आमटी + चटणी

Submitted by योकु on 24 June, 2019 - 12:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आई परवाला कोकण फिरून आलीय घरी. येतांना सुरेख कोकमं (सोले) घेऊन आली. आज ते कोकमं वापरून बायडीच्या पद्धतीनं आमटी केली. त्याची ही कृती. सोबत एक साधी चटणी केली होती त्याचीही कृती देतोय. पावसाळी गार संध्याकाळी ओरपायला जाम मजा आली. नक्की करून पाहा. प्रमाण ४ लोकांकरता.
४ लहान वाट्या तुरीची डाळ, शिजवून घ्यावी
१५/२० लसूण पाकळ्या; सोलून, ठेचून सुरीनी ओबडधोबड चिरून
४ मध्यम तिखट हिरव्या मिरच्या
१५-२० कोकमं (सोलं)
मोठ्या लिंबाएवढा गूळ
पाव चमचा (थोडा कमीच) सावजी मसाला
२ चमचे भरून नेहेमी चा गोडा मसाला
२ चमचे लाल तिखट
१ चमचा हळद
पाव चमचा हिंग
४ मोठे चमचे तेल
मीठ चवीनुसार
आवडत असतील तर कढीलिंबाची पानं १०-१२

चटणीकरता-
१०-१२ मध्यम तिखट हिरव्या मिरच्या
मूठभर सुक्या खोबर्‍याचे तुकडे १५ मिनिटं गरम पाण्यात भिजवून
मीठ, साखर, थोडं जिरं

क्रमवार पाककृती: 

आमटी करता-
लोखंडी कढई सणसणीत तापवून त्यात ४ मोठे चमचे तेल, ते धुरावंतय तोच त्याच मोहोरी, जिरं घालावं. ते जळतंय इतक्यात हिंग, लसूण हिरवी मिरची घालून भराभर हलवावं. आधी कढई मस्त तापल्यानी लसूण लगेच सोनेरी होईल तर यात आता हळद तिखट आणि शिजलेली डाळ घालून जरा परतावं. मग यात चांगलं पातळ होईल इतकं पाणी घालावं. यात आता चवीनुसार मीठ, गूळ, सावजी मसाला, गोडा मसाला आणि कोकमं घालून आमटी १५ मिनिटं तरी उकळू द्यावी. ही जरा पात़ळच चांगली लागते सो त्या नुसार कढत पाणी घालून अ‍ॅडजस्ट करावी.

चटणी करता- दिलेलं सगळं साहित्य बारीक वाटावं (खोबरं निथळून घेऊन, अर्थात). हवीच असेल तर चमचा भर तेलाची फोडणी द्यावी.

गूळ-आमसुलाची आमटी असेल तरी लसूण + मसाले घालून करून पाहा. सुरेख चव येते.
वेगळी खोबर्‍याची चटणी असल्यानी आमटीत खोबरं घातलं नाहीय. तसही कधी आमच्याकडे वापरत नाहीत.

इंद्रायणी तांदळाचा क्रीमी, वाफाळता भात, ही आमटी वरून + बाजूला वाटीत भुरकायला आणि चवीला खोबर्‍याची चटणी असा मस्त बेत होतो.

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांकरता
माहितीचा स्रोत: 
नेहेमीचीच कृती आहे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योक्या, ४ माणसांसाठी एका वेळेला पातळ आमटीसाठी ४ वाट्या (आमटीची वाटी) तूरडाळ घ्यायची?

मस्तच आमटी. करुन बघेन.
पण २०-२२ कोकमं की कोकमाची साल घ्यायची?
२०-२२ कोकम घातले तर जास्त आंबट नाही होणार का?

२०-२२ कोकमं जास्त आहेत.हे कोकमाचे सारही नाही.
चटणी मस्त आहे.मुख्य म्हणजे ओले खोबरे नाही.ओ.खो. चटणीसाठी वाटायला वाईट वाटते.कारण रोजच्या स्वयंपाकात
ओ.खो.लागतेच.

देवकी, सिद्धी वर केला आहे बदल. १५/२० कोकम सोलं पुरतील. तुम्ही बहुतेक कोकमाची फळं समजलात. आमच्याकडे 'कोकम' म्हणजे तुम्ही म्हणताय तसं कोकमाची साल (याला कोकम रसाचे पुटं चढवलेली असतात)

१५/२० कोकम सोलं पुरतील. >>>> ती पण जास्त होतील.असो.ज्याला जशी हवी तशी आंबट करावी. Wink
बाकी रेसिपी वाचताना (लोखंडी कढई सणसणीत तापवून) मजा आली.

तुम्ही बहुतेक कोकमाची फळं समजलात.>>>>. नाही बरं! फळे(रातांबे,भिरिंडे) आमटीत घालत नाहीत.ती खाण्यासाठी कोकणात जावे लागेल. आमच्याकडे पण कोकमांच्या सालींना, सोलं म्हणतात.

योकु धन्यवाद. ठिक आहे करून बघते. पण मी घरी आमटी बनवते त्यात फक्त २-४ कोकम सोल टाकले की आंबट पणा जाणवतो.
कोकमाची फळं आमटीत टाकत नाहीत.पण आतलं गर काढून उरलेल्या साली वाळतात. त्या २०-२२ साली आणि साखर घेऊन २ ग्लास चांगल सरबत तयार होईल.
माझ्या अंदाजाने २-४ सोल पुरे आहेत आमटी साठी.
१५-२० हे प्रमाण खूप जास्त होइल.

हुं, मी इतकी टाकली तरी आमटी फार काय आंबट झाली नाही. रंग मात्र सुरेख होता.
सोलं फॉल्टी म्हणू का? धरून हाणाल मला Uhoh

सोलं फॉल्टी म्हणू का?
- असु शकतात हा, कारण बाजारात उपलब्ध असलेले कोकम अगदी सगळा रस काढुन नावालाच उरलेला चोथा वाळवुन विकला जातो.
- माझ्या गावी कोकम आहे. ते घरी बनवतात आई, काकु वैगरे. ४ पुटी देउन बनवलं जातं. त्याला आंबटपणा खूप आहे. बाजारी कोकणाच्या ४ पटीने म्हणालात तरी अतिशयोक्ती नाही होणार.

उलट ईकडे मुंबईला मी मुद्दाम कोकम विकत घेऊन पाहिल आहे. ६-७ टाकली तरी काहीच आंबटपणा नाही.

लोखंडी कढईत कोकमं घालणं चांगलं की वाईट? कारण कोकमं लावून कढई घासली की फारच वाईट रंगाचं पाणी तयार होतं पण कढई लखलखीत होते.

बाकी आमटी मस्त. उकळी आली की वेगळ्या भांड्यात लगेच काढून ठेवा मात्र. तसंच उकळलेल्या आमटीत वरून तूप घाला चमचाभर आणि थोडी कोथींबीर. मस्त दरवळ सुटेल आमटीचा.

येस मेधा, ते राहीलंच लिहायचं. आधी वेगळ्या भांड्यात काढून ठेवणे आणि खायला घेतांना वरून लोणकढ्या साजुक तुपाची धार अवश्य. Happy

१५-२० आमसुलांची आमटी न कळकता बनली म्हणजे नक्की तुझी लोखंडाची कढई फॉल्टी आहे Wink

एक वाटी डाळीला एक - शिकस्त म्हणजे दोन - आमसुले रगड होतात. सिद्धीने म्हटल्याप्रमाणे ४++ पुटी आमसुलं असतील तर सहसा खूप सुंदर रंग येत नाही. रंगाकरता आगळ वापरावं लागतं.

अस्सल आमसुल बोटाच्या पेराएवढे घातले तर आमटीत उकळल्यावर त्याचा आकार बागुर्ड्याएवढा (उडणारे मोठे झुरळ) होतो.

एक वाटी डाळीला एक - शिकस्त म्हणजे दोन - आमसुले रगड होतात>>>>म्हणजे ४ वाट्या डाळीला जास्तीत जास्त ८ सोलं! कोणी बिचार्‍याने वर दिल्याप्रमाणे २०-२२/१५-२० सोलं घातली तर काय होईल? Wink Wink :

या वर्षी गुहागरच्या लोकल दुकानातून कोकमं (आमसुलं) आणली होती. कितीही टाकली तरी थोडाही आंबटपणा येत नव्हता. चक्क फेकून दिली. पुण्यात उत्तम कोकम मिळाले. गणपतीपुळ्याला खुप सुरेख कोकमे मिळाली होती एकदा.
आमटीत कोकमाने जो आंबटपणा येतो तसा चिंचेने येत नाही.

पुण्यात देसाई बंधू किंवा बेहेरे आंबेवाले या दोन दुकानात उत्कृष्ट कोकम / सोलं मिळतात. माधवनी लिहिल्याप्रमाणे उकळलं की वाळकं एवढासा कोकम फुलून मोठा होतो. आम्ही 4 जणांची आमटी करतो त्यात 3 आमसूल पुरेसे होतात. आणि आमटी उकळल्यावर काढून टाकले नाहीत तर आमटी अधिक अधिक आंबट होत जाते. वर दिलेल्या प्रमाणात 15-20 टाकले तर आगळ तयार होईल Happy

४ जणांना 4 वाट्या आमटी खूप जास्त होणार नाही का? छोटी वाटी असली तरी प्रमाण खुप जास्त आहे.

बाकी आमटी भात, चटणी बेस्ट मेन्यू.

आमच्याकडे कोकम, गुळ, गोडा मसाल्याचीच आमटी असते नेहेमी पण कोकम किंवा सोले दोन पुरतात एका लहान वाटी डाळीला.

बाकी तो सावजी मसाला वगैरे घालून बघायला हवी. गरम मसाला घालते कधी कधी गोड्या मसाल्याबरोबर.

बाकी तुम्ही कृती छान लिहिता, इंटरेस्टिंग नेहेमीप्रमाणे.

Submitted by अन्जू on 25 June, 2019 - 10:46>> +२२
मला वाटतंय पावसाळ्यात थंड संध्याकाळी गरमागरम पिता यावी म्हणून मुद्दामून जास्त आंबट + तिखट केली आहे आमटी .. म्हणून जाणूनबुजून एवढी आमसुलं घातलीत .. रोजच्या आमटीला माणशी डिड २ पुरे मला वाटतंय
योकु ची रेसिपी म्हणजे सणसणीत तापलेली कढई , आणि त्यात तेल तापल्यावर जिरं फुलल्यावर हिंग .. पुढची फोडणी हा ट्रेडमार्क आहे Happy

वाचूनच भुक लागली.
१५ _२०सोलं म्हणजे जरा जास्तच. होतील असं वाटतं. आम्ही चारजणांच्या सोलकढीला पण ईतकी वापरत नाही.
'योकु ची रेसिपी म्हणजे सणसणीत तापलेली कढई , आणि त्यात तेल तापल्यावर जिरं फुलल्यावर हिंग .. पुढची फोडणी हा ट्रेडमार्क आहे ' +१११

इंद्रायणी तांदळाचा क्रीमी, वाफाळता भात, ही आमटी वरून + बाजूला वाटीत भुरकायला आणि चवीला खोबर्‍याची चटणी असा मस्त बेत होतो.>>>> वाचूनच मस्त वाटलं...
फोटो plzzzz...

डेफिनेटली सोलंच फॉल्टी आहेत. रात्रिची आमटीही सेम चवीची होती आज सकाळी. देसाई बंधूंकडून आणून पाहायला हवेत आता...

4 जणांसाठी 4 वाट्या तूर डाळ, 15-20कोकमं, 15-20लसूण पाकळ्या सगळंच जास्ती वाटतंय. मी कोकमं घालून आमटी करताना कढीपत्ता, हिंग, गोडा मसाला, गुळ एवढंच घालते.

ही डाळ मी इत्क्या वेळेस केली की तुम्हाला धन्यवाद म्हणायला स्पेशली ID उत्खनन करून काढला Lol छान रेसिपी.