सांडगे

Submitted by दिनेश. on 27 April, 2010 - 08:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

पुढील कृतित दिल्याप्रमाणॅ

क्रमवार पाककृती: 

सांडग्याचे प्रकार
मूगाचे सांडगे, (यालाच मूगवड्या पण म्हणतात. )
अर्धा किलो मूगाची डाळ, अर्धी वाटी उददाची डाळ, वाटीभर सोललेला लसूण,
पाव किलो हिरव्या मिरच्या वा एक वाटी तिखट (आवडीप्रमाणे कमीजास्त)
एक छोटी जूडी कोथिंबीर, मिठ, हींग जिरे, मिरीदाणे, हळद

मूगाची डाळ कोरडीच भरड वाटून घ्यावी.त्याबरोबर जिरे आणि मिरीदाणे
वाटावेत.(या सर्व मिश्रणाचे प्रमाण असे नाही. भिजवलेले पीठ झणझणीत
लागले पाहिजे, चवीला.)
उडदाची डाळ रात्रभर भिजत घालून सकाळी वाटावी. वाटताना त्यात लसुण
व मिरच्या घालाव्यात. कोथिंबीर मात्र बारीक चिरुन घालावी, वाटू नये.
त्यात बाकीचे जिन्नस व मूगडाळीचे मिश्रण घालावे. नीट मिसळून घ्यावे.
अर्धा तास थांबावे. परत मिश्रण नीट मिसळून घ्यावे. यावेळी ते हाताला
कोरडे लागू नये. लागल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
मग प्लॅष्टीकच्या कागदावर वा ताटात, सांडगे घालावेत. हाताने घालण्यापेक्षा
जर जाडसर प्लॅष्टिकच्या पिशवीला छोटेसे भोक पाडून (जिलबीसाठी करतो
तसे ) घातले तर हात खराब होत नाहीत, व सुबक सांडगे घालता येतात.
हे सांडगे दोन दिवस कडक उन्हात वाळवावेत. मग सोडवून उलटवून परत
वाळवावेत. पूर्ण वाळल्याशिवाय, डब्यात भरु नयेत.
हे सांडगे तेलात लालसर रंगावर तळून, वांगी, बटाटा, कडधान्य यासारख्या
भाजीत घालतात. हे सुके असल्याने, नीट शिजवावे लागतात. नूसत्या
या सांडग्याची पण भाजी करता येते. शिजल्यावर हे थोडे फ़ूगतात.
कोल्हापूरकडे हे सांडगे मुहुर्ताचे म्हणून करतात. लग्न ठरले, कि पहिल्यांदा
हे सांडगे करायचे. त्यातले पहिले पाच, पूजायचे.

कोहळ्याचे सांडगे
अर्धा किलो कोहळा, १०० ग्रॅम गवारी, १०० ग्रॅम भेंडी, एक छोटी काकडी,
पाव किलो भाजके पोहे, लाल मिरच्या, मीठ, हिंग

पोहे भरड दळून घ्यावेत. कोहळा, गवारी व भेंडी या भाज्यांचे तूकडे
करुन घ्यावेत व ते एकत्र करुन कूटावेत. अगदी बारीक करायचे
नाहीत. मग त्यात काकडीचा किस, लाल मिरच्यांचे तूकडे घालून
परत कूटायचे. त्यात पोहे मिसळायचे. मीठ व हींग घालायचा.
या मिश्रणाचे हलक्या हाताने लिंबाएवढे गोळे करुन कडक
उन्हात वाळवायचे.
हे तळल्यावर सुटे होतात. नूसतेच जेवणात घेतात (भाजीत वगैरे घालत
नाहीत. ) पण चवदार लागतात.

हिरव्या मिरच्यांचे सांडगे

पाव किलो हिरव्या मिरच्या. अर्धी वाटी उडीद डाळ, मीठ आणि हिंग

उडीद डाळ, रात्रभर भिजत घालून कमी पाण्यात अगदी बारीक वाटावी.
मिरच्यांचे तूकडे करुन, भरड कूटावेत. त्यात डाळिचे मिश्रण व हिंग
घालावा. नीट मिसळून याचे सांडगे घालून कडक उन्हात वाळवावेत.
हे सांडगे तळून, दहीभाताबरोबर खातात.

कुडाच्या फ़ूलांचे सांडगे.

या दिवसात कोकणात गेलात, तर सगळीकडे पांढरा कुडा, फ़ुललेला
दिसतो. त्याची फ़ूले खुडून आणायची.
ती सावलीतच वाळवायची. मग रात्री उघड्यावर (गच्चीत ) ठेवायची.
मग सकाळी ती चुरुन त्यात मीठ, व हींग घालून मळायची. त्यात थोडे बेसन
घालून त्याचे सांडगे घालायचे. कडवट पण चवदार लागतात. शिवाय
पोटासाठी चांगले आहेत.

मेथीच्या भाजीचे सांडगे

दोन जूड्या मेथीसाठी, पाव किलो तूरडाळ वा चणाडाळ (वा दोन्हीचे
मिश्रण ) भिजत घालून भरड वाटायची. त्यात मेथीची पाने, मीठ
व आवडीप्रमाणे तिखट वगैरे घालुन मिसळायचे.
या मिश्रणाचे सांडगे न घालता, छोटा लाडू करुन, दोन्ही हाताच्या
तळव्यात अलगद दाबायचा. आणि मग ते उन्हात वाळवायचे.
(हाताला थोडे तेल लावायचे )
हे वडे तळून, रस्सा भाजीत, कढीत घालता येतात.

कांद्याचे सांडगे

एक पेला जूने तांदूळ, तीन दिवस भिजत घालायचे. रोज
पाणी बदलायचे. तिसऱ्या दिवशी, ते पाणी घालून अगदी
बारीक वाटायचे. मग त्यात मीठ, हींग व लाल तिखट
घालायचे. हे मिश्रण दूधापेक्षाही पातळ हवे. तिखट
मीठ जरा जास्तच घालायचे.
मंद आचेवर हे मिश्रण शिजत ठेवायचे. सतत ढवळायचे.
पारदर्शक झाले कि उतरायचे. मग हे जरा थंड झाले कि
तीन चार मोठे लाल कांदे, अगदी बारीक चिरुन त्यात
मिसळायचे. नीट ढवळून, त्याचे चमच्याने सांडगे घालायचे.
हे सांडगे वाळले कि आतून पोकळ होतात.
तळल्यावर ते खूप फ़ूलतात. चहाबरोबर वा जेवणात
घेता येतात.

सांडगे करणे आता विस्मरणात जात आहे. वर्षभर, खास
करुन ज्यावेळी भाज्या मिळत नाहीत, त्या काळातली
बेगमी असे ही. पूर्वी ते मोठ्या प्रमाणात करत असत,
पण थोड्या प्रमाणात केल्यास, फ़ारसा वेळ लागत नाही.

हा आणखी एक वेगळा प्रकार. खुप वर्षांपुर्वी कालनिर्णय मधे वाचला होता. करुनही बघितला होता.
मटकीचे सांडगे.
पाव किलो मटकी भिजत घालून निथळून घ्यावी. चार सहा शेवग्याच्या शेंगाचे मोठे तूकडे करुन उकडून घ्यावेत. त्याचा फक्त गर घ्यावा. मग तो गर आणि मटकी वाटून घ्यावी. त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व हींग घालावा. (मी लसूणही घातला होता ) मग त्याचे सांडगे उन्हात वाळवावेत. तळून तसेच खावेत वा भाजीत घालावेत. चवीला छान लागतात.
प्रतिसाद
प्राजक्ता | 27 April, 2010 - 10:37
प्रिती रेसिपी लिही.
हरबरा डाळिचे सांडगे(वडे)
हरबरा डाळ रात्री भिजत घालुन सकाळी उपसुन पाणि न घालता वाटायची त्यात हिंग ,हळद, मिठ आवडिप्रमाणे तिखट किंवा हिरव्या मिरच्या आणी कोंथिबिर बारिक चिरुन घालायची,मिसळून पाटावर किंवा प्लॅस्टिक कागदावर वडे घालायचे. (त्याला वडे तोडण अस म्हणतात.) कडकडित वाळवायचे.
लागेल तस भाजि किंवा तोंडिलावण म्हणून वापरायचे.
हे वडे झार्‍याने झारुन करायची पण पद्धत आहे.

प्रीति | 7 May, 2010 - 11:27
बाजरीच्या खारवड्या / सांड्गे
बाजरी खमंग भाजुन घ्यायची. मिक्सरमधुन ओबड धोबड काढुन घ्यायची. पाणी उकळायला ठेवायचं, त्यात तिखट, मीठ, हळद, लसुण जीरं वाटुन घालायचं आणि पीठ हळुहळु ढवळत घालायचं, गुठळ्या फोडायच्या. मिश्रण पातळ होईल इतपत पीठ पाण्यात टाकायचं, चांगलं शिजु द्यायचं. बर्‍यापैकी घट्ट होईल मिश्रण शिजल्यावर. पाण्याच्या हाताने सांडगे घालायचे. कडकडीत वाळवायचे. गरम गरम पीठ छान लागतं. ह्या खारोड्या तळुन किंवा नुसत्या दह्यात घालुन पण छान लागतात, तसचं तेल, तिखट, मीठ आणि शेंगदाणे लावुनही मस्त लागतात, सोबत कांदा. तोंडाला पाणी सुटलं. आजच संध्याकाळी खाणार

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली मी असे करते ते सांडगे.
कोबी, गाजर, मुळा, दुधी किसून घेणे, भेंडी मिक्सरमधुन बारीक करुन घ्यायची, हि. मिरची बारीक चिरुन किंवा मिक्सरमधुन काढुन, तीळ, तिखट, मीठ मिक्स करायचं आणि चपटे सांडगे घालायचे. नुसत्या भेंडीचे पण खुप ठिसुळ होतात.

एप्रिल मधे घरी गेली होती.. परत येतेवेळी मला आणि ताईला दोघींनाही मुगाच्या वड्या हव्या होत्या. आईची सकाळची शाळा आणि आमची रात्रीची गाडी..
तिने रात्री डाळ भिजू घालून ठेवली. सकाळी तिला धुवून मग शाळेत गेली.. म्हणे आल्यावर करुया. आता रात्र होईस्तोवर नाही वाळल्या वड्या तर आली ना आफत म्हणुन मग माझ्या सुपरविजन खाली माझी कझिन आणि ताई या दोघींना घेतल आणि मिळून २ किलो च्या मुगाच्या डाळीच्या वड्या घातल्या Wink

हे बघा फटू..

ह्या दोन मोठाल्या परड्या :

आणि त्यावर मावल्या नाही म्ह्णुन मग बंगईवर (झोपाळ्यावर) सुद्धा टाकल्या Wink

हात दुखुन गेले होते तिघींचेही Sad पण रिझल्ट मस्त होता मात्र Happy

दिनेशदा, भेंडीच्या जून सांडग्याबद्दल पण लिहा ना, आमची पलूसची आजी झकास घालत असे भेंडीचे सांडगे, खिचडी असली की कधीतरी पापडाच्याजागी तळून खायला झकास लागत ते

टिने, किती सुंदर आणि सुबक घातल्या आहेस.

बापू, जून भेंडी, गवारी, मूळ्याच्या शेंगा ( डींगर्‍या ), कारल्याच्या चकत्या असे सगळे थोडेसे मीठ लावून ( कधी कधी मीठ घातलेल्या ताकात बुडवून ) वाळवून ठेवतात. मग आयत्यावेळी तळून खातात.

मुंबईत यापैकी काही आता मिळू लागले आहे... गावाला मात्र हे सगळे वाया जाऊ नये म्हणून हे उद्योग करत असत. या भाज्या जून झाल्या कि तश्याच खाता येत नाहीत ना !

थँक्यु दादा...
ते निळं कापड घातलेल्या परडीवरचे लाईनशीर असलेले आणि बंगईवरचे अलिकडले बारीक बारीक असणारे मी घातलेय आणि उरलेले सारे भद्दाडे माझ्या दोन बहिणींनी..
म्हणे नको तिथे शिस्त गाजवते.. मी लय शिव्या घातल्या त्या दोघींना मग त्यांनी मी घातलेल्या वड्यांमधे स्वतः घातलेल्या भदाड्या वड्या घुसवण्याच्या अतिरेकी कारवाया केल्या.. हि भावंड लय कमीने असतात Angry ..

किती वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे करतात, छान माहीती. मला यातले थोडेच माहीती आहेत.

टीना Lol , किती गुणाची ग तू बाय.

टीना, मेहंदी हातावर काढतात गं, कापडावर नाही. इतक्या सुबक मुगवड्या बघून लोकांना कॉम्प्लेक्स येणार आता Happy

आई कोहाळ्याच्या (सालासकट) फोडींना मीठ, तिखट, हिंग आणि हळद (बहुतेक एवढेच) लाऊन सांडगे करायची. भारी लागायचे... तळल्यावर एकदम हलके होतात. त्याच पद्धतीने कलींगडाच्या पांढर्‍या पाठीचे (यात साल काढून) पण सांडगे करायची पण ते थोडे वातड लागायचे म्हणून मी कोहाळ्याचेच फस्त करायचो.

व्वॉव! काय सही दिसताहेत. इथे मागच्यावर्षी प्रचंड ऊन असल्यामुळे सांडगे करता आले. मी एकटीने प्रथमच करत असल्याने चांगले मोठे मोठे सांडगे केले :). पुढचे पिवळे मिक्स डाळींचे आहेत आणि मागचे गाजर मुळा मिक्स आहेत. दोन्ही मस्त लागले Happy
या वर्षी तापमान ३० ° से. च्या वर एकच दिवस गेले :(, त्यामुळे सांडगे करताच आले नाहीत Sad
Sandage.jpg

Pages