'पंचम' बस नाम ही काफी है!
खरे तर असे असून देखिल पंचम ऊर्फ, राहुल देव बर्मन यांच्याबद्दल कितीही लिहिलं बोललं तरी ते कमीच आहे. संगीत, विशेषतः चित्रपट संगीत अवकाशात पंचम हा असा सूर्य आहे की जे काही आहे ते पंचम च्या ऊदय व अस्ता च्या अलिकडले वा पलिकडले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये, का ते या लेखमालेत नंतर येईलच. पंचम चे स्थान माझ्या आयुष्यात तरी एखाद्या कुटूंबीयापेक्षा कमी नाहीच त्यामूळे पंचम चा एकेरी ऊल्लेख केवळ त्याच्यावरील माया, आदर व भक्तीपोटी.
पंचम ची १८ वी पुण्यतिथी ४ जानेवारी ला झाली. त्या निमित्ताने खरे तर लिहायचे होते. पण असे काट्यावर लिहीणे तेही पंचम वर म्हणजे खरे तर स्वताच्याच भावनांवर अन्याय केल्यासारखे वाटले असते. त्यामूळे ती ऊर्मी दाबून डोक्यातील विचार, भावना, ई. सर्व थोडे फुरसतीतच मांडावे असे मनात आले. आजवर पंचम बद्दल वाचलेले, ऐकलेले, पाहिलेले अनेक लेख, मुलाखती, अन माहितीपट ई. च्या आधारावर आणि अर्थातच अनेक वर्षे पंचम ची गीते ऐकल्यावर जे काही मला समजले, ऊमजले तेच ईथे लिहीत आहे. एव्हडे करूनही कुठेतरी काहीतरी अपूर्ण असेलच हे माहित आहे. पंचम नावाच्या अक्षरशः कायम अवखळ अशा अफाट समुद्राला असे एका 'पेज' वर वा लेखमालिकेत बंदिस्त करणे अशक्यच आहे. तरिही, पंचम जी नशा मला आहे ती थोडीशी तुम्हालाही चढावी एव्हडाच ऊद्देश. कारण पंचम ला अंत नाही(च)..
"मुसाफीर हूं यारो... मुझे चलते जाना है! बस! चलते जाना ..."
आता पंचम बद्दल आजवर ईतकं काही लिहीलं गेलं आहे, ईतके ब्लॉग्स आहेत, फॅन क्लब आहेत, की मी अजून काही वेगळे लिहू शकेन असे नाही. पण एखाद्या गाण्याचे विश्लेषण करताना, त्यातील बारकावे तपासताना, पंचम मधल्या कलाकाराने नेमकी काय विचार केला असेल, किंवा केला होता, किंवा पंचम ची मला आवडलेली निवडक दहा (टॉप टेन) गीते वगैरे अशी काही चौकट घेऊन त्या अनुशंगाने लिहायचा प्रयत्न आहे. निव्वळ संगीत एव्हडाच मर्यादीत फोकस न ठेवता या अशा गितांमधून मला आढळलेली प्रयोगशीलता, टिमवर्क, नाविन्य, ट्रेंड्सेटींग, त्यातून प्रकट झालेली पंचम ची अभिव्यक्ती, मंत्र आणि 'तंत्र' देखिल, या सर्व गोष्टी अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे.
पुन्हा एकदा हे नमूद करतो की पंचम आणि त्याचे काम हा विश्लेषणापेक्षाही अनुभूतीचाच भाग अधिक आहे. खेरीज त्याच्या गीतांची विश्लेषण करण्याएव्हडी योग्यता माझी नाही. पण नशा पचवता येत नाही म्हणून नशा करूच नये असे कुठे आहे?
तस्मात, आवडले तर कळवाच, नाही तर नशेत बरळतोय असे म्हणून सोडून द्या.. पंचम ला काहीच फरक पडणार नाहीये!
आता पंचम वर लिहीण्याआधी माझी पार्श्वभूमी थोडीशी लिहीली तर ऊर्वरीत लेखनामधिल माझे विचार व भावना त्या अनुशंगाने कदाचित अधिक योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत पोचू शकतील. पंचम चे(च) संगीत लहानपणापासून कानावर पडत होते असे काही नाही. घरात संगीतमय वातावरण असल्याने अनेक प्रकारचे संगीत ऐकले जायचे. 'कळत्या' वयात आलो तेव्हा पंचम च्या कारकीर्दीची खरे तर मध्यान्ह ऊलटली होती, १९८० चे दशक. अन दुसर्या अर्थाने पंचम अक्षरशः 'तळपत' होता असेही म्हणता येईल. पण गंमत अशी आहे की मुद्दामून पंचम चे म्हणून ऐकायचे एव्हडे शहाणपण व संगीत विषयातील समज मला यायला ८० चे दशक ऊजाडावे लागले. 'अमर प्रेम' (१९७१) चित्रपटातील गाण्यांची ऑडियो टेप ऐकताना जवळ जवळ प्रत्त्येक गाण्यावर थबकलो. जवळ जवळ सर्वच गाणी ऐकणार्याला एखाद्या एकांत स्थळी घेऊन जाणारी. ती खास पंचम शी पहिली भेट होती.
त्या आधी 'मेहबूबा मेहबूबा..' (शोले- १९७५) या फेमस गीताचा गायक, दुनियामे लोगों को.. (अपना देश १९७२) मध्ये ते श्वास धरून 'हा हा हा हा हा...' असे एक युनिक गाणारा तो गायक, 'दम मारो दम' (हरे राम हरे क्रीष्ण-१९७१), 'यम्मा यम्मा' (शान- १९८०), "प्यार हमे किस मोड पे ले आया" (सत्ते पे सत्ता- १९८०) या वा अशा अनेक "हीट" गीतांचा संगीतकार तो म्हणजे पंचम, या ओळखी पासून ते "अमर प्रेम" चा संगीतकारही पंचमच ही ओळख मला अगदीच धक्कादायक होती. याचे कारण आधी लिहीले तसे 'हीट' गाणी एरवी कानावर पडायची पण जाणीवपूर्वक संगीत सौंदर्य शोधण्याची परिपक्वता येण्याचा माझा प्रवास ऊलटा होता असे म्हणावे लागेल. कारण निवळ कालमानानुसार अमर प्रेम हा चित्रपट या सर्वांच्या आधीचा. हे म्हणजे सचिन चे १०० वे शतक पाहिल्यावर मग तो तरूण वयात कसा खेळत होता त्या क्लिप्स पुन्हा मुद्दामून पाहून अचंबीत होण्यासारखे आहे. असो.
तर 'अमर प्रेम' गवसले आणि पंचम या "अनुभूती" चा जाणीवपूर्वक शोध सुरू झाला.
दरम्यान, ईंजिनीयरींग च्या हॉस्टेल च्या दिवसात ऊशाशी वॉकमन (वॉकमन बिचारा केव्हाचाच 'बसला' आता आयफोन वा आयपॅड!) आणि किशोरदांची गाणी हा प्रवास सुरू झाला होता. अक्षरशः निव्वळ पास होण्यासाठी बी.एल.थेराजा (तोच तो "ईलेक्ट्रिकल ईंजीनीयरींग" विषयाची ज्ञानेश्वरी लिहीणारा!) च्या किचकट धड्यांची जितकी पारायणे केली नसतील त्यापेक्षा हजार पटीने किशोरदांच्या गीताची अशी पारायणे केली जायची. तो काळ नेट, डिव्हिडी चा नव्हताच. मग मुद्दामून अक्षरशः मिळेल ती मासिके, कॅसेट, ई. ची दुकाने ईथे जाऊन निव्वळ माहिती शोधायची की गाणि कुठल्या चित्रपटाची आणि त्याचा संगीतकार कोण? ईथे पंचम पुन्हा नव्यानेच भेटला- किशोरदांनी गायलेल्या, फेमस झालेल्या, जवळ जवळ सर्वच गाण्यांचा संगीतकार बहुतांशी पंचमच हा देखिल 'शोध' लागला.
पुन्हा एकदा संदर्भ ७० च्या दशकानंतरचा आहे. म्हणजे सलिल चौधरी, नौशाद, एस डी, मदन मोहन या दिग्गज व गाजलेल्या संगीतकारांच्या नंतरचा काळ...
मग नंतर शिक्षणाच्या शर्यतीत ऊसगावला (यु.एस्.ए.) गेल्यावर तर पंचम असा काही सापडला की रोज आकंठ कोळून प्यायलो तरी दुसरे दिवशी पुन्हा कानाचे रिकामे कटोरे घेऊन रात्रभर ते भरत बसायचे. अट्टल दारूडा आणि आमच्यात खरे तर काहीच फरक नव्हता.. रोज तीच नशा! ऊसगावला अक्षरशः भारतातील सर्व प्रांतांचे मित्र मैत्रिणी भेटले. समकालीन पैकी जतिन ललित, नदीम श्रवण, नुकताच 'ऊगवता' ए. आर. रेहमान, या सर्वांबद्दल सर्वांनाच आकर्षण होते तरी सर्वांच्यात 'पंचम धागा' कायम होता. आणि प्रत्त्येकाची बैठक, पार्श्वभूमी, संगितीक अनुभव, ई. वेगळे असल्याने पंचम अक्षरशः अनेक मितीतून समोर येत गेला. कुणाला पंचम च्या गाण्यातील काय आवडायचे तर कुणाला काय.. त्यातून नव्यानेच पुन्हा पंचम च्या गीत संगीतातील आधी न विचार केलेले, न जाणवलेले बारकावे समोर येत गेले. एकाच माणसाने किती जणांना अक्षरशः वेडं करून सोडलं आहे हे केवळ अविश्वसनीयच! ऊसगावमध्ये आम्ही कार्यक्रम करू लागलो.. आमचा बँड वगैरे स्थापन झाला. मग काय पंचम ची गाणी नुसती ऐकणेच नव्हे तर ती वाजवताना कधी त्यासाठी वाजवलेली गिटार, तबला, कीबोर्ड, तालवाद्ये, हे सर्व वाजवताना पंचम ने संगीतबध्द करताना काय जादुगिरी केली होती याची झलक अनुभवता येत होती. 'हम किसीसे कम नही' (१९७७) चित्रपटा मधिल ती गाण्यांची 'फेमस' मेडली (चांद मेरा दिल- तुम क्या जानो- हमको साथी मिल गया) आम्ही बसवायचो तेव्हा पंचम ही काय चीज होती याचा अक्षरशः थरारक अनुभ येत असे. आईशपथ, त्या अख्ख्या मेडलीमध्ये ज्या प्रकारे वाद्ये, कॉर्ड्स बदलणे, एकातून दुसर्यात ई. सर्व केले गेले आहे ते काहि अंशी साकारताना काय झिंग यायची म्हणून सांगू... पंचम ची सुरावट अशी 'गवसल्यावर' आणि अंगत भिनल्यावर ती वाजवताना आमची जी अवस्था असे-'निर्वाण', 'मोक्ष', काहिही म्हणा.. ईतके वर्षांनी कळले की लोकं जेव्हा म्हणतात अमुक तमुक पंडितजींना गाताना गंधार 'दिसतो' म्हणजे नेमके काय होते, ती नेमकी अनुभूती काय असते. आम्हाला तसाच 'पंचम' दिसत असे. पंचमची गाणी वाजवायला वा गायला घेतली की अक्षरशः साठीच्या वयातील वयस्कर ते विशीतील तरूण मंडळी सर्वच जल्लोश करत असत- पंचम आणि त्याचे संगीत खर्या अर्थाने पिढीजात मुरलेले असल्याचे, आणि कुठल्याही स्थळ, काळ, वय, ई. च्या व्यावहारीक मर्यादेच्या पलिकडे पोहचले होते याचे जीवंत ऊदाहरण आम्ही समोर बघत असू.
गंमत म्हणजे अगदी ९० चे दशक ऊलटले तेव्हा हा 'साक्षात्कार' झाला की आशा ताईंनी गायलेली जवळ जवळ सर्वच लोकप्रिय गाणी देखिल पंचमचीच आहेत. एरवी आशा ताईंची अनेक गाणी ऐकली होती, माहित होती पण त्यातले अनेक हिरे हे पंचमच्या खाणीत बनलेले आहेत हे ठाऊक नव्हते.
ऊसगाव मध्ये आमचा एक गझल वेडा रुमी होता.. 'गुलजार' हे त्याचे दैवत. मग काय- पंचम पुन्हा नव्याने भेटला यावेळी मात्र एक संपूर्ण समीकरण असल्यासारखा-
गुलजार+पंचम+किशोर+आशा= संगीत प्रेमीची मक्का/मदिनाच जणू किंवा तीर्थक्षेत्र!
गुलजार+पंचम+लता= परमोच्च आनंद
माझ्यासाठी हे समीकरण आजवरच्या रूक्ष अभियांत्रिकी शिक्षणातील सर्वात ऊपयुक्त आणि "कळलेले" असे एकमेव समीकरण होते. आणि समीकरणाच्या जोडीला भेटलेले अनेक भाषिक्/प्रांतीक पंचम भक्त. आणि मग सुरू झाला प्रवास या समिकरणाच्या डेरिव्हेटिव, ईंटीग्रेशन, रियल वॅल्यू आणि ईमॅजिनरी व्यॅल्यू चा.. तेही प्रत्त्येकाच्या नजरेतून..
मग पंचम ची नशा आमची रोजची 'गरज' बनली. पंचम चे नॉन फिल्मी अलबम्स, अमेरिकन व ईतर आंतरराष्ट्रीय कलाकारांबरोबर केलेले काम, गुलजार सोबत चे अलबम्स, अनेक भाषांतून पंचमने दिलेले संगीत, पंचमवरील माहितीपट, पंचमवरील संकेतस्थळे, पंचम वरील कार्यक्रम... अक्षरशः आयुष्यात दुसरे काहीच ध्येय नसल्यासारखे आम्ही दिवस रात्र पंचम शोधला, जागवला, रक्तात भिनवला. या सर्वातून पंचम ही व्यक्ती आणि त्यांचे आयुष्य हे देखिल कधी आमच्याच कुटूंबाचा भाग झाले कळले नाही. भारतात 'सापडलेला' पंचम आणि मग ऊसगाव मध्ये 'लाभलेला' पंचम हे वर्तुळ पूर्ण असे व्हायचे होते.
म्हणजे साधारण दोन दशके पंचम ऐकल्यावर आणि अनुभवल्यावर लक्षात आले की या माणसाने काय अफाट काम करून ठेवले आहे. अशा एकाही प्रकारचे गीत नाही जे पंचम ने केलेले नाही. त्यातही शास्त्रीय संगीत वा रागावर आधारीत, सुगम संगीत, भावगीत, चित्रगीत, भजन, गझल, डिस्को, लोकगीत, कॅबरे, जॅझ, रॉक, फ्युजन, पार्श्वसंगीत, असे अक्षरशः अनंत परिमितीत पंचमची प्रतिभा व लक्षणीय काम पाहिले की अवाक व्हायला होते, शब्द थिटे पडतात, लेखणी असमर्थ वाटते.
एकदातरी आयुष्यात पंचम ला भेटायलाच हवे ही ईच्छा नव्हे तर तळमळ लागली तेव्हा पंचम मात्र कायमचा निघून गेला होता हे मान्य करणे जड गेले. काय हा विचीत्र दैवयोगच! कारण त्याच्या काळात पंचम लोकांना कळलाच नाही.. तो सर्वांच्या आणि काळाच्या खूप पुढे होता.. त्याअर्थी तो केव्हाच पुढे निघून गेला होता.. व्यावहारीक दृष्ट्या मात्र तो पुढे निघून गेला आहे, आपणच मागे राहिलो आहोत ही भावना अक्षरशः त्यावेळी ऊर जाळून गेली. माझ्या करंट्या नशीबावर मला त्यावेळी जितकी कीव आली ती आजवर दुसर्या कशाची आली नसेल. किशोर दा गेले तेव्हा दूरदर्शनवर त्यांची अंत्ययात्रा पाहून किमान घरी रडून तरी घेतलेच होते, पण पंचम साठी अश्रू गाळणे तो गेला तेव्हाही जमले नाही, कारण तेव्हा तो असा भिडलाच नव्हता, कळलाच नव्हता, हीच ती खंत! हे वैयक्तीक नुकसान कधीच न भरून येणारं आहे.
आता तो गेल्यावर मात्र त्याच्या नावाने शपथा, कहाण्या सांगणारे कलाकार, त्याच्या कामाबद्दल अदभूत आश्चर्य, त्याच्या नावाचे पुरस्कार, त्याच्या कलेबद्दल, त्याने चित्रपट संगीतात घडवलेल्या अमूलाग्र बदल ई. बद्दल लिहीणारे, बोलणारे, आणि त्याच्यातील कलाकारासमोर नतमस्तक होणारे जग केवळ शिल्लक आहे. पण तो नाही,
..... "कुछ लोग इक रोज जो बिछड जाते है
वो हजांरो के आनेसे मिलते नाही...
ऊम्रभर चाहे कोई पुकारा करे ऊनका नाम..
वोह फिर नही आते......"
त्यामूळे आता निव्वळ पंचम टॉप टेन ची माझ्यापुरती लिस्ट बनवून त्यातून पंचम पुन्हा जगण्याची ही ऊठाठेव. तर तसे असो.
अर्थातच हीच गाणी टॉप टेन का, दुसरी का नाही यावर ऊत्तर नाही.. माझ्या वरील सर्व पार्श्वभूमी, दृष्टीकोनातून ती तशी आहेत, ईतकेच. प्रत्त्येकाचे कारण वेगळे. काही गाण्यांना वैयक्तीक वा व्यावहारीक आयुष्यातील काही घटनांचे, स्थळांचे संदर्भ आहेत, काहींना तंत्र (टेक्नोलॉजी) चे, काहींना ईतर कसले. मला जो पंचम सापडला तोच तसाच तुम्हालाही सापडायला हवा असा आग्रह नाही, पण एकदा माझ्याही नजरेतून पहा एव्हडीच अपेक्षा.
तेव्हा लेखमालिकेच्या पुढील भागात एकंदर पंचमची सचित्र कारकीर्द, एकंदर आवाका (२), निवडक दहा गीते (३), पंचमबद्दलचे फेमस कोटस, वाक्ये, अनुभव (४), आणि शेवटी एक संक्षिप्तात आढावा, आजचे बदललेले संगीत आणि त्या संदर्भाने पंचम चे वेगळेपण (५) असे लिहायचे ठरवले आहे.
शिवधनुष्य ऊचलण्यापेक्षाही हे भयंकर अवघड काम असू शकेल.. बघुया कितपत जमतय. तुमचे पाठबळ असेल तर काहीच अशक्य नाही!
तूर्तास एकच विनंती. लेखामालिका पूर्ण होईपर्यंत, लेखाच्या अनुशंगानेच फक्त अभिप्राय दिलात तर बरे होईल. म्हणजे या लेखाच्या खाली तुमच्या आवडीची पंचम गीते किंवा कहाण्या नकोत- त्या भाग २ व ३ च्या अभिप्रायात आल्यास अधिक सुसंगत होईल, मुख्य म्हणजे माझी गाडी रूळावर राहील. बाकी जे लिहीलय त्याबद्दल अभिप्राय द्यालच.
भाग १ समाप्त.
पुढील भाग २.१
२७ जून (१९३९).
२७ जून (१९३९).
त्या निमित्ताने लेखमालिका पुन्हा एकदा 'वर' आणतोय. बाकी काही नाही.
वर आणल्याबद्दल धन्यवाद !!
वर आणल्याबद्दल धन्यवाद !! खुपच सुंदर लेख आहे. आम्ही तर एक लडकी को देखा च्या काळात गाणी ऐकायला सुरूवात केली. त्यामुळे ती सुरूवातीची ओळख. नंतर हळू हळू हा बॉस चा शेवटचा पिक्चर होता हे कळल्यावर खुप हळहळ वाटलेली. कॉलेज जीवनात आम्ही सुद्धा बॉस ला वाहून घेतलेले. इतकी गाणी ऐकली आणि मग नंतर ऐकतच राहिलोय.
बॉस करता आलेले झंकार बीट्स आणि दिल विल प्यार व्यार पाहून झाले. त्यातली गाणी ऐकली गेली. आणि आजही त्याच्या आवाजातले गाणे गाडीत लागले की त्या आवाजात म्हणण्याकरता सुरूवात केली जाते !!
Pages