कौरवपांडवांमध्ये राज्य विभागले गेल्यावर पांडवाच्या वाट्याला यमुनेच्या किनार्यावरील खांडवप्रस्थ येथील वन आणि पर्वताने वेढलेला भाग येतो. पांडव आपल्या मेहनतीने आणि उद्योगाने तेथे राजधानी वसवतात. द्रौपदीसहीत तेथे सुखाने कालक्रमणा करताना त्यांनी द्रौपदीला वर्षाच्या पाच भागांमध्ये विभागून घेतलेले असते. आणि त्या दरम्यान जर इतर कुठल्या भावाने त्यांच्या एकांतात प्रवेश केला तर त्याने बारा वर्षे तीर्थाटन करून त्याचे प्रायश्चित्त घ्यावे असा नियम देखिल केलेला असतो. त्यानूसार एका ब्राह्मणाच्या गायी वाचविण्यासाठी शस्त्रगारात शस्त्रे घेण्यासाठी अर्जुन प्रवेश करतो आणि तेथे द्रौपदी युधिष्ठीर असतात. नियमभंगाचे प्रायश्चित्त म्हणून अर्जुन बारा वर्षे तीर्थाटनाला निघतो. आपल्या प्रवासात द्वारकेला गेला असता कृष्णाच्या सल्ल्याने अर्जुनाकडून सुभद्राहरण घडते आणि अर्जुनाचा सुभद्रेशी विवाह होतो. अर्जुन बारा वर्षे संपवून परत आल्यावर श्रीकृष्णासहीत सुभद्रेबरोबर यादव मंडळी इंद्रप्रस्थाला येतात. यादवांकडून पांडवांना अपार धन मिळते. यादव परत जातात मात्र कृष्ण इंद्रप्रस्थातच काही वर्षे राहतो. या कालावधीत पांडवांपासून द्रौपदीला पाच मुले तर अर्जुनापासून सुभद्रेला अभिमन्यु होतो. ही खांडववन कथेची पार्श्वभूमि आहे.
अशातच अर्जुन आणि श्रीकृष्ण आपल्या स्त्रियांसहित वनविहारास निघतात. दोघेही आनंद लुटत असलेले हे स्थान खांडववनानजिक असते. तेथे अग्नि ब्राह्मणाच्या रुपात येऊन त्यांच्याकडे भोजनाची भिक्षा मागतो. त्याला खांडववन भस्मसात करुन आपली भूक भागवायची असते. मात्र यात एक अडचण असते. इंद्राचा मित्र तक्षक तेथे आपल्या माणसांबरोबर राहत असल्याने जेव्हा अग्नि हे वन जाळावयास जातो तेव्हा इंद्र वृष्टी करून ही आग विझवतो. ही अडचण दूर करून सुखानैव खांडववनाचा ग्रास घेण्यास अग्नि कृष्णार्जुनाकडे सहाय्य मागतो. दोघेही तयार होतात. परंतू या कामासाठी आवश्यक शस्त्रास्त्रे आपल्याकडे नाहीत अशी अडचण अर्जुन अग्निसमोर मांडतो.
अग्नि वरुणाचे स्मरण करुन त्याच्याकडून अर्जुनाला रथ, गांडिव धनुष्य, अक्षय भाता आणि श्रीकृष्णाला चक्र देतो. अशा तर्हेने ते दोघे शस्त्रसज्ज झाल्यावर अग्नि वन जाळण्यास सुरुवात करतो. कृष्ण अर्जुन त्या वनातून बाहेर पडण्यास धडपडणार्या एकुणएक प्राण्याला आपल्या शस्त्राने ठार मारतात किंवा जखमी होऊन त्यांना आगीत पाडतात. आपला मित्र तक्षकाला वाचविण्यास इंद्र धावून येतो आणि घनघोर वृष्टी करु लागतो मात्र कृष्णार्जुनाच्या पराक्रमापुढे ती निष्फळ ठरल्यावर आपल्या सहकार्यांसहित इंद्राचे कृष्णार्जुनासमवेत घनघोर युद्ध सुरु होते. शेवटी त्यांचा पराक्रम पाहून इंद्र संतुष्ट होतो. तक्षक खांडववनात नाही याची त्याला खात्री पटते आणि तो माघार घेतो. संपूर्ण खांडववन तेथल्या प्राण्यांसहित जाळुन, तेथिल प्राण्याची चरबी पिऊन अग्नि तृप्त होतो.
मूळ कथा समजल्यावर कथनशास्त्र यातील अर्थ लावताना कुठली साधने आपल्या हाती देते आणि त्या साधनांमधून अर्थ कसा लावता येतो हे आता पाहावे लागेल. मात्र त्या आधी मूळ कथेतच वाचताना काही गोष्टी जाणवल्या त्यांचा उल्लेख करणे अस्थानी होणार नाही.
खांडववन दाह कथा, काही शंका
खांडववन दाह कथा मूळात अशी असली तरी ती वाचताना अनेक शंका मनात उभ्या राहतात. कसलाही संदर्भ नसताना अचानक एक ब्राह्मण अग्निच्या रुपात येऊन उभा राहतो आणि खांडववन जाळण्याची भिक्षा मागतो. यामागे कसलाही आगापिछा नाही. कृष्ण आणि अर्जुन सोयीस्कररित्या खांडववनाजवळच वनविहाराला गेलेले असतात. आपली नेहेमीची शस्त्रास्त्रे न घेता क्षत्रिय वनविहाराला जातात हे फारसे संभवनीय वाटत नाही. दुसरे म्हणजे सुभद्रेला घेऊन भरपूर धनासहित यादव अर्जुन तीर्थाटनाहून परतल्यावर इंद्रप्रस्थाला येतात. त्यानंतर काही दिवसातच बाकी सर्व परत जातात पण कृष्ण राहतो. अर्जुन परत आल्यानंतर ते खांडववन दाहाच्या प्रसंगापर्यंत किती काळ गेला हे महाभारतात सांगितले नसले तरी अंदाज बांधता येतो कारण त्याच काळात द्रौपदीला पाच मुले होतात. म्हणजे कमीतकमी दहा वर्षाचा कालावधी गेला असण्याची शक्यता आहे. इतका काळ श्रीकृष्ण आपल्या बहिणीच्या घरी का राहिला हे कळत नाही. आणि अचानक अर्जुनाला वनविहाराला जावेसे वाटणे, तेही खांडववनाशेजारीच जावेसे वाटणे, त्याचवेळी तेथे अग्निने ब्राह्मणाच्या वेशात येणे, वन जाळण्याची भिक्षा मागणे इतके योगायोग एकाचवेळी होणे हेही चमत्कारिक वाटते.
पुढे जे काही घडते त्याची फारशी संगती लागत नाही. तक्षक इंद्राचा मित्र म्हणून त्याला वाचविण्यासाठी इंद्र धावून येतो. हाच इंद्र अर्जुनाचा पिता देखील आहे. हा संदर्भ जणु काही येथे पुसलाच जातो. जो वरुण अर्जुन आणि कृष्णाला हे वन जाळण्यासाठी शस्त्र पुरवतो तोच वरुण इंद्राबरोबर कृष्णार्जुनाविरुद्ध या युद्धात लढतो देखील. अग्नि फक्त वन जाळण्याची भाषा सुरुवातीला करतो. त्यातील प्राणी अथवा माणसे मारण्याचा उल्लेख त्याच्या बोलण्यात कुठेही नसतो. मात्र वन जाळायला सुरुवात केल्यावर अर्जुन आणि कृष्ण एक एक प्राणी, पशु टिपून, वेचून ठार मारतात. फार काय आकाशात उडणार्या पक्ष्यांनादेखील ते सोडीत नाहीत. तक्षकाची पत्नी मुलगा अश्वसेन याला गिळून आकाशमार्गे निसटायला पाहते तेव्हा अर्जुन तिला ठार मारतो. समजा फक्त वन जाळले असते आणि त्यातील जीवाच्या भीतीने सैरावैरा धावणारे प्राणी निसटले असते तरी वन जाळण्याची भिक्षा अग्निला मिळालीच असती. त्यामुळे नुसते वनच नाही तर वनासकट आत राहणारे यच्चयावत जीव ठार मारावेत हे कृष्णार्जुनाने आधीच ठरवले होते असे दिसते.
ज्या तर्हेने खांडववनात संहार झाला आहे त्यामागे दिसणारे क्रौर्य महाभरतातल्या मूळ कथेत अगदी उठून दिसते. आधीच आगीमुळे कुणाचे अंग जळाले, कुणी अतिउष्णतेने भाजून पडले, कुणाचे डोळे फुटले, कुणी बेशुद्ध झाले, कुणी भीतीने पळु लागले, कुणी मुलांशी, मातेशी, पित्याशी बिलगून प्राण सोडले पण प्रेमामुळे त्यांना सोडु शकले नाहीत, कुणी जळाल्याने कुरुप होऊन अनेकवेळा पडून पुन्हा आगीत पडु लागले, अनेक जण पंख, पाय व डोळे जळाल्याने जमीनीवर लोळण घेत मरु लागले, तलावातील जल उकळल्याने त्यातील मासे, कासव मरु लागले, सर्वांचे देह अग्निदेह असल्याप्रमाणे दिसु लागले, जे पक्षी उडत होते त्यांना अर्जुन हसत हसत बाणांनी तुकडे करून अग्नित टाकु लागला. देहात बाण घुसल्यावर आकांत करीत ते वर येऊन पुन्हा अग्नित पडु लागले. हे वर्णन वाचल्यावर अतिशय निर्घृण असे हे हत्याकांड होते हे सहजच समजून येते. यातून वाचण्याचा प्रयत्न करणार्यांना कुटीलतेसाठी कृष्णार्जुन व अग्नि "तुमची प्रतिष्ठा संपेल" असा शाप देतात असा हस्यास्पद प्रकारही येथे आहे. म्हणजे तुम्ही उगाचच आम्हाला क्रूरपणे ठार मारताना आम्ही स्वत:ला वाचवायचा प्रयत्न केला तर तो कुटीलपणा असा अजब प्रकार येथे घडलेला दिसतो.
शेवटी संपूर्ण वन जळून खाक होते. पंधरा दिवसांनी आग विझते. त्यातील प्राण्याचे मांस खावून, चरबी पिऊन अग्नि तृप्त होतो. तुम्ही इच्छा कराल तेथे पोहोचाल, तुमची गती कधी थांबणार नाही असा वर तो कृष्णार्जुनांना देतो. जीवदान दिलेला मय दानव पांडवांसाठी देखणी सभा बांधून देण्याचे ठरवतो. या सगळ्यात ज्यांचा काहीच दोष नसतो ते प्राणी, पक्षी, जलचर, तेथे आधीपासून वस्ती करुन असलेल्या वन्य जमाती अत्यंत क्रूरपणे मारल्या जातात.
कथनशास्त्राची साधने हातात घेऊन त्यांच्या सहाय्याने ही कथा काय सांगते ते पाहता अनेक वेगळ्या गोष्टी हाती लागतात.
(क्रमशः)
अतुल ठाकुर
उत्कंठा वाटतेय पुढे काय
उत्कंठा वाटतेय पुढे काय वाचायला मिळणार त्याची.
नाग लोकांचा उल्लेख पण याच भागात आहे ना ?
होय दिनेशदा. आपला अंदाज बरोबर
होय दिनेशदा. आपला अंदाज बरोबर आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उत्कंठा वाटतेय पुढे काय
उत्कंठा वाटतेय पुढे काय वाचायला मिळणार त्याची. >>> +१
आवडला भाग.
आवडला भाग.
महाभारत एकुणातच फार अस्वस्थ करणारं वाटतं. नीतिमूल्यांच्या कल्पनांना सुरुंग लागल्यासारखं वाटतं. त्रेतायुगात घडलं (पुराणानुसार) का हे? कलियुगाला उगाच बदनाम करतात मग.
हा भाग आवडला पु भा प्र, एक
हा भाग आवडला पु भा प्र, एक प्रश्न पडला आहे कि महाभारत द्वापार युगात घडले ना?
माझ्या वाचनात आलेल्या
माझ्या वाचनात आलेल्या माहितीनुसार महाभारत काल हा इसवीसन पूर्व ३००० वर्षे आहे. रामायण काल हा इसवीसन पूर्व ५००० वर्षे आहे.
वाचतो आहे!
वाचतो आहे!
काही ठिकाणी भस्माचे डोंगर
काही ठिकाणी भस्माचे डोंगर असतात . तिथेही असाच इतिहास असतो असे म्हणतात . पण धार्मिक अधिष्ठान असल्याने त्याची चिकित्सा होत नाही.
इंटरेस्टिंग
इंटरेस्टिंग
महाराष्ट्रात कुठेही भस्माचे
महाराष्ट्रात कुठेही भस्माचे डोंगर माहित असल्यास मला तातडीने तपशीलात कळवा. प्लीज. कर्नाटकात आणि आंध्रमधे असे ढिगारे बरेच आढळतात पण महाराष्ट्रात क्वचित. मी त्यांची माहिती गोळा करत आहे.
तैमूर, तुम्ही एकदा वैयक्तिक संपर्कातून खिद्रापूरपाशी कुठल्या तरी गावात असलेल्या भस्माच्या डोंगराविषयी कळवले होते ती मेल मला सापडत नाहीये. परत एकदा कळवणार का?
हो. तो म्याटर आता पुर्वीच्या
हो. तो म्याटर आता पुर्वीच्या आयडींबरोबर भस्म झालेला आहे.
खिद्रापुरजवळ टाकळी येथे भस्माचे डोंगर आहेत , असे ऐकून आहे.
ओके. मनःपूर्वक धन्यवाद.
ओके. मनःपूर्वक धन्यवाद. आणखीही कधी कुठे माहिती मिळाली तर जरूर कळवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा अंदाज - पांडवानी राज्य
माझा अंदाज - पांडवानी राज्य वाढविण्यासाठी खांडववन जाळले. तिथले प्राणी ( अनार्य) बाहेर पडून परत आपल्याच राज्यातल्या लोकांना त्रास द्यायच्या आधी मारले. अग्नी ला अर्पण करून दिव्य शस्त्रे मिळवली. इंद्राने वर वर युद्ध केले असे दाखविले आणि आपलाच मुलगा असल्याने माघार घेतली. इंद्र, अग्नी सगळे आर्य च.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रीकृष्णाचा हेतू च मुळी द्वापार युग ला क्लोजर देणे असल्याने अर्जुनाला यशस्वी होण्याकरिता ( आणि महत्त्वाचे म्हणजे अर्जुन जिवंत रहावा म्हणोन ) त्याने सहाय्य केले. अर्थात हा अंदाज आहे.
खांडव दाहनाचा प्रसंग
खांडव दाहनाचा प्रसंग इंद्रपस्थ उभारण्यापूर्वीच घडला आहे ना?
>>>महाभारत एकुणातच फार
>>>महाभारत एकुणातच फार अस्वस्थ करणारं वाटतं. नीतिमूल्यांच्या कल्पनांना सुरुंग लागल्यासारखं वाटतं ------- सहमत.
हो. खांडव वन आधी जाळले.मग
हो. खांडव वन आधी जाळले.मग तिथे मयसभा इंद्रप्रस्थ उभारले.
पण ढ्रुतराष्ट्रने खांडववन पांडवाना आधीच दिलेले होते. तिथे ते सुरुवातीला झोपडी बांधुन रहात होते.
.....
खांडव वन अॅग्री लँड होते. तॅ पांडवाना मिळाले.
त्यानी तिथे झोपडी बांधली. झोपडी पाडू नये म्हणुन कमान उभारुन त्यावर एखाद्या दमदार नेत्याचे नाव लिहायचे म्हणुन इंद्राच्या नावे ' इंद्रप्रस्थ झोपडपट्टी ' नाव दिले.
मग झोपडी कायम करण्यावरुन मूलनिवासींशी संघर्ष . त्यातून जाळपोळ. जाळपोळीनंतर अॅग्री प्लॉट एन ए झाला.
त्यामुळे पांडवाना एफ एस आय वाढून मिळाला.
मग एस आर ए , झोपु अंतर्गत रिडेवलपमेंट करुन मय बिल्डरबरोबर हातमिळवणी करुन न्यू इंद्रप्रस्थ उbhe केले.
मुलनिवासी जोरदार नसल्याने संपले किंवा कर्जतला पळाले.
त्यांच्या नेत्यानी वरवर युद्ध व आतून मांडवली असे सेनीय - मनसीय धोरण वापरुन देवपद टिकवले.
..........
दिसते मजला सुखचित्र नवे !
व्यासोच्छिष्टं जगत सर्वम !
खिद्रापुरजवळ टाकळी येथे
खिद्रापुरजवळ टाकळी येथे भस्माचे डोंगर आहेत , असे ऐकून आहे.
>>>
तैमूर, खिद्रापूरजवळ सैनिक टाकळी आहे ना? का अजून एक टाकळी पण आहे नुसती? एक अगदी मिरजेजवळ आहे पश्चिमेला
वरदा, डिटेल माहिती हवी असेल तर वडिलांना सांगतो. सध्या त्यांना गावा भोवतालच्या गोष्टीत जाम इन्तरेस्ट आलाय आणि निसर्गसंवाद वगैरे ग्रुपातून ते हौसेने असली कामे करायला जातात
खांडव दाहनाचा प्रसंग
खांडव दाहनाचा प्रसंग इंद्रपस्थ उभारण्यापूर्वीच घडला आहे ना? >> मलाही असेच आठवतेय. खांडव वन जाळून तिथे इंद्रप्रस्थ वसवले.
खिद्रापुरजवळ सैनिक टाकळी आहे.
खिद्रापुरजवळ सैनिक टाकळी आहे.
वरदा, माझी मावशी सैनिक टाकळीत
वरदा, माझी मावशी सैनिक टाकळीत रहाते. तिला विचारुन सांगते.
इतक्या मोठ्या प्रमाणा वर
इतक्या मोठ्या प्रमाणा वर निरपराध पक्षी व प्राण्यांचा संहार अक्ष्म्य आहे. त्यामुळे त्यानंतर त्यांच्या सोबत झाले ते संयुक्तिक वाट्ते कणभरही साहानुभूति वाटत नाही. अना र्य म्हणजे लोकल राहणारे वनवासी आदिवासी लोक, प्राणी व लोकल झाडे वनस्पती. ह्यांना मारून नवी वसाहत उभारली हे जगात खूप ठिकाणी झाले आहे. अमेरिकेत ओरिजिनल इंडियन समुदाय, ऑस्ट्रे लियातील व कँनडातील अबोरिजिनल्स लोकांची कत्तल, त्यांना गुलाम बनवून किंवा त्यांचे पूर्ण कल्चरच उध्वस्त करून वर आपल्या वसाहती उभारण्याचा वसाहत वाद इथे दिस्तो. पूर्वी शेती साठी राने जाळत व जमीन क्लीअर करत तसे ही असू शकेल. सध्या असलेल्या रेफ्युजी प्रश्नाशीही सांगड घालता येइल. बाँब स्फोट करून असलेल्या लोकल लोकांच्या वसाहती नष्ट करायच्या तिथे जगणे अशक्यच करून सोडायचे व वरून दांभिक पणा करून तेच कसे चूक आहेत ते दाखवायचे हे ही जग भर झाले आहे.
माझा प्रतिसाद शास्त्रिय भाषेत नाही. पण इतक्या प्राण्यांचा लोकांचा तळतळा ट घेउन वसवलेल्या जीव नाचा अंत कसा होतो हे ही दिसतेच.
हे भस्माचे डोंगर म्हणजे काय,
हे भस्माचे डोंगर म्हणजे काय, याबद्दल काही माहिती मिळेल का?
आंध्रप्रदेश व कर्नाटकमधे
आंध्रप्रदेश व कर्नाटकमधे आढळणारे भस्माचे डोंगर हे तेथील इ.स.पू १५०० च्या आसपास राहणार्या नवाश्मयुगीन शेतकर्यांच्या वसाहतींशी निगडीत असतात. तत्कालीन शेतकरी बहुदा खूप मोठ्या प्रमाणात खिल्लार बाळगून असत व त्यांच्या शेणाचे ढिगारे ते नियमितपणे एकत्र करून एकाच ठिकाणी जाळत असत. त्याच्या राखेतूनच हे आजचे भस्माचे डोंगर तयार झाले. मात्र महाराष्ट्रात हे क्वचित ऐकिवात आहेत. जिथे जिथे ऐकिवात आहेत तिथले डोंगर आता नामशेष झाल्याने त्यांवर फारसे संशोधनही झालेले नाही. मला त्यात रस आहे म्हणून माहिती गोळा करत आहे.
गाणगापूरचा भस्माचा डोंगर म्हणजे असाच नवाश्मयुगीन शेणाच्या राखेचा ढिगारा होय. त्यात इतर दैवी काहीही नाहीये
असो. माझे प्रतिसाद फार अवांतर
असो. माझे प्रतिसाद फार अवांतर झालेत त्याबद्दल सॉरी, अतुल ठाकूर. तुमच्या लेखनाच्या पुढच्या भागांची वाट बघते आहे.
धन्यवाद वरदा.
धन्यवाद वरदा.
आणि अवांतरा बद्दल मला सुद्धा क्षमस्व, अतुल ठाकुर.
काहीच हरकत नाही. त्या
काहीच हरकत नाही. त्या निमित्ताने नविन माहिती मिळतेय
सर्वांचे मनःपूर्वक आभार ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ अतुल ठाकूर, महाभारत कधी
@ अतुल ठाकूर, महाभारत कधी घडले, कृपया याविषयी आपले मत सांगाल का?
नक्की नाही सांगता येणार.
नक्की नाही सांगता येणार. महाभारताची चिकित्सक आवृत्ती साधारण इसवीसन १००० चे महाभारत उभे करते. त्याच्या आधी गुप्त काळ आहे जो इसवीसन ३०० ते ५०० च्या आसपासचा आहे. त्याच्या आधी मौर्य काळ आहे जो इसवीसनपूर्व ३०० च्या आसपास आहे. त्याच्या आधी बौद्ध आणि जैन धर्म. म्हणजे ५०० वर्षे आधी असेल. त्याच्या अगोदर उपनिषदांचा काळ, त्या आधी आरण्यके म्हणजे यज्ञसंस्थेच्या उताराचा काळ आणि कर्मकांडाला बुद्धीवादी वळण देण्याचा काळ. त्याच्या आधी यज्ञसंस्थेचा काळ आहे. महाभारतात राजसूय यज्ञाचा उल्लेख आहे. कदाचित २५०० ते ३००० हजार वर्षापूर्वी असेल असे वाटते. पण वरदासारखे कुणी तज्ञच याबद्दल सांगु शकतील.
राजसूय व अश्वमेध हे अतिशय
राजसूय व अश्वमेध हे अतिशय महागडे यज्ञ होते.. त्यामुळे पुराणकालानंतर ऐतिहासिक काळात त्याचे उल्लेख फार कमी आहेत.
@ अतुल ठाकुर, माहितीबद्दल
@ अतुल ठाकुर, माहितीबद्दल धन्यवाद.
Pages