टॉमेटो चे डबे

Submitted by mi_anu on 3 January, 2019 - 10:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टॉमेटो(खाणारी माणसे गुणिले 2)
कांदे(लहान 2)
कोथिंबीर आवडीनुसार
आले आवडीनुसार
लसूण आवडीनुसार
मीठ आवडीनुसार
तेल आवडीनुसार
शिजवायचे भांडे आवडीनुसार
कापायची सूरी आवडीनुसार
गॅस,स्वयंपाकघर,खिडक्या,पडदे,ताट, वाट्या,चमचे आवडीनुसार

क्रमवार पाककृती: 

अपॉकॅलिप्स आला तर उपाशी न मरता वाचता यावे म्हणून प्रत्येक घरात कांदा टोमॅटो बटाटा यांचा अखंड स्त्रोत हवाच हवा.कांदा डाळ,टॉमेटो बटाटा,कांदा बटाटा,बटाटा बटाटा, टॉमेटो कांदा बटाटा असे अनेक दिवस निघू शकतात.(अपॉकॅलिप्स मध्ये गॅस,घर वगैरे कसे शाबुत असेल वगैरे प्रश्न विचारू नका. अपॉकॅलिप्स आला की खात्री करून घ्या.)

टॉमेटो चे देठाकडचे झाकण उडवून ते सुरीने अलगद कोरून रिकामे करायचे.

रिकामे करताना निघालेला ऐवज मिक्सर च्या छोट्या भांड्यात गोळा करायचा.मग त्यात कोथिंबीर घालून मिक्सर घुर्र करायचे.

मग घुर्र झाल्यावर अर्धा ऐवज एका बाउल मध्ये काढुन घ्यायचा.मिक्सरमध्ये उरलेल्या अर्ध्या मध्ये 2 कांदे सोलून,आले असल्यास,लसूण असल्यास घालुन परत एक मोठे घुर्र करावे.

आता आधीच्या घुर्र केलेल्या मधून बाजूला काढलेला ऐवज भांड्यात काढून भांडे हातात घ्यावे.त्यात जितके टॉमेटो तितके चमचे दाण्याचा कूट घालावा,के एल एम किंवा तुमचे नेहमीचे तिखट मसाला घालावे,मीठ घालावे(साधारण 1 टीस्पून)आणि मिसळून घ्यावे.

आता मिक्सर मधले दुसरे घुर्र केलेले मिश्रण काढून भांडे हातात घ्यावे.भांड्यात तेल तापवून त्यात हळद हिंग घालून हे मिश्रण आणि के एल एम मीठ घालून हलवावे आणि झाकण ठेवावे.

आता हे शिजेपर्यंत डबे भरायला घ्यावे.दाण्याचा कूट वाला मसाला प्रत्येक डब्यात दाबून भरावा.पेशन्स असल्यास टॉमेटो ची झाकणे घुर्र मधून वाचवून ठेवून ती टूथ पीक ने वर चिकटवून डबे बंद करावे.

आता भांड्यातला ऐवज शिजला असेल.डबे त्यात सुलटे अलगद ठेवावे आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा ची पूजा करताना ज्या नाजूकपणे मुर्तीवर पळीने पाणी घालतो त्या नाजूकपणाने त्या प्रत्येक टॉमेटो च्या टाळक्यावर भांड्यातला मसाला पसरवावा.आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.या भाजीत शिजायला वरून पाणी घातल्यास पाप लागते.टोमॅटो च्या अंगच्या पाण्यातच ही शिजायला हवी.(वाफ आल्याने फोटो स्पष्ट आला नाही.)

आता गरम गरम खायला घ्यावी.आता तुम्ही विचाराल की इतके कमी टोमॅटो का.तर धागा लेखकांनी ही भाजी करता करता परवा लग्नात मिळालेली चिवड्याची पुडी फस्त केलीय त्यामुळे एक माणूस टोमॅटो मधून वजा.

वाढणी/प्रमाण: 
3 जण
अधिक टिपा: 

ग्रेव्ही पातळ झाल्यास ग्रेव्ही शिजत आल्यावर थोडा दाणे कूट घालून ढवळावे.आधी घातल्यास भाजी करपेल.

माहितीचा स्रोत: 
मदर इन लॉ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी! खास अनु स्टाईल!
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा ची पूजा करताना ज्या नाजूकपणे मुर्तीवर पळीने पाणी घालतो त्या नाजूकपणाने त्या प्रत्येक टॉमेटो च्या टाळक्यावर
टाळक्यावर?? Lol मस्तकावर, मस्तिष्कावर, अशी काहीतरी अपेक्षा होती Wink

के एल एम
<<
म्हंजे काय? कैरी लोणचे मसाला का? की केशवलक्ष्मीप्रसाधन उर्फ केप्र वाल्यांचा मसाला?

कांदा लसूण मसाला
यात कांदा (तेलात परतलेला),लसूण,कोथिंबीर,आले,गोडा मसाला,कढीपत्ता,चिली पावडर,टिकायला मीठ असते.
वापरल्यास मीठ आणि तेल कमी वापरावे लागते.

शिजवायचे भांडे घातले की.
गॅस ही स्थावर मालमत्ता.गॅस आवडीनुसार म्हटले की लगेच हौशी पाककृती वाले प्रत्येक पाककृती ला त्या त्या वेळी आवडत्या ब्रॅण्डचा नवा गॅस विकत आणतील. ☺️☺️

ही ही ही ! मस्त लिहीली आहे पाककृती. आणि टोमॅटो बिनविरोध सगळ्यांना आवडतो, त्यामुळे ही पाककृती नक्की करण्यात येईल. फक्त ते घुर्र प्रकरण परत एकदा वाचून काय कशी विभागणी केली ते समजून घ्यावे लागेल.

छान आहे.
>>गॅस आवडीनुसार म्हटले >> की आमच्या सारखे फाको करु करु वात आणतील. Wink Biggrin
छान आहे पण कन्फ्युजिंग आहे फार. पाकृ वाचताना एका स्टेपच्या पुढे भलताच फोटो दिसतो. त्यात घुर्र केलेला ऐवज हातात घ्या असं दोन वेळा म्हटलंय आणि दोन्ही वेळेला तो ऐवज हातातुन निथळून पडेल ना! हीच फाको डोक्यात आल्याने आता स्वतःवरच बिचारं वाटलं.
ओह्ह.... मला केएलएम मीठ वाचुन तो मीठाचा ब्रँड आहे असंच वाटलं.

घुर्र वाली स्टेप वेगळी लिही जरा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, कोथिबिर टाकली तर छान चव येइल आणी दिसेल...

तो शेवटचा फो टो मंगळावरचे पाणी, आतड्याच्या सर्जरीतल्या स्टेप्स मधला एक अंतर्गत फोटो, पॅसिफिक समुद्रात खोलीत राहणा रे प्राणी, इशा अंबानीने बनवलेला उंदियो, एलिअनची मुले असा काहीही असू शकेल असा आला आहे. मस्त विनोदी लेखन.

आतड्याच्या सर्जरीतल्या स्टेप्स मधला एक अंतर्गत फोटो >> ईईईईईई....खरच असा दिसला मला....
मस्त रेसिपी...बघणार नक्की

डबे काय?
स्टफ म्हणायचं. Happy
तो शेवटचा फो टो मंगळावरचे पाणी, आतड्याच्या सर्जरीतल्या स्टेप्स मधला एक अंतर्गत फोटो, पॅसिफिक समुद्रात खोलीत राहणा रे प्राणी, इशा अंबानीने बनवलेला उंदियो, एलिअनची मुले असा काहीही असू शकेल असा आला आहे. मस्त विनोदी लेखन.>>>>>> अमा +१

टोमॅटो चे डबे हा साबा शब्द आहे.
मी लग्नापूर्वी टोमॅटो भरण्याचे कष्ट कधीही घेतलेले नाहीत. ☺️
ही सोपी भाजी मदर इन लॉ धडा.
याचे थोडे पंजाबी व्हेरिएशन करायचे असेल तर टोमॅटो मध्ये उकडलेले मटर, मसाला वगैरे भरून शिजवता येईल.

<गॅस,स्वयंपाकघर,खिडक्या,पडदे,ताट, वाट्या,चमचे आवडीनुसार> नळ राहिले.
<आता मिक्सर मधले दुसरे घुर्र केलेले मिश्रण काढून भांडे हातात घ्यावे.भांड्यात तेल तापवून त्यात हळद हिंग घालून हे मिश्रण आणि के एल एम मीठ घालून हलवावे आणि झाकण ठेवावे.> म्हणजे हाताच्या उष्णतेनेच शिजवायचे का?

रेसिपी मस्त. पण लेखन त्यापेक्षा जास्त आवडलं.

घुर्र केलेल्या अर्ध्या भागात टमाटो शिजवण्यापेक्षा टमाटोंच्या टाळक्यावर चीझ किसून घालून दोनतीन मिनिटे मायक्रोवेव्हचा अभिषेक करायला आवडेल.

घुर्र केलेल्या अर्ध्या भागात टमाटो शिजवण्यापेक्षा टमाटोंच्या टाळक्यावर चीझ किसून घालून दोनतीन मिनिटे मायक्रोवेव्हचा अभिषेक करायला आवडेल.>>>> कल्पना आवडली.

चीज घातले तर आत दा कु काहीतरीच लागेल.अॅलन सोली च्या फॉर्मल शर्ट खाली नऊवारी नेसल्या सारखं.टोमॅटो च्या आत बटाटा/ऑलिव्ह/बीन्स/हलापिनो भरून मग टाळक्यावर चीज चा अभिषेक करा.देव पावेल आणि प्रयत्नांचे चीज होईल.

अय्यो, गॅस ऑन करा आणि भांडं गॅस वर ठेवा हे सांगितलंच नाही मी.बिचारं पब्लिक हातात भांडं धरून आतला मसाला शिजायची वाट बघत बसेल ☺️

नाही ..पण मग ती पोळीशी खावयाची भाजी नाही होणार.... भाजी म्हणजे हीच. मूळ अनुची..... Happy

Pages