पोळी/चपातीची कणीक कशी भिजवावी?

Submitted by राहुल बावणकुळे on 10 April, 2017 - 23:36

सध्या मी मुंबईमध्ये PhD करत असून एकटाच राहतो आणि दररोज स्वयंपाक करून institute ला डबा घेवून जातो. मुंबईत आल्यापासून तेल लावलेल्या पोळ्या/चपाती खायची सवय पडलेली. नागपूरकडे अशी पद्धत नाही. त्यामुळे पोळी/चपाती साठी कणीक भिजवताना आधी तेल की पाणी टाकू असा सदैव प्रश्न पडतो? तसेच कणीक मळून झाल्यावर पोळी/चपाती करण्यापूर्वी साधारण किती वेळ झाकून ठेवावी?
कृपया कणीक भिजवताना दूध किंवा तत्सम काही टाकण्याचा अनाहूत सल्ला देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२ कप पीठ मोठा बाऊल,परात्,ताटात घ्या. त्यात ३ छोटे चमचे तेल घाळुन घ्या. मीठ चविपुरत घालून घ्या. सगळ मिक्स करा. आता हळु हळु पाणि घालत मळायला सुरुवात करा. साधारण ओबडधोबड गोळा व्हायला लागला कि मग आणखी पाणी घालू नका. आता हाताला थोड पीठ लावून गोळा परत मळुन घ्या. छान गोल ,मघासपेक्षा गुळगुळीत गोळा होईल. आता कणकेला तेलाच्या हाताने शेवटच मळून घ्या. अगदी तुकतुकीत , भेगा नसलेला गोरापान देखणा गोळा झाला कि कणिक तयार. Happy साधारण १०/१५ मिनिट तरी (झाकून)भिजत ठेवा कणिक. त्यापेक्षा जास्त ठेवली तरी चालेल.
आता साधारण लाडु एवढा गोळा घ्या. चपटा करा. पीठात घोळून घ्या. अति पीठ नको. अगदी हलक्या हाताने पुरी एवढा लाटून घ्या. त्यावर तेल पसरवा. थोडस पीठ भुरभुरवा. आणि त्रिकोणी घडी घालून घ्या. कुठेही दुमडू नका घडी घातल्यावर. (त्रिकोण दुमडला , तर चपातीला पापुद्रे सुटत नाहीत. आणि फुगतही नाही छान) त्रिकोण लाटुन घ्या. चपाती त्रिकोणी झाली तरी चालते. गोल करण्याच्या नादात फार पातळ नको.
एकसारखी लयीत लाटली चपाती कि छान फुगते.
आई सकाळी चपाती करताना नुस्त्या आवाजाने ओळखता येत.
तिचा हात अगदी एकसारखा लयीत फिरत असतो आणि बांगड्यांचा असा मस्त रिदम मध्ये आवाज येत असतो.

सीमा, मस्त वर्णन.
राहुल, सीमाने वर्णन केल्याप्रमाणे. पण एकदा पाणी मोजून घ्या. दोन कप कणकेला साधारण एक कप पाणी
लागते. सुरवातीला कणीक, पाणी सगळे मोजूनच घ्या. नंतर अंदाज येत जातो.
लाटायला तांदळाचे पिठ घेतले तर लाटायला सोपे जाते. गोल चपाती लाटताना लाटण्याची अ‍ॅक्शन अशी हवी ( इंग्रजी ओ अक्षराप्रमाणे ) कि चपाती जागच्या जागी गोल फिरली पाहिजे. पण याला थोडा सराव हवा.
नवीन माणूस लाटताना, मनगटाचा फार जोर लावतो. चपाती लाटताना अजिबात जोर लागत नाही ( लागू
नये, इतपत कणीक मऊ असावी ) केवळ लाटण्याचे वजन आणि हाताची हालचाल वापरून कणीक
लाटता येते.

सुरवातीला चपात्या गोल होणार नाहीत, त्यामूळे पहिला प्रयत्न हा ती सारख्या जाडीची व्हावी असा असावा. लाटताना
पोलपाट नक्की घ्या. पोळीची कडा आणि पोलपाटाची कडा यामधील अंतरावर लक्ष ठेवायचे, म्हणजे कुठल्या बाजुला
जास्त लाटायला हवी ते कळते.

पहिल्यांदा खुप वेळही जाईल चपात्या करण्यात. त्यामूळे त्यात बेसन_+ हिरवी मिरची + हळद वगैरे घालून ( मिस्सी
रोटी ) करा म्हणजे भाजी नाही केली तरी चालते.

चिकाटी सोडू नका, फारतर दोन आठवडे लागतील हे तंत्र जमायला.

@ तैमूर: होय, गोवंडी मध्ये. आपणही तिकडेच असता का?
@ सीमा व श्री दिनेश: प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपल्या सुचनांचे पालन करेल. मला पोळी/चपाती अगदी गोल व आवश्यक तेवढी पातळ बनवता येते. Infact सर्वच स्वयंपाक चांगल्या रीतीने करता येतो, केवळ कणीक भिजवातांना पडणाऱ्या प्रश्नाचे निरसन करायचे होते.

राहुल, तुम्ही यू ट्यूब वर मधुराज रेसीपी मध्ये मराठी रेसीपी आहेत त्यात घडीची पोळी म्हणून सर्च करा. सोपे जाईल. ऑल द बेस्ट.

कणिक झाकून ठेवताना त्यावर हवा राहणार नाही याची काळजी घ्या म्हणजे गोळा वाळत नाही. कणिकेच्या गोळ्याच्या साईझ चे भांडे घ्या झाकायला...

आई सकाळी चपाती करताना नुस्त्या आवाजाने ओळखता येत.
तिचा हात अगदी एकसारखा लयीत फिरत असतो आणि बांगड्यांचा असा मस्त रिदम मध्ये आवाज येत असतो. << होहो

मला पोळी/चपाती अगदी गोल व आवश्यक तेवढी पातळ बनवता येते. Infact सर्वच स्वयंपाक चांगल्या रीतीने करता येतो, केवळ कणीक भिजवातांना पडणाऱ्या प्रश्नाचे निरसन करायचे होते.>>
सीमा ने पर्फेक्ट क्रुती लिहलीये! पोळिला तेल आवडत नसेल तर तुप, बटर लावले तरी चालते... फुल़क्याना काहिच लावले नाही तरी चालते पण मग ते लगेच खावे लागतात. डब्यात न्यायच असेल पोळीला मऊ राहाव म्हणुन वरुन तेल्/तुप लावावेच लागेल.
कणीक भिजवताना तेल पाणि कुठल्याही क्रमाने घातले तरी फरक पडणार नाही, प्रमाणाने मात्र पडेल.
नागपुरला काय पद्धत आहे?
(माबोकर आपलुकीने (थोडा जास्तिचा) सल्ला देतातच, गोड मानुन घ्या! त्यात अजुन एखाद्या नवशिका पण मराठी टाइप न येणार्‍याचाही फाय्दा होतो.)

कणिकेत तेल घातल्याने नंतर गोळा करताना परातिला चिकटलेली कणिक काढताना त्रास होतो, त्यासाठी मी परात घेतल्या वर त्यात २-३ चमचे तेल घेते (कणिक किती आहे त्यावर प्रमाण ठरते, मी अंदाजेच घेते) आणि त्या तेलात मीठ घालून ते मिश्रण आख्ख्या परातीला लावून घेते आणि मग कणिक घालून मळायला सुरूवात करते, त्यामुळे कणिक कमीत कमी चिकटते आणि शेवटी छान गोळा होतो.
काही लोक कणिक कोमट पाण्यात मळतात, माझी बहिण आदल्या दिवशी उरलेल्या दुधात भिजवते कणिक.

सीमा, दिनेशदा आणि बाकी सगळेच, मस्त लिहिलय. मलाही नीट पोळ्या येत नाहीत. आता इथे लिहिलय तसं एक एक करुन बघेन.

मलाही नीट पोळ्या येत नाहीत. >>>> +१ पण माझे कारण कदाचीत हे असेल की मला पोळ्या ना खायला आवडतात ना करायला. यापेक्षा भाकरी बरी लगेच होते आणी खायलाही छान लागते, खासकरुन तांदळाची.

अवांतराबद्द्ल क्षमस्व

कणिक भिजवताना आधी फक्त पाण्याने भिजवून मग शेवटी तेलाच्या हाताने मळून घेतली तर कमी तेलात चांगली मळून होते.

सर्वाना धन्यवाद! आणि माझ्या स्पष्टवक्तपणाबद्दल क्षमस्व कारण मायबोलीवर अनेक मूळ प्रश्न अनुत्तरीत राहून फटफसारा वाढल्याची उदाहरणे आहेत.
@ प्राजक्ता: नागपूरकडे सहसा कणिक पाण्यानेच भिजवतात, तेल मुळीच घालत नाही. शक्यतो पोळी कोरडीच असते. मात्र त्याची कसर भाजीमध्ये काढली जाते, जरा जास्तच तेल असते. किंबहुना मला पोळी/चपातींचे विविध नवीन मराठी प्रकार मुंबईतच कळले, कारण नागपूरला पोळी (त्रिकोणी वा साधी), फुलके, किंवा ज्वारीची भाकरी केली जाते. एखाद्या वेळी पुरी किंवा पराठे ही करतात. ह्याशिवाय तंदुरी रोटी, नान, कुलचा इ. उत्तर भारतीय प्रकार असतात पण ते सहसा घरी केल्या जात नाही. मात्र मुंबईत घडीची पोळी/त्रिकोणी पोळी, चपाती, आंबोळी, वडे, तांदळाची/ज्वारीची/बाजरीची भाकरी इ. प्रकार करतात.
@ सीमा व अदिती: मी जेव्हा पोळी/चपाती करतो, तेव्हा अधून मधून पोळपाटाचा आवाज येत असतो. तो देखील छान वाटतो. अगदी आईच्या बांगड्यांच्या आवाजाची सर नसली तरी, तिच्या वळणावर जात आहोत असे वाटत.

पहिल्या प्रतिसादात थोऽडी भर.

एक स्वच्छ सुती कपडा ठेवायचा जवळ. त्याच्या बोळ्याने तव्यावर पोळी शेकताना थोडी थोडी दाबत फिरवत रहायची. बुडबुड्यासारखे फुगणार्‍या जागेच्या आधी आजू-बाजूला दाबायचे, अन मग हलकेच फुगलेल्या जागेतली हवा दाबली, तर पोळी चट्कन फुगते.

त्रिकोणी घडीचा गोल करणे जमायला थोडी कलाकुसर यावीच लागते. शिकाऊ कारकिर्दीत याला पर्याय म्हणून थोडी लांबट झीरो 0 आकृती लाटून मग त्यावर तेल लावून मधेच चिमटी काढायची, अन लाटीचा 8 चा आकडा बनवायचा. हे दोन्ही गोल एकमेकांवर आणले, की साधारण गोलसर लाटी होते, जी नीट गोलाकारात लाटता येते, अन पुडाची पोळीही होते.

ता.क. माझ्ह्या स्वल्प ज्ञानानुसार कणिक/तत्सम भिजवतानाच घातलेल्या तेलाला "मोहन" म्हणतात. हे घातलं, तर पोळी/पराठा इ. खुसखुशीत होतं. का, त्याची केमेस्ट्री आत्ता आठवत नाहिये. मोहन शब्दाचा उगमही चिनुक्स यांच्या अन्नं वै प्राण: मधे कुठेतरी वाचलासा वाटतोय.. पण पोळी ची कणिक भिजवताना मोहन घातलंच पाहिजे असं नाही, हा स्वानुभव.

माझ्ह्या स्वल्प ज्ञानानुसार कणिक/तत्सम भिजवतानाच घातलेल्या तेलाला "मोहन" म्हणतात. हे घातलं, तर पोळी/पराठा इ. खुसखुशीत होतं. >> तेल गरम करुन घालतात त्याला "मोहन" म्हणतात. Happy

फूडप्रोसेसर मध्ये पण मस्त कणिक मळता येते .
हवे तेव्हढे पीठ मग चवीपुरतं मीठ आणि तेल १ /२ चमचे आणि मग अंदाज घेत पाणी घालायचे .
मस्त कणिक मळून होते आणि फुलके ,पोळ्या पण छान होतात.

तेलाबद्दल मेधावि ला अनुमोदन.
मुळात कणीक मळताना व्यवस्थित जोर लावून तिंबायची. जितकी व्यवस्थित मळली जाईल तितक्या पोळ्या चांगल्या होतील. कधीकधी विकतची कणीक चांगली असतेच असं नाही, एकदम वातड पोळ्या होऊ शकतात. अशा वेळेस गरम किंवा कोमट पाण्यात मळून घ्यायची.

मोहन म्हणजे गरम करून घातलेलं तेल. भज्याच्या, वड्याच्या पिठात घालतात तसं. कणकेत मोहन घालत नाहीत. गार तेलच घालतात.

तेलाचा एकही थेंब न लावता/घालता पीठ मळून मी घेत असे.परातीला चिकटलेली कणीक काविलत्याने/उलथण्याने काढायची. माझ्यासाठी फुलके करायची, नवर्‍यासाठी पोळ्या,त्यात घडीत तेल घालायचे.दुपारपर्यंत फुलके मऊ रहातात.

२-३ चमचे तेल कणीक मळताना घालाय्ची गरज नसते. कणीक मीठ पाणी घालुन चांगली मळायची. मग एखादा लहान चमचा तेल घालुन पुन्हा नीट तेल मुरेपर्यंत मळुन घ्यायची. ५-१० मिनिटानी चपात्या करायला घ्यायच्या. उंड्यात एखादं बोट तेलाचं लावायचं. चांगल्या होतात.
मला त्रिकोणी-चौकोनी चपात्या लाटतान हळु विचार्पुर्वक लाटाव्या लागतात. भराभर फक्त गोलच लाटता येतात.

अगदी थोडे सोयाबीन चे पीठ मिक्स करा... खूप मऊ होतात पोळ्या...
आणि मऊच राहतात दुसऱ्या दिवशी पण.. कडक होत नाहीत.

पोळी/चपातीची कणीक कशी भिजवावी? >>>> फुड प्रोसेसर मधे. कारणं अनेक -
एक ते दोन दिवसामधे पाण्याचा अंदाज आला कि कणिक मळणं अतिशय सोपं होतं. कणिक + थोडंसं मीठ + ठरलेल्या मेजरने पाणी + ३-४ मिनिटं फिरवलं कि मस्त सॉफ्ट कणिकेचा गोळा तयार. भिजवुन ठेवायला वेळ नसेल तर लगेच लाटलं तरी चालतं, इतका छान तिंबला गेलेला असतो.
हाताने खुप तिंबावी लागते, फुप्रो मधे ३-४ मिनिटं फिरवली कि न भिजवुन ठेवता सुद्धा मस्त मऊ पोळ्या होतात. आणि जास्त मऊ पण.
तेल न घालता सुद्ध मळता येते आणि भांडं तरीही स्वच्छ रहातं. त्या उलट हाताला तेल न लावता कणिक मळली तर धुवायला खुप पाणी लागतं .
मी तेल न घालता मळते त्यामुळे भांडं नुसतं पाण्याने लगेच धुवुन टाकता येतं. कणिक काढुन डब्यात ठेवेपर्यंत फुप्रो भांड्यामधे पाणी घालुन ठेवायचं आणि नंतर नुसतं पाण्याने विसळलं तरी चालतं. फार पाणी वाया जात नाही.
कणिक हाताने मळली आणि ठेवुन दिली कि काळी पडते ( असं म्हणे कि हाताच्या उष्णतेने), तशी फुप्रो मधे अजिबात काळी होत नाही, पोळ्यासुधा नंन्तर पांढर्‍या होतात.
मला हात स्वच्छ धुतले तरी कणिक हाताने मळणे फारसं आवडत नाही, अनहायजेनिक वाटतं उगीचच. बरोबर नाही मला माहित आहे, पण आवडात नाही एवढं नक्की.

चांगली कणिक/गहू विकत आणा. शरबती चांगला किंवा पिल्सबरी/सुजाता इ ब्रँड - आडात नसेल तर पोहर्‍यात काय येणार! मायबोलीकरांनी दिलेल्या पटतील त्या सूचना अमलात आणा. ब्याकग्राउंडात "उसे मुक्कमल कर भी आओ वो जो अधुरीसी बात बाकी है" असे एखादे मेडीटेटीव्ह गाणे लावा. कणिक तिंबणे हे एक कार्य नसून लाईफ चेंजिंग एक्सपिरीयन्स आहे. सरेंडर विथ अथॉरिटी. गुडलक!

काय बे ! अजून कणिक भिजवून च राहलाय का ?
<
हाव नं! चपात्या कवंय लाटतीन आन शेकतीन कवंय? भूकेजून जीव जायलाय हिते Wink

*
आरारा म्हटलं तरी चालेल
<<

त्या दक्षिणा ताई बघा, मला कणकेत घालून तिंबायचा प्लॅन आहे त्यांचा Lol

ब्याकग्राउंडात "उसे मुक्कमल कर भी आओ वो जो अधुरीसी बात बाकी है" असे एखादे मेडीटेटीव्ह गाणे लावा. >> + १००
गहू शरबती असतील तर - मैं रंग शरबतों का, हे गाणे पण चालावे !

मैं रंग शरबतों का >>> Lol
उसे मुक्कमल कर भी आओ >>> कणकेला एव्हढे उर्दू समजणार नसेल तर 'हम होंगे कामयाब' किंवा 'रुक जाना नाहीं तू कहीं हार के' पण चालेल...

एका व्यक्तीसाठी चपात्या करायच्या असतील तर फुड प्रोसेसरमध्ये त्या दिवसापुरती कणीक मळता येते का?

मी अनेक वर्षे फूड प्रोसेसरमध्ये कणीक मळतो आहे. तेव्हा तीन व्यक्ती होत्या. कधी पर्फेक्ट जमते. कधी आपला हात जगन्नाथ म्हणत दुरुस्ती करावी लागते.

आता फूड प्रोसेसरच्या भांड्याचा आकार बघता त्यात एका व्यक्तीसाठी कणीक भिजवायचा प्रयत्न केला नाही.

हाताने हँडल फिरवायचे यंत्र वापरले

हे नवे यंत्र आलेले दिसत आहे

मग शेवटी कोणतेही यंत्र न वापरता कणीक मळून पाहिली.

बहुतेक वेळा पाणी जास्त होऊन प्रॉब्लेम होत असे. मग आई काय करायची ते आठवलं. गोळा होत आला की कणकेत सरळ आणखीपाणी न घालता हातावर पाणी घेऊन त्याने कणीक मळायची.
इथे बी या आयडीचा फुलक्यांचा धागा आहे. त्यात कणीक मळताना पंजाच्या मनगटाकडच्या भागाने जोर देण्याबद्दल लिहिले आहे. तेही केलं.
या गुढीपाडव्याला पुरीसाठी कणीक मळली आणि ती पर्फेक्ट जमली. नेहमी कणीक सौल होऊन पुर्‍या तेल पीत.

मला स्वतःला कमी कणकेला फुप्रो किंवा ते हँडल मशीन वापरणं खूप कटकट वाटते.नंतर ती भांडी, ब्लेडस नीट धुवा. कोपऱ्यात कुठे पीठ असेल ब्लेड च्या आत तेही खरवडून काढा(नाहीतर बुरशी किंवा अळ्या होतात)
पटापट पाहिजे तितकं पीठ बाउल मध्ये घेऊन हाताच्या अंगठ्याच्या बाजूचा आडवा हात तळवा भाग दाबत,बोटं आणि अंगठा अजिबात न वापरता तो इन प्रोसेस गोळा भांड्यात कडेला फिरवत(म्हणजे नंतर बाउल घासायला सोपा आणि पीठ नासाडी कमी) आणि थोडं थोडं पाणी घालत पटापट मळून होते कणिक.
कोणावर राग आला असेल तर अधून मधून तो गोळा बाऊलमध्ये आपटून आपटून टाकता पण येतो Happy

मी कणिक मळण्यास फुप्रो घ्यायचा एकदा विचार केला होता पण तुम्ही लिहिले त्याच कारणामुळे (दुप्पट काम) विचार बदलला. कबिता'ज किचनचा व्हिडिओ फार कामी आला मला तेव्हा. त्या आधी कधी घट्ट म्हणुन पाणी घातले की जास्त सैल मग परत कोरडी कणिक घाला असे इटरेशन्स बरेच व्हायचे ते एकदम कमी झाले, आणि मग एकाच स्टेप मध्ये जमायला लागले.

एका व्यक्तीसाठी चपात्या करायच्या असतील तर फुड प्रोसेसरमध्ये त्या दिवसापुरती कणीक मळता येते का? >>> येते. दिवसभराच्या पोळ्यांची कणिक एकदम भिजवा.

कणकेत तेल, मीठ व थोडे पाणी घालून एकदा फिरवून मिक्स करा. नंतर एका भांड्यात पाणी घेवून एकीकडे अगदी बारीक धार घालत एकीकडे कणिक फिरवा. ज्या point ला गुठळी दिसेल त्या पॉईंटला कणिक फिरवत अगदी सावधपणे लागेल तेवढं चमचा चमचा पाणीच लागेल. जरा मोठ्या गुठळ्या झाल्या की पाणी एकदम बंद आणि नुसती कणिक फिरवणे. छान मळून निघते. भांडंही साफ राहाते.

दोन तीनदा करुन अंदाज येवू लागला ह्या सगळ्याला की फक्त २ मिनिटं पुरतात.

मी वर्षभर फूड प्रोसेसर वापरला कणीक मळण्यासाठी. (त्याआधी पोळ्यांना बाई होत्या.) कणीक उत्तम मळली जायची, पण फुप्रोची भांडी तडकायची. मी एकूण तीनदा नवीन भांडं मागवलं आणि शेवटी वैतागले. (माझ्याकडे प्रीति झोडिआक मिक्सर कम फुप्रो आहे.)
मग गेल्या वर्षी अगारो कंपनीचा स्टँड मिक्सर मागवला. महाग आहे, पण तेव्हा पन्नास टक्के की काही तरी सूट होती. (आताही दिसतेय amazon वर ४६%). चांगला आहे हा. मी रोज त्यात कणीक मळते. स्टीलचं भांडं असल्यामुळे डिशवॉशरला चालतं, हाताने घासायलाही फारसे कष्ट नाहीत. ब्लेड जरा वेळ पाण्यात भिजवून ठेवलं तर सहज स्वच्छ होतं. तीन-चार वाट्या कणीक मळली जाते एका वेळी.

कणकेत साधारण निम्मे पाणी पुरते पण काही गव्हांची पिठे कमी पाणी पितात. त्यामुळे मी नेहमी निम्मे पाणी घेते व त्यातले पाव पाणी तसेच ठेऊन उरलेले कणकेत ओतते. पिठ ताटात न मळता नेहमी गोलाकार भांड्यात घेते. पाणी ओतायचे आणि पाच बोटे त्यात घालुन गोलाकार जोरात फिरवायची. एका मिनिटात गोळा तयार होतो. मग किती घट्ट नरम ते बघुनफिनिशिन्ङ्ग करायचे. दोन तिन मिनिटात कणिक भिजवुन होते. थोडेथोडे पाणी घालत बसले तर मला वेळ लागतो. आणि वेळ घट्ट झालेली कणिक सैल करण्यात जास्त जातो. त्यामुळे मी सरळ पाणी ओतुन फिरवते.

पिठ ताटात न मळता नेहमी गोलाकार भांड्यात घेते. >>> मी पण . कणिक लवकर आणि सहज मळली जाते.

मीही साधना ताई करते अगदी same तस्सेच करते. तरीही मी जास्तीची कणिक भिजवून ठेवते.. च्यामारी रोज रोज तेच तेच कोण करील?
दिवसाला ८ पोळ्या लागत असतील तर १६ ते २० पोळ्यांची कणिक भिजवते अंदाजे गोळे करते व न लागणाऱ्या कणकेचे गोळे झिपलॉक मध्ये किंवा अन्न फ्रेश राहते तसल्या फॉईल मध्ये गुंडाळून फ्रिझर ला टाकते खूप दिवस गोळा अजिबात काळसर न होता जसाच्या तसा राहतो, रोज सकाळी ofc ला जाण्या आधी फ्रिझर मधून गोळा बाहेर काढून ठेवते संध्याकाळी घरी येईपर्यंत नॉर्मल ला आलेला असतो.
भरत. तुम्ही असे करून बघा एकदा

एखाद दोन दिवस फ्रीज मध्ये ही कणीक ठीक रहाते. करुन ठेवलेल्या पोळ्या ही ठीक रहातात.

अंजली Lol तुमच्या पोस्ट मधला उद्वेग वाचुन जाम हसू आलं.

म काय तर!! Lol उद्वेग पेक्षा मोटिवेशन मिळते की चला ..! कणिक रेडी आहे. कडाडून भूक लागलेली असताना कणिक भिजवण्यापासून नि भेंडी धुण्या / पुसण्यापासून तयारी असेल तर कोणाला उत्साह असेल? उगाच का मॅगीला सुगीचे दिवस आलेले ते?!?!

अजिबात तेल एक थेम्ब सुद्धा न घालता कणिक भिजवली असेल तर २ दिवस राहते. तेल घातले असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी काळी पडते.(फ्रिज च्या temp नुसार कदाचित २ दिवस टिकत असेलही माझ्या फ्रीझ मध्ये नाही बॉ टिकत.. !)
जे रोज पोळ्या करत नाहीत त्यांनी नक्कीच फ्रिजर मध्ये ठेवायला हरकत नाही.

पोळी, चपाती, फुलके हे पहा एकदा. लय लय आपशणं मिळतील.

सई चा - पोळी चपातीची गोष्ट हा लेखही बर्‍याच गोष्टी क्लिअर करतो कणिक, पोळी इ. बाबतीत.
त्याच लेखावरची ही माझी कमेंट, आशा आहे की तुम्हाला कामात येइल. बॉन आपेतीत!

लॉकडाऊन मध्ये शिकलेली मास्टरी.

सर्वप्रथम गहू. चांगला गहू असला की कणीक चांगली आणि अर्थातच पुढे चपात्याही चांगल्या होतात हा अनुभव. अगदी टिपिकल गहू रंग येतो पोळीला.
शक्यतो सिहोर/शरबती गहू घेतो आताशा, याच्या पोळ्या/ फुलके अगदी संध्याकाळच्या जेवणापरेंत मऊ राहातात.
लोकवन इ. पोळ्या जरा कोरड्या होतात.
विकतच्या आट्याच्या (कुठलाही ब्रँड - पतंजली, पिल्सबरी, आशिर्वाद, नेचर फ्रेश, इनहाऊस ब्रँड्स इ.) पोळ्या लोकवन गव्हाच्या पोळ्यांपेक्षाही जरा जास्त कोरडसर होतात आणि रंगालाही जरा पांढर्‍या राहातात.

इथे पोळ्या/ चपात्या म्हणजे नेहेमीचे फुलके असं वाचा. आमच्या कडे घडीची पोळी इ. प्रकार करत नाहीत रोजच्या जेवणाला.

तर ही कणीक-कहाणी

तवा, जरा जड चांगल्या थिकनेस चा लोखंडी तवा असेल तर उत्तम. माझ्याकडे लोखंडीच आहे पण मला जरा पातळ वाटतो तो, पोळी पटकन जास्त होते त्यावर.

दोन मध्यम ओंजळभर कणकेचे आकारानुसार १२/१४ फुलके होतात.

कणीक भिजवतांना काहीही घालायचं नाही; (इतक्या कणकेला नेहेमीचा स्टीलच्या पेल्यापेक्षा जरासं कमी पाणी लागतं) कणीक भिजवून पूर्ण गोळा झाला की जरा कडक/स्टीफ लागेल हाताला. आता यात चांगल २ टेबलस्पून तेल घालून अजून एक ५ मिनिटं मळायचं आणि झाकून कमीतकमी १५/२० मिनिटं तरी मुरू द्यायचं. (या वेळात भाजी चिरून फोडणीला घालणं अगदी सहज होतं; वरणभाताचा कुकर ही - डाळ तांदूळ धूवून कुकर तयार करून आचेवर चढवणे हे सगळं होतं. ५-७ मिनिटं जास्त लागले तरी फिकर नॉट अर्थातच!)

पुढे...
तवा स्वच्छ घासून कोरडा करून अगदी बारीक गॅसवर तापत टाकायचा.
तोवर पोळपाट, लाटणं आणि चिमटा स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायचे आणि भिजवलेल्या कणकेचे मध्यम मोठ्या लिंबाएवढे गोळे तोडून ठेवायचे; तसेच ओबडधोबड असू द्यावे.

एका गोळ्याला तळहातांमध्ये जरा मळून गोल पेढा करून घ्यावा; आणि कोरड्या पिठात चांगला सगळ्या बाजूनी माखून मग पोळपाटावर, लाटण्याच्या मदतीनं हलक्या पण स्विफ्ट मूव्ह अ‍ॅक्शन नी पोळी लाटावी. मध्ये एकदा अर्धवट लाटून झालेल्या पोळीला कणीक लावावी लागते.
त्याशिवाय जर अजून लागली कणीक तर वापरावी.

आता तवा तापला असेल, त्यावर लाटलेली पोळी टाकावी आणि दुसरी लाटायला घ्यावी,
दुसर्‍या पोळीला अर्धवट लाटून जेव्हा कणीक लावाल तेव्हा तव्यावरची पहीली पोळी उलटावी आणि आच जरा वाढवावी. इथे ती तव्याला जाम चिकटून बसणे अपेक्षीत नाही.

पोळपाटावरची दुसरी पोळी पूर्ण लाटून तव्यात जायला तयार ठेवावी आणि तव्यावरची पहिली पोळी तव्यावरून चिमट्याने उचलून पलटून (फ्लिप करून) आचेवर टाकावी, पोळपाटावरची लाटलेली पोळी तव्यात टाकावी तोवर पहीली पोळी बर्‍यापैकी भाजून झाली असेल ती डब्यात टाकावी.
(जरा फास्ट अ‍ॅक्शन आहे पण मला जमते म्हणजे कुणालाही अगदी सहज जमेल)
गॅस बारीक तवा गॅसवर विथ सेकंड पोळी. नाऊ, पोळपाट रिकामा इज. तिसरा गोळा लाटायला घेणे.

रीपीट द प्रोसेस.

मला पोळ्या करायला घेऊन त्याची सगळी उपकरणी घासून ओटा साफ करून पुसून व्हायला ३०/३५ मिनिटं लागतात.

टीपा -
पोळ्यांच्या तव्यात शक्यतो तेलाचं काही करू नये; केलंच तर तवा चांगला तारेच्या घासणीनं घासून तेलाचा अंश पूर्णपणे जाईल असं पाहावं.
पोळपाट, लाटणं, चिमटा अगदी कोरडा असला पाहीजे

हुश्य...!

असाच पोळ्यांवरचा एकदम खुसखुशीत लेख आहे - मेघना भुस्कुटे चा - पोळ्या - एक अर्वाचीन छळ

<कणकेत तेल, मीठ व थोडे पाणी घालून एकदा फिरवून मिक्स करा. नंतर एका भांड्यात पाणी घेवून एकीकडे अगदी बारीक धार घालत एकीकडे कणिक फिरवा...... > हे मी तीन माणसांसाठीच्या चपात्या व्हायच्या तेव्हा करायचो आणि बर्‍यापैकी जमायचं.

आताही दोन तीन दिवसांची कणीक एकदम भिजवून फ्रीज करणं हा प्रकार करून झालाय.

माझा आधीचा इनाल्सचा फुडप्रोसेसर होता. आता उषाचा मिक्सर ग्राइंडर ज्युसर + फुड प्रोसेसर आहे आणि त्याची सगळी भांडी बरीच मोठी आहेत. कदाचित त्यामुळे त्यात धड जमत नाही. पाण्याचा अंदाज आहे. त्यातलं निम्मं पाणी आधी घालून मग लागेल तसं हे सगळं करतानाही कधी कधी पीठ पातळ व्हायचं. त्यामुळे फुड प्रोसेसरचा नाद सोडून वर दिलेलं हाताने फिरवायच्या हँडलवालं यंत्र घेतलं. त्यात फुड प्रोसेसरसारखा गुळागुळीत गोळा होत नाही. शिवाय ते भांडं स्वच्छ करायची कटकट. कणकेत हात भरायची सवय नाही + नावड आहे. त्यामुळे आता पूर्णपणे हातानेच कणीक मळणं चालू केलं. फोर्कने पाणी आणि पीठ एकत्र करायचं. गोळा होत आला की मग हात घालायचा , असं करतोय.
ताटाऐवजी गोल भांड्यात करून पाहतो.
ते एग बीटरसारखं उपकरण घेऊन घरातल्या अडगळीत भर घालायचा मोहही होतो आहे.

गोल भांड्यात करून पाहतो. >> हो. ताट किंवा पितळी ऐवजी खोल आणि पसरट तसराळे घ्या. कणकेने भांडे बरबटवत नसाल तर पोळ्या झाल्या की त्यातच ठेवून झाकण ठेवा. पोळीचा डबा घासायचे वाचते Lol

इलेक्ट्रीक आटा मेकरमध्ये राडा न होता कणिक मळली जाते असे एका नातेवाइकांचे म्हणणे आहे. ते केकच्या बॅटरलाही वापरता येते

मलाही कणकेत बोटं गेलेली,किंवा बोटांना ग्रेव्ही भाज्यांचा, वरण भाताचा स्पर्श झालेला आवडत नाही.(तुम्ही कोणी मिसळ केंद्रात पावाचे तुकडे कट मध्ये घालून चमच्याने खाताना पाहिली ती विअर्डो मी.)
अर्थात पंगतीत वगैरे खावं लागलं, चमचा मागायची सोय नसली तर हाताने खाऊ शकते.

हाताच्या अंगठ्याकडच्या तळव्याने मळते.मध्ये मध्ये उलट्या सुरीने हाताला लागलेलं काढुन टाकते.इथे सगळे सांगतात तसं एखाद्या गोल गुळगुळीत कुंड्यात पटकन मळून होते.सुरुवातीला चमचा/फोर्क वापरता येतो, आणि त्याला गोळंत्व आलं की मग पटापट हाताने.

फूड प्रोसेसरमध्ये कणीक भिजवण्याआधी मी त्या भांड्याला आतून तेल लावून घेते. याने रबरबाट कमी होतो. (तेलातही हात घालायचा नसेल तर बेस्टिंग ब्रशने लावू शकता.)
मग कणीक+मीठ घालून आधी कोरडं आणि मग थोडं तेल घालून असं दोनदा क्विक (पल्स) फिरवून घेते. मग बटण ऑन करून वरून अगदी थोडं थोडं पाणी घालत जाते.
कणकेचा पोत पीठ ते रवा ते भगर ते छोटे गोळे ते एक मोठा गोळा असं डोळ्यांदेखत बदलत जातं.
मोठा गोळा झाला रे झाला की थांबायचं.
मग तो गोळा बाहेर काढून काय आणखी चमचाभर तेल/पाणी लागलंच तर ते हातावरच लावून घ्यायचं. ज्या डब्यात कणीक ठेवायची त्यालाही तेलाचा पुसट हात लावून घ्यायचा.

गुळगुळीत कुंड्यात पटकन मळून होते>> मला पण असेच वाटते. पराती पेक्षा माझ्याकडे एक मोठा मिक्सिंग बोल आहे त्यात मस्त मळता येते कणीक. वरचे सगळे सल्ले मस्त आहेत. कधी कधी मऊ कणिक मळायची असेल तर मी थोडे दही आणि साखर घालतो. मस्त मऊ मळली जाते कणिक.

Pages