आज २४ जुलै २०१८ रोजी 'रेडबुल ट्रान्स-सैबेरियन अल्टीमेट स्टेज सायकल रेस', मॉस्को शहरातून चालू होत आहे. जगातील सर्वात जास्त लांबीच्या आणि सगळ्यात खडतर मानल्या जाणार्या ह्या स्पर्धेचे हे तिसरेच वर्ष आहे. एकूण ९२०० किमी, हो, नऊ हजार दोनशे किमी लांबीच्या ह्या रेस मधे १५ टप्पे असतील. सगळ्यात कमी अंतराचा टप्पा ३०० किमीचा तर सगळ्यात मोठा तब्बल १४०० किमी लांबी असलेला आहे. एकूण २५ दिवसांनंतर ही रेस, व्लादिवोस्तोक येथे संपेल. ही रेस टूर द फ्रान्स च्या तिप्पट आणि 'राम' अर्थात रेस अक्रॉस अमेरिकेच्या जवळजवळ दुप्पट लांबीची आहे.
अत्यंत खडतर अशा ह्या रेस दरम्यान स्पर्धकांना चांगल्या परिस्थितीतील रस्त्यांबरोबरच, अत्यंत खराब परिस्थितीतील रस्ते लागणार आहेत. वाटेत सायबेरियाचे वाळवंट, उरल, बैकल ई. तलाव, बैकल पर्वत, व्होल्गा सारखी सुप्रसिद्ध नदी, सायबेरियातल्या ओब, अमूर आणि येनेसी सारख्या फारशा माहित नसलेल्या नद्या, कझाकिस्तान मंगोलिया चीनच्या सीमेजवळील प्रदेश ई. पार करावे लागणार आहेत.
ह्या स्पर्धेतील टप्प्यांच्या अंतरा उंची बद्दल माहिती देणारा हा आलेख्/तक्ता
ह्या स्पर्धेतील अंतराखेरीज अजून एक आव्हान असेल ते म्हणजे दिवस रात्रीच्या तपमानातील फरक जो सुमारे ४० अंश सेल्सियस इतका असू शकतो.
तर अशा ह्या स्पर्धेकरता या वर्षी जगभरातून केवळ १२ जणांनी उत्सुकता दाखवली होती. त्यातील केवळ ६ जणांनी आज स्पर्धा चालू केली आहे.
तर अशा ह्या निवडक ६ जणांमधे एक जण आहेत, नागपूरचे मराठमोळे डॉ. अमित समर्थ.
ह्यांनी ह्या आधी रेस अक्रॉस अमेरिका - 'राम' एकट्याने आणि तेही आपल्या पहिल्याच प्रयत्नात पुर्ण केली आहे.
मी काही दिवसांपुर्वी त्यांची घेतलेली ही मुलाखत (इथे टप्प्या टप्प्याने टाकत आहे.)
नमस्कार डॉक्टर
सर्व प्रथम आपल्या कौटुंबिक पार्श्वभुमीबद्दल काही सांगाल का? आपले बालपण कुठे गेलं, घरी कोण असते शाळा कोणती वगैरे. तसेच शाळकरी वयात काही खेळ खेळायचात का?
डॉ. अमित - सर्वप्रथम धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल. मी रहातो नागपूरला. माझा जन्मही नागपूरचाच. माझ्या घरी माझे आई बाबा बायको आणि मुलगा असे असतात. आम्ही एकत्रच राहतो. अगदी लहानपणीची वडीलांच्या नोकरी निमित्त घालवलेली काही वर्षे वगळता माझे सर्व बालपण नागपुरातच गेले. माझे तिसरीपासूनचे शालेय शिक्षण, साऊथ इंडियन सोसायटीच्या 'सरस्वती विद्यालय' नावाच्या शाळेत झाले. ही जवळजवळ १२५ वर्षे जुनी शाळा आहे.
शाळेत असताना तसा मी खूप अॅक्टिव्ह रहायचो, शाळेत सायकल वरच जायचो यायचो. माझी शाळा घरापासून निदान पाच तरी किमी असेल ते आणि इतर मिळून माझे रोज २०-२५ किमी सायकलिंग होत असावं अर्थात तरीही त्यावेळी, मी सायकलिंगमधे काही करेन असे मला वाटलेही नाही आणि माझी तशी काही महत्वाकांक्षा देखिल नव्हती. शाळेत असताना मी अॅक्टिव्ह असलो तरी ओव्हरवेट होतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खेळात भाग घ्यायला, ओव्हरवेट असल्या कारणाने अपात्रच धरला जायचो. त्यामुळे वैयक्तिक किंवा सांघिक कुठल्याच खेळात मी कधीच नव्हतो.
हर्षद - ओह, मग शाळेत असताना अभ्यास आवडायचा का? डॉक्टर बनण्याचा निर्णय कसा घेतला? कॉलेज कुठलं होतं आणि मग डॉक्टरकी शिकताना काही खेळ खेळणं चालू केलंत का?
डॉ. अमित - मी शाळेत असताना अभ्यास हा खूपच महत्वाचा भाग होता आणि माझा कायम पहिल्या पाचात वगैरे क्रमांक असायचा. मला इ.भु.ना. मधे शालांत परिक्षेत १०० पैकी १०० गुण मिळाले होते.
माझे ज्यूनियर कॉलेज धरमपेठ सायन्स कॉलेजातून केलं अकरावी बारावीतही मला खूप चांगले मार्क्स मिळाले होते. बारावीत मला ९३% मार्क्स होते. मला अभ्यास करायला आवडायचे. त्यातल्या त्यात जीवशास्त्र आणि रसायन शास्त्र हे माझ्या अधिक आवडीचे विषय. त्यामुळे अभ्यास हा नेहेमीच इम्पॉर्टंट होता. डॉक्टरकी करायचे म्हणाल तर आमच्या घरी आईकडून नातेवाईक आधीच खूप सारे डॉक्टर आहेत. मी आमच्या घरात आठवा नववा डॉक्टर आहे. शिवाय बायॉलॉजीमधे आवड होती त्यामुळे डॉक्टर बनायचे असे नेहेमीच मनात होतं. आणि चांगले मार्क्स मिळाले आणि आई बाबांनी सपोर्ट केल म्हणून मग डॉक्टर झालो. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन अमेरिकेतून पब्लिक हेल्थ मधून जॉन्स हॉपकिन्स स्कूल मधून केलं पब्लिक हेल्थ हा ही माझ्या आवडीचा विषय आहे आणि आपल्या देशालाही त्याची गरज आहे आणि मला वाटते की कुठ्लाही क्रीडाप्रकार हा पब्लिक हेल्थ वाढवायसाठी एक जरिया आहे
कॉलेज मधे असताना मी जिम मधे जायचो. जिम खरेतर ह्या करता लावलं होतं की बारावीत मी खूप ओव्हर वेट होतो. जवळ जवळ ९५ किलो वजन होतं माझं नुसता अभ्यास करून माझे वजन खूप वाढून गेलं होतं. पण मग मी 'एम बी बी एस'ला अॅड्मिशन घेतल्यावर जिम लावली. त्यामागचे कारण इतकं च होतं की मी फिट, थिन आणि गूड लुकिंग बनावं. पण मग मला त्याचे पण इतकं वेड लागलं की मी 'विदर्भ श्री' स्पर्धा आणि इतरही लोकल बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा जिंकल्या होत्या. पण तो एक वेगळा काळ होता आणि हा एक वेगळा काळ आहे.
हर्षद - अमेझिंग, बॉडी बिल्डिंग मधे 'विदर्भ श्री' किताब मिळवणं म्हणजे भारीच की एकदम. पण मग जिम व्यतिरिक्त बाहेरच्या खेळांची आवड निर्माण झाली तरी कधी आणि कशी. कारण मला तुम्ही माहित आहात ते एक ट्रायथ्लिट म्हणून. आणि तंजावरला रनिंग इव्हेंट आयोजित करण्याचा निर्णय कसा घेतला.
डॉ. अमित - मी २००१-०२ साली बॉडी बिल्डिंग मधे 'विदर्भ श्री' होतो नंतर मी सिनियर नॅशनल चॅम्पियन्शिप खेळायला गेलो होतो त्यानंतर मात्र मी अभ्यासात बिझी झालो. आणि मग मेडिकलचे शेवट्चे वर्ष, इंटर्नशिप यामधे व्यग्र झालो नंतर मग नोकरी लागली त्यामुळे जिम एकदम सुटूनच गेली. असेच नोकरीकरता हैदराबाद येथे गेलो असता मला एक सर भेटले जे तायक्वांदो शिकवायचे जो एक कोरियन मार्शल आर्टचा प्रकार आहे. मग मला त्यात आवड निर्माण झाली. माझे बॉडी बिल्डिंग आणि वेट ट्रेनिंग बंदच झाले होते मात्र मग त्यानंतरची तीन वर्षे मार्शल आर्ट्चे ट्रेनिंग मात्र चालू ठेवले होते. आता मी सर्टीफाईड फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट होल्डर आहे. त्याच ट्रेनिंग दरम्यान जे टीचर होते ते आमच्याकडून खूप रनिंग करवायचे फिट्नेस करवायचे तर त्याच्यामधे मला रनिंग ची आवड निर्माण झाली आणि मग मी मॅरॅथॉन धावायला सुरुवात केली. मी नेहेमीच खूप चांगला धावायचो. खूपशा मॅरॅथॉन मधे मी पहिल्या पाचात तीनात असा येत असे. मी आज पर्यंत ८ फुल मॅरॅथॉन धावलो आहे. नंतर मग मी ट्रायथलॉन मधे आलो. त्याची एक वेगळीच मजा आहे. मी आत्तापर्यंत १२ हाफ आयर्न मॅन म्हणजे ७०.३ अंतराच्या स्पर्धा आणि एक फुल आयर्न मॅन पण केलं आहे. मी राम पण केलं आहे. मी तंजावरला एका संस्थेसाठी काम करत असताना तिकडे कसल्याही स्पर्धा वगैरे होत नव्हत्या त्यामुळे असंच मनात आलं की आपणच पुढाकार घ्यावा आणि एक इव्हेंट ओर्गनाईज करूया. मला तिथल्या स्थानिक लोकांनीही खूप मदत केली. तो आणि एकंदरितच माझ्या तामिळनाडूमधल्या दोन वर्षाच्या वास्तव्याचा अनुभव देखिल अविस्मरणीय होता.
हर्षद - आपण राम बद्दल बोलूच पण त्याआधी मला सांगा ट्रायथलॉन पहिल्यांदा माहित कधी झाले आणि तुम्ही त्यात पहिल्यांदा भाग कधी घेतलात ?
डॉ. अमित - तसे पाहता ट्रायथलॉन मला २०११ मधे माझा हैदराबादचा एक मित्र आयर्नमॅन करणार होता त्यावेळी, त्याच्या मुळे माहित झाले. मी त्यावेळी रनिंग आणि तायक्वोंदो करायचो पण सायकलिंग आणि पोहोणे ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकरता एकदम नवीनच होत्या. सायकलिंग शाळेनंतर केलेच नव्हते. स्विमिंग येत नव्हते. मी ३२ वर्षाचा होतो. पण तरी सायकलिंग मला जरा सोपे गेले त्यावेळी हैदराबाद मधे पहिली रेसिंग सायकल ३०००० रुपयांना मी विकत घेतली. त्या नंतर २०१६ मधे ऑस्ट्रेलियात फुल आयर्न मॅन केलं. पण त्या आधी हाफ आयर्न मॅन म्हणजे ७०.३ अंतराची स्पर्धा मी अनेक वेळा केली. २०१४ मधे भारतात थोन्नुर आणि चेन्नई या ठिकाणी मी विनर होतो. भारता बाहेरही इंडोनेशिया, फुकेत, मलेशिया, श्रीलंका, दुबई ई. ठिकाणीही भाग घेतला. मी जसजसे ट्रायथलॉन करत गेलो तसतशी माझी (तिन्ही स्पोर्ट्स बाबत) आवड वाढत गेली. स्विमिंग तर मी केवळ आयर्न मॅन करायचे म्हणून बत्तीसाव्या वर्षी शिकलो पण मग माझी अशी जिद्द होती की तलाव असो वा नदी असो वा समुद्र आपल्याला कुठेही पोहता आलं पाहिजे. तर अशा रितीने माझे आयर्नमॅनचे स्वप्न पुर्ण केले आणि राम तर त्याच्याही नंतर केले.
हर्षद - ह्या दरम्यान लग्न कधी झालं? आणि मग लग्नानंतर संसार, डॉक्टर म्हणून प्रैक्टिस, खेळाडू, प्रशिक्षक, संयोजक, संचालक
अशा विविध प्रकारच्या भूमिका पार पाडताना तारांबळ उडत नाही का? वेळ कसा पुरतो? वेळेचं व्यवस्थापन कसे साध्य करता? रोजचा दिनक्रम कसा असतो? सगळं सांभाळताना दडपण येतं का आणि आलं तर कसं हाताळता त्याला?
डॉ. अमित - पूर्ण वेळ कामधंदा सांभाळून ट्रेनिंग मॅनेज करणे म्हणजे तसे जरा अवघडच असते पण पहाटे लवकर उठून किंवा शनिवार रविवार जास्त वेळ देऊन असेच ते करावे लागते. आठवड्याच्या मधल्या दिवसात सकाळी दोन अडीच तास संध्याकाळी एक तास, विकेंडला जास्त ट्रेनिंग करायचं असे करूनच तुम्ही हवे तेवढे ट्रेनिंग घेऊ शकता. अर्थात कुटुंबाकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत मी फार सुदैवी आहे असेच म्हणावे लागेल.
माझे लग्न २०१० मध्ये झाले आणि आज मला सात वर्षाचा एक मुलगा आहे. माझी बायको, माझी आई खूप चांगल्या प्रकारे मला सपोर्ट करतात. माझे ट्रेनिंग, आहार विहार याकरता मदतच करतात. ‘हा काय वेडेपणा’ वगैरे कधी बोलत तर नाहीतच उलट खूप मदतच करतात. त्यांना माहित्ये की अमितने एखादी गोष्ट करायची ठरवले तर तो करणारच आणि त्याकरता लागेल ती मेहेनत घ्यावी तर लागेलच तर त्याला आडकाठी कशाला करा. हे सगळे करायला घरच्या लोकांचा प्रचंड पाठींबा आहे आणि माझे मित्रही खूपच मदत करतात म्हणूनच मी हे करू शकतो. माझे मित्र मला लागेल तेव्हा, तशी आणि तितकी मदत करतात.
तसे दडपण वगैरे येतं थोडेफार पण मला माहित्ये इतर खेळाडू कसे ट्रेन करतात. दिवसा नाहीच जमले तर पहाटे उठतात. रात्री उठून देखिल काही बाही करतात. मी देखील दिवसा वेळ नसेल तेव्हा रात्री १ वाजता उठून वगैरे सायकलिंग करायला, पहाटे ४ वाजता उठून धावायला गेलेलो आहे. त्याची काही एक वेगळीच मजा असते. अंधार असतो, रस्ते बिन वर्दळीचे सुनसान असतात. त्या शांत अशा वातावरणात ट्रेन करायला मजाच येते.
फक्त तुम्ही आणि तुमची सायकल; किंवा धावतानाचे एकटे तुम्ही, एक वेगळीच अनुभूती असते. सगळे जग झोपले असताना तुम्ही आपले काम करत असता ह्याचा आनंद काही औरच. तुम्हाला काही करायचेच असेल तर प्रेशर असे काहीच नाही वाटत आणि समोर काही ध्येय असेल तर तुम्ही काहीपण करू शकता या जगात.
हर्षद - तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्या व्यक्ती किंवा तुमचे रोल मॉडेल कोण कोण आहेत?
डॉ. अमित - रोल मॉडेल तसे खूपसे आहेत पण त्यातल्या त्यात 'ब्रुस ली' मला खूप प्रभावशाली वाटतो. रफाल नदाल माझा आवडता खेळाडू आहे. एन्ड्युरंस स्पोर्ट्स मधेही अनेक मॅरॅथॉनपटू माझे आदर्श आहेत. पण ब्रुस ली आणि रफाल नदाल हे दोघे माझे आत्यंतिक आवडते आहेत.
हर्षद - ट्रेनिंग मधील सर्वात आवडता भाग कोणता आणि नावडता कोणता? फावल्या वेळात विरंगुळा म्हणून काय करता?
डॉ. अमित - सगळ्यात नावडते असे काहीच नाही पण पोहोण्यात मी जरा कच्चा आहे त्यामुळे मी त्यावर जास्त मेहेनत घेतो. त्या व्यतिरिक्त मला ट्रेनिंग मधले सगळेच आवडते आणि फावल्या वेळात मी पुस्तके वाचतो. जास्त करून खेळांवरची. स्पोर्ट्सच्या कोचेसनी लिहिलेली पुस्तके वाचतो, खेळाडूंची चरित्रे आत्मचरित्रे वगैरे वाचतो.
हर्षद - रेस अक्रॉस अमेरिका बद्दल माहिती कशी मिळाली. करायचे कधी ठरवले डेक्कन क्लिफ हँगर करायच्या आधी की नंतर. राम करतानाचे काही अनुभव घटना सांगाल का ?
डॉ. अमित - खरे सांगायचे तर राम मी कधी करणार असे मला माहितही नव्हते, तसा काही प्लॅन आणि विचारही मी कधी केला नव्हता. माझे एक मित्र आहेत सचीन पालेवार म्हणून एक मित्र आहेत त्यांनी २०१५ मधे पुणे ते गोवा ह्या डेक्कन क्लिफहँगर नावाच्या रेस करता मला न विचारताच रजिस्टर करून टाकले. कारण मी १०० - २०० किमी अंतर खूप फास्ट काटायचो, तर त्यांना असे वाटले की मी ही पुणे ते गोवा ६०० किमी ची रेस करून बघावी . तो पर्यंत मला अल्ट्रा सायकलिंग बद्दल खूप कमी माहिती होती मग मी नोव्हेंबर २०१५ मधे पुण्याला गेलो. माझे अनिरुद्ध आणि चेतन नावाचे मित्र आणि डायना नावाची पुण्याची एक मुलगी ह्यांनी माझा क्रु म्हणून काम केले. आम्हाला अजिबात अनुभव नव्हता. आम्ही एक दोनदा रस्ता देखिल चुकलो. असे चुकत माकत जवळ जवळ तीन तास वाया घालवूनही एकूण २८ तासात ती रेस आम्ही पुर्ण केली. त्या वर्षी ती रेस पहायला म्हणून राम चे रेस डायरेक्टर आलेले हो ते पहिल्यांदा पुण्याला आणि नंतर गोव्यालाही मला त्यांना भेटता आले. मी डेक्कन क्लिफ हँगर पुर्ण केल्यामुळे राम क्वालिफायर ठरलो होतो. तेव्हा मला राम बद्दल काहीही माहीत नव्हते पण नागपूर ला आल्यावर मी त्याबद्दल जरा अधिक माहिती घेतली. इंटरनेट वर रिसर्च केला. जेव्हा कळले की हे खूप खर्चिक प्रकरण आहे तेव्हा मी त्याबद्दलचा विचार करणे जवळपास सोडूनच दिले. त्यावेळेस मी आपला ट्रायथलॉन करत होतो, बर्यापैकी चांगल्या वेळेत करत होतो तर त्यातच खूष होतो. पण मग माझ्या काही मित्रांनी मला भरीस पाडले की निदान राम मधे क्रु म्हणून सहभाग घ्यावा. मग मी शॉना होगन म्हणून एक सायकलपटू आहेत त्यांना क्रु करायचे ठरवले.
त्यांनी ती रेस तब्बल सात वेळा पुर्ण केली आहे. त्यावेळी मी त्यांना माझ्या एका मित्रा सोबत क्रू केलं आणि ती रेस अगदी जवळून बघीतली. मग परत आल्यावर माझ्या मित्रांनी विचारले की तूही का नाही करत राम आणि मलाही वाटले की जर का नीट तयारीनिशी राम मधे उतरलो तर मी देखिल पुर्ण करू शकेन. नीट तयारी केली आणि चांगला सपोर्ट मिळाला तर मी देखिल रेस पुर्ण करू शकतो. मग एकूण दीड वर्षे त्याकरता ट्रेनिंग केले, त्याच दरम्यान मी एक फुल आयर्न मॅन देखिल केले. आणि मग स्पर्धेआधीचे सहा महिने मात्र मी स्वतःला रामच्या ट्रेनिंग करता पुर्णतः वाहून घेतले. राम चे अविस्मरणिय अनुभव इतके काही आहेत की मी चोविस तास त्याबद्दल बोलू शकतो. सांगायची गंमत म्हणजे आम्ही सगळेच नवखे होतो. मी पहिल्यांदाच भाग घेत होतो. आमचा क्रू चिफ होता तो ही पहिल्यांदाच क्रु चिफ बनला होता. इतर सगळेच सद्स्य देखिल पहिल्यांदाच असे काही काम करत होतो. आमची 'लगान' टीमच होती म्हणा ना. सगळे नवीन असल्यामुळे खूप उत्साही होते. मजा करायला चाललो आहे अशी भावना ठवून एकंदरित धमाल करत करत आम्ही ती रेस केली. त्यांनी माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. मला जे हवे ती आणून दिले. शेवट शेवट माझी खूप चिडचिड होत होती तेव्हाही त्यांनी मला खूप सांभाळून घेतले. रेस अक्रॉस अमेरिका ही केवळ एक रेसच नाही तर तुमचे जीवन आमुलाग्र बदलून टाकणारी एक घटना आहे. ती केल्यावर तुम्ही सेम पर्सन राहूच शकत नाही. तुम्हाला मॅरॅथॉन वगैरेची रोज आठवण येणार नाही पण रेस अक्रॉस अमेरिका मात्र दररोज आठवत राहते.
हर्षद - रेस अक्रॉस अमेरिका, राम करताना एखादाच लक्षात रहाणारा प्रसंग आहे का की जो अगदी मनावर कोरला गेला आहे?
डॉ. अमित - राम मधले तसे खूप सारे प्रसंग आहेत लक्षात ठेवण्याजोगे पण एकच सांगायचा झाला तर माझ्या आईने मला रेस चालू व्ह्यायच्या आधी जे मला सांगीतले होते ते शब्द मला आठवतात. तिने मला सांगीतले की राम इज डू ऑर डाय सिच्युएशन आणि अर्थातच त्यातला एकच पर्याय माझ्या समोर होता, तो म्हणजे स्पर्धा पुर्ण करणे. कारण खरोखरच माझ्याकरता ती परिस्थिती तशीच होती त्यावेळी. राम करता मी माझे सर्व आयुष्य पणाला लावले होते. संपुर्ण तन मन धन अर्पून मी त्या स्पर्धेत भाग घ्यायला गेलो होतो आणि ते शब्द माझ्या मनावर कोरले गेले आहेत.
हर्षद - ब्राव्हो. आता तुम्ही ट्रान्स सैबेरियन करताय तर ह्या स्पर्धेविषयी जरा अधिक माहिती द्याल का? ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुर्व अट किंवा पात्रता निकष काय होते? तयारी कशी चालू आहे? ट्रेनिंग प्लॅन चे स्वरुप कसे आहे. बनवला, क्रॉस ट्रेनिंग म्हणून इतर कोणता व्यायाम करता?
डॉ. अमित - ही ९१०० किमी अंतराची रेस आहे. ही रशियातल्या मॉस्को पासून ते व्लादिवोस्तोक पर्यंत एकूण २५ दिवसात टप्प्या टप्प्याने पार पाडायची आहे. ह्याचा फॉर्मॅट राम पेक्षा वेगळा आहे. राम ही कन्टिन्युअस चालणारी किंवा नॉन स्टॉप रेस आहे. ट्रान्स सैबेरियन मधे १५ स्टेजेस आहेत वेगवेगळ्या अंतरांवर. एकूण ९१०० किमी अंतर २५ दिवसात संपवायचे आहेत. त्या त्या ठिकाणी ठराविक वेळात पोहोचल्यावर, स्पर्धेचा पुढचा टप्पा सुरु करताना सगळेजण पुन्हा एकत्र असणार आहेत. या रेस मधे तुम्ही इतर रायडर्सचा ड्राफ्ट घेऊ शकता. या रेस मधे ते पुर्णतः लिगल आहे. अशा प्रकारे काही काही गोष्टी राम पेक्षा वेगळ्या आहेत.
ट्रेनिंग प्लॅन म्हटले तर रामच्या वेळच्या अनुभवाचा मला खूप फायदा होत आहे. रामच्या वेळी केलेल्या चुका टाळण्याकडे माझा भर राहील. राम मधे मी खूप ओव्हर ट्रेनिंग केलं होतं आता मात्र मी जितके जरूरी आहे तितकेच स्पेसिफिक ट्रेनिंग घेतो. विश्रांतीच्या दिवशी नीट विश्रांती घेतो. ज्या दिवशी कमी अंतर पण जास्त वेगाने सायकल चालवणे अपेक्षित असेल त्यावेळी तसेच करतो. उगाच जास्त अंतर चालवत नाही. तसेच क्रॉस ट्रेनिंग म्हणून कधी धावतो कधी पोहतो. त्यामुळेही एक वेगळ्या प्रकारे स्टॅमिना वाढतो.
हर्षद - ट्रेनिंग आठवड्यातले किती तास आणि कशाप्रकारे असतं? सायकलिंग इनडोअर ट्रेनरवर करता का?
डॉ. अमित - हो. दर आठवड्यात सायकलिंगचं ट्रेनिंग असतं. स्पीड ट्रेनिंग, हिल ट्रेनिंग असतं, लॉग एन्ड्युरन्स राईड्स असतात. एका आठवड्यात मी एन्ड्युरन्सवर जास्त फोकस करतो आणि पुढच्या आठवड्यात स्पीड आणि रिकव्हरी ट्रेनिंगवर फोकस करतो. काहे दिवस रनिंग, स्वीमिंग असं पण करतो. जिम ट्रेनिंग, स्ट्रेंगथ ट्रेनिंग करतो.
इनडोअर ट्रेनिंग मी फारसं करत नाही कारण मला आवडत नाही इनडोअर फारसं. जास्तकरून मी हायवेवर जाउनच ट्रेनिंग करतो. त्याचाच मला जास्त फायदा मिळतो.
हर्षद - You are founder of NGO and running clubs तर Pro health foundation, Miles, and milers बद्दल काही सांगणार का?
डॉ. अमित - प्रो हेल्थ फाउंडेशनचे मुख्य उद्देश म्हणजे स्पोर्ट्सला प्रमोट करणे; मुख्यत्वे करून एन्ड्युरन्स स्पोर्ट्स. आम्ही इव्हेंट्स स्पोर्ट्स ऑर्गनाईज करतो. आमचा एक स्पोर्ट्स क्लब आहे माईज आणि मायलर्स नावाचा. आम्ही अॅथलिट्सना सपोर्ट करतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी स्पॉन्सरशिप देतो आणि विविध प्रकारे मदत करतो. आमचा माईल्स आणि मायलर्स ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्यात आम्ही हाफ मॅरेथॉन, १० कि.मी., फुल मॅरेथॉन, कॉम्रेड्स मॅरेथॉन साठी ट्रेनिंग देतो. आमच्या क्लबमधून दोन जणांनी कॉम्रेडस मॅरेथॉन पूर्ण केली आहे. ५-६ जणांना आम्ही आयर्नमॅनसाठीही ट्रेनिंग दिले आहे; त्यांनी हाफ आयर्नमॅन पूर्ण केली आहे. हाफ आणि फुल मॅरेथॉनसाठी जवळजवळ १५० लोकं आमच्या इथे ट्रेनिंग करतात. फक्त फिटनेस साठीही खूप लोकं येतात. त्यांना marathon नसते धावायची, पण ५-१० किलोमीटर धावायचं, पन्नासेक किलोमीटर सायकलिंग करायचंय, फिट राहायचं आहे, असेही बरेच लोक येतात आमच्याकडे.
त्या व्यतिरिक्त स्पर्धात्मक खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडूही येतात आमच्याकडे. त्यांचं जरा वेगळ्या प्रकारे ट्रेनिंग होतं.
खूप साऱ्या पाच आणि दहा किलोमीटरच्या रेसेसचा चॅम्पियन, नागपूर युनिव्हर्सिटीचा क्रॉस कंट्री चॅम्पियान अजित आमच्या इथेच ट्रेनिंग करतो.
आमच्या इथे दोन फुल टाईम कोचेस पण आहेत, जे मला हे सर्व सांभाळण्यामधे मदत करतात.
हर्षद - ट्रान्स सैबेरियन करायची प्रेरणा कुठून मिळाली? एखादा म्हणाला असता, राम केली, बास झालं. त्याची तयारी अनेक पातळ्यांवर करावी लागतं असेल न? या तयारीचा भाग म्हणून काय काय चालू आहे? नुकताच हिमालयात सायकल चालवण्याचा जो अनुभव घेतलात त्याबद्दल सांगाल का?
डॉ. अमित - राम केल्यानंतर मी दुसऱ्या रेसेस पहात असे. मी ट्रान्स सैबेरियनच्या रेस डायरेक्टरला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी माझी बॅकग्राऊंड चेक केली, मी आजपर्यंत काय काय केलं आहे हे बघितलं. मी ट्रान्स सैबेरियनच्या रेसचा फॉर्मेट पाहिला, ट्रान्स सैबेरियन केलेलं आहे अशा १-२ लोकांना कॉन्टॅक्ट केलं. रेस फॉर्मेट पाहिल्यावर मला वाटलं की ही रेस मी करू शकतो. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी करू शकतो असं मला वाटलं, अर्थात, योग्य ट्रेनिंग घेऊन आणि स्ट्रॅटेजी आखून. ट्रान्स सैबेरियन करण्याचा माझा मुख्य उद्देश आहे तो रेस पूर्ण करण्याचा, मी कितव्या स्थानावर येतो ती नंतरची गोष्ट आहे. राम केल्यानंतर बस, आता झालं सगळं असं मला कधीच वाटलं नाही. उलट राम केल्यानंतर माझ्यात आत्मविश्वास आला की मी (शारिरिक दृष्ट्या) बरंच काही करू शकतो. पण मुख्य प्रश्न असा आहे की, या सगळ्या गोष्टी करायला खूप पैसा लागतो, जो आपल्या देशात सायकलिंगसारख्या खेळासाठी मिळणं खूप अवघड आहे. गल्लीतल्या क्रिकेट टूर्नामेंटसाठीही स्पॉन्सरशिप सहज मिळेल, पण अशा खेळासाठी / मोहिमेकरता नाही मिळत. शिवाय लोकांचा, नागपूरसारख्या ठिकाणाचा कोणी हे करू शकतो, त्याची क्षमता आहे यावरही विश्वास नाही बसत. राम केल्यानंतरही अजून कोणाचा विश्वास नाही! तरीही आम्ही तयारी करत आहोत.
हिमालयात, लेह लडाख भागातही आम्ही ट्रेनिंग केलं. खूप चांगला अनुभव होता तो. खूप थंडी नव्हती किंवा खूप गरमीही नव्हती. मजा आली तिथे, हिमालयात सायकलिंग करायला, पहाड चढायला... ट्रान्स सैबेरियनमध्ये असे मोठे पहाड वगैरे नाहीयेत. तिथे फ्लॅट आणि रोलिंग हिल्स असे रस्ते आहेत. जोरदार तयारी चालू आहे आणि आम्ही ट्रान्स सैबेरियन पूर्ण करूच अशी खात्री आहे.
हर्षद - भारतात सायकलिंगला चांगले दिवस आले आहेत, असं म्हणता येईल का? सैबेरियन करताना आर्थिक बाजूची तयारी करताना कसे अनुभव येत आहेत?
डॉ. अमित - भारतात सायकलिंग स्पोर्टसाठी चांगले दिवस आलेत असं नाही म्हणता येणार. मी आधी म्हणालो तसं स्पॉन्सरर मिळणं खूपच कठीण आहे. मोठमोठ्या सायकल कंपन्यासुद्धा स्पॉन्सररशिप द्यायला तयार नाहीयेत. ट्रान्स सैबेरियनसारख्या मोठ्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या पहिल्या भारतीयालासुद्धा स्पॉन्सररशिप द्यायला मोठ्या सायकल कंपन्या सुद्धा तयार झाल्या नाहीत हे खरंतर खूप आश्चर्यजनक आहे. कॉर्पोरेट कंपन्यांकडूनही स्पॉन्सररशिप मिळवणं खूप कठीण असतं.
पण हो, भारतात सायकलिंग वाढत आहे, पण स्पोर्ट्स म्हणून सायकलिंगचा प्रसार व्हायला, इंटरनॅशनल लेव्हलवरचे खेळाडू भारतात तयार व्हायला अजून माझ्या मते दहा वर्षं तरी लागतील. कॉर्पोरेट कंपन्यांनी वगैरे या लोकांना सपोर्ट केलं पाहिजे, चांगलं ट्रेनिंग आणि इक्विपमेंट्स पुरवली पाहिजेत. रेसेसमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं पाहिजे.
हर्षद - भारतात सायकलिंग सारख्या क्रीडाप्रकाराला खंदे पुरस्कर्ते मिळो, आपल्याकडून 'रेडबुल ट्रान्स-सैबेरियन अल्टीमेट सायकल रेस' आणि यासारख्या अनेक मोहिमा यशस्वी रित्या पार पडोत या शुभेच्छांसह आपली रजा घेतो. आपल्या व्यग्र अशा वेळापत्रकातून वेळात वेळ काढून मायबोलीकरता ही मुलाखत तुम्ही दिलीत याकरता आपले आभार. तसेच जगभरात पसरलेल्या मायबोलीच्या समस्त वाचकांतर्फे मनःपुर्वक सदिच्छा. निर्विघ्नं कुरु ते देव सर्व कार्येषु सर्वदा | धन्यवाद
डॉ. अमित - धन्यवाद
- मुलाखत समाप्त -
तळटीप - डॉ. अमित यांच्या ह्या मोहिमेकरता केटो नावाच्या संस्थळावर क्राऊड फंडिंग मार्गाने आर्थिक मदत गोळा केली जात आहे.
रेस अक्रॉस अमेरिका असो वा ट्रान्स सैबेरियन रेस, एकंदरीतच अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या मानवी शरीर काय काय करू शकते हे समस्त मानवजातीला दाखवणार्या आहेत. डॉ. अमित समर्थ यांनी राम ही ५००० किमी अंतराची स्पर्धा ११-१२ दिवसात संपवणे किंवा ९१०० किमी ची ट्रान्स सैबेरियन २५ दिवसात संपवणे ह्याचे स्वरुप हे तांत्रिकदृष्ट्या, वैयक्तीक पातळीवरचा एक उपक्रम असे ठरत असले तरी केवळ महाराष्ट्र किंवा भारताकरताच नव्हे तर संपूर्ण मानवजाती करता ही गौरवाची बाब / अभिमानास्पद कामगिरी असणार आहे.
अशा प्रकारच्या खेळांना मिळणाऱ्या प्रोत्साहन पाठींब्यामधे आपला समाज दाखवत असलेल्या सापत्नभावामुळे, अशा प्रकारच्या स्पर्धा किंबहुना ज्याला मोहीम हाच शब्द योग्य राहील ती हाती घेणारे क्रीडापटू खरोखरच कमी असतात. त्यामुळे ह्या मोहिमेला पाठिंबा दाखवण्याकरता पुढे या, ही मुलाखत शेअर करा, जमत असेल तशी तेवढी आर्थिक मदत करा, गरज लागली तर रशियात आपल्या ओळखीचे कोणी असतील त्यांना कळवून ठेवा. आपण दिलेला, आर्थिक मानसिक किंबहुना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा हा डॉ. अमित समर्थ आणि त्यांच्या संपुर्ण टीम करता मोलाचा ठरेल यात शंका नाही.
दहा लाखाचे फ़ंडिंग टार्गेट आहे
दहा लाखाचे फ़ंडिंग टार्गेट आहे यांच्या क्राऊड फाँडींग साईटवर
https://www.ketto.org/fundraiser/amitsamarth
हेला, मला संपुर्ण खर्चाचा
हेला, मला संपुर्ण खर्चाचा अंदाज नाही.
असे कळते की काही बाबींपुरते पुरस्कर्ते मिळाले आहेतही, केटो वर दहा गोळा करत असले तरी पण प्रत्यक्ष खर्च बराच जास्त असावा.
डॉक्टरांना खूप शुभेच्छा.
डॉक्टरांना खूप शुभेच्छा. खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. हॅट्स ऑफ टू हिम.
इथे माहिती करून दिल्याबद्दल तुझेही आभार हर्पेन.
<<डॉक्टरांना खूप शुभेच्छा.
<<डॉक्टरांना खूप शुभेच्छा. खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. हॅट्स ऑफ टू हिम.
इथे माहिती करून दिल्याबद्दल तुझेही आभार हर्पेन. >>
+१
ओके ! धन्यवाद!
ओके ! धन्यवाद!
तिसरा ६९३ किमी चा टप्पा पूर्ण
तिसरा ६९३ किमी चा टप्पा पूर्ण झाल्यानंतरची क्रमवारी
अर्थात ह्या स्पर्धेत क्रमवारी पेक्षा पार पाडणयाला महत्व
मस्त हरपेन. इथे अपडेट वाचायला
मस्त हरपेन. इथे अपडेट वाचायला भारी वाटतं आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज संपूर्ण मुलाखत वाचली.
आज संपूर्ण मुलाखत वाचली. डॉक्टर अमित यांना अनेक शुभेच्छा!
मस्त मुलाखत! डॉक्टरांना
मस्त मुलाखत! डॉक्टरांना शुभेच्छा!
(No subject)
आज वाचले हे , जबरी ... डॉक्टर
आज वाचले हे , जबरी ... डॉक्टर अमित यांना अनेक शुभेच्छा!!
छान आहे. आता किती किमी झाले,
छान आहे. आता किती किमी झाले, हर्पेन?
संपादन - वेग आणि वेळ दिली असताना हा प्रश्न उगाच विचारला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भा, आता ६४३५ किमी राहिलेत
भा, आता ६४३५ किमी राहिलेत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
डॉक्टर अमित यांचे सध्याचे
डॉक्टर अमित यांचे सध्याचे स्थान
एकूण ८ टाइम झोन पार पाडायचे आहेत.
(No subject)
चढ इथले संपत नाही
मस्त मुलाखत, डॉक्टर अमित
मस्त मुलाखत, डॉक्टर अमित यांना अनेक शुभेच्छा. जबरदस्त व्यक्तीमत्व.
फोटोपण मस्त.
डॉ अमित समर्थ यांच्या कडून
डॉ अमित समर्थ यांच्या कडून १०५० किमी अंतराचा दहावा टप्पा पार
गारठव् णा ऱ्या पावसात सायकल
गारठव् णा ऱ्या पावसात सायकल चालवताना
डॉ अमित समर्थ यांनी अकरावी
डॉ अमित समर्थ यांनी अकरावी स्टेजही पार पाडली आहे.
पंधरापैकी अकरा स्टेजेस पार केल्या म्हणजे झालीच की रेस पुर्ण असे वा टून उपयोगाचे नाही. खरी रेस तर आताच चालू होत आहे. नुसते अंतर नाही तर अती प्रचंड चढणी चढून जायच्या आहेत.
(No subject)
तेरावी स्टेज धोक्याची
डॉ अमित यांना भरभरून शुभेच्छा द्या.
ह्या मुलाखतीला आपापल्या मित्रमंडळात पसरवा. अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांची ही कामगिरी पोहोचली जावी हीच ईच्छा!
ग्रेट सिम्प्ली ग्रेट
ग्रेट सिम्प्ली ग्रेट
बारावा टप्पा पार !
बारावा टप्पा पार !
तेरावा टप्पा चालू(च) आहे.
तेरावा टप्पा चालू(च) आहे.
अमित समर्थ मेजर क्लासिफिकेशन
अमित समर्थ मेजर क्लासिफिकेशन मध्ये कुठल्याही नंबरला आले तरी ती खूप मोठी आचिव्हमेंट असेल.. आणि सध्याची परिस्थिती बघता ते सहज शक्य आहे
हो नक्कीच
हो नक्कीच
तेरावा टप्पा संपायला अंदाजे बारा तास आणि सुमारे २०० किमी. बाकी आहेत.
डॉक्टर अमित यांच्याकड़ून,
डॉक्टर अमित यांच्याकड़ून, तेरावा, अबब स्वरूपाचा टप्पा पार
हत्ती गेला शेपुट राहिले,
आता फक्त दोन टप्पे उरले
(No subject)
अबब!!
अबब!!
जहबहरहहहस्तं!
जहबहरहहहस्तं!
तुस्सी ग्रेट हो अमित साब.
व्लादिमिर ह्या आधीच्या सगळ्या टप्प्यांमध्ये लीडर होता मग ईथेच अचानक कसा ढेपाळला? ईंज्युरी वगैरे?
पीएर जबरदस्तं.
व्लादिमारच्या गुढघ्याला
व्लादिमारच्या गुढघ्याला दुखापत झालीये
Pages