उदर भरण नोहे …

Submitted by Pradipbhau on 22 February, 2018 - 04:05

उदर भरण नोहे ….
आपले आयुष्य किती गमतीचे आहे पहा. आयुष्यभर राब राब राबायचे. पैसा कमवायचा. मुलाबाळासाठी साठवायचा. आपले आबाळ करायचे. अन एक दिवस अनपेक्षितपणे मरुन जायचे. याला काय आयुष्य म्हणायचे. मला तर हे मुळीच पटत नाही. माणसाने कसे खाऊन पिऊन मजेत रहावे. काय पटतय ना तुम्हाला. हो बरे झाले खाण्यावरुन आठवले. तर मित्रहो खरे तर खाणे हा माझा विक पाईँटच समजा ना. मला नाष्टा जेवण वेळेवरच व पुरेसे लागते. नाही तर रूद्रावतार धारण होतो. माझ्या प्रेमळ बायकोला हे माहीत असल्याने तिची नजर स्वयपाकावर व घड्याळाच्या काट्यावर सारखीच असते.
असो तर मुद्दा आहे जेवणाचा. मी मिश्राहारी म्हणजे आठवड्यातून चार दिवस शाकाहारी व दोन दिवस मांसाहारी. कधी कधी बायकोने नाराजीचा सूर ओढला तर आठवडाभर शाकाहारी. काय करणार निव्रूत्त कर्मचारी असल्याने ऐकावच लागते. शिवाय जेष्ठ नागरीक असल्याने आधाराची गरज. निव्रुत्ती नंतर वैध्यकीय सल्ला देण्याचे निम्मे अधीक काम बायकाच करीत असल्याने काय खायचे काय प्यायचे हे त्यानीच ठरवायचे असते. घरात काय हो बंधनच बंधन. मनसोक्त खाता येते ते बाहेर जेवायला गेल्यानंतर. त्यामुळे मला लग्न, मुंज, वास्तुशांत, गाव जत्रा, रिसेप्शनला जाणे आवडते.
मूळ मुद्दा आहे तो जेवणाच्या पध्दतीचा. पूर्वी कशा जेवणावळीच्या पंगती असत. ऐसपैस पाटावर बसता येत असे. पुरूष बायका यांच्या समोरासमोर रांगा असत. नशीब चांगले असेल तर एखादी सुंदर ललना आपल्या समोर आली तर काय दुधात साखरच. ताटाभोवती सुंदर रांगोळी काढलेली असे. उदबत्तीचा सुवास दरवळत असे. पाण्याचा स्वच्छ तांब्या डाव्या बाजूला असे. सुंदर बायका नटून थटून वाढत असत त्यांच्याकडे चोरुन पहात चार घास जास्त जात. आग्रहाचे वाढणे होते. सावकाश जेवा, आणखी एक जिलेबीचे कडे घ्या ही वाक्ये ऐकली की मन कसे त्रुप्त होत असे. एका वेळी शंभर जणांची पंगत उठे. ये पाणी आण, ये जिलेबी आण, अरे ताक भात वाढायला घ्या अशा सुचनानी एक वेगळे वातावरण निर्माण होत असे. काही का असेना त्या जेवणात माणूसकीचा ओलावा असे.
काळ बदलला. बायकांच्या कमरा धरल्या. वाकून वाढणे जमेना. त्यामुळे पाटाची जागा टेबल खुर्च्यानी घेतली. तेंव्हापासून मात्र मी जेवायला जायचे टाळू लागलो. काय ती जागा मिळविण्यासाठी धडपड चालते. लग्नात तर मंगलाष्टक संपते न संपते तोच जेवणासाठी जागा मिळविण्यासाठी एकच धावपळ होते. बर आत जाणारे स्वतः बसतात अन एसटी त जागा धरल्याप्रमाणे खुर्च्यांवर टोपी रूमाल ठेऊन दुसर्याची जागा धरतात.
धडपड करुन जागा मिळाली तर नेमकी त्याच ताटात वाटी एकच असते. बाकीच्या ताटात दोन वाट्या त्यात भर म्हणून आमटी वाढणारा आधी येतो व एकमेव वाटी आमटीने भरुन जातो. थोड्यावेळाने मठ्ठा वाढणारा येतो. ताटात वाटी नाही पाहून तो तसाच पुढे जाऊ लागतो. मी त्याला वाटी मागताच तो अरे एक वाटी दे असे ओरडतो. जेवण संपेपर्यंत वाटी येत नाही मी मात्र मठ्ठा मुकतो.
घरी आल्यावर बायको मठ्ठा किती छान होता याचे वर्णन करते. मी मौन पाळतो ती मात्र त्याच्याशिवाय दूसरा विषय काढत नाही. अग मला मठ्ठा मिळालाच नाही हे मी वाटी पुराणासह तिला सांगतो. किती वेंधळे हो तुम्ही साधी एक वाटी तुम्हाला मागता आली नाही असा शेरा ती मारते.
आणखी एक आपण वरण भात खातो न खातो तोच आपल्या खुर्ची मागे कोणीतरी येऊन उभा राहिलेला असतो. त्याला पहिल्या पंक्तीत जागा न मिळाल्याने तो आपण जेऊन कधी उठतो या प्रतिक्षेत असतो. आवर की किती खातोस असे तो म्हणत असल्याचा उगाचच मला भास होतो.
बर वाढप्यांची जेवण वाढण्याची पध्दत तरी योग्य हवी. ताट वाट्या ठेवून झाल्या की भात वाढणारा भाताची पाटी व भातवाढी घेवून धावतच सुटतो. भातावर वरण वाढणाराची तह्रा वेगळीच असते. वरणाच्या पातेल्यात तो पळी नुसती बुडवतो अन भातावर उपडी करतो. तूप वाढणाय्राच्या चमच्यातून तुपाचा थेंब देखील भातावर पडत नाही. तेवढ्यात कोण तरी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रहरीचे पुकारा करते अन ताटात जेवढे आले त्यावर ताव मारण्यास सुरवात होते.
बुफे पध्दतीचे जेवण आजकाल लोकप्रिय झाले आहे. या प्रकाराबाबत तर काय बोलावे. ताट वाट्या मीठ लिंबू पासून मुख्य मेनू पर्यंत सर्व टेबलावर मांडून ठेवलेले असते. आधी पेपर हातावर त्यावर ताट त्यात वाट्या असा सगळा थाट असतो. वाट्या नेमक्या किती घ्यायच्या याचा अंदाज मला आजवर लागला नाही. ताट घेवून फिरताना कसरतच करावी लागते. मीठ, लिंबू, पापड, कोशिंबीर, भजी, साधा भात, मसाला भात, आमटी, तळण किंवा बाँबी, पुरी, स्वीट इतके सारे पदार्थ न विसरता ताटात घ्यावे लागतात.
स्वतःला सावरत डाव्या हातात ताट घेऊन उभे राहून जेवावे लागते. खुर्च्यांची व्यवस्था जरी असली तरी काही मंडळी एका खुर्चीवर ताट ठेवून एका खुर्चीवर आपण बसून जेवणाचा आस्वाद घेत असतात त्यामुळे खुर्ची आपल्या वाट्याला येतच नाही.
बुफे पध्दतीचा एक फायदा होतो तो म्हणजे आपल्याला आवडणारा पदार्थ उपलब्ध असेल तर यथेच्छ खाता येतो. मांसाहारी भोजनाची गंमत तर वेगळी असते. पंक्तीत हे भोजन असेल तर थाळीभर रस्सा चार पाच पीस खायला मिळतात. उलट बुफे असेल तर शिल्लक असल्यास भरपूर पीस घेता येतात. त्यातही लोक शक्कल लढवितात. एका ठिकाणी मांसाहारी जेवणाची बुफे पध्दतीने रचना करताना सुरवातीला मीठ, लिंबू, कांदा, भाकरी, बिर्याणी, रस्सा, शेवटी पीस अशी रचना केली होती. खवय्यानी प्रथम ताटात पीस घेण्यासाठी गर्दी केली.
एक मात्र नक्की पंक्तीत जेवण्यात जी मजा आहे ती बुफे पध्दतीत नाही. पंक्तीत कसे सर्वात आधी जागा पकडण्यासाठी धडपड, मग विना फाटलेली पत्रावळी किंवा स्वच्छ ताटाचा शोध, त्याच वेळी अर्धे लक्ष चप्पल बुटाकडे असा सारा मामला असतो. काय वाढायला आणतात हे पाहून बरेच जण ताटातील पदार्थ संपवत असतात. शेवटी काय तर उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळी गंमतच घालवतात लग्नाच्या जेवणाची आ़जकाल. लग्नाला कसला बूफे?
मुंबईत एकदा कसल्या तरी पार्टीला गेलो होतो. थोड्याच वेळात केटरर ने सांगितले अन्न संपले! लोकांनी आमच्या अंदाजापेक्षा जास्त खाल्ले! अर्धे लोक उपाशी! आणखी करून आणा की, पैसे देऊच. तर म्हणे आता शक्य नाही!!
मुंबईत गोरेगावात त्याला संध्याकाळी सहा वाजता अन्नाची तरतूद करता आली नाही?? काय ही केटरिंग कंपनी!

मला तर आजकाल आपल्या घरीच जेवायला आवडते. हवे ते हवे तेव्हढे खाता येते! जरा आधी सांगितले की झाले. दुर्वास ऋषींसारखे आयत्या वेळी काहीतरी मागायचे नि नाही दिले तर शाप द्यायची धमकी द्यायची असले करू नये (कितीहि वाटले तरी. कारण तुमच्या शापाला कुणि घरात घाबरत नाहीत, उलट पुनः घरात जेवायचे असेल तर जरा जपूनच.)

आणखी करून आणा की, पैसे देऊच. तर म्हणे आता शक्य नाही!!
मुंबईत गोरेगावात त्याला संध्याकाळी सहा वाजता अन्नाची तरतूद करता आली नाही?? का
>>>>

1) कदाचित आतली खबर वेगळी असावी. यजमानांचे जास्तीचे जेवणाचे बजेट नसावे.

2) संध्याकाळचे सहाला जेवण संपले हा जेवणासाठी जरा मधलाच टाईम वाटतो, ना लंच ना डिनर.. वेगळीच ऑर्डर असल्याने ज्यादा मागणी पुर्ण करणे जमले नसावे..

3) गोरेगाव म्हणजे अगदीच मुंबई नाही. पश्चिम उपनगर आले. त्यातही कमीजास्त विकसित भाग असतीलच.