सुखडी / गुळपापडी

Submitted by सायु on 14 November, 2017 - 07:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कणिक = १ वाटी
साजक तुप = १/२ वाटी
गुळ (खीसलेला) = १/२ वाटी

क्रमवार पाककृती: 

गुजराथीत सुखडी तर मराठीत गुळपापडी. गुजराथी लोक प्रसादाला सुखडी करतात.. माझ्या माहेरी शेजार गुज्जु लोकांचा होता.
त्यांच्या कडुनच आई आणि आई कडुन मी शिकले. शेजारी बीना म्हणुन खुप गोड मैत्रीण रहात होती. तीने सुखडी भाजायला घेतली
की आपोआपच पावले शाहा भाभींच्या घरा कडे वळायची... ती सुखडीचं पीठ भाजायची आणि मी त्यांच्या कीचन ओट्या वर बसुन तास न तास गप्पा मारायचे...त्यांच्या कडे गुरवारी उपास असायचा.. मग संध्याकाळची आरती आणि सुखडी चा प्रसाद घेऊनच घरी यायचे..आमच्या कडे आवडते म्हणुन त्या जास्त करायच्या आणि सोबत द्यायच्या.. गोड आठवणी माहेरच्या.. Happy असो..

तर वळु या मुळ कृती कडे..

करायला एकदम सोपी पौष्टीक, अज्जीबात वेळ खाउ नाही आणि पाका बीका ची भानगड नसल्या मुळे हमखास जमणारी ही पाककृती आहे.

कढईत १/२ वाटी तुप तापवायला ठेवा.. मग त्यात १ वाटी कणिक मंद आचे वर गुलाबीसर भाजुन घ्या...बेसनाच्या लाडुच भाजतो तसच..
तुप कमी वाटल तर एक,दोन चमचे तुप वाढवायचे.. पीठ कोरडं नको. छान खमंग भाजुन झाले की कढई गॉस वरुन उतरवुन जरा वेळ
पंख्याखाली ठेवा.. पीठ कोमट असतांना त्यात अर्धी वाटी खिसलेला गुळ घालायचा.. आणि सराट्याने छान कालवुन घ्यायचा...
ताटाला आधी तुप आणि त्यावर हे पीठ पसरवुन सुरीने वड्या कापायच्या.. खुसखुशीत सुखडी तय्यार..

प्रसादाला , किंव्हा मधल्या वेळेत खायला छान पदार्थ. मला आठवतय मी आणि माझी धाकटी बहिण आम्ही गाण्याच्या क्लासला जायच्या आधी
आई आमच्या हातावर दोन दोन सुखड्या ठेवायची.
माझी मुले देखिल तेवढ्याच आवडीने खातात... हल्ली मुलांचा कल ब्रेड , बिस्कीट कडे जास्त असतो..
त्यापेक्षा आपले पारंपारिक , पौष्टीक पदार्थ कीत्ती तरी पटीने चांगले आहेत नाही का!

वाढणी/प्रमाण: 
१ वाटीत १० ते १२ वड्या होतात..
अधिक टिपा: 

पीठ गरम असतांना गुळ घालायचा नाही, कारण गुळ वितळतो आणि मग मिश्रण पातळ होते.. मग वड्या जमत नाही..
मी एका वाटीला अर्धी वाटी गुळ असे प्रमाण सांगीतले आहे.. पण जास्त गोड आवडत असेल तर अर्ध्या च्या ऐवजी पाऊण वाटी गुळ घेऊ शकता.

माहितीचा स्रोत: 
शेजारची जिवलग मैत्रिण बीना.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच... याचे लाडू पण छान होतात...

मस्त रेसिपी साय . लिहिलं पण छानच आहेस.
गूळ पापडी मला ही खूप आवडते.

सुकडी झेडपी च्या शाळेत पण मिळायची. पौष्टीक आहार म्हणून मुलांना द्यायचे ती. ती कशी करायचे काय माहिती ? पण ही कृती सोपी आणि चांगली वाटते आहे.

छान पाकृ.

ती म्युनिसिपल शाळेत मिळणारी सुकडी मी खालीय खूपदा. ती जरी पावडर फॉर्म मध्ये असली तरी कृती बहुतेक हीच असावी.

गुळ अजिबात गरम करायचा नाही ? खुसखुशीत होतात का ?
गुळाची कणी आहे माझ्याकडे , त्याने बांधल्या जातील का? की काहितरी सुंठवडा टाईप्स होईल .

सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन आनंद झाला. पा. कृ आवडल्या बद्द्ल आभार..

याचे लाडू पण छान होतात...+ हो अगदी बरोबर
मस्त रेसिपी साय . लिहिलं पण छानच आहेस.+ धन्स हेमा ताई..:)
पण ही कृती सोपी आणि चांगली वाटते आहे.++ करुन बघा, खुप सोप्पी आहे.
छान पाकृ.+ धन्स साधना, वावे.:)
गुळ अजिबात गरम करायचा नाही ? खुसखुशीत होतात का ?
गुळाची कणी आहे माझ्याकडे , त्याने बांधल्या जातील का? की काहितरी सुंठवडा टाईप्स होईल .+ अगदी ? खुसखुशीत होतात, जरा भगराळ वाटलं एक चमचा तुप टाकायच..
गुळाची कणी आहे माझ्याकडे , त्याने बांधल्या जातील का+ हो
चिकट गुळ चालेल का?+ चालतोय की..
मस्तच. आई माझी सुकडीच म्हणते आणि आम्ही गुळपापडी. आई मी करते त्यापेक्षा जरा कडक करते. मी खुसखुशीत करते. Happy आईच्या हातच्या चवीची सर काही न्यारीच..
सायु लिखाण आणि रेसिपी दोन्ही छान. फोटो टाकलास तर अजून मजा येईल. Happy धन्स जागु, फोटो आज टाकलेत.

मस्त.. सुकडी नाही ग.. सुखडी.. + अय्या खरच.. धन्स ग.. बदल केलाय..

आईच्या हातच्या चवीची सर काही न्यारीच.>>>> +१

खुप छान . लहानपणी आई खुप वेळा करायची. एका वेळी कमित कमी तीन- चार तरी खल्ले जायचे.....

फोटो पण मस्त.....

एस, माझी आई बहुतेक गुळाचा पाक करायची, म्हणून बहुतेक कडक होत असाव्यात. तेव्हा इंटरेस्ट फार दाखवला नाही, खायचं काम केलं. विचारेन आईला.

मी इथे दिलेल्या रेसिपीने करते पण मी पीठ कढईत असताना आणि ते गरम असतानाच गुळ घालते आणि सारखं करते थोडा वेळ मग उतरवते. मग तुपाच्या ताटात पसरवते आणि गार झाल्यावर वड्या पाडते. कधी कधी मी यात दाण्याचं कुट थोडं घालते, नेहेमी नाही. सुकामेवा मात्र नेहेमी घालते आणि वेलची दाणे घालते थोडे.

बेसन सोडून इतर पीठेही वापरता येतील का? प्रयोग करून बघायला हवे.
साधना- हो अवश्य करा हं, गुळपापडी साठी थोडी जाडसर कणिक वापरते मी

धन्यवाद या रेसिपीसाठि ... कालच केलि पण थोडि अगोड झालीये.... बाकी वड्या वगैरे मस्त पडल्या एकदम...

सायु, फोटो एकदम मस्त आलाय.

साधना, नाचणी पीठ ह्यात ऍड3 करता येईल . गूळ आणि नाचणी ची चव छान लागते.

यात तीळ टाकते मी . छान चव येते. नाचणीचे पीठ ही चांगलं .
यावेळी दिवाळीला अनारसे तळून चाळणीत काढले. त्या चाळणी खाली थोडे पोहे टाकलेत .अनारशाच तूप त्या पोहयात झिरपल . नंतर त्याच अनारशा च्या तुपात थोडी कणिक व नाचणीचे पीठ भाजले. नंतर ते पोहे थोडे भाजून बारीक करून त्यात टाकले . खोबरं ड्रायफ्रूट व गूळ घालून लाडू केलेत.
अप्रतिम पौष्टिक लाडू झालेत.

Pages