पानिपतानंतर रूढ झालेले वाक्प्रचार

Submitted by shantanu paranjpe on 19 May, 2018 - 05:38

पानिपतानंतर रूढ झालेले वाक्प्रचार

पानिपताने मराठा साम्राज्याला काय दिले यावर अनेक जणांमध्ये मतभेद आहेत. काही जण म्हणतात फायदा झाला आणि काही जण म्हणतात तोटा झाला. ते काहीही असो पण पानिपताने मराठी भाषेला खुप फायदा झाला. कसा म्हणताय? अहो अनेक वाक्प्रचार जनमानसात रूढ झाले आणि ते रोजच्या वापरत सुद्धा वापरले जाऊ लागले. त्यातील काही ‘सदाशिवरावभाऊ’ यांच्याबद्दल असणारे वाक्प्रचार हे पानिपत येथे राहणाऱ्या लोकांनीच वापरायला सुरुवात केली.

पानिपत झाले/पानिपत होणे:
हा वाक्प्रचार तर पानिपत झाल्यानंतर खूपच प्रचलीत झाला. पानिपतात झालेला मराठ्यांचा संहार आणि पराभव यांमुळे ‘पानिपत होणे’ म्हणजे पराभव होणे किंवा नष्ट होणे अशा प्रकारचा शब्दप्रयोग रूढ झाला.

विश्वास तर गेला पानिपतात :
पानिपतात विश्वासरावांचा दुर्दैवी अंत झाला. तर त्यासंदर्भात या वाक्यप्रयोग केला जातो. समजा एखाद्याने म्हणले की तुझा माझ्यावर अजिबात विश्वास नाही तेव्हा "विश्वास पनिपतातच तर गेला" असा शब्दप्रयोग सुरु झाला.

भाऊकी लूट:

हा वाक्प्रयोग तेव्हा वापरण्यात येतो जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या मनुष्याकडे एखादी वस्तू फुकट मागू लागतो. ज्याव्यक्तीकडे ही वस्तू मागण्यात येते तो माणूस जो दुसऱ्या माणसास ‘क्या भाऊकी लूट है क्या?’ असे म्हणतो.

याचा संदर्भ शोधायला गेलं तर कदाचित दोन घटनांमुळे हा वाक्यप्रयोग वापरत असावेत असे कळून येते. या दोन्ही घटनांचा उल्लेख शंकर नारायण जोशी यांची ‘पानिपत कुरुक्षेत्र वर्णन’ या आपल्या पुस्तकात केले आहे.

पहिली घटना अशी की, १५ ऑगस्ट १७६० च्या सुमारास जेव्हा भाऊ ससैन्य दिल्लीत येऊन पोहोचले आणि साधारण १० ऑक्टोबरला ‘कुंजपुरा’ हे ठिकाण घेतले, त्यावेळेला मुघलांचा पराभव करून मराठ्यांनी बरीच लूट केली. आता हा मुद्दा राहतो की यातील प्रत्यक्ष किती लूट पेश्व्यांच्याकडे आली?? कारण एवढ्या मोठ्या सैन्याचा खर्च भागवून किती रक्कम किती राहणार!! दुसरी घटना म्हणजे पानिपत नंतर अब्दालीच्या सैन्याने केलेली लूट जोशी यांच्यामते या दुसऱ्या घटनेमुळे हा वाक्प्रचार रूढ झाला असावा कारण ही लूट ही सहज मिळालेली होती.

क्या भाऊका घोडा लगा है!

हा अजून एक वाक्प्रचार वापरला जातो तो भाऊंच्या घोड्याच्या बाबतीत आहे. हा घोडा फारच उत्तम होता असे म्हणले जात असे. विशेष प्रसंग असले किच या घोड्याचा वापर भाऊ करत असत. तिथल्या लोकांच्या मते ज्यावेळेला कुंजीपुरावर मराठ्यांनी हल्ला केला तेव्हा गावाच्या बाहेर असणाऱ्या तटावरून आत उडी या घोड्याने मारली होती. त्यामुळे या घोड्याची किंमत ही भरपूर होती. तेव्हा जर एखादा शेतकरी बैलांच्या बाजारात बैल विकत घ्यायला जात असे तेव्हा समजा समोरच्या शेतकऱ्याने जर अवास्तव किंमत सांगितली तर विकत घेणारा, ‘ तुम्हारा बैल क्या भाऊका घोडा लागता है?” असा वाक्यप्रयोग करायचे. याचा अर्थ तुझा बैल इतका चांगला आहे का की तू त्याची इतकी किंमत मागतो आहेस.

भाऊका बन्या:

हा एक मजेशीर शब्दप्रयोग वापरला जातो. भाऊंनी उत्तरेत येताना बरेसचे द्रव्य आणले होते आणि लढाईनंतर बरीच लुटालूट झाली त्यात बरेसचे स्थानिक लोक अचानक श्रीमंत झाले. तेव्हापासून कुणी मनुष्य अचानक श्रीमंत झाला तर त्याला “भाऊका बन्या” असे म्हणले जाऊ लागले.

भाऊका प्रताप है:

ही सुद्धा एक मजेशीर गोष्ट आहे. भाऊंनी पानिपतवर इतका पराक्रम गाजवला की त्याचे पोवाडे तिथल्या भागात गायले जाऊ लागले. पानिपतच्या आजूबाजूला “सुखाखेडी” नावाचा भाग आहे, तर तिथे कुस्त्यांचे आखाडे लढवले जातात आणि या भागात बाहेरचा कुणीही पहेलवान जिंकू शकत नाही आणि नेहमी इथल्याच पहेलवानाचा विजय होतो. याच गोष्टीला इथले लोकं, “भाऊचा प्रताप” असे म्हणतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा पण लेख आवडला... भारी लिहीता बरं का तुम्ही.... संदर्भासह स्पष्टीकरण ते ही इतक्या सोप्या शब्दात देणं छान जमतं तुम्हाला... Happy

सुरेख.
पानिपत आणि भाऊ हा माझा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. लिहित रहा असेच.

अनेक जण म्हणतात खरे. पण पानिपत १७६१ मध्ये झाले होते त्यामुळे वर्षाचा संबंध नसावा. कदाचित पानिपतच्या वेळी अनेक खटपटी कराव्या लागल्या त्यामुळे म्हणत असावेत. मला कल्पना नाही पण याची

अनेक जण म्हणतात खरे. पण पानिपत १७६१ मध्ये झाले होते त्यामुळे वर्षाचा संबंध नसावा.
नवीन Submitted by shantanu paranjpe on 19 June, 2018 - 11:54
<<
मित्रा,
पानिपतचे युद्ध जरी १४ जानेवारी १७६१ मध्ये झाले असले, तरी त्या मोहिमेची सुरुवात सन १७६० मध्येच झाली होती. तेंव्हा वरिल हेम यांच्या म्हणण्यात तथ्थ असू शकते.

मराठे १३ जानेवारी १७६१ मध्ये पुण्यातून निघाले व १४ जानेवारीला पानीपतावर पोहचून अब्दालीबरोबर युद्ध लढले असे काही झाले नसावे असे मला तरी वाटते.

मराठे १३ जानेवारी १७६१ मध्ये पुण्यातून निघाले व १४ जानेवारीला पानीपतावर पोहचून अब्दालीबरोबर युद्ध लढले असे काही झाले नसावे असे मला तरी वाटते.>>> नक्कीच!! एका दिवसात एवढी मजल शक्यच नाही!!

या सर्व शक्यता आहेत. त्यामुळे असू सुद्धा शकते किंवा नसू सुद्धा शकते!!