रविवारच्या लोकमत मंथन पुरवणी मध्ये प्रयोगशील शाळांबद्दल लेख आला होता. या शाळांच्या कार्यपद्दतीची थोडक्यात चांगली ओळख करून दिली आहे या लेखात. त्यात महाराष्ट्रातल्या काही शाळांची नावं पण आहेत.
http://epaper.lokmat.com/epapernew.php?articleid=LOK_MTHN_20161204_5_1&a...
याच लेखाच्या निमित्ताने नाशिक मधील आनंद निकेतन शाळे बद्दल थोडी माहिती:
शाळेची वेबसाईट: http://www.anandniketan.ac.in/
माझा मुलगा तन्मय आनंद निकेतन, नाशिक या शाळेत इयत्ता पहिलीत आहे. तो खेळवाडी (pre-school) पासूनच या शाळेत आहे. आणि ते तसं असेल तर मुलांसाठी फार चांगलं आहे. का ते पुढे लेखात येईलच.
आपल्या पाल्याला शाळेत घालायची वेळ आली की आपल्याला असंख्य प्रश्न पडतात. त्यासंदर्भात पुढे लेखात दिलेली माहिती ही फक्त प्रयोगशील शाळांबद्द्ल आहे.
त्यातला पहिला प्रश्न म्हणजे
माध्यम कोणतं निवडायचं?
(आजकाल अनेक पालकांना हा प्रश्न पडतच नाही कारण बरेचदा बाळ जन्माला येण्यापूर्वीच इंग्रजी माध्यम ठरलेलं असत :-)).
ह्या प्रयोगशील शाळा मातृभाषेतून शिकवतात. महाराष्ट्रापुर्त बोलायचं तर मराठी ही प्रथम भाषा. मग मराठीतूनच का शिकायचं आणि मग मुलांना इग्रजी कसं येणार हे प्रश्न तुम्ही त्यांना नक्कीच विचारू शकता. ते आपल्याला नीट समजावून सांगतात. आणि नुसतं बोलूनच गार करत नाहीत तर त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीतून पटवून देतात. इथली भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी कोणतीही असो) शिकवण्याची पद्धत शास्त्रीय आहे. ऐकणे, बोलणे, वाचणे मग लिहिणे या क्रमाने शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवले जाते. (आजकाल सर्वसामन्यपणे पहिले लिहिणे (A, B, C, D वगैरे) मग वाचणे बोलणे वगैरे अशा विचित्र क्रमाने शिकवले जाते.) इंग्रजी बद्दल निर्धास्त होण्यासाठी एकच सांगू शकते की या शाळेतली सहावी आणि सातवीतली मुलं स्नेहसंमेलनात पूर्ण आत्मविश्वासाने सहज सुंदर नाटक इंग्रजीतून सादर करतात. आठवी ते दहावीतली मुल स्वतः इंग्रजीतून कविता करतात तसेच प्रसिद्ध इंग्रजी कवितांचे सुंदर अनुवाद ही करतात आणि या कविता काव्य वाचनात वाचून पण दाखवतात.
(तर मराठी माध्यम नक्की झालं. हुश्श एक प्रश्न सुटला.)
कोणत्या शाळेत घालायचं?
आपलं पाल्य कोणत्या शाळेत जातं हा प्रतिष्ठेचा प्रश्न न करता खरच कोणती शाळा आपल्या पाल्याला नुसत्या घोकंपट्टी च्या आणि मार्कांच्या मागे धावायला लावून “परीक्षार्थी” न करता खऱ्या अर्थाने “विद्यार्थी” म्हणून घडवू शकते याचा शोध घ्यावा. या निकषावर प्रशा (प्रयोगशील शाळा) नक्कीच सरस ठरतात.
Admission process काय असेल?
प्रशा मध्ये प्रथम येणार्यास प्राधान्य असा प्रकार आहे. (निदान नाशिक च्या आनंद निकेतन मध्ये तरी हे कसोशीने पाळले जाते. कोणताही आडमार्ग, मागचा दरवाजा असले प्रकार नाहीत.) दिवाळी नंतर शाळा सुरु झाली की पहिल्या आठवड्यात जाऊन नाव नोंदणी करावी लागते खेळवाडीसाठी. नाव नोंदणी मध्ये ज्यांची मोठी भावंडे शाळेत आहेत त्यांना प्राधान्य देऊन मग उरलेल्या जागांसाठी इतर मुलांचा नंबर लागतो. डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात, जर आपला नंबर लागत असेल तर, आपल्याला शाळेतून फोन येतो. मग १०० रुपये भरून फॉर्म घ्यायचा आणि जन्माचा दाखला, पाल्याचे दोन फोटो यासकट वर्षाची फी भरून admission नक्की करायची. या वर्षीची खेळवाडीची फी आहे आठ हजार (८०००/-) रुपये. पालकांना फक्त एखाद दुसरा प्रश्न विचारतात. जसे की व्यवसाय/नोकरी काय करता वगैरे. बस इतकच. इथे पालकांचा तसेच पाल्याचा interview वगैरे घेण्याची अघोरी प्रथा नाही. पहाटे पासून लांबच लांब रांग लावून फॉर्म घेण्यासाठी ताटकळत राहावे लागत नाही. फॉर्म तर मिळाला पण admission मिळेल की नाही अशी चिंता करायची गरज नाही. कारण इथे मुळातच फक्त दोन तुकड्या असतात आणि एका तुकडीत २० ते २२ मुले असतात, जास्त नाही. हा सगळा विचार करूनच फॉर्म दिले जातात.
आता पुढचा प्रश्न म्हणजे
डोनेशन किती भरावे लागते?
विश्वास बसणार नाही कोणाचा पण खरच ही शाळा डोनेशन मागत नाही. फक्त वार्षिक फी भरायची. त्यानंतर वर्षभरात उगाच फी वाढवणे नाही की अजून काही कारण दाखवून अव्वा च्या सव्वा पैसे मागणे नाही. कोणाला काही मदत म्हणून कधी द्यावेसे वाटले (पालकांव्यतिरिक्त पण इतर कोणीही मदत करू शकतात) तर त्यांनी शाळेच्या प्रशासनाशी चर्चा करून शाळेत कशाची तातडीची गरज आहे हे जाणून घ्यावे. त्याप्रमाणे यथाशक्ती मदत करावी. त्यावर Tax Benefit मिळू शकते. शाळेकडून पक्की पावती मिळते. अगदी पैसे नाही तर कोरे किंवा पाठ कोरे कागद, रंगीत खडू, स्केचपेन, कात्र्या, खेळणी असं काहीहि छोट मोठ पण आपण देऊ शकतो. पण हे सगळ ऐच्छिक आहे. कशाचीही जबरदस्ती नाही. त्यामुळे लोक खरच मनापासून भरपूर मदत करतात.
शाळेची शिक्षण पद्धती कशी आहे?
खरच वाखाणण्याजोगी आहे. खेळवाडी, बालवाडी असो की प्राथमिक, माध्यमिक शाळा त्यांच बालपण, किशोरावस्था जपतात आणि खुलवतात सुद्धा.
खेळवाडीत त्यांच्या वयाला झेपतील असे खेळ खेळायचे, ताईन सोबत गाणी म्हणायची (इथे शिक्षिकांना ताई म्हणतात, बाई नाही :-). पुरुष शिक्षक असले तर दादा. पण माझ्या मुलाच्या शाळेत सगळ्या ताई च आहेत.), गोष्टी ऐकायच्या, व्यायाम करायचा, डबा खायचा. असं सगळ सुशेगात सुरु असत. पहिले आठ दहा दिवस बरीच मुल रडतात कंटाळतात. पण ताई कोणालाच धाक दाखवत नाहीत, ओरडत नाहीत. त्यांच्या कलाने घेतात. (हे मी स्वतः पूर्णवेळ शाळे बाहेर बसून पाहिले आहे पहिले आठ दिवस.) मुलांच मन रमवायला त्यांना खूप सारी खेळणी देतात, मैदानात उड्या मारू देतात, पळू देतात, बागेत खेळू देतात, डबा खाऊ देतात. थोडक्यात ज्याला जे हव ते करू देतात. हळूहळू रुळतात मुल. मग त्यांना शाळा इतकी आवडायला लागते की शाळेला सुट्टी नको असते. शनिवार-रविवार सुट्टी म्हणजे त्यांना फार वाटते.
खेळवाडीत लिहायला शिकवत नाहीत. ते बालवाडी १ मध्ये गेल्यावर ते सुद्धा पाटीवरच फक्त. बालवाडी २ मध्ये ही तसच. वही पेन्सिल पहिलीत गेल्यावर.
खेळवाडी ते बालवाडी२ म्हणजे तीन वर्षात मुलांच्या हातापायांच्या स्नायूंची योग्य वाढ, मेंदूची इतर अवयावान सोबत सुसूत्रता या गोष्टीन वर भर दिला जातो. मुलांना त्याच्या आजूबाजूचा परिसर, घर, शाळा या संबंधितल्या गोष्टी, प्राणी, पक्षी, भाज्या, फळ अशा सगळ्याची माहिती करून देणे तसेच सगळ्याचा शक्य तेवढा प्रत्यक्ष अनुभव देणे ह्याला महत्व असते. त्यासाठी आवश्यक वेगवेगळे खेळ, व्यायाम करून घेतले जातात. जस की चाळणीने माती चाळणे, बाटलीत माती भरणे, धान्य निवडणे, भाज्या निवडणे, चिरणे, किसणे, फळ कापणे, मातीकाम, कोलाज काम, वेगवेगळ्या रचना बनवणे ज्यात शंख शिंपले, पिस्त्याचे टरफल, प्लास्टिक च्या बांगड्यांचे तुकडे अशा काही वस्तू वापरणे, ठसे काम, जिग सौ पझल सोडवणे, सरळ रेषेवरून चालणे, पायऱ्यान वरून उडी मारणे, चेंडू बादलीत टाकणे, माळा ओवणे, शिवणकाम असे बरेच काही...
बालवाडी ते दहावी त्यांना समजतील अशा क्षेत्र भेटींना त्यांना नेतात. त्यात बऱ्याच ठिकाणाचा समावेश असतो जसे की आजूबाजूचा परिसर, बांधकाम सुरु असलेली जागा, शेत, कारखाने, बाजार आणि अगदी स्मशान सुद्धा.
शाळेच्या स्नेहसंमेलनात सगळ्यांना सहभागी करून घेतात. प्रत्येक विध्यार्थ्याला भाग घेता येईल आणि ते व्यासपीठावर उभे राहून काही न काही सादर करतील याची पूर्ण काळजी ताई घेतात. त्यासाठी सगळ्या ताई, काही माजी विद्यार्थी आणि बरेचसे पालकही खूप मेहनत घेतात.
खेळवाडी बालवाडी मध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी, गाणी व इतर अभ्यास क्रम हे सगळ मुलां कडून जबरदस्ती पाठ करून घेऊ नये असं सांगणारी शाळा मला तरी स्वप्नवत वाटते. हे सगळ त्यांना इतकं खेळीमेळीने शिकवलं जात की आपोआप त्यांच्या लक्षात रहात. काहीही घोकाव लागत नाही.
पहिली ते दहावी पर्यंतच सगळ शिक्षण हे नुसत पुस्तकी न ठेवता मुलांना त्यात रस वाटेल, त्यांच्या बुद्धीला चालना मिलेल, त्यांच्यात निकोप स्पर्धा राहील हे पाहणे. प्रत्येक नवी गोष्ट शिकतना ती आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडून ती मुलांच्या पातळी वर आणून त्यांना उलगडून सांगणे, वयक्तिक रित्या तसच इतरांच्या सोबत गटात काम करून उपक्रम राबवणे. असं खूप काही सतत, दर वर्षी, नव्या जोमाने, प्रचंड उत्साहाने, खिलाडू वृत्तीने आणि महत्वाच म्हणजे तुफान सहनशक्तीने सगळ्या शिक्षिका करतात.
दरवर्षी शाळेला दिवाळीची सुट्टी लागण्या पूर्वी शाळेत एक दिवस दुकानजत्रा असते. ज्यासाठी कच्चा माल आणून, वस्तू बनवणे, विकणे, सगळा हिशोब ठेवणे अशी सगळी काम मुल करतात. त्यात ते छान छान ग्रीटींग्ज, बुकमार्क्स, वौल पीस, तोरणं, आकाशकंदील, मुलींचे कानातले, ब्रेसलेट, वेगवेगळ्या चटण्या, भेल, दाबेली आणि असंच बरच काही बनवून विकतात. काही गोष्टीचं फक्त रिटेल ट्रेडिंग ही करतात जस की फराळाचे पदार्थ, तयार कपडे, पिशव्या, पर्स, बुद्धीला चालना देणारी खेळणी, पुस्तक वगैरे.
या शाळेत शिस्त नक्कीच आहे पण धाकदपटशाही नाही. मुलांना पट्टीने मारणे, झोडणे हे प्रकार नाहीत.
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इथे प्रत्येक विद्यार्थ्याच व्यवस्थित मूल्यमापन केलं जात. प्रत्येकाच रोजच रेकॉर्ड ठेवलं जात. त्यांच वागण, बोलण, न बोलण, रागावण, रडण, भांडण, दिलेली असैन्मेंट पूर्ण केली की नाही, केली तर कशी केली, काय जमल, काय नाही जमल, काय आवडीनी केलं जात, काय कारायला आवडत नाही, वागण्यात नव्याने झालेले चांगले वाईट बदल असं बरच काही नियमित नोंदवून ठेवल जात. जे पालकांपर्यंत योग्य पद्धतीनी पोचवल जात.
मार्क न देता, श्रेणी न देता प्रत्येक विषयात कशी प्रगती आहे हे योग्य आणि थोडक्या शब्दात लिहिलेली मूल्यमापन पत्रिका निकालाच्या दिवशी मिळते. त्यातच कुठे सुधारणा हवी, काय सुधारणा हवी हे सुद्धा नमूद केलेलं असते.
तर अशी ही बऱ्याच बाबतीत स्वप्नवत वाटणारी प्रयोगशील शाळा आपल्या मुलांना मिळावी असं कोणत्या पालकांना वाटणार नाही.
सांगायचं म्हंटलं तर अशा अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत. काय काय आणि किती किती सांगणार. ते सगळ अनुभवण्यातच मज्जा आहे... बालक आणि पालक म्हणूनही...
--मद्रकन्या
मस्त! अश्या एखाद्या शाळेत
मस्त!
अश्या एखाद्या शाळेत मुलांना टाकणे खरेच आवडेल.
महाराष्ट्रात कुठे कुठे आहेत या शाळा? मुंबईत आहे का? निघायला हव्यात..
या एसेसी, सीबीएसई वगैरे बोर्डांच्या अंतर्गत नाही येत का?
छानच आहे हि शाळा !
छानच आहे हि शाळा !
अभ्यासक्रम ssc बोर्डाचाच आहे.
अभ्यासक्रम ssc बोर्डाचाच आहे.
मस्त शाळा. लकी आहे तुमचा
मस्त शाळा. लकी आहे तुमचा मुलगा आणि तुम्ही.
अरे वा! भार्रीए की शाळा. इथे
अरे वा! भार्रीए की शाळा.
इथे लिहिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद
मायबोलीवर स्वागत असो!
मुंबैत कुठे आहे ही शाळा?
मुंबैत कुठे आहे ही शाळा?
पुण्यातील अक्षरनंदन शाळाही
पुण्यातील अक्षरनंदन शाळाही अशाच काहीशा तत्वावर सुरु आहे. माझ्या सख्ख्या बहिणीची मुलं या शाळेत आहेत. ती खुष आहेत शाळेवर.
मुंबैत कुठे आहे ही शाळा?
मुंबैत कुठे आहे ही शाळा? ....१११११११
छान आहे तुमच्या मुलाची शाळा
छान आहे तुमच्या मुलाची शाळा आणि तुम्ही अगदी विस्तारानं लिहिलंय.
एका समाधानी पालकाकडून शाळेबद्दलचा वृत्तांत वाचताना छान वाटलं. आपलं मूल आनंदी वातावरणात शिकतंय, वाढतंय, याहून मोठा आनंद नाही.
अशा सकारात्मक गोष्टी जस्तीत जास्त शेअर होत रहायला हव्यात.
मद्रकन्या, शाळेबद्दल आणि मुलाच्या उपक्रमांबद्दल नियमित लिहित रहा. वाचायला आवडेल. मायबोलीवर तुमचं स्वागत आहे
मातृभाषेत शिक्षणाचे महत्त्व
मातृभाषेत शिक्षणाचे महत्त्व ओळखून शाळा चालवणारे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे पालक पाहून खूप बरे वाटते. अशा भरपूर शाळा सुरु व्हाव्यात हीच इच्छा.
लोकसत्ताच्या लेखमालेत
लोकसत्ताच्या लेखमालेत आनंद-निकेतन बद्दल वाचलं होतं. छान शाळा आहे.
पुण्यात अक्षरनंदन शाळा तर आहेच, त्याचबरोबर ग्राममंगलची शाळा आणि वाघोलीची अमन सेतू शाळा याही अशाच प्रयोगशील शाळा आहेत. फलटणची कमला निंबकर बालभवन, कोल्हापूरची सृजन आनंद विद्यालय यांचा उल्लेख या मालिकेत करायलाच हवा.
आपल्याला माहिती असलेल्या
आपल्याला माहिती असलेल्या प्रयोगशील शाळा आणि त्यातल्या खरोखरच वेगळं काम करणा-या शाळा ह्यामध्ये फरक आहे. शाळा कशी आहे, हे केवळ आपले पाल्य त्या शाळेच्या मुशीत असेल तरच खरेखुरे कळते. अन्यथा ते डोंगर दुरूनच साजरे असू शकतात.
प्रयोगशील शाळा म्हणून काही ठरावीक शाळांची नावे पुन्हा पुन्हा घेतली जातात, पण दुर्दैवाने त्यांचे प्रत्यक्षातले कार्य जसे आपण ऐकलेय तसे असतेच असे नाही. सुरुवातीला जो हेतू मांडलेला असतो आणि जी प्रतिमा दाखवली जाते, त्याच्यावर टिकून रहाणं संस्थांना जड जातं आणि हळूहळू चित्रही बदलतं. माझ्या मुलाच्या एकमेव शाळेच्याबाबतीत हा अनुभव घेतला आहे. चाकोरीपेक्षा वेगळ्या शाळा म्हणजे चांगल्या किंवा मुलांसाठी योग्य असे सरसकट म्हणता येणार नाही. ह्याउलट मेनस्ट्रीममधल्या कितीतरी शा़ळा आपापल्या विद्यार्थ्यांसाठी चांगले उपक्रम राबवत असतात, ते सहसा चर्चेत येत नाही. अक्षरनंदनचा अपवाद करता येईल. त्यांच्यासुद्धा मूळ स्वरुपात आता बदल झालेत, पण तरीही त्यातल्या त्यात चांगला समतोल राखायचा प्रयत्न ते करतात.
अरे वा ! खूप छान शाळा व
अरे वा ! खूप छान शाळा व त्याबद्दलची माहिती. कालांतराने तुमच्या मुलाची प्रगती ऐकायला आवडेल.
कृष्णमूर्ती शाळांबद्दल कुणाचा स्वताचा अनुभव असेल तर लिहा.
अहो पण मुबैत कुठे आहे ही शा
अहो पण मुबैत कुठे आहे ही शा ळा?
लेखातली आनंद निकेतन शाळा फक्त
लेखातली आनंद निकेतन शाळा फक्त नाशिक मध्ये आहे मुंबईत नाही. पण लोकमत मंथन ची जी लिंक दिली आहे त्यात गोरेगाव च्या एका शाळेचे नाव आहे महाराष्ट्रातल्या प्रयोगशील शाळांच्या यादीत.
अ भि गोरेगावकर शाळा.
'रात्रनिवास' ही आनंदनिकेतनची
'रात्रनिवास' ही आनंदनिकेतनची खासियत आहे. वर्षातून एक दिवस सर्व मुले रात्री शाळेत मुक्कामाला असतात. हा उपक्रम अगदी पहिल्या वर्षापासून सुरु आहे जेव्हा शाळेत सोळाच मुले होती. आता चारशे आहेत. त्यामुळे तो विभागून होतो. आज बालवाडीच्या आणि प्राथमिक च्या मुलांचा रात्रनिवास आहे. त्यातली प्राथमिक ची मुलं रात्रभर राहातील, फक्त बालवाडीची मुलं रात्रभर शाळेत राहात नाहीत पण उशीरा पर्यंत थांबतात, मस्ती करतात व एकत्र जेवतात. या कार्यक्रमाची माहिती पालकांना देणारी चिठ्ठी मुलांकडे दिली जाते. त्यात लिहीले होते "शाळेतर्फे समूह भोजन आहे" बालवाडीतल्या पिनाकने घरी चिठ्ठी देतांना सांगितले " उद्या शाळेत आम्हाला व्याहीभोजन आहे!"
माझ्या लेकाचा आज पहिलाच रात्र निवास आहे त्यामुळे तो सकाळ पासूनच खूप खुश आहे. उद्या सकाळी 6.30 वाजता येईल स्वारी परत घरी. मला पण उत्सुकता आहे काय धम्माल करणार आहेत आज सगळे बाळगोपाळ...
Submitted by सई. on 10
Submitted by सई. on 10 December, 2016 - 16:16
सई. यांच्या प्रतिसादाशी बहुतांशी सहमत.
छान आहे तुमच्या मुलाची शाळा
छान आहे तुमच्या मुलाची शाळा Happy आणि तुम्ही अगदी विस्तारानं लिहिलंय.
एका समाधानी पालकाकडून शाळेबद्दलचा वृत्तांत वाचताना छान वाटलं. आपलं मूल आनंदी वातावरणात शिकतंय, वाढतंय, याहून मोठा आनंद नाही.
अशा सकारात्मक गोष्टी जस्तीत जास्त शेअर होत रहायला हव्यात.
मद्रकन्या, शाळेबद्दल आणि मुलाच्या उपक्रमांबद्दल नियमित लिहित रहा. वाचायला आवडेल. मायबोलीवर तुमचं स्वागत आहे Happy >>>>> +9999