हिरव्या मटाराची मसाल्याची उसळ

Submitted by योकु on 4 January, 2018 - 02:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- दाणे/ अडीच वाट्या ताजे मटार दाणे
- दोन लहान बटाटे किंवा एक मध्यम मोठा बटाटा (वापरला नाही तर चालेल पण यामुळे जरा रस मिळून येतो आणि खरपूस बटाटा चवीला फार टेस्टी लागतो)
- १०/१२ लसूण पाकळ्या
- पेरभर आल्याचा तुकडा
- ३/४ हिरव्या मिरच्या (तिखट कमी हवं असेल तर कमी घेता येतील पण वगळू नका; हिरव्या मिरचीचा स्वाद हवाच)
- एक मध्यम मोठा कांदा
- एक मोठा टोमॅटो
- पाव चमचा लाल तिखट
- पाव चमच्याहून जरा कमीच हळद
- चवीनुसार मीठ
- तेल
- मोहोरी
- हिंग (मिळत असेल तर हिरा हिंग वापरावा; फारच मस्त स्वाद येतो. हिरा हे कंपनीचं नाव नाहीय)
- सावजी मसाला (नेहेमीचा काळा + गरम मसाला किंवा गोडा मसाला + जराशी धणे-जिरेपूड + लवंग-दालचीनीपूड + गरम मसाला; यांतून जवळपासची चव साधेल)
- वाटी/ दोन वाट्या कढत पाणी

क्रमवार पाककृती: 

- मटारदाणे निवडून, धूवून चाळणीत/रोवळीत निथळत ठेवावे; कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. बटाट्याची सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करून पाण्यात घालून ठेवाव्यात
- लसूण, आलं आणि हिरवी मिरची यांना मिक्सरमधून बारीक करून घ्यावं; पाणी वापरायची गरज नाही. थोडं जाड राहीलं तरी चालेल
- लोखंडी कडई असेल तर ती वापरावी नाहीतर नेहेमीच्या जाड बुडाच्या भांड्यात जरा दमदमीत तेल घेऊन तापत ठेवावं
- तेल तापलं की मोहोरी आणि हिंग घालून फोडणी करावी
- यात आलं, लसूण मिरचीचा पेंड टाकून जरा परतायचं मग कांदा घालून परतायचंय. यानंतर बटाटा घालून जरा होऊ द्यायचा; मग निथळलेले मटार घालून तेलावर जरा परतायचे
- सगळ्या भाजीला तेल-मसाला माखला की मग हळद, लाल तिखट, सावजी मसाला आणि मीठ घालून पुन्हा परतायच
- यात आता टोमॅटो च्या फोडी आणि कढत पाणी घालून उसळ्/भाजी शिजू द्यावी
- झाकण घालून भाजी मस्त उकळू द्यावी
- सगळं नीट शिजलं की मसालेदार तरीही मटारामुळे जराचा गोडसरपणा असलेली भाजी/उसळ तयार आहे
- गरमागरम टेष्टी उसळ, गरम फुलके आणि ताज्या गाजर-फ्लॉवर-मिरचीच्या लोणच्या बरोबर हाणावी

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

- भाजी शिजली की अंगाबरोबर रस राहील एव्हढं आधणाचं पाणी हवं
- लाल तिखट आणि हिरवी मिरची फार नको; मसाल्याचा जरा झणका आणि मटाराचा गोडसरपणा यावर भाजी जिंकेल

माहितीचा स्रोत: 
सासूबै
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पाकृ!
>>गरमागरम टेष्टी उसळ, गरम फुलके आणि ताज्या गाजर-फ्लॉवर-मिरचीच्या लोणच्या बरोबर हाणावी>> लोणच्याची पाकृ देखील येवू दे.

मस्तच आहे.

सावजी मसाला वापरला नाही कधी पण तो वगळता ह्या टाईप करते मी. कधीकधी हे सर्व वापरून पाणी जास्त न घालता करते आणि मग त्याची मटार करंजी करते.

मस्त रेसिपी. सावजी मसाल्याऐवजी दुसरा कोणता चालेल?
पाव भारी (मस्त) लागेल ह्याबरोबर. Wink

मस्त आहे. बहुतेक सावजी मसाला न वापरता नुसता घरचा मसाला आणि धणे जीरे पूड घालून केलेली आहे मटार उसळ. मस्त होते !

छान आहे रेसिपी. ऑफिशियली ब्याडवर्ड आहे की रेसिपीत. मला मटारच्या उसळीमध्ये बटाटा अजिबात आवडत नाही तर मी फ्लॉवर घालेन.

भारी आहे . नक्की करणार .
एकदा वाटीभर धण्याच्या मापात सावजी मसाल्याची सविस्तर कृती टाकायचं बघा राव. तुम्ही आग्रह केल्यावर सासू बाई काही नाही म्हणणार नाहीत .

>>एकदा वाटीभर धण्याच्या मापात सावजी मसाल्याची सविस्तर कृती टाकायचं बघा राव. तुम्ही आग्रह केल्यावर सासू बाई काही नाही म्हणणार नाहीत .>> +१

मस्त आहे रेसिपी .
फक्त दोन अडीच वाट्या मटारला 10/12 लसूण पाकळ्या जरा जास्त होतील असं वाटतंय. लसूण थोडी कमी घालून करून बघेन.

लोणच्याची पाकृ देखील येवू दे.
नवीन Submitted by स्वाती२ on 4 January, 2018 - 18:29
>>>
प्रमाण : सर्व जिन्नस मिळून २५०~३०० ग्रॅम. (मध्यम बरणी)
आम्ही घरी करतो तेव्हा गाजर बारीकच आणतो. गाजराच्या बारीक चकत्या, मटारचे दाणे, फ्लाॅवरचे लहानसहान तुकडे, मध्यम तिखट मिरचीचे अर्ध्या पेराएवढे तुकडे एकत्र करून घेणे त्यावर नाॅर्मल कैरी लोणचे मसाला ४~५ चमचे टाकवून हलवून घेणे. गरम करून थंड केलेले तेल दोन पळ्या टाकणे. (मसाला चिकटून रहाण्यासाठी. )
४~५ दिवस टिकते.

याच प्रकारे ओली हळद चकत्या करून मिरची वरीलप्रमाणे आणि लिंबू एकाच्या ८ फोडी करून लोणचे बनवतात.

हि रेसिपी माझी नाही. मिपावर मिळाली ती इथे देतेय (सानिका स्वप्निल यांची बहूतेक). मसाला छान होतो. मी नॉनव्हेजला हाच वापरते.
सावजी मसाला साहित्यः
सावजी चिकन/ मटण हे झणझणीत, जहाल तिखट असते. तिखटाचे प्रमाण थोडे कमी, आमच्या चवीप्रमाणे बसवले आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी - जास्तं, तब्येतीला झेपेल असे प्रमाण बसवावे Happy
३ टेस्पून सुके खोबरे
३ टेस्पून ज्वारीचे पीठ
६-७ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी - जास्तं)
१/२ टीस्पून धणे
१/२ टीस्पून बडीशेप
१/२ टीस्पून शहाजिरे
१/२ टीस्पून पेक्षा थोडी जास्तं टीस्पून खसखस
४ हिरवी वेलची
२ मसला वेलची
थोडे दगडफूल
४-५ लवंगा
९-१० काळीमिरी
१ जायपत्री
२-३ दालचिनीच्या काड्या तोडून
पाकृ:
एका पॅनमध्ये धणे, बडीशेप, शहाजिरे, खसखस, हिरवी वेलची, मसला वेलची, दगडफूल, लवंगा, काळीमिरी, जायपत्री व दालचिनी कोरडेच मंद आचेवर भाजायला घ्या.
थोडे लालसर झाल्यावर त्यात सुके खोबरे व लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या.
शेवटी ज्वारीचे पीठ घालून मंद आचेवर थोडे लालसर भाजून घ्या.
गार झाले कि कोरडेच मिक्सरवर वाटून घ्या.

पाथफाइंडर, लोणच्याच्या पाकृसाठी धन्यवाद.
वरती विनिता झक्कास यांनी उल्लेख केलेल्या सानिकास्वप्निल यांच्या रेसीपीचा दुवा-
http://www.misalpav.com/node/27732

मसाल्याची कृती विचारली -
वर पोस्टींत जे जिन्नस आहेत तेच मायनस ज्वा.पी.
वाटीच्या मापाकरता हेच वाढवायला हवे.