कटकटीची पण चविष्ट - भरली वांगी

Submitted by योकु on 29 June, 2018 - 14:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

कमी कटकटीची भरली वांगी (https://www.maayboli.com/node/34499) ही रेस्पी केल्यावर बायडी च्या हातून आजून एकदा भरली वांगी घडली पण खास साबा ष्टाईलनं. त्याची ही रेसीपी. जरा वेळखाऊ प्रकरण आहे पण यिल्ड टिपिकल आचार्‍यांनी लग्नात केलेल्या भाजीसारखं होतं अर्थात चवही तीच साधते. स्पेशल एक्विपमेंटस म्हणजे लोखंडी कढई आणि ऐवजांमध्ये सावजी मसाला हवाच (इथे -https://www.maayboli.com/node/64884 सावजी मसाल्याची कृती पोस्टींत आहे)
तर लागणारे जिन्नस-
- अर्धा किलो लहान काटेरी वांगी
- ३ हिरव्या मिरच्या
- ३ मध्यम मोठे कांदे
- ८-१० लसूण पाकळ्या
- एखादा टीस्पून चिंचेचा कोळ नाहीतर एका लिंबाच्या पाव भागाचा रस किंवा पाव चमचा आमचूर
- चवीनुसार मीठ
- अर्धा टीस्पून साखर
- ३ चमचे लाल तिखट
- एक चमचा हळद
- अर्धा चमचा धणे पूड
- अर्धा चमचा जिरे पूड
- पाऊण ते एक चमचा सावजी मसाला
- २ वाट्या तेल
- पाव ते अर्धी वाटी प्रत्येकी तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं किसून
- वरून घालायला बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

- वांग्यांना + चिरा देऊन डेख जरा काढावं (संपूर्ण डेख काढायचं नाहीय) आणि मिठाच्या पाण्यात ठेवून द्यावं
- तीळ, शेंगदाणे आणि सुकं खोबरं निरनिराळं भाजून घ्यावं (रंग बदलता कामा नये आणि तसंपण ते नंतर शिजणार आहेच) आणि नंतर कांदा + हिरवी मिरची + लसूण यांसोबत महीन वाटून घ्यावं. हे वाटणांच बदगं दोन वाट्या तरी व्हायला हवं.
- सगळे कोरडे मसाले एकत्र करून ठेवावे.
- वांगी निथळून घ्यावी
- लोखंडी कढईत तेल तापत घालावं आणि जरा तापलं की वांगी त्यात सोडावी
- आलटवून-पलटवून वांगी खरपूस तळून झाली की काढून घ्यावी; यासाठी १०-१२ मिनिटं लागतील साधारणपणे
- त्याच तेलात आता वाटलेला मसाला घालावा आणि मंद आचेवर परतत राहावं. याकरता १२-१५ मिनिटं तरी लागतील.
- घरभर सुवास उधळला की मग यात कोरडे मसाले घालून अजून मिनिटभर परतावे आणि आणि मग मीठ-साखर घालावी
- यात आता आधी तळून ठेवलेले वांगे सोडावे आणि सगळं पुन्हा हलक्या हातांनी वांग्यांना मसाला मसाला नीट माखेस्तोवर २-३ मिनिटं परतावं
- आता यात २-३ कप गरम पाणी घालावं रस किती दाट-पातळ हवा त्याप्रमाणे आणि झाकण घालून भाजी मस्त उकळू द्यावी १० मिनिटं तरी
- मस्त रोगन असलेली खमंग वांग्याची भाजी तयार आहे. वाढायच्या भांड्यात काढून घेऊन मग वरून कोथिंबीरीने सजवावी.

वाढणी/प्रमाण: 
३-४ लोकांना पुरेल एव्हढी भाजी
अधिक टिपा: 

- वांगी, मसाले तळतांना आच मंदच हवीय आणि जागचे हलू नये. मसाला परतत राहावा लागतो, नजर हटी दुर्घटना घटी. तसंच वांगे तेलात सोडतांना जपून. त्यांच्या चिंरातही पाणी असतं आणि ते गरम तेलात आपलं अस्तित्व दाखवतं तेव्हा तेलाला बाऊ होतो आणि ते रडतं, उसळ्या मारतं.
- आमचूर (किंवा पर्याय) भाजी आंबट करायला वापरायचे नाहीत, जस्ट वांग्यांचा जरा अंगचा कडवटपणा असेल तर तो झाकण्यापुरेसं आंबट वापरायचंय
- भाजी झाल्यावर काढून दुसर्‍या भांड्यात लगेच ठेवावी नाहीतर रंग बदलेल (लोखंडी कढई वापरल्यानं)

माहितीचा स्रोत: 
बायडी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!!
मसाला परतातानाचा सुवास एकदम जाणवला.सोबत फोटो नसल्याने 5 मार्क कमी केलेत ☺️☺️

वेगळी पद्धत आहे, फार कटकटीची वाटली नाही, ह्यात वांगं कुठंल्या पायरीला भरलय ते शोधत होते पण ते भरायच नाही म्हणून सोपं वाटून घेतलय!

Amachyakade almost ashich bharli vangi kartat. Savji masala nasto, kala masala aani thoda gul asato,Aani vangyat masala bhartat.

फोटो पाहिजे
म्हणजे फोटोत चुका काढून मार्क कमी करण्याचा निर्मल आनंद लोकांना मिळतो☺️☺️☺️(आठवा: टोमॅटो चटणी, चॉपिंग बोर्ड,शेगडी)

रेसिपी भारी आहे पण फोटो हवाच. मला अनेक दिवसांपासून सौदिंडियन भरली वांगी लिहायची आहेत, तुझी रेसिपी वाचून हात शिवशिवत आहेत. बघू मुहुर्त लागतो का.

मस्त पाकृ.
महीन वाटून घ्यावं म्हणजे कसं?

मस्त पाकृ.
महीन वाटून घ्यावं म्हणजे कसं?

फोटो पाहिजे !!!

या पाकृ च्या जवळ जाणार्‍या कृतीनेच मसाला वांगी केली जातात आमच्याकडे पण. फक्त ती भरली वांगी स्टाईल होतात. आता अशी आधी वांगी शिजवून घेऊन करून पहायला हवीत.

Back to top