकच कृती मला नव्या माबोवर दिसली. प्रमाण तीन बर्‍यापैकी खंद्या खाणार्‍यांकरता. भात हा एकच मुख्य प्रकार आहे असं समजून पुढील प्रमाण -

- कुठलेही जरा जुने तांदूळ - २.५ ते ३ वाट्या
(मसाले भाताकरता बासमती शक्यतो नकोच. मला स्वतःला इंद्रायणी फार आवडतो)
- मोठी वाटीभर मध्यम मोठे फ्लॉवर चे तुरे
त्याहून जरा कमी पण त्याच आकारांत चिरलेल्या बटाट्याच्या फोडी (एक मोठा बटाटा)
एक वाटीभर मटारदाणे. हे नसतील तर मूठभर शेंगदाणे ही पळतात पण मग ते आधी जरा गरम पाण्यात भिजत घालावेत.
(काजू हवे असतील तर ते ही वापरता येतील इथे.)
जरा खडा मसाला- दोन तमालपत्रं, बोटभर दालचीनिचे तुकडे, ७/८ लवंगा, ७/८ मिरीदाणे
दोन हिरव्या (कमी तिखट) मिरच्या, बोटभर आल्याचा तुकडा किसून
तेल, कडेनी सोडायला तूप, मीठ, चवीपुरेशी साखर, हळद अर्धा ते पाऊण चमचा, लाल तिखट अर्धा चमचा. ३ चमचे भरून गोडा मसाला (माझ्याकडे यावेळी अंबारीचा होता तो वापरला)
वरून घ्यायला बचकभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं किंवा सुकं खोबरं किसून.

मठ्ठ्याकरता-
मोठी वाटीभर साधं पण थंडगार दही
एक चमचाभर जिरं पावडर
दोन चमचे आलं किसून (हे आलं आधी सोलून मग किसायचं)
दोन मोठे चमचे कोथिंबीर
मीठ चवीनुसार, दोन - तीन चमचे साखर.

क्रमवार पाककृती: 

- जरा मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात बर्‍यापैकी तेल तापत घालावं. दुसरीकडे ७/८ वाट्या पाणीही गरम करत ठेवावं.
- तांदूळ निवडून घ्यावेत. (बोरीक पावडर लावली असेल तर धुवावे लागतीलच. मी स्वतः शक्यतो तांदूळ धूवत नाही; धुतलेल्या तांदळाचा भात गिजका होतो असं माझं मत; तसंही फोडणीत तो नीट परतल्या जात नाही ओला असल्यानी आणि अलवार झाल्यानी लगेच मोडतोही)
- तेलात मोहोरी, जिर्‍याची फोडणी करून खडा मसाला घालावा आणि वर मिरची आलं घालावं. यावर फ्लॉवर आणि चिरलेल बटाटा घालावा. हडसून खडसून चांगल परतावं हे प्रकरण. सुवास उधळला की झाकण देऊन एक वाफ येऊ द्यावी.
- यावर आता तांदूळ घालून आच मध्यम करून परतत राहावं. ८/१० मिनिटं तरी तांदूळ परतावा. यावर मटार, हळद, तिखट, मीठ आणि साखर घालून पुन्हा दोन-तीन मिनिटं परतावं.
- गरम पाणी वर घालावं आणि एकदा ढवळून वर मसाला घालावा. झाकण देऊन मंदच आचेवर भात चांगला शिजू द्यावा. चांगला शिजला की मग कडेनी दोन चमचे तूप सोडून झाकण तसंच ठेवून मुरू द्यावा एक १० मिनिटं तरी.
- गरमागरम मऊ मोकळा मसालेभात वर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबरं आणि तुपाची धार घेऊन खायला घ्यावा, सोबत पाण्याऐवजी मठ्ठाच घ्यावा.

मठ्ठ्या करता -
मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, जिरेपूड, मीठ, साखर, आलं आणि दही घालून मस्त बारीक करावं. यात भरऊप पाणी घालून पातळ करावं . सुरेख चवीचा मठ्ठा तयार आहे. चवीनुसार मीठ साखर कमीजास्त करता येइल.

वाढणी/प्रमाण: 
मसाले भात
अधिक टिपा: 

- यामध्ये लसूण, जिरं आणि हिरव्या मिरचीचं वाटणही वापरता येइल पण यामुळे जरा उग्र चव येते आणि मिरची बारीक वाटल्यानी बर्‍यापैकी झणका येतो.

माहितीचा स्रोत: 
नेहेमीची कृती आहे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरून घ्यायला बचकभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं किंवा सुकं खोबरं किसून.>> हे आणी काजु मस्ट आहे, तुझी रेसिपी लिहण्याची स्टाइल वाचुन डोळ्यासमोर येतो पदार्थ कधीतरी फोटोही ड्कवत जा.
मी सायोच्या रेसिपिनि करते . मस्त होतो तो पण, मी सगळ परतुन मग राइस कुकर लावायचे आता इन्स्टट पॉट्ला परता परती सगळच करता येत त्यामुळे सोप होत काम.

(तिकडे केरेमल नाही त्याला पुडिंग म्हणावे का असा वाद सुरू आहे. )

वांगे नाही, त्याला मसाले भात म्हणावे का ?

छान रेसिपी. आम च्या इथल्या टाटा टेस्को मध्ये आंबेमोहोर मिळा यला लागला आहे. ती एकेक किलोची आंबे मोहोर असे इंग्रजीत लिहीलेली पाकीटे बघून मला तर ह र्ष वायुच झाला. टाको टा क एक किलो आणला तो आता संपायला आला. इथेच कापलेल्या भाज्या पुलाव मिक्स म्हणून मिळतात व ड्राय फ्रूट वाला नेहमी मागे असतो घ्या घ्या म्हणून. त्याकडून ५० ग्राम काजू आणेन. परवाच इथून बेडेकरांचा मसाले भात मसाला आण ला आहे. एकूण सर्व मामला हजर आहे.

मला सुट्टे नसले रिक्षाला द्यायला की मी ऑफिसजवळ मंदिरा आहे त्या बाहेर फूल नारळ विकतात त्या बाईकडून नारळ घेते. त्यामुळे बचकभर
खोबरे नक्की मिळेल. कोथिंबीर कालच आणली आहे.

आमचे कडे एक सत्कार स्वीट व नमकीन फार जबरी दही असते व डॉलर जिलेबी. ही स्विगीवर आणवेन. लेकीला पुण्याला कॉलेजला सोडून आले कि मस्त मसाले भात मट्ठा बेत करेन व युट्युब वर बिस्मिल्ला शहनाई लावून ताव मारेन. म्हणजे खास पुण्याचा लग्नी फील येइल.

योकू, मस्त रेसिपी. मसालेभात माझा खूप आवडता. लग्नाच्या पंगतीत मिळायचा, तो परत परत मागून घेऊन खायचे तेव्हा. हल्ली लग्नातली ती गंमतच निघून गेलीय.

नेटवर एक रेसिपी मिळालेली ती वापरून मसालेभात करायचे. तोही सुरेख लागायचा. आता तुझी रेसिपी वापरून एकदा करून बघेन. बाकी मसालेभातात बासमतीचे काहीच काम नाही हे खरे आहे पण थेट इंद्रायणी म्हणजे गिचका नाही होणार? मला इंद्रायणी प्रचंड आवडतो, तोच खाते नेहमी पण तो गिचकाच आवडतो. मसालेभातात हे गिचका प्रकरण कितपत आवडेल जरा शंका वाटतेय. आंबेमोहिर वापरून बघेन.

मठ्ठा फसतो नेहमी. Sad ती चव येत नाही. परत प्रयत्न करेन.

अमा, कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण अगदीच राहवत नाही म्हणून सांगते. कापलेल्या भाज्या पुलाव मिक्स म्हणून मिळतात त्या घेऊ नका, कारण कापल्यावर त्यातली जीवनसत्त्वे उडून जातात. तुमच्या घरी येईपर्यंत त्या भाज्या खाण्यास पूर्णपणे निरुपयोगी झालेल्या असतात. प्रत्येक भाजी पाव किलो घेणे परवडत नाही कारण एका माणसाला तितकी भाजी लागत नाही हे माहीत आहे. बहुतेक सगळ्या भाज्यांचे दर सारखेच असतात, त्यामुळे मी एकेक भाजी पाव किलो घेण्याऐवजी सारख्या दराच्या भाज्या मिक्स करून ते मिक्स पाव किलो घेते. भाजीवाला नेहमीचा असल्याने तो देतो. हे असे मिक्स घेऊन वापरा.

आहा! मस्त!!
१-२ वेळा बहुतेक सायोच्या कृतीने केलाय. आता असा करून बघेन. मठ्ठापण छानच.

छान लागेल. मस्त रेसेपी.
पण इंद्रायणी वापरला तर मसाला भात न होता खिचडी होईल हे नक्की. इंद्रायणीला कणी आणि गिजका याच्यामधली स्टेप नाहीए.
मठ्ठा मस्तच लागेल.

गीजका नक्की होत नाही. वर म्हटल्याप्रमाणे तांदूळ आधी धुवायचा नाही आणि मंद आचेवर चांगला परतायचा. खूण म्हणजे तांदूळ पांढरट होतो आणि अवसडताना जरा कुरकुरीत झाल्यासारखा आवाजही येतो.

मस्त पाकृ . हे कॉम्बिनेशनच जबरी लागत !!
मी पण असाच करते ..पण मी भयंकर आळशी असल्यामुळे फरक इतकाच कि जेवढ्यास तेवढं आणि वर किंचित पाव वाटी पाणी घालून मी सरळ १० मिनीट किंवा १ शिट्टी होईपर्यंत कुकर ला लावते .. Wink Proud आणि तांदूळ बासमती.
वेळ असेल तेव्हा असा बाहेर पातेल्यात करते ..
ते अधिक टीपा मधे लसूण कश्यात ? मठ्यात ? बिग नो नो
फोटोचं तेवढं जमवा बुआ!>+९९ मी म्हणते एकदा द्याच तुम्ही आम्हाला सरप्राईज !! Wink

ते अधिक टीपा मधे लसूण कश्यात ? >>> भातात.
ताकामध्ये लसूण फक्त कढीच्या वेळीच आवडतो मला. बिग नो टू कच्चा लसूण + ताक Uhoh

मी आलं लसूण पेस्ट घालते. आणि भाज्यां मध्ये खरेतर ताजी कोव ळी तोंडली भोपळी मिरची, वांगी झिंदा बाद.

साधनाजी सूचने बद्दल धन्यवाद. लक्षात ठेवीन. त्या पँक्ड भाज्या खरं तर कधी पॅक केलेल्या असतात कोण जाणे. कधी कधी एकादोन दिवसात खराबच होतात फ्रिज मध्ये ठेवून सुद्धा. माझं उसळ आणि कांदा बटाटा अंडी ह्यावरच चालून जातं उगीच भात म्हणून चोचले. भाजीवाल्याकडून आणायचे म्हणजे पावकिलो तिख ट मिरची, भरपूर कोथिंबीर पुदिना थोडा कढिपत्ता अर्धा किलो भेंडी व कांदापात एक जुडी.
आता १०० ग्राम तोंडली भोमी वांगी आणेन मसालेभाताच्या बेता साठी.