पुरण- कटाची आमटी वाटणाची

Submitted by ShitalKrishna on 14 January, 2019 - 06:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1. पुरणाचे कटवणी (कट) 2 ते सवा दोन लिटर
2. अर्धी वाटी शिजलेली डाळ
मी अर्धा किलो डाळीचे पुरण घालते, माझ्याकडे पावशेर चा 1 पेला आहे, तो मोजणी ला वापरते. म्हणजे 2 पेले डाळीला 12 पेले पाणी घालून शिजवते (डाळीच्या 6 पट पाणी), शिजवताना चमचा भर तेल/तूप, चमचा भर हळद, किंचित मीठ घालते. डाळ शिजून दोन ते सवा दोन लिटर अंदाजे 8-9 पेले कट मिळतो.
3. फोडणी: दहाबारा ठेचलेल्या लसूण पाकळ्या, मूठभर कडीपत्ता पाने, घरचे तिखट(वर्षभरासाठी करतो ते) 4 चमचे नसेल तर लाल तिखट. बेताचे तिखट होते, तुम्ही वाढवू शकता. अर्धा लिटर कटला 1 चमचा तिखट, हळद 1 चमचा, जिरे 1 ते दिढ चमचा, अर्धी वाटी खिसलेलं सुखा खोबरं, अर्धा चमचा हिंग, तमालपत्र 2 -4 पाने ऐच्छिक, तेल चार पळी(6 पळीही चालेल)
4. वाटण: खोबऱ्याच्या अर्ध्या वाटीचे(डौल) पातळ काप करून थोड्या तेलावर भाजून घेणे, 4 मध्यम आकाराच्या कांद्याचे उभे काप करून तेलावर परतवून घेणे. खोबरे, कांदा वेगवेगळे भाजा. कांदा भाजत आल्यावर 2 इंच आल्याचे काप करून त्यात टाकणे तसेच दहाबारा पाकळ्या लसूण ही टाकणे. कांदा चांगला खमंग भाजायचा आहे. वाटीभर कोथिंबीर.
मिक्सर मध्ये आधी खोबरे बारीक करून घ्या, खोबरे न काढता त्यातच भाजलेलं कांदा-लसूण-आलं,कोथिंबीर टाका. हे वाटण एकजीव करून घ्या. पाणी शक्यतो नको पाण्याने खमंग पणा जातो, अगदीच होत नसेल तर टाका दोन चमचे पाणी परंतू चमच्याने हलवून मिक्सर मध्ये फिरूनच करा हे वाटण.
5. अर्धी वाटी कोथिंबीर वरून घालायला
6. मीठ अर्धा लिटर ला 1 चमचा, म्हणजे इथे 4 चमचे (बाकीच्या भाज्या , आमटी, रस्सा साठी हेच प्रमाण घेते मी, बेताचे पडते, जास्त नाही होत आणि कमी पडला तर वरून घेता येता)

क्रमवार पाककृती: 

प्रथम वाटण मिक्सर च्या भांड्यातून काढून ठेवा व त्याच भांड्यात डाळ थोडे पाणी घालून वाटून घ्या. ही वाटलेली डाळ, मीठ कटाच्या पाण्यात घाला.
आमटी साठी गॅसवर पातेले ठेवण्या आधी हे सगळं साहित्य आणि वाटण जमवून ठेवणे (जर्मनच्या पातेल्यात आमटी करत असल्याने फोडणी जळू शकते म्हणून जिन्नस जमवणे)
गॅस वर ठेवलेले पातेले गरम झाल्यावर तेल टाका, गॅस medium flame वर ठेवा, सगळी फोडणी medium flame वर करायची आहे. तेल तापलं कि जिरे, जिरे तडतडले कि हिंग, कडीपत्ता, मग सुखे किसलेले खोबरे मग लसूण टाकावा. हलवा. खोबरे लसुन चा रंग बदलला कि हळद, तिखट टाका. हळद तिखट टाकले कि हलवून लगेच वाटण टाका. वाट्णाला तेल सुटे पर्यंत परतायचे आहे, याला वेळ लागेल. आता कटाचे मिश्रण टाका.चांगले हलवून घ्या. Gas High flame करा, परंतु उकळीचा पहिला बुडबुडा आला कि Gas low flame करा. म्हणजे तवंग चांगला येतो आणि आमटी फुटत ही नाही.
ही आमटी पातळच चांगली लागते.
वाढताना लिंबाची फोड द्या. वाटीभर आमटी लिंबू पिळून भुरकतात जेवणाच्या सुरवातीलाच. आमच्याकडे जेवढे पोळी ला महत्व तेवढेच कटाच्या आमटीला ही Happy
पहिलाच प्रयत्न आहे लिहिण्याचा, सांभाळून घ्या, लेखनाच्या चुका जरूर सांगा.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्यावर अवलंबून, एकासाठी 4 वाटी धरून चला
अधिक टिपा: 

1. फोडणी मध्ये लसुन आणि खिसलेलं सुख खोबरा आवश्यक
2. खळखळा उकळायची नाही आमटी.
3. गोड पुरण घेऊ नका आमटीसाठी (चिंच गुळाच्या पुरणाच्या आमटीची वेगळी कृती आहे)

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! जरा वेगळी कृती आहे ही.
आमच्याकडे मुळात कटाची आमटी हा प्रकारच नाही. सो घरी कधी खायचा प्रश्नच नाही. जिथे एकदोनदा चाखलीय त्यात गूळ/ साखर काहीतरी नक्की होतं; चवीला बर्‍यापैकी गुळचट, तिखट अशी होती. ही कांद्याखोबर्‍याच्या वाटणाची आमटी पाहील आता करून.

छान क्रुती आहे , पुरण नैवद्यालाच केल जात असल्याने कटाच्या आमटित कान्दा,लसुण घालण शक्य नाही पण ही क्लोज टु पाटवड्याच्या आमटिची क्रुती वाटतेय...आई करते तेव्हा गॅस वर खोबर्याची वाटी भाजुन घेते.
मी पण खोबर जिरे भाजुन मग कटाला लावते बाकी घरचा मसाला, चिन्च वैगरे गोन्ड-तिखट अशी मिश्र चविचीच असते...

छान क्रुती आहे , पुरण नैवद्यालाच केल जात असल्याने कटाच्या आमटित कान्दा,लसुण घालण शक्य नाही >>>>>+१.

हो मी पण ब्राह्मण आहे माहेरची, चिंचगूळाची आमटी करायची आई कांदा लसूण न घातलेली. नंतर आम्हा मुलांना शेजारच्या चवी आवडायला लागल्यावर नेवैद्यासाठी थोडीशीच वेगळी करायची

मी फोडणीत आधी कटाचं पाणी घालून नंतर वाटण लावते. पण अर्थात वाटप फोडणीत परतून घेतलं तर जास्त खमंग लागत असणार आणि तर्रीही मस्त येत असेल.

मला कटाची आमटी फार काही आवडत नाही. इथे कोकणात या आमटीला "येळवणी" म्हणतात.
आता कधी केली तर या पद्धतीने करुन बघेन. अर्धांगाला आवडते भुरकायला. Happy

कटाची आमटी कांदा लसुण घालून....... येह बात हरगिज नामुमकीन Proud
मी जेव्हा जेव्हा टेस्ट केली आहे तिथे मसालेदार, खोबरं घातलेली चिंच गुळाची कटाचीआमटी खाल्ली आहे.

आईकडे पण चिंचगूळाचीच असते, तुम्ही ही खाऊन पहा. गावात फक्त माझी आई चिंचगूळाची करायची आणि बाकीच्यांकडे कांदालसून. आम्ही मुलं शेजारी जाऊन खायलो लागलो मग आई नैवेद्यासाठी वेगळी करून आम्हाला वेगळी करायला लागली.

मला कटाची आमटी कशीही आवडते ब्राह्मणी पद्धतीची आमच्याकडे असते, ती जास्त आवडते पण शेजारी वाटण घाटण घालून असते तीही आवडते.