पुरणपोळी - रवा मैद्याची

Submitted by VB on 12 January, 2019 - 13:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

चणा डाळ - अर्धा किलो
रवा अन मैदा - पाव किलो प्रत्येकी
सुंठ - अंदाजे एक इंच
५-६ वेलची
गूळ - अर्धा किलो
तूप
मीठ
खायचा सोडा
पाणी
आणि
हळद

क्रमवार पाककृती: 

परातीत थोडे पाणी घेऊन त्यात साफ केलेला रवा अन मैदा घ्यायचा. त्यात चिमूटभर मीठ अन सोडा घालायचा. अर्धा चमचा हळद घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. दुसऱ्या एका भांड्यात त्यांब्याभर पाणी घालून त्यात पिठाचा मळलेला घट्ट गोळा भिजवून झाकून ठेवा. हे पीठ किमान तास दिडतास तरी भिजवायचे(हा वेळ वर धरला नाहीये).

आता जोवर पीठ भिजतेय, पुरणाची तयारी करायची.
जितका कट हवा त्याच्या सव्वापट पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळले की त्यात चणाडाळ घालून शिजवायची. फक्त काळजी घ्या की डाळ जास्त शिजायला नको. डाळ एक कण कच्ची असताना त्यातले पाणी काढून घ्या. अन हो आच मंद ठेवा, नाहीतर डाळ करपेल. आता त्या डाळीत चिरलेला गूळ, सुंठ अन वेलची पावडर घालुन नीट मिक्स करून घ्या. गूळ जसा गरम होईल तसे त्याला पाणी सुटते. सो जास्तीचे पाणी आटवून घ्यावे. पाणी आटले की गॅस बंद करून पुरण थोडे गार होऊ द्या. आता गार झालेले पुरण पाटा, पुरण यंत्र वा मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे. आम्ही पुरण चाळणीत वाटून घेतो मस्त बारीक होते. अन मग बारीक वाटलेल्या पुरणाचे गोळे करायचे. आमच्याकडे पुरण भरपूर भरतात त्यामुळे अर्धा किलो डाळीच्या फक्त ११ पुपो होतात.

पुरणाचे गोळे झाल्यावर भिजत घातलेल्या पिठाकडे वळूयात.

पिठाचा गोळा जास्तीचे पाणी काढून परातीत घेऊन नीट मळून घ्यायचा. मळताना हाताला तूप किंवा तेल लावायचे कारण हे पीठ चिकट असते अन मळायला त्रासदायक देखिल ☺️

पुरणाचे गोळे झाले, पीठ मळून झाले की तवा गरम करा. ही पोळी शेकायला खूप नाजूक असते सो आच खूप जास्त ठेवायची नाही अन खूप कमी पण नाही.

पिठाचा बारीक गोळा करायचा अगद लहान पुरीला लागतो तेवढा. तो मैद्यात लोळवून त्याची छोटी पारी करायची, त्यात पुरणाचा गोळा भरून पारीचे तोंड बंद करायचे. अन परत थोडासा मैदा लावून हलक्या हाताने पोळी लाटून भरपूर तूप लावून शेकायची.

गरमागरम पुपो तयार. तुम्हाला हवी तशी खा, दुध, आमरस, गुळवणी सोबत वा नुसती.
आम्ही पुपो गुळवणीत कालवून खातो, सोबत तोंडलावणी ला बटाट्याची भाजी ,पापड अन कटाच्या आमटीचे भुरके☺️

अन हा पूर्ण भरलेल्या ताटाचा फोटो

Screenshot_2019-01-06-21-08-15-442_com.miui_.gallery_0.png

वाढणी/प्रमाण: 
४/५
अधिक टिपा: 

१-सुंठ, वेलची ची पावडर करताना त्यात थोडी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची.
२-रवा मैद्याची पारी लाटायला अन शेकायला खूप कठीण असते, सो दोन्ही खूप हलक्या हाताने करायचे नाहीतर पोळी फुटते.
३-पुरण वाटताना खूप जास्त कोरडे झाले तर कटासाठी काढलेले थोडेसे पाणी घाला

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
परातीत थोडे पाणी घेऊन त्यात साफ केलेला रवा अन मैदा घ्यायचा. त्यात चिमूटभर मीठ अन सोडा घालायचा. अर्धा चमचा हळद घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. दुसऱ्या एका भांड्यात त्यांब्याभर पाणी घालून त्यात पिठाचा मळलेला घट्ट गोळा भिजवून झाकून ठेवा. हे पीठ किमान तास दिडतास तरी भिजवायचे(हा वेळ वर धरला नाहीये).>>>असे मी कधीच केले नाही. परातीत थोडे म्हणजे किती पाणी घ्यावे लागेल? परत ही पीठ पाण्यात ठेवल्यावर काय होते? त्यापेक्षा आधिच जरा जास्त पाणी घेऊन पीठ कमी घट्ट मळले तर चालेल का?

>>>ही पीठ पाण्यात ठेवल्यावर काय होते? <<
रवा हळुहळु पाणी शोषत फुलतो व नरम होतो. भरपुर पाणी आधीच घालून करण्यापेक्षा, ह्या प्रक्रियेने ग्लुटन उत्तम रित्या तयार होवुन पीठाला लवचिक बनवते(पीठ मस्त ताणले जाते).( इति माझी आई)

आम्ही, कणिक ठेवतो अशी तेल आणि पाण्यात भिजत पुपोसाठी. सेमच एफेक्ट येतो. रव्याच्या जरा ज्यास्त तलम होतात.( इति माझी आई)

छान आहे.

हळद आणि सोडा कधी घालत नाहीत आमच्याकडे सासरी माहेरी. शेजारचे हळद घालतात बहुतेक कारण ते देतात आम्हाला त्या पिवळ्या रंगाच्या असतात.

पुपोत साखर Uhoh
१ल्यांदा ऐकले हे .
ट्राय करुन पहायला हवे ती आणि ही मैदारवावालीपण

पुपोत साखर >>> करतात बरेच जण, मलापण उशिरा समजलं. मी पुपो, खरवस गुळाचा करतात समजायचे. कधी गुळाबरोबर थोडीशी साखर टाकली तर टाकतात पण पूर्ण साखरेच्या दोन्ही गोष्टी करतात बऱ्याच प्रांतात हे मला उशिरा समजलं.

श्रीरामपुरला होतो चार वर्ष तेव्हा आमच्या घरमालकांकडे सर्व साखरेचे करायचे आणि प्रत्येक सणाला पुपो करायचे. एकदा मी गुळाचा खरवस दिला तो आवडला त्यांना, ते बघून गुळाचा करायला लागले.

कणिक, मैदा कशाच्याही करतात आमच्याकडे पण गुळाच्या करतात. सासूबाई आणि आई मुठभर साखर टाकतात गुळाबरोबर.

आभार सर्वांचे☺️

परातीत थोडे म्हणजे किती पाणी घ्यावे लागेल? परत ही पीठ पाण्यात ठेवल्यावर काय होते? त्यापेक्षा आधिच जरा जास्त पाणी घेऊन पीठ कमी घट्ट मळले तर चालेल का?>>> सोनाली, थोडे पाणी म्हणजे कणिक भिजायला जेव्हढे लागेल तितके किंवा थोडे कमी. आधीच जास्त पाणी घातले तर पोळ्या नीट लाटता येत नाहीत.

@झंपी, तुमची आई जे बोलली तेच कारण आहे. रवा मस्त भिजून फुगून तलम होतो. पण आम्ही तेल किंवा तूप या स्टेजला घालत नाही.

अंजुताई, देवकीताई हळद मळताना घातल्याने, पोळ्या मस्त पिवळ्या धमक होतात. काहीजण पोळ्या शेकताना तुपात हळद मिसळून लावतात पण त्याने त्या डाग लागल्यासारखे वाटतात

<<<<मैद्याच्या ऐवजी कणीक वापरली तर चालते का..?

Submitted by DJ. on 14 January, 2019 - 13:36>>> DJ चालतील तश्या पण ती चव येणार नाही अन लाटा-शेकायला पण त्रास होईल.

मुळात रवा-मैद्याची पोळी करायला कितीही कठीण असली तरी वर्थ आहे. ही पोळी तोंडात टाकताच विरघळते. रवा नीट भिजला असेल तर छोट्या पुरीसाठी लागणाऱ्या पिठात भली मोठी पोळी बनते☺️

अंजुताई, देवकीताई हळद मळताना घातल्याने, पोळ्या मस्त पिवळ्या धमक होतात. काहीजण पोळ्या शेकताना तुपात हळद मिसळून लावतात पण त्याने त्या डाग लागल्यासारखे वाटतात >>> अच्छा, ओके. आमच्याकडे हळद नाहीच वापरत यात. पण घालायची असेल तर पीठ भिजवतानाच घालणं योग्य हे बरोबर.

आमच्याकडे अर्धा गुळ आणी अर्धी साखर अस प्रमाण घेतो आम्ही , सासरी आणि माहेरी दोन्हीकडे हळद घालत नाही पण मी अगदी नावाला किन्चित घालते.
काहीजण पोळ्या शेकताना तुपात हळद मिसळून लावतात >> कच्ची हळद अशी लावल्यावर कडु लागत नसतिल का?

नक्की करून बघणार. पीठ मळायची पद्धत फारच इंटरेस्टिंग आहे.

Submitted by सई केसकर on 15 January, 2019 - 15:27 >> सई खरच करा , अन जमल्यास ईकडे कळवा चव आवडली कि नाही ते Happy

काहीजण पोळ्या शेकताना तुपात हळद मिसळून लावतात >> कच्ची हळद अशी लावल्यावर कडु लागत नसतिल का? >>> नाही, कारण तुप अन हळद एकत्र करुन लावुन शेकतात मग हळद कच्ची राहत नाही.

बाकी पुपोत साखर वाचुनच कसेतरी होते.

पीठ पाण्यात भिजत ठेवायचे ही नविनच पद्धत कळली. खूपच कौशल्याचे काम आहे. आमच्याकडे पुरणपोळी ही तेलपोळी असते, तेलात भिजवून तेलावरच लाटलेली.

मी या पद्धतीने पुरणपोळी करून बघितली. मस्त झाली पण मला कृतीमध्ये एक अडचण आली. मी परत होळीला हीच पाकृ करणार आहे.

>>>>जितका कट हवा त्याच्या सव्वापट पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळले की त्यात चणाडाळ घालून शिजवायची. फक्त काळजी घ्या की डाळ जास्त शिजायला नको. डाळ एक कण कच्ची असताना त्यातले पाणी काढून घ्या. अन हो आच मंद ठेवा, नाहीतर डाळ करपेल.

वरील सूचनेप्रमाणे मी डाळ शिजवली. आणि बोटांमध्ये दाबून ती शिजली आहे का ते पहिले. पाण्यातली डाळ व्यवस्थित क्रश होत होती म्हणून मी पाणी काढून गूळ घातला तर ती पुन्हा कडक झाली! त्या नंतर मला खूप व्याप करून ती पुन्हा शिजवावी लागली. आणि चाळणीने गाळून त्यातल्या टणक डाळी वेगळ्या कराव्या लागल्या. याआधी मी पुरण करताना, बहुतेक डाळ ओव्हरकूक करायचे. या पद्धतीने पुरण करताना मला इतका ताप झाला की याला "पुरणाचा घाट घालणे" का म्हणतात हे लक्षात आले. पण जे झाले ते पुरण मात्र मस्त सरसरीत मोकळे झाले. आणि पोळी अगदी चितळे वगैरेंची असते तशी झाली. त्यामुळे माझी आधीची पद्धतही बरोबर नव्हती हे कळले.

तर व्ही. बी, माझे दुसऱ्या अटेम्प्टला असे होऊ नये म्हणून काही टीप आहे का?

सई, तुम्ही गुळ घालुन गॅस चालु असतानाच खुप वे़ळ डा़ळ परतली का??? कारण कधी कधी असे केल्याने देखिल होते डाळ कडक.

दुसरे म्हणजे, फक्त डाळ काढुन ती मिक्सरला लावुन घ्या अन नंतर त्यात गुळ चिरुन घालुन व्यवस्थीत एकजिव करा.

Pages