फ्लॉवर, स्वीट कॉर्न - रस भाजी

Submitted by योकु on 6 July, 2017 - 15:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक फ्लॉवर चा मध्यम आकाराचा, घट्ट बांधणीचा आणि पांढराशुभ्र असा गड्डा
एक ते दीड वाटी स्वीटकॉर्न चे दाणे
एक मध्यम बटाटा
एक मोठा टोमॅटो
चवीनुसार मीठ
सढळ हातानी तेल
पाव चमचा लाल तिखट
पाव चमचा हळद
चिमूटभर हिंग
थोडं जिरं
एक चमचा पावभाजी मसाला (माझ्याकडे एवरेस्ट चा होता तो वापरला)

क्रमवार पाककृती: 

- फ्लॉवरचे तुरे काढून घ्यावेत लहान लहान (किडीची शंका असेल तर मिठाच्या पाण्यात ठेवावे जरावेळ, नंतर निथळून पुन्हा एकदा धुवून घ्यावेत)
- बटाटाही सिमिलर साईजमध्ये चिरून घ्यावा
- टोमॅटो बारीक चिरावा
- सढळ हातानं तेल ओतून गरम होऊ द्यावं
- यात जिरं घालून छान तडतडलं की हिंग घालावा
- यात आता निथळलेला बटाटा आणि कॉर्न घालावा
- तेलात कॉर्नचे दाणे उडतात तेव्हा जपून... झाकण घालून द्यावं
- एखाद मिनिटानंतर फ्लॉवर, टोमॅटो घालून नीट हलवून घ्यावं, परतत बसण्याची गरज नाही; हे सगळं नंतर पाण्यात शिजणार आहेच
- यात आता कोरडे मसाले, मीठ आणि चव घातलेली आवडत असल्यास चिमटीभर साखर घालावी
- पेलाभर पाणी घालून शिजत ठेवावी भाजी
- चांगली शिजली की वरून जराशी कोथिंबीर शिवरून गरमगरमच खायला घ्यावी
- घडीची पोळी, गरम फुलके, साधं तुरीच्या डाळीचं वरण-भात, यांसोबत मस्त लागते ही भाजी (हवंच असेल तर एखादी लोणच्याची फोड ही मस्त जाते याबरोबर...)

वाढणी/प्रमाण: 
भरपूर होते
अधिक टिपा: 

- भरपूर रस आवडत नसेल तर शिजल्यावर, मोठ्या आचेवर जरा पाणी आटू द्यावं (मीही करतांना अंगासरशीच रस ठेवला होता)
- तिखट आणि मक्यामुळे जराशी गोड अशी भाजी मस्त लागते
- टोमॅटो आंबटपणा साठी आणि बटाटा जरा रस मिळून येण्याकरता म्हणून घातला आहे
- पाभा मसाल्याची मस्त चव येते
- पाभा मसाल्यात तिखट असतं, त्यामुळे वेगळं असं घालायची तशी गरज नाही; मी आधी तिखट घातलं आणि मग पाभा मसाला समोर दिसला तर तोही ढकलला चमचाभरून. पण नंतर प्रकरण भारीच टेस्टी झालं होतं...
- बाकी कुठले वाटणं, आलं, लसूण, मिरची, खोबरं नसल्यानी तेल जरा भक्कम घालावं

माहितीचा स्रोत: 
सासूबै
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड नक्कीच नाही होत. कॉर्न दाताखाली आल्यावर मस्त लागतं पण.
सायो, विशेष काही नसल्यानी फोटो काढला नाहीय...