स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी स्वयंसेवक हवेत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 19 June, 2017 - 10:04

स्थळ : पुणे, बुधवार पेठ, नूतन समर्थ प्राथमिक विद्यालय.
मुलं : इयत्ता पहिली ते सातवी या वर्गांत शिकणारी चळवळी, उत्साही, उपेक्षित समाजातून येणारी व देवदासी स्त्रियांची मुलं
शालेय वर्ष : २०१७ ते २०१८ (जुलै २०१७ ते मार्च २०१८)
काय शिकवायचंय : स्पोकन इंग्लिश, हसत खेळत, गाणी -कोडी-खेळ-गप्पा यांच्या माध्यमातून
किती वेळ द्यावा लागेल : आठवड्यातून एक तास फक्त. (शनिवारी दुपारी साधारण १२ ते १ दरम्यान)
तुमच्याजवळ काय हवं : या मुलांसाठी वेळ देण्याची तयारी, त्यांना शिकवण्याचा उत्साह, इंग्रजी भाषेचे योग्य ज्ञान, पेशन्स, आवड.
काय मिळणार : भरपूर आनंद, समाधान. कोणताही आर्थिक लाभ नाही.

तर मायबोलीकरहो,

यावर्षीही आपण नूतन स्मर्थ शाळेत स्पोकन इंग्लिशचे वर्ग चालू ठेवणार आहोत. गेली ३-४ वर्षे वेगवेगळे स्वयंसेवक हा उपक्रम अतिशय हौसेने व तळमळीने पार पाडत आहेत. आपल्या व्यस्त दिनचर्येतून खास वेळ काढून तो या मुलांसमवेत घालवताना तेही नवनवीन गोष्टी या मुलांकडून शिकत आहेत.

कोण आहेत ही मुलं?
नूतन समर्थ शाळेला ८०+ वर्षांची परंपरा असली तरी सुरुवातीला आजूबाजूच्या व्यापारी वस्तीतील मुलं शाळेत यायची. गेल्या काही दशकांत ती येणं कमी कमी होत गेलं. आजूबाजूला देवदासींची वस्ती प्रामुख्याने वाढली. त्यांच्या मुलांना शिक्षण देणारी, दिवसभराचा सुरक्षित आसरा व दोन वेळचं सकस अन्न देणारी ही संस्था साहजिकच देवदासींच्या मुलांना शिक्षणासाठी आधार ठरली. या शाळेत येणारी मुलं ही मुख्यतः वंचित, उपेक्षित व देवदासी वर्गातून येत असल्यामुळे त्यांचा रोजच्या जीवनात इंग्रजीशी अजिबात संबंध येत नाही. विलक्षण ताण व उपेक्षा सोसत ही मुलं आयुष्य कंठत असतात. त्यांना दिलासा असतो तो शाळेतल्या पाच तासांचा, ज्यात त्यांना मित्रमैत्रिणी मिळतात, नवं काहीतरी शिकायला मिळतं, प्रेमाने व आस्थेने चौकशी करणारं - रागावणारं - जवळ घेणारं - कौतुक करणारं कोणीतरी असतं. वर्षाच्या सुरुवातीला गणवेश, चपला बूट, नवं दप्तर, वह्या पुस्तकं मिळतात. शनिवारी कोणी पाहुणे भेटायला आले की खाऊ घेऊन येतात. तेवढीच गंमत!
शाळेला वेगवेगळ्या देणग्यांमधून ई लर्निंग सुविधा, संगणक, पुस्तकं वगैरे मिळालं आहे. परंतु चांगले शिक्षक तसे सहज मिळत नाहीत. मुलांशी खेळ, हास्यविनोद, गंमतगाणी, संवादाच्या माध्यमातून स्पोकन इंग्लिश शिकवणारं कोणीतरी शाळेला हवंच आहे.
आजपर्यंत मायबोलीच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील लोक, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट, जाहिरात क्षेत्रातील लोक, शिक्षण क्षेत्रातील लोक, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी वगैरे नानाविध प्रकारच्या स्वयंसेवकांनी या उपक्रमात आपले अनमोल योगदान दिले आहे.

मुलांना या वर्गातून काय मिळतं?

पांढरपेशा समाज या वर्गापासून तसा लांबच असतो. या वर्गाच्या निमित्ताने मुलं या समाजातील ताई-दादांशी संवाद साधू शकतात, त्यांच्याकडून नवं काही शिकू बघतात. मुलांना इंग्लिशची गोडी लावणं हे तसं आव्हानच असतं. परंतु ते साधत असताना मुलांना वेगवेगळ्या विषयांची माहिती देणं, त्यांच्या रोजच्या आयुष्यात येणार्‍या गोष्टी त्यांना इंग्रजी भाषेतून सांगणं, इंग्रजीविषयी त्यांच्या मनात आत्मविश्वास व गोडी निर्माण करणं हे जर साध्य झालं तर शालांत परीक्षेनंतरही त्याचा फायदा या मुलांना पुढील शिक्षणात होत राहातो.

लवकरच जुलै महिन्यात आपले स्पोकन इंग्लिशचे वर्ग सुरु होतील. या वर्गांसाठी मुलांना शिकवणारे स्वयंसेवक हवे आहेत.

तुमची जर तयारी असेल तर जरुर आपले नाव आम्हांला द्या.
काही शंका, प्रश्न असतील तर विचारा.
जसे योगदान शक्य असेल तसे योगदान द्या.
प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचेच आहे.

कोणाशी संपर्क साधायचा?

आपण मला व मायबोलीकर साजिरा ( http://www.maayboli.com/user/5883) यांना विपू, संपर्कातून लिहू शकता किंवा इथेच प्रतिसादातही लिहू शकता. आपले वैयक्तिक तपशील (संपूर्ण खरे नाव, फोन नंबर, ईमेल, काय करता वगैरे) हे संपर्कातून कळवू शकता.

या अगोदरच्या वर्षांतील उपक्रमाचे दुवे :

http://www.maayboli.com/node/59005

http://www.maayboli.com/node/54278

http://www.maayboli.com/node/49464

या शाळेविषयी मायबोलीवरील इतर लेखांच्या लिंक्स

http://www.maayboli.com/node/48317

http://www.maayboli.com/node/52506

http://www.maayboli.com/node/55353

धन्यवाद!

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

अरुंधती- मॅडमना पैशाची आवश्यकता असल्यास कळवशील का कृपया हक्काने ?

सर्वांना धन्यवाद!
@ रैना, हो, तसं त्यांना कळवूनही ठेवते गं!

अकु, धन्यवाद हा बाफ सुरू केल्याबद्दल.
अनेक गोड अनुभव वरच्या काही लिन्क्सम्ध्ये आहेत तरीही वेळ काढून इथे लिहिन..

उपक्रमाला मनापासून शुभेच्छा!
मी २०१२-१३ मध्ये ह्या उपक्रमात भाग घेतला होता. शिकवायचा कुठलाही अनुभव नसल्यामुळे जरा भीती वाटत होती. शिवाय घरच्या आणि कामाच्या जबाबदार्यांमुळे दर शनिवारी जमेल की नाही, अशी भीतीही वाटत होती. पण प्रत्येक वर्गाला दोन-दोन स्वयंसेवक असल्याने एखाद्या शनिवारी जायला जमलं नाही, किंवा उशीर झाला, तरी वर्ग चालू राहात असे. मुलांना शिकायला मजा येत होती. त्यामुळे मलाही मजा येऊ लागली. ह्या शिकवण्याचा मुलांना फायदा झाला की नाही, ह्याची खात्री नाही, पण माझं अनुभवविश्व मात्र विस्तारलं.

नंतर इतर काही जबाबदार्यांमुळे जाता आलं नाही. मी ज्या मुलांना शिकवत होते, ती आता सातवीच्या पुढे गेली असतील. मोठ्या शाळेत. त्यांची मला अजूनही आठवण येते.

ज्यांना जमत असेल, त्यांनी प्लीज ह्या उपक्रमात भाग घ्या, अशी माझी कळकळीची विनंती आहे.

धन्यवाद साजिरा व अनया! मुलांनाही तुमची आठवण येत असेलच. फार जीव लावतात मुलं. Happy

धन्यवाद अकु. या शाळेत शिकवणं आणि त्या मुलांमध्ये रमणं ही माझी सवय आणि गरजही बनून गेलिये आता. मला खुप समृद्ध केलंय या अनुभवांनी. या शाळेत शिकवण्याचे हे माझे सलग पाचवे वर्ष! सातवी होऊन बाहेरच्या मोठ्या शाळेत गेलेली मुलं पुन्हा शाळेत येऊन भेटतात आणि भेटल्यावर ज्या हक्काने मिठ्या वगैरे मारतात.... हजार प्रश्न विचारतात.... ते संचित काय असतं ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही!