राणी पद्मावती

Submitted by कल्पतरू on 16 July, 2017 - 13:35

येत्या वर्षाच्या अखेरीस एक हिंदी चित्रपट येतोय. राणी पद्मावती नावाचा. दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारतेय. आता हा चित्रपट रिलीज होणार आणि त्यामध्ये आपल्याला निर्मात्यांच्या अगम्य आणि अतर्क्य कल्पनाशक्तीचे(जसे बाजीराव मध्ये सुरवातीलाच मस्तानीची धडाकेबाज एंट्री, पिंगा गाण्यावर काशी आणि मस्तानीचा डान्स वैगरे वगैरे) दर्शन होऊन खरी राणी पद्मावती कुठेतरी हरवून जाणार. कल्पना आणि आभासी जगाच्या या दुनियेत राणी पद्मावती गुरफटून जाण्याआधी ती जशी मला भावली तशी इथे साकारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न.जालावरून जेवढे मिळाले तेवढे फोटो वापरून एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे त्याची लिंक खाली देत आहे.

https://www.youtube.com/watch?v=bkra7FvUrTo

राणी पद्मावती/पद्मिनीच्या कथेला खरी सुरवात झाली ती १२व्या शतकाच्या उत्तरार्ध.गझनीचा मुहम्मद घोरी हा एक परकीय आक्रमक होता. याने सात वेळा दिल्लीवर आक्रमण केलं होतं.सातही वेळा पृथ्वीराजने याला हरवून कैदेत टाकलं होतं. पण प्रत्येकवेळी याची दया येऊन याला सोडूनही दिलं होतं. आठव्यांदा हा पुन्हा आला यावेळी मात्र पृथ्वीराजचा कपटाने पराभव झाला आणि दिल्लीवर परकीय आक्रमकांचा अंमल सुरु झाला. दिल्लीच्या इतिहासाला उतरती कळा लागली. लूटमार आणि धनाच्या लालसेने भारतात पाऊल ठेवलेल्या या परकीय आक्रमकांच्या मनात भारतीय जनतेबद्दल किंचितही सहानुभूती न्हवती. इतिहासाची पाने चाळताना अनेक परकीय आक्रमकांसोबत आपली ओळख होते. हुमायु आजारातून बरा व्हावा म्हणून स्वतःचा जीव पणाला लावणारा बाप बाबर, तर दुसरीकडे बाप कधी मरतोय याची वाट पाहणारा औरंगजेब. हिंदू मुस्लिम ऐक्याच्या ध्यास घेतलेला अकबर तर दुसरीकडे तलवारीला भूक लागले हे कारण सांगून लाखो निरपराध हिंदू जनतेची कत्तल करणारा तैमूर लंग. या सगळ्या आक्रमकांच्या मनाचा थांग घेऊन त्यांना नीच आणि क्रूर या बिरुदावलीचा लेप असणाऱ्या धाग्यात गुंफण म्हणजे जरा कठीणच. पण एक गोष्ट नक्की होती ती म्हणजे यांच्या कारकिर्दीत भारतीय जनतेवर अनन्वित अत्याचार झाले. खूप सारे जोहर (राजपूत स्त्रिया स्वतःला मुघलांच्या स्वाधीन करण्यापेक्षा मोठा अग्नी प्रज्वलित करून त्यात प्रवेश करत असत.) मुघलांच्या कारकिर्दीत या देशाने अनुभवले. जसं राजा महाराजांनी दिल्लीवर राज्य केलं तसं गुलाम घराण्यांनीसुद्धा दिल्लीवर राज्य केलं. पृथ्वीराजच्या पराभवानंतर दिल्लीवर गुलाम घराण्याचा अंमल सुरु झाला. ११९२साली सत्तेवर आलेल्या या गुलाम घराण्याचा शेवट खिलजी घराण्याने केला आणि १२९० साली खिलजी घराण्याने दिल्लीची सत्ता काबीज केली. याच खिलजी घराण्याच्या कारकिर्दीत घडलेली, मनाला चटका लावून जाणारी कथा म्हणजे राणी पद्मिनीचा इतिहास. हा इतिहास आहे राणी पद्मिनीच्या आत्मसम्मान आणि आत्मसमर्पणाचा, अल्लाउद्दीन खिलजीच्या नीच आणि वसानाधुंद मनाचा, राजपूत राजा रतनसिंग आणि त्याच्या शौर्याचा.
राणी पद्मिनी/पद्मावती हि चित्तोडचा राजा रतनसिंगची पत्नी होती.राणी पद्मिनी आणि राजा रतनसिंग यांच्या विवाहाविषयी एक आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार राणी पद्मिनी ही सिंहल राज्याचा (आताची श्रीलंका) राजा गंधर्व सेन आणि राणी चंपावतीची राजकन्या होती. पद्मिनीकडेएक बोलणारा पोपट होता. ती त्याच्यासोबत तासंतास गप्पा मारत असे. ही गोष्ट राजा गंधर्वसेनला आवडत नसे, एकदा रागाच्या भरात त्याने पोपटाला ठार मारण्याचे आदेश दिले, पण पोपटाला या कट कारस्थानाचा आधीच सुगावा लागला आणि तो तेथून फरार झाला आणि चित्तोड राज्यात येऊन राणीच्या सौंदर्याची प्रशंसा राजा रतनसिंगसमोर केली.त्या प्रशंसेवर प्रभावित होऊन राजा रतनसिंगने पद्मिनीच्या स्वयंवराला उपस्थिती लावली आणि पण जिंकून राणी पद्मिनीसोबत विवाह केला. या आख्यायिकेवर आता किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याच्या प्रश्न आहे. तर आपण आता मूळ कथेकडे वळू.
राणी पद्मावतीच्या सौंदर्याची चर्चा त्या काळी संपूर्ण भारतभर पसरली होती. राणी पद्मिनी विवाहयोग्य झाल्यावर तिच्या वडिलांनी म्हणजेच सिंहल राज्याचा राजा गंधर्वसेनने एक स्वयंवर आयोजित केलं. पद्मिनीच्या सौंदर्याची ख्याती ऐकून अनेक दूर दूरच्या राजांनी त्या स्वयंवराला आपली उपस्थिती लावली होती.चित्तोडचा राजा रतनसिंग याने बाकीच्या राजांचा पराभव करून तो पण जिंकला आणि राणी पद्मिनीसोबत त्याचा विवाह संपन्न झाला.
राणी पद्मिनीला घेऊन तो चित्तोडमध्ये परतला. काही दिवस असेच गेले. एकदा दरबार भरलेला असताना राजाने त्याच्या दरबारातील कवी राघवचा अपमान केला. राघव तो राग मनात ठेऊन दिल्लीला गेला. त्यावेळी दिल्लीची सत्ता अल्लाउद्दीन खिलजीकडे होती. अल्लाउद्दीन खिलजी हा एक निर्दयी आणि क्रूर स्वभावाचा व्यक्ती होता. काही वर्षांपूर्वी दक्षिणेतून लुटून आणलेली दौलत आपल्या काकाला दाखवण्यासाठी एका महालात बोलावलं होतं. काका दौलत पाहण्यात मग्न असताना पाठीत खंजीर खुपसून याने आपल्या काकाची हत्या केली होती. अशा या निर्दयी आणि रक्तपिपासू माणसाच्या कानावर कवी राघवने राणी पद्मावतीच्या सौंदर्याची प्रशंसा केली. ती प्रशंसा ऐकून खिलजीच्या मनात राणी पद्मिनीला मिळवण्यासाठी लालसा निर्माण झाली. आणि त्या लालसेमुळे त्याने चित्तोडवर आक्रमण केलं. चित्तोडच्या किल्ल्याला त्याने अनेक महिने वेढा दिला. अल्लाउद्दीन खिल्जीचं पारडं हे सैन्य,शस्त्र, युद्धकौशल्य या सगळ्याच बाबतीत रतनसिंगच्या तुलनेत जास्त होतं. पण चित्तोडचा किल्ला हा एक अभेद्य किल्ला होता. त्याची सौरचना, आकारमान आणि अन्य बांधकामं अशी काही भक्कम होती की अल्लाउद्दीनच्या प्रचंड सेनेलासुद्धा तो किल्ला भेदणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती.
अल्लाउद्दीन खिलजीला आतापर्यंत समजून चुकलं होतं की किल्ला सरळधोपट मार्गाने जिंकता येणार नाही. त्याच्या कपटी मानाने आता उचल खाल्ली. त्याने राजा रतनसिंगला एक तहाचा खलिता पाठवला, त्यात लिहिलं होतं की "मला फक्त एकदा राणी पद्मिनीचं ओझरतं दर्शन घडवून आणा. मी तिच्या सौंदर्याची खूप प्रशंसा ऐकले. तिला पाहिलं की मी पुन्हा दिल्लीला निघून जाईन." सुरवातीला हा प्रस्ताव ऐकून रतनसिंग क्रोधीत झाला. परंतु यावर एक तोडगा काढण्यात आला तो म्हणजे खिलजीला राणीचं प्रतिबिंब एका आरशात दाखवलं जाईल कारण एवढ्या छोट्या गोष्टीवरून तो त्याच्या सैनिकांना मरणाच्या दारात उभं करू शकत न्हवता.
अखेर खिलजीने पद्मिनीचं सौंदर्य पाहण्यासाठी महालात प्रवेश केला. राणी पद्मिनी दूर एका तळ्याच्या मधोमध असेलेल्या महालात उभी राहिली आणि आरशाच्या मदतीने तिचं दर्शन खिलजीला घडवून आणलं. एवढ्या दुरूनसुद्धा राणीचं ते सौंदर्य पाहून खिलजीच्या मनातील राणीला मिळवण्याची ईच्छा अजून प्रबळ झाली. किल्ल्याबाहेर निघताना राजा रतनसिंगला बोलण्यात फसवून खिलजी त्याला सातही दरवाज्याच्या पार घेऊन आला. तिथे दबा धरून बसलेल्या त्याच्या सैनिकांनी रतनसिंगला कैद करून खिलजीच्या छावणीत घेऊन गेले. खिलजीच्या हाती आता हुकुमाचा एक्का लागला होता. त्याने राणीला एक संदेश पाठवला त्यात लिहिलं होतं जर राणीने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं तर तो रतनसिंगला मुक्त करेल. स्वतःच्या पतीला सोडवण्यासाठी राणीने ही अट मान्य केली पण तिनेसुद्धा दोन अटी खिलजीसमोर ठेवल्या पहिली अट होती तिच्यासोबत तिच्या ७०० दासी तिची देखरेख करण्याकरता येतील आणि दुसरी अट म्हणजे ती रतनसिंगला शेवटचं एकांतात भेटू इच्छीते. खिलजीला या अटींवर काहीच हरकत न्हवती.
दुसऱ्या दिवशी सकाळी चित्तोड किल्ल्यातून ७०० पालख्या खिलजीच्या छावणीकडे यायला निघाल्या. त्या पालख्या पाहून खिलजी खुश झाला. पण त्याला हे माहित न्हवतं की पालखीत शस्त्राधारी सैनिक बसलेत आणि पालखी उचलण्याचं कामसुद्धा सैनिकच करत आहेत. गाफील असलेल्या खिलजीच्या सैनिकांवर रतनसिंगच्या सैनिकांनी विजेच्या चपळाईने हल्ला चढवला, त्यांना तलवार म्यानातून बाहेर काढण्याचीही उसंत न देता रतनसिंगला सोडवून पुन्हा किल्ल्यात घेऊन आले. या घटनेनंरतर छोट्या मोठ्या चकमकी दोन्ही सैन्यात अधूनमधून घडत राहिल्या, पण हळूहळू चित्तोडचे सैनिक वीरगतीला प्राप्त होऊ लागले. किल्ल्यावरची रसदपण आता संपली होती. जेव्हा राणी पद्मिनीला चित्तोडची हार दिसू लागली तेव्हा तिने खिलजीच्या स्वाधीन होण्यापेक्षा आगीला कवटाळणं पसंद केलं. शेवटच्या क्षणी रतनसिंग त्याच्या मूठभर सैन्यासह विशालकाय मुघलसेनेवर तुटून पडला. त्याच वेळी किल्ल्यात प्रचंड अग्नी प्रज्वलित करण्यात आला. राणी पद्मिनीसोबत इतर साऱ्या राजपूत स्त्रियांनी त्या अग्नीत प्रवेश करून इतिहासात अमरत्व मिळवलं. ज्या सौंदर्यावर पूर्ण चित्तोडला गर्व होता ते सौंदर्य आहुती बनून अग्निमध्ये सामावलं होतं. राणी पद्मिनीने आपल्या आत्मबलिदान आणि आत्मसर्पणाने इतिहासात अढळ स्थान मिळवलं. रतनसिंग आणि त्याचे सैनिक पराक्रमाची शर्थ करत वीरगतीला प्राप्त झाले. खिलजी जेव्हा किल्ल्यात पोहचला तेव्हा त्याच्या हाती लागली ती फक्त जळालेल्या देहांची राख. जेव्हा जेव्हा राणी पद्मिनीचा उल्लेख होतो तेव्हा नकळत मला कुसुमाग्रजांच्या चार ओळी आठवतात.
खळखळु द्या या अद्य शृंखला हातापायात
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम, आवळा कसूनिया पाश
पिचले मनगट परी उरांतिल अभंग आवेश

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चितोडगड च्या वेढ्याबद्दल या आधी वाचलं होतं पण इतकं सविस्तर आजच.. छान लिहीलं आहे.
ज्या सौंदर्यावर पूर्ण चित्तोडला गर्व होता ते सौंदर्य आहुती बघून अग्निमध्ये सामावलं होतं. >>>
'बघून' ऐवजी 'बनून' हवं आहे. Happy

छान, आधी साधारण माहिती होतेच. काही अतिरीक्त माहितीसह उजळणी झाली. आता कधी भन्साळीला झेलायची वेळ आलीच तर तयार असेन Happy

गझनीचा मुहम्मद घोरी हा एक परकीय आक्रमक होता. याने सात वेळा दिल्लीवर आक्रमण केलं होतं.सातही वेळा पृथ्वीराजने याला हरवून कैदेत टाकलं होतं. पण प्रत्येकवेळी याची दया येऊन याला सोडूनही दिलं होतं. आठव्यांदा हा पुन्हा आला यावेळी मात्र पृथ्वीराजचा कपटाने पराभव झाला आणि दिल्लीवर परकीय आक्रमकांचा अंमल सुरु झाला. >>>>

यावरून 'If you fool me once, shame on you. If you fool me twice, shame on me' हे आठवले Sad

बाकी चांगली माहिती.

हि एक मनोरंजक लोककथा आहे।
कुठल्याही इतिहास संशोधकास त्याचे अस्सल पुरावे मिळालेले नाही।

हि एक मनोरंजक लोककथा आहे।
कुठल्याही इतिहास संशोधकास त्याचे अस्सल पुरावे मिळालेले नाही।

चीकू, प्लस सेव्हन एटी सिक्स.
मी देखील हे काल लिहिणार होतो.

पण मला ते सात वेळा कैद वगैरेही दंतकथा वाटतेय. एखादा राजा सातवेळा कशी चूक करू शकतो? चाणक्य असता तर काय बोलला असता अश्या राजाला..

काय खरं काय खोटं देव जाणे. वाचलेलं ऐकलेलं लिहिण्याशिवाय पर्याय नाही दुसरा. टाईम मशीन घेऊन त्या काळात परत नाही ना जाऊ शकत. पण हे मात्र खरं आहे कि पुड्या सोडल्या नसत्या तर हा लेख पाच ओळीत आणि पद्मावत पाच मिनिटात संपला असता.

Back to top